बारा मोटेची विहीर : शेरी लिंब, जिल्हा – सातारा

बारा मोटेची विहीर : शेरी लिंब, जिल्हा – सातारासाताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे “शेरी लिंब” नावाचे गाव आहे, या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीर आहे. शिवकालीन स्थापत्य शास्त्राचा एक अद्भुत उदाहरण म्हणजे हि बारा मोटेची विहीर. हि विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी. साधारण शिवलिंगाचा आकाराची हि विहीर आहे. अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत. विहिरीस आलिशान जिना आणि आत उतरण्यास चोरवाटा आहेत. या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात. या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले. या विहिरीची खोली ११० फुट असून व्यास साधारण ५० एक फुट आहे. विहीर दोन टप्प्यात विभागली आहे. अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर. या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे. 


आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो. इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत. इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो. या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र. खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले. या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात. महालातून विहीरीकडे वर पाहताना मोटेच्या पायथ्याच्या कातळावर सुंदर नक्षीकाम केल्याचे दिसते. शेजारी पायाखाली हत्ती तुडविणाऱ्या वाघाचे शिल्प भिंतीस जोडले आहे. समोर शिकारीसाठी झेपाविणाऱ्या वाघाचे शिल्प आहे. त्याशेजारी षटकोनी विहिरीच्या कोपऱ्यात नागोबाचे शिल्प कोरल्याचे दिसते. महालाला जोडून असलेल्या सज्जावर येवून पहिले तर महालाच्या बाहेरील बाजूस खांबावर झुंजणाऱ्या दोन मल्लांचे शिल्प आणि डावीकडील खांबावर कृष्ण आणि गोपिकांचे शिल्प कोरल्याचे नजरेस पडले. एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्या छतावर चढून आलो आणि पाहिला तर इथे सिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत. 

विहिरीत खालील बाजूस जिवंत झरा असून या विहिरीत बारमाही पाणी असावे असे दिसते. सध्या या विहिरीची  मालकी श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या कडे आहे. लिंब आणि वाई जवळील बावधन हे गाव सध्या श्रीमंतांच्या अधिपत्याखाली असून या विलक्षण आणि अद्भुत अशा विहिरीची महाराजांनी योग्य ती बडदास्त ठेवल्याचे नमूद करावे लागेल. 


इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली हि विहीर पाहण्याचे भाग्य लाभले हि म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय. माधव कुलकर्णी

One Comment Add yours

  1. अतिशय उत्तम माहिती दिली आहे … महेश ट्रेक बुक इंडिया http://www.trekbook.in

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s