बागलाणची मुशाफिरी.. भाग २

बागलाण सामना (दिवस दुसरा): झुंजार कातळशिल्प मुल्हेर आणि दुर्गम मोरा किल्ला
All the photographs in this article are taken by Upendra Kshirsagar.. An Expert Photographer
 
झुन्जुमुन्जू झालं तशी पहाटे पाच-सहा ला जाग आली .. पाहिलं तर छायाचित्रकार उपेंद्र आणि मंडळी उगवतीच्या रंगछटा टिपण्यासाठी बाहेर गेले होते .. बोचकी बाचकी,  वळकट्या आवरल्या आणि गडावर फेरफटका मारायला निघालो.. गंगासागर तलाव, पाण्याचं टाकं.. देवीचं मंदिर, उध्वस्त हनुमान मंदिर.. यज्ञकुंड पाहून आलो.. गंगासागर तलावच्या  मध्यभागी एक खांब.. आणि तलावाचा लांबलचक काठ.. सगळं कसं अगदी.. ‘फ्रेम टू फ्रेम’.. गंगासागर तलाव आणि मागे सेल्बरीचे दिसणारे निसर्गदृश्य पाहून वाघांबे कडे निघालो.. कप्तान उपेंद्र म्हणाला.. काल ओपनिंग जोडीचा सामना केलात आज गाठ मुल्हेर-मोरा शी आहे.. नाबाद राहून जिंकायचं आहे आपल्याला.. “चलो रे.. आगे बढो..  आक्रमण“..
कालचीच पायवाट आज उतरताना एकदम FlashBack मध्ये चालतोय असं वाटू लागलं.. हे काल पाहिलेलं दृश्य मनावर खोलवर ठसलेलं होतं.. साधारण अर्ध्या तासात खिंडीत दाखल झालो.. खिंडीतून सोंडेवर आलो आणि इथे पुन्हा सोंडेवरून उजवीकडच्या उतरणीची वाट धरली मग उतरणी च्या वाटेवर टेकड्यांची मालिकाच सुरु झाली.. एक टेकाड उतरून झालं कि दुसरं टेकाड.. दत्त म्हून हजर.. पाच सहा टेकड्या उतरून एका ट्रेडमार्क आंब्याच्या झाडाशी येवून पोहोचलो.. साधारण डावीकडच्या पायवाटा घेतल्या.. उतरताना.. विशाल सोबतीला होता..

विशाल हा सर्पमित्र असल्याचे कळले.. साधारणतः सापाचे नाव काढल्यावर सामान्य माणसाचा थरकाप उडतो.. पण हा धाडसी सर्पमित्र लीलया सापांशी खेळतो.. इथे बागलाण भागात बांबू पिट् वायपर आणि रसेल वायपर (घोणस) हे विषारी साप आढळतात असे त्याने सांगितले.. सर्पमित्राने सांगितलं कि, साधारण एखादा साप आडवा आला तर जागीच थांबावे.. त्याला जावू द्यावे आणि मगच पुढे जावे.. सर्प मित्राशी गट्टी जमली.. उतरताना “जंगलातील साप पाहिल्यावर उडणारा थरकाप.. आणि त्यावरचे उपाय” यावर चांगलंच ज्ञान मिळालं.. बातोबातोमे तासाभरात वाघांबे गाव कसं समीप आलं कळलं नाही.. जिभाउंच्या चंद्रमौळी घरासमोर बसकण मारली.. साल्हेर-सालोटा चा डाव शारीरिक क्षमतेचि परिक्षा पाहणारा ठरला..

