अलिबाग ची रॉयल दुर्गभ्रमंती – भाग १

Alibaug (Kolaba fort, Sarjekot, Hirakot).. Thal Port (Landfort, Khanderi Underi)
अलिबाग ची रॉयल दुर्ग भ्रमंती २०१० – भाग १

अलिबाग प्रभागातील किल्ले  – किल्ले कोलाबा, सर्जेकोट आणि हिराकोट,
थळ बंदराचे दुर्ग शिल्प थळचा उध्वस्त खुबलढा किल्ला आणि खडकाळ बेटावरचे भले दांडगे किल्ले खांदेरी आणि उंदेरी
रेवदंडा टापूतील किल्ले – पोर्तुगीज बांधणीचा रेवदंडा, चौल बंदराचा रक्षक चौल चा किल्ला, लांबलचक तटबंदीचा देखणा किल्ले कोर्लई..
दंडराजपुरीचे किल्ले – किल्ले जाझिरे-महरूब ‘किल्ले जंझिरा’, सिद्दीच्या नाकावर टिच्चून बांधलेला किल्ले पद्मदुर्ग, टेहळणीसाठी उभारलेला किल्ले सामराजदुर्ग.. 
कोकण आणि मराठी माणूस यांचे नात जिव्हाळ्याचं आणि अतूट आहे.. मराठी माणसाला ‘आमचो कोकन’ बद्दल प्रचंड प्रेम.. आत्मीयता आहे.. इथली तांबडी माती.. सुस्वच्छ (!) किनारे.. नारळी पोफळीच्या बागा.. तोंडाला पाणी आणणारे मासे.. तांदळाची भाकरी आणि इथला आरस्पानी निसर्ग.. काय काय नाही या आमच्या एकमेवाद्वित्य अशा.. ‘आमचो कोकनात’..
या कोकणावर कधी काळी परशुरामाने राज्य केलं आणि तदनंतर मराठी मनावर राज्य करणारा ‘जाणता राजा’ छत्रपती शिवाजी राजांनी आणि हिंदवी सेनानींनी.. या भूमीला भगव्या रक्ताचं अर्ध्य देवून पवित्र केलं.. विलासी मदधुंद पाशवी यवनी शक्तींचे या भूभागातून उच्चाटन केले आणी येथे हिंदवी स्वराज्याची गुढी उभारली.. हिंदवी स्वराज्य सेनेने या कोकणचा समुद्र, त्याचा विस्तीर्ण असा हा किनारा प्राणपणाने लढविला आणि स्वराज्यात आणला.. तर असा हा ‘आमचो कोकन’.. अलिबाग पासून रेडी पर्यंत पसरलेला.. विविध रंगानी नटलेला विशाल कोकण.. अशा या कोकणातील डहाणू-अलिबाग ते मुरुड या टापूत अनेक शिवकालीन, बहामनी काळातील भुईकोट, जलदुर्ग ठाण मांडून बसले आहेत.. 
यंदाचा दसरा शुक्रवारी येत असल्याने.. लॉंग विकेंड ची संधी आयतीच दारात चालून आली.. अशी संधी सोडून कसं चालणार होतं.. जमेल तेवढ्या किल्ल्यांच्या सीमा लांघुनच यंदा सीमोल्लंघन करण्याचा घाट घातला.. चंद्रकांतला विचारलं त्याने दिनेश अन्नाला टेली कॉन्फरंस मध्ये घेतला.. आणि भटकंती साठी कुठलं ठिकाण फायनल करावं याच्यावर टेली चर्चा आयोजित करण्यात आली.. सू-सू फोटोग्राफर्स (सुदर्शन-सुयोग) हे देखील या टेली चर्चेत सहभागी झाले.. चर्चेच्या दुसऱ्या मिनिटाला चंद्रकांत दांडेली ला जावून पोहोचला.. परत यायला तयारच होईना.. त्याला म्हटलं भाऊ एक तर सुट्टी ‘इन मीन तीन’ दिवस आणि त्यात दांडेली म्हणजे उगाच लांब होतंय.. जरा जवळचं बघू काहीतरी.. त्याला म्हटलं दांडेली राहू दे.. यंदा फणसाड अभयारण्य बघू.. अन्ना चं ध्यान दांडेली वरून फणसाड कडे वळवलं.. आणि हळूच अलिबागच्या दुर्गभ्रमंतीचा प्लान या टेली चर्चेत घुसवला.. फणसाडचं नाव ऐकताच.. शेवटी हा पठ्ठा नाही.. हो.. करत अलिबाग मोहिमेसाठी तयार झाला आणि या दुर्गभ्रमंतीवर सरतेशेवटी शिक्कामोर्तब झालं.. पण दसरा घरी साजरा करायचा असल्याने तीन दिवसांच्या मोहिमेला कात्री लावून दोन दिवसांचा बेत ठरला.. ठरलं तर मग ..”सरताच दसरा.. चलो.. अलिबाग किनारा”.. साधारण ट्रेक प्लान खालील प्रमाणे ठरला: 
