बागलाणची मुशाफिरी – भाग ३

बागलाण कसोटी (दिवस तिसरा): किल्ले हरगड आणि जिभ सुळका
All the photographs in this article are taken by Upendra Kshirsagar.. An Expert Photographer
भल्या पहाटे सहाला टीम मिटींग झाली.. Captain Cool आणि कोच दीपक दादांनी पुढचा प्लान पोतडीतून बाहेर काढला.. सकाळी नाश्ता करून हरगड.. आणि दुपारी लंच ब्रेक नंतर मिशन ‘मांगी-तुंगी’.. थोडक्यात सांगायचं तर, या बागलाण सामन्यातील मुल्हेर-मोराचा डाव घोषित केला होता.. आजचे फलंदाजही कसलेले आणि नावाजलेले.. हरगड, मांगी आणि तुंगी.. आज यांना सामोरं जायचं होतं.. बागलाण टेस्ट सामन्यातील हा तिसरा दिवस कुणाकुणाला जायबंदी करणार होता कोण जाणे..!


न्याहारी उरकून,, दुपारसाठी फळे आणि ठेपले घेवून.. हरगड पदभ्रमण सुरु झाले.. पुन्हा मुल्हेर माची च्या पायथ्याशी असणाऱ्या धनगरवाडा गाठला.. काल सर् केलेल्या मुल्हेर-मोराकडे एक विजयी कटाक्ष टाकला.. आणि वाटाड्या घेऊन उजवीकडच्या सोंडेवरून निघालो.. मुल्हेर-हरगड खिंडीत जाण्यास निघालो..

हरगड हा मोरा-मुल्हेरचा सवंगडी.. शोलेत कसे दोन दोस्त असतात.. अगदी जिवाभावाचे मैतर.. तसा हा मुल्हेर चा सवंगडी हरगड.. जरी उंचीने थोरला असला तरी.. एखाद्या धाकट्या भावाच्या मायेने मुल्हेरचे  रक्षण करण्यास सदैव सज्ज..

इतिहासकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर.. मोरा आणि हरगड या किल्ल्यांची बांधणी मुल्हेरच्या संरक्षणासाठी करण्यात आली.. उजवीकडे धिप्पाड हरगड अन् डावीकडे काटक देहबोलीचा मोरा.. तीन कसलेले मल्ल समोर आले तर काय बिशाद प्रतिस्पर्ध्यांची.. पुढे  पाऊल टाकायची.. अंगावर चालून येणाऱ्या गनिमाला, हे दुर्गत्रिकुट ठणकवतात.. “खबरदार पुढे याल तर .. उडवीन राई राई एवढ्या चिंधड्या..”

धनगरवाड्या शेजारी.. मुल्हेरकडे तोंड करून उभे राहता.. उजवीकडच्या सोंडेवरून निघालो.. एक-दोन टेकाड चढून.. हरगडाच्या कातळभिंतीच्या पायथ्याच्या पायवाटेला येवून मिळतो.. इथून डावीकडे चालताच.. आता खिंड नाकाच्या रेषेत सरळ पुढे थोडी वर दिसत असते.. आणि मुल्हेर-मोरा डावीकडे राहतात.. मुल्हेर माचीवर खिंडीकडच्या बाजूचे दरवाजे दिसतात अधून मधून.. हरगडाच्या कातळ भिंतीला समांतर जात आणखी थोडी पायपीट करताच समोर खिंडीतली तटबंदी दिसू लागते.. धनगरवाड्यातून साधारण अर्ध्या-पाऊण तासात मुल्हेर-हरगडला जोडणाऱ्या खिंडीत दाखल झालो.. खिंडीत पाहिलं तर.. इथे  भरभक्कम  बांधकाम आहे.. मुल्हेरमाची ला बांधलेली संरक्षक तटबंदी.. एक भग्न दरवाजा ही आहे..  

खिंडीत ड्रिंक्स ब्रेक घेतला.. हरगडाची विकेट कशी घ्यावी यावर मार्गदर्शक (वाटाड्या), कप्तान आणि कोच यांच्या काही Internal खलबते झाली.. Warm-Up ने फुललेला श्वास पूर्वपदावर येताच,, Captain Cool ने ‘गेम ऑन’ ची घोषणा दिली आणि पुन्हा सामना सुरु झाला..


हरगडावर खिंडीतून जाण्याचे दोन मार्ग आहेत.. एक खिंड ओलांडून पलीकडच्या बाजूने (मुख्य द्वाराने) तर दुसरा.. खिंडीच्या अलीकडून तीव्र घसाऱ्याच्या (Scree) वाटेने चोर दरवाजातून.. वाटाड्या म्हणाला, ‘हिकडून तुम्हाला न्हाई जमणार तुम्ही पुढून चला’.. खिंडीतून दरवाजाच्या भग्न तटातून वाट काढत.. पुन्हा उजवीकडे निघालो.. आता मघाशी समांतर चालणारी हरगडाची कातळभिंत पाहता ती इंग्रजी ‘व्ही’ आकाराची दिसते.. आणि पुन्हा आपण कातळ भिंतीला उजवीकडे ठेवत.. समांतर चालू लागतो..  आता समोर उजवीकडची कातळ भिंत आणि त्याला जोडणारा एक सुळक्यासारखा दिसणारा डोंगर दिसू लागतो.. हा सुळका-टाइप डोंगर आणि उजवीकडच्या कातळभिंतीला जोडणाऱ्या घळईतून हरगडाची वाट आहे..


