सांगाती गडवाटांचे
“अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती, दोन दिसांची हि भटकंती दोन दिसांची नाती..”. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात भटकताना जेव्हा विचारांचा भुंगा मानगुटीवर बसून मन पोखरत असतो.. तेव्हा माझ्या सह्याद्रीचे सांगाती गडवाटांवर भटकताना मला साथ सोबत देतात. भटकंती दरम्यान भेटलेले हे सांगाती आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये ही एका पेक्षा एक सरस अशी.. कसलंही कपट नाही की कसलाही माज नाही.. फक्त एक आटापिटा.. रोज मर्रा की जिंदगीतला एक दिवस पुढे ढकलण्यासाठी.. अशाच काही अवली सांगातींच्या भेटी दरम्यान चे काही प्रसंग, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये शब्दात गुंफण्याचा हा एक तुटपुंजा प्रयत्न.
१. जिभाऊ :- जिभाऊ.. हा बागलाणच्या मातीत जन्मलेला, शेतीकामात जुंपलेला, संसाराचा गाडा नेटानी हाकणारा, आमच्या बागलाण मुशाफिरीतला साल्हेर-सालोटयावर साथ सोबत करणारा वाटाड्या.. काटक शरीरयष्टी .. शरीर कसलं यष्टीच म्हणा ना हवं तर ! दोन्ही गडांची खडा न खडा माहिती ठेवणारा एक हरहुन्नरी वल्ली. साल्हेर सालोटयाच्या खिंडीत शरीराचे मुटकुळ करून, भाकरी तुकडा करून खाणारा, माझा औट घटकेचा मैतर. साल्हेरच्या गुहेत कुडकुडत शेकोटीच्या उबेत, रात्रीच्या बोचऱ्या थंडीशी झुंजणारा.. त्याला प्रेमानं आम्ही भाउजी म्हणायचो. साल्हेरच्या पायथ्याला असणाऱ्या धोडंबे गावी कधी गेलाच तर यांना आवश्य भेटा.
२. कोंडाबाई :- “नाव कोंडाबाई, कटी ताकाचा घडा”. तोरण्यावर गिरीदर्शन संस्थेने १०० लोकांची टीम घेवून स्वारी केली. कोंडाबाई ताक विकायला या टीमला ओव्हरटेक करून थेट महादरवाजात हजर. “दहा ताकावर एक ताक फ्री !”. मेंगालाई देवीच्या मंदिरावर मुसळधार पावसात भिजत ताकाचं मार्केटिंग करत होत्या. जरा चौकशी केली तर ताक विकणे हा त्यांचा जोड व्यवसाय. भात शेतीची काम सुरु होण्याआधी जोडधंदा करून चार पैसे गाठीला लागतील म्हणून हा जीवाचा एवढा आटापिटा. स्लीपरवर निसरड्या वाटेने कोंडाबाई तोरण्याचे अवघड टप्पे लीलया पार करत गडावर कशा काय येऊ शकतात याचेच आश्चर्य वाटते. इकडे Woodland, एक्शन ट्रेकिंग, केच्वा शूज वाले निसरड्या वाटेवर सरसर सटकतात तिकडे कोंडाबाई त्याच निसरड्या वाटेवर स्लीपरवर तोरणा अर्ध्या वेळेत सर करतात. “मला तर कोंडाबाई साक्षात हिरकणीचा आवतार वाटल्या”.
३. हाजीलाल :- साताऱ्या जवळी भूषणगडावर फोटो काढताना दुपारी दहा ते बारा वयोगटातील शाळकरी ट्रेकर चा जत्था गडावर आला. त्यातलं हे चुणचुणीत पोरगं.. हाजीलाल. अत्यंत गोंडस, बटबटीत डोळे, शाळेचा गणवेश, अनवाणी आणि चेहऱ्यावर सुमधुर हास्य. असा आमचा ज्युनिअर ट्रेकर हाजीलाल. एक मळकी पिशवी काखोटीला मारून भर दुपारच्या उन्हात याची गड प्रदक्षिणा जोरदार रित्या चालू होती.. म्हणतात ना “जातीच्या हिऱ्याला घामाचंच कोंदण..”
४. पांडुरंग गाईड :- ढाक ते भीमाशंकर हि भटकंती मी पंधरा वर्षापूर्वी केली त्यावेळी गावातून वाटाड्या घेतला होता.. पांडुरंग गाईड.. ढाकपासून उजवीकडे कुसुर् गावाकडे निघालो. दुपारच्या उन्हात मुकाट खाली मुंडी घालुन पद्मभ्रमण चालू होते. अचानक पांडुरंग ओरडला रानडुक्कर आलं.. रानडुक्कर आलं.. रानडुक्कर समोरनं तिरपं आलं तसा सगळ्यात आधी पांडुरंग झाडावर चढून बसला. रानडुक्कर पापणी लवते न लवते तोवर समोरून दहा फुटावरून पसार झालं.. तरी.. आमचा पांडुरंग गाईड अजून झाडावर... म्हटलं, :गेलं रानडुक्कर खाली यां आता”.. खाली उतरताच त्याला खडसावलं .. दादा.. “आता वाटाड्याच असा झाडावर चढला तर वाटसरूंनी काय कराव?”
