पिसोळ किल्ला, डेरमाळ किल्ला, भामेर / भामागिरी किल्ला, रव्या-जाव्याचा डोंगर
Fort Pisol, Dermal Fort, Bhamer/Bhamagiri Fort, Ravya-Javya Hills
नमस्कार “गडकोट २४ तास – एक पाउल गडावर” या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी भटक भूणगा माधव कुलकर्णी आपले सहर्ष स्वागत करतो. आज या विशेष कार्यक्रमात आपण नुकत्याच सह्याद्रीच्या कडे कपारी भिरभिरणाऱ्या एका भटक्या-चौकडीने नुकतीच खानदेशची भटकंती पूर्ण केली आहे.. तर या खानदेशातील किल्ले आणि तिथवर पोहोचण्यासाठी पडणारे श्रम आणि तद्नंतर झालेला आनंद असे काही संमिश्र अनुभव आपण जाणून घेणार आहोत.. या विशेष कार्यक्रमात ज्याचे नाव आहे.. “गडकोट २४ तास – एक पाउल गडावर”.. तर चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करतानाच सर्वप्रथम आपण स्वागत करुया या मोहिमेचे सूत्रधार ज्यांनी या सह्याद्रीचे सुमारे दोन-एकशे गडकोट वयाच्या अवघ्या तिशीत पालथे घातले आहेत.. तर स्वागत करूयात एक भन्नाट ट्रेकर.. उपेंद्र क्षीरसागर यांचे.. त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या मोहिमेचे साथीदार मयूर आणि मिलिंद हासे.. सर्वांचे या कार्यक्रमात स्वागत असो..
तर उपेंद्र सर्वप्रथम या मोहिमे मागच्या विचाराबद्दल थोडक्यात सांगा.. उपेंद्र.. (क्षणभर शांतता.. आणी पुन्हा).. उपेंद्र..!! उपेंद्र : नमस्कार.. मोहिमेबद्दल सांगायचं तर.. खानदेशातील किल्ले हे सह्याद्री पासून थोड्या अलिप्त अशा डोंगर रांगावर वसलेले आहे.. या रांगांना ‘गाळणा टेकड्या‘ असं म्हणतात आणि खानदेशातील बराचसा भाग हा पूर्वी आदिवासी भाग म्हणून गणला जायचा.. या भागातील मरणप्राय उकाडा, अपुरे पर्जन्यमान, आणि भौगोलिक स्थिती यामुळे साताऱ्यातील माणगाव नंतर खानदेश हा भाग.. महाराष्ट्रातील मिनी वाळवंट आहे असा बऱ्याच जणांचा समज आहे.. म्हणून सहसा डोका फिरल्याशिवाय हौशी पर्यटक इकडे कुणी फिरकत नाही.. स्वतःला हाडाचे ट्रेकर्स म्हणवणारे गिर्यारोहक देखील या भागाकडे पाठ फिरवतात.. खानदेशावर मराठी आणि गुजराथी भाषेचा पगडा आहे.. अहिराणी भाषेत तुम्हाला दोन्ही भाषांचा संगम झालेला दिसेल.. पण वऱ्हाडी ठेचा आणि तोंडचं पाणी पळवणारी मिरची हि सुद्धा या देशात उगवते हे महाराष्ट्राला सांगायची वेळ आली आहे.. खानदेश जसा आदिवासी भिल्ल लोकांचा.. जसा तो गवळी राजे अहिर राजांचा.. तसाच तो जात्यावर पीठ दळता दळता सहजसुंदर आणि कानाला गोड वाटणाऱ्या ‘मन वढाय.. वढाय, अरे खोप्यामधी खोपा‘.. अशा अवीट काव्य रचनाऱ्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरीचा हा खानदेश.. आणि म्हणुनच आम्ही खानदेश मोहिमेचा विडा उचलला.. ‘असेल जरी उन्हाचा कहर तरी पूर्ण करू खानदेशाची सफर‘ हे आमचे ब्रीदवाक्य आहे..