खिंड मागे सोडताच नागमोडी वाटेने चालत आपण बऱ्यापैकी घनदाट झाडीत येवून पोहोचतो.. इथे मगाशी विरळ वाटणारी झाडी आता घनदाट झालेली असते.. इथे उंच आणि हिरवीटंच झाडांची गर्दी झालेली असते.. एखाद्या देवराईत आल्यासारखं वाटतं.. मध्यान्हीच्या उन्हात रापलेल्या देहावर ह्या देवराईतून वाट काढणारा वारा हळुवार फुंकर मारू लागला.. क्षणभराची विश्रांती घेवून पुढे निघालो.. इथून उजवीकडे दाट झाडी-झुडुपातून जाणारी चढणीची नागमोडी वाट आपल्याला कातळ भिंतीच्या जवळ नेते.. कातळभिंत उजवीकडे ठेवत तिरपे गेल्यास आपण घळईत दाखल होतो.. वर पाहिलं तर घळईतून डोकावणारा हरगडाचा माथा अजूनही आवाक्याबाहेर वाटतो..

हरगड अजूनही दूर दिसल्याचे पाहून बसकन मारली.. कप्तान ने पुन्हा रनर दिला.. विशाल उर्फ सर्पमित्र.. यंदा आमचे लीड गोलंदाज वेंकी आणि आकाश हरगडाला भिडत होते.. कोच दीपक दादा.. मार्गदर्शनपर सुचना देत होते.. आता चांगली पायवाट संपून.. घळईतली  दगड धोंड्याची  वाट सुरु झाली.. साधारण २००-३०० फुटांची ही घळ.. ६०-७० अंशाच्या कोनात चढायचं दिव्य पार करावे लागणार होते.. पण “इरादा पक्का तर दे धक्का..”


सर्पमित्राला म्हटलं निवांत जाऊ गप्पा मारत.. म्हटलं आकाश-वेंकी जर ‘सबसे आगे सबसे तेज’ द्रुतगती गोलंदाज.. तर आपण ‘लेट लतीफ’ कूर्मगती गोलंदाज.. पण सामना जिंकायला सगळेच सारखे.. पावलं दगडांवर पडू लागली तशी गप्पांची रंगात वाढू लागली.. ‘मेरा एक-एक सवाल.. सर्पमित्र के दस-दस जवाब..’ असं सवाल-जवाब, सवाल-जवाब खेळत.. हरगडा चा पहिला दरवाजा दृष्टीक्षेपात आला..

‘माणूस इतकं कसं बोलू शकतो आणि ते ही न थकता..’ मला तर, “हा विशाल, शोलेतील आपल्या बसंतीचा युगांडा मध्ये हरवलेला भाऊ आहे कि काय !” अशी शंका यायला लागली.. पण सर्पमित्राने सापांविषयी माझा Database एकदम अपडेट करून टाकला होता.. शिवाय सर्पमित्रच सोबतीला म्हटल्यावर सापांची काय बिशाद.. पुढे यायची..! म्हणजे तुम्ही कमिशनर ला घेवून दुचाकी वरून चालला आहात आणि एखाद्या सिटी पोलिसाने अडवलं.. तर तुम्ही जसे निवांत राहाल अगदी Same-To-Same.. तसं हा ‘सापांचा कमिशनर’ सोबतीला आहे म्हटल्यावर सापांची भीती दूर पळाली होती..

गडाचा पहिला दरवाजा..म्हणजे ट्रेकच्या पूर्ततेची पावती देणारा.. माथ्यावर नेणारा जणू एक सांगाती.. ह्या आडवळणा वरच्या गडवाटांचा.. पहिला दरवाजा.. जर तुम्ही कुठल्याही गडाचा पहिला दरवाजा गाठला तर ट्रेक जवळपास पूर्ण झाला असं म्हणायला (Declare करायला) हरकत नाही.. पण ट्रेक खऱ्या अर्थाने सफल संपूर्ण करायचा असेल तर आणखी थोडी पायपीट करायलाच हवी.. भग्नावशेष पाहत पुढ निघालो.. पुन्हा दोन दरवाजे पार करून वर आलो.. समोर मारुती मंदिर दिसत होतं.. मागे वळून पाहिलं तर उजवीकडे एक हिरवं पाण्याचं टाकं आणि खाली घळईत दिसणारे तीन दरवाजे.. बागलाण मधील किल्ल्यांचा USP म्हणजे हे तीन दरवाजे, आणि बोडके पिवळेधमक  डोंगर.. तिकडे साल्हेर च्या दोन्ही वाटांवरचे तीन-तीन दरवाजे, सालोटावरचे तीन दरवाजे.. इकडे मुल्हेरमाचीकडे जाताना लागणारे तीन दरवाजे आणि हरगडाचे तीन दरवाजे.. या तीन दरवाजांचे काय गौडबंगाल आहे ते कळेना .. बहुदा किल्ले बांधण्याची ही बागलानी शैली असावी.. पण गड राखण्यासाठी केलेली ही ट्रिपल स्पीड ब्रेकर टाइप तीन दरवाजांची कल्पनाच अफलातून आहे.. म्हणजे एका दरवाजातून शत्रू आत आलं कि.. घे त्याला दुसऱ्या दरवाजाच्या कोपऱ्यात.. द्या त्याला खर्चापानी.. दुसऱ्या दरवाजातून आत निसटला तर.. आहेच तिसरा दरवाजा.. द्या परत बेल बुक्का गुलाल.. कधी काळी शत्रूंच्या नाकी नऊ आणणारे हे तीन दरवाजे आज भग्नावस्थेत पाहून मन उद्विग्न झालं..


