Rajmachi Fort
![]() |
श्रीवर्धन किल्ला |
![]() |
मनरंजन किल्ला |
आदरणीय भाऊ, जय महाराष्ट्र ..
अर्जंट पत्र लिवण्यास कारन की मागल्या आठवड्यात आपलं ‘भटकंती आत्मा मित्रमंडळ ‘ राजमाची मोटोक्रॉस ट्रेक ला गेलं व्हतं. तिकडं पब्लिक नं जो धुरळा उडीवला त्यो तुमच्या कानावर घालायचा व्हता. म्हनून हे पत्र लिवत हाये. तर त्याचं झालं असं की, ‘अप्पा म्हनले‘ राजमाचीला येनार का म्हनून? मागं धा वर्सापूर्वी माझ्या कालेजातली काही शेंबडी पोरं घेवून मी तिकडं गेलो व्हतो. चांगलं धा-पंधरा कि. मी. पतूर आन ते बी चालत. या येळेला अप्पांनी गाडी काढली तवा मी म्हणलं ‘चला अप्पांनी कधी न्हाय तवा गाडी काढली चला घ्या हात साफ करून ‘. अप्पाला व्हय म्हनलं.
ठरल्या टायमाला हिंजवडी फाट्याव अप्पांची गाडी हुभी व्हती आन आमी छोट्या हत्तीमधनं तिकडं उतरलो. त्याचं झालं असं कि, अप्पांची गाडी पुलाखाली आमी उतरलो थोडा म्होरं. उतरल्या उतरल्या लागलीच अप्पांना फोन लावला. अप्पा म्हनले तुमी मागं नका येवू आमीच फुढ येतो. यंदाच्या टायमाला अप्पांनी कुनीतरी दोन नवीन दोस्त आनलेले व्हते पुन्या मंबई कडले, फोटू वाले दोस्त. तसा आपला अप्पा बघा लई दिलदार मानुस.
तर त्याचं झालं असं की .. अप्पांच्या गाडीत सामान कोंबलं आनी Direct गाडीत घुसलो.. अप्पांना म्हणलं गाडी direct express way ने हाना तर अप्पा NO म्हनले.. वर म्हनले जुन्या मुंबई हायवेला शीन-शिनरी एकदम झाक दिसती तवा तिकडनं जावू .. आपल्याला काय NO तर NO ! दुपारच्या टायमाला गाडी निघाल्यान समदी पोरं अगदी दणकून जेवान करून आली व्हती.
अप्पांनी एकदम जोशात गाडी हाणली अन् तासात लोणावळ्याला touch केली.. तिथं फाट्यावर गाडी siding घेतली आनी अप्पा म्हनले “कुणाला काय बिडी-कडी डबा-बाटली काय करायचं ते हितं करून घ्या, बुलेट वाले दोन पैलवान येनार हायेत” दोन-एक फिल्टर वाल्या वढीत बसलो पैलवानांची वाट बघत बसलो. अर्ध्या तासानं योक छोटा हत्ती मोठ्या हत्तीवर (५५० सी सी बुलेट) बसून आला. त्यामागणं योक श्टाईलभाई ‘डुरक्या सलमान’ लुकड्या हत्तीवरून (३५० सी सी बुलेट) बसून आला. त्यामागनं आपले जय आनी विरू पल्सर वरून तिकडं आलं. समदी मंडळी तिकडं फाट्यावर जमल्याव, अप्पा ‘Go’ म्हनले आन गाडी फुफाटा उडवीत तुंगार्ली गावाकडं निघली. धा वर्सापाठी हिकडं आलो होतो तवा हिकडं काय सुदिक बी नव्हतं.. निस्त जंगल आन फुफाटा.. आन भाऊ काय सांगू तुम्हाला आता ‘अबोबो ह्या एवढाल्या मोठ्या बिल्डिंगा, हे posh posh गाड्या’.