आजच्या सामन्यातील एक सेशन.. टीम सन्मान ने लीलया जिंकला होता.. इथे कप्तान उपेंद्र ने लंच-ब्रेक आधी टी-ब्रेक डिक्लेर केला, मुल्हेर गाठायला उशीर होवू नये म्हणून ही रणनीती आखली.. फटाफट चायपान करून टाटा सुमो ने मुल्हेर माची कडे निघालो.. मुल्हेर  गावातील मुख्य चौकात वडापाव च्या गाडीवर प्रत्येकी दोन वडापाव पार्सल घेऊन मुल्हेरमाची कडे मोर्चा वळविला..
वाघांबे-ताहीराबाद रस्त्यावरचे मुल्हेर हे एक पुरातन गाव.. शिवकालात आधी मुल्हेर माचीवर माणसांची वसती असलेलं गाव अस्तित्वात होतं.. कालांतराने हे गाव खाली किल्ल्यापासून ३-४ कि.मी. अंतरावर दूर वसविण्यात आले.. या गावातूनच मुल्हेर माचीचा रस्ता आहे.. मुल्हेर गावाला महाभारत कालीन इतिहास आहे.. पूर्वी या भागाचे नाव होते.. रत्नपूर.. आणि मयूरध्वज नावचा राजा इथे राज्य करीत होता.. पुराणात रत्नपूर चा उल्लेख आढळतो.. साधारण चौदाव्या शतकात बागुलवंशीय राजे राठोड यांनी हा किल्ला बांधल्याचे सांगतात.. या किल्ल्याचं नाव मयुरगड होतं.. साधारण सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत इथे बागालाण प्रांतावर बागुल वंशीय राठोडांचा अंकुश होता.. दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य आणि बागलाणचा इतिहास समकालीन आहे.. पुढे मयुरगड चं बागुलगड झालं, पण नंतर पुढे या किल्ल्याचे नाव मुल्हेर कसे पडले हे मला अज्ञात आहे.. पण बागलाण सामर्थ्याची प्रतिक असलेली तलवारिची ‘मुल्हेर-मूठ’ बागुल वंशीय राजे राठोडांच्या कार्यकाळात घडविण्यात आली असं इतिहासकार सांगतात.. पुढे मुघलांनी बागुल राजांचा पाडाव केला.. आणि या किल्ल्याचे नाव बदलून पुन्हा औरंगगड ठेवले.. किल्ल्यावर महमद ताहीर याला किल्लेदार म्हणून नेमण्यात आले.. पुढे दुसऱ्यांदा सुरत लुटून परतायला महाराजांनी हा मार्ग निवडला आणि बागलाण स्वराज्यात सामील करायचा बेत आखला.. मराठ्यांनी  १६७२ मध्ये साल्हेर च्या  प्रसिद्ध लढाई नंतर हा किल्ला स्वराज्यात सामील केला..


असो.. इतिहासाची सफर उरकून मुल्हेर चा भूगोल पाहण्यास निघालो.. मुल्हेर गावतील  ग्रामपंचायत व्यापारी संकुलापासून पुढे निघालो मुल्हेर माची कडे.. ३-४ कि.मी. च्या गाडी रस्त्याने मुल्हेर माचीच्या पायथ्याशी आलो.. कप्तान उपेंद्रने खेळाडूंना तयार होण्याचे निर्देश दिले.. धनगरवाड्यातून समोर  नजर फेकताच.. वर डावीकडे दिसणारा उंचपुरा पण थोडासा अलिप्त असा निमुळता सुळका म्हणजे मोरा गड .. मध्यभागी आडवा दिसणारा डोंगर म्हणजे मुल्हेरचा बालेकिल्ला.. त्यानंतर दोन तीन Sine Wave सारख्या दिसणाऱ्या टेकड्या आणि पुढे उजवीकडे  खिंडीला खेटून उभा तिरपा धिप्पाड हरगड.. पायथ्याला विस्तीर्ण अशी मुल्हेर माची आणि तटबंदी..

तब्बल तीन कसलेले .. खेळाडू आमची वाट पाहत होते .. दाणादाण उडविण्यास सज्ज होते.. इथे फळांवर ताव मारून.. मुल्हेर कडे कूच केली.. समोर माचीला घातलेल्या तटबंदी कडे निरखून पाहता एक तुटका भूभाग नजरेस पडतो हीच आपली वाट.. कच्च्या गाडीवाटेने चालत अर्ध्या तासात पहिला दरवाजा दिसू लागला.. गाडीरस्ता सोडून डावीकडे पायवाटेने वर चढलो.. मग पायऱ्यांनी वर जाताच आणखी दोन दरवाजे पार करून मुल्हेर माचीवर पाऊल ठेवले.. मुल्हेर माचीच्या पहिल्या दरवाजासमोर कातळात कोरलेले हनुमानाचे शिल्प आहे..