शेवटच्या दरवाजातून आत येताच कातळ चढून उजवीकडे निघालो गडाच्या दक्षिण टोकाकडे.. आता आपण मगाशी समांतर असलेल्या हरगडाच्या कातळ भिंतीच्या माथ्यावरून चालत असतो.. तुटलेली भिंत उजवीकडे ठेवत.. तिरपे डावीकडे जाताच भग्न इमारतीचे अवशेष नजरेस पडतात.. या भग्न इमारतीचा चौथरा आडवा पायवाटेला आडवा येतो.. या चौथऱ्याकडे पाठ करताच उजवीकडच्या वाटेने चालत जाताच उजवीकडे खाली हरगडाच्या पश्चिमेकडील कातळ भिंतीला चिटकून उभा असलेला सुळका दिसतो.. याला ‘जिभ’ सुळका म्हणतात… सालोट्यावरून जिभाउन्नी दाखवलेला हाच तो सुळका जो कातळातून एखाद्या जिभे सारखा बाहेर आल्यासारखा दिसत होता… तो आता जवळून बघताना हैद्राबादच्या चार मिनारांपैकी एखाद्या उत्तुंग मिनारासाखा वाटत होता.. वाटलं इथे सिंघम अन्नाला आणायला पाहिजे क्ल्याम्बिंग ला.. सुसाट निघेल तो.. एखाद्या वाऱ्या सारखा..
हरगडचा एक-मिनार पाहून पुन्हा दक्षिण टोकाकडे निघालो.. पुन्हा आल्या वाटेने .. भग्न इमारतीच्या चौथरा गाठला आणि पायवाटेने इमारतीची खुजी तुटलेली भिंत लांघून पलीकडे गेलो इथे समोर.. अगदी छोट्या टेकाडावर चढून गेलो.. आणि इथे एक तोफ पहायला मिळाली.. हीच टी हरगडावरची दुनियामे वर्ल्ड फेमस.. हजार बांगडी तोफ.. लोखंडाच्या बांगड्यांपासून घडवलेल्या या बांगडी तोफा यवनी राज्यकर्त्यांची खासियत असावी बहुतेक.. तिकडे जंजिऱ्यावर कलाल-बांगडी इकडे हजार बांगडी..

पूर्वी घडवलेली मोठी तोफ.. गडावर घेवून जाणे जवळपास ‘नमुन्कीन के बराबर’ होतं.. म्हणून ओतीव लोखंडाच्या रिंगा जोडून त्यांची अशी तोफ घडवली आहे.. तोफेचा घेर पाहून.. ही लांब पल्ल्याची तोफ असल्याचे कळले.. मुल्हेर माची कडे होणारे आक्रमण थोपवण्यासाठी.. या दक्षिण बुरुजावर सुसाट सुटणारे तोफगोळे मुल्हेर माची जिंकू पाहणाऱ्या गनिमाचा थरकाप उडवीत असणार हे नक्की..

इथून मुल्हेर-मोरा या किल्ल्यांचं एक वेगळंच रुपडं पहायला मिळते.. इथून दिसणारे मुल्हेर माचीवरचे गणेश मंदिर-गणेश तळे, सोमेश्वर मदिर तर केवळ स्वप्नातीत असेच.. हरगडाची सफर या Landscape मुळे सार्थकी लागली.. इथवर यायला केलेली तब्बल तीन तासांची तंगडतोड या अफलातून नजाऱ्यासमोर काहीच  नव्हती.. आहेच अशी जादू माझ्या ‘मल्हारी महाराष्ट्रात आणि त्याच्या सह्याद्रीच्या दारी-खोऱ्यात’..  इथून मुल्हेर माचीचे खिंडीकडून असलेले तीन दरवाजे पहायला मिळतात.. 

हजारबांगडी तोफेच्या पुढ्यात ब्यागा टेकवल्या आणि समोर दिसणाऱ्या अर्धा-वर्तुळाकृती बुरुजावर उन्हाचा मारा सोसत बसलो.. डबे-डूबे उघडून ठेपला-फ्राय, चटणी आणि सफरचंद असा लंच केला.. थोडं भानावर येताच.. कप्तान गंभीरपणे म्हणाले.. अभिनंदन टीम सन्मान… मोठ्या मेहनतीने हरगडाची विकेट घेतली.. आता गाठ .. उंचपुऱ्या मांगी-तुंगी या सख्ख्या भावंडांशी आहे.. चलो आगे बढो.. कमॉन टीम सन्मान..  कर लो बागलाण मुट्ठी में..


