In Search Of Routes 1: Bangaluru – Tumkur – Nelmangala – Chitradurga (Total Distance 201 K.M.)
वाटाड्या मार्ग क्र. १ : बंगळूर (majestic circle) – टूमकुर – नेलमंगला – चित्रदुर्ग .. (एकूण २०१ कि.मी.)

बंगळूर शहर हे नवदुर्गांनी वेढलेलं आहे.. मधुगिरी, साविनदुर्ग, देवारायणदुर्ग, नंदिदुर्ग, मक्कलीदुर्ग, चन्नारायणदुर्ग, कब्बलदुर्ग, भैरवदुर्ग, हुलीयुरदुर्ग .. बंगळुरात येवून २ महिने झाले आणि हे नवदुर्ग पाहून घ्यावे असं ठरवलं.. मग काय भटकंतीचा सपाटा सुरु झाला.. बंगळूरचा शहरी किल्ला, देवनहल्ली किल्ला मग श्रीरंगपट्टण चा अतिविशाल भुईकोट पाहून आलो.. मंगळूर चा राजवाडा पाहताना त्याच्या भवतालची तटबंदी हा केवळ राजवाडा नसून पूर्वाश्रमीचा एक भूदुर्ग (भुईकोट किल्ला) होता हे समजलं.. तद्नंतर पराग आणि मी साविनदुर्ग चा एका सलग १००० मिटर खडकावर बांधलेला गिरिदुर्ग पाहून आलो.. आता कुठे मोर्चा न्यावा याचा विचार करत होतो.. मृणाल आणि मी निघालो .. मधुगिरी ला.. शनिवार-रविवार जायचा बेत ठरला.. सगळी तयारी झाली.. पण ऐन वेळी माशी शिंकली, कर्नाटक सरकारने कावेरी तामिळनाडू ला दोन बादल्या पाणी जास्त दिल्याने कट्टर कन्नडिगांनी राज्यव्यापी बंद पुकारला.. मग पुन्हा फोनाफोनी झाली.. या दरम्यान अभिजित बेहेरे इचलकरंजी वाले यांचा दूरध्वनी आला.. अरे या विकेंडला चित्रदुर्ग किंवा संताजी जाधवांनी गाजवलेला ‘गुटी’चा किल्ला (आंध्रप्रदेश) बघूया म्हणून.. बरं.. त्याला ये म्हटलं खरं.. पण या कर्नाटक-बंद च्या दिवशी गाडी मिळणार नाही हे नक्की होतं.. इकडे बंद जोरदारपणे आणि कडकडीत पाळतात.. “आता झाली का पंचाईत..!”
सरतेशेवटी पहाटे लवकर निघण्याचा बेत आखला.. काहीही झालं तरी चित्रदुर्ग पाहायचाच हा वज्रनिर्धार केला.. मी आणि मृणाल पहाटे सहाला निघालो.. कुंदनहल्ली गेट-मारतहल्ली वरून निघालो.. कर्नाटक बंद मुळे कर्नाटक मित्रमंडळा ची ‘वज्र .. The whispering Death’ हि वातानुकुलीत सिटीबस आज रस्त्यावरून धावत नव्हती.. कर्नाटक परिवहन मित्रमंडळाचा निळा डबा मात्र वज्रनिर्धाराने धावत होता.. चार दोन काचा फुटल्या तरी त्यांना काही फरक पडणार नव्हता.. मग अशाच एक झुंजार निळ्या डब्यात घुसलो आणि केंपेगौडा बस स्थानकाचे (Majestic) तिकीट काढले.. कर्नाटक बंद ला समर्थन देणारे कर्नाटक रक्षण वेदिकेचे, भा.ज.पा., देवेगौडा मित्रमंडळाचे रिकामटेकडे कार्यकर्ते रस्त्यावर फिरू लागले.. तसा बंद चा तडाखा जाणवू लागला.. निळ्या डब्याच्या ड्रायव्हरने बंदचा रागरंग बघून गाडी मध्येच थांबवली आणि या बसचे प्रवासी रस्त्यावर आले..
