वाटाड्या मार्ग क्र. १ : पुणे – (२२५ कि.मी.) – कोल्हापूर – (४५ कि.मी.) – गारगोटी – (४ कि.मी.) – पुष्पनगर – (८ कि.मी.) – किल्ले भूदरगड
वाटाड्या मार्ग क्र. २: पुणे – (२२५ कि.मी.) – कोल्हापूर – (४५ कि.मी.) – गारगोटी – (२५ कि.मी.) – पाटगाव – (१० कि.मी.) – भटवाडी – (१०/१२ कि.मी.) – चिक्केवाडी – (१ कि.मी.) किल्ले रांगणा..
जसा पावसाचा जोर वाढू लागला.. तसं शहरी पिंजऱ्यातील बंदिस्त मन.. दूरच्या रानाकडे धावू लागलं.. बाहेर कॉंक्रीटच्या जंगलातील.. खिडक्यांच्या तावदानावरून कोसळणारा हतबल.. म्हणजेच बेबस.. पाऊस बघताना.. मनात आठवणीची भाऊगर्दी होते.. मागच्या वर्षी या टायमाला आपण तमुक गडावर काय कल्ला केला होता.. आज यार आपण अमुक गडावर असायला पाहिजे होतं.. तर काय धमाल आली असती.. अशीच.. जर-तर ची फुकी जळमटे मनाला फारच पिडायला लागली आणि ठरवलं यंदाचा मॉन्सून ट्रेक कोल्हापुरात काढायचा.. दूरच्या रानात ठाण मांडून बसलेला गडकोट.. रांगणा.. कोल्हापुर जिल्ह्यातील गारगोटी जवळचा रांगणा.. किल्ले रांगणा..
“आले भटक्याच्या मना.. तिथे कुणाचे चालेना”.. निघालो.. गाडीच्या टपावर वाजणारा सर सर ताशांचा आवाज.. आणि समोरच्या काचेतून थेट अंगावर तिरपा येणारा 3-D पाऊस.. असं दुहेरी सुख ‘याची देही याची डोळा’ अनुभवत पुण्याहून कोल्हापूर मार्गे गारगोटीकडे निघालो.. एन-एच ४ वर आमच्या स्वागतासाठी पावसाने खुद्द जातीने.. ठिकठिकाणी सरींचे तोरण बांधून ठेवले होते.. इकडे.. धूळ माखल्या वाटांवर.. हिरवे पागोटे डोईवर घेवून वृक्षवल्लरी आगंतुकाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या, तर तिकडे धुक्याचा श्वेतसुंदर मंच या भटक-भुंग्यांचे स्वागत करण्यास उतावीळ झाला होता.. वळणा-वळणावर रंग बदलणारा पाऊस.. एखाद्या बहुरुप्यासारखा विविध रूपे घेवून त्या धुक्याच्या मंचावर एन्ट्री घेत राहिला.. कधी मुसळधार.. तर कधी रिमझिम.. कधी सर-सर.. तर कधी पीर-पीर.. कधी धो-धो.. तर कधी.. आडवा-तिडवा.. तर कधी टीप-टीप !! पण तुम्ही म्हणाल अशी पावसाची विविध रूपे ओळखायची तरी कशी.. कशी म्हणजे..? अनुभूतीतून..!!
“समजा तुम्ही चकाचक तयार होवून टकाटक मॉर्निंग वॉकला निघालात आणि अचानक.. पावसाला सुरुवात झाली.. समोर एक झाड दिसतंय.. पण तुम्ही तिथे धावत-पळत पोहोचण्याआधी पावसाने तुम्हाला नखशिखांत.. आंतरबाह्य चिंब भिजवलं तर तो मुसळधार पाऊस..”
“एखाद्या निवांत संध्याकाळी.. नुकत्याच जुळलेल्या.. कोवळ्या प्रेमाच्या हाकेला.. ओ.. देवून तुम्ही तुमच्या रांझणा अर्थात प्रेयसीला.. मॉन्सून राइडला.. डबलसीट जाताना.. हळूच तिच्या नकळत.. तुम्ही आडोसा शोधत असताना.. पडलेला पाऊस म्हणजे रिमझिम पाऊस..”