तिसऱ्या दरवाजातून आत जाताच.. थोडं पुढे दगड- चिऱ्यांनी बांधलेले चौरस असे गणपती तळे दिसले.. इथे चक्क तळ्यातला गणपती आहे.. दगडी चिऱ्यांनी बांधलेले हे मंदिर एकदम रेखीव भासते..  अंधाराच्या आधी मुल्हेर माथ्याला साद घालायची असल्याने.. गौरीपुत्राला दुरूनच दंडवत घालून डावीकडे निघालो.. अधून मधून जुन्या भरभक्कम इमारतींचे चौथरे नजरेस पडतात.. दहा-पाच मिनिटातच सोमेश्वर मदिर दिसले.. इथेही मंदिरासमोर चर खणून छोटेखानी तळे केल्याचे दिसले.. मंदिराच्या मागे बाहेर पहारा देण्यास खुद्द लॉर्ड गंणेश.. पायाखाली तोफेचा गोळा घेवून उभे असल्याचे एक विहंगम दृश्य इथे पहायला मिळाले.. इथे मंदिराच्या एका खांबाजवळ बोर्डावर बागलाण राजांची वंशावळ लिहून ठेवली आहे.. मुल्हेर माचीवर राहण्यासाठी सोमेश्वर मंदिर सर्वोत्तम.. इथे पाण्याची उत्तम सोय आहे.. पाण्याची चव Mineral Water च्या थोतरीत मारावी अशीच.. 


सोमेश्वराचे दर्शन घेवून.. गणरायाला वंदन करून पुढे निघालो सोमेश्वर मंदिरातून वर पाहिले तर मुखर आणि मोरा या किल्ल्यांना जोडणारी खिंड / घळई नजरेस पडते.. त्या खिंडीच्या डावीकडे एक तीव्र उताराची डोंगर धार दिसते (मोरा गडाचे नाकाड).. आपली वाट याचं नाकाडावरून जाते.. सोमेश्वर मंदिराच्या थोडं पुढे गेल्याच एक छप्पर नसलेला मंदिर आहे.. याच्या डावीकडून जाणारी वाट खिंडीकडे जाते..  पुढे सरळ वाटणारी वाट नागमोडी होत वर उजवीकडे घळईकडे जावू लागली तशी धाप लागली.. कप्तान ला सांगितले आता रनर पाहिजे.. हळूहळू येतो.. कप्तानाने .. रनर म्हणून विशाल उर्फ सर्पमित्राला सोबत दिले आणि ‘या सावकाश’ म्हणाला.. कालपर्यंत मोजके बोलाणारा सर्पमित्र .. आज भडभडून बोलू लागला.. माग त्याच्या गप्पांना मोजकी उत्तरे देत अंगावर आलेला चढाव तुडवू लागलो.. घसरगुंडी बुटांमुळे.. चढताना त्रास होवू लागला.. हा टप्पा चढताना मला चंद्रगडाची आठवण झाली.. एकदम व्हर्टिकल लिमिट सारखा.. होता हा टप्पा.. साधारण ८००-९०० फुटांचा.. गुडघ्यांचा बाजार झाला तरी चालत राहिलो.. अधून मधून एखाद-दुसरं दूर आणि बरंच वर दिसणारं खुरटं झाड.. विचार केला डोरेमॉन च्या डोक्यावर असलेला पंखा असता तर किती बरं झालं असतं.. नुसता या गडावरून त्या गडावर.. उड्या मारत राहायचं.. भर उन्हाची ही पायपीट अगदी जीवावर आली होती .. म्हणतात ना “टाकीचे पाणी पिल्याशिवाय देवपण नाही“