परतीच्या प्रवासाला आल्या वाटेने पुन्हा खाली निघालो.. वाटेत मुख्य दरवाजासमोर.. एक हनुमान मंदिर आहे.. दर्शनाला निघालो.. मंदिरापाशी पोहोचताच, बाहेर निळ्या आकाशाच्या छत्री खाली उभा असलेला महाबली महारुद्र हनुमान पाहून आपसूकच भक्तिभावनेने हात जोडले गेले.. नीट पाहिलं तर हनुमानाच्या पायाशी काही तोफगोळे लोटांगण घालताना दिसले.. तिकडे.. मुल्हेरला तोफगोळा पायाशी असलेला गौरीपुत्र गणेश आणि इकडे अंजनीसूत हनुमान.. काही तरी तर्कशास्त्र नक्की असणार या मागे.. मंदिराच्या मागे आमचे परवाचे दोस्त साल्हेर-सालोटा आमच्याकडे डोकावून पाहत होते.. म्हटलं पुन्हा येणार.. नक्की..

मांगी-तुंगी ची वेळ चुकवायची नसल्याने हरगडावरून काढता पाय घेतला.. पुन्हा घळईतून दगड-धोंड्याच्या वाटेने निघालो.. उतरताना माणसाला गुडघे नसते तर किती बरं झालं असतं असं वाटू लागलं.. गुडघ्यांची सत्वपरिक्षाच जशी ! .. या जीवघेण्या परिक्षेत माझा डावा गुडघा नापास झाला.. म्हणजेच जोरात दुखू लागला.. कप्तान ने पुन्हा रनर दिला .. सर्पमित्र विशाल.. दुखऱ्या गुडघ्याचे उगाच कौतुक नं करता गुमान रस्ता कापत खिंडीत दाखल झालो.. खिंडीत औटघटकेचा विसावा घेवून.. पुन्हा मुल्हेर माचीच्या पायथ्याशी असणाऱ्या धनगरवाड्यात येवून पोहोचलो.. साधारण दुपारचा एक वाजला होता..

लंच पर्यंत एकही गडी न गमावता हरगडा ची विकेट घेतली होती.. आता डाव मांगी-तुंगी चा होता.. Captain Cool उपेंद्र ने गाडीतच टीम डिस्कशन उरकले.. वेगळा ब्रेक न घेता गाडीतच जेवण उरकावे म्हणजे मांगी-तुंगी च्या पायथ्याशी लवकर पोहोचता यावं.. यासाठी कप्तान ने वेळेच्या व्यवस्थापनाचा एक आदर्श घालून दिला.. बाकी ट्रेक मध्ये काय काय शिकायला मिळतं.. आपात्कालीन व्यवस्थापन, वेळेचे महत्त्व, संघ-भावना, आणि ध्येय कसं गाठायचं याचा दांडगा अनुभव फक्त आणि फक्त ट्रेक मध्येच मिळू शकतो..

मांगी-तुंगी : मांगी-तुंगी ही जैन धर्मियांचे श्रद्धा स्थान.. सटाणा-ताहीराबाद-घाट रस्ता-भिलवाडी असा गाडीमार्ग आहे.. आदिनाथ आणि पार्श्वनाथ यांच्या वास्तव्याने पावन झालेले ही दुहेरी शक्तीपीठे म्हणजे मांगी आणि तुंगी चे दोन सुळके.. या ठिकाणी जैन तीर्थंकर महावीर जैन, आदिनाथ जैन, शांतीनाथ जैन आणि पार्श्वनाथ जैन यांच्या मूर्ती कातळात कोरल्या आहेत.. भिलवडीतून पाहताना हे सुळके  पाहताना.. आपल्याच तोऱ्यात उभे असल्याचे आपल्याला दिसतात.. उजवीकडचा तुंगी आणि डावीकडचा मांगी सुळका.. तुंगी सुळका हा उंचीने थोडा मांगीला थोरला आहे.. बाकी तोरा तोच.. एखाद्या जगाज्जेत्यासारखा.. भिलवाडला पोहोचलो.. लगोलग पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.. आणि समोर मांगी-तुन्गीला जोडणाऱ्या माची कडे नेणाऱ्या पायऱ्या पाहू लागलो.. शेवटी नजर थकली पण पायऱ्या काही संपत नव्हत्या..


आजू-बाजूला पहिलं तर मांगी-तुंगीची वारी करून आलेला एक ग्रुप नळ-कोंडाळ्या लगतच्या झाडाखाली पारावर निवांत बसला होता.. त्यांनी ‘वर माकडं खूप आहेत आणि खायचं प्यायचं नेवू नका असा प्रेमाचा सल्ला दिला.. आमच्या ग्रुप मधल्या एकाचा मोबाईल पळवला.. अशी चौका देनेवाली बातमी ही दिली..’ आता काय म्हणावं या हुल्लड माकडांना.. फोन घेवून काय करणार होती ही माकडं.. आयटम ला फोन लावणार का ते  !.. हेलो डिअर मंकीरानी .. ‘हुप हुप हुप.. तुझी लांब-आणि-शेंडेदार शेपूट मला जाम आवडते.. तिकडे तुंगी आळीतला काळ्या तोंडाचा ढेसऱ्या आहे ना.. अगं तो लुक्का मंकी चा दोस्त.. तो तुझ्यावर जाम लाईन मारतो.. मला कालच आपला मांगी आळीतला ढोल्या मंकू बोलला.. तुझा काही म्याटर चाललाय म्हणून..’ .. आणि तिकडून काय माकडीण असं उत्तरणार होती का.. ‘हुप.. हुप.. हुप.. उगाच उन्हाच्या टायमाला भंकस करू नकोस.. आयला इकडं पुण्या-मुंबईचे छावे यायची वेळ झाली.. तरी याची वासुगिरी सुरूच.. चल ठेवते रे लाल-तोंड्या.. मला मेक अप करायचाय अजून’.. काहीतरी उगाच माकडाने फोन पळवला म्हणे.. !!!

