“ओळख.. नगर जिल्ह्यातील.. अपरिचित किल्ल्यांची..”


मांजरसुंभागड (Fort Manjarsumbha), पळशी किल्ला (Fort Palshi), जामगाव किल्ला (Fort Jamgaon) आणि अहमदनगर चा किल्ला (Ahmednagar Fort)

अहमदनगर.. हे एक अनोखं ऐतिहासिक शहर आहे.. गतकाळच्या निजामशाहीची राजधानी.. विषम भौगोलिक परिस्थिती साठी प्रसिद्ध.. इकडे दुष्काळी भागही आहे आणि हिरवागार सुकाळदेखिल आहे.. इकडे विशाल.. भंडारदरा धरणही आहे आणि कोरड्या पडलेल्या विहिरी आहेत.. भंडारदरा.. प्रवरेकाठ्ची गावं पहिली की नगरला दुष्काळी भाग का म्हणायचं असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.. प्रवरा, सिना, मुळा आणि घोडनदी या अहमदनगर जिल्ह्यातील काही प्रमुख नद्या.. संत ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी.. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत.. भगवद्गीतेचा अर्थ उलगडून भावार्थ-दीपिका (अर्थात ज्ञानेश्वरी) लिहिली ते नेवासा गाव देखिल या जिल्ह्यामध्येच आहे.. नगर जिल्ह्याची आणखी एक खासियत म्हणजे इथली भाषा.. साधारण पुण्या-मुंबईतली माणसं एका दमात फार फार तर ७-८ शब्दाचं फुटकळ वाक्य फेकू शकतात.. पण अस्सल हाडाचा नगरी माणूस एका दमात (पूर्ण-विराम, स्वल्प विराम यांना झुगारून) तडक तीन-चार वाक्यांचा पार भुगा करून टाकतो.. शेवटी आपलाच ऐकण्याचा वेग वाढवावा लागतो तेंव्हा कुठे बोला-फुलाची गाठ पडते..

अहमदनगर.. निजामाने वसवलेलं एक आटपाट नगर.. निसर्गाच्या विविध रंगानी नटलेलं एक दमदार भूप्रदेश.. तर अशा या अहमदनगर जिल्ह्यात कोण-कोणते किल्ले येतात असा प्रश्न विचारला तर.. डोकं खाजवून पहा किंवा आपटून पहा.. पण हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच नावे येतील.. पण या नगर जिल्ह्यात जर वीस पेक्षा अधिक किल्ले आहेत असं सांगितलं तर.. लोकं तुम्हाला खुळ्यात काढतील.. तर अशा आटपाट नगर जिल्ह्यात बरेच किल्ले आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत.. केवळ प्रस्तरारोहण करता येणाऱ्या मंडळीच्या आवाक्यातले अलंग-मदन-कुलंग हे दुर्ग त्रिकुट.. महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर कळसुबाई हे या जिल्ह्यातले बरं का.. आणि भटक्यांची पंढरी.. जगात भारी  हरीश्चंद्रगड तोही याच भागातला.. भंडारदरा जलाशयाची काठी हेमाडपंथी अमृतेश्वर मंदिर आणि बेभान रांगडा रतनगड इथल्याच मातीतला.. या शिवाय इकडे आणखी काही अपरिचित किल्ले आहेत.. जे कुणाच्या खिजगणतीत नाही.. पण तरीही वैशिष्ट्यपूर्ण असे.. आज आपण काही अपरिचित गडकोटांची ओळख करून घेणार आहोत.. उन्हाळी सुटीत बच्चे कंपनीला सोबत घेवून केलेल्या या भागातील marethon भटकंतीचा हा धावता वृत्तांत..
मांजरसुंभा किल्ला आणि शिव-गोरक्षगड (आगरगाव डोंगररांग):
वाटाड्या मार्ग क्र. १: अहमदनगर ८ कि.मी. वांबोरी फाटा ५ कि.मी. मांजरसुंबागड ३ कि.मी.  शिवगोरक्षगड   
अहमदनगर-संभाजीनगर (औरंगाबाद) राज्य महामार्गावर नगर पासून उत्तरेकडे.. अदमासे ७-८ कि.मी. वर वांबोरी फाटा आहे.. इथून डावीकडे ४-५ कि.मी. अंतरावर मांजरसुम्भा नावाचे गाव आहे.. इथे गावाच्या मागे मांजरसुम्भा नावाचा एक छोटेखानी पण देखणा किल्ला आहे.. असं गडाचे नाव ऐकून चकित व्हायचं नाही संगमनेर जवळचा मांझरपुंज किल्ला.. ढाक भैरीच्या गुहेतून दिसणारा मांझरपुंज चा डोंगर.. झालंच तर प्रचीतगडाला खेटून उभं वांदरटेंभा सुळका.. अशा अपरिचित नावाचे काही गडकोट या मल्हारी महाराष्ट्रात आहेत..

