गडकोट २४ तास : खानदेशी किल्ल्यांची अनोखी सफर – भाग २


सोनगीर किल्ला, लळिंग किल्ला, गाळणा किल्ला, नबातीचा किल्ला, कंक्राळा किल्ला, मालेगावचा भुईकोट किल्ला..          

Songir Fort, Laling Hill fort, Galna Fort, Nabati Fort, Kankrala Fort and Malegaon Landfort

मित्रांनो आपण ब्रेक पूर्वी पहिलं.. की भामेर किल्ल्याचा अफाट पसारा आणि रव्या-जाव्याची शानदार सफर.. तर आता कार्यक्रमाच्या या टप्प्यात आपण जाणून घेऊयात.. खानदेश च्या आणखी काही  किल्ल्याबद्दल सोनगीरलळिंगभामेर आणि अपरिचित असा नबातीचा किल्ला.. तर मी विचारणार आहे या मोहिमेचे कर्तेधर्ते उपेंद्र यांना, की एका दिवसात हे किल्ले करणे शक्य आहे का आणि शक्य असेल.. तर जायचे कसे.. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य सांगा.. आता प्रेक्षकांना खानदेशातील या चार किल्ल्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.. उपेंद्र..

उपेंद्र : पहाटे लवकर उठून सोनगीर कडे निघायचं..  धुळे-आग्रा महामार्गावर सोनगीर गाव लागतं आणि इथून जवळच सोनगीर  किल्ला आहे.. किल्ला तसा आटोपशीर.. गावकऱ्यांनी गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत.. सिमेंटच्या पायऱ्यांनी किल्ल्याला डावीकडून वळसा घालत आपण मुख्य दरवाजाशी येतो.. मुख्य दरवाजाची चौकट अजून सहीसलामत आहे.. शेजारी चोर दरवाजा आहे.. दरवाजातून आत प्रवेश करताच तीन कोरीव खांब आणि एक कबर दिसते.. आणि समोर कातळ कोरीव जीना.. हा जीना जांभळ्या खडकाला फोडून तयार केल्या आहेत.. पायऱ्यांच्या सुरुवातीला डावीकडे एक कुठल्याशा देवीचं मंदिर आहे.. पायऱ्या चढून वर येताच समोर दूर सोनगीर किल्ल्याची निमुळती माची दिसते.. एक फेरफटका मारून पुन्हा पायऱ्याजवळ यायचं आणि पायऱ्या उजवीकडे ठेवून सरळ पुढे निघायचं.. इथे ध्वज बुरुज दिसतो.. बुरुजाच्या अलीकडे एक मोठी पाण्याचं टाकं दिसतं.. आणि छोटेखानी महालाचे अवशेष.. ध्वज बुरुजावर पोहोचल्यावर सोनगीर किल्ल्याची उत्तरेकडची एक माची आणि गोलाकार बुरुज दिसतो.. इथून मागे काही टेकड्या आणि डावीकडे पाझर तलाव नजरेस पडतो.. गड पाहून पुन्हा गावात परतायचं.. इथं ग्रामपंचायतीजवळ एक रथ आहे.. बालाजी संस्थानाचा.. रथावर बक्कळ कोरीव काम आहे.. राम-लक्ष्मण-सिता आणि मारुतीरायाची  मूर्ती रथाच्या मखरीवर कोरल्याचे दिसते.. रथाचे नक्षीकाम फारच सुरेख आहे..  
ब्रेकिंग न्यूज : सोनगीर गावात आहे एक नक्षीदार रथ..!! गडावर आहे एक चोर दरवाजा  ..!!