तुंगार्ली गावात घुसलो आन लागलीच अप्पा यकदम ‘Stop’ म्हनले. तर त्याचं झालं असं की अप्पा म्हनले ‘काय बी करून गडाव जिल्बी खायची म्हंजे खायचीच’ काय म्हणावं ह्या अप्पाला आता, ‘तसा ह्या अप्पाच्या जीभंला लहिच चवना, चवन्या बोडयाचा मेला’. अप्पानं गाडी गटारी म्होरं हुभी केली. उतारलो आनी येका मानसाला इचारल, ‘बाबा रे हिकडं जिल्बी कुठशी मिळल म्हनून?’ तर त्यो म्हणाला या माझ्या मागनं मीच जिल्बिवाला हाये. हे म्हनजे ‘जीस्कू शोधा गल्ली गल्ली हौर वो तो अपने परसाकड मे मिली’. तिकडं अप्पाला इचारलं, ‘अप्पा पोरांच्या जेवणाची काय सोय लावली तुम्ही’ अप्पा म्हनले “गड्या, कशाचं काय घिवून बसला.. गडावर चूल मांडायची आज.. हायेस कुठं”.
पुन्यांदा गाडीत घुसलो .. अप्पांनी starter मारला .. तुंगार्ली गावापास्न थोडं फुढ गेल्याव अप्पा ‘RIGHT’ म्हनले आन गाडी right ला हान्ली हिकडं बघावं तर काय हे मोठमोठाले बंगले ह्या महागड्या गाड्या. थोडं फुढ गेलो आन रस्ताच सपला.. म्होरं बघावं तर हे मोठाले दगाड आन ह्यो दांडगा फुफाटा.. अप्पाना म्हणलं “काय हो हे अप्पा, आता या दगुड-धोंड्यामधनं गाडी जात असती का आपली” अप्पा ‘YES’ म्हनले. दोन Bike वाले पैलवान फुढ आनी आम्ही मागनं अशी वरात निघली. अप्पा जीवाला जपत न्हाय पण गाडी वर बघा माधुरी दीक्षित सारखं पिरेम करतो. अप्पा नं अशी काय गाडी हान्ली की गाडीला एक सुदिक दगुड लागला न्हाय. तसं अप्पाच डायव्हिंग म्हंजे काय इचारता राव “निस्त मख्खन.. ते बी साधं नाय तर .. एकदम गावरान मख्खन बर् का.. साधं पोटचा पानी न्हाय हलून द्यायाचा आमचा ह्यो अप्पा”.
धरनाला आडवं जात फुढ निघलो आनी एक घाट लागला, तशी बुलेटवाले रायडर स्लो झाले. अप्पा बी धीम्यान गाडी हाकीत व्हता.. तर त्याचं झालं असं की .. जांभळी फाट्याव जय-विरू ची पल्सर पंक्चर झाली आनी अप्पांनी गाडी siding ला घेतली.म्हणलं झालं का बल्ल्या आता.. तशी न्हाई म्हनायला पल्सार च्या चाकात थोडी हवा शिल्लक व्हती.. “आपले अप्पा ठुसकी मारतात तेवढी”.. अप्पा म्हनले विरू बस गाडीत..

थोडं पुढती गेलो आनी समोरनं दोन जीपा फुफाटा उडवीत येताना दिसल्या, योक महिन्द्राची “थार” गाडी आनी दुसरी आपली कोर्पिओ.. तर त्याचं झालं असं की त्या म्होरल्या थार गाडी मधे ३ संटे बसलेले आनी एक सुंदरी डायव्हिंग करत व्हती. अप्पा ‘STOP’ म्हनले. आपली समदी पोरं तर ‘थार’ वालीकड निस्ती टकामका टकामका बघाया लागली. अप्पा तर जागीच खिळून राह्यला, अप्पाला म्हणलं.. चला म्होरं तर ‘एक नाय आन दोन न्हाय’.. अप्पा तर त्या सुंदरी वर पुरता भाळला व्हता..
अप्पाला म्हणलं, “अप्पा.. तुम्ही काय लाईन मारनार हिच्यावर, तुमच्या कडनं न्हाय आवरणार ती” भाऊ, तुम्हाला सांगतो “ह्या ‘थार’ वालीनं समद्यांच्या काळजावर अस्सा काय वार केला होता म्हनून सांगतो, की समदी मंडळी पुरती घायाळ झाली जणू”.. “आता या छटाकभर रस्त्यावरनं अप्पांची गाडी ‘यशवंती’ आनी त्या सुंदरीची ‘थार’ गाडी कशी काय pass व्हणार होती देवास ठाव” ..