मग एका रिक्षावाल्याच्या हातापाया पडून त्याला कसाबसा रेडी केला आणि Majestic Circle ला येवून पोहोचलो.. इकडे पाहिलं तर बंदच्या भीतीने कर्नाटक मित्रमंडळाच्या ST बसेस डेपो मध्ये उभ्या होत्या.. एकही बस रस्त्यावर धावत नव्हती… मग रेल्वे स्थानकावर गेलो.. तिकडे मोर्चे लागले होते.. त्यामुळे रेल्वे बंद.. मृणालला म्हटलं आता रे करायचं तरी काय.. मग एखादा प्रायवेट कार वाला येतो ते पाहण्यासाठी रेल्वे स्थानाकाच्या बाहेर पडलो.. एका कानडी इंडिका वाल्याला विचारलं “चित्रदुर्गा चलेंगे क्या?” तो हो म्हणाला.. म्हटलं “पैसा कितना लेगा भाई”.. ती म्हणाला “१०,००० रुपया”.. २०० कि.मी. अंतरासाठी एवढी रक्कम ऐकून.. मी हसायला लागलो.. तसा तो उखडला आणि वाद घालू लागला.. मग कर्नाटक पोलिस हवालदाराला बोलावून त्याला सज्जड दम दिला.. शेवटी तिथेच शाब्दिक बाचाबाची चर्चासत्र उरकलं.. कर्म म्हणायचं आणि दुसरं काय ! म्हटलं आज काही झालं तरी चित्रदुर्ग ला जायचंच.. मग शेवटी बाईक ने जायचं ठरलं.. आता बाईक कुणाची घ्यावी असा विचार डोकावताच.. माझा ऑफिस चा दोस्त सचिनकृष्ण जोशी आठवला.. लगोलग फोन लावला.. “सचिन भैय्या बाईक मिलेगा क्या.. आज बंद है.. गाडी बंद.. सब बंद.. सिर्फ १०,००० वाला कार चालू है”… सचिन बोला “लेके जावो”.. मग परत आणखी एका रिक्षावाल्याला पटवून.. श्रीनिवास-नगरात राहणाऱ्या या दोस्ताकडून बाईक आणायला निघालो.. श्रीनिवास-नगरात पोहोचलो तोवर ८ वाजले होते.. एव्हाना कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शहरभर धुडगूस घालण्यास सुरुवात केली होती.. रिक्षातून उतरतो ना उतरतो तोच एक कन्नड रक्षण वेदिकेचा उमदा कार्यकर्ता.. कन्नड प्रभुदेवा डायरेक्ट आडवा आला.. रिक्षावाल्याला त्याने कन्नड भाषेत काहीतरी बोलला.. पण “कन्नड अस्मितेचा आणि समस्यांची तुला काही चाड नाही का?” असा काहिसा आशय त्या कानडी डायलॉगबाजीचा असावा ”
मित्राचं घर गाठलं आणि बाईक घेतली.. त्याचा आनंदी अंत:करणाने निरोप घेवून Outer Ring Road ने टुमकुर कडे निघालो.. चित्रदुर्ग बंगळूर सिटी सेंटर पासून साधारण २५० कि.मी. अंतरावर (बंगळूर-मुंबई महामार्ग क्र. ४ वर) आहे.. यशवंती (TVS Victor), मी आणि मृणाल ‘कर्नाटक बंद’ च्या जाळपोळीतून वाट काढत.. नेलमंगला कडे निघालो.. नेलमंगला हे चित्रदुर्गाच्या वाटेवरचं पाहिलं मोठं गाव.. Outer Ring Road सोडून हायवे चा रस्ता पकडला तर सामसूम रस्त्यावर काही तुरळक दुचाकी आणि चारचाकी वगळता सगळा आनद होता.. नेलमंगला पासून ६-८ कि.मी. गेलो आणि समोर कर्नाटक बंद वाल्यांनी हायवे बंद करून टाकला होता.. म्हटलं झाली का शाळा आता.. ! पाहिलं तर सुमारे २०-२५ दुचाक्या आणि १०-१२ कार तिथे जीव मुठीत घेवून उभ्या असल्याचे दिसले .. थोडा वेळ वाट पाहूया असं म्हणून गाडी सायडिंगला घेतली.. ‘कावेरी.. कावेरी.. कावेरी.. कावेरी $$’ जा जोरदार जयघोष सुरु झाला.. इकडे देवेगौडाच्या पक्षातील कार्यकर्त्यांचं कावेरी प्रेम ऊतू जात होतं.. त्यासाठीच हे शक्तीप्रदर्शन.. राष्ट्राच्या निर्मितीसाठी एवढी जाळपोळ करायलाच तर हवीच ना..!! साधारण १००-१५० कार्यकर्त्यांनी हायवे डोक्यावर घेवून उच्छाद मांडला होता.. मोबाईल वरून फोटो काढून घेत स्टायील ने बंद चा विरोध सुरु होता.. त्यातल्या एका कार्यकर्त्याने.. एक घोषणा दिली.. “दे दो.. दे दो.. कावेरी का पानी दे दो ”.. त्याच ग्रुप मधला दुसरा हिरो म्हणाला “दे दो.. दे दो.. हमे बिर्याणी.. दे दो”.. पाहिलंत कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं.. दारुड्याला नशेचं अन झिन्ग्लेल्याला ऊशीचं ! तर बंदचा हा असा कॉमेडी ड्रामा सुरु होता.. भर रस्त्यातला बिन पैशांचा तमाशा..!! तो पाहत बसलो. उगाच आमच्या यशवंती वर दगडफेक नको म्हणून एका कानडी बांधवाकडून एक देवेगौडाचा हिरवा झेंडा घेतला आणि गाडीला लावला.. आता एका कानडी बांधवाने झेंडा दिला म्हणून लगेच एका दुसऱ्या कानडी बांधवाने बाईक मधून पेट्रोल काढले आणि एक टायर जाळला.. एक तर आधीच बाईक मध्ये पेट्रोल चा आनंद होता.. त्यात हे टायर जाळायला मंडळाचच पेट्रोल भसाभसा काढणार.. मृणाल ला म्हटलं गाडी मागे घे रे बाबा.. कसला देवेगौडाचा झेंडा आणि कसलं काय..!! साधारण पाऊण तास.. हा कॉमेडी शो सुरु होता.. शेवटी एक पोट सुटलेल्या सिंघम इनीस्पेकटर ने या ठिकाणी एंट्री घेतली आणि पुढे चाल मिळाली.. मृणालला म्हटलं पेट्रोल नाही मिळालं तर मधुगिरीला जाऊ ते जवळ आहे.. मिळालं तर..! चित्रदुर्ग..! पुढे निघालो आणि टुमकुर च्या अलीकडे एक भारत पेट्रोलियम चा पंप उघडा असल्याचे दिसले.. लगेच टाकी फुल्ल केली आणि मृणालभाईला म्हटलं “चलो चित्रदुर्ग”..!!