“चांगला आठवडाभर गाजलेला ट्रेक एक दिवसांवर येवून ठेपावा.. आणि मांजर आडवी जावी तशी.. बायकोची आप्त इष्ट मंडळी.. ट्रेकच्या आधल्या दिवशी नेमकी दारात उगवावी. कपाळाला हात मारून.. मनोरंजनासाठी FM लावावा आणि तिथेही .. ‘बना के क्यू उजाडा रे.. ओ नसिबा.. उपरवाले.. उपरवाले’.. असं गाणं गात लताबाई… किलोकिलोने जखमेवर मीठ चोळत असताना.. खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस हा पीर-पीर पाऊस म्हटला पाहिजे..”
“फ्राय-डे नाईट च्या जलसा महोत्सवात लाईट-लाईट.. घेवून येताना.. १२०-३०० च्या किकने गरगरणारे डोकं तालावर ठेवून.. बाईक आणि स्वत:ला सांभाळत घरी परतताना.. अचानक.. वरून थेट कोसळणारा आणि डोळ्यासमोर डिस्को करीत.. बेधुंद नाचणारा पाऊस.. हा आडवा-तिडवा पाऊस” असो.. पावसाची विविध रूपे अनुभवत गारगोटी ला पोहोचलो..
भूदरगड किल्ला (मु. पो. गारगोटी, कोल्हापूर):
गारगोटी ST स्थानकावरील टणक कठीण कवचधारी वडा-पाव खावून भूदरगड चा रस्ता विचारला.. ‘पुढं एक मशाल चौक आहे.. त्या तिथं डावीकड्नं जावा.. मग पुढं पुष्पनगर आणि तिथं डावीकडं गडाव रस्ता गेलाय..’ अशी जुजबी माहिती मिळताच.. भूदरगडाचा रस्ता धरला.. गारगोटी पासून १० किमी अंतरावर भूदरगड आहे.. दिडशहाण्यांनी तटबंदी फोडून थेट गडावर जाण्यासाठी सोय करून ठेवली आहे त्यामुळे कारमध्ये बसून थेट गडमाथा गाठला.. छायाचित्रकार मंडळी ‘फ्रेम कि तलाश में’ निघून गेले आणि यंदाचा नवा भिडू अमोद आणि मी गडावरचे इतर अवशेष पाहण्यास निघालो.. तटबंदी मधून आत येताच उत्तरेकडे दूर अंबाबाई मंदिर आणि उंच दीपमाळ लक्ष वेधून घेते.. तिकडे जाताच.. अर्धेअधिक मंदिर जमिनीखाली असल्याचे दिसले.. मंदिरासमोर तटबंदी लगत एक दीपमाळ आहे.. सध्या त्याशेजारी एक इंग्रजकालीन तोफ पाहायला मिळते.. मंदिराशेजारी उजवीकडे (सध्या इथे मोबाईल टॉवर आहे) आणखी दोन पोर्टेबल दीपमाळा आणि एक वृंदावन नजरेस पडते.. मुख्य दीपमाळेपासून डावीकडे नजर फेकता.. इंग्रजी अक्षर ‘सी / C’ आकारात वळणारी आकर्षक तटबंदी नजरेस पडते.. इथे तटावर चढून जाण्यासाठी तीन ठिकाणी पायऱ्या आहेत.. तटावर चढून उजवीकडे समोर पाहताच भूदरगडाची लांबच्या लांब तटबंदी आणि खाली गर्द वनराई दिसते.. इथे पुन्हा खाली उतरताच .. एक मातीने झाकलेली कमान तटबंदीत दडून बसल्याचे दिसते.. हा दरवाजा असावा.. भूदरगडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथले तलाव.. गडावर दोन भव्य तलाव आहेत.. आणि गडाचा घेरा तसा विस्तीर्ण आहे.. पण गडावर अवशेष त्यामानाने फार कमी आहेत.. त्यामुळे भूदरगडाला धावती भेट देवून रांगणा किल्ल्याकडे निघालो..