तासाभराची सोनगीर किल्ल्याची सफर उरकून लळिंगकडे निघायचं.. वाटेत चहापाणी घेवून लळिंगच्या पायथ्याला पोहोचायचं.. धुळे-नाशिक महामार्गावर सहा कि.मी. वर लळिंग किल्ला आहे.. धुळे शहर सोडून औद्योगिक वसाहत लागली की लळिंग किल्ला ताठ मान उंचावून  उभा असल्याचे दिसते.. मग लळिंग गाव येताच पुलाजवळ डावीकडच्या गाडीरस्त्याने पुलाखाली उतरायचं आणि लळिंग गावात शिरायचं.. इथे शंकराचे मंदिर गाठायचं.. हेमाडपंती आणि लाल रंगात नटलेलं मंदिर पाहून.. गणपती आणि शंकराला वंदन करून.. मंदिराच्या डावीकडच्या वाटेने गडाकडे निघायचं.. १००-२०० पावलं चालले कि वस्ती संपते आणि लळिंग किल्ला समोर डोक्यावर उभा असल्याचे दिसते.. दूरवरून बघताना देखील गडाच्या उजवीकडचा पांढऱ्या रंगाचा विशाल बुरुज लक्ष वेधून घेतो.. समोर १००-२००  फुट खडकातील वाट चढून वर यायचं कि समोर लळिंगचा डोंगर आणि विस्कटलेली झाडं-झुडूपं दिसतात.. थोडं पुढे जाऊन दगड-धोंड्यांची डावीकडची वाट धरायची.. आणि नागमोडी चालत राहायचं.. वाटेत दिसणाऱ्या खुरट्या झुडूपात तापलेलं डोकं शांत करायचं आणि पुन्हा वर निघायचं.. चालताना एके ठिकानी पायवाटेच्या दोन्ही बाजूस दगडाचे ढिगारे पडल्याचे दिसतात.. हा गडाचा  दरवाजा असावा.. पुढे नागमोडी वाटेने जाताच.. एक पिराची कबर दिसते.. इथून डावीकडची वाट गडावर जाते.. तर उजविकडची वाट तलावाकडे.. डावीकडच्या प्रशस्त पायवाटेने निघायचं.. नीट लक्ष दिल्यास हि वाट बांधून काढल्यासारखी दिसते.. पुन्हा झुडुपांच्या सावलीत डोकं बुडवून विश्रांती घेत पुढं जाताच.. लळिंग किल्ल्याची आडवी तटबंदी दिसते.. इथून डावीकडे पायऱ्या दिसतात .. पायऱ्या चढून वर येताच पाण्याच्या टाक्याच्या तीन गुहा नजरेस पडतात.. पण आनंदून जाणायचं अजिबात कारण नाही हि सुकलेली टाकी आहेत.. उजवीकडे निघायचं.. इथे लळिंगची भिंत डावीकडे ठेवत तिरपे वर जात आपण गडाच्या ध्वज बुरुजाशी येवून पोहोचतो.. इथे भग्न इमारतीचा सज्जाआणि काही इमारतींचे भग्नावशेष पाहून डावीकडच्या टेकाडाकडे निघायचं.. दहा मिनिटात आपण टेकाडावर पोहोचतो.. इथे डावीकडे एक द्रव्य जमा करण्याचा  रांजण आणि उजवीकडे समोर  जवळपास अर्ध वर्तुळाकार अशी  बालेकिल्ल्याची तटबंदी दिसते.. मध्यभागी एक चौकी आणि पाण्याची पाच टाकी.. आणि  सगळ्यात उजवीकडे वर.. ललीतामातेचे मंदिर आहे..  मंदिराकडे जाताना आधी डावीकडे तटबंदीलगत चोर दरवाजा आहे.. तो पाहून देवीच्या पायी नतमस्तक व्हायचं आणि दुपारच्या भर उन्हात चार घास खावून पुन्हा परतीची वाट धरायची.. 