नेलमंगला सोडलं तसा बंदचा जोर नाहीसा झाला रस्त्यावर पूर्ण सामसूम चार-दोन बाईकवाले अधून मधून दिसत होते बाकी निवांत होतं.. मजल दरमजल करीत दबासपेठ गाठलं.. इथे पुढे एक डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याशी मस्त रेल्वेमार्ग असं दृश्य आहे ते पाहून पुढे निघालो.. गाडी बरीच पुढे करून जरा ब्रेक घेतला.. इथे डावीकडे किल्ल्यासारखा भासणारा डोंगर दिसला.. झूम मारून डोंगराचा फोटो काढला तर खरंच तिथे किल्ला होता.. पण इथे हायवे च्या कडेला एका टपरीत तृतीयपंथियांचा एक घोळका बसला होता.. उगाच लफडा नको म्हणून पुढे निघालो.. चित्रदुर्ग गाठायचा असल्याने.. बिगी बिगी निघालो.. हिरीयूर गाव आलं आणि मग चित्रदुर्ग जवळ आल्याची कुणकुण लागली.. अभिजित ला फोन केला तर पठ्ठ्या आधीच चित्रदुर्ग ला दाखल झाला होता..
कर्नाटका बंद चा एक फायदा झाला.. रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं त्यामुळे साहजिकच प्रवास १०० टक्के सुरक्षित झाला होता.. टुमकुर सोडलं मग ऐमंगला, ऐतिहासिक शहर खिरा सोडलं तसं समोर दूरवर डोंगर रांगा दिसू लागल्या हीच चित्रदुर्ग आवाक्यात आल्याची चाहूल.. हिरीयूर गावात एक वाटर ब्रेक घेतला आणि मग शेवटचा ४० कि.मी चा पल्ला धडाक्यात पूर्ण केला.. चित्रदुर्ग ० कि.मी… ची पाटी दिसली आणि हुरूप आला.. आतापर्यंत च्या प्रवासात कर्नाटक टुरिझम मित्रमंडळाने हायवे वर ठिकठिकाणी काळ्या-पिवळ्या रंगाचे टुरिझम चे स्थानदर्शक आणि दिशादर्शक बोर्ड लावल्याचे पाहून बरे वाटले.. हायवे वरील कुठल्याही गावी गेलात तर जवळपास काय काय पाहण्यासारखे .. प्रेक्षणीय स्थळे आहेत हे चटकन कळते.. त्याबद्दल कर्नाटक टुरिझम मित्रमंडळाला धन्यवाद देवून पुढे निघालो..
आता चित्रदुर्ग चे वेध लागले होते.. साधारण दुपारचे ४ वाजले असावेत.. अभिजीत ला दूरध्वनी फिरविला तर नुसतीच रिंग वाजत होती.. काहीच कळेना.. शेवटी मृणाल ला म्हटलं आपण किल्ल्यावर जाऊ आणि त्याला तिकडेच बोलावून घेऊ.. काय !.. ‘गडावर कसं.. इतिहासात माणूस रमतय..’

चित्रदुर्ग शहरातील उड्डाण पूल उजवीकडे सोडून डावीकडच्या रस्त्याने निघालो.. विनामूल्य स्थानिक GPS कडून पत्ता विचारत पुढे निघालो.. एकाला विचारलं .. ‘ये चित्रदुर्ग किला किधर है..’.. ‘किला.. !!!’ किला शब्द ऐकताच समोरच्याच्या चेहऱ्यावरची माशी उडत नाही पाहून.. मग प्रश्न बदलला.. ‘चित्रदुर्ग कोटे किधर है ?’.. मग उत्तर आलं ‘आगेसे लेफ्ट जावो’.. मग एकदा किल्ल्याला कानडी भाषेत ‘कोटे’ म्हणतात असं मृणालला कळताच मग रस्त्याच्या प्रत्येक वळणावर दिसलेल्या स्थानिकांना तो विचारात सुटला.. ‘कोटे? कोटे?’.. त्याला म्हटलं अरे कोटे शब्दाला काही कर्ता, कर्म आणि क्रियापद काहीतरी वापरशील का नाही..! मग त्याने प्रश्न बदलला.. ‘भैया.. इधर कोटे..? कोटे किधर है ??’.. स्थानिक GPS च्या आधारे माग काढत चित्रदुर्ग च्या पुढ्यात येवून उभा ठाकलो.. पुन्हा अभिजीत ला दूरध्वनी फिरविला तर पुन्हा नुसतीच रिंग वाजत होती.. शेवटी तडक गडावर निघालो..
चित्रदुर्ग हा एक भव्य, अवाढव्य किल्ला आहे.. साधारण १२-१५ कि.मी.चा गडाचा घेरा आहे.. गडाच्या बाह्य बाजूने मजबूत तटबंदी आणि खंदक पाहून बरं वाटलं.. गडाच्या मुख्य दरवाजासमोर उजवीकडे एक मोठं दगडी चौरस आकाराचा हौद आहे.. चौकशी करता हा हत्ती साठी पाणी पिण्याचा हौद होता असे कळले.. काहीतरी नवीन पाहिल्याचे समाधान मिळाले.. पुरातत्व खात्याचे तिकीट पाहून गडाच्या मुख्य द्वारातून प्रवेश घेतला.. दरवाजातून आत शिरलो.. आणि तडक गडावर निघालो.. चित्रदुर्ग किल्लाच्या आत बऱ्याच लहान मोठ्या टेकड्या आहेत आणि सगळ्यात उंच टेकडीवर हा चित्र दुर्ग चा बालेकिल्ला.. कधी काळी या किल्ल्याला नऊ दरवाजे आणि नऊ भरभक्कम तट होते असं गाईड लोक सांगतात..
