 |
खांदेरी किल्ला |
खांदेरी-उंदेरी : हि बेटं उथळ आणि खडकाळ किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. खांदेरी आणि उंदेरी बेटांच्या भोवताली खडकाळ किनारा असून (सुमारे २०-२४ फुट खोल ) मोठी जहाजे इथे पोहोचू शकत नाही. खांदेरी – उंदेरी मधील खाडी फ़क़्त छोट्या होड्याच पार करू शकतात. थळ मच्छीमार सोसायटी वरून कोलीवाड्याकडे चालत गेल्यास उजवीकडे उंदेरी आणि खांदेरी बेटांचे सुंदर दर्शन घडते. थळ च्या किनाऱ्यावर मच्छिमार जिथे मासे वळायला ठेवतात तिथून हे किल्ले पाहता येतील.

खांदेरी हा किल्ला दोन टेकड्यांनी तयार झालेल्या बेटावर वसवला आहे. उत्तर – दक्षिण पसरलेल्या या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी इ स १६७९ मध्ये शस्त्रास्त्रे, दारुगोळा, सुमारे तीन एकशे सैनिक आणि तितकेच कामगार पाठवून या किल्ल्याचे बांधकाम सुरु केले. हि बातमी इंग्रजांच्या कानी पडताच त्यांनी हा भूभाग त्यांचा असल्याचा दावा केला. त्यामुळे इंग्रजांनी १९ सप्टेंबर १६७९ रोजी चाळीस एक बंदूक धारी सैनिकांनीशी व्यापारी जहाज घेवून खांदेरी वर हल्ला चढविला, त्या काळी इंग्रजांकडे मराठी आरमारात असणारी, उथळ समुद्रात वेगाने अंतर कापणारी गलबते नसल्याने त्यांना व्यापारी जहाजे वापरावी लागली. त्यांची व्यापारी जहाज (शिबार) खडकाळ किना-यामुळे खांदेरी वर पोहोचू शकले नाही. त्यांना खराब हवामानामुळे परतावे लागले. किनाऱ्यावर परतताना मराठी मावळ्यांनी त्यांचे व्यापारी जहाज सैन्यासह समुद्रात बुडविले. मराठ्यांची गलबते छोटेखानी आणि निमुळती असल्याने त्यांना खांदेरी वर सैन्य सहजी पोहोचवता येत असे, अगदी या उलट इंग्रजाचे जहाज आकाराने मोठे असल्याने खांदेरी त्यांच्या आवाक्यात येत नव्हता. खांदेरी वारीला इंग्रजांचा हल्ला फसल्याची जखम भरते न भरते तोवर इंग्रजांना आणखी एक बातमी मिळाली. ती अशी कि शिवाजी महाराजांनी नेमून दिलेला चौलचा सरखेल दौलतखान आपली कुमक घेवून खांदेरी ला रवाना झाला आहे. हि बातमी काळातच इंग्रजाचे पित्त खवळले आणि आठ जहाजे घेवून सुमारे दोनशे सैन्यानिशी त्यांनी पुन्हा खांदेरी वर हल्लाबोल केला. नौदल सेनापती किवीन याकडे या मोहिमेचे नेतृत्व देण्यात आले. तीन-चार मध्यम आकाराच्या होड्या (खडकांची खोली मोजण्यासाठी सोबत लांबलचक बांबू), दोन व्यापारी जहाजे (शिबार), दोन-तीन मचवा (कोळी लोकांच्या लहान होड्या) इत्यादी फौजफाटा दिमतीला घेवून सेनापती किवीन निघाला. तिकडे अलिबाग वरून खांदेरी कडे गलबतांचा ताफा निघाला, इकडे इंग्रज तयारच होते. त्यांनी पाच गलबते समुद्रात बुडविली आणि मागे फिरलेल्या उरलेल्या गलबतांचा नागोठण खाडी पर्यंत पाठलाग केला. इतका पराक्रम गाजवून देखील इंग्रजांना दर्यावर्दी मावळ्यांना खांदेरी वर जाण्यास रोखता आले नाही. लहान बोटीतून मावळ्यांचे जत्थे च्या जत्थे खांदेरीवर येवून थडकले. या दरम्यानच्या काळात मराठ्यांनी खांदेरी वर मोठ्या संख्येने तोफा उभारल्या. खांदेरी ला एखाद्या छावणी चे स्वरूप प्राप्त झाले होते, शेवटी हा हिंदवी स्वराज्याच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होता.