ब्रेकिंग न्यूज : लळिंगच्या पायथ्याला हेमाडपंती मंदिर..!! गडावर आहे एक बिनपैशांचा रांजण..!! ललीतामातेच्या मंदिराच्या जवळ आहे एक भुयारी दरवाजा !!
धन्यवाद उपेंद्र.. आता वेळ झाली आहे एका ब्रेक ची.. पण ब्रेक वर जाण्याआधी प्रश्न पुन्हा एकदा ऐका.. “खानदेशातील किल्ल्यांना सह्याद्रीतील किल्ल्यांची सर् आहे का?”.. बघा पडद्यावर बघा.. आता साधारण ६०% टक्के लोक होय‘ म्हणतायेत.. तर बऱ्याच प्रेक्षकांचा कल बदललाय.. पाहूया कार्यक्रमाच्या अखेर मायबाप प्रेक्षक काय म्हणतात ते.. शेवटी प्रेक्षकांचा कौल महत्त्वाचा.. तर कुठेही जाऊ नका.. बघत राहा.. आपला आवडता कार्यक्रम, ‘गडकोट २४ तास – एक पाउल गडावर‘..
मित्रांनो नमस्कार ब्रेक नंतर सगळ्याचं स्वागत.. ज्या प्रेक्षकांनी नुकताच टिव्ही सुरु केला आहे त्यांना सांगतो.. आपण ब्रेक पूर्वी पहिलं.. पिसोळडेरमाळभामेररव्या-जाव्यासोनगीर आणि लळिंग या किल्ल्याबद्दलचा अनुभव.. ह्या भटक्या मंडळींनी नेमक्या शब्दात तुमच्या पर्यंत पोहोचवला.. एक रखरखीत पण प्रेक्षणीय अशा किल्ल्यांची सफर‘ असंच या मोहिमेचे वर्णन करावे लागेल.. तर आता कार्यक्रमाच्या या टप्प्यात आपण ऐकूया.. खानदेश च्या आणखी काही किल्ल्यांबद्दल किल्ले गाळणा आणि अपरिचित असा नबातीचा किल्ला”.. तर मी पुन्हा उपेंद्र कडे वळतो.. प्रेक्षकांना खानदेशातील या जोड किल्ल्याबद्दल काय सांगशील? .. उपेंद्र..
दोन-अडीच तासांची लळिंग ची मोहीम पार पाडून पुन्हा धुळे-नाशिक महामार्गाने आर्वी फाट्यावर पोहोचायचं.. इथून तासाभरात.. डोंगराळे गावातून गाळणा किल्ल्याचा पायथा गाठायचा.. इथं कानिफनाथांच्या आश्रमाच्या उजवीकडची वाट गडावर जाते.. थोडं पुढे जाताच आश्रमाची भिंत संपली कि उजवीकडे पायऱ्या सुरु होतात.. आणि गडाचा पहिला दरवाजा दिसतो.. जिबिचा दरवाजा.. म्हणजे चौकशी दरवाजा.. इथून वर पहायचं.. गाळणा किल्ल्याची आकर्षक आणि भव्य तटबंदी लक्ष वेधून घेते.. गडाच्या सावलीत.. पायऱ्या चढून गडाचा दुसरा दरवाजा गाठायचा.. या दरवाजाच्या बरंच अलीकडे डावीकडे पाण्याचे प्रशस्त टाके आहे.. बिगीबिगी पाहून पुन्हा दरवाजा गाठायचा.. इथे गडाची अभेद्य तटबंदी पाहून अभिमानाने उर भरून घेवून पुढे निघायचं.. गडाच्या बाह्य कमानीच्या वर फारसी भाषेतील शिलालेख आहे.. आणि उजवीकडच्या तटबंदीवर एक घोड्याचे शिल्प कोरले आहे.. दरवाजातून मागे वळून पाहता.. लांबच्या लांब पसरलेली तटबंदी दिसते.. दरवाजातून आत आलं कुठल्याशा चिकट द्रवाचे ओघळ आलेला बुरुज नजरेस पडतो.. स्थानिक लोक या द्रवाला पत्थर का पसीना‘.. तर अभिनव असा पत्थर का पसीना पाहून.. आता आपल्याच कपाळावरचा पसीना पुसत पुढे आलो कि तिसरा दरवाजा नजरेस पडतो.. तिसऱ्या दरवाजावर पांढरा झेंडा फडकावला आहे.. हा किल्ला सर्व धर्मियांचे प्रतिनिधित्व करतो असे ह्या झेंडा फडकावणाऱ्याला सुचवायचे असावे..  