वांबोरी फाट्यावरून डावीकडे वळून थोडं पुढे जाताच एक लहानग्या टेकड्यांची मालिका सुरु होते.. यांना आगरगाव टेकड्या (रांग) म्हणतात .. आणि याच टेकड्यामधील एका टुमदार टेकडीवर हा गड बांधला आहे.. मांजरसुम्भा गावातून पुढे उजवीकडून कच्च्या रस्त्याने थेट गडमाथ्यावर जातं येतं.. पण आपण गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या विलक्षण बांधणीच्या एकांड्या बुरुजाजवळ गाडी उभी करून.. गाडीवाट सोडून डावीकडे तिरपं निघायचं.. वर दिसणाऱ्या कमानीच्या दरवाजाकडे.. निसरड्या मुरुमाच्या वाटेने एक-दो-एक करत पायवाटेने निघायचं.. पायवाट दगडधोंड्यांची असल्याने.. जरा जपून पावलं टाकीत दगडांच्या राशीमधून पायवाटेचा माग काढत.. अगदी सोपे प्रस्तरारोहण करीत  गडाच्या मुख्य दरवाजाकडे निघायचं.. पंधरा-वीस मिनिटात आपण गडाच्या मुख्य द्वाराशी येवून पोहोचतो.. गडाचा मुख्य दरवाजा सुस्थितीत असल्याचे पाहून समाधान मानायचं आणि निजामशाही स्थापत्य शास्त्राचा हा कलाविष्कार पाहून.. मुख्य द्वारातून आत काटकोनात वळून थेट समोर निघायचं.. गडाच्या उत्तरेकडे दिसणाऱ्या तिनमजली भग्न इमारतीकडे.. थोडं किरकोळ चढावाच्या वाटेने वर आल्यास इथे भव्य चौथरा, तिनमजली इमारतीची भग्न भिंत आणि उजवीकडे एक प्रशस्त बांधीव तलाव दिसतो.. आता ह्या गडाची खरी कारीगरी दिसू लागते.. तिन-मजली इमारतीच्या डावीकडे.. पाण्याच्या टाकीसारख्या दिसणाऱ्या औरस-चौरस अर्ध-मजली बांधकामाच्या छतावर चढून पाहिल्यास.. वर्तुळाकृती दोन झरोके दिसतात.. आणि या झरोक्यातून आत डोकावताना.. मग ही पाण्याची टाकी नसून.. एक तळमजल्यातील आरस्पानी महाल असल्याचे कळते.. मग उजवीकडून या गुप्त महालातील भग्न खोल्यात खलबतं उरकून पुन्हा तीन मजली इमारतीकडे मोर्चा वळवायचा.. 
कुणी म्हणतं हा राजवाडा आहे निजामाच्या कुठल्याशा वंशजाने बांधलेला.. कोण म्हणतं इथे सुप्रसिद्ध शाद्वल (शार्दुल) बाबा यांचा महाल आहे राजाने बांधून दिलेला.. आपण इतिहासाच्या फंदात न पडता गडाचा भूगोल पचनी पाडायचा.. सुकलेल्या तलावात.. कातळी पायऱ्यावरून आत उतरून एक फेरफटका मारायचा आणि पुन्हा तिन मजली इमारतीच्या मागे जायचं.. इथे पिराची कबर आहे.. आणि एक आरस्पानी कारंजे.. तलावाचे पाणी या कारंज्याकडे वळविले आहे.. सध्या कोरड्या तलावातून कसं काय बुवा या कारंज्यात पाणी वळविले असेल.. असा विचार करत कल्पनेची परंजी उडव्याची आणि शेजारच्या झाडाखाली सावलीला यायचं.. इथे तलावाकडे पाठ करून उभं राहिलं कि समोर दरी दिसते.. गडाची हि बाजी मात्र.. बरीच खोल आणि नैसर्गिक दृष्ट्या भक्कम अशी आहे.. उजवीकडे नजर टाकताच एक तिमजली ५०-६० फुटी एकटा बुरुज लक्ष वेधून घेतो.. त्यामुळे तिकडे निघायचं.. या बुरुजाच्या अलीकडे डावीकडे.. थोडं खाली उतरून गेल्यास तटबंदी चे अवशेष दिसतात.. निसरड्या पायवाटेने तटबंदी वरून चालत बुरुजाकडे निघायचं.. या बुरुजात उतरण्यासाठी जिना तयार करण्यात आला आहे.. काटकोनात वळणाऱ्या जिन्याने ३० एक पायऱ्या उतरताच आपण बुरुजाच्या मधल्या भागात येवून पोहोचतो इकडे डावीकडे कमानीतून पाहताना.. गडाची तटबंदी स्पष्ट दिसते.. उजवीकडे मोठ्या खिडकीच्या कमानीतून बाहेर पाहताना इथल्या आटोपशीर खोऱ्याचा नजरा पाहायला मिळतो.. इथे खाली बुरुजाच्या तळमजल्यात उतरण्यासाठी एक झरोका काढला आहे.. या झरोक्यात डोकावून पाहिलं कि खाली भिंतीमध्ये साधारण ३-४ फुट अंतरावर चिरे रोवून खाली उतरण्याची सोय केली आहे.. खाली टेहळणी साठी चक्क एक तळमजला बांधला आहे.. या झरोक्याशेजारी लोटांगण घालून खाली पाहिल्यास एक पाण्याचे टाके दिसते.. हे काय गौडबंगाल आहे याचा विचार करीत उजवीकडे निघायचं.. 