अप्पाला म्हणलं, “अप्पा.. तुम्ही काय लाईन मारनार हिच्यावर, तुमच्या कडनं न्हाय आवरणार ती” भाऊ, तुम्हाला सांगतो “ह्या ‘थार’ वालीनं समद्यांच्या काळजावर अस्सा काय वार केला होता म्हनून सांगतो, की समदी मंडळी पुरती घायाळ झाली जणू”.. “आता या छटाकभर रस्त्यावरनं अप्पांची गाडी ‘यशवंती’ आनी त्या सुंदरीची ‘थार’ गाडी कशी काय pass व्हणार होती देवास ठाव” ..
अप्पाला म्हणलं “गाडी दाबा तिकडं डावीकडं”, तर अप्पा म्हणला, “काय दाबा?” भाऊ तुम्हाला म्हनून सांगतो, “हा अप्पा एक नंबरचा डाम्बिस माणूस, दिसली पोरगी की झालीच याची नियत खराब. मागं आमी कोकनात गेलो होतो तवा येका ठिकानी हा अप्पा पत्ता विचाराया थांबला. तर त्याचं झालं असं की, समोर दोन चिकण्या पोरी हुभ्या होत्या. तवा हा आपला अप्पा म्हणतो कसा, घ्यायचं का आत ह्यांना. तर असं आहे हा अप्पा, खाली मुंडी आनी पाताळ धुंडी. एक नंबर चा डाम्बिस मानुस”. अप्पांनी गाडी डाव्या अंगाला दाबली आनी ती ‘थार’ वाली समद्यांच्या कलेज्यावर वार करून बुंगाट निघून गेली.. अप्पा तर तिथंच थांबला, “म्हणलं, काय हे अप्पा निस्त खुळ लावून घेतलाय अप्पा.. असला नाद बरा न्हाय चला म्होरं” अप्पा ‘YES’ म्हनले आनी पुढती निघालो.

लगोलग अप्पा GO म्हनले, तवा दादा (५०० सी सी बुलेट वाले) म्हनले पोरांना गडावर काय खायला कमी पडाय नगं. म्हनून दादांनी ५ अंडाकरी आनी इस भाकऱ्या अशी आर्डर दिली. आर्डर देवून समदे गडाकड निघली. फोटूवाले, अप्पा, डुरक्या सलमान, जय आनी बिरू, दादा आनी मी अशी वरात चालली व्हती. पुढती फारीस्टाच्या बोर्डा सामोरली डाव्या अंगाची वाट गडाव जाती, असं गाववाले म्हणत व्हते, तसं निघलो. पंधरा मिनिटात समदी पोरं गडाव पोचली. फकस्त ढेरपोटी पोरं मागाहून गडावर जावू लागली. आप्पा आनी आमी खिंडीत पोचलो. हिकडं डावीकडं मनरंजन आनी उजवीकड श्रीवर्धन किल्ला. अप्पा RIGHT म्हनले. गडावर चढताना धाप लागाय लागली. कसनुसा वर बुरुजासी येवून पोचलो. बुरुजाला वळसा मारून दरवाजा लागला. आनी चांगल्या धा-इस पायऱ्या चढून वरती गेलो. हिकडं दोन पान्याची टाकी गावली. तीनिसंजेची येळ व्हती आनी आभाळ यकदम तांबडं भडक होवून गेलं. तर त्याचं झालं असं की, तीनिसंजेची हि अशी शीन शिनरी पाहून समदी फोटूवाली मंडळी चेकाळली. आनी दणादणा फोटू काढाया लागली. भाऊ, “मानुस म्हणू नका, तट म्हणू नका, दरवाजा म्हणू नका, दारी म्हणू नका, बालेकिल्ला म्हणू नका, अगदी खूळ लागल्यावानी भसाभसा फोटू काढत व्हती”. “एक फोटू वाला तर चांगली धा (१०) मिनिटं निस्ता camera चं बटन धरून बसला व्हता”. अप्पांना म्हणलं “काय हो हे खूळ”. अप्पा म्हनले, “त्यांचं फोटू काढणं येगळं असतंय आपलं येगळं असतंय”.. “आपलं बेनं एका सेकंदात एक फोटू काढतंय आनी हे लाखाचा camera घेतलेलं बेनं धा मिनिटात एकाच फोटू काढतंय”. अप्पा म्हनले तू तिकडं दुसऱ्या गडाकड थोबाड आनी माझ्याकडं पाठाड करून हुभा राहा, मी तुझा पाठमोरा फोटू काढतो. ह्यो अप्पा असाच पाणउतारा करतो माझा नेहमी. त्या डुरक्या सलमानचे थोबाडाचे फोटू काढतो आनी आमचे पाठाडाचे फोटू. “आता तुमीच सांगा, फोटू मंदी आमी काय बुड बघायचं का आमचं !”
