बागलाण कसोटी (दिवस चौथा): किल्ले अंकाई आणि टंकाई
All the photographs in this article are taken by Upendra Kshirsagar.. An Expert Photographer
पहाटे पाचाला टीम सन्मान शुचिर्भूत होवून सज्ज झाली .. अंकाई-टंकाई चा सामना करायला.. आज या बागलाण भटकंतीचा शेवटचा दिवस होता.. उद्धव महाराजांच्या पायावर डोकं ठेवून निरोप घ्यावा म्हणून मंदिराकडे निघालो.. या मठाच्या मध्यभागी लक्ष्मी नारायण मंदिर, मंदिरात उद्धव महाराजांची समाधी.. मंदिराशेजारी डावीकडे अश्वथ वृक्ष.. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक विहीर आणि एकूणच माहोल.. शांत भावभक्ती ने पुरेपूर भारलेला.. जणू अंतर्मुख करणारा.. मंदिरात पोहोचलो.. लक्ष्मी नारायणाचे दर्शन घेतले .. तेवढ्यात तिथे पुजारीबुवा पूजेसाठी प्रगटले.. पूजा उरकताच त्यांनी मग माहिती देण्यास सुरुवात केली..
पुजारीबुवा: ही लक्ष्मी नारायणाची मूर्ती फार पुरातन कालची आहे आणि ज्या दगडातून ती घडवली तो काही साधा दगड नाही.. फार मौल्यवान दगड आहे.. हा.. अजूनही एक फोन केला कि पोलिसांची टीम ताबडतोब दाखल होते या मूर्तीच्या रक्षणाकरिता.. आता पुजारीबुवांनी या प्रात:कालीन सभेचा अघोषित ताबा घेतला होता.. ते माहिती सांगू लागले
पुजारीबुवा: दरवर्षी गोकुळ अष्टमीला इथे रासक्रीडेचा जंगी कार्यक्रम असतो.. आणि इथे कृष्ण जन्माचे गोडवे गाण्यासाठी भारतभरातून प्रसिध्द गायक हजेरी लावतात.. अवधी.. गायकी घराण्यातले.. शास्त्रीय निम्शास्त्रीय गायक.. सगळे झाडून हजर असतात या सोहळ्याला.. दरवर्षी पावसाळ्यात उद्धव महाराजांच्या पायाशी पाण्याचा निर्झर उगम पावतो.. आहे कि नाही आश्चर्य.. ‘हम्म’.. काही दिवटे शास्त्रज्ञ आले होते या पाण्याचा गुणधर्म तपासायला.. तर नर्मदेच्या पाण्याशी याचे गुणधर्म जुळले.. साक्षात नर्मदेश्वरी गंगा उद्धव महाराच्या पायाशी झुळझुळ वाहते.. अशी जुजबी माहिती पुजारी बुवा पुरवत होते.. त्याचा निरोप घेतला उगाच पुढच्या मोहिमेला उशीर नको म्हणून मठातून प्रस्थान केले..
गाडी धुराळा उडवत निघाली.. ताहीराबाद-सटाणा-चांदवड-आणि मनमाड असा प्रवास सुरु झाला.. आग्र महामार्गा वर टोळ वर पोहोचलो तोवर पूर्वेची मंद चाहूल लागली.. चांदवड किल्ला हा असा उजवीकडे पण अंधुकसा दिसू लागला.. पुढे निघालो.. आणि अर्ध्या तासांतच सूर्यदेव डोंगराडून फुटभर वर आले.. कप्तान उपेंद्र ने गाडी बाजूला घ्यायला लावली.. सूर्योदयाचे हे आणखी एक मनोहारी दर्शया पहायला मिळाले..
बागलाण सफारीतला हा चौथा मनोहारी सूर्योदय.. सह्याद्रीच्या कुशीतून जन्मलेला.. जागृत आणि तितकाच प्रगल्भ.. आठवणीत कायमचा कोरून .. मनमाड गाठले.. यष्टी स्थानकावरून पुढे निघालो.. अंकाई रेल्वे स्टेशनच्या रस्त्याने.. चार-पाच कि.मी. भर पुढे जाताच अंकाई आणि टंकाई ही जोड गोळी दिसू लागली.. पुढे अंकाई च्या टेकाडाला वळसा मारून पायथ्याच्या गावी पोहोचलो.. इथवर पोहोचलो तोवर चांगलंच फटफटलं होतं.. गावातल्या चौकात एका टपरीजवळ गाडी थांबली.. तिथे आजींकडे चं मिळेल का म्हणून चौकशी केली.. पण आजी नम्रपणे नाही म्हणाल्या.. ‘आज पाण्याचा दिवस आहे.. चहा मिळणार नाही’.. या भागात पाण्याचा बारमाही दुष्काळ असल्याचे कळले.. पाणी येतं पण १५ दिवसातून एकदा मग हा दिवस चुकवून कसं भागणार होतं आजींचं.. शेवटी आजींनी पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आणि चहा स्टोव्ह वर ठेवला.. आज ‘चहा मिळणार होता’.. म्हणून कप-बशी कधी पुढ्यात येते याची वाट पाहू लागलो..
