सोलापूर व्हाया फलटण .. किल्ले एकदम टणाटण

Piliv Fort, Mangalwedha Fort, Machanur Fort, Solapur Fort 

Piliv Fort


यंदाच्या रविवारी चंद्रकांत The Warrier ने भटक्या मनाची पालखी घेवून पंढरपूर आणि अक्कलकोट च्या देवदर्शनाचा बेत आखला.. सिंघम च्या नव्या कोऱ्या कुर्रिंग अशा पोलो (लाजवंती) गाडीतून खिशाला परवडणारी अशी हि ट्रीप.. मग माघार कसली.. चंद्रकांत ला म्हटलं अरे नुसतंच देवदर्शन नको सोबत काही किल्ले दर्शन करूयात.. फलटणच्या पुढे पिलीवचा किल्ला आहे तो पाहून पुढे मंगळवेढा किल्ला आणि मग शेवटी सोलापूर आणि नळदुर्ग.. अन्ना लगेच तयार झाला.. तसं अन्नाचा काही त्रास नसतो.. त्याला त्याच्या स्टायीलने कार चालवायला मिळाली कि अन्ना खुश.. मग तुम्ही किल्ल्यावर जा कि जंगलात अन्ना एका पायावर तयार.. पहाटे सहाला पुणे सोडलं आणि पोलो सातारा रोडने पुढे धावू लागली.. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीस दुष्काळाचे सावट असल्याने ‘पुणे – फलटण – माळशिरस  – पिलीव – मंगळवेढा – (माचनूर) – सोलापूर – पुणे’या प्रवासात रखरखत्या उन्हाचा सामना करावा लागणार हे उघड होते.. म्हणून घरून निघताना पाण्याचा १५-२० लिटरचा साठा बरोबर घेतला.. आणि तडक फलटण कडे निघालो..

खंडाळा घाटाच्या अलीकडे शिरवळ नंतर डावीकडील midc कडे वळायचं आणि पुढे .. वीर धरणाच्या जवळून जाणारा रस्ता आहे.. वीर धरणाच्या back water (जलाशय) जवळ पोहोचलो आणि अन्ना च्या पोटात गडबड सुरु झाली.. तशी पोलो बाजूला घेतली.. वाटेत तुंबलेला अन्ना वीर धरणाच्या जलाशयाच्या काठी एकदाचा रिकामा केला.. निघण्यापूर्वी चंद्रकांत अन्ना ने शिंघम ला गाडी रिव्हर्स कशी घ्यावी याचे ट्रेनिंग दिले.. “अरे.. घे मागे.. अरे वढ.. अरे घे जोरात..” जोरात जोरात म्हणताना.. आता.. पोलो जाते की काय वीर धरणात..! अशी परिस्थिती उद्भवली.. शेवटी अन्नाला आवरला आणि अन्नाला घेवून लाजवंती फलटण कडे निघाली.. फलटण ला पोहोचलो आणि माळशिरस/पंढरपूर रस्त्याने निघालो..

वाटेत नेत्यांनी आणि मिडीयाने जेवढा दुष्काळी परिस्थितीचा बाऊ केला आहे तशी परिस्थिती काही वाटली  नाही जिकडे बघावा तिकडे ऊस.. एकदम ताडासारखा वाढलेला ऊस.. असो.. हिरव्यागार शेताडाला छेदत जाणाऱ्या डांबरी सडकेने.. माळशिरस गाठले.. इथून पिलीवचा रस्ता विचारत पुढे एक  साखर कारखाना आणि मग साधारण अर्ध्या तासात पिलीव गाव गाठलं.. गावात शिरताच एक तटबंदी आणि कमान लक्ष वेधून घेते.. हि वेशीवरची कमान.. पुढे रस्ता विचारत निघालो गल्ली बोळातून वाट काढत अगदी किरकोळ आणि लहानशा टेकडावर बांधलेल्या पिलीव किल्ल्याच्या पुढ्यात येवून पोहोचलो..