दिवस पहिला –
१.      स. ६ वा. अलिबाग किनाऱ्यावर आगमन
२.      कोलाबा – सर्जेकोट दुर्गभ्रमंती
३.      ९.३० वा. नाश्ता आणि जमल्यास हिराकोट बाह्यदर्शन
४.      स. १० वा. थळ बंदर
५.      खांदेरी – उंदेरी आणि उध्वस्त थळ चा किल्ला
६.      दु. २.३० वा. रॉयल लंच @ अलिबाग
७.      चौलचा राजकोट, रेवदंडा आणि कोर्लई किल्ला
८.      सा. ७ वा. दरम्यानच्या समुद्रकिनारी तंबूत मुक्काम 
दिवस दुसरा –
१.      पहिल्या दिवसातले काही उरलेले किल्ले
२.      स. ९ वा नाश्ता आणि मग किल्ले पद्मदुर्ग
३.      दु. १२ वा. जेवण @ दंडराजपुरी
४.      किल्ले जाझिरे महरूब अर्थात जन्झीरा
५.      दु. ४ वा. खोकरी घुमट आणि परतीचा प्रवास
६.      वेळ मिळाल्यास फणसाड अभयारण्य
७.      रा. ९ वा.. ताम्हिणी घाट मार्गे पुण्यास प्रस्थान 
दसऱ्याची संध्याकाळ होईतो एकूण सात मेंबर्स तयार झाले.. चंद्रु ‘द भोळासांब’ ने प्रत्येक मेंबर्स ना थेट दारात.. ‘पिक.. अप आणि ड्रॉप’ चे आश्वासन दिले आणि पुण्यातच ३-४ तास पिक-अप करीत चंद्रुची ‘मारुती व्हर्सा’ भिरभिरू लागली.. प्रथम वारजे ला अस्मादिक.. मग धायरीला दिनेश द सिंघम.. मग अपोलो टाकीज (ड्रायव्हर अन्नाचा ब्रेक).. मग युवराजांची (सुयोग) राजधानी जनवाडी.. नंतर संत तुकाराम नगरला सुदर्शन चक्र घेवून.. आणि शेवटाला निगडीला अन्वर मियांना उचलून पुढे निघालो.. तर हे असं रात्री अकराला सुरु झालेलं.. अखंड पुणे दर्शन उरकून शेवटी हायवे गाठला.. तेंव्हा एक वाजला होता.. 
चंद्रकांत ने गाडीचे सुकाणू युवराजांच्या हाती दिले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली.. ऑक्टोबर चा मुसळधार पाऊस पहिले प्रथमच पहायला मिळाला.. पावसाचा जोर इतका होता कि गाड्यांचा चाकांचा जोर कमी झाला आणि वायपर चा वेग वाढला.. मुंगीच्या वेगाने खंडाळा घाट उतरू लागलो.. पुढे बोगद्याच्या अलीकडे .. एक ट्रक थेट डोंगरावर चालून गेला होता.. पार उभा.. ट्रकसह सह्याद्रीच्या बेलाग कातळ-कडे चढू पाहणारा.. डेरिंगबाज असा एक अनोखा अन् कॉमेडी क्ल्याम्बर पाहून पुढे निघालो.. खोपोलीला बाहेर पडलो आणि पेण फाट्यावर ब्रेक घेतला.. त्याचं झालं असं कि चंद्रकांतला भूक लागली होती.. दशम्या उघडल्या आणि भर पावसात उभ्या उभ्या जेवण उरकलं.. इकडे पावसाची भूर भूर आणि तिकडे अन्ना ची आमटी वरपताना चाललेली फुर्र फुर्र.. यावेळेस हे दोनच आवाज मोठ्याने ऐकू येत होते.. आमटीचा भुरका ऐकून चार दोन आडोशाला बसलेली कुकूटी गुर्र्गुर्र करायला लागली.. शेवटी अन्नाची ढेकर ऐकली आणि अलिबागचा रस्ता धरला..