तिकडे सर्पमित्राने हळूच एका शेपूट लावणाऱ्या कुत्र्याला गोंजारायला सुरुवात केली.. लाडात आलेलं ते कुकुड कुत्रं.. सगळ्यांच्याच पायाला चाटू लागलं… तसं सर्पमित्राला त्याचं हे प्राणीप्रेम आवरतं घ्यायला सांगितलं..
गरमागरम चहाचा घोट घेवूनच गडावर निघालो.. आजूबाजूला पाहिलं तर.. पाण्याच्या हंड्यांचा खणखणाट आणि पक्ष्यांचा चिवचिवाट शिगेला पोहोचला होता.. पुढे निघालो.. विरळ बाभळीच्या रानातून वाट काढून दोन गडांच्या पायथ्याशी असणाऱ्या लेण्यांकडे निघालो.. येडा राघू,, बुलबुल, मैना.. चिमण्या झाडून बाभळीच्या शेंगांवर ताव मारत होत्या.. त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोतवाल पक्षी ही होता..
टंकाईच्या पायथ्याशी असणाऱ्या लेण्या समोरील झाडाखाली पोहोचलो.. समोर पाहिलं तर चार दुमजली गुंफा नजरेस पडल्या.. कुठून सुरुवात करावी असं विचार करू लागलो.. बरं .. सुरुवात से सुरुवात करते है.. म्हणून चौथ्या गुहेतून सुरुवात केली.. इथे शंकर भगवान अवतरले होते आडबाजूला ध्यानस्थ बसले होते.. आणि सोबतीला काही भक्त.. तिसऱ्या गुहेत पाहिलं तर इथे पार्श्वनाथाची ध्यानस्थ मूर्ती आहे.. आणि आजूबाजूला त्यांच्या शिष्यांच्या मूर्तीच्या शिल्लक राहिलेल्या चौकटी.. चौकटीतून शिष्य गायब झाले होते.. जणू अंतर्धान पावले होते.. बऱ्याच मूर्ती या भग्न चेहऱ्यांच्या असल्याने.. त्यांना नाव नव्हते.. पण जे काही होतं ते सुंदर नक्कीच होतं.. गुंफेच्या बाहेर पायथ्याला एका रांगेत गजराजांची शिल्पे आहेत..
डाविकडून दुसऱ्या गुहेत.. चार कोरीव खांब आणि रिकामा गाभारा.. या गाभाऱ्यात कुठल्या देवाचा अधिवास होता हे मूर्ती चोरच सांगू शकेल.. पण छतावर कमलपुष्पाचे सुंदर नक्षीकाम आहे.. अफलातून.. गुहेला खिडक्या देखील आहेत.. एकदम कोरीव.. कडक.. बाहेर प्रवेशद्वाराशी वर दोन शेपूट उंचावलेल्या सिंहांचे मोठे शिल्प कोरले आहे अगदी मुक्तहस्त चित्र सारखे.. असा हा डेंजर सिंघम अन्ना पाहून.. पहिल्या गुहेकडे निघालो.. यात काय दडलंय याची उत्सुकता वाटू लागली.. कोरीव दरवाजाच्या चौकटीतून आत आलो.. तर उजवीकडे वाघावर स्वार होवून साक्षात देवी प्रगट झाली होती.. सिरवा चुडा.. तांबडा मळवट आणि करारी नजर.. आणि प्रगल्भ अवतार.. माहूरच्या देवी सारखा आवेश.. जणू रणांगण गाजवून आलेल्या विजेतीचा थाट या देवीच्या आवेशात दिसू लागला.. नतमस्तक झालो.. दर्शन घेवून गडाव निघालो..
लेण्याच्या डावीकडील पायऱ्यांनी जाताच.. दोन गडांना जोडणाऱ्या खिडीत बांधलेल्या मुख्य प्रवेशद्वार दिसले… उजवीकडे आत दडवलेला दरवाजा.. आणि समोर भिंत.. गडाचा दरवाजा चटकन दिसत नाही.. पायऱ्या चढताना भिंत दिसते.. दरवाजा आत दडून वाट पाहत असतो..