दौलतखान च्या सोबतीचे मराठे सैन्य जुमानत नाही हे पाहून शेवटी इंग्रजांनी मोघलांचा सरनौबत जंजिर्याच्या सिद्दीची कुमक जोडून घेण्याचे ठरवले. आता एका बाजूला जंजिर्याचा सिद्दी आणि दुसरीकडे इंग्रज अशा दोन कसलेल्या गनिमांशी मराठी सैन्य दोन हात करू लागले. इकडे खान्देरीचा पाडाव होत नाही के पाहून संतापलेल्या सिद्दीने उंदेरी वर किल्ल्याचे बांधकाम सुरु ठेवले. एके बाजूने उंदेरीवर किल्ला बांधायचा आणि दुसरीकडे खांदेरी वरील बांधकामाला अडसर करायचा असा दोन कलमी कार्यक्रम सिद्दी राबवत होता. दरम्यान जर खांदेरी घेतला तर तो स्वतः कडे ठेवून घेण्याचा सिद्दीचा डाव इंग्रज अधिकारी किवीन च्या ध्यानी आला आणि इंग्रजांनी सिद्दी हा शिवाजी महाराजांपेक्षा शिरजोर ठरू शकेल या भीतीपोटी खांदेरी मोहिमेचा जोर कमी केला. इंग्रजांनी माघार घेतली तरी सिद्दी ने उंदेरी चे बांधकाम पूर्ण केले आणि खांदेरी वर तोफांचा मारा सुरूच ठेवला. सुमारे चार-पाच महिने चालले हे चालूच राहिले. शेवटी २७ जानेवारी १६८० दौलत खानाचा पाडाव झाला आणि सिद्दी ने खांदेरी वर कब्जा मिळविला. सिद्दी ने खांदेरी वर ताबा मिळताच मराठी व्यापारी आणि मच्छिमारांना सातावण्यास सुरुवात केली. संभाजी राजांच्या आदेशानुसार सुमारे दोन-अडीचशे मावळ्यांनी उंदेरीवर शिड्या लावल्या.. पण सिद्दी च्या सैनिकांनी हा हल्ला परतवून लावला आणि जवळपास सर्व मावळे मारले गेले. सिद्दीने ८० मावळ्यांची मस्तके कापून माझगाव ला आणली आणि ती त्याने बंदरावरील ८० खांबांना लावण्याची तयारी सुरु केली, पण इंग्रजांच्या आदेशानुसार सिद्दीला असे करण्यापासून रोखण्यात आले.
 |
Underi Fort |
त्यानंतर बरीच वर्षे मराठे आणि सिद्दी यांच्या मध्ये खांदेरी – उंदेरीचा ताबा मिळवण्यासाठी आणि टिकविण्यासाठी युद्ध सुरु राहिले. सन १७१३ मध्ये सरखेल कान्होजी आन्ग्र्यांनी खांदेरी-उंदेरी वर मराठी साम्राज्याचा झेंडा रोवला. इ स १७१८ मध्ये पुन्हा इंग्रजांनी खांदेरी विजयाची मोहीम आखली पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी १७४० ला पुन्हा इंग्रज आणि सिद्दी याच्या तह होवून गड जिंकल्यास तो त्यावरील दारुगोळा आणि शिबंदी, तोफांसह इंग्रजांच्या ताब्यात देण्याचे ठरले. पण रघुजी आंग्रे याने हे प्रयत्न धुळीस मिळवले आणि गडावर आणखी तोफा तैनातीस ठेवल्या. इ स १७५९ साली मानाजी आंग्रे (जे कोलाबा किल्ल्याचे कारभारी होते) यांच्या मृत्यू नंतर सिद्दीने कोलाब्याचा पाडाव केला. याला प्रत्युत्तर म्हणून माधवराव पेशव्याच्या आदेशानुसार रघुजी आन्ग्रेने उंदेरीवर हल्लाबोल केला आणि घनघोर युद्धानंतर उंदेरीचा पाडाव केला. शेवटाला १७९९ साली इंग्रज सेनापती हेज याला खांदेरी मोहोमेचा आदेश मिळाला. दरम्यानच्या काळात खांदेरीवर सुमारे ३०० तोफा तैनातीस होत्या असे त्याला कळले. त्याने तुफानी दारुगोळा आणि सैन्यासह या किल्ल्यांवर हल्ला चढविला आणि किल्ल्यावर युनियन जेक फडकवला. पण हार मानतील ते मावळे कसले. या दरम्यान इंग्रजांच्या कैदेत असलेले जयसिंग आंग्रे याच्या पत्नी रणरागिणी सकवारबाई हिने पुन्हा खांदेरी वर प्रतिहल्ला चढवून या किल्ल्यावर भगवा फडकवला.. पण शेवटी काफिरांनी तिला आमिष दाखविण्यात आले कि खांदेरी वरचा ताबा सोडला तर जयसिंग आन्ग्रेंची सुटका करण्यात येईल. पतीप्रेमापोटी तिने या किल्ल्याचा ताबा सोडला.. पण इंग्रजांनी जयसिंग आंग्रेंचा वध केला आणि रणरागिणी सकवारबाईस तुरुंगात डांबले. आणि १८१८ ला जसे भारतावर इंग्रजांचे राज्य आले तसे या किल्ल्यांचे स्वामित्व इंग्रजांकडे गेले. सुमारे सव्वाशे वर्ष स्वराज्याची साथसोबत करणाऱ्या या किल्ले द्वायींना इंग्रजांनी त्यांच्या राज्यात सामील करून घेतले. पुढे इथे दीपगृह उभारण्यात आले, आता जे दीपगृह किल्ल्यावर पाहायला मिळते ते इंग्रजांच्या टायमाचे बरंका..