रांगणा किल्ला
वाटेत एके ठिकाणी ‘कोल्हापुरी सॉकर’ चा खेळ पाहताना समोर इंद्रधनुष्याची सतरंगी कमान अवतरली.. मागे भुदरगड समोर सतरंगी कमान असं अनवट निसर्गचित्र पाहून पुढे पाटगाव कडे निघालो.. पाटगावच्या अलीकडे एके ठिकाणी भर रस्त्यात एक पिवळा हत्ती (क्रेन) आडवा घालून.. रस्त्याच्या खाली कलंडलेला डुरक्या डंपर (ट्रक) पुन्हा वर काढण्याचा कार्यक्रम सुरु होता.. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.. साधारण ४ वाजले असावेत.. हायड्रोलिक आर्मने डंपर बाहेर काढण्याची क्रेनची कसरत सुरु होती.. पण चिखलमय परिस्थिती आणि रुतलेला डंपर यामुळे क्रेनची चाके जाग्यावर भिरभिरू लागली.. अचानक.. ठप्प आवाज झाला.. फुगा फुटावा तसा क्रेनचा टायर फुटला आणि क्रेनच्या पिटातून धूराचा लोट निघाला.. डंपर बाहेर खेचणारा क्रेनचा आर्म निपचित होवून खाली पडला.. हलेना ना डुलेना.. आता झाली का पंचाईत..!! हा घोटाळा आता कसा निस्तरणार याचा क्रेन चालक आणि मालक विचार करू लागले.. निर्ढावलेले स्कोर्पिओ आणि बोलेरो चालक देखिल.. निवांत हातावर हात धरून बसले.. तिथे माझ्या यशवंतीची काय कथा !! आता तंबू इथेच टाकावा लागणार अशी चिन्हं दिसू लागली.. पण क्रेनचालकाने पुन्हा धीराने क्रेन चालू केली आणि निपचित पडलेला क्रेन-आर्म हालतोय का? ते पहिले.. पण व्यर्थ.. शेवटी चालकाने युक्ती लढवून जागीच खिळलेला क्रेन-आर्म मोकळा केला आणि या रास्ता-रोको समारंभाच्या अध्यक्ष स्थानी असलेला पिवळा हत्ती रस्त्याच्या कडेला उभा केला.. अडथळा दूर झाला आणि यशवंती पाटगाव कडे पुन्हा धावू लागली..
पाटगाव गाठलं आणि रांगण्याला कसं जायचं याची चौकशी केली.. “पुढं धरन लागल.. तिथनं भटवाडीला जायचं आणि तिथनं पुढे रांगणा हाये..” असं GPS दादांनी सांगताच.. ‘चलो भटवाडी’ नारा देत साधारण ५ च्या सुमारास भटवाडीत दाखल झालो.. इथे पोहोचलो आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली.. भर पावसात पुढचं नियोजन सुरु झालं.. काय होईल कस्स होईल.. !! चार इंजिनिअर जेंव्हा नियोजन करतात तेंव्हा सगळ्याचं एकमत होणं केवळ अशक्य आहे त्यामुळे.. गंपू आणि सुबोध काय ठरवतात हे पाहू लागलो.. गंपू ला गडावर जायचं होतं आणि सुबोधला शाळेत राहायचं होतं.. दोघंही तिसरं मत कुणाच्या बाजूने पडतंय याची वाट पाहू लागले.. शेवटी रात्री गडावर जाण्याच्या कल्पनेला नारळ देवून .. शाळेत मुक्काम करण्याला कौल देण्यात आला.. शाळेत रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु केली.. सुबोधने यंदा एक नवीन आधुनिक प्रकारचा आयुर्वेदिक स्टोव्ह आणला होता.. त्यात इंधन म्हणून कापूरयुक्त इंधन-वड्या.. २ इंधन वडीत चहा आणि ५ इंधन वड्यात ४ लोकांसाठी खिचडी तयार झाली.. मग कोंबडीला किमान २० वड्या तरी लागतील असा हिशोब तयार झाला.. पण पावसाळी वातावरणात उपयुक्त अशा या आयुर्वेदिक स्टोव्ह ने जेवणाची फक्कड सोय लावली.. आयुर्वेदिक स्टोव्ह वर तयार झालेले आयुर्वेदिक जेवण करून टेंट मध्ये ताणून दिली.. पहाटे सातला जाग आली आणि तातडीने आवराआवर करून तडक रांगणा किल्ल्याकडे निघालो.. भटवाडीत यशवंतीला …. घरासमोरील अंगणात उभी करून.. चिक्केवाडी कडे निघालो.. गारगोटी-पाटगाव हे २५ किमी अंतर- पुढे भटवाडी १० किमी.. असं ३५ किमी अंतर कापून भटवाडी मध्ये पोहोचता येतं इथून जवळच चिक्केवाडी..