उपेंद्र फार सुंदर, नेटक्या आणि थोडक्या शब्दात तुम्ही मोहिमेबद्दल सांगितलं याबद्दल धन्यवाद.. “आते ह्या समदा लोकासले चिंता वाटी रायानिका ह्या पूना-मुंबईना पोरया आमना खान्देश्ना किल्लाना बाबतमा काय काय येगळ सांगतीत..”.. सॉरी.. मराठी भाषेत सांगतो .. “आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली राहिली आहे कि हे पुण्या-ममईचे लोक आमच्या खानदेशातील किल्ल्या बद्द्ल काय वेगळं सांगणार याची” ..तर उपेंद्र तुम्ही मला सांगा.. मोहिमेचा सारांश.. तुम्ही इथल्या किल्ल्यामध्ये काय काय पहिलं.. तुम्हाला काय काय अडचणी आल्या याबद्दल थोडक्यात.. त्याचं काय आहे वेळ थोडा आहे ना आपल्या कार्यक्रमासाठी.. तर सांगा.. इथल्या किल्ल्याविषयी, इथल्या लोकांविषयी.. तुमचे अनुभव तुमचा प्रवास, तुमची भटकंती काहीतरी सांगा.. उपेंद्र…!! उपेद्र..!!
उपेंद्र: खानदेशात तसे बरेच किल्ले आणि अफलातून डोंगर आहेत.. सांगायचाच झालं तर… सेलबारी–डोलबारी डोंगररांगाजवळचे जायखेडा गावाजवळचे डेरमाळ आणि पिसोळ हे किल्ले.. तब्बल चार टेकड्यांवर उभारलेला, सुमारे ३०० हून अधिक गुहा आणि भरभक्कम पुरातन बांधकामाचे अवशेष असलेला भामागिरी उर्फ किल्ले भामेर, भामेरचे सवंगडी रव्या-जाव्या हि डोंगराची जोडी आणि एकांड्या टेकडावर वसवलेले गाळणा, कंक्राळा, ललिंग, सोनगीर.. हे दुर्गम किल्ले.. काय काय नाही या खानदेशात..
आमच्या या भटकंती ची सुरुवात झाली पिसोळ किल्ल्यापासून आणि सांगता झाली राव बहाद्दरांच्या मालेगाव किल्ल्याच्या भटकंती ने.. आम्ही निवडलेला भटकंतीचा मार्गे अस्सा होता..
“नाशिक à सटाणा à तहिरबाद à जायखेडा à पिसोळवाडी à पिसोळ किल्ला à भिलवडी à डेरमाळ किल्ला à साक्री à शेवाळी फाटा à रायपुर फाटा à भामेर गांव à भामेर चा किल्ला à रव्या-जाव्या चा डोंगर à रायपुर फाटा à शेवाळी फाटा à धुळे à शिरपूर रोड à सोनगीर à पुन्हा धुळे à ललिंग गाव à ललिंग किल्ला à मुंबई/आग्रा महामार्ग à आर्वी फाटा à डोंगराळे à गाळणे गाव à किल्ले गाळना आणि नबातीचा किल्ला à डोंगराळे गाव à करंज गव्हाण गाव à कंक्राळे गाव à कंक्राला किल्ला à मालेगाव à मालेगाव किल्ला”…
असा साधारण २००-२५० कि.मी. चा प्रवास होता.. पण मजा आली.. मोहिमेची खरी गंमत प्रवासात आणि प्रवासातील अनुभवाच्या प्रचीती मध्ये आहे.. या संदर्भात तुम्हाला माझ्या एका भटक्या मित्राने रचलेली एक कविता ऐकवतो..
पांथस्था.. अरे कुठे चाललास.. तू.. ??
ही दीड-शहाणी शहरी मरगळ काखोटीला मारून..??
रानोवनी भटकायला की?.. दोन क्षण जगायला..??
त्या बोडक्या माळावर.. की पायवाटांवर थिरकायला..!!
त्या पिवळ्या-धमक गवताला झुलवणारं वारं प्यायला
की, भग्न.. उजाड.. थोर.. साम्राज्याचे कवडसे वेचायला
पांथस्था.. अरे कुठे चाललास.. तू.. ??
कातळाच्या पाठीवर खोगीरीसारखे बांधलेले तट पहायला
की, बिन-पहाऱ्याचे ओसाड दरवाजे आणि चौकटी पहायला
काळ-कातळाच्या पोटात चित्कारणारी वटवाघळे पहायला..!!
