आम्ही जातो अमुच्या गोवा ..!!!
#१. अग्वाद किल्ला, अप्पर आग्वाद आणि लोअर अग्वाद (Aguada Fort – Upper and Lower)
#२. रीस मागुस किल्ला (Ries Magos Fort)
#३. छापोरा किल्ला (Chapora Fort)
#४. तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)
#५. रेडी किल्ला
#६. वेंगुर्ले कोट / डच वखार (Dutch Factory / Vengurle Kot) – Sagreshwar Beach, Mochemad Beach, Vengurle Port Beach,
सर्वसाधारणपणे गोवा म्हटलं की डोळ्यासमोर एक चित्र तरळतं, “नारळी-पोफळीच्या बागा, कलंगुट-बाघा समुद्रकिनारा, एक सो एक चापेल (चर्च), एक दुजे के लिये फेम डोना-पौला, गोवन फिश करी, चार्मिंग वर्षा उसगावकर आणि ‘गुपचूप गुपचूप’ चित्रपटातला प्रोफेसर धोंड” या अशा एक ना अनेक गोष्टींसाठी दुनियामे ‘वर्ल्ड फेमस’ आहे. गोवा तसं बरचसं चंगळवादासाठी प्रसिद्ध आहे. गोव्याला जायचं ऐष करायची म्हणजेच काय तर पडेस्तोवर ढोसायची आणी उताणं पडायचं अशीच काही सर्व साधारण मौजमजेची व्याख्या आहे आजकालच्या तरुणाईची. पण गोव्यात जाऊन नेमकं पहायचं ते काय? याचा अनेकांना पत्ताच नसतो.
गोव्यात पाहण्यासारखं बरंच काही आहे. पुरातन मंदिरे, मशिदी, चापेल, आरस्पानी–महाकाय असा दुधसागर धबधबा, मंदिरे, साहसी जलक्रीडा आणि एक पेक्षा एक असे भरभक्कम किल्ले. मागच्या महिन्यात गोवा ट्रीप ठरली आणि ठरवलं यंदा गोव्यातले जमेल तेवढे किल्ले पाहून घ्यायचं. गुगल इंटरनेट प्रणाली वर शोध मोहीम राबवली आणि या निसर्गरम्य गोव्यात तब्बल वीस-बावीस किल्ले असल्याचे कळले.
सांगायचच झालं तर भव्य आग्वाद किल्ला (अप्पर आणि लोअर आग्वाद किल्ला), डागडुजी करून पुन्हा उभारलेला रीस मागोस किल्ला, दिल चाहता है फेम छापोरा किल्ला, बार्देझ तालुक्यातील कोर्जुएम किल्ला, गोवा स्वतंत्रता संग्रामाचा साथीदार तेरेखोल किल्ला, महाराजांचा पोंडा किल्ला, तिविम चा किल्ला, श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन असा काबो-डी-रामा फोर्ट, डिझायनर रांगोलीसारखा दिसणारा ‘अलोर्मा किल्ला’, सातारी जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला राजबिंडा नान्नज किल्ला, राचोल किल्ला, मार्मागोवा किल्ला, कारवार जवळच्या बेटावरचा अंजदीव किल्ला, दिवार बेटावरचा नरोआ किल्ला, कोलावले किल्ला, कोर्जुएम किल्ला आणि सांखळीचा भुईकोट किल्ला अशी भली मोठी लांबी चौडी किल्ल्यांची यादी. किल्ल्यांचा हा एवढा खजिना पाहून पाय शिवशिवायला लागले.. यंदाच्या गोवा मोहिमेत बार्देझ जिल्ह्यातले शक्य तेवढे किल्ले पाहून घ्यायचा चंग बांधला.
आता काही दिवटे म्हणतील ही गोव्याला जायचं आणि किल्ले पाहायचे? बीचवर जाऊन डोळ्यांची दिवाळी करायची का भटकत्या भुतासारखं उध्वस्त किल्ल्यांवर भटकायचं अतृप्त नजरेने. का आणि कशासाठी? कशासाठी तर, “या जगाच्या पाठीवर कुठल्याही डोंगरावर आणि दूरवरच्या कुठल्याही किल्ल्यावर जा, तुम्हाला एक असा काही विलक्षण नजारा पाहायला मिळतो की, बस्स यही लाईफ है ! असं वाटल्याशिवाय राहणार नाही”. पण हा नजारा पहायला डोळ्यावर घातलेला चंगळवादाचा चष्मा काढायला हवा आणि करावी लागणार जराशी तंगडतोड, करावा लागणार माथा गाठण्यासाठी थोडासा जीवाचा आटापिटा..