“डोक्यावर शुभ्र किरणांचा जोरदार मारा होता.. पण .. या श्वासांचा अजूनही मणभर तोरा होता.. कारण डोक्यावरती किल्ले मोरा होता..” तासाभराच्या संघर्षानंतर मातीची मळलेली पायवाट संपून .. दगड धोंड्याची  वाट सुरु झाली.. तशी पाण्याची (घळईतली) वाट दिसू लागली.. आणि उजवीकडे मुल्हेर ची सरळसोट तुटलेली भव्य कातळभिंत.. वर मुल्हेर-मोरा किल्ल्याला जोडणारी तटबंदी.. ही वर दिसणारी तटबंदी अजूनही दोन-एकशे फुट वर होती.. तिथे एका सपाट दगडावर बसकण मारली.. कप्तान ला म्हटलं ‘ड्रिंक्स ब्रेक ?’ .. म्हटलं ‘सर् सलामत तो .. हजाम पचास’.. आणि .. ‘बचेंगे तो और भी दौडेंगे..’ इन मीन पाच मिनिटांचा ब्रेक उरकून .. तटबंदीच्या दिशेने निघालो.. आता फक्त रांगायचं बाकी उरलं होतं .. वाटच अशी जुल्मी आणि क्रूर होती..


दहा-पंधरा मिनिटात तटबंदीच्या डावीकडील वाटेने चढत.. तटबंदी लगतच्या भग्न दरवाजातून तटावर प्रवेश केला.. आमचे ओपनिंग फलंदाज केंव्हाच तटावर पोहोचले होते .. सर्पमित्र आणि मी गप्पा मारत दरवाजात दाखल झालो.. इथे .. वेलकम ड्रिंक्स मिळाले आणि थोडं हायसं वाटलं.. ‘कप्तान उपेन्द्राने इथे उदार अंत:करणाने तब्बल पंधरा मिनिटांचा ब्रेक मंजूर केला होता..’.. म्हटलं ‘पदरी पडले.. पावन झाले’..

इथे तटावरून फेरफटका मारताना.. तटबंदी मध्ये दडवलेला भुयारी मार्ग नजरेस पडतो.. आणि इथला नजारा काय वर्णावा.. अहाहा.. ! समोर घळइतून.. वर अंगावर येणारा.. सोसाट्याचा वारा.. डावीकडे.. ताशीव आणि माथ्यापासून तुटलेली मुल्हेरची  अजिंक्य कातळभिंत .. लांबवर पसरलेली.. भिंत संपताच खाली पायथ्याची माचीवर करड्या चौरस ठिपक्यासारखे दिसणारे सोमेश्वर आणि गणेश मंदिर.. एकदम निर्वाणी चे दृश्य ते.. मनाला विचारांपासून डायरेक्ट रिटायर करणारे.. हे विशाल आणि हृदयस्पर्शी असे  दृश्य.. फक्त सह्याद्री च्या Canvas वरच पहायला मिळते.. दुसरीकडे शक्यच नाही.. तुम्ही हिमालयात जा किंवा आल्प्स वर… “एकदा सह्याद्री चे पाणी  चाखलेला हाडाचा गिरीप्रेमी.. फक्त  आणि फक्त सह्याद्रीतच रमू शकतो”
नकोत मजला .. हिमशिखरे ती
नको आल्प्स .. अन् नको फुजी
या सह्याद्रीची .. बात  ही न्यारी
मज हिमशिखरे ही..  दिसे खुजी
कप्तान उपेंद्र आणि प्रशिक्षक दीपक दादा यांच्यात गुप्त चर्चा सुरु झाली.. आधी मुल्हेर चा पाडाव करून मग मोराचा सामना करण्याचे ठरले.. टीम सन्माच्या फलंदाजांना विकेट टिकवून खेळपट्टीवर टिकून राहण्याचे आवाहन केले.. मुल्हेर च्या चोर दरवाजाशी येवून पोहोचलो.. इथे उजवीकडे पाण्याचं एक टाकं आहे पण पिण्यायोग्य नाही.. चोर दरवाजा कातळाला खोदून काढला आहे, त्यामुळे इथे चढायला लिंबू टिंबू रॉक क्लायम्बिंग करावं लागतं.. पण ८००-९०० फुटाची तीव्र वाट चढून आल्याने हा प्रस्तर चढताना माझी अवस्था ‘आधीच हौस आणि त्यात चावला माऊस’ अशी झाली होती.. बेंबीच्या देठापासून जोर लावून चढलो..