अरे ! मग ती इथेही आहेत की.. आपल्या आवडत्या शहरात
फक्त ! त्यांना आजकल माणूस असं म्हणतात.. इतकंच
ही माणसे दिवसभर भणंग मनाने काम करत राहतात
आणि रोज रात्री अस्वस्थ घरात.. चार भिंतीच्या गुहेत
उलट्या मनाने.. लटकत असतात विचारांच्या फांद्यांवर
मग.. पांथस्था.. कुठे चाललास.. तू.. ??
थांब.. मीही येतो.. मोकळ्या रानात.. दुपारच्या उन्हात
दोन श्वास मुक्तपणे घ्यायला.. पांथस्था थांब.. मीही येतो
उपेन्द्र.. तुम्हाला थोडं थांबवतो.. कारण.. वेळ झाली आहे एका ब्रेक ची.. मला माहिती आहे तुम्ही गड केलेत.. जनतेला माहितीये तुम्ही गड केलेत.. पण तुम्ही या गडावर नेमकं पाहिलंत काय.. याची आम्हाला उत्सुकता लागली आहे.. जाणून घेवूया भटक्यांच्या चौकडीने खानदेशातील किल्ल्यावर नेमकं काय-काय पाहिलं ते.. तर अस्सा गेलो आणि अस्सा परत आलो.. पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम.. “गडकोट २४ तास – एक पाउल गडावर”..
ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचे स्वागत.. तर आपण जाणून घेणार आहोत भटक्यांच्या ह्या चौकडी ने खानदेशातील किल्ल्यांत असं.. काय वैशिष्ट्य पाहिलं.. उपेंद्र..!!! तसं सांगण्यासारखं बरंच आहे पण याबद्दल या मोहिमेतील माझे सहयोगी मिलिंद हासे तुम्हाला सविस्तर सांगतील.. ओवर टू यु मिलिंद..
मिलिंद : पहिला दिवस हा सेल्बारी-डोल्बारी रांगालगतच्या डोंगरात वसलेले किल्ले पिसोळ आणि डेरमाळ.. साधारण ३५०० फुट उंचीचे किल्ले ह्या खानदेश मधील किल्ल्यामधील सगळ्यात उंच किल्ले.. ह्या खानदेशी किल्ल्यांच्या परीक्षेतला.. अवघड पेपर पहिल्याच झटक्यात सोडवावा म्हणून आम्ही सुरुवात या दोन किल्ल्यांपासून केली.. पिसोळ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमंतरायाचे दर्शन घेवून मोहिमेला सुरुवात झाली.. पारावरील हनुमानाच्या मंदिरापासून सरळ जात मळलेल्या पायवाटेने डावीकडे वळताच पाण्याची तीन टाकी दिसतात.. टाक्याच्या वरच्या पायवाटेने तिरप्या चढणीची वाट चालत.. घळीत पोहोचायचं.. मग घळीतून वर जात आपण गडावर येवून पोहोचतो.. पिसोळ किल्ला हा दोन डोंगरावर बांधलेला एक भक्कम किल्ला आहे.. किल्ल्याला तीन प्रवेशद्वार आहेत.. पण काळाच्या ओघात आता द्वारालगतच्या भिंतीचे फक्त तट दिसतात.. पिसोळ किल्ल्याचे बालेकिल्ला आणि पिसोळ माची असे दोन भाग पडतात.. माची विस्तीर्ण असून माचीवर एक सुकलेला तलाव आहे.. माचीच्या शेवटाला एक दांडगा बुरुज असून माचीची तटबंदी बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.. बालेकिल्ल्याच्या डोंगरात पहिल्या दरवाजाजवळ एक वटवाघूळांची खोल आहे.. इथे पोहोचताच वटवाघूळांचा गलका ऐकू येतो.. दुसऱ्या दरवाजा पार केला की डावीकडे चार गुहा दिसतात इकडे एकच दगडात ‘नंदी आणि महादेवाची पिंड‘ कोरल्याचे दिसते.. माची आणि बालेकिल्ल्याच्या डोंगरांना जोडणाऱ्या खिंडीतून डावीकडे जाताच सुकलेली किंवा हिरवीशार पान्याची टाकी दिसतात.. आणि हनुमानाची मूर्ती दिसते.. त्याच्या उजवीकडे एक वाडा टाइप आणि त्याच्या उजवीकडे एक दरवाजाची कमान उभी असल्याचे दिसते.. साधारण अडीच-तीन तासात गड प्रदक्षिणा मारून परत पायथ्याला येता येतं..