तिसऱ्या दरवाजातून आत यायचं.. कि समोर वर बालेकिल्ल्यावर मशीद नजरेस पडते.. वर जाण्यास पायऱ्या आहेत.. पण आपण उजवीकडे निघायचं.. बालेकिल्ल्याला उजवीकडून वळसा मारून देखील जाता येतं.. म्हणून उजवीकडे निघायचं.. उजवीकडे.. पाच-सात गुहा आणि टाकी आहेत यातील काही वटवाघूळांच्या गुहा आहेत.. वाटेवर उजवीकडे.. तटबंदीतून बाहेर डोकावणारा कोरीव आणि चौरस सज्जा आहे.. तो पहायचा आणि पुढे कातळ कोरून केलेले एक मंदिर आहे तिकडे निघायचं.. आश्रमातील महाराज इथे ध्यानास बसत.. आत महादेवाची पिंड.. हनुमानाची  मूर्ती आणि गणेश मूर्ती आहे.. इथे आणखी एक मूर्ती आहे पण ती ओळखू येत नाही.. दर्शन घेवून पुढे निघायचं.. थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे खाली उतरून चोर दरवाजा पहायचा.. आणि पुन्हा वर येवून समोर तिरपं वर जात बालेकिल्ल्याच्या डोंगराकडे निघायचं.. थोडं वर जाऊन मागे वळायचं.. इथे पाण्याची टाकी आणी एक डावीकडे इमारत दिसते.. हा महाल असावा.. इथे दोन हौद आहेत.. लहान हौदातून मोठ्या हौदात पाणी जायची केलेली रचना वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे.. महालाच्या भिंतीवर फारसी भाषेतील शिलालेख आहे.. त्यावर काही करंट्यांनी नावे कोरली आहेत.. इथून डावीकडे मशीदीकडे जायचं.. मशिदीचे बांधकाम काळ्या चिऱ्याचे आहे.. त्यावर पांढरा आणि हिरवा रंग चोपडला आहे.. इथे पूर्वी गाळणेश्वर महादेवाचे मंदिर होते असं स्थानिक सांगतात.. आपण वादात न पडता.. बांधकाम पाहून.. वरच्या लहान टेकाडावर निघायचं.. वर बरीच झाडी असून.. इथे काही थडगी  नजरेस पडतात.. मशिदीजवळ.. एक मोठं तलाव आहे.. आणि तलावासमोर वाड्याचे अवशेष.. तलावाजवळ पोहोचलो आणि इथे  दोन माणसे.. एका अभिनव पद्धतीने तलावाचं पाणी खाली बांधकामासाठी शेंदत होती.. एक माणूस तलावात उतरून बदलीने पाणी काढून दुसऱ्या बादलीत ओतत होता.,. वरचा माणूस ते शेंदून वर काढत होता.. इथे एक मोठ्या नरसाळ्यात ओतत होता.. नरसाळ्याच्या तोटीला एक ४०० फुटांचा पाईप लाऊन हे पाणी खाली पायऱ्यांच्या बांधकामाला वापरलं जात होतं.. असं हे एक अभिनव इंजिनिअरिंग पाहून परतीचा प्रवास सुरु केला.. मशिदीच्या शेजारी डावीकडच्या खोलीत एका छुप्या जिन्याने वरच्या भागात जाता येते.. पण धार्मिक भावना दुखवू नयेत म्हणून आपण वर न जाता पुन्हा खाली परतायचं.. गाळणा किल्ल्याची भटकंती करायला ३ तास पुरे.. गड नीट पहायचा तर एक दिवस हवा.. गाळणा किल्ला उतरताना उजवीकडचा डोंगर लक्ष वेधून घेतो.. हा नबातीचा किल्ला.. थोडं या किल्ल्याविषयी सांगतो.. 