चिक्केवाडी हे रांगणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव.. भटवाडी ते चिक्कूवाडी (चिक्केवाडी चे लाडाचे नाव).. १२ किमी चे अंतर.. घाट माथ्याचा प्रवास.. राधानगरी संरक्षित अभयारण्याच्या Buffer Zone मधला प्रवास.. शेतीची पावसाळी कामे सुरु असल्याने वाटाड्या म्हणून येण्यास कुणी तयार होईना.. मग एका काकांना विचारलं तर.. चिक्केवाडी पर्यंत कच्चा गाडी रस्ता आहे आणि तिथून १५ मिनिटात रांगणा.. घाट माथ्यावरून रांगणा किल्ला तसा फार उंचावर नाही.. रांगणा खोऱ्यातील डोंगर रांगांपासून अलिप्त झालेल्या एका डोंगरावर हा किल्ला आहे..
चिक्कूवाडीकडे निघालो.. वाटेत आधी एक ओढा आडवा आला.. तिकडे गंपू आणि सुबोध फोटोग्राफी मध्ये गुंग होते.. अधून मधून पावसाची सर येवून जायची आणि बदड बदड बदडून जायची.. ३-४ किमी अंतरावर एक मोठा ओढा लागला.. पोर्टेबल नदीच जणू.. “मग अल्याड चे आदीमानव.. मानवी साखळी धरून.. पल्याड गेले..” इथून पुढे जाताना orchid फुलांच्या रोपांचे ताटवे लागले.. नजर फेकावे तिकडे orchid च orchid.. ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये इथे orchid चा जलसा महोत्सव होत असावा.. नुकत्याच काही रोपट्यांना रंगबिरंगी फुलं उमलल्याचे दिसले.. हिरवळीला छेदत जाणारा चिखलमय रस्ता.. रस्त्याच्या मधोमध वाफ्यासारखी भासणारी हिरवी रांग.. आणि धुक्याची लहरत जाणारी दुलई.. अधूनमधून डोकावणारा ‘दिव्य प्रकाश’.. अशा प्रसन्न वातावरणात पावलं पुढं पडत होती.. कधी देवराई तून तर कधी गर्द हिरव्या गोल्फ कोर्स मधून पुढे जात राहिलो.. पुढे एका ठिकाणी गाडीवाट उजवीकडून U-turn मारून पुन्हा समोर दिसू लागली.. पाहिलं तर पठाराला दोन भागात विभागणारा एक ओढा पुढ्यात दिसला.. इथे बऱ्यापैकी पठार आहे.. पठाराच्या चारही बाजूंनी गर्द झाडी आणि मधोमध आडवा ओढा.. पल्याड गेलो आणि एक किमी चा गाडी रस्त्याची पायपीट वाचवली.. मग ओढा डावीकडे ठेवत पुढे निघालो.. चिक्कूवाडी येण्याची चिन्हं काही दिसेनात.. कुणाला विचारावं तर चार आदिमानवांशिवाय तिथं कुणी चिटपाखरू हि नव्हतं.. पण ही गाडीवाट चुकण्याचा काही प्रश्नच नव्हता.. थोडं पुढे गेलो आणखी एक ओढ लागला.. आणि देवराई.. सोबतच्या ‘मेड इन मुंबई’ छत्री मुळे कॅमेरामन सुबोधची चांगलीच सोय झाली.. लाखांचा कॅमेरा आणि तोळामासा जीव सारं त्या छत्री सामावून चालत राहिलो.. पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच होता.. पण अजून मुसळधार म्हणावं अशी सर नव्हती..