पिलीवचा किल्ला : साधारण ६-७ एकरात वसवलेला हा किल्ला पाहणे म्हणजे दुर्ग प्रेमींसाठी एक पर्वणी आहे.. भरभक्कम बुरुज.. बुरुजातून आणि तटबंदीतून डोकावणाऱ्या जंग्या (जुन्या काळच्या चापाच्या लांबलचक आणि निमुळत्या बंदुकांच्या नळीचे टोक बाहेर काढण्याचे झरोके म्हणजे जंगी), मुख्य दरवाजा, षटकोनी विहीर आणि आकर्षक तटबंदी.. साधारण १६-१७ बुरुज असलेला हा किल्ला तसा भक्कम.. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूच्या तटासमोर.. एक कमरेइतक्या उंचीची भिंत घातली आहे.. कदाचित या भिंतीआड चार-पाच सैनिकांची एक छोटी तुकडी दाबा धरून बसत असावी.. मुख्य दरवाजा शेजारील बुरुज थोडा बाहेर डोकावतो आहे असे दिसते.. आत शिरताच काटकोनात वळताच.. किल्ल्याचा घेरा लक्षात येतो.. डावीकडच्या तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत.. मध्यभागी एका प्रशस्त वाड्याचे चौथरे नजरेस पडतात.. डावीकडच्या तटबंदीलगतच्या पायऱ्या चढून वर आलो.. आणि तटबंदीवर एक फेरफटका मारला.. इथे मधल्या बुरुजावर एक छोटी तोफ नजरेस पडते.. हि बहुदा खांद्यावर धरून उडवायची तोफ असावी.. अगदी पुढे टोकाला दिसणाऱ्या बुरुजावर जाण्यासाठी एका चौकटीतून वाकून प्रवेश करावा लागतो.. असे एक-एक करून सगळे बुरुज जिंकले तरच गड जिंकला नाहीतर गड अभेद्य आणि अजिंक्य.. त्यामुळे बुरुजाच्या संरक्षणासाठी केलेली हि रचना फारच उत्तम आहे.. या बुरुजाच्या अलीकडे डाव्या बाजूस.. आयताकृती सज्जा असून.. त्याला खालच्या बाजूने चौरस झरोके आहेत.. बाहेरून काळ्या-तांबूस पिवळसर दगडांनी बांधलेल्या तटबंदीकडे पाहताना.. हा वैशिष्ट्यपूर्ण सज्जा (बाल्कनी) फारच सुंदर भासतो.. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या डावीकडील तटबंदी समोर तीन चुन्याची घाणी आढळतात.. यावरून.. आकाराने मोठ्या किल्ल्याचे बांधकाम करायचे ठरले असावे पण काही कारणास्तव छोटेखानी किल्ला बांधला असावा..

इतिहास : किल्ल्याचे मुळ मालक श्री. अजित बाळासाहेब जहागीरदार यांनी सांगितलेला इतिहास हा असा..  या जहागीरदार घराण्याचे कोणी एक मूळपुरुष यांनी शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात हा किल्ला बांधला.. स्वराज्यातील सातारा कोल्हापूर भागातील किल्ल्यांवर किंवा शहरांवर, मोघल सैन्याचे विजापूर-सोलापूर या मार्गे होणारे आक्रमण थोपवण्यासाठी हा किल्ला बांधला असावा.. हि गढी नसून हा एक भर भक्कम भुईकोट किल्ला आहे..  किल्ल्याचे थोडे बांधकाम अर्धवट राहीले आहे .. म्हणजे आता ज्या बुरुजावर वर झेंडा फडकत आहे त्याचे बांधकाम हे अपूर्णावस्थेत आहे.. सदर किल्ला हा सध्या जहागीरदारांच्या वंशजांच्या अखत्यारीत आहे.. त्यावर सरकारचा कुठलाही अधिकार नाही.. कुठल्याशा लढाईत जहागीरदार यांच्या घराण्यातील मूळपुरुषाने प्रचंड पराक्रम गाजवला परंतु दिवाळीच्या दरम्यान झालेल्या लढाईत झुंजताना त्यांना वीरमरण आले.. तेंव्हापासून या जहागिरदारांच्या वाड्यात दिवाळीला आकाशकंदील लावत नाहीत.. दिवाळी साजरी केली जात नाही..

