बागलाणची मुशाफिरी.. २०१२.. भाग १
(Baglaan Down-Under Series.. Fort Salher and Salota )
All the photographs in this article are taken by Upendra Kshirsagar.. An Expert Photographer
महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कळसूबाई आणि सगळ्यात उंच किल्ला कुठला तर साल्हेर. मागे दिनेश भाऊ आणि मी ठरवलेली बागलाण मोहीम काही कारणास्तव ऐनवेळी रद्द करावी लागली.. त्यामुळे बरेच दिवस हे असेच .. ‘मौके की तलाश में’.. वाट पाहण्यात निघून गेले.. पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते असं म्हणतात.. तशी या बागलाण भटकंती ची पण वेळ यायची होती.. इंटरनेट वर शोधाशोध करताना.. आमची मुंबईच्या ‘सन्मान हायकर्स’ या संस्थेने बागलाण मोहिमेचा विडा प्रजासत्ताक दिनी उचलल्याचे कळले.. मग काय शुभ कार्यास विलंब कशाला..! म्हणून या बागलाण मोहिमेचा सूत्रधार उपेंद्रला तातडीने सांगून टाकलं, ‘मी नक्की येतोय’ असं.. चार दिवस आठ किल्ले.. साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा-हरगड, मांगी-तुंगी आणि न्हावी किल्ला.. २६ ते २९ जानेवारी २०१२ अशी जुजबी मोहीम ठरली..
२५ तारखेला ट्रेक सुरु झाला.. तो ही घरापासूनच.. म्हणजे ट्रेकसाठी बायकोकडे परवानगी मिळवण्याचा ट्रेक.. झालंच तर ऑफीस मध्ये सायबाला बतावणी करून सुट्टीसाठी विनवणी करण्याचा ट्रेक.. असे एक-दोन लहान-सहान ट्रेक करून मेगा ट्रेकला जाण्यास निघालो.. रात्री ८ ला हार्वेस्ट हॉटेलात सलील सरांच्या ‘जलसा’ ला हजेरी लावली.. जेवण (!) उरकले.. आणि पुढे निघणार इतक्यात मुळे वकील दिलेर वृत्तीने म्हणाले.. तुला शिवाजीनगर ला सोडतो.. मी म्हटलं ‘नको नको.. कशाला उगाच तुम्हाला तसदी (!)’ .. पण वकीलसाहेब परत एकदा म्हणाले, ‘सोडतो.. अरे सोडतो तुला मी’.. सोडतो .. सोडतो .. असं वाक्य दोनदा वकील साहेबांच्या तोंडून ऐकताच ‘हा आता गाडीने शुअर शॉट् सोडणार’ याची खात्री वाटू लागली.. नाही नाही म्हणत साहेबांच्या आल्टोत बसून.. शिवाजीनगर यष्टी स्थानकावर दाखल झालो.. वकील साहेबांना अलविदा करून नाशिक चे तिकीट काढायला निघालो.. इकडं पाहिलं तर फलाटावर पाय ठेवायला जागा नव्हती.. जोडून सुटी आल्याने स्थानकावर खच्चून गर्दी होती..
मग एस.टी. कंट्रोलर कडे चौकशी करताच एक त्र्यंबकेश्वर चा लाल डबा विनाआरक्षित असल्याचे कळले.. मग घुसलो लाल डब्यात.. शेवटाला दोन सीट रिकामे होते.. तिथे बुड टेकवणार.. तितक्यात तिथे शेजारच्या सिटावर बसलेलं एक आयटी तलं बेनं केकाटलं.. ‘सीट रिझर्व्ह आहे.. माझा दोस्त बसणार आहे.. भोसरीला’.. मी .. ‘अच्छा (भोसरीचा) भोसरीला बसणार आहे का, पण तोपर्यंत बुड टेकवू का?’ तो बसा म्हटला.. तसं बूड टेकवलं..