इथे बुरुजातून बाहेर पडण्यासाठी दरवाजा आहे.. थोडं पुढे जाताच.. अगदी टोकाला काही पायऱ्या आणि तटबंदी चे अवशेष दिसतात इथे गडाचा दुसरा दरवाजा आहे.. उजवीकडून जात.. डावीकडे यु-टर्न मारून गडाच्या दरवाजात येवून बसायचं.. इथं मस्तवाल वारा आपल्या भोवती पिंगा घालीत असतो.. त्याला थोडं आजारायचं गोन्जारायचं आणि दरवाजाच्या समोर खाली उतरणाऱ्या पायऱ्या पाहून खालची वाट धरायची.. इथे दिड-एकशे पायऱ्यांचा कातळी जिना उतरून जाताच.. मांजरसुम्भा गडाचा ताशीव कडा लक्षवेधी भासतो.. इथे खाली उतरताच गडाची ताशीव कातळभिंत डावीकडे ठेवत Traverse मारत सरळ पुढे गेल्यास पाण्याची तब्बल ९ टाकी नजरेस पडतात.. यातील बहुतांशी टाकी पिण्यायोग्य नाही.. शिवाय इथे सापांचाही वावर आहे.. यातील साधारण चौथ्या टाक्याच्या पाशी आपण येवून पोहोचतो तेंव्हा मगाशी दिसणारा तिमजली बुरुज आता आपल्या डोक्यावर उभं असतो.. आणि त्याच्या तळमजल्यातील.. झरोका आता स्पष्ट दिसू लागतो.. इथून वर पाहताना हि अद्वितीय वास्तुरचना पाहून थक्क व्हायला होतं.. आता याला कडेलोट पॉइंट म्हण्याचा कि काय असा प्रश्न मनात डोकावतो.. पण बुरुजाच्या खाली थेट टाक्यापर्यंत चा १५०-२०० फुटी कातळ चक्क तासून काढला आहे.. आणि खालचे टाके दगड-चिऱ्यांनी बांधून काढले आहे.. असं आगळावेगळा.. भन्नाट बुरुज पाहून पुन्हा कातळी जिना चढून गडाच्या मागल्या दरवाजात दाखल व्हायचं..इथे पोहोचेपर्यंत.. आपण एक भन्नाट किल्ला बघितल्याचे समाधान चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागते.. आणि हेच समाधान घेवून पाण्याचा तलावाला वळसा मारत पुन्हा मुख्य दरवाजाशी येवून पोहोचायचं.. इथल्या मखरातील आतील बाजूचे नक्षीकाम पाहून ४ आकर्षक गवाक्षातून येणारा उजेड पाहून गडाचा निरोप घ्यायचा..
गडाला तिन्ही बाजूंना नैसर्गिक असा दरीचा खंदक आहे.. या मुळे गडाला तिमजली बुरुजाची कातळ भिंत वगळता.. इतर बाजूंना तटबंदी नाही किंवा काळाच्या ओघात ती गडप झाली असण्याची शक्यता आहे.. गडाची मुख्य द्वाराकडील बाजू हि त्यामानाने कमी उंचीची असल्याने त्याकाळी गड संरक्षणाच्या अनुषंगाने असुरक्षित असावी असे वाटते.. असो.. हे हि नसे थोडके असे म्हणून गड उतरण्यास सुरुवात करायची.. आता कच्च्या गाडी रस्त्याच्या वाटेने उतरत पुन्हा एकांड्या बुरुजाकडे येवून पोहोचायचं.. हा एकांड्या बुरुजाची रचना आकर्षक आणि एखाद्या अष्टकोनी फुलाच्या रेखीव रांगोळीसारखी आहे.. पुन्हा गावाकडे परतताना उजवीकडे दिसणाऱ्या डोंगररांगेकडे नजर टाकायची.. यातील एक डोंगरावर शिव-गोरक्षनाथाचे मंदिर आहे.. त्यास शिव-गोरक्षगड असे म्हणतात.. थोडा वेळ असल्यास गोरक्षनाथाच्या दर्शनास वेळ काढून जायला हरकत नाही.. इथल्या घाटातला प्रवास.. भटकंतीत धमाल आणतो हे नक्की.. शिवाय या घाट रस्त्यातून मांजर सुम्भाडाचे एक आगळेच दर्शन घडते.. गोरक्षनाथाचे हे मूळ मंदिर अतिप्राचीन असून.. सध्या त्याचा जीर्णोद्धार केला आहे.. या मंदिराच्या शेजारील पिंपळ पारावर अन्नदानाचे काम चालते.. इथे पक्ती मध्ये बसून घेतलेल्या महाप्रसादाची मजा काही औरच..            