गोव्याचा नकाशा चाचपून पाहिलं तर बार्देझ जिल्ह्यातच पाच सहा किल्ले पाहिले. मग काय ! कलंगुटला पोहोचलो, ताबडतोब भाड्याची दुचाकी गाडी घेतली, बिगीने आग्वाद, रीस मागोस आणी छापोरा किल्ला पाहण्यास निघालो.
आग्वाद किल्ला.. आग्वाद म्हणजे पोर्तुगीज भाषेत ‘पाणी’. आग्वाद किल्ल्यावर २० लाख Gallon पाण्याचा साठा आहे. या शिवाय दिपस्तंभ, खंदक, भरभक्कम तटबंदी, वैशिष्ट्यपूर्ण जीने आणि समुद्राच्या लाटांवरुन तरळत थेट श्वासातून आरपार जाणारा आल्हादायक वारा. ‘आग्वाद किल्ला’ हा एक पुळणीवरच्या टेकाडावर बांधलेला एक भव्य किल्ला आहे. एके काळी गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगीज कारभाऱ्यांचं सत्ताकेंद्र. आग्वाद किल्ला पहायचा तर ताज हॉटेल जवळील लोअर आग्वाद पाहायलाच हवा. समुद्रावर धडाकणाऱ्या लाटांना छेदत उभां ठाकलेला विशाल बुरुज, इथे कुण्या एके काळी जहाज उभी करत असं म्हणतात. आग्वाद किल्ल्याचा काही भाग टाटांच्या हॉटेल साठी देवून टाकला आहे तर दक्षिण तटावरील काही भाग सेंट्रल जेल साठी. अप्पर अग्वाद साठी जाणऱ्या रस्ता सोडून डावीकडे सेंट्रल जेल कडे गेल्यास, जेलच्या दरवाजासमोर डावीकडील पायवाटेने खाली उतरताच आग्वाद किल्ल्याचा विस्तीर्ण असा दक्षिण तट पहायला मिळतो.
आग्वाद किल्ल्याची भटकंती करून रीस मागोस या पुनर्बांधणी केलेल्या आकर्षक किल्ल्याला भेट देऊन आलो. रीस मागोस आणि गास्पर डायस हे किल्ले आदिलशाही राजवटीखाली होते. पोर्तुगीजानी ते ताब्यात घेऊन त्यावर आपला छाप उमटवला. इंग्रजी ‘व्ही’ अक्षरा सारखे बांधलेले चौरस बूरुज हे पोर्तुगीज दुर्गबांधणीचे एक वैशिष्ट्य, गडाची बांधणीही चौरस. पोर्तुगीज दुर्ग स्थापत्याची आणखीही उदाहरणे आहेत. अलिबाग जवळील रेवदंडाचा सातखणी महाल, रेल्वेच्या डब्यासासारख्या बांधलेल्या तटबंदीचा कोर्लई किल्ला. याशिवाय मोटी दमन-नानी दमन हे किल्ले, मुंबईजवळ केळवेचा पाचूच्या वनात दडलेला भूईकोट किल्ला आणि वसई किल्ला’ हे पोर्तुगीज बांधणीची छाप असलेले आणखी काही किल्ले.