ब्रेकिंग न्यूज : गाळण्याचा बुरुज ढाळतो अश्रू.. स्थानिक म्हणतात  पत्थर का पसीना‘..  !! गडाच्या बांधकामासाठी वापरलं जातंय एक अभिनव इंजिनिअरिंग..!!
नबातीचा किल्ला: गाळणा किल्ल्याच्या डोंगराच्या डावीकडे एक डोंगर आहे.. गाळणा किल्ल्यांच्या मुख्य द्वारातून मागे बघितल्यास.. हा आटोपशीर किल्ला सुंदर दिसतो.,. खालून गडाकडे नीट पाहिल्यास.. उजवीकडे डोंगराच्या नाकाडावर मध्यभागी झुडुपांच्या आड दडलेला एक बुरुज आणि गडाच्या माथ्याला तटबंदीचे अवशेष दिसतात.. बुरुजाच्या दिशेने वर जायचं आणि मग डावीकडे तिरपे जात गड माथ्यावर पोहोचायचं.. निजामशाही सरदार.. महालदारखान  हा नबातीचा किल्लेदार होता.. असं इतिहासकार म्हणतात.. या गडाविषयी फार माहिती उपलब्ध नाही पण गाळणा किल्ला पाहून झाल्यावर या इतिहासाच्या पानावर दुर्लक्षित अशा उपेक्षित गडाची भटकंती विशेष आनंद देऊ शकेल.. नबातीचा  किल्ला  हा गाळण्याचा जोडकिल्ला आहे.. गड फिरून येण्यास साधारण दीड तास पुरे.. 
ब्रेकिंग न्यूज : गाळण्याच्या शेजारी उभा आहे .. उपेक्षित आणि ऐतिहासिक असा नबातीचा किल्ला….!! 
जोड किल्ल्यांची भटकंती करून कंक्राळा किल्ल्याकडे निघायचं.. पुन्हा डोंगराळे गाव  गाठायाचं आणि तिथून करंज गव्हाण.. इथून पुढे कंक्राळे गाव दहा कि..मी. वर आहे, कंक्राळा किल्ल्याची एक धावती भेट घ्यायची .. गडावर पाहण्यासारखा असं फारसं काही नाही पण चार-दोन पाण्याची टाकी, हनुमानाची मूर्ती, खिंडीतील भग्न तटबंदी आणि दरवाजा, गुहा इत्यादी अवशेष आहेत.. एक धावती भेट देवून परतीचा वाट धरायची.. 

रात्री मुक्क्माला मालेगाव गाठलं.. नदीच्या दोन्ही बाजूला हिंदू आणि मुस्लीम वस्त्या विभागलेल्या आहेत.. पण इथे कसलाही तणाव नव्हता.. होता जल्लोष नववर्षाच्या स्वागताचा.. फक्त इथे रस्त्यावर जिकडे तिकडे मालेगाव के रायडर दिसत होते.. इथल्या  गाड्यांना ब्रेक नावाचा अवयव आहे हे इथले रायडर विसरले असावेत.. जो बघावं तो भन्नाट निघालेला.. धुराळा उडवत.. न थांबता.. सुसाट.. अन्नपूर्णा लॉज वर मुक्काम केला आणि सकाळी मालेगाव किल्ल्याची भटकंती सुरु केली.. आजकाल या किल्ल्यात शाळा भरते.. शाळेच्या प्रवेशद्वारी सरस्वती देवीच्या पुतळ्या समोर तीन तोफा ठेवल्याचे दिसतात.. किल्ल्याच्या भग्न तटबंदीवर दोन इंग्रजी तोफा नजरेस पडतात.. साधारण चौरस आकाराच्या या गडाचे बुरुज आणि तट फार उत्तुंग आणि अजिंक्य असे आहेत आणि बुरुजाचा घेरा फार मोठा आहे.. गडाला एक बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा मारताना  तुटक्या तटबंदीमध्ये  दुमजली भुयारी रचना लक्ष वेधून घेते.. गडाच्या आतून तटबंदीवर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत.. उजव्या कोपऱ्यात एक कबर आणि पायऱ्या शेजारी एक विशाल बुरुज आहे.. इथून मागे वळून बघता समोर दोन दगडी खांबांचे लहानगे मंडप दिसतात.. गडाच्या मुख्य द्वाराची अवस्था नेटकी आहे.. किल्ल्याच्या चारही बाजूंनी खंदकाची रचना केलेली दिसते.. मालेगाव हा किल्ला नारो शंकर राजे बहाद्दूर (१७४० – १७४५ या काळात पेशवाईतील नाशिक परगण्याचे सरदार) यांनी बांधला असे इतिहासकार सांगतात..  सध्या गड रावबहाद्दरांच्या ताब्यात असून.. त्यांच्या परवानगीने गडाच्या आतील भागात फेरफटका मारता येतो.. इथून जवळच त्यांचा वाडा हि  आहे वेळ असल्यास इथे आवर्जून भेट द्यावी..मालेगाव पासून दहा कि.मी. अंतरावर मनमाडच्या रस्त्यावर जवळच कवळाने नावाच्या गावात एक राजवाडा आहे.. हा राजवाडा सयाजीराजे गायकवाड यांनी बांधला आहे.. त्यांचा जन्म या गावी झाला ते गाव म्हणजे कवळण.. वेळेचं गणित सुटलं तर इथेही एक धावती  भेट देता येवू शकेल..  मालेगावची छोटीसी सफर उरकून नाशिकची वाट धरली आणि नववर्षाची सुरुवात गड भ्रमन्तीने करून.. पुन्हा माणसांच्या जंगलात परतलो..  