स्वातंत्र्यपूर्व इतिहासाचा साक्षीदार अहमदनगरचा भुईकोट किल्ला : नगर जिल्ह्यातील आणखी काही अपरिचित किल्ल्यांची भटकंती करण्यासाधी शहरातील भुईकोट किल्ल्याला धावती भेट द्यायला हरकत नाही.. बहामनी राज्याचा एक सेनापती मलिक अहमद निजाम शाह हा होता.. पुढे बहामनी राज्याची शकले होवून निजामशाही अस्तित्वात आली आणि अहमदनगर निजामशाही ची राजधानी म्हणून उदयास आले.. हा किल्ला हुसेन निजामशाह याने १५ व्या शतकात बांधला असे म्हणतात.. पुढे चांदबीबी ने हा किल्ला मोघालांविरुद्ध लढविला आणि निजामशाही जिवंत ठेवली.. औरंगजेब  चारही बाजुनी खंदक.. तब्बल २४ भरभक्कम बुरुज, मुख्य द्वारासामोरील दोन तोफा.. ३०-४० फुटी भक्कम तटबंदी.. मुख्य दरवाजापासून डावीकडे तटबंदीवर एक बुरुजावरील सुळीचा खांब.. आणि झुलता पूल हि अहमदनगर किल्लाची काही ठळक वैशिष्ट्ये.. सध्या गडाच्या आतल्या भागात मिलिटरी चा कॅम्प असून काही ठराविक भागात जाता येते.. इथे स्वत्र्यापुर्वी पंडित नेहरू आणि इतर स्वातंत्र्यसेनानिंना इंग्रजांनी डांबून ठेवले होते.. इथेच पंडितजींनी.. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे अजरामर पुस्तक लिहिले.. त्यामुळे गडाच्या तटबंदीवर दौलणारा तिरंगा पाहून थोडं पुढं जाऊन सुळीचा खांब पाहून यायचं आणि आल्या पावली परतायचं.. झालंच तर मुख्य दरवाजाकडे पाठ करून.. उजवीकडे गडाला खंदकाच्या भोवतीने एक बाह्य प्रदक्षिणा मारायची आणि झुलता पूल पाहून यायचं.. निजामाचा सेनापती सलाबतखान याने चांदबीबी च्या मुलीशी प्रेम करण्याची गुस्ताखी केली म्हणून त्याचं शीर धडावेगळे करून टाकण्याची शिक्षा फर्मावण्यात आली.. त्याचं कापलेलं शीर हे गडाच्या मुख्य द्वारासामोरील तोफेखाली पुरण्यात आले अशी एक आख्यायिका आहे.. सुळीच्या खांबापासून दूर दिसणाऱ्या टेकडाकडे नजर टाकल्यास ३ मजली.. एक मनोरा दिसतो.. कुणी याला चांदबीबीचा महाल असं देखिल म्हणतात.. पण हे सलाबतखानाचे थडगे आहे.. असो नगरच्या किल्ल्याची धावती भेट घेवून.. पळशी चा किल्ला पाहण्यासाठी निघायचं..
पळशी चा भुईकोट किल्ला, १७ व्या शतकातले विठ्ठल मंदिर :
वाटाड्या मार्ग क्र. २ – अहमदनगर २२ किमी भाळवणी ८ किमी ढवळपुरी १८ किमी वणकुटे गाव १० किमी पळशी गाव पळशी किल्ला
अहमदनगर चा भुईकोट किल्ला पाहून निघालो टॉवर दुपारचे १ वाजले असावेत.. अ.नगर-कल्याण रोडवर भाळवणी नावाचे गाव आहे  ढवळपुरी नावाचे गाव आहे.. इथून वनकुटे गावचा रस्ता विचारायचा.. आपण इथून निघाल्यानंतर.. एक विस्तीर्ण पठार नजरेस पडतं.. या पठाराच्या मध्यातून वनकुटे गावची वाट आहे.. हा टापू हा दुष्काळी भागात येतो असे इथल्या विरळ वसतीने जाणवते.. वनकुटे गावात मग पळसी/पळशी गावचा पत्ता विचारलं तर.. मागे एका टेकाडाच्या मागे डावीकडे कुठल्याशा नदीकाठी.. पळसी हे गाव वसले आहे.. वनकुटे गावातून पळसी गावाकडे एका डोंगरापाशी चढावाचा रस्ता सोडून डावीकडचा रस्ता घेवून.. या रस्त्यावर डावीकडे जी (??) नदी दिसते.. त्या नदीच्या दोन्ही बाजूस रेतीच्या आकर्षक टेकड्या नजरेस पडतात.. इथे ‘काळवतणीचा दरा’ नावाचा एक विलक्षण भूप्रदेश आहे.. ओबड-धोबड टेकड्यांचा हा प्रदेश पहाणे हा एक विलक्षण अनुभव आहे.. पळशी गाव दृष्टीक्षेपात येताच.. एक धरणभिंत दिसू लागते इथे नदीकाठावर पळशीचा भुईकोट किल्ला आहे.. १५-२० फुटांचे बुरुज आकर्षक प्रवेशद्वार आणि समोरून वाहणारी जाणारी आठमाही कोरडी नदी हि इथली काही वैशिष्ट्य.. नदीकाठच्या द्वारातून किल्ल्यात प्रवेश केला इथे पेशव्यांचे सुभेदार पळशीकरांचा एक भव्यदिव्य वाडा आहे.. सध्या इथे कुणी राहत नाही त्यामुळे वाड्याची वारीच दुरवस्था झाली आहे.. नक्षीदार दरवाजे.. आणि पळशीकरांचा वाडा पाहून पुढे निघालो.. इथे एका चौकात डावीकडे सिमेंटच्या जंगलात तग धरून असलेलं पुरातन महादेवाचं मंदिर आहे.. संगमरवरी महादेवाची चकाकती पिंड.. इथे मंदिराच्या मंडपात एक गणपतीची शेंदरी सुरेख मूर्ती आहे.. कलाकुसरीने नटलेला शिवमंदिराचा गाभारा आणि आतील महादेवाचे दर्शन घेतले.. एक सुंदर शिवालय पाहिल्याचं समाधान घेवून सरळ पुढे डांबरी रस्त्याने जाताच गडाचा मुख्य दरवाजा आहे.. २० एक फुटी कमानीतून बाहेर पडताच.. गडाच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस काळ्या रंगाच्या दगडातील एक शिलालेख दिसतो.. यातील डावीकडील शिलालेखातील मजकूर असा.. “श्री. अंबाचरणी तत्पर रामरावअप्पाजि निरंतर शाखा आश्र्चलायान गोत्र वसिष्ट उपनाव कांबळे || व त्रि कुळकर्णी जहागीरदार सा अंबल यानि कम केले || सन १२०७”.. तर उजवीकडील शिलालेखात पुढील मजकूर लिहिला आहे.. “श्री गणेशायनमः || पळसीचे नगर दुर्ग बांधावयास प्रारंभ शके १७०९ प्लवंगनाम संवस्तरे श्रावण शुक्ल १३ त्रयोदसीस || सिद्ध जाले १७१९ पींगळ नाम संवस्तरे मार्गशीर्ष शुद्ध १३  त्रयोदसी”.. हा शिलालेख प्राकृत भाषेतील असल्याने सामान्य माणसांना समजण्यासारखा आहे.. यावरून रामराव आप्पा यांनी १७ व्या शतकाच्या सुरुवातीस बांधल्याचे कळते.. आणि किल्ला बांधण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लोटला हेही कळते.. असो मुख्य दरवाजातून डावीकडे जावून किल्ल्याला एक प्रदक्षिणा मारली.. तेंव्हा गडाचा आणखी दरवाजा नजरेस पडला.. इतर दरवाजांच्या मानाने लहान असा हा दरवाजा तटबंदीत चौकट घालून तयार केल्याचे दिसले..किल्ले प्रदक्षिणा पूर्ण करून परतीचा प्रवास सुरु केला.. इथे पळशी गावाच्या जवळ एक १७ व्या शतकातील एक सुंदर विठ्ठल मंदिर असल्याचे कळले तेंव्हा हे मंदिर पाहण्यास निघालो.. सध्या घातलेल्या धरण भिंतीच्या मागे हे मंदिर दिसते.. किल्ल्याचे आणि मंदिराचे बांधकाम एकाच वेळी झाली असण्याची शक्यता आहे..