ब्रेकिंग न्यूज : पिसोळ गडावर एकाच दगडात कोरलेली अभिनव अशी नंदी आणि महादेवाची पिंड.. गडावरच्या गुहेत वटवाघूळांचा आतंक !!!
पिसोळ किल्ल्याची भ्रमंती करून आम्ही.. जायखेडा गावी नाश्ता करण्यास निघालो.. इकडे पाहिलं तर चौकात.. पाववड्याची बक्कळ दुकाने होती.. मग तेलकट वड्याचा नाद सोडून तर्री आटलेली मिसळ आणि गोटीपाव खावून एक जोरदार चहा मारून डेरमाळ किल्ल्याकडे निघालो.. जायखेडा-भिलपुरी गाव असा तासाभराचा प्रवास करून इथवर पोहोचलो तो दुपारचे बारा वाजले होते.. आता खरी गम्मत सुरु झाली.. बिलपुरी गावातील वाटाड्या महेश आणि आम्ही डेरमाळ किल्ल्याकडे निघालो.. डेरमाळ गावातून पुढे जाताच दूरवर डावीकडे डेरमाळ आणि अगदी समोर एक डोंगररांग दिसू लागते.. पण किल्ल्याची वाट थोडी फिरून फिरून गडावर जाते.. समोर दिसणाऱ्या डोंगराला उजवीकडे वळसा घालून आपण पुढे येतो तेंव्हा आणखी मुरुमाचा डोंगर समोर येतो.. इथे समोर दिसणाऱ्या डोंगराच्या नाकाडावर टिच्चून वर आलो की पुन्हा उजविकडे वळसा घालायचा.. की आपण एक रुक्ष आणि रखरखीत पठारावर येवून पोहोचतो.. बर् आडोशाला एखादी सावली शोधायची म्हटलं तर.. आधी झाडं लावण्यापासून सुरुवात.. समोर बिनपानाची बोडकी झाडं दिसतात.. पण हे पठार मला उन्हाळ्यात दिसणाऱ्या म्हसाईच्या पठारा सारखं वाटलं.. डावीकडे दरी आणि दूरवर पसरलेलं ओसाड माळरान.. फक्त दोघातला फरक इतकाच की इकडे हिवाळ्यातच रान पिवळंधमक झालं होतं.. आपण पठारावर पोहोचलो..की डावीकडे डेरमाळ किल्ल्याचा डोंगर आणि लगतच्या डोंगराला जोडणारी खिंड दिसते.. आपल्याला तिथं पोहोचायचं असतं.. पण डोक्यावर तावलेलं उन आपल्या स्वस्थपणे खिंडीत पोहोचू देत नाही.. बाराच्या उन्हात पठारावर चालण्याचा अनुभव एखाद्या वाळवंट पार करण्यासारखा आहे.. वाटेत गुणकारी आवळ्याची दोन-एक झाडं लागतात हेच काय ते या रखरखीत प्रवासातलं सुख..
ब्रेकिंग न्यूज : किल्ले डेरमाळच्या वाटेवर आहे एक ओसाड पठार.. आणि त्यात तग धरणारे एक आवळ्याचे झाड.. !!!