पहाटे.. चारला अलिबागला पोहोचलो.. थेट अलिबाग चौपाटीचा किनारा गाठला आणि इथेच मुक्काम करायचं ठरलं.. लगोलग मारुती व्हर्साची सीट पाडली आणि त्यावर क्यारी म्याट पसरल्या.. लाटांची गाज आणि डासांची गुणगुण ऐकत झोपी गेलो.. 
दिवस पहिला : 
पहाटे सहाला जाग आली ती मोबाईलचा कर्कश अलार्म वाजला म्हणून.. मोबाईलची पिरपिर बंद करून डोळे चोळत खाली उतरलो.. तर समोर मागे चार दोन नारळीच्या झाडांतून डोकावणाऱ्या कोलाबा किल्ला आणि सर्जेकोट या जोड किल्ल्याची धुसर आकृती दिसू लागली..   
 
धुसर धुसर वाट धुक्याची … गाज ऐकतो घन लाटांची
आला दिनकर आला दिनकर … स्वार होवुनी लाल रथावर
 पंख निघाले त्याच नभावर … आस घेवूनी तिच निरंतर  
गड्कोटांचा ध्यास निरंतर … असे शुभंकर असे शुभंकर
चौपाटीच्या दगडी पायऱ्यांवरून पाहिलं तर समुद्राला उधाण आलं होतं.. कोलाबा किल्ल्यावर ओहोटीच्या वेळी चालत जाता येतं पण भरतीला होडी शिवाय पर्याय नाही.. मग आमच्या कोलीबांधवांकडे चौकशी केली.. एक नावाडी म्हणाला, १०० माणशी द्या मग गडावर नेवून सोडतो.. शेवटी ४०० रुपयात ६ माणसांना सोडण्यास कोळीबांधव तयार झाला.. आणि सोबत लाईफ जाकेट फ्री..!! बोटी च्या प्रवासात लाईफ जाकेट फ्री.. मंडळाच्या १०० टक्के सुरक्षेची हमी घेवून बोटीत बसलो.. भरतीच्या लाटांचा जोर पोट आणि काळजाचा कोपरा न कोपरा ढवळून काढत होता..  वीस एक मिनिटातच नावाडी काकांनी .. कोलाबा किल्ल्याच्या प्रवेशद्वारी नेवून सोडलं.. तासाभरात परत येतो असं सांगून नावाडी पुन्हा किनाऱ्याकडे निघून गेले.. म्हणजे गड पाहण्यास साधारण तासाभराचा अवधी होता.. तासाभराने ‘नक्की या हं’ असा नावाड्याला एक काळजीयुक्त Reminder देवून गडाकडे मोर्चा वळविला..

किल्ले कोलाबा / अलिबागचा किल्ला – गडाच्या मुख्य द्वाराच्या कमानीवर मध्यभागी गणेश मूर्ती कोरलेली असून, त्याच्या वरच्या भागात दोन हत्तींची झुंज असे चित्रशिल्प कोरल्याचे  दिसते.. दरवाजाच्या वरच्या भागात.. चौकटीच्या वरच्या आडव्या पट्ट्यात साधारण ८-१० रकाने असून त्यात कमलपुष्प, मोर, हरीण यांची आकर्षक शिल्पचित्रे कोरल्याचे पाहायला मिळते.. कमानीच्या दोन्ही बाजूस वर मुक्तहस्त व्याघ्रशिल्प आहे.. सह्याद्रीच्या अनेक गडकोटांच्या प्रवेशद्वारी कोरलेली शिल्पे हा एक संशोधनाचा विषय होवू शकेल.. गडाचा मुख्य द्वार जितके मजबूत तितका गड अजिंक्य आणि सुरक्षित.. 

भरभक्कम आणि विशाल अशा मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला..जाझिरे कोलाबा हा किल्ला सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून गड पाहण्यास तिकीट काढावे लागते.. कुठलाही गड पहावा तो तटबंदीवरून फेरफटका मारूनच पहावा.. म्हणजे गडाच्या अंतरंगात डोकावता येतं.. तटबंदी वरून चक्कर मारली कि आपसूक लक्षात येतं.. गडावर नेमकं काय पाहायला मिळणार ते .. !! गड कोटाचे गतवैभव अनुभवावे तटबंदिवरून अगदी डोळेभरून.. 