तटा-तटातून अटीतटीने.. झटपट वाट काढत.. तब्बल ६-७ दरवाजे पार करून बालेकिल्ल्यावर पोहोचलो.. बालेकिल्ल्यावर हिडींबेश्वरी देवीचे मंदिर, राजे लोकांची कचेरी.. विजयस्तंभ.. होळीचा हौद आणि एकनाथेश्वरी मंदिरअसे काही अवशेष आहेत.. या शिवाय धान्यकोठार आणि इथल्या नायकांचे राजगुरू सम्पिगे सिद्धेश्वरास्वामींचा मठ आहे.. या मठाशेजारी एका टेकाडावर बुरुज बांधला आहे.. हा इथला वॉच टॉवर.. या बुरुजावरून सगळा किल्ला आवाक्यात येतो आणि कोण कुठून घुसखोरी करतंय हे सहज कळू शकत असे.. आणि त्याला नेम धरून टिपता येत असे.. मग किल्ल्याची माहिती असलेला कुणी स्थानिक माहितगार सापडतोय का याचा शोध घेवू लागलो.. म्हणजे ‘किले कहानी.. राजू गाईड के जुबानी’ विनामुल्य ऐकता का ते पाहू लागलो.. स्थानिकांना माहित असलेला इतिहास आणि जाणकारांना माहित असलेला इतिहास यात बरीच तफावत असते.. कानाला गोड वाटणाऱ्या आख्यायिका जाणकारांच्या खिजगणतीतहि नसतात.. म्हणून असा कुणी दर्दी.. अस्सल इतिहासकार सापडतो का ते पाहून लागलो.. गडावर फेरफटका मारून सम्पिगे सिद्धेश्वरास्वामींच्या मठाजवळ पोहोचलो.. तर तिथे मठाच्या पडवीत दोन गब्रू जवान व्यायाम करत होते.. गळ्यात Camera, बर्मुडा घातलेले आमच्यासारखे आदिवासी जीव पाहून साहजिकच कुतूहलाने त्यांच्या नजरा आमच्याकडे वळल्या.. मग मीच आपली ओळख करून घेतली आणि मग संभाषण सुरु झाले.. ‘हमारे एक-एक सवाल आणि उनके दो-दो जवाब.. सवाल-जवाब.. सवाल-जवाब..’ अस्सा सिलसिला सुरु झाला..
मी – ‘ये चित्रदुर्ग जो कोटे है.. इसके इतिहास के बारेमे कुछ जाणते हो तो हमे बतावो? वो क्या है ना हम जिधर भी जाते है तो थोडा उसका इतिहास स्टडी करते है.. अच्छा रहता है’.. इतिहास हा शब्द ऐकताच राजू गाईड च्या चेहऱ्याचे बदलेले रंग पाहून मी म्हटलं .. ‘ये चित्रदुर्ग कोटे का हिस्टरी जाणते हो तो जरा हमे बता दो’..!!
राजू गाईड – “ये कोटे मद्क्केरी नायका (पाळेगार) ने बांधा.. इस कोटे में एक के अंदर एक ऐसे नौ कोटे (तटबंदी) थे.. अभी ७ कोटे बचे है..” “बाकी दो कोटे का क्या हुआ?”.. “वो गाव के लोगो ने घर गीर बनाको उने तोड दिया”.. “अच्छा !”.. “यहा देखनेके लिये क्या क्या है ?” “यहा ये सम्पिगे सिद्धेश्वरा स्वामी का मट्ट, वो सामने मंदिर है ना वो मद्क्केरी नायका जो यहा के राजा थे उनकी देवी हिडीम्बेश्वरी का मंदिर है.. ये कोटे बहुत बडा है.. इधर कुछ् कुछ् गट्टा में शेर और बेअर कि गुफा रहता है..” “गट्टा !” “वो सामने दिख रहा है ना.. पहाड जैसा .. यहा उसको गट्टा कहते है.. ” “और क्या क्या है ?”.. “और क्या भी नही रहनेका..“..”वोह सामने वोह छोटे गट्टा पे वो सर्कल जैसा क्या है?”.. “हा उसको तुप्पदू बतेरी कहते”.. “अच्छा अच्छा.. इसको हम अंग्रेजी में Bastion और मराठी में बुरुज कहते है..” “वो मद्क्केरी नायका सैनिक का एन्ट्रन्स एक्झाम होता था.. ये बतेरी पे..” “वो कैसे?” .. वो जो बतेरी पे जाने को छोटे पद मार्क्स है ना .. स्टेप्स .. ‘हां’.. उसपे तुप्प (तूप) डालते थे और फिर जो इस बतेरी (बुरुज) पे चढ के पहले वापस आनेका उसको फिर मदक्केरी नायका उनके आर्मी में लेते थे..” “मतलब जमा करते थे..?” “हां”
