K2 :: कथा दोन किल्ल्यांची

कुगावचा किल्ला आणि करमाळ्याचा भुईकोट

उन्हाचा कहर जसा वाढू लागला तसा गिरीदुर्गांचा नाद सोडून भुईकोट किल्ल्यांकडे मोर्चा वळविला.. सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भ या भागात तब्बल  ७०-८० भुईकोट आहेत असा मध्यंतरी गुगलवर शोध लागला  आणि हळूहळू हे सर्व भुईकोट पाहून आडवाटांचा इतिहास जाणून घेण्यासाठी सोलापुरातील भटकंती सुरु झाली.. सोलापूर जिल्ह्यात पिलीव, अकलूज, सोलापूर शहर, मंगळवेढा, माचनूर, अक्कलकोट, परांडा, माढा, करमाळा, कुगाव-चिखलठाण इथे भुईकोट किल्ले आहेत.. याशिवाय उजनी हे भीमा नदीवरील धरण आहे.. क्षमतेच्या बाबतीत या उजनी धरणाचा  कोयना व जायकवाडी यांच्यानंतर तिसरा क्रमांक लागतो.. उजनी धरण हे पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे, उजनी धरणाच्या जलाशयात स्थलांतरित पक्षांची संख्या पुष्कळ आहे.. नगर, पुणे आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांच्या हद्दीत पसरलेला उजनी धरणाचा विस्तीर्ण जलाशय हे या भागाचे वैशिष्ट्य आहे.. सोलापुरातील भटकंती पंढरीरायाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होवू शकत नाही.. चंद्रभागेच्या तीरावरील पंढरीने पावन झालेले असे आमचे सोलापूर.. तर अशा या रॉयल सोलापूर ची भटकंती सुरु करण्याचे ठरवले.. मध्यंतरी सोलापूर ला गेलो आणि  मंगळवेढा, पिलीव, माचनूर, अक्कलकोट आणि सोलापूर भागातील गडकोट पाहून  एक उन्हाळी दिवस धन्य झाला.. नुकताच करमाळा भागात जाण्याचा योग आला.. करमाळा तालुक्यातील करंजे माझं आजोळ.. पुणे – हडपसर – भिगवण – राशीन – करमाळा असा गाडीमार्ग आहे..

देवीचा माळ 

करमाळा गाठलं आणि जवळपास काय काय पाहता येईल याची शहानिशा केली.. इथे ५-७ कि.मी. वर संगोबा हे सीना नदीच्या काठचे जुने शिवमंदिर आहे आणि  करमाळ्यापासून २-३ कि.मी. अंतरावर देवीचा माळ एका लहानशा टेकडावर बांधला आहे .. इथे कमलादेवीचे मंदिर आहे.. कमलादेवी हा भवानी मातेचा अवतार.. या देवीच्या माळावरून या शहराला करमाळा हे नाव पडले असे जाणकार सांगतात.. कमलादेवी / भवानी देवी मंदिराच्या भोवती दोन पदरी दगडी चिऱ्यांचा भक्कम कोट उभा केला आहे.. श्री. राव रंभा निंबाळकर या राजाने हा कोट बांधल्याचे काही लोक सांगतात.. पायऱ्यांवरून वर जाताच राजे राव रंभा निंबाळकर यांची समाधी दिसते..  मंदिराच्या मागच्या बाजूस.. राजघराण्यातील काही लोकांच्या समाध्या आहेत.. त्यामागे.. एक अजस्त्र विहीर आहे.. हि विहीर अष्टकोनी, सात पदरी आणि सुमारे १००  फुट खोल आहे.. अष्टभुजा कमलादेवी ची मूर्ती प्रगल्भ असून.. पंचक्रोशीत देवीचा महिमा प्रसिद्ध आहे..  देव दर्शन करून बाहेर येताच.. समोर दरवाजाच्या पुढ्यात आकाशाकडे झेपावणाऱ्या तीन दीपमाळा लक्ष वेधून घेतात.. या उत्तुंग दीपमाळेच्या आतून वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.. या देवीच्या माळातून पाहताना चाहुबाजूचा परिसर न्याहाळता येतो.. 


करमाळा किल्ला 

देवदर्शन करून करमाळा किल्ल्याकडे मोर्चा वळविला.. S.T. stand पासून जवळच हा किल्ला आहे.. २१ बुरुजांचा आणि दोन दरवाजांचा हा किल्ला.. किल्ल्याला पूर्व-पश्चिम दरवाजा आहे.. पूर्वे कडील दरवाजातून आत येताच.. हनुमान मंदिर आणि उजवीकडे हेमाडपंती शंकराचे मंदिर आहे.. तटबंदीलगत कुणा एका पिराची कबर आहे.. किल्ला बाहेरून पाहताना जरी भक्कम वाटत असला तरी आत मात्र तटबंदी आणि बुरुज पोखरलेल्या अवस्थेत आहेत.. कधी ढासळतील  याचा नेम नाही.. सदर किल्ला राव रंभा निंबाळकर यांनी बांधला असून आत त्यांचा राजवाडा आहे.. सध्या इथे कोर्ट भरवले जाते.. रंभाजी निंबाळकर हे संभाजी महाराजानंतर पुणे सुभ्याचे वतनदार झाले.. तद्नंतर त्यांना करमाळा जवळील वतन देण्यात आले.. साधारण १७ व्या शतकात हा किल्ला उभारल्याचे इतिहासकार सांगतात.. किल्ल्यावर एक आतून फेरफटका मारून किल्ल्यातील मारुती रायाचे दर्शन घेतले.. नंतर आंबी जळगाव इथे राहणारे आमचे पाहुणे प्रवीण कुलकर्णी यांच्याकडे निघालो.. तिथे त्यांच्या शेतावरच्या घरी थंडगार वाऱ्यात ताणून दिली.. दुसऱ्या  दिवशी सकाळी लवकरच जाग आली ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने.. वेडा राघु, भारद्वाज, देसी हमिंग बर्ड, माळचिमणी असे नानाविध पक्षी अंगणात मुक्तपणे विहार करीत होते.. फुकटातले पक्षी निरीक्षण करून कुगावचा जलसमाधी घेतलेला किल्ला पाहण्याचं नक्की केलं.. 