तिकडं समदी फोटू काढाया अशी खुळी झालेली आनी हिकडं अप्पा डबा टाकाया बसल्यागत बसून फोटू काढत व्हता. अप्पाला म्हणलं अप्पा टमरेल दिऊ का आणून. “अप्पा म्हनले, शेण्या तुला न्हाय कळणार ते. त्यो angle हाय फोटूचा.. computer मध्ये electronic असतंय ते, तुला न्हाय कळणार” .. तू तिकडं तटबंदीवर हुभा राहा तुझा एक बुड-दाखव्या फोटू काढतो.
सगळे अशे फोटू हाणत होते आनी माडेल म्हनून आमास्नी हुभं करीत व्हते. अप्पाला म्हणलं फाडू का पावती धा-धा रुपयाची चांगली कमाई होईल आपली.. आप्पा NO म्हनले.. म्हनले जावू द्या आपलीच पोरं हायेत काय फोटूचा पाऊस पाडायचा तो पाडू दे त्यांना. आपण काय बी बोलायचा न्हाई. आपल्याला काय नो तर नो .. शेवटी अप्पा जरी नो बोलला तरी बी नेहमी अप्पाच right असतो.
मन भरून फोटू काढल्याव अप्पा म्हणले चला बालेकिल्ल्यावर.. मी म्हणलं अप्पा इकडं मस्त गुहा हाये त्यात मुक्काम करू म्हंजे हिव कमी वाजील. तर अप्पा मला NO म्हनाले.. “च्या मारी या अप्पाच्या सदा नं खदा न्हाय न्हाय आनी न्हाय.. सवताच्या घोडा फुढ हकितो हा अप्पा, न्हाय याला बालेकिल्ल्यावर अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला लावला तर नावाचा पंत न्हाय” ..
समदे गडाव निघाले तवर चांगला अंधार पडला व्हता.. बालेकिल्ल्यावर पोचलो आनी तिकडं खांबाजवळ ब्यागा टेकीवल्या. बुरुजाच्या भित्तीला पाठाड टेकवून बसलो.. आनी साम्द्यांसमोर प्रस्ताव ठिवला.. यंदा च्या टायमाला या दादांना (५०० सी सी बुलेट रायडर वाले) मंडळाचा अध्यक्ष करून टाकू.. अप्पांचा वय झालंय आता.. त्यांना उगा कशाला लोड द्यायचा.. समदे कार्यकर्ते व्हय म्हनले.. न्हाई म्हनून सांगतात कुणाला फिल्डींगच अशी लावली होती की.. काय सांगू भाऊ तुम्हाला .. जे काम तुम्हाला मला जमलं न्हाई ते काम येका अंडाकरीनं करून दाखिवलं.. अप्पाचा चेहरा तर बघण्यासारखा झाला व्हता..
हा दादा म्हंजे लई धडाडीचा मानुस.. रांगडा गडी.. खाली गावात म्हणत व्हता “समदं जग हिकडचं तिकडं झालं तरीबी चाललं पर आपल्या पोरास्नी कायबी कमी पडाय नगं”.. तर असा हा मोठ्या मनाचा आमचा दादा.. अंडाकरी येईपर्यंत दादा म्हनले .. चला चूल मांडून घ्या .. आमी या अप्पाला घेवून लाकूडफाटा घेवून येतो.. तिकडं काटक्या आणायला गेलेले अप्पा हरवले.. सगळ्यांनी हाळी दिवून पाह्यली पर हाकेला हाक दिली तर त्यो अप्पा कसला.. कुठं उलटला होता कोण जाने..? ह्या अप्पाला पोकळ बांबूचे फटके दिले पाह्यजे तवा तळ्यावर येयील ह्यो अप्पा.. शेवटी फोटू वाल्यांना अप्पा गावाला आनी समदी निवांत झाली..