५. आडया – धोंड्या :- हा धनगर मला तोरणा ते रायगड या जम्बो मोहिमेत मोहरी – सिंगापूर गावात भेटला. साधारण ४० मेढयां, दोन कुत्री, काखोटीला मारलेल्या दोन कोंबड्या, सोबतीला एक मिसरूड नं फुटलेलं पोरगं आणि निम्न तराट अवस्थेत हा वली सिंगापूर नाळेतून खाली पाने गावात निघाला होता.. माझा दोस्त प्याऱ्याने (परितोष ने) त्याची उगाच खेचाखेची सुरु केली. “गावाकडची मानस लई दणकट असतात, लही strong, लई पावरबाज असत्यात.. वगैरे वगैरे”. आडया –“तर मंग ! अकरा पोरं झाली मला. पण बारावा नम्बर लावला हाये”. “सरकारची मानसं आली व्हती नसबंदी कराया. सगळी मानसं गाडीत कोंबली व्हती, पण मी चालत्या गाडीतनं उडी मारून पळून आलो. काही बी झालं तरी बारावा झालाच पाहिजे. या समद्या पंचक्रोशीतील मानसं मला वळीखत्यात”. आडया – धोंड्या म्हणतात मला..!
६. श्रीकांत शिंपी / गंपू :- हा अवली भटक्या मला सातारा circuit ला भेटला. भर उन्हात साताऱ्यातले किल्ले भटकताना त्याने चकार शब्द काढला नाही. माझीच नुसती बड्बड. पण गंपू शांत, मितभाषी आणि स्वमग्न असा. फोटोग्राफीच्या विश्वात रमलेला. याला काहीही विचारा याचं उत्तर ठरलेलं.. ‘हं’ (ह्म्म्म) ! श्रीकांत अरे लग्नाच कुठपर्यंत आलंय – ‘हं’ !श्रीकांत अरे मुलगी वगैरे पाहीली कि नाही – ‘हं’ ! काय विचारलं तिला कांदे पोहे कार्यक्रमात – ‘हं’ ! आता याच्यासमोर काय डोके बडवायचं की काय? याचं ‘हं’ ! म्हणणं हि एक कला आहे. हा आपले सगळे संवाद दुर्लक्ष करून स्वतःशी काहीतरी विचार करत असतो आणि दुसऱ्याचं म्हणणं फक्त ऐकलय हे सांगण्यासाठी हळूच ‘हं’ ! करतो. तुम्हाला सांगतो हा गंपू जरी जास्त बोलत नसला तरी याची छायाचित्र बोलतात..!
७. मि. इंडिया नावाडी : – सिंधुदुर्गाचा उपदुर्ग पाहण्यास निघालो. एखादी तरी (लहान होडी) मिळण्याची वाट पाहत दांडगेश्वर मंदिरासमोरील पुळणीवर उन खात बसलो होतो. साधारण दहा पंधरा मिनिटात मि. इंडियाचे तरी (लहान होडी) घेऊन पुळणीवर आगमन झाले. युवराज सुयोगचा एक लाखाचा कॅमेरा आणि स्वतः युवराज यांचं तोलामोलाचा जीव सगळं पणाला लावून तरीत बसलो. लाटांवर ती तरी (लहान होडी) अशी काय हेलकावत होती की, “आता बुडते का मग बुडते”. पण मि. इंडिया एखाद्या वेताळा सारखा झपाटल्याप्रमाणे होडी चालवत होता.. चार-दोन वल्हे, असंख्य लाटा, लाटांवर डामडौल अशी आमची तरी आणि सोबतीला जोरदार घोंगावणारं रग्गेल वारं… तरीही न उडणारी मि. इंडिया ची HAT सारंच अद्भुत. शेवटी एकदाची नाव पल्याड गेली आणि टांगलेला जीव भांड्यांत पडला…
८. बंटी द क्लाय्म्बर:- तैलबैला प्रस्तरारोहण मोहिमेत हा अवली भेटला. सपासप रॉक patch मारून शेवटच्या overhangकातळाला भिडून वर Belay देण्याचे चे काम करायला सज्ज झाला. पोट सुटलेल्या निमवयस्क मंडळींची हा कातळ चढताना पुरती दमछाक झाली होती .. रॉक क्लाय्म्बर्स च्या भाषेत सांगायचं झालं तर एकेकाची बादली झाली होती. ७०/८० किलोचा ढेरपोट्या बादल्या Belay ने ओढनं काही येड्यागबाळ्याचं काम नव्हे.. पण हार मानेल तो बंटी कसला. “कम ओन कम ओंन इंडिअन आर्मी, एक कवटी दोन हडडी” म्हणत त्यानं ढेरपोट्या ट्रेकर मध्ये असा काही जोश निर्माण केला की ७०-८० किलोच्या हेवी वेट बादल्या Summit (गिरीमाथ्या) कडे निघाल्या.