तर दोस्तहो अश्या शे आमना खान्देशना प्रवास ..  आयुष्यभर ध्यानमा राहणारा.. एक अस्सल देशनी वळख व्ह्ययनि. मना खानदेशआमानी आहिरणी बोलणाऱ्या भाऊबंधना देश.. खान्देशना किल्ला काळ्या पिवळ्या टेकड्यालांबवर जायेल कोयडा  (ओसाड) माळभर हिवमा  डाव (चटका) देणार ऊन  , तरी डोंगरणा पोटमा गोड पाणी . बाभूळना झाडवर  गान  गाणारा चिडा (पक्षी)..  भर उनमा घाम गाळणारा  भील ना देश.. तापी,  गिरणा, बोरी, पांझरा नदीस्ना देश.. गाड्यासो आयुष्यमा एकदा तरी दखो आश्या हाऊ खानदेश 


तर दोस्तांनो असा हा आमचा खानदेशीचा आड वाटेवरचा प्रवास.. एक कायम आठवणीत राहणारा प्रवास.. एका अस्सल देशाची ओळख झाली.. महाराष्ट्र देशीचा.. खानदेश.. माझा खानदेश .. माझ्या अहिराणी बोली बोलणाऱ्या बांधवांचा देश.. खानदेशावरचे  किल्ले.. काळ्या पिवळ्या रंगांच्या टेकड्या .. दूरवर पसरलेले ओसाड माळ.. भर थंडीत चटके देणारे  उन .. तरी डोंगराच्या पोटात दडलेले गोड चवीचे पाणी.. बाभळीच्या झाडीवर किलबिलणारे पक्षी..  रणरणत्या उन्हात घाम गाळणाऱ्या भिल्लांचा देश .. तापीगिरणाबोरी आणि पांझिरा या दिव्य नद्यांचा देश.. तर मित्रहो असा हा विविध रंगी खानदेश..एकदा तरी आवर्जून पहाच तुम्ही .. 
मायबाप  प्रेक्षकांनो आज आपण पाहिलं की उन्हा-तान्हात भटकून.. रानोवनी वाटा तुडवून.. कोपलेल्या निसर्गाची पर्वा न करता आजकालची तरुणाई नवनवीन जागा अनुभवतात आणि क्षणभर गड माथ्यावर रमून पुन्हा माणसांच्या जंगलात परततात.. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेला खरा महाराष्ट्र बघण्याचा ध्यास ह्या मंडळीना कुठे घेवून जातो.. हे पाहुयात येणाऱ्या काळात.. आजसाठी  आपला कार्यक्रम इथेच थांबवूयात.. कार्यक्रमाची सांगता करण्याधी जनतेचा कौल पाहुयात.. प्रश्न पुन्हा एकदा ऐका.. “खानदेशातील किल्ल्यांना सह्याद्रीतील किल्ल्यांची सर् आहे का?”.. बघा पडद्यावर बघा.. आता साधारण ९९% टक्के लोक होय‘ म्हणतायेत.. तर आता तुमचा निरोप घेतो.. उपेंद्रमयूर आणि मिलिंद धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.. पुन्हा भेटूयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमात..ज्याचं नाव आहे..  गडकोट २४ तास – एक पाउल गडावर”..
माधव कुलकर्णी
ता.क. या लेखातील अहिराणी उतारा हा श्री. आशिष भांबरे यांनी लिहिला आहे याची नोंद घ्यावी..

2 Comments Add yours

  1. atma says:

    मस्त रे…

    Like

  2. छान, अत्यंत उत्कृष्ट आणि सुबक भाषेत आपण खान्देश चे वर्णन केल्या बददल

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s