सहा फुटांपेक्षा अधिक उंची.. धिप्पाड शरीर यष्टी.. ‘३००’ चित्रपटातील एखाद्या शूर मावळ्यासारखे हे श्री अजित जहागीरदार दिसत होते.. त्यावरून महाराजांच्या टायमाला धिप्पाड मावळे कसे असतील याची कल्पना येते.. आणि मग त्यांना मोघल, आदिलशाही सैन्य का घाबरत असावे याची खात्री पटते.. साधारण सत्तरीत पोहोचलेल्या श्री. अजित बाळासाहेब जहागीरदार यांनी आपुलकीने चौकशी करत हि किल्ल्याविषयी माहिती पुरविली.. त्यांचा निरोप घेवून मंगळवेढ्याकडे निघालो.. पिलीवहून पंढरपूर रोडने निघालो.. वाटेत भुकेल्या पोटाचे कौतुक सोहळा उरकून घेतला.. उसळ-मिसळ-पुरी-चपाती.. जे मिळेल ते ओरबाडून.. पंढरपूर गाठलं.. अफझलखान जेंव्हा लाखांचं सैन्य घेवून स्वराज्यावर चालून आला होता.. तेंव्हा.. त्याने तुळजापूर देवस्थान आणि पंढरपूर देवस्थानावर हल्ला केला.. पंढरपूर वर जेव्हा हल्ला झाला तेंव्हा बडव्यांनी विठ्ठलाच्या मूर्ती भोवती मानवी कडे तयार केले.. शेकडो बडव्यांनी या मानवी काड्याने विठ्ठलमूर्ती चे रक्षण केले असं सांगितलं जातं.. असो.. बऱ्याच वर्षांनी विठ्ठल दर्शनाचा योग आला तेंव्हा मुखदर्शन घेवून.. मंगळवेढा गाठलं.. इथे ‘चंद्रकांत द वॉरियर’ चे पाहुणे राहतात.. त्यामुळे त्यांच्याकडे चहापानासाठी जावून आलो.. तिथे चंद्रकांत आणि पाहुणे यांच्यात मराठी मिश्रित कन्नड भाषेत काही डायलॉग बाजी झाली.. आणि इथे जवळच माचनूर इथे सिद्धेश्वर मंदिर आणि एक भुईकोट किल्ला असल्याची माहिती मिळाली.. मग तिथल्या तिथे प्लान बदलण्यात आला.. मंगळवेढा किल्ला पाहून मग माचनूरचा किल्ला पाहण्याचे ठरले.. नळदुर्ग भ्रमंतीचा बेत तडकाफडकी रद्द करण्यात आला..

मंगळवेढा किल्ला : मंगळवेढा गावात शिरताचकचेरी कुठाय? कचेरी कुठाय?’ ‘कुठाय कचेरी?’ असं विचारत गेलं तरी आपण मंगळवेढा किल्ल्यात आरामात जावून पोहोचतो.. सध्या या किल्ल्यात तलाठी कचेरी, पोलीस चौकी आणि पोर्टेबल तुरुंग आहे.. किल्ल्याचा तट जरी मजबूत असला तरी दुमजली बुरुज ढासळला आहे.. तटबंदी च्या आतून बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.. इथे पोहोचलो तरी भल्या मोठ्या वृक्षवल्लीने हा किल्ला वेढल्याचे दिसले.. चिंच, वड आणि कडूनिंब या झाडांच्या भाऊगर्दीने इथे एक थंडावा निर्माण झाला आहे.. किल्ल्यात प्रवेश केला आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला.. कांडी करकोचा, खंड्याचे दर्शन घडले.. पुढे पोलीस चौकी जवळ च्या झाडाखाली उभं राहिलो तर घुबडांचा घुत्कार ऐकू आला.. मान वर करून पहिले तर दोन घुबडे पाहायला मिळाली.. त्यातलं एक घुबड शिंघम कडे डोळे वटारून ‘टकमका टकमका’ पाहत होतं.. 
किल्ल्याविषयी सांगायचं झालं तर बिदरच्या राजाने हा किल्ला बांधल्याचे इतिहासकार सांगतात.. एकूण सात बुरुजांच्या ह्या किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे.. सध्या या किल्ल्यातील बालेकिल्ला म्हणजे चौबुर्जी.. हा चार बुरुजांचा कोट तेवढा धडधाकट असा उभा आहे.. किल्ल्यावर फेरफटका मारला तर काही पोर्टेबल तुरुंगासमोरील मोकळ्या जागेत काही जैन देवतांच्या मूर्ती आणि एक विश्वेश्वराचा मुखवटा नजरेस पडतो..