पण हा आनंद क्षणभंगुर होता.. भोसरीला.. भोसरीच्या मित्राचा दोस्त आला आणि नाईलाजाने मला उभं राहावं लागलं.. मग.. मधल्या रांगेत ब्याग टाकली आणि रेटून बसलो.. बुडाखाली कार आल्यापासून हे असलं काही केलं नव्हतं .. पण ट्रेक साठी वाट्टेल ते !.. धक्के धुक्के खात संगमनेर आलं.. आणि पुढे सिन्नर ला गाडी जराशी रिकामी झाली.. कुबट वासाची .. पातळी (Level).. तशी जरा सौम्य झाली होती.. या माय का लाल.. शुमाकरने (एस.टी. चालकाने) अकराला निघालेला लाल डबा.. शार्प पहाटे सव्वातीन वाजता नाशिक CBS स्थानकावर पोहोचवला.. म्हटलं ‘जियो मेरे यार..!’. उतरताच .. उपेन्द्रला फोन लावला.. उपेंद्र म्हणाला .. ‘ठरल्यापेक्षा अर्धा तास उशीर होणार आहे’.. मी म्हटलं.. “काळजी नको.. मी माझी इतर कामं उरकतो..!.. सी.बी.एस. पोहोचला की कॉल कर”..
स्थानकावरच्या.. मिलन उपहारगृहात .. पहाटे.. चारला पोह्यावर ताव मारताना उपेन्द्रचा कॉल आला.. ‘आम्ही सी.बी.एस. ला पोहोचलो.. आहेस कुठे..?’.. म्हटलं आलोच.. स्थानकाबाहेर आलो आणि क्वालीस मधून उतरलेल्या नव्या दोस्त मंडळींची ओळख करून घेतली .. दीपक दादा.. एक-दोन मिसरूड न फुटलेले गडी (आकाश आणी सर्पमित्र).. एक दक्षिण भारतीय मित्र वेंकी (व्यंकटेश).. आणि कप्तान उपेंद्र क्षिरसागर.. बागलाण चा कसोटी सामना खेळण्यास टीम सन्मान तयार झाली होती.. चार दिवस.. आणि ८ किल्ले..
बागलाण कसोटी (दिवस पहिला): बागलाण चे उत्तुंग शिखर साल्हेर आणि घसरड्या वाटांचा राजा सालोटा किल्ला
पहाटे पाचला नाशिक सोडलं आणि नाशिक-आग्रा महामार्गे-देवळा-पितळखोरे रोड-ताहराबाद असा (साधारण १५० कि.मी.) प्रवास करीत साल्हेर च्या पायथ्याचे ‘वाघांबे’ गाव गाठलं.. साल्हेर ला जाण्याचे दोन परिचित मार्ग आहेत पहिला वाघांबे आणि दुसरा साल्हेरवाडी गावातून.. कप्तान उपेंद्र ने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि आणि बागलाण टीम मधील साल्हेर-सालोटा सारख्या कसलेल्या ओपनिंग जोडी ने बागलाण इनिंगची सुरुवात केली.. वाघांबे गावात प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरु होती.. ढोल लेझीम .. ताशे यांच्या गजरात संचलन सुरु झालं .. आणि मुख्याध्यापकांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण पार पडलं.. निधड्या छातीने राष्ट्रगीत म्हणून साल्हेर चा ट्रेक सुरु झाला.. कप्तान उपेन्द्रने वाघांबे गावातील.. श्री जिभाऊ महाले यांना वाटाड्या म्हणून सोबतीला घेतलं आणि ट्रेक सुरु झाला.. शाळेमागील शेताडाच्या वाटेने चालू लागलो.. वाघांबे गावातून साल्हेर-सालोटा ही जोडगोळी गगनाला गवसणी घालत उभी असल्याचे दिसते.. उजवीकडच्या वाटेने तिरपे वर चढत एक-दोन टेकाड पार करताच.. दोन किल्ल्यांच्या मधील खिंडीकडे नेणारी सोंड दिसू लागते.. साल्हेर-सालोट्या खिंडीकडे जाणारा रस्ता बराचसा तोरणा किल्ल्या सारखा आहे.. म्हणजे उजवीकडची निमुळती सोंड तिरपी जात चढायची.. सोंड संपली आणि पुढे पाहिलं तर पुन्हा जीवघेणा चढ.. म्हटलं ‘येणार ! येणार पण .. मध्ये थोडा ब्रेक घेणार’.. दोन धिप्पाड (घरंदाज) डोंगर इथे आव्हान देत उभे ठाकले होते.. या कोण करतंय आता (श्वासांची) गोलंदाजी या आविर्भावात.. कितीही कसलेला ट्रेकर असलं तरी या टप्प्यावर थांबल्याशिवाय पर्याय नाही.. ड्रिंक्स ब्रेक घेतला आणि पुन्हा श्वासांची गोलंदाजी सुरु केली.. सोंड संपताच डावीकडच्या पायवाटेने टेकाड चढून सालोट्याच्या पायाथ्याला उजवीकडून वळसा मारत खिंडीत दाखल झालो.. कप्तान उपेंद्र ने पुढचा प्लान सांगितला.. आधी सालोट्याची विकेट घ्यायची आणि मग साल्हेर..किल्ला


खिंडीत वाघांबे कडे पाठ करून उभे राहिलं तर डावीकडचा सालोटा किल्ला आणि उजवीकडचा साल्हेर किल्ला.. राजाधिराज छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या च्या टीम स्वराज्याचे दोन खंदे भरवशाचे खेळाडू.. या खिंडीत सालोटा कडे पाहिलं तर या पिरामिड सारख्या दिसणाऱ्या या किल्ल्याचा आकार इथे .. इंग्रजी उताणा पडलेल्या ‘व्ही’ अक्षरासारखा दिसतो.. इकडून उजविकडे दोन एकशे पावलं तिरपे चालत वर जाताच एक मध्यम उंचीचे झाड दिसू लागते.. इथून वर पुन्हा डावीकडे.. निसरडी मुरुमाची वाट सत्वपरिक्षा पहात उभी होती.. थोडं शंभर एक पावले चालून गेल्यानंतर एक सोपा प्रस्तर (Rock Patch) आडवा आला.. इथे खोबणीतून वाट काढत .. वर आलो आणि २५-३० कातळकोरीव पायऱ्या चढून एका गुहेसमोर येवून पोहोचलो.. इथल्या पायऱ्या अलंग मदन ची आठवण करून देणाऱ्या.. ‘कातिल’ अशाच होत्या.. डावीकडे कातळाचे तासलेले कठडे आणि ४-५ फुटी पायऱ्या .. गुहेतून पुढे जाताच .. गडाचा पहिला दरवाजा दिसला .. इथे दरड कोसळल्याने ७-८ फुटी कातळ चढून जाण्याचे दिव्यकर्म नशिबी आले.. ते पार पाडून पुढे निघालो.. इथे आपण डोंगर पोखरून काढलेल्या कातळी पायवाटेने (traverse) साल्हेर ला समांतर जात असतो. इथे तटबंदी चे अवशेष दिसू लागतात.. दुसऱ्या दरवाजाशी येवून पोहोचलो.. या दरवाजातून पाहताना साल्हेर किल्ला एखाद्या आखीव-रेखीव छायाचित्रासारखा भासतो.. आत जाताच उजवीकडे काही गुहा नजरेस पडतात.. इथे पाण्याचं एक टाकं आहे.. असाच पुढे Traverse वरून.. वळसा मारत आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजाशी येवून पोहोचतो.. आत येताच.. मध्यभागी एक टेकाड दिसू लागते.. इथून डावीकडे गेल्यास एक.. छप्पर नसलेलं हनुमान मंदिर आहे.. आणि इथे मेरूपर्वत तळहातावर घेउन उभे ठाकलेले मारुतीराया.. जणू ट्रेकर्स ची रक्षा करणारे.. एक स्वयंभू शक्तीपीठच..
इथून पूर्वेकडे पाहताना उजवीकडे पाच पांडव नावाची पाच डोंगरांची रांग आणि मागे.. हरगडाला खेटून उभा असलेला एक सुळका दिसू लागतो.. स्थानिक लोक या सुळक्याला ला ‘जीभ’ म्हणतात.. डावीकडे समोर.. मुंडके नसलेल्या जिराफासारखा दिसणारा न्हावीगड .. पुढे तांबोळया लक्ष वेधून घेतात.. त्यामागे मांगी-तुंगी हे सुळके.. एखाद्या जुळ्या भावंडासारखे दिसतात.. इथून मुल्हेर दिसत नाही.. कारण हरगड पुढ्यात असतो.. एखाद्या ढालीसारखा..