१७ व्या शतकातील सुंदर विठ्ठल मंदिर: मंदिरासमोरील चिंचेच्या झाडाच्या सावलीत गाडी उभी करून विठूमाउलींच्या दर्शनास  निघालो.. मंदिराच्या चौबाजूस कोट चढविला असून दरवाजाच्या उजव्या बाजूस एक चौरस बांधीव तलाव आहे.. कोरीव शिल्पांनी नटलेल्या द्वारातून आत प्रवेश केला आणि आत एक पुरातन मंदिर पाहून थक्क झालो.. डावीकडे उंचपुरा कमळाकृती कळस असलेले.. आखीव-रेखीव मुख्य मंदिर आणी जोडून एक प्रशस्त सभामंडप असून.. मंडपाचे १८ खांब हे १८ पुराणाचे प्रतिक आहे.. मंडपाच्या खांबावर सुरेख नक्षीकाम केले असून पुराणकाळातील काही घटनांची चित्रे त्यावर कोरल्याचे दिसते.. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्य बाजूने नक्षीदार हत्तीमुख, दोन झुंजणाऱ्या हत्तीचे, लढाईस निघालेल्या सेनानी आणि सांडणीस्वार, मयूर चित्रे.. डावीकडच्या एका चौकटीत दुर्गा मातेचे शिल्प आणि मागील बाजूस चार हातांच्या विष्णूदेवाचे.. शिल्प कोरल्याचे दिसते.. चौरस कोरीव खांब आणि त्यांची घडी पाडून तयार केलेल्या ह्या मुख्य मंदिराची बाह्यरचना फारच सुरेख आहे.. मंदिराच्या मागे असलेल्या पडवीच्या छतावर दोन काळविटाचे एक शिल्प कोरल्याचे दिसते.. वेगवेगळ्या दिशेने पाहिल्यास एक खाली मुंड्या घालणारी दोन काळविटे आणि दोन धावणारी काळविटे अशी एकूण चार काळविटे दिसतात.. हि आकर्षक शिल्पकला पाहून तोंडात बोटं घालायची आणि विठ्ठलाच्या दर्शनास जायचं.. मादापाच्या दारातून आत येताच एक बटबटीत डोळ्यांचे आणि मिशीवाले कासव विठ्ठलाच्या समोर नतमस्तक झाल्याचे दिसते..
                             