मुख्य द्वारातून आत शिरल्या शिरल्या डावीकडच्या पायऱ्या चढून तटबंदीवर येवून पोहोचलो आणि घड्याळाच्या काट्यासारखं प्रदक्षिणा चालू केली.. कोलाबा किल्ल्याचा तट साधारण २०-२५ फुटी उंचीचा असून गडावर एकूण १७ बूरुज आहेत.. गडाच्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूस भरभक्कम बूरुज आहेत.. गडावर डावीकडून प्रदक्षिणा मारताना भवानी मंदिर, दर्गा, भुयारी बांधीव पाण्याचं टाकं (अंधारबाव) आणि  धान्य कोठाराचे अवशेष नजरेस पडतात.. गडाच्या मधोमध नुकत्याच बांधलेल्या सिमेंट पायवाटेने जाताना या वास्तू पाहता येतात..
गडाच्या मधोमध पंचायतन असून.. इथे तीन मंदिरे पहायला मिळातात.. मंदिराच्या कळसावर नजर टाकता कोरीव नक्षीकाम लक्ष वेधून घेते.. पंचायतनात मध्यभागी गणेश व बाजूने शिव, विष्णू, सूर्य आणि देवीच्या मूर्ती ठाण मांडून बसल्याचे दिसले.. मंदिराचे बांधकाम पेशवाईच्या भरभराटीच्या काळात झाले असावे असे दिसते.. पंचायतनासमोर एक तुळशी वृंदावन असून त्यावरील शिल्पकला फार सुरेख आहे.. उजवीकडे अंजनेयाचे म्हणजेच मारुती बाप्पा चे सुंदर मंदिर असून ते शिवकालीन असण्याची शक्यता आहे..
पंचायतनासमोर एक भला मोठा बांधीव तलाव असून त्याला चारही बाजूंनी दगडी चिऱ्याच्या भिंतींनी झाकून ठेवले आहे.. या तलावात खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांचे बांधकाम अद्वितीय आहे.. तट बंदिवरून चालत दर्ग्याशेजारी खाली उतरलो.. अंधारबाव पाहून पंचायतनाकडे येवून पोहोचलो.. संगमरवरी दगडात घडवलेल्या या पंचदेवतांच्या चरणी नतमस्तक होवून यशवंत दरवाजाकडे (दर्या दरवाजा) निघालो.. वाटेत डावीकडे पडक्या राजवाड्याचे .. आणि धान्य कोठाराचे अवशेष दृष्टीस पडतात.. यशवंत दरवाजाच्या अलीकडे एक राउळ किंवा घुमटी आहे.. याला कान्होबाची घुमटी म्हणतात.. या मंदिराच्या अलीकडे महिषासुरमर्दिनीचे मंदिर आहे.. यशवंत दरवाजावरही शिल्पकलेचा वारसा पाहता येतो.. कमानीच्या वरच्या भागात आडव्या पट्टीवर मगर, किर्तीमुख, कमळ आणि हिरा (डायमंड) कोरल्याचे दिसते..
यशवंत दरवाजाला दर्या दरवाजा असंही म्हणत असत.. तर अशा शिल्पाकृतीने परिपूर्ण असलेला आणि स्वराज्याच्या वाटेवर यशवंत झालेला हा दिव्य दरवाजा पाऊन पुढे निघालो.. यशवंत दरवाजातून बाहेर पडताच कोलाबा किल्ल्याचा दक्षिण तट नजरेस पडतो.. थोडं पुढे खडकाळ जेट्टी आहे इकडे पूर्वी होड्या उभ्या करत.. पुन्हा दरवाजातून आत आलो.. दरवाजा आणि कान्होबाच्या घुमटीच्या अगदी मधोमध जाणारी पायवाट आपल्याला तटबंदी वर नेणाऱ्या पाय्र्यांकडे घेवून जाते.. पायऱ्या चढून वर आलो.. उजवीकडच्या काटकोनी तटबंदी वर उभ्या ठाकलेल्या बुरुजावर येवून उभा राहिलो.. तिकडे दिनेशभाई आणि सिंघमअण्णा ने एक रॉक क्लायम्बिंग चे छोटेसे सेशन उरकून घेतले.. तसे सू..सू (सुदर्शन-सुयोग) फोटोग्राफर्स नी क्यामेरे सरसावले.. बुरुजाच्या कातळ भिंतीवरील चिऱ्यातिल फटीत ग्रिप्स घेत.. मंडळाने Bassion Climbing  मोफत सराव करून घेतला.. अन्वर भाईनी फोटोसेशन पुरता बुरुज चढला आणि फोटो काढताच अवघडलेला देह बुरुजावरून खाली घेतला.. आणि सरळ पायऱ्यांनी तट गाठला.. तटावरून तसेच चालत .. पूर्वेकडील डावीकडच्या कोपरा बुरुजाकडे निघालो.. मध्ये एके ठिकाणी तुटक अशा तटबंदीवरून चंद्रकांत आणि मंडळींनी उद्या मारत फोटो काढून घेतले.. पुन्हा पंचायतन उजवीकडे ठेवत तटावरून चालत कोपरा बुरुजावर येवून पोहोचलो.. इकडे दोन तोफा नजरेस पडतात.. इंग्रजांनी यॉर्कशायरहून आणलेल्या या तोफा अजून सुस्थितीत आहेत.. उन-पावसात राहून थोडा गंज चढला इतकेच..