चोर दरवाजातून वाकून आत शिरलो तर इथे एक मोठी दरड कोसळली होती.. चिरेबंदी भिंतीच्या खोबणीत  हात घालून वर चढलो आणि तटावर येवून पोहोचलो.. इथून दिसणारा मोरा किल्ला आणि त्याच्या कातळ कोरीव पायऱ्या लक्ष वेधून घेत होत्या.. इकडे डावीकडे वर जाणाऱ्या खोबणीतून पाय रोवत निघालो इकडे.. एक T-Shape पायवाट दिसली.. कप्तान ने डावीकडे जाण्यास फर्मावले..
डावीकडे मुल्हेर माथ्यावरच्या टेकाडाला वळसा मारत निघालो.. आणि माथ्यावर आलो.. इथे पाहिले तर..  इथून दिसणारं नजारा.. केवळ अशक्य कोटीतला.. पठारावर व्यापलेल्या तांबूस-पिवळ्या-हिरव्या गवताची वाऱ्यासवे लावणारी पात.. खाली दूरवर दिसणारी आखीव हिरवीगार शेते.. हरणबारी धरणाचा आटोपशीर नजारा.. अधून मधून शेतामध्ये वसलेली टुमदार गावे.. त्यांना एकमेकांना जोडणारे संजीवन रस्ते.. आकाशात घिरट्या घालणारी गिधाडे.. वारा खट्याळ पोरासारखा गवतातून सळसळत वाहात होता.. कुठला गोंगाट नाही कसला उच्छाद नाही.. कसला उन्माद नाही कि कसला आक्रोश नाही फक्त दूरवर पसरलेली आसमंत भारणारी शांतता ..

वळसा मारणाऱ्या पायवाटेने पुढे आलो दूर पठारावर एक झाड दिसू लागले.. तिकडे निघालो..  झाड जवळ येताच डावीकडे एक पाण्याचे गवतात लपलेले टाके दिसू लागले.. हिरव्या रंगाच्या शेवाळाने आच्छादलेले.. ‘रंग गेला तर पैसे परत’.. इतके हिरवेगार.. सळसळनाऱ्या गवतातून वाट काढत झाडाखालच्या मंदिराशी येवून पोहोचलो.. ओपनिंग Batsman आकाश आणि वेंकी आधीच पोहोचले होते.. Captain Cool ने इथे लंच ब्रेक मंजूर केला अर्ध्या तासांचा.. काय बरं वाटलं म्हणून सांगू.. ! ‘सुखाची व्याख्या दुसरी असूच शकत नाही..’ 

ट्रेकनंतरच्या वनभोजनाची मजाच काही और असते.. एक हक्काचं जेवण.. काबाडकष्ट उपसल्यानंतर ‘पदरी पडलेलं आणि पवित्र झालेलं’.. गोड-धोड, चकल्या, फरसाण, मिरची लोणचे, जाम, ब्रेड  आणि गुजराथी ठेपले, काय काय म्हणून नाही चेपले..!
झाडाखाली भडंगनाथाचे मंदिर आहे.. त्याला एक तांब्याचा मुखवटा चढवला आहे.. शेजारी देवळी.. छप्पर नसलेल्या या कोनाड्या शेजारी.. लोखंडी चिमटे अडकवले होते.. भडंगनाथ.. शंकराचे इथे दूरवर उभारलेले एक शक्तीपीठ.. भडंगनाथाचे आशीर्वाद घेवून गडाच्या उत्तर  टोकाकडे निघालो.. झाडाखाली उभे राहिल्यास दूर पठारावर एक दरवाजाची कमान दिसते.. तिकडे निघालो.. दहा पंधरा मिनिटात एका दगडी भिंतीजवळ येवून पोहोचलो.. हे राजवाड्याचे अवशेष.. थोडं पुढे गेल्यास पाण्याची बरीच म्हणजे पाच-सहा टाकी नजरेस पडतात.. इथे डावीकडे डावीकडे सातमाळा रांगेतील काही किल्ले अस्पष्ट दिसू लागतात.. उजवीकडे.. खाली  गडाचा मुख्य दरवाजा आहे..