साधारण बाराच्या ठोक्याला एक बोर्ड दिसला रांगणा किल्ला आणि उजवीकडे बाण दाखविला होता.. गाडीवाट डावीकडे निघाली.. मग उजवीकडे निघालो.. इथे समोर दिसणाऱ्या झाडीत दगडांच्या राशी आणि आडवा कातळी दगडांचा उंबरठा आहे.. हा गडाचा पहिला दरवाजा.. इथून पुढे जाताच आपण दाट जंगलातून खाली उतरू लागतो.. साधारण १५ मिनिटांची उतरण पार करताच भग्न भिंतीचे अवशेष नजरेस पडतात आणि ओबडधोबड दगडी पायऱ्या.. इथून उजवीकडे जाताच एक मंदिर दिसते.. आत समोर एक जुनाट तुळशी वृंदावन आहे.. इथे पोहोचलो आणि रांगणा किल्ला काही दिसेना.. उजवीकडच्या झाडीत लपलाय कि काय अशी शंका यायला लागली पण पायवाट डावीकडे निघाली होती.. म्हणजे अलीकडे दाट जंगलाने वेढलेला डोंगर समोर जमिनीचा रुंद पट्टा पुढचं काही दिसत नव्हतं पहावं तिकडे घनगर्द धुके आणि फक्त धुके.. अगदी किरकोळ.. लहानशा टेकाडाला डावीकडे ठेवून पुढे निघालो आणि पुन्हा दाट धुके.. किल्ला कुठाय? कुठाय किल्ला.. कुठाय किल्ला.. काही कळेना.. इतक्यात निसर्ग देवतेने धुक्याचे पदर हळू हळू उलगडायला सुरुवात केली.. आणि समोर रांगणा किल्ल्याचा बाह्य बुरुज.. आडवी तटबंदी आणि कातळ भिंत समोर दिसायला लागली.. तटबंदी वर हिरव्या गवताची नक्षी.. पण या तटबंदी व्यतिरिक्त आजूबाजूला फक्त दाट धुके.. पुढे निघालो.. आता डावीकडे दरी दिसू लागली आणि उजवीकडे रांगणा किल्याची १०० एक फुटाची कातळभिंत आणि त्यावरची २०-३० फुटांची तटबंदी दृष्टीक्षेपात आली.. १०० एक पावलं पुढे गेल्यावर रांगणा किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसला.. “याच साठी.. पार केला होता हा.. श्वासांचा घाट”.. किल्ले रांगणा.. युरेका.. युरेका.. सापडला.. सापडला.. दरवाजा सापडला तरी गंपू काहीसा नाराज होता.. धुक्यामुळे त्याला नेमकी फ्रेम सापडत नव्हती..