तोफांचे .. तोफाबरोबर.. मंडळाचे.. अतरंगी फोटोसेशन उरकून पुन्हा पुरातत्व खात्याच्या तिकीट खिडकी पाशी आलो.. इथे तिकीट फाडणाऱ्या काकांनी गडाबद्दल बरीच माहिती दिली.. टी अशी : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या जलदुर्गा चे काम अलिबाग पासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या या नवघर या खडकाळ बेटावर सुरु झाले.. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी थोरल्या महाराजांचे गड बांधण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले .. तदनंतर सरखेल कान्होजी आन्ग्रेंचा वचक आणि पुढे त्यांच्याच वंशातील पुढील पिढीची भाऊबंदकी या गडाने अनुभवली..सरतेशेवटी पेशवाईच्या अधिपत्याखाली असलेल्या या किल्ल्याचे इंग्रजावसान झाले”
गडाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत.. याशिवाय Gazetteers Of Bombay Presidency मध्ये दिलेल्या नोंदींमध्ये या गडाच्या इतिहासा बद्दल बरीच माहिती दिली आहे.. गडकोटाचा इतिहास जिवंत करणारी बरीच जाणकार मंडळी आपल्या नशिबाने महाराष्ट्रात आहेत.. माझा हेतू हिंदवी स्वराज्याचे गडकोट पाहण्याचा आहे..
असो स्वत:चं मार्केटिंग थांबवून पुन्हा भटकंतीकडे वळतो..अलिबागच्या कोलाबा किल्ल्याजवळ पूर्वेकडे आणिखी एक छोटा चौकीवजा किल्ला नजरेस पडतो.. हाच तो दुनियामे वर्ल्ड फेमस ‘सर्जेकोट किल्ला’.. जाझिरे कोलाबा या मुख्य जलदुर्गावर जमिनीवरून होणारे आक्रमण थोपवण्यासाठी या सर्जेकोट किल्लायची बांधणी करण्यात आली.. हा किल्ला एखाद्या चिलखतासारखा मुख्य किल्ल्याचे संरक्षण करतो.. शत्रूंना हा किल्ला म्हणत असावा.. ‘पहले छोटे भैया से दो हात करलो.. फिर बडे भैया है ही तेरी ब्यांड बाजाने के लिए..!’
सर्जेकोट प्रमाणे अलिबाग मध्ये किनाऱ्याजवळ आणि एक भुईकोट किल्ला बांधला आहे त्याचं नाव ‘हिराकोट’.. सध्या हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला जातो.. कोलाबा किल्ल्यापर्यंत पोहोचण्या आधी या दोन किल्ल्यांचा सामना करावा लागत असे..  आधी हिराकोट आणि मग सर्जेकोट.. या कुणाची बिशाद आहे कोलाबा जिंकण्याची.. 
कोलाबा किल्ला ते सर्जेकोट दरम्यानच्या पुळणीवर एक दगडी पूल बांधला आहे.. पण काळाच्या ओघात आणि लाटांच्या तडाख्यात या पुलाचा काही भाग खचून गेला आहे.. ओहोटीला खचलेल्या पुलाच्या मोठाल्या दगड धोंड्यावरून कसरत करीत वाट काढत सर्जेकोट ला जाता येतं.. 
आम्ही बिगीबिगी सर्जेकोट बघून घ्यायचं ठरवलं आणि सारासारा दगडी पुलाच्या डावीकडून जात.. पुढे पाण्यात डगमगणाऱ्या दगड धोंड्यावर पावलं टाकत.. सर्जेकोट च्या एकमेव द्वाराशी येवून पोहोचलो.. सुमारे तीस-एक फुट उंचीच्या धिप्पाड तटबंदीने उभारलेला हा उपदुर्ग.. अजूनही .. ‘काळाशी दोन हात करीत’.. ऐटीत उभा ठाकला आहे.. अगदी शड्डू ठोकत..