रीस मागोस.. हा कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा गिरीदुर्ग आहे. गोवा सरकारने याची पुनर्बांधणी करून इतिहासाचं फाटलेले सुवर्णपान पुन्हा पुस्तकात चिकटवलं आहे.. महाराष्ट्र सरकार मात्र इतिहासाची पान टराटरा फाडत चाललंय.. यांनी गल्ल्यातून डोकं वर काढला तर त्यांना किल्ला दिसणार ना..! मांडोवी नदीकाठचा हा किल्ला पाहण्यास अर्धा पाऊण तास पुरे.. इथे बुरूजावर लाकडी चाकांवर रोखलेल्या तोफा, डागडुजी केलेले बूरुज आणि गडाच्या दक्षिण बुरुजावरून दिसणारा जुन्या गोवयाचा नजारा तर अफलातूनच.. या शिवाय गडाच्या मुख्य द्वाराच्या आत कमानीत दडलेले ‘डेथ होल’ म्हणजे साक्षात झरोक्यातून डोकावणारा मृत्यूच.. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक वटवृक्ष आहे.. हा महाकाय वटवृक्ष एका नारळाच्या झाडावर परावलंबी (Parasite) होवून वाढला.. पुढे हे मूळ नारळाचे झाड कोसळले आणि हा वृक्ष उन्मळण्याच्या बेतात होता, पण याची २००८ सालामध्ये दुरुस्त करण्यात आली.. झाडाच्या खोडात सिमेंट कॉन्क्रीट (Concrete) चा कॉलम भरून त्याला स्थैर्य देण्यात आले.. झाडाच्या फांद्या स्टीलच्या तारांनी ओढून धरल्या आणि अखेर हा वृक्ष तगला.. इकडे गोव्यात एका झाडाला वाचवण्यासाठीही ही वणवण तर तिकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘कॉन्क्रीट (Concrete) जोडो टेकडी फोडो’ अभियान केवढा हा विरोधाभास. म्हणूनच म्हटलं आमचो गोव्यात बघण्यासारखं बरंच काही आहे चंगळवादाशिवाय.. चंगळवाद हा बोनस आहे, ‘इथला आरस्पानी निसर्ग आणि संस्कृती हेच काय ते खरं’.. रीस मागोस किल्ल्याला अलविदा करून पायथ्याशी आलो. सूर्य मावळायला दोन तास आवकाश होता म्हटलं चला छापोरा किल्ल्यावर.
छापोरा किल्ला आदिलशहा ने बांधला असं म्हणतात. कलंगुट पासून साधारण १५ किलोमीटरवरील हा किल्ला एका टेकडावर बांधला आहे.. दोन कॅप्सुल बुरुज, सुस्थितीतला दरवाजा, भव्य तटबंदी आणि मावळतीचा एक भव्य नजारा असं या किल्ल्याचे वर्णन करावे लागेल.. मित्रांनो ‘दिल चाहता है’ चित्रपटात दाखवलेला नजारा याच किल्ल्यावरचा.. तांबूस पिवळ्या रंगाची सांजवात क्षितिजापार मालवेपर्यंत गडावरून पाय निघेना.. सांज ढळताच कलंगुटला हॉटेलात परतलो.. तरी या त्रिवेणी दुर्गभ्रमंतीचा नजारा डोळ्यासमोरून हलत न्हवता..
दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरु झाला. कलंगुट ते सायोलीन (siolim) ते केरीम (querim) हा समुद्रालगतचा प्रवास आणि मैन्द्रेम (mandrem) शेवटी आरम्बोल खाडीचा विहंगम नजारा. गोवा मुक्ती संग्रामाचा साक्षिदार असा हा तेरेखोल किल्ला आरम्बोल खाडीलगतच्या टेकाडावर बांधला आहे.. इथे जायला केरीम गावातून फेरी बोट आहे.. थेट गाडी घेवून खाडी पार करता येते आणि तेरेखोल किल्ल्यावर जाता येतं.. “गडकोट पाहण्यास तासभर पुरे.. पण गड समजण्यास एक आयुष्यही अपुरे आहे”.. तेरेखोल किल्ला हा एक आटोपशीर किल्ला. कॅप्सुल आकाराचा बुरुज, मध्यभागी एक चापेल चौरस तटबंदी आणि एक भरभक्कम दरवाजा. इथे दरवाजातच एक मोठी पेटारा ठेवला आहे.. जणू काही जादूचा पेटारा, भिंतीना दोन्ही बाजूंनी भाले अडकवले आहेत.. किल्ल्यावरील सैनिकांच्या, अधिकाऱ्यांच्या खोल्यांचं आता हॉटेल मध्ये रुपांतर केले आहे.. रूम बुकिंगचा बहाणा करून या खोल्या पाहून आलो.. पोर्तुगीज धाटणीचे बांधकाम आणि प्रशस्त जागा.. खिडकीतून आता सैरावैरा धावणारा तेरेखोल खाडीचा वारा.. सारंच अद्भूत.. तेरेखोल किल्ल्याचा अनुभव गाठीशी बांधून रेडी गावातील रेडी किल्ला अर्थात यशवंत गडाकडे मोर्चा वळविला.