शेवटी जग हिकडचं तिकडं झालं तरीबी चाललं पर आजचा master chef वीरूच अशेल.. विरुनी पोरांना कमी पडाया नको म्हनून एक किलोचा भात लावला.. पार भांडं गच् भरलं तरी बी विरू मागं हटला न्हाई.. तासाभरात सैपाक तयार झालं आनी समदी पोरं भूक भूक कराया लागली..
बुरुजावर चटया हातारल्या आनी जेवणावर आडवा हात मारला.. जेवता जेवता आप्पाची खेचाखेची चालू झाली.. “या अप्पाला काय बी इचारा.. तर त्याचं एकच उत्तर..” “हे कुठून आणलं.. तर बुधवार पेठेतून .. ते कुठून आणलं.. तर बुधवार पेठेतून..” किती रुपयाला तर १८० रुपये.. आता काय म्हणावं या अप्पाला.. चायनीज अप्पा कुठला..! “हर चीज १८० रुपय्ये वाला अप्पा !”. “काठी गेली सरणाला आनी अप्पा चालला भजनाला”..
जेवान उरकलं आनी थोडं पुढती धार माराया गेलो तर दगडाखाली काळा इंचू.. तशीच आवर्ती घेतली आनी दादाच्या कानावर घातला .. की इंचू दिसला म्हनून.. दादा समद्यास्नी म्हनले.. “बूट घालून झोपा, गडावर लई इंचूकाटा हाये.. तवा कुठं भोकात बोटं घालाया जावू नका”.. आमी आपलं तंबू गाडला.. आनी तंबूत छोटा चेतन, मी आनी जय-विरू सगळे घुसलो”.. तिकडं फोटूवाले रात्री ढगांचे फोटू काढीत व्हते आनी आमी इकडं आमी तंबूत ताणून दिली.. भाऊ, आत्ता बोला हाय की न्हाय हा फोटू काढण्याचा नाद.. नाद खुळा.. रात्रीच्या येळेला ते बी ढगांचे फोटू..! “एकदा का माणसाला शौक लागला की बिथरतय ते”

मी समद्यांना अप्पा बद्दल दोन शब्द बोलण्याची इनंती केली.. तवा दादा बोलले.. “जरासा डाम्बिस”, जरासा करामती.. जरी असला आपला अप्पा.. तरी आतून लाजाळूचं झाड हाये आमचा अप्पा.. अप्पाला कुणाची वळख लागत न्हाई .. त्याचा कुनीबी दोस्त होवू शकतो.. दोस्ताचा दोस्त आपला दोस्त आनी दोस्ताचा दुश्मन तोबी आपला दोस्त..! तसा आहे आमचा lovely अप्पा.. जसा चेंडूचा न उडणारा टप्पा..” सगळ्यांचा बोलून झाल्यावर मीच म्हणलं “अप्पा तुमी स्टेज वर या आनी दोन शब्द बोला” अप्पांनी आपलं म्हणणं थोडक्यात उरकलं आनी मंडळी आवर आवरी करून पुन्हा परतीच्या मार्गाला लागली..
भाऊ तुमाला सांगतो, जिंदगीतला एक दिस कसा गेलं कळलं न्हाई.. पण एक मात्र खरा भाऊ जाम मजा आली .. जिंदगी अशी पाह्यजे.. बिन-बोभाट.. जराशी सुसाट.. वाऱ्यासंगे उडणारी .. आभाळाला भिडणारी.. मातीत लोळणारी.. तळ्यात डुंबनारी.. मनाला गोंजारणारी.. आनि काय सांगू भाऊ तुम्हाला ! मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही, तुमचा हात असाच राहू द्या.. आमच्या गरीबाच्या डोस्क्यावर.. म्हंजे पुढचा अध्यक्ष मीच .. मग कसला दादा आनी कुठला अप्पा .. सगळ्यांचा कप्पा कप्पा करून टाकतो .. बाकी टाकायला बसल्यावर निवांत बोलू ..
कळावे आपला शेवक
माधव पंत
प्रिय मित्र माधवतुझ्या लिखाणाला साक्षात दंडवत!!!माहोलच, असा हा आपल्या मराठी भाषेत लेहिलेला एक नंबर, कडकडी उतारा माझ्या उभ्या – आडव्या आयुष्यात कधीही वाचला नाही!!!
LikeLike