गडाच्या मुख्य द्वारावरील कमान पडलेली असून आता बाजूचे खांब आणि कातळी उंबरठा .. नजरेस पडतात.. आत शिरताच डावीकडे.. चाफ्याच्या झाडामागे तटबंदीलगत .. सरळ वर जाण्यासाठी जीना आहे .. तसेच पुढे उजविकडेही पायऱ्या आहेत..
पायऱ्या चढून वर आलो.. कोटाच्या उत्तरेकडील निमुळत्या तटावरून चालत शेवटच्या बुरुजावर येवून पोहोचलो.. इथे कोलाबा किल्ल्याचे राजबिंडे रुपडं Camera मध्ये साठवून घेतलं.. इथून कोलाबा किल्ला फार सुंदर दिसतो.. ‘सुंदर ते ध्यान उभे बेटावरी.. गडकोट देहावरी.. लेवुनिया’ अस्सं काहीसं विशाल दृश्य या छोटेखानी जलदुर्गावरून पहायला मिळालं..   
तटबंदी वरून फेरफटका मारून पुन्हा कोलाबा किल्ल्याकडे निघालो.. परतीच्या वाटेवर इथल्या उथळ किनारी.. सीगल पक्ष्यांचे थवे मासळीची न्याहारी करताना दिसले.. ते तिथून उडून जायच्या आत कोलाबा किल्ल्याच्या मुख्य द्वारी येवून पोहोचलो.. सकाळचे साडेनऊ वाजले असावेत.. नावाडी .. ‘हमारी नैया.. अलिबाग किनारी’ नेण्यासाठी वल्हे सरसावून सज्ज झाले होता.. सर्जेकोट आणि जझिरे कोलाबा या दोन नव्या दुर्गांचा निरोप घेवून नवीन दुर्गांना भेट देण्यास निघालो.. थळ बंदराजवळची दुर्गत्रयी.. किल्ले थळ, जलदुर्ग खांदेरी आणि उंदेरी.!!
खांदेरी- उंदेरीची अपूर्ण मोहीम .. हिराकोट चे बाह्य दर्शन 
अलिबाग चौपाटीला नाव किनाऱ्याला लागली आणि ‘हागणदारीयुक्त’ कोळीवाड्या जवळच्या पायऱ्या चढून चौपाटीवर आलो.. इथे सभा भरवण्यात आली.. आणि थळ-खांदेरी-उंदेरी हि दुर्गत्रयी पाहण्याचे एकमुखाने नक्की ठरले.. जास्त टाइमपास न करता मंडळाला गाडीत घुसण्याचे आवाहन केले.. अलिबाग चौपाटीवरून परतीच्या रस्त्यावर डावीकडे निघालो.. इकडे थोडं पुढे येताच थोडं मोकळं मैदान दिसलं आणि नंतर हिराकोट किल्ल्याची तटबंदी नजरेस पडली.. हिराकोट किल्ल्यात आजकाल तुरुंग असल्याने हिराकोट बाहेरून पाहता येतो.. आतून पहायचा तर एखाद्या मंत्र्याची परवानगी हवी किंवा आतल्या साहेबांशी जोरदार सेटिंग पाहिजे.. यापैकी कोणतीही गोष्ट शक्य नसल्याने.. हिराकोट चि तटबंदी बाहेरून पाहून तडक थळ बंदराकडे निघालो.. अलिबाग ते मांडवा / रेवस रस्त्यावरून माग काढत अलिबाग एस.टी. स्थानक गाठले.. स्थानकावर खाण्या-पिण्याच्या हातगाड्या दिसताच.. मंडळाचे कार्यकर्ते ‘अण्णा जेवायला.. जेवायला.. जेवायला’.. असं म्हणू लागली.. तशी सिंघम अण्णा ने गाडी बाजूला घेतली.. इथे एका गाड्यावर प्रत्येकी दोन वडापाव आणि १५ रु. ग्लास वाला टंपासभर सफरचंद/Mango/अननसाचा ज्यूस पिवून अतृप्त मंडळी शांत झाली.. आणि पुढे निघालो.. व्हर्सा गाडी सुरु झाली.. जेमतेम १०० मीटर पुढे गेलो असू.. तेवढ्यात समोरून काही नवतरुणी समोरून येताना पाहून.. हळूच चान्स बघून ‘सुदर्शन द ठरकी मास्टर’ ने .. ‘ ए आयटम’ असा आवाज टाकला.. आत्ता .. काय म्हणावं या कार्ट्याला.. कुठं नेण्याच्या लायकीचे नाही.. अण्णाला म्हटलं याला एक सज्जड दम दे.. असले फालतू आवाज टाकले तर याला इथेच सोडू या स्थानकावर.. बसू दे बोम्बलत.. ए आयटम.. ए आयटम करत.. थोड्या वेळच्या या व्यत्ययानंतर अन्ना शुमाकरने पुन्हा स्टार्टर मारला.. आणि गाडी थळ बंदराकडे धावू लागली.. अलिबाग ते थळ बंदर साधारण १० कि.मी. चे अंतर.. अलिबाग-रेवस रस्त्यावर थळ बंदराकडे जाण्याचा फाटा आहे.. इथे RCF कंपनी पासून ‘मच्छिमार सोसायटी कुठाय?’ किंवा ‘कस्टम ऑफिस कुठे?’ असं विचारत विचारत.. आपण थळ बंदराशी येवून पोहोचतो..
