रामपूरचा किल्ला आणि उमराणीची गढी

Rampur Fort, Umarani Mudfort

बंगळूरात गेलो आणि सह्याद्रीची कास सुटली.. गेल्या चार महिन्यात बंगळूराच्या आसपासचे उत्तुंग असे ४-५ किल्ले पहिले .. पण अस्सल महाराष्ट्रातील मातीचा किल्ला अजूनही शेकडो कोस दूर होता.. २०१२ ची दिवाळी सुट्टी ऐनवेळी घेतली आणि ऐनवेळी तिकिट मिळेना.. शेवटी माझे जुने मित्र लकडेजी म्हणाले जतला चला आणि एक दिवस आमचा पाहुणचार घ्या आणि मग जा पुण्याला.. मग त्यांच्या सोबत  ‘जत’ पर्यंत गेलो आणि तिथे ऐनवेळी भटकंतीचा ताबडतोब प्लान ठरवून टाकला.. विजापूर किल्ला, जतचा राजवाडा आणि उमराणीची गढी आणि जत जवळचा निनावी किल्ला  पाहण्याचा बेत पक्का केला..

शिवाजी महाराजांचा वतनदार आणि वतनदारी यावर रोष होता.. त्यामुळे स्वराज्यात कधी वतन वाटप झालं नाही.. पण त्याकाळची असंतुष्ट सरदार मग मोघलाई आणि आदिलशाही ची कास धरून वतन पदरात पाडून घेत आणि मघ प्रजेवर जुल्म-जबरदस्ती करत त्याच्या राज्याचे गाडे हाकीत असत.. छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराजांनी देखील वतनदारी लं फाटा देवून स्वराज्याच्या मुलभूत मूल्यांना तडा जावू दिला नाही.. मग पुढे महाराज या वतनदारीच्या लालसेने बेचैन झालेल्या शिर्क्यांच्या कारस्थानाला बळी पडले आणि पुन्हा ही वतन दारी आणि संस्थाने फोफावली.. कालचा सरदार आजचा राजा झालां.. जत, डफळेपूर, उमराणी आणि करजगी (सध्या कर्नाटकातील गाव) हे एकेकाळची संस्थाने.. पुढे या चार संस्थानांचे मिळून जत हे संस्थान एको काळी अस्तित्वात होते.. डफळे सरकार हे इथले राजे होते.. जत मधील उत्तुंग राजवाडे हे डफळे सरकारांचे.. मुळचे चव्हाण आणि नंतरचे डफळापूर ची जहागिरी मिळाल्यानंतरचे डफळे सरकार.. तर योगायोगाने जत पाहण्याची संधी आली आणि इथला मुलुख पालथा घालण्याचा विचार पक्का झाला.. 

विजापूरचा किल्ला आणि मुलुख-ए-मैदान :

विजापूरची भटकंती करण्यास टांग्यातून निघालो.. टांगेवाला कम गाईड ने बरीच माहिती दिली.. प्रथम गोल  गुंबज अर्थात गोल घुमट पाहून आलो.. हा गोल घुमट इराणी वास्तूविशारदाने बांधला असे म्हणतात.. भव्य आणि एकसंध असा हा अजस्त्र घुमट पाहून थक्क व्हायला होतं.. इथे वर जाण्यासाठी मनोऱ्यातून सर्पिलाकार जीना आहे… इथे सात प्रकारचे प्रतिध्वनी ऐकू येतात असे कळले// ओं आत बघ्यांची भाऊगर्दी होती आणि सात नव्हे तर तब्बल सातशे आवाज या ठिकानी घुमत्  होते.. खरा प्रतिध्वनी ऐकायचा तर सकाळी यायला हवं //  बघ्यांची वेळ टाळून//  गोल घुमटाच्या समोरील दरवाजासमोर// काही तोफा ठेवल्या आहेत यावरील कलाकुसर बघण्यासारखी आहे// वेगळ्या आकाराच्या आणि बांधणीच्या या तोफा एका नजरेत पाहणे ही एक पर्वणीच आहे//

मग  विजापूरचा किल्ला, खंदक.. सात महल.. गोल घुमट, ताज बावडी  आणि मुलुख मैदान तोफ पाहून आलो..  मुलुख मैदान ही तोफ ज्या बुरुजावर सध्या आहे त्या बुरुजावर एक दरवाजा आहे या दवाजावर एक चांद-तारा कोरला आहे.. हा असा चांद -तारा जीवधन किल्ल्याच्या मुख्य द्वारावर कोरलेला दिसतो.. या शिवाय दरवाजावर एक शिल्प लक्ष वेधून घेते.. या दरवाजा शेजारील भिंतीवर एक चौरस तासलेला चिरा आहे// इथे तळी वाजवली कि मागे एका उंच अशा टेहळणी बुरुजावरून त्याचा प्रतिध्वनी येतो..अशी ही अभिनव अभियांत्रिकी//