 |
खांदेरी किल्ल्याची भरभक्कम तटबंदी |
खांदेरी किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे वेताळ मंदिर, धातुनाद शिळा, मंदिरे, भरभक्कम तटबंदी, दीपगृह, पिराची कबर, पाण्याचा तलाव, आणि तोफा.. किल्ल्यावार फेरफटका मारायचा तर तासाभराचा वेळ हवा.. किल्ल्याची तटबंदी हि मोठ मोठाले चि-यांचे थर रचून केलेली दिसते.. आकारमानाने मोठ्या असणा-या ह्या ची-यांमुळे लाटांचा आघात सोसत हि तटबंदी अजूनही ठाण मांडून उभी आहे
इथे वेताळाला शार्क माश्याचा कणा वाहण्याची प्रथा आहे .. इथे या फोटो मध्ये हा कणा मागे छतावर पाहता येइल .. खांदेरी किल्ल्यावर पीर आणि वेताळ असा दुहेरी देवांचा वरद हस्त आहे .. कोळी बांधव पावसाळ्यात होड्या पाण्यात सोडताना दोन्ही देवांची पूजा करतात आणि मागचा पुढे जातात ..
 |
मी सर केलेला 100 वा किल्ला .. उंदेरी किल्ला |
बिरवाडी किल्ला :
बिरवाडी हा किल्ला मुरुड गावापासून पासून अगदी हाकेच्या अंतरावर (5 कि.मी.) असा आहे. रोहा ते मुरुड रस्त्यावर (फणसाड अभयारण्याच्या अलीकडे.. रोह्यापासून 17 K.M.) चणेरे नावाचे गाव लागते ह्या गावातून बिरवाडी गावाची वाट जाते.. बिरवाडी गावातून आता गाडीने थेट बिरवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भवानी देवी मंदिरापर्यंत जाता येते. गडावर जाण्यासाठी पुष्कळ वाटा आहेत..
 |
बिरवाडी किल्ला मुख्य प्रवेश द्वार |
पहिली वाट भवानी मंदिराशेजारून डोंगराच्या नाकाडावरून (spur) जाणारी.. वाटेत शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलाआहे. एक मध्यम श्रेणीचा rock patch पार करत आपण किल्ल्याच्या बुरुजाच्या जवळ येवून पोहोचातो. बुरुजाला उजवीकडून वळसा मारून पुन्हा थोडं वर जाताच गडाचा भग्नावस्थेतील चोर दरवाजा दिसू लागतो. वरून एखादया पाणी शेंदण्यासाठी बांधलेल्या मोटे सारखा जरी भासत असला तरी हाच गडाचा चोर दरवाजा. गडावर जाण्यासाठी हीच सगळ्यात जवळची वाट.
दुसरी वाट टेकाडाला वळसे मारत जाणारी. मंदिराची वाट सोडून डावीकडची वाट आपल्याला गडाच्या मुख्य दरवाजाकडे घेवून जाते.गडाचा मुख्य दरवाजा अजून सुस्थितीत असून त्या भोवतालचे चार बुरुज अजून भरभक्कम अवस्थेत आहे. कातळ पाय-यांनी चालत दरवाजातून आत शिरताच समोर पाण्याचं टाकं दृष्टीस पडते. या टाक्याच्या अलीकडूनच गडाच्या बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट आहे.
या वाटेने तिरपे वर जात पुढे उजवीकडे वळायचं. आपण नुकतीच चढून आलो ती वाट आता आपल्याला उजवीकडे खाली दिसत राहते. असं चालत 15-20 मिनिटात तुम्ही बालेकिल्ल्यावर दाखल होता.गडावर वाड्याचे चौथरे पहायला मिळतात. बालेकिल्ल्याचा परीघ आटोपशीर असून दहा एक मिनिटात फेरफटका मारून गड दर्शनाची सांगता करता येईल.
सलग तीन-चार दिवस हातात असतील तर बिरवाडी, जंझिरा, सामराजदुर्ग , पद्मगड, कोर्लई, रेवदंडा, सर्जेकोट, कोलाबा किल्ला, थळ , खांदेरी-उंदेरी असा जम्बो ट्रेक आखता येईल .
 |
बिरवाडी किल्ला मुख्य प्रवेश द्वार |
 |
बिरवाडी किल्ला – महाराजांचा पुतळा |
Like this:
Like Loading...
Related