“अच्छा यहा और क्या देखने को मिलेगा”.. “वहा.. वो मदक्केरी नायक का ऑफिस (कचेरी) का लेफ्ट में ओनाके ओबव्वा किंडी है ?”.. “किंडी मतलब.. ?”.. “वो दो गट्टा (डोंगर) के बीचमे छोटा रोड जाता है..” “अच्छा .. मराठी में हम उसको खिंड कहते है..” “उसका भी एक स्टोरी है.. ”.. “बतावो यार“.. वो गेट पे ऐसे तलवार लेके खडा रेहता है ना सैनिक.. द्वारपाल .. वहा पे एक कलानायक नामक सैनिक था.. एक बार वो रात में खाना खा रहा था.. ऐसे वोह पीछे साईड का गेट है उधर उसके घर में खाना खा रा था.. और हैदर अली के सैनिक किले में घुस रहे थे.. ये वो खाना खाने वाले सैनिक कि बीवी ने देखा.. वो देखी तो उने हसबंड काना ख रे थे.. ओर इधर के औरत अगर पती काना का रे तो उनको डिस्टर्ब नही करते .. तो उने सोचे के मै हि कुछ तो करेंगे करके… उने घर में क्या मिलता वो धुंडा.. तो उने ‘ओनाका’ (मुसळ) मिल गये तो वो ओनाका लेके गये’.. वो किंडी में एक ऐसा छोटा रास्ता रेहता है.. वो हैदर अली का सैनिक वहां से आया तो ओबव्वा उनके सर् पे ओनाका मार के .. उनको पुरा मार देते.. और ऐसे एक के उपर एक डाल देते.. इधर ओबव्वा के हसबंड को कुछ् मालूम नही पडता.. वो अपना काना बिना काके (खाना खाके) वापस गेट पे आता तो ! देखा के हैदर अली के ५०-१०० सैनिक मर जाता.. करके उने पता चलता की हैदर अली के सैनिक कोटे में घुस गये करके.. “तो ओबव्वा के पती ने उसको बोला.. बाकी सैनिक को उपर घुसने को नही देना .. ओर वो बाकी सैनिक को बुलाने चला गया.. फिर बाकी सैनिक आते है ओर हैदर अली के सैनिक को मार देते है..” ये सब मदक्केरी नायका को पता चलता है तो वो बोलता है.. ये किंडी का नाम आजसे – “ओनाके ओबव्वा किंडी है करके”..
“सही है.. और वो हिडीम्बेश्वरी मंदिर के बरे में कुछ् बतावो..” .. “हां.. वो मंदिर मद्क्केरी नायका Family मंदिर है.. उधर उनके बिना कोई भी जाने को नही सकता.. वो पुराने जमाने में.. मदक्केरी नायका पैलवान जैसा थे.. जब युद्ध पे जाते थे तो ये देवी के दर्शन करते थे.. आरती करते थे और युद्ध से आने के बाद वापस दर्शन करते थे.. .. आरती करते थे यहां लेडीज को जाना मना है.. ये देवी के उपर चंपक फुल चढाया जाता है और रोज प्रशाद में वो राजा को मिलता..” .. ‘आगे?’ तो एक दिन वो मंदिर का पुजारी रेहता है.. उसका बीवी जिद् करता है.. मुझे वो पूजा का वो चंपक फुल होना बोलके.. जिद् करता है.. बहुत रोता है.. तो पुजारी बोलता है .. राजा युद्ध पे जायेगा तब ले लेंगे करके.. एक दिन राजा युद्ध पे जाता है तो पुजारी का बीवी आता है और पूजा का चंपक फुल लेके जाता है और उधर अपने बालों कां लगाया दुसरा फुल रखता है.. बादमे.. मदक्केरी नायका आ जाता है.. और सीदा मंदिर में दर्शन गिर्षण करनेके लिये आ जाता.. और बादमे पूजा का चंपक फुल लेता तो उसको फुल के उप्पर एक लंबा बाल नजर आता तो उने पुजारी को पुछता के इधर को कोई आय था क्या करके.. पुजारी ‘नही’ बोलके झूट बोलता.. तो राजा को पता चलता है.. फिर मदक्केरी नायका वो पुजारी को कोडे मारने की सजा देता है.. तो पुजारी का बीवी बोलता है मैने लिया करके.. तो राजा बोलता है तुम्हारे सर् के बाल यहां अर्पण करो करके.. तो इसीलिये आज भी यहांपे देवी को बाल अर्पण करनेकी प्रथा है.. वहां तिरुपती के इधर और इधर हिडीम्बेश्वरी मंदिर में.. अभी आजकल कोई नही करता !
कानडी राजू गाईड एकदम फॉर्मात आला होता.. और इस किले का क्या हिस्टरी है.. “ये कोटे एक और एक बात है.. वो गणेशजी का मंदिर है ना.. उधर जो गट्टा (डोंगर) पे पत्थर है.. उधर देखा तो.. वो पत्थर नाही है करके मालूम पडता..”.. फिर? ..”वो चित्र है.. यहां पत्थर के अलग अलग चित्र देखनेको सकते.. कोई पत्थर rabbit जैसा.. कोई हाथी जैसा.. कोई फ्रॉग जैसा.. तो कोई साप के जैसा दिखता.. बोलके.. ये किले का नाम चित्रदुर्ग पड जाता..”.. इथे दगडांचा आकार प्राण्यांच्या चित्रासारखा दिसतो म्हणून नाव चित्रदुर्ग.. चित्रांचा दुर्ग.. चित्रदुर्गाची ही खासियत पाहून थक्क झालो..