एके काळी मुलुखावर वर्चस्व गाजवणारी तोफ आज काहीशी थंडावली होती.. पण तोरा तोच.. ‘कर हिम्मत.. तो दिखा दू जन्नत’ अस्सा.. मुलुख-ए-मैदान ची बांधणी पाहून थक्क व्हायला होतं..मुलुख मैदान तोफ २७० अंशातून फिरवण्यासाठी केलेली रचना अप्रतिम आहे.. शेजारी एक हौद आहे.. इथे तोफेला बत्ती देणारे सैनिक तोफेच्या आवाजाने कानठळ्या बसून कान फुटू नये.. यासाठी बत्ती दिली कि लगेच या हौदात बुडी मारून बसत.. तोफेवर वरच्या बाजूला एकं पिळदार मिशीच्या मानवी चेहऱ्याचा आकार कोरलेला आहे या शिवाय डावीकडे आणि उजवीकडे हत्तीचे चित्र कोरले आहे.. वर फारसी भाषेत काही अक्षरे कोरलेली असून.. तोफेचा घेर प्रचंड आहे//

विजापूरला भोज्जा करून जत गाठलं.. रात्री मित्राच्या मळ्यात गावरान कोंबडीचा रस्सा वरपून धन्य झालो आणी सकाळी शार्प नऊ वाजता भटकंती सुरु झाली.. मित्राने भटकंती ची चांगली सोय लावली होती.. सोबतीला मेव्हण्याला कामाला लावलं..

उमराणी ची गढी :

जतच्या भटकंती ची सुरुवात उमराणी च्या गढी पासून करावी असं ठरवलं आणि मिमे (मित्राच्या मेव्हणा) ने थेट उमराणीच्या सरपंचांना  फोन लावला. मी आणि मिमे निघालो.. उमराणीचा विजयस्तंभ आणि गढी पहायला.. बाईक ला  किक मारली आणि जत पासून साधारण २० कि.मी. वर दूर असं उमराणी गाव गाठलं.. तिथे या गावातले प्रगतीशील शेतकरी आणि विद्यमान सरपंच याची आधुनिक शेती पाहून भारावून गेलो.. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा त्याचा ध्यास पाहून थक्क झालो.. द्राक्ष शेती.. मनुके तयार करण्याचा कारखाना आणि २१ व्या शतकातील अद्ययावत सिमेंट ची विहीर पाहून.. “उगाच आपण आय-टी मध्ये माशा मारतोय असं वाटू लागलं”.. सरपंच चहा घेवून जा म्हणाले आणि अस्सल गुळाचा चहा पिऊन  उमराणी गावी निघालो..

शिवरायांचे विश्वासू सोबती.. हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरसेनापती अर्थात सरनौबत प्रतापराव गुजरांनी आदिलशाही सरदार बहलोलखानवर जो पराक्रमी विजय मिळवला ते गाव म्हणजे उमराणी.. या गावात ग्रामस्थांनी उमराणीच्या विजयाची आठवण जपण्यासाठी हा विजयस्तंभ उभारला आहे ..विजयस्तंभ पाहायला निघालो.. सरनौबत प्रतापराव गुजरांनी बहालोलखानावर जो विजय मिळवला  त्याची आठवण म्हणून हा विजयस्तंभ उभारला आहे.. उमराणी जवळच्या एका पाणवठ्यावर उन्हाने लाही लाही झालेल्या बहलोल च्या सैन्यावर मावळ्यांनी छापा घातला आणि खानाचा पाडाव केला.. पुढे काय झालं हां एक इतिहास आहे.. वेडात मराठे वीर दौडले सात.. हे सरनौबत प्रतापराव गुजरांवर लिहिले गाणं सर्वश्रुत आहेच.. मी बापुडा आणखी काय सांगणार.. जवळच उमराणी ची गढी आहे ती पाहायला निघालो..

उमराणी गावातच डफळे सरकारांची गढी आहे.. आता सोबतीला सरपंच होते म्हणून डायरेक्ट उमराणीच्या गढीत प्रवेश मिळाला.. साधारण औरस-चौरस आकाराची ही गढी ही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.. समोरून पाहता कलाकुसरीचा दरवाजा दोन बुरुज आणि समोर काही ऐतहासिक बांधकामाचे अवशेष दिसतात.. सरपंचांनी दस्तूरखुद्द डफळे सरकारांची ओळख करून दिली आणि सरकारांनी स्वतःहून डफळे घराण्याचा थोडक्यात इतिहास सांगीतला..  पण महाराजांच्या काळातील काही इतिहास ऐकायला मिळेल या आशेवर पाणी पडलं.. पण डफळे सरकार आणि इंग्रज सरकार यांच्यातील पत्रव्यवहार कानी पडला.. रॉयल चहा आणि रॉयल पाणी पिवून.. परत निघालो.. वाड्यातील भयानक रानटी कुत्र्यामुळे गढी आतून पाहता नाही आली पण जाता-जाता वाड्यातील पुरातन बांधीव विहिरीला भेट देवून ‘हिज हायनेस डफळे’ सरकारांचा निरोप घेतला..