पिवळ्या तांबूस छटांनी भारलेले डोंगर.. धरणाच्या आजूबाजूला दिसणारी हिरवाई.. रेखीव डोंगर रांग.. एका नजरेत पाहता येणारे टीम स्वराज्याचे सवंगडी.. अधून मधून वर डोकावणारे एखाद-दुसरे खुरटे झाड.. वर आकाशातून उडणारी गिधाडे.. आणि दरी खोऱ्यातून वाहणारा मदमस्त वारा.. काय सांगावा इथला नजारा.. या मदमस्त वाऱ्याला निरोप दिला.. “जा मुल्हेर वर निरोप घेवून जा .. आम्ही येतोय .. उद्या .. शिखराला गवसणी घालायला.. पायवाटा तुडवायला.. इतिहासाची पाने चाळायला.. घामाचे थेंब गाळायला.. छत्रपतींचा इतिहास जगायला.. येतोय रे.. येतोय आम्ही नक्की येतोय उद्या ! ”
इथे बलशाली अंजनीसुताचा निरोप घेवून.. खिंडीकडे निघालो.. सूर्य डोक्यावर नाचत होता.. आणि पोटात कावळे कव्वाली गाऊ लागले होते.. पहिल्या विकेट चे सेलीब्रेशन संपताच कप्तान उपेन्द्रने.. खिंडीकडे जाण्याचा आदेश दिला.. निसरडे शूज आणि मुरुमाची वाट यांचा छत्तीसचा आकडा असतो.. यंदाचे शूज निसरडे असल्याने.. शूज उतरवून .. मुरुमाच्या असंख्य सुया टोचून घेत.. सालोटा उतरू लागलो.. अर्ध्या तासांतच खिंडीत दाखल झालो.. इथे लंच ब्रेक मंजूर करण्यात आला.. खिंडीतून थोडं पुढे जात साल्हेरच्या पायथ्याला असणाऱ्या एका खुरट्या झुडुपाच्या सावलीत शिदोरी उघडली.. पोट भरताच.. दगड गोट्यांच्या बिछान्यावर दहा-वीस मिनिटे वामकुक्षी घेतली.. आणि पुढे निघालो.. खिंडीतून साल्हेर कडे पाहताना.. हे ‘व्ही शेप .. Giant पिरामिड (Pyramid) आता कसं काय सर् करणार ! याचा विचार मनात डोकावला.. पोटात गोळा आला.. एवढं जेवण चेपल्यानंतर कसा चढणार हा किल्ला? पण कप्तान आक्रमण म्हणाले.. आणि टीम सन्मान सुसाट साल्हेर कडे निघाली.. यंदा उप-कप्तान दीपक दादांनी साल्हेरचा पाडाव करण्याचे आव्हान स्वीकारले.. लीड पोझिशन ला दादा.. मागे आकाश.. वेंकी.. मागे विशाल आणि उपेंद्र.. निघालो.. आज दुसरी विकेट पाडायची होती बागलाण टीमची.. साल्हेर..
समोर दिसणाऱ्या व्ही आकाराच्या डोंगराच्या डावीकडच्या धारेने निघालो.. थोडं तिरपे वर जात एक प्रस्तर (RRock Patch) पार करताच उजवीकडे साल्हेरच्या नाकाडाकडे जाणाऱ्या कातळ कोरीव पायऱ्या दिसू लागल्या.. पहिला दरवाजा दिसला आत जाताच बरोबर नाकाडावर कोरलेला ४००-५०० पायऱ्यांचा एक अजस्त्र आणि अंगावर आलेला कातळ जीना दृष्टीक्षेपात आला.. मनावर दगड ठेवून दगडांच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली.. “एक के बाद एक.. पंधरा-वीस नंतर ब्रेक आणि पुन्हा ट्रेक करत..वर निघालो.. उजवीकडे कातळात लपविलेल्या गडाच्या दुसऱ्या दरवाजात येवून पोहचलो.. आणि थेट बसकण मारली.. इथे ड्रिंक्स ब्रेक उरकून पुन्हा उजवीकडे तिरपे वर निघालो.. तर पुन्हा एक जीना.. एकदम राज कपूर च्या गाण्याची आठवण झाली ‘जीना यहां.. जीना वहां.. इसके सिवा जाना कहां !’ पुन्हा शे-सव्वाशे पायऱ्या चढून गेलो आणि गडाच्या तिसऱ्या दरवाजात दाखल झालो.. आत येताच समोर ज्वालामुखीच्या दोन स्तरातून तयार झालेला एक लांबलचक परिक्रमा मार्ग (traverse) आहे.. इथे तटबंदी बांधल्याचे दिसले.. या पायवाटेने चालताना डावीकडे १२-१३ गुहा दिसतात पण या राहण्या योग्य नाहीत.. गड माथ्यावरच्या पांडवकालीन गुहेत मुक्काम करण्यास पुढे निघालो.. उजवीकडे .. सेलबारी डोंगररांगांचे एक सुंदर निसर्गचित्र समांतर चालत होते.. सुमारे तीन-एकशे पावलं चालून जाताच बालेकिल्ल्याचा पूर्वाभिमुख असा मुख्य दरवाजा नजरेस पडतो.. दर्शनी दरवाजाचे बूरुज कमान… सगळं सही-सलामत असल्याचे पाहून.. बरं वाटलं.. इथून समोर पाहताना सेलबारी रांग सरळ नाकाच्या रेषेत चालत राहते.. आणि उगाचच आपण ढगात तरंगतोय असं वाटू लागतं..
इथवर पोहोचेपर्यंत पाच वाजले होते.. सूर्यास्त पहायचा असल्याने.. गंगासागर तलावाकडे निघालो.. उजवीकडची पायवाट चालताना गडाचे अवशेष नजरेस पडतात.. पंधरा-वीस मिनिटात गंगासागर तालावाशी येवून पोहोचलो.. इथे मंदिरासमोरील टाक्यातून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि मंदिराशेजारच्या पायवाटेने पांडवकालीन गुहेकडे निघालो.. गडावर चिटपाखरू नसल्याने.. ही २ BHK गुहा साहजिकच टीम सन्मानच्या पथ्यावर पडली.. गुहेत ब्यागा टेकवून.. तोंडावर पाण्याचे सपकारे मारून थोडं ताजेतवाने झालो.. पावलं थकली होती पण मन अजून फ्रेश होतं.. जणू सह्याद्री रांगेतील किल्ल्यावरील सर्वोच्च माथ्याला गवसणी घालायला ते आसुसलेलं होतं.. गुहेच्या डोक्यावरील साल्हेरच्या सर्वोच्च माथ्याकडे म्हणजेच.. परशुरामाच्या मंदिराकडे निघालो.. इथे बसून कधी काळी परशुरामाने तपस्या केली असं म्हणतात..
मावळतीचा कल्लोळ पहायला गडमाथ्याच्या माध्येभागी असलेले हे शेवटचे टेकाड चढण्याचे दिव्य पार करायचे होते .. गुहेच्या उजवीकडून कातळाच्या खोबणीत पाय रुतवत वर जावू लागलो.. दहा-पंधरा मिनिटातच गडमाथा गाठला.. आता डावीकडे समोर शेवटच्या टेकाडावर दिसणारे परशुराम मंदिर.. पायाखाली पसरलेला तांबूस पिवळ्या गवताचा गालीचा..दिसू लागला आणि उजवीकडे.. सूर्यदेव.. दिवसभर किरणांचा मारा करून थकून भागून विश्रांतीसाठी क्षितिजाआड निघालेले.. “ध्येय असं नजरेच्या थेट समोर ठाण मांडून बसलेलं”.. रांगत जावे लागले तरी बेहत्तर पण आज सर्वोच्च माथा गाठायचाच याचा निर्धार केला.. आकाश, दीपक दादा पुढे आणि सिनियर सिटीझन्स मागे.. दुखऱ्या पायांनी टेकाडाला वळसा मारत.. सर्व्वोच माथा गाठला.. ‘’बस्स.. याला म्हणतात.. सुख.. ! सुख म्हणजे याच्याशिवाय दुसरं असूच शकत नाही.. दिवसभराच्या पायपिटीनंतर जेंव्हा ध्येय असं पायाखाली लोळण घेतं.. तेंव्हा आपल्याला उगाच .. औटघटकेचा सिकंदर झाल्यासारखं वाटतं.. सह्याद्रीचे वारकरी आज सह्याद्रीच्या सर्वोच्च माथ्यावर होते.. “बागलाण सामन्यातील दुसरा गडी बाद झाला होता.. किल्ले साल्हेर..” सूर्यास्त होण्याआधी तिरंगा फडकाविला आणि मावळतीच्या सोनेरी किरणात रंगून गेलो.. इथे अंगाला बोचणारा गार वारा सुटला होता.. थकलेल्या शरीराला नवसंजीवनी देणारा अमूर्त वारा.. भटक्या मनाला मुक्त करणारा वारा.. सर्वोच्च माथ्यावरचा अजिंक्य वारा.. क्षितिजावर नजर फेकत तिथे गुजगोष्टी करणारा वारा..
वरून चारी बाजूंना नजर फेकली.. ‘बर्डस आय’ नजारा.. मघाशी थोरला वाटणारा सालोटा आता धाकटा वाटू लागला.. जसा साल्हेर चा धाकटा भाऊ.. पूर्वेकडे.. मुल्हेर मोरा हरगड आणि पाच पांडवांची पाच डोंगरांची रांग.. डावीकडे न्हावी ताम्बोळ्या, मांगी-तुंगीची रांग.. मागे डांगचे खोरे.. उत्तरेला.. सातमाळा रांगेची झलक.. सह्याद्रीच्या रांगांचे एका पेक्षा एक सुंदर असे निसर्गचित्र मावळतीच्या सोनसळी रंगात भिजून एकदम सजीव झालं होतं.. या क्षणी जगणं हीच या जीवनाची व्याख्या..