इथली माकडे आक्रमक आहेत असेच बऱ्याच जणांकडून ऐकले आणि त्यामुळे फक्त पाण्याच्या बाटल्यांची एक आणि बिस्किटाच्या पुड्यांची एक ब्याग घेवून निघालो.. माकडांना हुसकवायला वेताच्या काठ्या घेतल्या… काय सांगावं उगाच अंगावर वगैरे आला म्हणजे..!

अशी भर दुपारी काढलेली ही डोलबारी रांगेतील ह्या डोंगरांची मोहीम आज अजरामर होणार हे नक्की होतं.. फक्त ही मोहीम पूर्ण करताना आपण स्वतः अमर होणार नाही याची काळजी घ्यायची होती.. हातात काठी आणि डोळ्यात ध्येय घेवून निघालो.. एकेक पायऱ्या चढू लागलो.. जेमतेम शंभर एक पायऱ्या चढून गेलो असेन.. आधीच हरगडाच्या घळीतील दगड-धोंड्यानी दुखावलेला डावा गुडघा या शंभराव्या पायरीला.. ‘आम्ही नाही जा’.. असं म्हणून रुसून बसला.. फक्त शंभर पायऱ्या चढलो तर ही अवस्था तर ३००० पायऱ्या काय अवस्था करणार या कल्पनेने.. अंगावर शहारे आले.. आणि पायाचा थरकाप उडाला.. मग कुणीतरी म्हणालं.. आपण एक आयडिया करुया.. म्हटलं ‘सांग बाबा सांग तुझी आयडीया ची कल्पना..’ म्हणाला .. ‘आपण इथे प्रत्येक ५० पायऱ्यांनंतर .. पायरीवर आकडा लिहिला आहे’.. आपण एका दमात पन्नास पायऱ्या चढायच्या आणि मग दहा मिनिटाचा ब्रेक.. ‘कशी वाटली आयडीया..!’..  म्हटलं बेस आहे.. बघू किती वेळ चालते ही आयडीया.. नव्याने सुचलेल्या आयडियाची कास धरून ५०० पायऱ्यांचा टप्पा पार केला.. अध्ये मध्ये उभारलेले पत्र्यांचे शेड डोक्यावर पाखर धरत होते .. ते नसते तर काय झाले असतं याची कल्पनाच न केलेली बरी..


पाचशे पायऱ्या चढून बूड टेकते ना टेकते तोच कप्तान म्हणाला.. हे असं ५०-५० पायऱ्या चढलो तर अंधार होईल वर जाईपर्यंत.. आपण १०० पायऱ्यांचा एक टप्पा ठेवूयात.. म्हटलं ‘बास का कप्तान असं चीटींग नाही करायचं.. आता ठरलंय ना आपलं.. ५० चं एक टप्पा.. उगाच टीमला तरास नको’.. टीम सन्मान मांगी-तुंगी कडे निघाले एकेक टप्पे पार करत.. मी आपलं हळूच एका टप्प्याचे दोन टप्पे करून.. एका दमात २५ पायऱ्या असं चालू लागलो.. मजल-दरमजल म्हणजे काय असतं.. ते इथली प्रत्येक पायरी चढताना कळतं.. धापा टाकत १००० व्या पायरीवर पोहोचलो.. इथवर आलो खरा.. पण आता खरं परत खाली जावं असा विचार मनात डोकावू लागला.. शेक्सपियरला पडलेला प्रश्न मला त्या १००० व्या पायरीवर पडला.. ‘To be or not to be !..  एक पळपूटं मन.. ‘पुढे जावं कि नं जावं’ या यक्ष प्रश्नात घुटमळलेलं आणि एक झुंजार मन.. म्हणालं ‘सहा निम्म्यातले दोन निम्मे चढून आलोय.. आता चार निम्मे राहिले.. चल पुढे’.. ‘तू ना रुकेगा कभी.. तू ना थमेगा गा कभी.. कर शपथ.. अग्निपथ.. अग्निपथ.. अग्निपथ’..

हजाराव्या पायरीला ‘एका दमात ५० पायऱ्या’ हे गणित पायरीवर सोडून.. ‘एका दमात जमतील तितक्या पायऱ्या’ हे प्रमाण मानून चालू लागलो.. हो नाही करत एकदाचा तो २००० पायऱ्यांचा टप्पा दृष्टीक्षेपात आला.. ध्येय असं आवाक्यात आल्याची ही चाहूल होती.. इथे शेड मध्ये एक आजी बाई ताक-सरबत विकण्यास सरसावल्या.. थोडं बूड टेकवलं तर माकडांची गुरगुर चालू झाली.. काय त्रास आहे हा.. ! ती वेताची काठी उचलण्याचेही त्राण नव्हते.. त्यांच्याकडे तसेच दुर्लक्ष करत सरबतावर ताव मारला.. दोन सरबताचे ग्लास गटागट पिवून पुन्हा माणसात आलो..