९. बाला ठाकूर :- हा नमुना मला प्रचीतगडाच्या ट्रेकला भेटला.. पहिलाच ट्रेक, हौस मौज करायची म्हणून ट्रेकला आला होता आणि ट्रेक कुठला निवडला तर प्रचीतगड.. ते पण शृंगारपुर मार्गे, कोकणातून चढाई आणी ते ही भर उन्हाळ्यातळी.. हा जेमतेम तासभर डोंगर वाटांवरून चालला आणि एका झुडूपाखाली पाला-पाचोळ्यात आडवा झाला, पूर्णतः निर्जलीकरण झाल्यासारखा.. जीभ अर्धा हात बाहेर, पोट सारखं आत-बाहेर.. याचं पोट आणि जीभ जणू एका लयीत संथपणे हलणारी .. पण हो नाही करत हा पठ्ठ्या प्रचीतगडावर एकदाचा दाखल झाला.. सकाळी साडे-आठ वाजे पर्यंत निवांत घोरत पडला होता.. सकाळी ट्रेक लीडर कर्नल विकास त्याला म्हणाला “उठो बालां ठाकूर उठो जल्दी, आज सिर्फ २० कि.मी. चलना है !”.. बाला ठाकूर मनातल्या मनात म्हणाला, “कल इतना हार्ड Rock Patch चढाया.. जैसे जिंदगी से उठाया था.. आज अच्छी भली निंद से उठाता है !” “उठाले रे बाबा उठाले… अरे मेरेकू नही रे बाबा .. इस कर्नल कू उठाले !”
१०. गुंड्या:- हा इसम एक अघोरी ट्रेकर आहे, कमळगडावंर पहिल्यांदा याची गाठ पडली. याचं गड चढण्याचं गणित फक्त काही मिनिटात सुटतं. आम्हाला हेच गणित सोडवायला तास नं तास लागतात इकडे याचं गणित फक्त काही मिनीटाचंच.. “कमळगड ४० मिनिटे, माहिमानगड ७ मिनीट, वर्धन गड ११ मिनीट तर भूषण गड ८ मिनीट”.. पर्वती शून्य मिनिटे.. डोंगराची सोंड दिसली कि हा धारेवरून.. सोंडेवरून पळत सुटतो. असा हा आमचा Marathon ट्रेकर… गुंडया.. फक्त गडमाठ्याची दिशा धरायची आणि पळत सुटायचं माथ्याकडे.. त्याचा पाठलाग करताना आमचा कमळगडावर पुरता फेस निघाला होता… Catch Him If You Can!
११. पिंट्या दादा :- निमगिरी-हनुमंतगडाच्या पायथ्याच्या गावात विचारणा केली… कुणी येतंय का वाटाड्या म्हणून? तिथे एक दहा-अकरा वर्षाचा चुणचुणीत पोरगा होता.. पिंट्या .. गावातला एक माणूस त्याला म्हणाला, “जातो का गडावं? तुला हि लोक काही बिस्किट देसान आणि वरती थोड पैसं.. जातो काय बा?.. पोरगा तयार झालं.. भर उन्हात ती खिंड चढताना पुरता दम लागला.. पोरगं सपासप मार्ग कापत होतं. डोक्यावर टॉवेल, घारे डोळे आणि घामाच्या सोनेरी थेम्बाने चमकणारे त्याच कपाळ.. सारच अद्भुत.. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती.. गडाच्या खाणाखुणा कोळून प्यायला होतं हा पिंट्या.. घोडे बांधायची पागा.. हनुमान मंदिर, आणि सिंदोळा किल्ल्याकडे उघडणारी गुहा.. सगळा गड १५-२० मिनिटात दाखवला पिंट्या ने.. गड उतरलो त्याला बिदागी दिली आणि सप्रेम भेट म्हणून एक अकरा मारुतीची टोपी.
तर दोस्तहो हे असे माझे जिवाभावाचे सांगाती.. अचानक या सह्याद्रीच्या वाटांवर भेटले आणि मनावर ठसा उमटवून गेले.. आजही कधी उदास वाटलं तर .. डोळे बंद करायचा अवकाश.. माझे जिवाभावाचे सांगती.. येतात माझ्या आठवणींच्या चित्रपटातील एक पात्र म्हणून..
मग चला भटकायला वळणावरच्या वाटांवर.. आरस्पानी लाटांवर .. डोंगराच्या वाऱ्यावर आणि सह्याद्री च्या धारेवर .. सापडतील तुम्हालाही असेच काही अवली, हरहुन्नरी सांगती.. सांगाती गडवाटांचे !
माधव कुलकर्णी – २ ऑगस्ट २०१२
फार मस्त रे. हे असे सवंगडीच तर प्रत्येक ट्रेक मेमरेबल करत असतात. प्रत्येकाची काही न काही स्पेशालिटी आणि प्रत्येक जण आपली काळजी घेणारा.बाकी श्रीकांतबद्दल \”हं\” !
LikeLike