ये जो हिडीम्बेश्वरी मंदीर है.. उसके बाजू में Food Storage का कोठी है (धान्य कोठार) | और वहा दो बडे खंबा दिखता वोह.. क्या? वो पता नही.. लेकीन उसके राईट में एक छोटा tank दिखता.. वहा पे होली खेलते थे.. और उसके तोडा आगे.. मद्क्केरी नायका का ऑफिस है (कचेरी)..| यहा जो उपर कोटे है.. उसके अंदर एक जमीन के नीचे और एक कोटे है.. उसका रस्ता.. हिडीम्बेश्वरी मंदिर में निकलता है..| लेकीन अब उसमे सब वो पत्थर जाके.. उधार जानेको नही सकते.. जब भी कभी कोटे पे लडाई होने का तो.. सब राजा लोग का परिवार.. ये अंदर के कोटे में जाके छुप जाता बोलके.. दुश्मन को कोई पता नाही चलता.. के उने किधर छुपते करके”.. राजू गाईड च्या या म्हणण्यात काही तथ्य असावे दिसते.. या किल्ल्याची रचना बघता.. इथे भुयारी रचना असण्याची दाट शक्यता आहे..राजू गाईडचा निरोप घेवून.. गडाचा निरोप घेतला.. उद्या परत एकदा किल्ला पहायचा असल्याने.. मुक्कामाची जागा शोधण्यास निघालो.. NH-४ वर एक जंक्शन लॉज पाहून तिकडे मुक्काम केला..
सकाळी नऊच्या दरम्यान चित्रदुर्ग सफर पुन्हा सुरु केली.. चित्रदुर्ग हा एक भव्य किल्ला आहे.. तो पाहण्यास दोन दिवस अपुरे आहेत.. एखाद्या साम्राज्या सारखा.. बऱ्याच एकपाषाणी (boulder) टेकड्या मिळून हा किल्ला तयार झाला आहे.. गडाला चौफेर आणि ७ स्तरांची तटबंदी आहे.. मध्यभागी असलेल्या एकपाषाणी टेकडीवर गडाचा बालेकिल्ला आहे.. या किल्ल्याला कल्लीना कोटे (दगडांचा दुर्ग) असेही म्हणतात.. सुमारे १५०० एकरात पसरलेला हा दुर्ग म्हणजे विजयनगर च्या बलशाली साम्राज्याचे एक प्रतिक आहे.. वेदवती नदीच्या खोऱ्यात असलेल्या डोंगर रांगात हा भव्य पाषाण दुर्ग वसलेला आहे.. १९ भरभक्कम दरवाजे, ३५ आंतरद्वार आणि तेवढेच चोर दरवाजे.. आणि गडावर टेहळणी साठी तब्बल २००० बुरुज (कानडी भाषेत बतेरी) आहेत.. गडावर सात पदराची तटबंदी आहे (येलूसुत्तिना कोटे).. तसेच या किल्ल्यावर १८ मंदिरे होती असे इतिहासकार सांगतात.. त्यापैकी हिडीम्बेश्वरी मंदिर.. एकनाथेश्वरी मंदिर, सम्पिगे सिद्धेश्वरा, फाल्गुनेश्वरा मंदिर, गोपाल कृष्णा, अंजनेया मंदीर (हनुमान), सुब्बराया मंदीर हि काही प्रमुख मंदिरे आहेत.. गडाच्या बाह्य तटबंदी ला चारही बाजूस चार दरवाजे आहेत (कानडी भाषेत बगीलू).. रंगायना बगीलू, सिद्धायना बगीलू, उच्चांगी बगीलू आणि लालकोटे बगीलू.. ग्रानाईट दगडांनी बांधलेली चौफेर तटबंदी.. गडाच्या पूर्वेकडील दरवाजाची रचना बहामनी स्थापत्य रचनेवर आधारली आहे.. मुख्य द्वाराच्या बाह्य बाजूस शेषनाग.. समोर नंदी आणि शिवलिंग.. तर आतील बाजूस डाव्या भिंतीवर.. द्विमुखी गंडभेरुड शिल्प आहे.. या चित्रात.. दोन चोचीत दोन हत्ती आणि पंजात दोन असे शिल्प कोरल्याचे दिसते.. मुख्य द्वाराच्या उजवीकडे एक लहान दरवाजा आहे.. यातून आत आल्यास उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो याच्या डावीकडे.. तुपाच्या विहिरी आहेत.. दुसऱ्या द्वारातून आत गेल्यास पुन्हा आणखी एक दरवाजा आणि उजवीकडे एका मंडपात काही हत्तीचे पुतळे उभारलेले दिसतात.. हे युद्धात कामी आलेल्या हत्तींचे स्मारक आहे.. इथे डावीकडे वळसादुहेरी तटबंदी तून आत शिरल्यास आणखी एक दरवाजा आणि उजव्या बाजूच्या कोपऱ्यात तटबंदीच्या तळाशी एक २x२ चोर दरवाजा दिसतो.. इथून आत जाण्यासाठी रांगून सरपटत जावे लागते.. इथून पुढे गेल्यास गडाच्या तटबंदी चा ४ था स्तर नजरेस पडतो.. इथे डावीकडे.. दगडांवर काही आकृत्या कोरल्या आहेत.. पण अस्पष्ट असल्याने नीटसे काही कळण्यास मार्ग नाही.. या चौथ्या दरवाजा पर्यंत पोहोचण्यासाठी काही कातळ कोरीव पायऱ्या आणि दुहेरी तटबंदी तून जाता येते.. या दरवाजा तून आत शिरताच.. आतील देवड्यांच्या खांबावर बरीच साहस शिल्पे कोरली आहेत.. यात दोन हत्तींची झुंज.. वाघाशी दोन हात करणारा बहाद्दर लढवय्या सैनिक.. अश्वधारी भालाफेक करणारा सेनापती.. तांडव करणारा शिव.. कुस्तीसाठी शड्ड ठोकणारा मल्ल.. आणि कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण अशी शिल्पकला दिसते.. इथे एका काळ्या पाषाणात कोरलेली अंजनेयाची (मारुती) मूर्ती आहे.. मारुतीला नमस्कार करून पुढे निघायचं.. इथे या ४ थ्या दरवाजालाही एक उप दरवाजा आहे.. त्याच्या कमानीवर गणेश मूर्ती कोरली आहे.. दरवाजा ओलांडून येताच पुन्हा मागे द्वाराकडे पाहिल्यास डावीकडे दोन माशांचे शिल्प कोरले आहे.. याचा अर्थ म्हणजे.. इथे जवळच पाण्याचा साठा आहे याची ही खुण आहे.. थोडं पुढे पायऱ्यांनी चालत गेल्यास.. एक गणेश मंदिर आणि उजवीकडे.. एक कुस्तीचा आखाडा आहे.. त्यात डोकवायचं आणि इथे उभे राहून उजवीकडे नजर फिरवत ओबड-धोबड दगडांच्या आकाराने नैसर्गिकरित्या तयार झालेल्या विविध प्राण्यांची चित्रे पहायची.. आणि या किल्ल्याला चित्रदुर्ग का म्हणायचं याचं उत्तर मिळवायचं.. या आखाड्याला काही लोक दारूचे कोठार देखिल म्हणतात.. पण इथली प्रकाश व्यवस्था पाहून हा आखाडा असावा असे दिसते.. आत मध्यभागी.. उजेडासाठी पाडलेले झरोके पाहून याची खात्री पटते.. इथे आखाड्याच्या मागे.. काही ताशीव दगड. आणि त्यावर.. एका सरळ रेषेत दिसणारी ठिपक्याची रांग कोरल्याचे दिसते.. ही रांग म्हणजे दगड फोडण्याचे त्या वेळचे तंत्र.. मोठ्या दगडाला.. मधोमध एका रांगेत छिद्रे पडून.. त्यात सळईच्या सहाय्याने दगडाचे दोन भागात विभाजन करता येते.. गडावरील सर्व चिरे याच तंत्राने तयार करण्यात आले आहे.. बऱ्याच वेळा.. या छिद्रात पाणी सोडून देखिल याचे दोन तुकडे करता येतात.. प्रत्येक चिरा मोठ्या दांडग्या आकाराचा आहे.. तर असं हे दगड फोडणीचे अभिनव तंत्र पाहून चकित व्हायचं आणि गडाच्या बालेकिल्ल्याच्या द्वाराशी येवून पोहचायचं..
बालेकिल्ल्याच्या द्वारातून आत येताच.. डावीकडे हिडीम्बेश्वरी मंदिर आणि समोर.. मठाच्या उजवीकडे तुप्पद बतेरी (मुख्य बुरुज) आहे.. पण वर जाण्यासाठी मध्यम प्रस्तरारोहण करून वर जाता येते.. साधारण ४०० एक फुट अशा एकसंध दगडावर बांधलेल्या या बुरुजावर वर जाण्यासाठी ठराविक अंतरावर खोबणी तयार केल्या आहेत.. पण.. पाय सरकला तर कपाळमोक्ष नक्की.. त्यामुळे जपून वर जायचं.. वर चढून वर गेल्यास.. गडावर एक चौफेर नजर टाकल्यास.. या किल्ल्याचा अफाट पसारा ध्यानी येतो.. एकदम 3D view..
हिडीम्बेश्वरी मंदिराकडे पहात.. बुरुजावरून उजव्या दिशेने एक प्रदक्षिणायुक्त चक्कर मारायची.. गडाचे काही दरवाजे आणि समांतर उभय तटबंदी पाहून धन्य व्हायचं.. आणखी थोडे पुढे जाताच.. राजवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेला दरवाजा दिसतो.. पुन्हा पुढे ५०-६० उंबऱ्याची पडक्या वास्तू.. आणि मागे.. भव्य प्रासाद (राजवाडा) नजरेस पडतो.. तसेच काही मातीचे रांजण देखिल दिसतात.. हे धान्याचे रांजण असावेत… आणखी पुढे उजवीकडे.. झुडुपांचे जंगल आणि लांबच्या लांब तटबंदी दिसते.. हि उजवीकडे तटबंदी जिथे संपते.. तिथे.. एक मंदिर आहे.. आणि काही गुढरम्य गुहा आहेत.. पण इथे बिबट्याचा आणि अस्वलांचा वावर असल्याने जरा जपून.. आक्नही थोडं.. उजवीकडे.. ओबव्वा खिंड.. कचेरी.. असे.. अवशेष नजरेस पडतात.. तूपद्दू बुरुजावरून फेरफटका मारून.. जीव मुठीत घेवून.. सांभाळत खाली उतारायचं आणि पाळेगारांच्या कचेरीचा एक फेरफटका मारायचा..