थळ किनाऱ्यावर फार पूर्वी एक भुईकोट किल्ला होता.. सध्या इथे या किल्ल्याच्या चौथऱ्यावर मासळी वाळायला घालतात.. सोसायटी जवळच्या चिंचेच्या झाडापासून पुढे गेल्यास किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात.. पण खरा किल्ला कुठे होता याचा फक्त अंदाज बांधायचा.. चार- मोठ्या दगडांचा पाया असलेले चौथरे म्हणजे पूर्वाश्रमीचा किल्ला असावा..     
थळ बंदरावरील मच्छीमार सोसायटी जवळ पोहोचलो तर.. इथे मासळी चा घमघमाट सुटला होता.. मग आजूबाजूला दिसणाऱ्या कोळीबांधवांना विचारले.. दादा.. खांदेरी-उंदेरी वर येतंस काय?.. तर एकही माणूस या जलदुर्गांवर येण्यास तयार होईना.. थळ गावातून किल्ल्यावर जाण्यास कस्टम ची बंदी आहे आणि फक्त मिस्टर ‘अश्विन बुंदगे’ आणि Sons यांच्याकडेच परवाना आहे..
खांदेरी-उंदेरीच्या भवतालचा समुद्र हा अशांत असल्याने बरेचसे मच्छिमार जीवास मुकले आहेत.. यात भरीस भर म्हणून Recently गडावर भटकंतीस काही कस्टम ऑफिसर मंडळीना घेवून जाणारी बोट बुडाल्याने.. कस्टम ने इथे जाण्यास मज्जाव केला आहे.. पण गडावर जाण्याची आस जोरकस असल्याने.. मग बुंदगेना फोन फिरवला.. आमाला वेळ नाही आणि बोट चालवणारा तालुक्याला गेलाय त्यामुळे जमनार नाही.. असे त्यांनी ठणकावून सांगताच मनाचा हिरमोड झाला.. पण ‘इच्छा तिथे मार्ग’.. हे गेल्या १५-१६ वर्षांच्या भटकंती मधून शिकलो.. म्हणून आणखी एक प्रयत्न करूयात म्हणून.. एका कोळी बांधवाला विचारलं, दादा.. किल्ल्यावर कसं जातं येईल..? इथल्या कस्टम हफिसातल्या साहेबांना इचारून बघा.. ते जा म्हनले तर.. आमी नेऊ बोटीतनं.. मग परवानगी मिळेल या भाबड्या आशेपायी कस्टम ऑफिस च्या पायऱ्या चढलो.. दरवाजातून प्रवेश केला तर खुर्चीवर बसून एक हाफ चड्डी घातलेला कार्यकर्ता.. कार्यालयाची सूत्रं हलवतोय असं चित्र दिसलं.. त्याची आर्जवं केली.. तेंव्हा थोडा वेळ थांबा एक साहेब येतील.. त्यांना विचारा.. अर्ध्या तासाने आणखी एक साहेब आले.. त्यांनी ढुंकूनही बघितलं नाही तसा हाफ चड्डीवाल्याकडे लग्गा लावला.. मग त्याने आमचं आर्जव मोठ्या साहेबांकडे फॉरवर्ड केलं.. साहेबांकडे जाताना.. २-४ SLR कॅमेरा गळ्यात लटकवलेले फोटोग्राफर्स.. Tripod.. सोबत अण्णा आणि मी.. असे सगळे आत घुसलो आणि साहेबांना घेराव घातला.. बघा साहेब खास पुण्यावरून आलोय.. किल्ला बघायला.. हे सोबतचे लोक खूप फेमस फोटोग्राफर्स आहेत.. खांदेरी-उंदेरी बघण्यासाठी आलेत.. फार लांबून.. बघा काहीतरी.. हा लवाजमा पाहून.. त्या साहेबांनी मुंबईला त्यांचे मोठे साहेब अशोककुमार यांना फोन लावला.. फोनाफोनी झाली आणि त्यांच्याकडून नकारघंटा मिळाली.. कस्टम ऑफिसातल्या साहेबांनी सांगितलं अशोककुमार साहेब सुट्टीवर आहेत.. तुम्ही अलिबाग कस्टम ऑफिसच्या शेट्टी साहेबांना भेटा.. आमाला पावर नाही.. असं दमदार वाक्य ऐकताच इथे परवानगीचे घोंगडं भिजत राहणार असे चित्र दिसले.. मग पुन्हा मच्छिमार सोसायटी जवळच्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली कोपरा सभा घेतली.. आणि मंडळाच्या एकमुखी निर्णयानुसार अलिबाग कस्टम ऑफिसकडे निघालो.. पुन्हा अलिबाग ST stand गाठले.. आणि कोळीवाड्यातील कस्टम ऑफिस कडे निघालो.. यंदा ड्रायव्हिंग चे सुकाणू खुद्द युवराजांच्या हाती होते.. कोळीवाडा.. कोळीवाडा असं विचारत निघालो..