मुख्य दरवाजातून आत गेल्यावर दुहेरी तटबंदी आणि कातळ कोरीव पायऱ्या चढून दुसऱ्या दरवाजाशी येवून पोहोचलो.. इथे डावीकडे भक्कम तटबंदी आहे आणि दरवाजाच्या कमानीवर मध्यभागी एक शिवलिंग कोरल्याचे दिसले.. बाबा भोलेनाथांचे आशीर्वाद घेवून.. गडावर प्रवेश केला.. इथे एक निंबाळकरांचा वाडा आहे आणि आत औरस-चौरस बारव (दगडांनी बांधलेली विहीर).. सध्या या वाड्याचा एक कोपरा आणि दरवाजाची कमान तेवढी शिल्लक आहे ती पाहून पुढे निघालो तर आणखी एक दरवाजा.. हा बालेकिल्ल्याचा दरवाजा.. दोन्ही बाजूंना भक्कम तटबंदी.. उजवीकडे वर जाण्यासाठी पायऱ्या.. आणि तटबंदी.. थोडं पुढे खोल दरी.. हा दरवाजा अगदी उजवीकडच्या भागात बांधला आहे.. आत प्रवेश केला तरी धुक्याचे पदर अजून झाकलेले असे होते.. रांगणाई देवीच्या मंदिराकडे निघालो.. इथे एक इंग्राची अक्षर Y सारखी दिसणारी पायवाट समोर उभी होती.. आता लेफ्ट का राईट..!! बप्पा लेफ्ट म्हणले आणि लेफ्ट ला निघालो.. १५ मिनिटे चालून मंदिराचा काही सुगावा लागेना पुन्हा माघारी फिरलो.. उजवीकडे निघालो आणि धुक्याचे पदर उलगडले.. इथे एक भव्य दिव्या असा जंक्शन तलाव दिसू लागला.. तिकडे वळालो.. आता इथेच शिदोरी उघडायचे ठरले.. “निसर्गाच्या रंगमंचावर.. धुक्याचे शुभ्र तलम पदर उलगडून.. गडावरील एक-एक वास्तू नजरेसमोर अवतरत होती.. एखाद्या कसलेल्या कलाकारासारखी एन्ट्री घेत..!!”
पाऊस.. मुसळधार पाऊस.. कधी डोळ्यातून ओसंडणारा
कधी ओढ्यातून वाहणारा.. कधी हृदयातून.. पाझरणारा..
वाऱ्यामागे सैरावैरा.. धावणारा.. थेंबांचे बाण.. सोडणारा
पाऊस.. रिमझिम पाऊस.. कधी. आठवणीत.. राहणारा
जणू.. रेशीमधागे विणणारा.. इंद्रधनुचा.. सखा.. सोयरा
तो.. युगायुगांचा.. सन्यासी. भणंग.. भटकत.. राहणारा
पाऊस… बेभान.. पाऊस.. कधी.. मातीत.. मिसळणारा
कधी लाट होवून उसळणारा.. दोन श्वास.. घुसळणारा
बेलाग शिखरावर फेर धरणारा.. तो मनमौजी.. न्यारा
पाऊस.. सखासोबती पाऊस.. जुन्या आठवांचा सांगाती
जशी.. चिंब.. काळी माती.. त्यात.. अंकुरले.. मोती..
खुळ्या.. पाखरांचे… थवे.. चिंब.. पावसात.. न्हाती..
मग तलावाच्या उजवीकडे.. एका कड्यावर शिदोऱ्या उघडल्या आणि पहिला घास घेणार.. इतक्यात गंपू ओरडला.. ओपन झालं ओपन झालं.. अरे काय ओपन झालं.. अरे तिकडे बघ.. वळून पाहिलं तर समोर साक्षात्कार व्हावा तसा सह्याद्रीतील रांगणा खोऱ्याचे दिव्य दर्शन घडले.. सुबोधने हातातला घास तसाच सोडून कॅमेरा सरसावला आणि दिव्यत्वाची थेट प्रचिती कॅमेराबंद करून टाकली.. उलगडलेल्या धुक्यातून डोकावणाऱ्या दिव्यप्रकाशात सारं काही धुतल्या तांदळासारखं स्वच्छ दिसू.. बालेकिल्ल्या लगतची तटबंदी.. रांगणा किल्ल्याला जोडणारा.. जमिनीचा पट्टा.. दरवाजाला जोडून असलेला कडा .. त्यावरची तटबंदी.. असे मेगा निसर्गचित्र डोळ्यात साठवून घेतले.. आणि उदरभरण सुरु केले ठेपले आणि आंबट चिंबट लोणचे.. आणि गुळपोळी.. बस्स.. हेच काय ते.. सुख की काय म्हणतात त्याला.. तेच सुख..