मातीच्या विटा आणि मातीच्या भिंती पाहून हे बांधकाम मातीचे असून इतकी वर्ष सुरक्षित कसे राहिले याचा विचार करीत पुढे निघायचं.. इथे एका लहानग्या खिंडीतून खाली उतरताना.. दिसणारे.. घोड्याच्या टापांच्या आकाराचे खाचखळगे पाहून आश्चर्य वाटून जाते.. हे खळगे.. घोड्यांना ग्रीप/आधार मिळावा म्हणून तयार करण्यात आले आहेत.. हि टिल्लूलिंबू-टिंबू खिंड उतरून खाली उतरताच.. डावीकडे.. एक मोठा बांधीव तलाव.. आणि मध्ये पायवाट.. पुन्हा उजवीकडे छोटा तलाव.. पाण्याचे पाट.. असं अभिनव इंजिनिअरिंग पाहून उजवीकडे शूर रणरागिणी ‘बनाके ओबव्वा’ खिंड पाहण्यास निघायचं.. इथे मोठाल्या पडलेल्या दगडामधून हि खिंडीची वात आहे.. पुढे.. रस्ता संपतो आणि.. जेमतेम एक माणूस सरपटत जाईल असा झरोका दिसतो.. हीच ती छुपी वाट आहे.. इथे एका वेळेस फक्त एक माणूस आत-बाहेर करू शकतो.. इथे रणरागिणी ओबव्वा या एका सैनिकाच्या पत्नीने हैदर अलीच्या शे-दीडशे सैनिकांना कंठस्नान घातल्याची कथा प्रसिद्ध आहे..
तर अशा ऐतिहासिक खिंडीला धावती भेट देवून.. परत फिरलो.. परतताना ४ दरवाजा पाशी एक पोनी बांधलेला इसम.. बुरुजावर रॉक क्लायम्बिंग करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले.. जरा त्याच्याशी गप्पा मारल्या तर.. हा भारताचा नं. १ दोराशिवाय कड्यावर/भिंतीवर लीलया चढून जाणारा एक धाडसी रॉक क्लायंबर असल्याचे समजले.. “मंकी राजू”.. मग सुटीच्या दिवशी नवीन पिढीत प्रस्तरारोहणाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा प्रात्यक्षिके दाखवितो.. एका ५० फुटी बुरुजाच्या खाली उभे राहून त्याने.. प्रात्यक्षिक सुरु केले.. “मै जो इस wall पे चढने वाला हू उसे घर पे ट्राय मत करो.. बहुत लोगोंको मेरा क्लायम्बिंग देखको हार्ट का झटका आ जाता.. ये एक कला है.. और उसे अच्छेसे सिकना पडता है..|” एवढे वाक्य बोलून हा पठ्ठ्या सरळसोट ५० फुटी भिंतीवर एका मिनिटात लिलया चढून गेला.. वर चढताना तो एके ठिकाणी घसरला आणि काळजाचा ठोका चुकला.. पण त्याची ग्रीप मजबूत होती.. मग त्याने.. एक हात खोबणीत रुतवून एक कोलांटी मारली आणि सरसर वर चढून गेला.. तो वर जाताच उपस्थितांनी एकंच गलका केला आणि टाळ्या वाजवून त्याच्या कलेला उत्स्फूर्त दाद दिली.. प्रात्यक्षिकाचा दुसरा भाग तर आणखी अफलातून होता.. दोन भिंतीच्या कोपऱ्यातून हि चढाई होती.. सरसर माकड चढावे तसा हा राजू माकडांना लाजवेल अशा थाटात चढत होता.. म्हणूनच त्याला मिळालेली ‘मंकी राजू’ हि उपाधी योग्य असल्याचे याची प्रचीती त्याचे चढाईचे नैपुण्य पाहून येते.. देश-विदेशात प्रसिद्ध अशा या मंकी राजूच्या live rock climbing डेमो ने डोळे मोठे झाले.. अशा या अवली बरोबर मी आणि मृणालने एक-दोन ग्रुप फोटो काढून घेतले आणि निघालो
अशा या एका दिवसाच्या भेटीत जेवढं शक्य आहे तेवढा गड पाहून परतीच्या प्रवासाला निघालो.. एक अफाट प्रस्तरदुर्ग.. पाहायला एक दिवस हा फार कमी अवधी आहे.. पण ‘पदरी पडले पवित्र झाले’.. भटकंती बरोबर आय.टी. ची खर्डेघाशी देखिल तितकीच महत्वाची असल्याने.. चित्रदुर्ग चा निरोप घेतला.. मुंबई-बंगळूर महामार्गावरून परत येताना वाटेत..ऐमंगला गावाजवळ दगडी फरशा रचून तयार केलेली एक तटबंदी दिसते.. जरा इथे काय दिसतंय ते पाहण्यास तिकडे निघालो तर हा एक भुईकोट असल्याचे कळले.. आतमध्ये भुईसपाट पण अभिनव असा बुरुज हे याचे वैशिष्ट्य.. आत जाण्यास निघालो तर आत पोलिस ट्रेनिंग सेंटर असल्याचे कळले.. त्याने त्याला या किल्ल्याबद्दल तशी काहीच माहिती नव्हती.. जाता जाता.. गेटवर च्या नवशिक्या पोलिसाला नाव विचारले.. तर तो म्हणाला.. मेरा नाम दिलीप कुमार है..!! उडालोच दिलीप कुमार हा कानडी पोलिस आहे.. असो.. दिलिप कुमार पुढ्यात असूनही त्याची सही न घेता या दोन दिवसीय भटकंती चा गाशा गुंडाळला आणि पुन्हा IT ची हमाली करण्यास सज्ज झालो..
माधव कुलकर्णी २०१२