गाभाऱ्याच्या डावीकडे गणपती-रिद्धी-सिद्धी मूर्ती तर उजवीकडे भैरव मूर्ती आहे.. राही, विठ्ठल आणि रुक्मिणी मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या मध्यभागी युगेयुगे भक्तांच्या संकटहरणासाठी उभे असल्याचे पाहून आपसूकच नतमस्तक झालो.. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.. कर कटावरी ठेवूनिया’ याची प्रचीती हि सुबक.. काळ्या संगमरवरी पाषाणात घडवलेल्या या विठू माउलींच्या मूर्ती कडे पाहताना येते.. इथे विठ्ठल मूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरले आहेत.. सिहासनावर नारद, गंधर्व आणि किन्नराच्या मूर्ती कातळात कोरल्याचे दिसते.. या ठिकाणाला प्रती-पंढरपूर असे स्थानिक म्हणतात.. येथील निरव शांतता आणि उपस्थितांचा भक्तीभाव पाहून एक विलक्षण सुंदर असे एक मंदिर पहाणे हि एक पर्वणी आहे.. मंदिराच्या सभामंडपात एका पाटीवर मंदिराचा आणि किल्ल्याच्या इतिहास संक्षिप्त स्वरुपात दिला आहे.. यातील शेवटचे वाक्य मनाला चटका लावणारे आहे.. ते असे.. “उपेक्षितांचे पंढरपूर असलेले पळशी गाव आजही पर्यटन स्थळाच्या दर्जापासून वंचित आहे”.. तर अशा भक्तांच्या भाऊगर्दीपासून दूरवर आडगावात नांदणाऱ्या ह्या विठ्ठलाचे दर्शन घडणे हा एक दैवयोगच म्हटला पाहिजे..