रणरणत्या उन्हात आणि घामांच्या धारात चालत खिंडीपर्यंत पोहचलो.. पठारावरून डावीकडे (डेरमाळ किल्ल्याकडे) पाहिल्यास खिंडीच्या वर पिवळ्याधमक डोंगरावर एक डावीकडे काळी आडवी पट्टी दिसते.. हिच डेरमाळ किल्ल्याची तटबंदी.. खिंडीत पोहोचताच मघाशी दडून बसलेलं वारं मग तापलेल्या देहाला हळुवार फुंकर मारू लागतं.. आणि गड आवाक्यात आल्याची जाणीव होते.. पठारावरून खिंडीत पोहोचताना उजवीकडच्या डोंगरावर कातडी सोलवटल्यासारखी खोडं असलेली ओसाड झाडे दिसतात.. हि झाडं चंद्रप्रकाशात चमकतात.. यांना घोस्ट ट्री असंही म्हणतात.. गडावर देखील घोस्ट Trees ची भाऊगर्दी आहे.. खिंडीत पोहोचलो की मग डावीकडच्या दिशेने जायचं तटबंदी डोक्यावर ठेवत तट जिथे संपते तिथून एक वाट आतल्या बाजुने तटबंदीला समांतर जात गडमाथ्याकडे जाते.. आणि आपण गड माथ्यावर येउन पोहोचतो.. डावीकडे पाण्याचे दोन टाके दिसू लागतात.. पाण्याचे टाके मागे टाकून थोडं पुढे गेलं की समोर पुन्हा पुष्कळ घोस्ट ट्री आणि पठाराच्या मध्यभागी एक लहानसं टेकाड दिसू लागतं.. इथे टेकाडाला वळसा मारत पुढे वर जायचं की एक पांढऱ्या रंगाची भिंत आणि दरवाजा दिसू लागतो..
ब्रेकिंग न्यूज : किल्ले डेरमाळवर घोस्ट ट्री च्या मागे उभा आहे .. एक पांढरा शुभ्र दरवाजा .. गडावर आहे लांबलचक तटबंदी !!
दरवाजा पाहून पुन्हा मधलं टेकाड डावीकडे ठेवत पुढे निघालो की पाण्याची ६-७ टाकी दिसतात.. इथं बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावकरी लोकांची जत्रा असते.. लोकं इथल्या टाक्यात मनसोक्त डुंबतात.. गडावर देव नाही पण मजा करायला गावकरी इथं येतात असं कळलं.. हे समोर दिसणारं टेकाड म्हणजे डेरमाळ किल्ल्याचा बालेकिल्ला.. तटातून आत डोकावून इमारतींचे चौथरे पहायचे आणि टाक्या जवळच्या पायवाटेने वळसा मारत खिंडीत पोहोचायचं.. ह्या वाटेने गेल्यास गड्प्रदक्षिणा पूर्ण होते.. खिंडीतून घळीत उतरताच गर्द काटेरी झाडीतून वाट काढत पठाराचा डोंगर डावीकडे ठेवत.. पुन्हा डेरमाळ गावाजवळ च्या डोंगराजवळ यायचं.. इथवर पोहोचेपर्यंत उन्हाने पुरता धूर निघालेला असतो.. त्यामुळे.. गावात चहापाणी करायचं आणि पुढच्या किल्ल्याकडे निघायचं.. तसा डेरमाळ किल्ला हा एक प्रचंड किल्ला आहे.. पूर्ण गड धुंडाळायचा म्हणजे पूर्ण एक दिवस हवा.. डेरमाळ किल्ला पाहून साक्री गावी पोहोचलो.. साक्री हे भामेर किल्ल्याच्या जवळचे गाव.. त्यामुळे मुक्कामाला उत्तम असे गाव.. इथं एखाद्या स्वस्तात मस्त लॉज पाहून मस्त ताणून द्यायची.. आणि सकाळी लवकरच उठून दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरु करायचा..
धन्यवाद मिलिंद.. आता वेळ झाली आहे एका ब्रेक ची.. पण ब्रेक वर जाण्याआधी प्रश्न ऐका.. “खानदेशातील किल्ल्यांना सह्याद्रीतील किल्ल्यांची सर् आहे का?”.. बघा पडद्यावर बघा.. साधारण २०% टक्के लोक ‘होय‘ म्हणतायेत.. तर ८० टक्के लोकांचं अजून असं मत आहे की ‘खानदेशातील किल्ल्यांना सह्याद्रीतील किल्ल्यांची सर् नाही‘..बघुयात प्रेक्षकांचा कौल बदलतो की तो तसाच राहतो ते.. तर अस्सा गेलो आणि अस्सा आलो बघत राहा आपला आवडता कार्यक्रम, ‘गडकोट २४ तास – एक पाउल गडावर‘..