त्या २००० पायऱ्या संपताच आपण मांगी सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचतो.. आता इथे दोन वाटा फुटतात.. उजवीकडची वाट तुंगी सुळक्या कडे नेणारी तर डावीकडची मांगी कडे.. उजवीकडे निघालो.. Captain Cool ने  निर्देश करताच पुन्हा माझ्या लाडक्या पायऱ्यांकडे निघालो.. दोन डोंगरांना जोडणाऱ्या दांडाकडे निघालो.. थोडं पुढे जाताच एक कृष्णाचे संगमरवरी भग्न मंदिर पहायला मिळाले.. आपसूक भक्तीभावाने हात जोडले गेले.. शेवटी आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत “आशीर्वाद आणि पायऱ्या”.. पुढे गेलो तर पुन्हा ५०० पायऱ्या.. आणि समोर पायऱ्यांचा राजा तुंगी चा सुळका.. त्या अंगावर येणाऱ्या पायऱ्या पाहून पुन्हा एकदा प्रश्न पडला To be or not To be.. that is the question”..??  पण

पण ही जात मावळ्याची.. वाटेस नाही डरायची
त्यास ठावूक आहे जात.. गानिमांशी लढायची

लंगडत्या पायांनी जोर देवून त्या .. ५०० पायऱ्या सर् करण्याचा निर्धार केला.. जसजसा तुंगीचा सुळका जवळ येवू लागला तसतसा मनाला धीर वाटू लागला.. नेटाने त्या ! ५०० पायऱ्या सर् केल्या आणि तुंगी सुळक्याच्या सावलीखाली पोहोचलो.. माझा गुडघा त्या २५०० व्या पायरीवर दुखावला आणि सुखावला.. सुखावला तो ध्येयपुर्तीच्या साधनेने आणि दुखावला तो पायऱ्या आणि पायऱ्यांनी.. शेवटी आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या ‘पायऱ्या आणि पायऱ्या’.. दुसरं काही असूच शकत नाही..

तुंगीच्या सुळक्याला प्रदक्षिणा मारण्यास निघालो तोच बेरकी माकडांचा एक घोळका दबकत हळूच पाठलाग करू लागला.. काही तरी खायला मिळेल या एकमेव आशेने ती माकडे मागावर होती.. प्रदक्षिणा मार्गावर सर्व गुंफा जाळीबंद केल्याचे दृश्य दिसले.. या ठिकाणी… जैन धर्मियांची भक्तीस्थळे ठाण मांडून उभी आहेत.. इथे दोन गुहेत भगवान चंद्रप्रभू जैन धर्मियांचे आठवे तीर्थंकर यांची मूर्ती आहे.. रामचंद्राची गुहा, हनुमान, गाव, गवाक्ष, नील आदी देवतांच्या मूर्ती कोरल्याचे ही दिसते.. इथल्या एका गुहेत प्रभू श्रीरामाच्या सैन्याचा सेनापती कृतांतवक्र याची एक साधुरुपातील मूर्ती आहे.. याशिवाय बाहुबली च्या ही मूर्ती आहेत.. प्रदक्षिणा मार्गावर माकडांनी टीम सन्मान ला कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला पण वेताच्या काठ्यांनी तो हाणून पाडला.. शेवटी तुंगी प्रदक्षिणा पूर्ण करून .. 

पायऱ्या उतरू लागलो .. तरी माकडं मागावरच.. त्यांच्या धाकाने का होईना .. पण झपाझप पायऱ्या उतरलो.. आणि पुन्हा दांडा वरून .. मांगी सुळक्याच्या पायऱ्यांशी येवून पोहोचलो.. माकडे अजून मागावरच होती.. तेवढ्यात.. एक टायवाला ग्रुप मांगी उतरून त्यांच्या राजू गाईड बरोबर खाली उतरू लागलं होता.. एव्हाना माकडांना कळून ही चुकलं ही आधुनिक माकडं आपल्यापेक्षा बेरकी आहेत म्हणून.. नाईलाजाने शेवटी त्यांनी आपला मोर्चा त्या उतरणाऱ्या मंडळींकडे वळवला.. बाकी झटक्यात सटकले त्यांचा गाईड सापडला.. गाईड च्या हातात स्टीलचा डबा होता आणि माकडांना निमित्त मिळालं..  त्यांनी गाईड ला घेरला .. १५-२० माकडे आणि एकटा गाईड .. शेवटी गाईड हातातला डबा सोडून जीव मुठीत घेवून पळाला.. आणि माकडांनी डब्याचा ताबा घेतला.. शेवटी माणूस कितीही शिकला तरी आपल्या पूर्वजांना शेवटी शरण जाणारच..

असा गमतीशीर प्रसंग पाहून पुढे निघालो..  एका दमात दहा पायऱ्या असा पल्ला गाठत पुढे निघालो .. सूर्य एव्हाना मावळू लागला होता.. पायऱ्यांवरून अधून मधून न्हावी आणी मागे साल्हेर-सालोटाचे दर्शन सुखावत होते..