जामगाव चा किल्ला:
पळशी गावातून निघायचं आणि तासा-दिड तासात पुन्हा भाळवणी फाट्यावरून येवून पोहोचायचं इथून भाळवणी-पारनेर रस्त्याने निघायचं.. या रस्त्यावरच जामगावच्या अलीकडे एक भुईकोट किल्ला आहे.. महादजी शिंदे यांचा राजवाडा या किल्ल्यात आहे असे gazetteer मध्ये नोंद आहे.. पण या किल्ल्याचा मूळ इतिहास समोर आणणे हे आधुनिक इतिहासकारांसाठी एक आव्हानच ठरेल.. पारनेर शहरापासून अलीकडे साधारण १० किमी अंतरावर.. रस्त्याच्या काठावरच उजवीकडे भव्य तटबंदी दिसते..  इथे आत गेल्यावर एका टेकडावर बालेकिल्यासारखा’ दिसणारा एक वाडा आहे.. यातील दगडी बांधकामाची साधारण १५० फुट खोल विहीर, त्यावरच्या मोटा.. बालेकिल्ल्याचा प्रशस्त दरवाजा.. प्रेक्षणीय आहे.. १५-२० एकराच्या परिसरात पसरलेला हा भव्य भुईकोट पाहून.. थक्क व्हायला होतं.. या किल्ल्याबद्दल फारशी माहिती नसल्याचे आश्चर्य वाटते.. किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर मारुचे मंदिर असून.. राक्षसाला लोळविणारा महाबली.. महाकाय.. महारुद्र.. मारुतीरायाची सुरेख मूर्ती आहे.. साधारण १०-१२ फुट उंचीची हि भव्य-दिव्य प्रगल्भ मूर्ती पाहून नतमस्तक झालो आणि किल्ल्याची धावती भेट घेवून परतीचा प्रवास सुरु केला.. वेळेअभावी अलकुटी गावातील गढी आणि पारनेर चा भुईकोट पाहण्याचे राहून गेले पण जे पहिले ते ही नसे थोडके.. तर हे आडगावातील इतिहासाचे सवंगडी पाहायला सहज शक्य आहे.. तेंव्हा चला नगर जिल्ह्यातील या अपरिचित गडांशी मैत्री करायला.. !!                          

माधव कुलकर्णी २०१३

2 Comments Add yours

  1. Unknown says:

    अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आली आहे

    Like

  2. मांझरपुंज संगमनेरजवळ कोठे आहे? लोकेशन मिळाले तर फार बरे होईल.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s