दरवाजा अजून सुस्थितीत असल्याचे पाहून बरे वाटले.. प्रवेश द्वारातून आत शिरलो.. डावीकडे कातळावर चढून अंकाईचे प्रवेशद्वार दिसले.. मागे टंकाई किल्ल्याच्या पायऱ्या आणि वर दरवाजा स्पष्ट दिसू लागला.. दोन रांगडे षटकोनी बूरुज आणि भरभक्कम दरवाजा असे या अंकाई च्या मुख्य द्वाराचे वर्णन करावे लागेल.. आत आलो तर समोर पुन्हा एक गुंफा आणि उजवीकडे काटली जीना.. या गुहेत काही लेणी कोरल्याचे दिसून आले.. इथे .. एका गुहेत मध्यभागी मंदिराचा गाभारा आणि आत त्रिमूर्ती शिल्प आहे .. एकदम एलिफंटा ची आठवण झाली .. त्याशी साधर्म्य असणारे हे शिल्प फारच अफलातून आहे.. लेण्याची कारीगरी पाहून जीना गाठला.. इथे डोंगराच्या नाकाडावर.. दुहेरी तटबंदी आणि संरक्षक दरवाजे बांधल्याचे दिसले.. पुढे जायला एक भुयारी मार्ग.. भुयारी पायऱ्यांचा माग काढत वर आलो तर वनदेवीचे मंदिर दिसले.. आणि पुख एक स्पायरल कातळ जीना.. वर जाताना ह्या जिन्याच्या पायऱ्या मधोमध दुभंगल्याचे दिसले.. जीना चढून वर आलो तर माथ्यावर अजून एक टेकाड वाट पाहत होते.. सह्याद्री ची हीच खरी कसोटी आहे.. एका मागून एक टेकाड .. असे पायवाटांचे घाट चालताना अवचित सामोरे येतात आणि पायथ्याला साधारण वाटणारे हे किल्ले .. वर पोहोचताना खरे कळतात.. वर नाकाडा च्या टोकाला अंकाई वरचा शेवटचा दरवाजा वाट पाहत होता ..
समोर टेकाडावर चढून गेलो तर.. वर कातळाच्या पोटात असलेली अगस्ती ऋषींची गुहा नजरेस पडली.. हिंदू पुराणातील सप्तर्षी मधील एक अगस्ती ऋषी.. अज म्हणजे पर्वत आणि अस्ति म्हणजे फेकणारा.. तर पर्वत उलथून टाकण्याचे सामर्थ्य असलेले असे हे अगस्ती ऋषी.. या डोंगरावर अगस्ती ऋषी नी साधना केल्याचे सांगतात.. पुराणातील एक कथा आहे.. काही असुरांनी समुद्रात आसरा घेतला होता आणि देवांना त्यांना शोधणे कठीण होवून बसले.. तेंव्हा अगस्ती मुनींनी समस्त समुद्र पिवून टाकला आणि असुरांचा संहार केला..
अगस्ती ऋषींच्या गुहेपासून पुढे निघालो.. पुढे एक विस्तीर्ण पठार नजरेस आणि दूर एकां राजवाड्याचे अवशेष.. तिकडे निघालो.. वाटेत एक कुंड आहे आणि त्याच्या मध्यभागी शिवमंदिर.. एका ४ बाय ४ फुटी बेटावर बांधलेले.. समस्त शिष्यगण इकडे प्रात:स्नानसंध्या करीत होते.. पुढे गेलो तर उजवीकडे तटाला खेटून आणखी एक हिरव्या पाण्याचं टाकं असल्याचे दिसले.. राजवाड्याच्या उजवीकडे मच्छिंद्रगडाचा सुळका लक्ष वेधून घेत होता.. समोर राजवाड्याकडे निघालो.. पाहिलं तर हा भव्य प्रासाद अजूनही ठाण मांडून बसला आहे एखाद्या साधकासारखा.. गतकाळच्या वैभवाची जागा आता अवकळेने घेतली तरी रुबाब कायम होता.. आत आलो तर या भव्य वाड्यात मध्यभागी चौरस खळगा आणि बाजूला खोल्यांचे बांधकाम दिसले.. समोर डावीकडच्या कोपऱ्यात.. एका झाडाखाली कुण्या पिराची कबर.. आतून फेरफटका मारून डावीकडच्या तुटक्या दरवाजातून बाहेर पडलो.. आणि पुन्हा अगस्ती मुनीच्या गुहेच्या टेकाडावर नजर टाकली.. इकडे उजवीकडे.. ताशीव कडा आणि नागमोडी तटबंदी नजरेस पडते.. मग पुन्हा मुख्य द्वाराशी येवून गुहेकडे निघालो.. ह्या अगस्ती मुनींच्या गुहेसमोर एक पिंपळाचे झाड आहे आणि सावलीत मारुतीरायाचे मंदिर.. इथे पारावर एक वयस्क मुनिवर चेहऱ्यावर तेज घेवून सकाळचे कोवळे उन खात बसल्याचे दिसले.. त्यांना म्हटलं बाबा एक फोटो घेवू का तुमचा .. मुनिवर उत्तरले ..”मेरा फोटो लेके क्या करेगा रे बाबा”.. म्हटलं.. “संकट समय में आपको याद करूंगा बाबा”.. बाबांनी तंद्री लावली.. आणि बाबांची ही मुद्रा Camera मध्ये बंदिस्त करून.. अगस्ती ऋषींच्या गुहेत शिरलो.. इकडं पाहिलं तर एक जटाधारी बाबा.. म्हटलं बाबा फोटो.. बाबा नाही म्हटले.. तेवढ्यात बाबांना एक अर्जेंट फोन आला आणि बाबा मोबाईलवर बिझी झाले.. रामाचे दर्शन घेवून बाहेर पडलो.. आणि टंकाई कडे निघालो..