तसाच सरळ पुढे निघालो.. डेड-एंड ला गडाला खेटून असलेली  उतरती डोंगर रांग दिसते .. त्या पल्याड अजस्त्र हरगड खुणावत असतो.. म्हटलं आज मुल्हेर-मोराची फिरकी खेळतो आणि उद्याला येतो हरगडाचा सामना करायला.. पुन्हा माघारी फिरलो.. मुख्य दरवाजाकडे निघालो.. तेवढ्यात चाळीशीतील गिर्यारोहकांचा एक जत्था राजमार्गाने मुख्य दरवाजातून वर आला.. चार पैशांसाठी आसुसलेल्या So Called प्रोफेशनल संस्थेने यांना बागलाण मोहिमेला आणले होते .. आधी मांगी-तुंगी करून मग मुल्हेर.. असा दिव्य प्रवास घडवून ही मंडळी गडावर दाखल झाली होती .. महादरवाजातून  खाली उतरून या विशाल, भरभक्कम दरवाजाची पाणी केली.. थोडं खाली उतरताच आणखी दोन दरवाजे आणि मुक्कामाची गुहा नजरेस पडते.. खाली उतरून चार-दोन गुहांचा परिचय करून घेतला.. इथे मुक्कामाची सोय चांगली आहे असे दिसले.. बाकी कुठेही मुक्कामाची सोय नाही.. दरवाजात विजयी आविर्भावात एक जंगी फोटोसेशन उरकून घेतले.. शेवटी आयुश्यात उरतात त्या आठवणीच.. आणखी काय घेवून जाणार.. परतीच्या प्रवासाला.. अजरामर आठवणींची शिदोरी बांधून पुन्हा माथ्यावर आलो..

उन्हाचा मारा सौम्य झालं हे पाहून Captain Cool ने परतीचे निर्देश दिले.. मुल्हेर चा डाव घोषित करण्यात आला.. भडंगनाथाचे मंदिर आणि त्यावर सावली धरणारे झाड उजवीकडे सोडून डावीकडच्या पायवाटेने निघालो ही वाट.. पुन्हा मुल्हेर च्या चोर दरवाजाकडे जाते.. दहा एक मिनिटात चोर दरवाजात येवून पोहोचलो.. मुल्हेर विजयाचे तेज चेहऱ्यावर घेवून मोराकडे निघालो..
खिंडीतून पुढे जाताच समोर मोराचा कातळी जीना चढू लागलो.. दहा मिनिटात मोरा गडाच्या मुख्य द्वारात पोहोचलो.. दरवाजाचे बांधकाम अजून शाबूत असल्याचे पाहून हायसे  वाटले.. दरवाजावर सुंदर नक्षिकाम केले आहे.. आणि आकर्षक कमान.. आत शिरलो.. डावीकडून वळसा मारत गडमाथ्याचा पहारेकरी असा दुसरा दरवाजा दिसला.. हुर्रे.. !!! “टीम सन्मान कि फतेह.. टीम इंडिया का खालसा”..  एव्हाना सूर्य मावळतीला आला होता.. साधारण पाच वाजले असावेत..