टीम सन्मान चे ओपनिंग फलंदाज आकाश आणि वेंकी सरसर पुढे निघाले.. मागे उरले फक्त ज्येष्ठ नागरिक आणि कुपोषित (!) वळसा मारत पुढ निघालो.. इथल्या प्रत्येक वळणावर एक दस हजारी नजारा आहे.. या बागलाणच्या रांगांचा कि बस्स एकदम.. मन प्रसन्न होवून जातं.. साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा-हरगड-ताम्बोल्या-न्हावी असे हाकेच्या अंतरावर भासतात.. अगदी जिवाभावाचे मैतर..!!


२००-३०० पायऱ्या चढून गेलो आणि मान्गीच्या पायथ्याची सीता गुंफा दिसली.. ही गुंफा म्हणजे लक्ष्य जवळ आल्याची चाहूल.. पुढे आणि एक स्पायरल जीना  चढून वर गेलो आणि काय सांगू दादानू .. “आली ध्येयघडी.. समीप पायऱ्या .. चढूनी यावे शिखरा..  दृष्टा दृष्ट गिरीवरा न करणे.. दोघे करावे उभे.. सांगाती बहु गलबला न करणे.. भटकंती झाली असे.. शुभमंगल सावधान..”.. ही शेवटची ३००० वी पायरी गाठता गाठता यापायऱ्यांशी जणू माझं लग्नच लागलं होतं.. वर नजर टाकली तर ही अंतिम पायरी डोक्यावर थयथया नाचत होती.. जणू म्हणत होती.. आ गये .. मेरी जिंदगीका तमाशा देखने.. ?? पण म्हटलं इरादा पक्का तर दे धक्का.. आता फक्त रांगायचं  बाकी होतं.. शेवटच्या पायरीवर लोटांगण घेतलं..
चाल तू पुढे सदा.. अजून दूर जायचे
शिखरावर दोन ठसे.. पावलांचे द्यायचे
दुर्गम ही वाट अशी.. सळसळते रान-पान
खळग्याची वाट चाल.. हरपूनी देहभान
टाक पाउले पुढे .. अजून दूर जायचे
दुर्ग रांगडे जरी.. तुलाच शूर व्हायचे
भिजलेली वाट जणू .. मातीचे अंतरंग
क्षितिजावर धुंद तसा.. चंदेरी तिमिर रंग    
चाल तू पुढे सदा.. अजून दूर जायचे
शांतशा माथ्यावरी.. तुलाच धृव व्हायचे
माथ्यावर पाहतो.. भव्यता असे नभी
सदैव साथ देत ही.. मायभू असे उभी
टाक पाउले पुढे .. अजून दूर जायचे
शिखरावर क्षणी रमून.. घरट्यात परतायचे

आज खऱ्या अर्थानं या बागलाणची भटकंती सार्थकी लागली होती.. ३ दिवसात तब्बल सात गिरीदुर्ग आणि सगळे एक सो एक.. नखशिखांत फक्त मूर्तिमंत निसर्ग सौंदर्याची बरसात करणारी ही सह्य शिखरे.. बस्स.. यही लाईफ है बॉस !! बाकी सब मिथ्या है !!

मांगी सुळक्याच्या प्रदक्षिणा मार्गावर सात मंदिर कोरलेली आहेत.. बऱ्याच संतांच्या पादुका इकडे कातळात कोरल्याचे दिसते.. इथे एक कुंड आहे त्याला कृष्ण कुंड म्हणतात.. इकडे बलभद्र नावाच्या गुंफेत बलरामाची मूर्ती कोरल्याचे दिसते.. असे म्हणतात इकडे बलराम-कृष्णाने साधना करून पाचवा स्वर्ग गाठला.. असे सांगितले जाते..


मांगी सुळक्याला प्रदक्षिणा मारून पुन्हा त्या ३००० व्या पायरीवर रेटून बसलो.. ‘कप्तान माही’ ने .. यंदा अर्ध्या तासाचा ब्रेक मंजूर केला होता.. मग काय .. पाठ टेकवली. .आणि फराळ उरकला.. तशी यशाची धुंदी उतरली आणि आपण या ज्या ३००० पायऱ्या चढून आलो आहोत त्या आता उतरायच्या पण आहेत याची जाणीव झाली.. मनात एक प्रश्न घर करून बसला.. इतना उप्पर आ तो गये.. लेकिन अब नीचे कैसे जायेंगे रे बाबा.. !! गुढघे चाचपले .. सगळे सांधे अजून शाबूत होते.. जय बागलाण.. म्हणून उतरू लागलो.. कप्तानला सिनियर सिटीझन स्टाईल विनंती केली.. निवांत येतो.. ब्रेक आणि ब्रेक के बाद ट्रेक.. असं करत उतरण चालू झाली.. तेवढ्यात आकाश ओरडला.. साप साप.. !! साप हा शव्द कानी पडताच.. सर्पमित्राच्या अंगी बारा हत्तींचा बळ संचारलं.. आणि तो पायरी वरून धावत पळत खाली निघाला.. सापाचं हे असं Live Telecast झालं… “आणि सर्पमित्र हसला..!!!” भारताला अणुस्फोट करून जितका आनंद झाला असेल त्याच्या शतपट आनंद सर्पमित्राच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.. मग सर्पमित्राने त्या भक्ष्य खावून सुस्तावलेल्या Jr. Wolf Snake ला बाटलीत घातले.. त्याचं जीव गुदमरू नये म्हणून बाटलीला भोकं पाडली आणि अलेक्झांडर च्या विश्वविजयी थाटात सर्पमित्र आणि तो .. Jr. Wolf Snake पायऱ्या उतरू लागले.. सर्पमित्राचा बागलाण ट्रेक आज खरं सार्थकी लागला होता.. “कब के बिछडे.. आंज इस पायरी पे मिले.. !!”.. मला तर हे दृश्य पाहून प्रभु श्री राम आणि भरत भेटीचा प्रसंग आठवला.. आता हा सर्प त्याची असंख्य पादत्राणे काढून या सर्पमित्राच्या डोस्क्यावर  ठेवतो कि काय अशी शंका यायला लागली.. पण असं काही घडलं नाही..

