
साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे “शेरी लिंब” नावाचे गाव आहे, या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीर आहे. शिवकालीन स्थापत्य शास्त्राचा एक अद्भुत उदाहरण म्हणजे हि बारा मोटेची विहीर. हि विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी. साधारण शिवलिंगाचा आकाराची हि विहीर आहे. अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत. विहिरीस आलिशान जिना आणि आत उतरण्यास चोरवाटा आहेत. या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात. या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले. या विहिरीची खोली ११० फुट असून व्यास साधारण ५० एक फुट आहे. विहीर दोन टप्प्यात विभागली आहे. अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर. या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.

विहिरीत खालील बाजूस जिवंत झरा असून या विहिरीत बारमाही पाणी असावे असे दिसते. सध्या या विहिरीची मालकी श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या कडे आहे. लिंब आणि वाई जवळील बावधन हे गाव सध्या श्रीमंतांच्या अधिपत्याखाली असून या विलक्षण आणि अद्भुत अशा विहिरीची महाराजांनी योग्य ती बडदास्त ठेवल्याचे नमूद करावे लागेल.
इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली हि विहीर पाहण्याचे भाग्य लाभले हि म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय.
अतिशय उत्तम माहिती दिली आहे … महेश ट्रेक बुक इंडिया http://www.trekbook.in
LikeLike