माचनूर किल्ला : मंगळवेढा किल्ला आणि त्यात अचानक, अनपेक्षित घडलेलं पक्षी निरीक्षण (Bird Warching) उरकून माचनूर कडे निघालो.. मंगळवेढा ते माचनूर असा १०-१२ कि.मी. चा प्रवास उरकून सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील रस्त्याने पुढे निघालो.. माचनूर च्या किल्ल्या जवळील गावात लाजवंती पार्क केली आणि तडक किल्ल्याकडे निघालो.. हागणदारी तून वाट काढत.. किल्ल्याच्या मुख्य द्वाराशी येवून पोहोचलो.. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा एक आडवी भिंत घालून लपवलेला आहे.. तटबंदी फारशी उंच नाही जेमतेम १५-२० फुट पण अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.. किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आत प्रवेश केला.. आणि पहिले तर क्रिकेटचे मैदान.. गावकऱ्यांनी किल्ल्यात एक अवशेष शिल्लक ठेवला नाही.. नुसते वाड्याचे चौथरे नजरेस पडतात..

जेंव्हा औरंगजेबाने आदिलशाही नेस्तनाबूत करण्याची मोहीम उघडली त्यावेळी या किल्ल्यावर मुक्काम केल्याचे इतिहासकार सांगतात.. दरवाजातून समोर पहिले असता चंद्रभागा नदीचे दर्शन होते तिकडे डाव्या कोपरयात.. एक पांढऱ्या रंगाने रंगवलेली एक मंदिरासारखी वास्तू नजरेस पडते.. तिकडे निघालो.. या वास्तूच्या मागच्या बाजूस भीमा नदी वाहते आणि डावीकडे सिद्धेश्वर मंदिराचा घाट आणि पाण्यात एखाद्या बेटासारखे दिसणारे शिवमंदिर नजरेस पडते.. माचनूर किल्ल्याला दोन बाजुनी नदीच्या पात्राने वेढले आहे.. भीमा नदी या किल्ल्याला वळसा मारूनच पुढे जाते.. दोन बाजूंना नैसर्गिक संरक्षण असल्याने या किल्ल्याचे स्थान भौगोलिक दृष्ट्या उत्तम आहे..  किल्ल्याची नदीकाठची तटबंदी पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे.. किल्ल्याचा पसारा तसा बऱ्यापैकी मोठा आहे.. पण ‘बाहेरून चकचकाट आणि आत भुइसपाट’ अशी अवस्था आज या किल्ल्याची झाली आहे..

इथे पोहोचलो तो आभाळ झाकोळलं होतं.. आणि नदीचा परसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेलं होता.. इथे सिंघम ला पाण्याला समांतर उडणाऱ्या काही टिटव्या, बाभळीच्या झाडावर बसलेला खंड्या.. देसी हमिंग बर्ड चे दर्शन झाले.. तिकडे खाली एका खोपाड्यात.. काहीतरी जाताना दिसलं.. पण ते उदमांजर होतं का घोरपड की मुंगुस यावर कुणाचंच एकमत झालं नाही .. शेवटी काहीतरी दिसलं असं डिक्लेअर करून पुन्हा मुख्य दरवाजाशी येवून पोहोचलो.. दरवाजासमोर जंगी फोटोसेशन उरकून सिद्धेश्वर मंदिराकडे निघालो..

माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर आणि बेगमपूर दर्गा
माचनूर चे सिद्धेश्वर मंदिर हेमाडपंती असून त्याला चार बाजूने कोट चढविला आहे.. या शिवाय नदीकडे उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांचा घाट बांधला आहे.. या पायऱ्या उतरलं कि आपण.. बेटासारख्या दिसणाऱ्या शिवमंदिराच्या पुढ्यात येवून पोहोचतो.. या घाटाच्या कठड्याकडे निट पाहिल्यास त्यावर व्याघ्र प्रतिमा कोरल्याचे दिसून येते.. सिद्धेश्वर मंदिरातील नंदी हा देखील बघण्यासारखा आहे.. शंकराकडे तिरपी नजर टाकणारा पितळेची शिंगे असलेला हा नंदी खासंच आहे.. सिद्धेश्वराचे दर्शन घेवून सोलापूरकडे निघालो.. इथून जवळच बेगमपूर चा दर्गा आहे.. बेगमपूर इथे नदी काठी औरंगजेबाच्या एका मुलीचे थडगे आहे.. यावर बरेच कोरीव काम केल्याचे दिसते..  पुरातत्व खात्याने सध्या इथली इमारत संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे..

सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर आणि तलाव
सोलापुरात पोहोचलो आणि चंद्रकांत अन्नाचा चेहरा खुलला.. अन्नाने गाडी सिद्धेश्वर मंदिराच्या पुढ्यात उभी केली.. सिद्धेश्वर मंदिर हे इथल्या भागात प्रसिद्ध आहे.. मंदिराच्या परिसरात बरीच लहान-मोठी शिवलिंग आहेत.. सिद्धेश्वर / सिद्धराम / सिद्धरामेश्वर हे १२ व्या शतकातील सोनल्ल्गी / सोलापूरचे राजे.. त्यांनी लिंगायत धर्माचा प्रसार केला आणि ते एक उत्कृष्ट अध्यात्मिक कवी होते.. त्यांनी लिहिलेली अध्यात्मिक वचने ही अजूनही नित्यनेमाने वाचली जातात.. कोणी एक तरुणी सिद्धराम यांच्या संतवाणीने भारून गेली होती आणि तिने सिद्धराम यांच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली.. पण सिद्धरामांनी त्यास नम्रपणे नकार दिला.. पण त्याच्या योगदंडाशी तिला लग्न करण्याची परवानगी त्यांनी दिली.. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी इथे गड्ड्याची यात्रा भरते.. लाखो भाविक सिद्धेश्वराच्या दर्शनास दूरदुरून येतात. इथला सिद्धेश्वर तलाव हा बाराव्या शतकात सिद्धरामेश्वर आणि त्यांच्या अनुयायांनी बांधल्याचे इतिहासकार सांगतात..

सोलापूरचा किल्ला : सिद्धेश्वर तलावाच्या काठावर लहानशा टेकडावर.. सोलापूरचा किल्ला आहे.. हा किल्ला १६ व्या शतकात अली आदिलशाहने बांधला असे म्हणतात.. पुढे मराठ्यांनी हा किल्ला जिकून घेतला.. किल्ल्याच्या तीन बाजूस खंदक आहेत.. किल्ल्याला निश्चित असा काही आकार नाही.. पण किल्ल्याला साधारण २३ एक बुरुज आहेत.. यातील बरेच बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत.. किल्ल्याच्या आतील भागात तालीम, शंकराचे मंदिर, दर्गा, नरहरी मंदिर आणि पुरातन लेणी आहेत.. या शिवाय सिद्धेश्वर मंदिराकडील बाजूस तटबंदी मध्ये एक विहीर आहे.. किल्ल्याच्या मुख्य दरवाजास रेवणी दरवाजा असे म्हणतात.. या शिवाय किल्ल्याला मधला (शहर) दरवाजा आणि खाती दरवाजा असे आणखी दोन दरवाजे आहेत.. किल्ल्याचा विस्तार प्रचंड असून सध्या किल्ल्यातील काही भागात जनतेसाठी बाग तयार करण्यात आली आहे.. सध्या या बागेत इंग्रजकालीन तोफा नजरेस पडतात..