रामपूर चा छोटेखानी किल्ला :

जतला परतलो आणि जेवणास उशीर होता म्हणून यजमान लकडेजींना म्हटलं इथं जवळचा रामपूरचा  किल्ला आणि जत चा राजवाडा पाहून येवूयात.. मग  मी, लकडेजी, त्यांचे पाहुणे आणि मिमे अशी छोटी चार भटक्यांची टीम तयार झाली… मग त्यांच्याच कारने रामपूर च्या किल्ल्याकडे निघालो.. रामापुरचा किल्ला हा जत पासून साधारण ३ कि.मी. वर हा छोट्याशा (१५० ते २०० फुट) टेकडीवर बांधलेला हा किल्ला.. इतिहासाच्या पानावर हरवलेला एक किल्ला पाहण्याचा योग आला होता.. जतच्या राजवाड्या पासून थोडं पुढे गेल्यास डावीकडे रामपूर गाव आहे.. इथून दूर एका छोट्या टेकाडावर बांधलेला इवलासा किल्ला आहे.. हाच रामपूर चा किल्ला… इथल्या स्थानिकांना या किल्ल्याबद्दल फार आस्था नाही हे किल्याच्या दुरावस्थेवरून लक्षात आलं.. त्यामुळे किल्ल्यावर नेमकं काय बघायला मिळेल याची उत्सुकता होती.. रामपूर गावात गाडी लावली.. आणि उजवीकडे रामपूर किल्ल्याचा भग्न बुरुज आणि तटबंदी दिसू लागली.. लकडेजींनी.. ‘गडावर कसं जायचं असा प्रश्न एका गावकऱ्याला विचारला आणि तो म्हणाला.. असं आडवं डाव्या अंगाला जा.. तिकडे वाट आहे गडाची.. मग तिकडे डाव्या अंगाच्या मळलेल्या पायवाटेने निघालो.. डावीकडे गडाचा प्रवेश दरवाजा आणि त्याची सुंदर कमान पाहून बरे वाटले.. मग कमानीत पडलेल्या दगड-धोंड्यातून वाट काढत.. आत प्रवेश केला.. आणि आत एक हेमाडपंती मंदिर पाहून आणखी एक सुखद धक्का बसला.. मग तिकडे जावून शंकराचे दर्शन घेतले.. इथून नजर फिरवता जराशा  ओबड-धोबड आकाराच्या  ह्या किल्ल्याचा घेरा लक्षात येतो..  गडाची तटबंदी ठिकठिकाणी ढासळली तरी गडाचे अवशेष अजूनही पाहण्यासाखे आहेत.. मंदिर शेजारच्या बाभळीच्या झुडूपात एक उखळ दडलेला दिसला.. मग गडावर एक फेरफटका मारून मागच्या तटावरून उतरणीला सुरवात केली.. इथे थोडं उतरून गडाकडे नजर टाकल्यास एक चोर दरवाजा झाडाखाली अंग चोरून लपल्याचे दिसले.. इथून ह्या किल्ल्याची तटबंदी सुर्ख दिसते.. गडाचा इतिहास फारसा ज्ञात नाही पण शिवाजी महाराज इथे येवून गेल्याचे स्थानिक आवर्जून सांगतात.. पण नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर आणि सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी आदिलशाही वर केलेल्या अनेक बेधडक आणि धाडसी मोहिमांचा इतिहास पाहता या गडाला त्यांचेही वास्तव्य लाभले असण्याची शक्यता आहे.. शिवाय गडावर चे शिवमंदिर या किल्ल्याच्या प्राचीनतेची साक्ष देतात..

बरेच जण म्हणतात काय ठेवलंय त्या तुमच्या किल्ल्यामध्ये.. पडलेले दगड आणि पोखरलेले बुरुज आणि असतं काय या किल्ल्यामध्ये.. पण मला या उदासीन लोकांना काही सांगायचंय.. काळाच्या पडद्याआड गेलेला इतिहास उघड्या डोळ्यांनी जगताना एखाद्या भन्नाट गडाचा आडदांड दरवाजा आडवा आला कि काही क्षण हे मन आनंदित होतं आणि काळाच्या पडद्याआड डोकावून बघणारे किल्ले त्यांचे भग्नावशेष जणू गर्जना करतात.. बघा माझे हे शानदार गतवैभव, मी साक्षीदार आहे त्या हिंदवी स्वराज्याच्या सोनेरी क्षणांचा.. आणि मग शेवटी आपण जेंव्हा गडाचा निरोप घेतो तेंव्हा हे गडकोट जड अंत:करणाने सांगतात “नीट जा पोरांनो.. आणि जमलं तर जतन करा हा वारसा मराठी अस्मितेचा आणि महारराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा.. नाहीतर तुमच्या सिमेंटच्या जंगलात एक दिवस हा माझा अस्सल रांगडा महाराष्ट्र कधी हरवून जाईल ते कळणार नाही.. नीट जा पोरांनो.. नीट जा”

एक दुर्लक्षित आणि नीटनेटका किल्ला पाहून जत कडे परतलो.. येता येता.. जतचा राजवाडा पाहून आलो.. आणि पुण्याची यष्टी पकडली.. गाडी फुफाटा उडवीत.. साताऱ्याकडे निघाली..

माधव कुलकर्णी

One Comment Add yours

  1. जतसंबंधी लिहिल्याबद्दल आभार

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s