कुठं कुठं जायाचं ट्रेकिंगला (Rain Trekking in Sahyadri)
“लोणावळा खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा .. राजगड – तोरणा नी जुन्नरला.. कुठं कुठं जायचं ट्रेकिंगला.. सांगा कुठं कुठं जायाचं ट्रेकिंगला”.
जून महिना सरला, जुलै अर्धा उरला तरी वरुणराजा उभ्या देशावर रुसला. कुठल्याही कट्ट्यावर जाऊन बघा तुम्हाला पावसाची वाट पाहणारी घुमक्क्ड मंडळी उसासे टाकताना दिसतील. “अरे, पावसाने दडी मारली बहुतेक यंदा” पासून “आयला या पावसाने खप्पा करून टाकला पार, आता ! गटारी जवळ आली तरी याचा पत्ताच न्हाय” असे संवाद कानावर पडतात आणि मन अस्वस्थ होवू लागतं. तसा पावसावर प्रेम न करणारा मराठी माणूस.. विरळाच.
आता बळीराजा शहरात यायला तयार नाही हे पाहून म्हटलं, गावात, डोंगर् वस्तीला कुठे सापडतोय का ते बघावं ! तोरणा किल्ला पाहून झाला, लोहगड-विसापूर पाहून झाला, पेडगावच्या बहाद्दूरगडावर जाऊन आलो. जवळपासची पंचक्रोशी पालथी घातली पण पाऊस गायब, आता या पावसाचा माग काढत चेरापुंजी पर्यंत जायचं की काय? तिकडं आसाम मध्ये अतिवृष्टी आणि इकडे साधा दोन टमरेल पाऊस नाही. तब्बल दीड महिना या पावसाचा माग काढत राहिलो. मागच्याच आठवड्यात भुलेश्वरला गेलो. जाताना आपण बिनदिव्याच्या गाडीतून एखाद्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करायला आलो की काय असं वाटायला लागलं. भुलेश्वर ला पोहोचलो आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली.. भर पावसात भेळबत्ता खावून परत निघालो तर पाऊस आमच्या सोबतंच निघाला पुण्याकडे. पार बापदेव घाटापर्यंत पठ्ठ्या आमच्या डोकावर थयथया नाचत होता. घाटात पोहोचलो आणि सुमारे सव्वा तीन हजार लिटर क्षमतेचा एक धिप्पाड ढग आम्हाला आडवा आला. लगोलग धुक्यात सगळी गाडीवाट हरवून गेली आणि घाट उतरायला चारचाकी गाड्यांनी मुंग्यांसारखी लाईन लावली. या पावसाने थेट घरापर्यंत सोबत दिली, म्हटलं “आला रे आला.. एकदाचा.. पाऊस आला”. कसलं काय ! सकाळी उठलो तर काल पहिलं ते स्वप्न होतं की काय? असं वाटावं ! एवढं निरभ्र आकाश.. एकदम सफाचक.
इकडे हवामान खाते सांगतय की सरासरी गाठणारा पाऊस होईल. आज होईल, उद्या होईल आणि परवा होईल. “यांनी आकाशात कागदी उपग्रह सोडला की काय अशी शंका यावी”, असे हवामान खात्याचे अंदाज. मला तर वाटतं ज्या दिवशी आपल्या हवामान खात्याचा अंदाज बरोबर येइल त्या दिवशी, “विकासदर उणे पाच असेल, पेट्रोल ५५५ रुपये लिटर आणि दारू १०० रुपयात एक चमचा मिळेल”.
पण पावसाचे अंदाज चुकले म्हणून हाडाचे घुमक्क्ड काही नाराज होत नाही. ते निघतात वाट फुटेल तिकडे. या भटक्या मंडळींचे हवामानाचे अंदाज अचूक असतात. कुणी अनुभवी भटक्या आंबोली घाटात शिरतो तर कुणी थेट कळसूबाई, काही हौशी भटके भिमेशंकरला जातात गोंडस ब्लू मोर्मन चे फोटोशूट करायला तर काही वासोट्याच्या जंगलात. शेवटी पाऊस शहरात फिरकत नाही म्हटल्यावर तो असेल तिकडे जाऊन भिजयालाच हवं आणि गड माथ्यावरचा तोऱ्यात कोसळणारा पाऊस काही औरच.. एकदम सप्तरंगी. तुम्हाला कसला पाऊस हवाय? रिमझिम बरसणारा की मुसळधार कोसळणारा.. भुरभूर पडणारा की तडतडा ताशे वाजविणारा.. कुत्र्यासारखा पडणारा की नको नकोसा वाटणारा.. यातल्या कुठल्याही टाइपचा पाऊस पहायचा तर “चला पावसाळी भटकंतीला”.
कधी माथेरानच्या विकटगडावर, राजेशाही राजमाचीवर, सिंहगड-राजगड-तोरणा, नानाच्या अंगठ्यावर जावून पहा.. कदाचित सापडेल तुम्हाला पाऊस.. थोडासा अवघडलेला, तोंड लपवून ढसाढसा रडणारा आणि थंडगार वाऱ्यावर भिरभिरणारा असा जीवा-भावाचा पाऊस सापडेल तुम्हाला. नक्की सापडेल तुम्हाला पाऊस.. कधी कोयनेच्या खोऱ्यात तर कधी माणदेशी तोऱ्यात, कधी माथ्यावरच्या रानात तर कधी चांदोलीच्या वनात, कधी घाटा-घाटात आणि कधी आड-वाटात नक्की सापडेल बघा ! तुम्हाला हा काल हरवलेला पाऊस आणि सापडलाच तर इतरांनाही कळवा त्याचा सध्याचा पत्ता.
शहरात दारं बंद करून बसणाऱ्या लोकांना मात्र पावसाचा स्क्रीन सेव्हरच लावावा लागणार आणि पहावा लागणार बंदिस्त आठवणीमधला पाऊस.. किंवा फेसबुकात एखादा जुना-पुराना पावसाळी फोटो टाकून लाईक्स चा पाउस पडेपर्यंत पुन्हा वाट पहावी लागणार. जिथे नोटांचा, आश्वासनांचा, हरवलेल्या संस्कृतीचा आणि गल्ली बोळातून रक्ताचा धो-धो पाऊस पडतोय, तिथे खोट्या पैशाला हुरळून .. रिमझिम पडणारा पाऊस आता हवाय कुणाला?
माधव कुलकर्णी – २०१२