कुगावचा किल्ला / राणीचा वाडा 

न्याहारी उरकून पूर्वीचा भुईकोट आणि सध्याचा जलदुर्ग कुगाव चा किल्ला पाहण्यास निघालो.. जेऊर ला आणखी एक भटकंतीला साथीदार मिळाला.. त्यांनीच कुगावचा रस्ता दाखवला.. करमाळा-जेऊर-चिखलठाण-केडगाव-कुगाव असा ३०-३५ कि.मी. चा प्रवास करून उजनी धरणाच्या जलाशयाशी  येवून पोहोचलो.. दुपारच्या रणरणत्या उन्हात कार  गाडी (यशवंती) उभी करायला चक्क एक आयते उभारलेल शेड मिळाले आणि यशवंती शेड मध्ये घुसली.. कडवळ (उसाचा वाळका पाला) छतावर अंथरून केलेली हि शेड त्या नदीकाठच्या वाळवंटात एकमेव सावली ची जागा होती.. 

कावलेल्या उन्हात डोक्यावर रुमाल गुंडाळून बोटीत बसलो आणि बोट कुगाव च्या किल्ल्याकडे निघाली.. या किल्ल्याबद्दल फारसा इतिहास माहिती नाही.. कुणी याला बामणाच्या राणीचा वाडा म्हणतात.. पण हा किल्ला आहे हे नक्की.. उजनी धरणात बुडालेला हा किल्ला दर वर्षी उन्हाळ्यात बाहेर डोकावू लागतो.. आणि यंदा दुष्काळी  परिस्थिती असल्याने मार्च मध्ये हा किल्ला बराच पाण्याच्या बाहेर आल्याचे दिसले.. किल्ल्याला एकूण तीन प्रवेश दरवाजे आहेत.. यातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस उंच मनोरे आहेत.. समोरून पाहताना हे मनोरे एखाद्या मिनारासारखे भासतात.. मुख्य द्वाराशेजारी देवडी असून.. तिला कमान असलेली  रुंद खिडकी आहे.. बोटीवरून ६-७ फुट खाली तटबंदी च्या ढासळलेल्या दगडांच्या राशीवर उडी मारून.. गडाच्या भग्न तटबंदीवरून गडावर  प्रवेश केला.. आणि ताबडतोब किल्ल्यावरील सुमारे हजारो टिटव्या एका सुरात कोरस मध्ये केकाटू लागल्या.. पुढे उजवीकडे जाताच टिटवीची अंडी नजरेस पडली.. आणि त्यांच्या गोंगाटाचे कारण कळले.. 

किल्ल्याला एकूण सहा बुरुज असून, त्याचा आकार साधारण चौरस असा आहे.. उजवीकडे कोपरयात बुरुज आणि गडाचा दुसरा दरवाजा नजरेस पडतो.. मग पुन्हा डावीकडे काटकोनात शेवटपर्यंत जाताच.. एक चोर दरवाजा.. बुरुज.. तलाव आणि मागे एका बेटासारखे दिसणारे मंदिर नजरेस पडते.. इथे एक अर्धवट तुटलेला रांजण नजरेस पडतो.. गडाच्या मध्यभागी वाड्याचे चौथरे  नजरेस पडतात.. गडाच्या मध्यभागी .. वाहून आलेली माती भरली आहे.. आणि ठिकठिकाणी पाण्याची डबकी.. त्यातून वाट काढत पुन्हा मुख्य दरवाजाजवळ येवून पोहोचलो.. टिटव्या अजूनही केकाटतच  होत्या.. मग पुन्हा पांढऱ्याफटक दगडांच्या राशीवरून मुख्य दरवाजाच्या डोक्यावर चढून पहिलं.. इथे दरवाजाच्या कमानीवरील गोलाकार छत पाहायला मिळालं.. मग डावीकडचा मनोरा आणि दरवाजाची भिंत यातील निमुळत्या जागेतून खाली उतरून.. मुख्य दरवाजाच्या डावीकडील खिडकी तून डोकावून पाहिलं.. तर आत देवडी आणि दरवाजाच्या आतील भिंतीचे अवशेष पाहायला मिळाले .. किल्ल्याचा हा भाग अजून सुस्थितीत आहे.. 

दगडांच्या राशीवरून तोल सांभाळत पुन्हा बोटीत प्रवेश केला आणि एक इतिहासाच्या पानावरून गायब झालेला किल्ला पाहिल्याचे समाधान उरात घेवून पुन्हा किनाऱ्याकडे परतलो.. यंदाच्या भटकंतीला प्रशांत, रवी, मामा हे नवीन ट्रेकर्स होते.. या नव्या ट्रेकिर्स मंडळीबरोबर हे ‘नवा गडी नवे राज्य’ पाहून.. पुन्हा पुण्याकडे स्वगृही परतलो..

माधव कुलकर्णी .. २०१३

 
  

 

One Comment Add yours

  1. कुगावच्या किल्ल्या बाबत शोधाशोध करताना ब्लॉग मिळाला. उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s