मुख्य दरवाजातून डावीकडे गेल्यास मधला दरवाजा नजरेस पडतो.. या दरवाजावर दुमजली इमारत असून लगतच्या दोन भक्कम बुरुजांनी या दरवाजाला अभेद्य केले आहे.. दरवाजाच्या कमानी च्या दोन्ही बाजूस व्याघ्रशिल्प दिसतात.. बाहेर काही कोरीव शिल्पे इतस्तः पडल्याचे दिसून आले.. दरवाजातून पुन्हा आत जावून डावीकडे खाली मंदिराकडे उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.. हे हेमाडपंती धाटणीचे मंदिर सध्या भग्नावस्थेत आहे.. तिथून पुन्हा पलीकडच्या बाजूस पायऱ्या चढून जाताच उजवीकडे एक पुष्कळ कोरीव खांब असलेला एक मंडप आहे.. हे बहुदा मंदिर असावे.. पण मंदिरातील उत्सवमूर्ती सध्या गायब झाल्याचे दिसते.. इथून तटबंदी कडे चालत गेल्यास तटबंदी मध्ये दडलेली एक विहीर दिसते.. तिथे कुण्या एके काळी पद्मावती दर्गो पाटील यांनी आत्मसमर्पण केल्याचे लिहिले आहे.. इथे अजूनही चित्र विचित्र आवाज ऐकू येतात असे म्हणतात.. या विहिरीच्या शेजारील दगडी पायऱ्यांनी बुरुजावर गेल्यास.. नागमोडी दुहेरी तटबंदी आणि मागे सिद्धेश्वर तलाव आणि तळ्यातले मंदिर फार सुरेख दिसते..

गडाचा फेरफटका मारून तासभरात पुन्हा मुख्य दरवाजापाशी परतता येते.. मुख्य दरवाजाच्या अलीकडे उजव्या बाजूस आखाडा आहे.. तिकडे आत जावं म्हटलं तर तिथल्या आखाड्यात राहणाऱ्या परिवारात राहणाऱ्या बाई एकदम खेकसल्याच.. “हा आमचा प्रायव्हेट आखाडा आहे, आत जाता येणार नाही”.. मग आखाड्याचा नाद सोडून दिला.. सोलापूर मध्ये माशाळकर आणि माशाळकर FAMILY चा निरोप घेवून अक्कलकोट कडे निघालो.. रात्री दहाच्या सुमारास इथे पोहोचलो.. फारशी गर्दी नव्हती.. त्यामुळे झटपट देवदर्शन उरकलं आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला..

एका दिवसाची भटकंती तशी छोटीशी पण महाराष्ट्रातील गडकोटांची नव्याने ओळख करून देणारी अशी रॉयल भटकंती ठरली.. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बांधलेले हे दुर्लक्षित पण भरभक्कम भुईकोट पाहुन.. गतकाळचा वैभवशाली आणि सशक्त महाराष्ट्र कसा असेल याची प्रचीती येते.. सध्या महाराष्ट्रात जे काय चाललंय त्याला कोणते राज्य म्हणावे हे समजत नाही पण हे स्वराज्य नक्कीच नाही.. हे भूसम्राट, सिंचन सम्राट, साखरसम्राट आणि शिक्षण सम्राटांचे राज्य म्हणावे लागेल.. छत्रपती शिवाजी राजे गेले आणि हा महाराष्ट्र या वतनदारांच्या घशात गेला.. नेत्यांनी नेत्यांच्या भल्यासाठी निर्मिलेलं लबाड राष्ट्र अशी या सध्याच्या महाराष्ट्राची स्थिती झाली आहे..

असो.. आम्हा भटक्या मंडळींचा महाराष्ट्र जरा वेगळा आहे.. दऱ्या-खोऱ्यात वसलेला.. नदीकाठच्या मंदिरातील देवाधीदेवांच्या वास्तव्याने पावन झालेला, भरभक्कम गडकोट आणि गढ्या यांनी सुरक्षित असा गतकाळचा महाराष्ट्र.. चला तर मग येताय ना.. खरा महाराष्ट्र पाहायला..!!

माधव कुलकर्णी २०१३

2 Comments Add yours

  1. मी इतकी वर्षे पंढरपूर ला जातो आहे पण हा पिलीव चा किल्ला बघितला नाही … आता नक्की वेळ काढून वाट वाकडी करून जाऊन येईन … महेश ट्रेक बुक इंडिया http://www.trekbook.in

    Like

  2. Unknown says:

    खुप छान माहीती आहे धन्यवाद

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s