मुल्हेर चा पहारेकरी मोरा किल्ला.. नैसर्गिक सरळसोट तुटलेला सुळका.. आणि त्यावर बांधलेला हा छोटेखानी किल्ला.. गडाचा मुख्य दरवाजा पाहून क्षणार्धात दिवसभराचा शिणवटा कुठल्या कुठे दूर पळाला.. दिल टोटे टोटे हो गया.. गडाच्या मुख्य द्वारातून गडमाथ्यावर प्रवेश केला.. गडावर मध्यभागी एका इमारतीचे अवशेष आणि पूर्वेला पाण्याचे टाके आहे .. गडाचा घेरा मुल्हेर च्या मानाने अगदी किरकोळ आहे.. पण याचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही.. मुल्हेरच्या रक्षणासाठी मोरा आणी हरगड या किल्ल्यांची बांधणी करण्यात आली.. डावीकडे मोरा आणि हरगड एखाद्या अंगरक्षकासारखे  मुल्हेरच्या रक्षणासाठी अजूनही तत्पर असल्याचे दिसले.. आल्या वाटेने पुन्हा पायथ्याशी निघालो.. घसरडे बूट कंबरेला बांधून अनवाणी घसाऱ्यावरून उतरू लागलो.. अर्ध्या-पाऊण तासात  पुन्हा सोमेश्वर मंदिरात याणून पोहोचलो.. पाण्याचे काही सपकारे तोंडावर मारून पुन्हा गणेश मंदिराकडे निघालो.. सुकलेल्या तळ्यातून चालत जात मंदिरात प्रवेश केला. मंदिराचे नक्षिकाम बघण्यासारखे आहे.. आणि समोर.. हिरवेगार तळे.. वर नजर फेकली तर मोरा-मुल्हेर राजेशाही तोऱ्यात उभे होते.. या किल्ल्यांचा धाक वाटत होता.. पण आज हे राजबिंडे किल्ले आमचे दोस्त झाले होते..

इथे आणखी काही दर्दी ट्रेकर मंडळी भेटले.. यातले सिनियर सावंत काकांनी तर मांगी-तुंगी चे सुळके सर् केले होते.. आणखी एक ग्रुप होता त्यांनी नुकताच न्हावी सर् केला होता.. गडावर पाहण्यासारखे काही नसल्याचे सांगितले.. या मुद्द्याची दाखल घेवून पुन्हा धनगरवाडा गाठला.. सारथी सखा सचिन.. सुमो गाडी घेवून सज्ज होता.. टीम सन्मान ला मुक्कामी नेण्यास.. मुक्क्माची सोय उद्धव महाराजांच्या मठात करण्यात आली.. या मठातील लक्ष्मीनारायण मंदिराशेजारील जुन्या शाळेत.. पथाऱ्या पसरल्या.. चौकातील वडापाव वाल्या दादाचा घरगुती जेवणाचा जोडधंदा होता.. शाळेत ब्यागा टेकवून उदरभरणासाठी निघालो.. खास खानदेशी झणका.. लालबुंद बटाटा रस्सा भाजी.. भाकऱ्या.. भात, वरण, चटणी.. असा हुकमी मेनू होता.. सकाळी चांगलाच धूर निघणार होता.. कारण इथली मिरची नुसतीच रंगाने लाल नव्हती.. बागलाणी मातीचा तिखट तोरा तिच्या अंगी ठासून भरलेला होता..
‘अन्नदाता सुखी देवो भव:’ म्हणून दादांच्या परिवाराचा निरोप घेतला..  मठात पोहोचताच थोडा फेरफटका मारण्यासाठी मठाच्या आवरात चक्कर मारली.. एक अश्वत्थ वृक्ष मठाच्या मधोमध स्थितप्रज्ञ होवून उभा होता एखाद्या ध्यानस्थ मुनीवरा सारखा.. शेजारी लक्ष्मिनारायणा चे सुबक मंदिर.. मंदिरात उद्धव महाराजांची मूर्ती.. आपसूकच भक्ती भावनेने तिथे नतमस्तक झालो.. म्हटलं “देवा नारायणा, उद्धवा, पांडुरंगा.. आज तुझ्या कृपेने.. साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा सर् करू शकलो.. अशीच माया ठेव या सह्याद्रीच्या लेकरांवर.. शरीराची हाडं ठिसूळ होण्याआधी महाराजांचे किमान तीनशे किल्ले तरी पाहू दे.. रे महाराजा..”
दिवसभराचा थकवा पहाता.. उद्या काय वाढून ठेवलंय याचा पत्ता नव्हता.. New Day New Adventure.. ‘नवा दिवस जुने भिडू आणि नवा किल्ला’ हे असंच चालू राहणार.. रात्री मठातील शाळेत जोरदार ताणून दिली.. उद्याचं उद्या.. शेवटी शेक्सपियर म्हणून गेलाय ना.. “कशात काय आणि डोंगरावर पाय”.. जावू द्या ‘नावात काय आहे’Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s