मित्रांनो आपण ब्रेक पूर्वी पहिलं.. उन्हाचा कहर आणि पिसोळ-डेरमाळ किल्ल्यांची सफर.. तर आता कार्यक्रमाच्या या टप्प्यात आपण जाणून घेऊयात.. खानदेश च्या आणखी दोन वैशिष्ट्यपूर्ण असा भामेर किल्ला आणि रव्या-जाव्या या दोन जोड-डोंगरांबद्दल.. तर मी आमंत्रित करतो या मोहिमेतील तिसरे सदस्य.. मयूर उर्फ म्याडी यांना.. मयूर .. तुमचा भामेर आणि रव्या-जाव्या चा अनुभव कसा होता..

मयूर : तसं बघितलं तर भामेर हा मी केलेला पहिला किल्ला.. भामेर गाव साधारण ५००० माणसांचं गाव.. गावातून शंकराच्या मंदिरापाशी पोहोचायचं आणि तिथून समोर पाहता.. एकूण चार डोंगरांवर बांधलेला.. भव्य-दिव्य असा भामेर किल्ला उर्फ भामगिरी नजरेस पडतो.. डावीकडच्या डोंगरावर.. हनुमान आणि गणपतीचे मंदिर आहे तर मधल्या डोंगरावर लेणी आणि बालेकिल्ला.. बालेकिल्ल्याचा माथ्यावर.. सती माता आणि हनुमानाचे मंदिर आहे.. तर उजवीकडच्या डोंगरावर पिराची कबर आहे.. मधल्या डोंगराच्या मागे जो डोंगर आहे त्याच्या परिघावर मध्यभागी अनेक लेणी कोरून ठेवली आहेत.. या गडावर ३६० हून अधिक लेणी आहेत असं आम्हाला आमचे गाईड ‘ओझरकर‘ यांच्याकडून कळलं.. गडाचा मुख्य दरवाजा मधल्या आणि उजव्या डोंगराला जोडणाऱ्या खिंडीत आहे.. पायथ्याच्या गावात.. तटबंदीचे अवशेष आणि भव्य दरवाजा पहायला मिळतात.. साधारण २५०० फुट उंचीचा गड दुपारच्या उन्हात चढणं हा एक अद्भूत अनुभव आहे.. शंकराच्या मंदिरापासून खिंडीत पोहोचायचं.. मग दवाजातून आत गेल्यावर डावीकडच्या पायऱ्यांनी आडवं चालत (Traverse) निघायचं.. वाटेत कातळात कोरलेल्या लेण्या आणि पाण्याचे टाके दिसतात.. इथल्या लेण्या १२-१३ व्या शतकातल्या आहेत.. मधल्या डोंगराच्या पोटात.. खूप खोल असा तुरुंग.. आणी उजवीकडच्या लेण्यामध्ये.. घोटाभर थंडगार पाणी भरलेली लेणी वजा गुहा आहे.. निसर्गाचा हा अद्भूत आणि चमत्कार फक्त खानदेशात पाहून पुढे खिंडीकडे निघायचं.. मधल्या डोंगरावर एक कातळ तासून तयार केलेली खिंड आहे तिथं पोहोचायचं.. कमरेइतक्या पायऱ्या चढून गेल्यावर डावीकडे निजामपूर, समोर रव्या-जाव्या आणि उजवीकडे चौथ्या डोंगरावरच्या गुहांचे दर्शन घडते.. दुपारच्या उन्हात इथलं वारा पित थोडं वेळ बसायचं आणि चार घास खावून पुन्हा बालेकिल्ल्याकडे निघायचं.. खिंडीतून पायऱ्या उतरून उजविकडची वाट धरायची.. दरी डावीकडे आणि बालेकिल्ला डोक्यावर ठेवत तिरपं वर चढलं.. आपण गोड्या पाण्याच्या टाक्यापाशी येतो.. गाईड ओझरकर यांच्या म्हणण्यानुसार.. चार खाटांची दोर सरळ करून जेवढी लांबी होईल इतकी ह्या पाण्याच्या टाकायची लांबी आहे.. इथलं गोड पाणी ओंजळीने प्यायचं आणि पुन्हा तिरपं वर जात सती मातेच्या मंदिरा पाशी पोहोचायचं..