मावळतीच्या तांबूस-पिवळ्या.. किरणांनी भरलेला आसमंत
समोर दरी-खोऱ्यात तेवणारी.. सोनसळी किरणांची सांजवात
मनाला अंतर्मुख करणारे.. ते चार दोन .. कातर क्षण
अन् त्या खडकावर विसावलेले.. माझे हे.. मुशाफिर मन
फक्त तू आणि तूच आहेस.. या मायावी आसमंताने भारलेला
घोर चिंतांची कात टाकून.. स्वतःला नव्याने उमगलेला
मी.. आणि फक्त मीच.. सदैव.. क्षितिजच्या वाटेवर मार्गस्थ
सह्याद्रीच्या भव्यतेची प्रचीती घेणारा एक भगवा पांथस्थ
कधी काळी याच माथ्यावर बसून परशुरामाने सूर्याची उपासना केली असेल.. अशा पवित्र जागी आपल्याला जायला मिळावं ही श्रींची कृपा दुसरं काय.. परशुरामाच्या पादुकांवर डोकं टेकवून, मंदिरच्या चौथऱ्यावर क्षणभर विसावा घेवून पुन्हा गुहेत मुक्कामाला निघालो.. आयुष्यातला एक दिवस सार्थकी लागला होता.. एक मंत्रमुग्ध दिवस.. सोनसळी किरणांनी मंतरलेला दिवस..
गुहेत पोहोचलो.. ब्यागा टेकवल्या आणि जिभाऊनी चूल पेटवली.. मास्टर शेफ दीपक दादांचा मदतनीस म्हणून वर्णी लावली.. शेफचा मदतनीस होण्याचे दोन फायदे असतात.. पहिला फायदा असं कि पाणक्या म्हणून काम करावे लागत नाही.. आणि जेवण फक्कड झाल्यास दाद मिळते ती वेगळी.. तीन दगडांची चूल ढण ढण पेटली तसा पातेल्यात तांदूळ घेवून.. बोटांची दोन पर तांदळाच्या पातळीवर बुडतील एवढं पाणी घातलं.. गुहेत बासमती तांदळाचा दरवळ सुटताच.. रस्सा भाजीची तयारी सुरु केली.. फोडणीच्या तेलावर बटाटा परतून घेतला.. हळद आणि तिखट टाकून माहौल लालेलाल होताच.. पानी टाकून उकळी फुटेपर्यंत एक बार लावला.. भाजीचा रंग पाहून टीम सन्मान ला घाम फुटला.. मी दिलासा दिला.. पुणेरी मिरचीचा फक्त रंगच लाल आहे याला तिखटपणा नाही .. ‘टेन्शन नाही लेनेका मास्टर शेफ (दीपक दादा) को पुछ्नेका.. !’
भुकेने कावलेले घुमक्कड अक्षरशः जेवणावर तुटून पडले.. पंधरा मिनिटे आजूबाजूला कोण आहे याची तमा न बाळगता.. जेवणावर लक्ष केंद्रित केले.. गुहेत फक्त खाताना होणारा तोंडाचा एवढाच आवाज तेवढा येत होता.. ठेवणीतले पराठे.. भात रस्सा भाजी.. हा अस्सा शाही मेनू.. तृप्त झालो.. आणि पथाऱ्या पसरण्यासाठी जागा हेरू लागलो.. गुहेत उंदरांचा चांगलाच वावर असल्याचे दिसले.. धोडपच्या गुहेत उंदरांनी घातलेला उच्छाद अजून स्मरणात असल्याने मध्यभागी अंथरून घातलं.. जेवणाचे आयटम गुहेच्या बाहेर ठेवून.. पाठ टेकवली.. गुहेत चांगलाच गारवा जाणवत होता.. त्यात जिभाऊ विना स्वेटर.. म्हटलं भाऊजी कुल्फी होणार आता तुमची या थंडीत.. चांगलंच हिव भरलंय इकडं.. घ्या माझं जाकेट घालून झोपा.. भाऊजींनी चुली समोर अंगाची वळकटी करून ताणून दिली.. मी स्लीपिंग ब्यागेत घुसलो.. आणि पाठ टेकताच डोळ्याला डोळा लागला.. स्वत:च्या..!