रेडी किल्ला तेरेखोल पासून ४-५ कि. मी. अंतरावर असलेला एक भव्य किल्ला, तीन दरवाजे, पाण्याचे टाके आणि मध्यभागी भव्य प्रासाद (राजवाडा) हे रेडी किल्ल्याचे आकर्षण. रेडीचा समुद्रकिनारा हा चंद्रकोरी सारखा दिसणारा, पारदर्शक, स्वछ आणि आरस्पानी असा. इथे माणसाचा मागमोस नाही की उच्छाद नाही, आहे फक्त मनाला अंतर्मुख करणारी शांतता.. रेडी किल्ल्यावरचा राजवाडा पाहण्यासारखा आहे.. राजवाड्याच्या भिंतीवर वाढलेले वटवृक्ष एकदम खंडहर टाइप भासतात.. रेडीच्या गणपतीची कीर्ती दुरवर पसरली आहे..
रेडी किल्ला पाहून सावंतवाडी मार्गे पुण्यास परतलो. यंदा वेगळाच गोवा पहायला मिळाला, दुर्ग संपदेने समृद्ध असा. पण हि भटकंती इथेच संपलेली नाही ती सुरूच राहणार, ‘अथ पासून इतिपर्यंत’… “क्योंकी पिच्क्चर अभी बाकी ही मेरे दोस्त”. महाराजांच्या नान्नज किल्ल्यावर जायला मिळाला नाही याची हुरहूर लागली पण थोरांनी सांगून ठेवलंय की “देअर इज आल्वेज नेक्स्ट टाइम”.. मग चला आमचो गोयाला… चंगळवादाला फाटा देवून गिरीदुर्ग, जलदुर्ग आणि स्थलदुर्ग भटकायला… येताय ना मग !
माधव कुलकर्णी २०१२
![]() |
अग्वाद किल्ला जुना दीपस्तंभ |
![]() |
अग्वाद किल्ला दक्षिण दरवाजा |
![]() |
छापोरा किल्ला अविस्मरणीय सूर्यास्त |
![]() |
छापोरा किल्ला मुख्य प्रवेशद्वार |
![]() |
छापोरा किल्ला काप्सूल बूरुज |
![]() |
छापोरा किल्ला |
![]() |
अरे.. कितना पियोगे यार .. अब बस भी करो .. गोवा |
![]() |
सायोलीम चे एक सुंदर .. आणि पवित्र ..चर्च |
![]() |
कोकणचा किनारा.. हा सागरी किनारा .. ओला सुंगधी वारा .. |
![]() |
रोड टू तेरेखोल .. एक अविस्मरणीय प्रवास .. |
![]() |
तेरेखोल कडे नेणारी फेरी बोट आणि मी |
![]() |
तेरेखोल किल्ला |
![]() |
गोवा मुक्ती संग्रामाचा साथीदार .. तेरेखोल किल्ला |
![]() |
तेरेखोल किल्ला .. चर्च आणि येशू ख्रिस्ताचा पुतळा |
रेडी चा स्वच्छ आणि निर्मनुष्य किनारा यशवंतगड / रेडी किल्ला यशवंतगड राजवाड्याच्या भिंतींवर तयार झालेली ही वटवृक्षाच्या मूळाची नक्षी यशवंतगड / रेडी किल्ला यशवंतगड मुख्य प्रवेशद्वार
|
छापोरा किल्ला .. सुंदर सायंकाळ |
जोरदार मोहिम झालेली दिसतेय.काप-द-राम नाही पाहिलास का रे? तो किल्ला ओलांडून पलीकडे उतरलास की फार सुंदर बीच आहे. नितळ पाणी आणि तळाशी रंगीत गोटे (पेबल्स).
LikeLike