ब्रेकिंग न्यूज : किल्ले भामेर च्या पोटात.. ३६० गुहा आणि पुरातन तुरुंग .. बालेकिल्ल्याच्या तळाशी खोल आणि अथांग गोड्या पाण्याचे टाके ..!!
सतीमातेचे दर्शन घेवून आल्या पावली परतायचं आणि भामेर किल्ल्याची साधारण तीन-चार तासांची भटकंती आटोपती घ्यायची..आणि लगोलग रव्या-जाव्याकडे निघायचं.. रव्या-जाव्या हे दोन भाऊ.. आणि याच्यावरून या डोंगरांना हि नावं पडली असं ओझरकर गाईड सांगतात.. भामेर गावातून बाहेर पडताच डाव्या गाडी रस्त्याने.. पुढे निघायचं.. मग पुढे छेदरस्ता आल्यानंतर थोडं डावीकडे जावून मग उजवीकडच्या कच्च्या रस्त्याने रव्या-जाव्या च्या पायथ्याशी पोहोचायचं.. इथं सुरवातीलाच एक मंदिर आहे आणि लाकडात कोरलेली आधुनिक हनुमानाची मूर्ती.. दर्शन घेवून रव्या-जाव्याच्या खिंडीकडे जाणाऱ्या नाकाडावर चढायचं.. खिंडीकडे जायच्या वाटेत.. नैसर्गिक दगडाच्या लाद्यापासून तयार झालेला जीना आहे.. ‘कातळी बिस्कीटांची पायवाट‘..!! तर अशा अद्भूत जिन्याने खिंडीजवळ पोहोचताच डावीकडच्या डोंगरावर चढायचं आणि मग घसाऱ्या (Traverse) वाटेने आडवं जात खिंडीत पोहोचायचं.. खिंडीत आणखी ‘एक कातळी बिस्कीटांचा जीना‘ आपली वाट पाहत असतो.. हा जीना जणू एक स्वर्गीय वाट.. इथे वर जाताना पायाखालची कातळी बिस्किटं.. सतत हलत असतात.. त्यामुळे तोल सावरत.. खिंडीत पोहोचायचं.. खिंडीतून भामेर चा एक सुंदर नजारा आहे… रव्या-जाव्याच्या खिंडीतून भामेर कडे पाहताना ही नैसर्गिक दगडाच्या लाद्यापासून तयार झालेली वाट.. एखाद्या अरुंद आणि एका रेषेत जाणाऱ्या..एखाद्या लांबलचक पसरलेल्या भिंती सारखी वाटते.. ‘ग्रेट वॉल ऑफ खानदेश‘.. खिंडीत पोटभर वारं आणि पाणी पिवून परतीची वाट धरायची.. आणि मुक्कामाला पुढच्या प्रवासाला जवळचं म्हणून धुळे शहर गाठायचं..
ब्रेकिंग न्यूज : रव्या-जाव्या च्या वाटेवर आहे .. ‘एक कातळी बिस्कीटांचा जीना‘…!!, खिंडीतून दिसते.. छोटेखानी.. ‘ग्रेट वॉल ऑफ खानदेश‘ ..!!
धन्यवाद मयूर.. आता वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्या ब्रेकची.. पण ब्रेक वर जाण्याआधी प्रश्न पुन्हा एकदा ऐका.. “खानदेशातील किल्ल्यांना सह्याद्रीतील किल्ल्यांची सर् आहे का?”.. बघा पडद्यावर बघा.. आता साधारण ४५% टक्के लोक ‘होय‘ म्हणतायेत.. तर अजून ५५% टक्के लोकांना असंच वाटतय की ‘खानदेशातील किल्ल्यांना सह्याद्रीतील किल्ल्यांची सर् नाही‘..लोकांना असं कां वाटतय !! बघुयात एका छोट्याशा ब्रेक नंतर.. तर कुठेही जाऊ नका.. बघत राहा आपला आवडता कार्यक्रम, ‘गडकोट २४ तास – एक पाउल गडावर‘..
Like this:
Like Loading...
Related
छान
LikeLike