अशा बेधुंद वातावरणाची सय मनावर आली आणि मन अंतर्मुख झालं अगदी एखाद्या सन्यस्तासारखं.. सुख-दु:खाच्या अनुभूतींच्या पल्याड गेलेलं मन.. तिथं कोपऱ्यात ध्यानस्थ होवून.. ही रानातली धुंद अनुभवत बसलं होतं.. त्याची तंद्री मोडून म्हटलं.. चलायचं का परत.. !!
अशा बेधुंद वातावरणाची सय मनावर आली आणि मन अंतर्मुख झालं अगदी एखाद्या सन्यस्तासारखं.. सुख-दु:खाच्या अनुभूतींच्या पल्याड गेलेलं मन.. तिथं कोपऱ्यात ध्यानस्थ होवून.. ही रानातली धुंद अनुभवत बसलं होतं.. त्याची तंद्री मोडून म्हटलं.. चलायचं का परत.. !!
परतीच्या प्रवास सुरु केला.. पुन्हा मुख्य दरवाजातून अरुंद पठारावर आलो.. आणि इथे रांगणा खोऱ्याची उजवी बाजू पहायला मिळाली.. इथून रांगणा किल्ल्याच्या कातळ भिंतीकडे आणि लगतच्या डावीकडच्या कातळ कड्याकडे पाहताना.. रांगणा हा जमिनीवर बसून डरकाळी फोडणाऱ्या सिंहासारखा दिसतो..!! किल्ल्याकडे पाठ करून उजवीकडे पाहिलं तर सह्याद्रीच्या कपाऱ्यातून कोसळणारे जलप्रपात.. आणि मागे रांगण्याच्या अंगाखांद्यावर असे धबधबे कोसळत असल्याचे एक मनोहारी निसर्गचित्र दिसले.. मग काय इतका वेळ मुका झालेला गंपूचा कॅमेरा वाचाळ झाला आणि भराभर छायाचित्रं टिपू लागला.. आणि गंपू हसला..!! परतीचा प्रवास सुरु झाला.. पुण्याला जाण्याची घाई असल्याने.. न थांबता.. झपाझप चालू लागलो.. चिक्कूवाडी फाटा पार केला आणि काळ्याभोर ढगांनी आकाशाचा ताबा घेतला.. आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली.. त्यात वादळी वारा सुटला.. रांगणा गडावर पार उध्वस्त झालेली ‘मेड इन मुंबई’ छत्री सावरून परतीचा प्रवास सुरु झाला.. अधून मधून डोकावणारा दिव्य प्रकाश.. यंदा सोबतीला आला होता.. त्यात येताना स्वच्छ वाटणाऱ्या गाडीवाटेचा चक्क ओढा झाला होता.. आणि वाटेतल्या पोर्टेबल नदीची मेगा नदी.. पाण्याला ओढही होती.. इथे मेगा नदीत सार्वजनिक अभ्यंग स्नान कार्यक्रम उरकून.. ५ च्या ठोक्याला.. भटवाडी गाठलं..
या अशा अनपेक्षित रित्या घडलेल्या आडवाटेवरच्या पावसाळी भटकंतीने.. आयुष्यातला एक दिव्य दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला.. इंद्रधनुष्य.. दिव्य प्रकाश.. आयुर्वेदिक स्टोव्ह वरची आयुर्वेदिक खिचडी.. मु. पो. चिक्कूवाडी.. आणि ‘राकट.. कणखर.. बेलाग.. भव्य.. रांगणा..’ बस्स..!! आणखी काय हवं भटक्या विमुक्तांना..!!
माधव कुलकर्णी – ५ जुलै २०१३
छायाचित्रं : अमोद राळे यांच्या बच्चन कॅमेऱ्यातून
नाद खुळा लीव्हलास कि भावा. माझ्या कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. तू जो टणक कवचाचा वडापाव खाल्लास त्याला ' क्रांतीचा वडापाव म्हणतात. माझ कॉलेज होत गारगोटीला आणि आम्ही तिथून चालत गेलो होतो भुदरगड किल्ल्यावर.
LikeLike