पुन्हा त्या २००० व्या पायरीवर सभा भरली.. आणि या Jr. Wolf Snake ला इथे सोडून देण्याचे ठरले.. सर्पमित्राला तो सोडवेना .. म्हणाला खाली घेवून जावू.. म्हटलं बस्स कां भाऊ.. बाटलीपर्यंत  ठीक आहे .. आता हे काय नसतं खूळ.. शेवटी कप्तान उपेंद्र ने आज्ञा केली.. सर्प-कुमारास मुक्त करावे.. बाटलीचे मुखद्वार उघडले तसा तो सर्प-कुमार सळसळत दरीकडे झेपावला..

आता दुपारी कावलेला सूर्यदेव, थकून भागून मुक्कामाला निघाला होता.. तांबड्या किरणांचा  भरजरी शेला पांघरून.. मावळती ला निघाला होता.. आता परतीचे वेध लागले.. दिवसभर किती रानभर भटकलं तरी पाखरांना शेवटी घरट्यात परतायचे वेध लागतात.. तसे.. आता .. मुक्कामाचे वेध लागले.. उतरताना वेगवेगळे प्रयोग करून पाहिले.. कधी कठड्याला धरून .. कधी उलट्या पायऱ्या उतरून पाहिलं.. ५० एक पायऱ्या उतरून एक मोठा ब्रेक घेत.. शेवटी .. एकदाची ती.. दो बिघा जमीन .. जवळ दिसू लागली.. कमानिशी येवून पोहोचलो.. मागे वळून पाहिलं तर मांगी-तुंगीचे दोन सुळके सांज सावलीत बुडून गेले होते.. कमानी जवळच्या पारावर जरा विसावा घेवून.. पुन्हा घरट्याच्या शोधात निघालो.. टीम सन्मान ने तीन दिवसात सात धीप्पाड डोंगरांची विकेट घेतली होती तेही एकाही गडी नं गमावता..शाब्बास टीम सन्मान.. आजच्या दिवसाचा मानकरी खरा आकाश होता.. जसं मुंबई-पुणे सायकल रेस मध्ये घाटांचा राजा हा खिताब असतो .. तसा याला ‘पायऱ्यांचा राजा’ असा किताब देण्यात यावं अशी मी जोरदार मागणी मंडळाकडे केली..

मांगी-तुंगी च्या पायथ्याशी .. आपल्या जैन बांधवांची.. धर्मशाळा आहे.. भिलवाड ला .. तिकडे निघालो.. भिलवाड मधील जैन धर्मशाळेच्या दारात पोहोचलो तर इकडे लग्नाचा धुमधडाका होता.. कप्तान म्हणाले .. इकडे नको.. चलो.. उद्धव महाराज आश्रम.. पोटात कावळ्यांचे रणकंदन सुरु झाले.. तशी पुन्हा मुल्हेर वडापाववाले केटरर यांच्याकडे जेवणाची सोय लावली.. इथे जेवताना आपण पायरीवर बसून जेवतोय असा भास झाला.. शेवटी आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या.. एक जेवण आणि दुसरी गोष्ट म्हणजे पायरी ..! खानदेशी  बटाटा रस्साभाजी पार धूर निघेपर्यंत वरपुन .. मुक्कमी पोहोचलो.. पाठ टेकवली तरी माझ्या जीवश्च कंठश्च पायऱ्या डोळ्यासमोरून हलत नव्हत्या.. कप्तान उपेंद्र ने पुढचा बेत सांगितला उद्या न्हावी करायचा का?.. सगळ्यांनी नकारार्थी माना डोलावल्या.. आज मांगी-तुन्गीने एवढी भादारली आता उद्या.. न्हावी नको आता..

या सगळ्या चर्चासत्रात.. मी अंकाई-टंकाई किल्ल्यांचा प्लान सुचवला.. कप्तान आणि कोच ने त्यास तत्वतः मान्यता दिली.. आणि मोहिमेची सांगता अंकाई-टंकाई ने करायची असा बेत ठरला.. पहाटे चार ला मिशन अंकाई-टंकाई.. पायऱ्यांचे स्वप्न उशाला घेवून आडवा झालो.. पडल्या पडल्या डोळा लागला.. 

उद्धव महाराज मठ.. मुल्हेर गाव

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s