पुन्हा भुयारी दरवाजातून बाहेर पडलो आणि खिंडीतून वर जात टंकाई किल्ल्याच्या पायऱ्या चढू लागलो.. वाटेत डावीकडे पाण्याचं टाके दिसले.. वर निघालो साधारण दो-एकशे पायऱ्या चढून टंकाई च्या मुख्य द्वाराशी पोहोचलो.. अंकाई किल्ल्याच्या मानाने टंकाई धाकटा.. त्यामुळे मगाशी दिसणारी भव्यता इकडे हरवली होती पण.. रांगडेपणा तोच.. आणि तोरा म्हणाल तर.. टीचभरही कमी नाही.. बऱ्याच किल्ल्यांचे जोड-किल्ले हे त्या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी बांधले जायचे.. किल्ल्यालगतच्या टेकाडावरून शत्रू येवून नये म्हणून.. हे उप-किल्ले बांधले जायचे.. मुल्हेरचा उप-किल्ला मोरा.. पुरंदरचा वज्रगड.. वंदनगडाचा उप-किल्ला चंदन गड हे असेच काही जोड-किल्ले.. रामाच्या रक्षेला लक्ष्मण जसा तसे हे उप-किल्ले.. रक्षणासाठी सदैव तत्पर..
लंगडत्या पायांनी दरवाजात पाऊल ठेवले आणि जोरदार घोषणा दिली “जय भवानी.. जय शिवाजी.. जय सह्याद्री”.. इथून मागे वळून पाहताना अंकाई एखाद्या महादेवाच्या पिंडीसारखा वाटतो.. अंकाई ची उजवी आणि डावी डोंगर धार तर फार सुरेख दिसते इथून.. उजव्या धारेच्या शेवटाला मच्छिंद्र गड.. आणि त्याच्या उजवीकडे दूर .. ध्यानस्थ आणि उत्तुंग अशी हडबीची शेंडी सुळका.. जणू थम्स अप सुळका.. सह्याद्री च्या वारकऱ्यांना शुभेच्छा देणारा थम्स अप.. सुळका
दरवाजातून आत गेलो तर हिरव्या शालीखाली चिरनिद्रा घेतलेल्या पिराची एक कबर दिसली.. डावीकडे महादेवाचं मंदिर आणि पाण्याचं टाकं आहे.. पुढे जाताच एक मोठं पठार आणि अधून मधून डोकावणारे काही भग्न वाड्यांचे अवशेष.. बाकीच्या मंडळीना म्हटलं तुम्ही जा पुढे .. मी आणि माझा दुखरा गुडघा इथेच बसतो.. हे मस्तवाल वारं खात.. आज खऱ्या अर्थाने या मोहिमेची सांगता झाली.. रान रान भटकून आज शेवटचा टप्पा गाठला किल्ले टंकाई.. चार दिवस सरले.. कि आठवणीत विरले .. हे नाही सांगता यायचं.. ही भटकंती आहे कि खूळ आहे हे मला माहिती नाही पण हे सह्याद्रीच्या कडे कापर्यात भटकायचं व्यसन सुटणे आता अशक्य.. काय काय नाही पाहिलं या चार दिवसात.. एखाद्या जीराफासारखा उंच न्हावी गड.. आरस्पानी मुल्हेर-मोरा-हरगड.. उत्तुंग साल्हेर आणि कणखर सालोटा.. तीन सहस्त्र पायऱ्यांचे.. मांगी-तुंगी सुळके.. प्रजासत्ताक दिनी सुरु झालेली ही सफर आज पूर्णत्वास आली होती.. आणि बरच काही शिकवून गेली.. काही आठवणी.. काही रमणीय सूर्यास्त.. गाठीशी बांधून घरट्याकडे निघालो.. मित्रहो .. शेवटी आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या.. एक म्हणजे ‘किल्ला’ आणि दुसरी म्हणजे ‘पायवाट’ .. या दोन्ही गोष्टी नसतील तर तुम्हीच सांगा.. या जगण्यास.. काही अर्थ आहे का !