रस्त्यात पुढे काही नवतरुणी दुचाकीवरून जाताना दिसताच.. त्यातील एका लांबसडक केशांच्या सौंदर्यवती युवतीने युवराजांना भुरळ पडली आणि युवराज.. जणू काही संमोहित झाल्यासारखे त्या युवतीच्या मागे निघाले..  आपल्याला कोळीवाड्याकडे जायचे आहे.. याचा त्यांना सपशेल विसर पडला.. पुढे एका अरुंद बोळात त्या ललनांचा तांडा नजरेआड होताच.. युवराज जॉन अब्राहम सातारेवाले.. यांना आपण रस्ता चुकल्याचे ध्यानी आले.. तसं.. पुन्हा कोळीवाड्याकडे मोर्चा वळविला.. माग काढत एकदाचं कस्टम ऑफिस च्या दारात येवून व्हर्सा उभी केली.. इथे काही कर्मचारी सकाळचं कोवळं ऊन खात ऑफिसच्या बाहेर खुर्च्या टाकून बसल्याचे दिसले.. त्यांना म्हटलं.. थळच्या ऑफिसातील अशोककुमार (दादामुनी) साहेबांनी शेट्टी (स्पॉट नाना) साहेबांना भेटायला सांगितलं आहे.. ते म्हणाले शेट्टी साहेब दुपारी ३ ला येणार आहेत.. तुम्ही फिरून परत या.. आणि मग त्यांनी खांदेरी-उंदेरी वर झालेल्या बोटींच्या अपघाताची व त्यात बुडालेल्या कस्टम ऑफिसर लोकांची दर्दभरी दास्तान ऐकवली.. त्याला म्हटलं.. बस्स दोस्त.. अब रुलायेगा क्या..!! इथे स्पॉट नानाची वाट पाहण्यापेक्षा अक्षी-नांदगाव रोड वरील ‘चौल-रेवदंडा (आगरकोट)-कोर्लई’ या दुर्गत्रयींची सफर करावी.. असा प्रस्ताव मांडला.. मित्रमंडळाने एक मुखाने प्रस्ताव मंजूर करताच अलिबाग हून चौल नाक्यावर आलो..

चौलचा भुईकोट किल्ला – राजकोट             

चौल हे एके काळी व्यापारी बंदर म्हणून उदयास आले होते.. पुरातत्व खात्याला चौलच्या परिसरात सातवाहनकालीन अवशेष सापडले आहेत.. पुढे इ.स. १६८३ साली छत्रपती संभाजी महाराजांनी चौलचा राजकोट बांधल्याचे काही इतिहासकार सांगतात.. गडावर शितळादेवी मंदिर, बांधीव तलाव, आग्राव गावाकडे जाताना उजवीकडे तटबंदीचे अवशेष, हमामखाना/कलावंतीणीचा महाल, मशिद, जोतं, फारसी शिलालेख, रामेश्वर मंदिर हे सर्व अवशेष.. त्यामुळे ह्या ठिकाणांची नवे घेवूनच हा किल्ला पाहता येतो.. किल्ला कुठे आहे असं विचारलं तर कुणी सांगत नाही.. चौल गावात पोहोचताच, इथे किल्ला कुठाय? अशी विचारणा करताच.. लोकांनी भुवया उंचावल्या आणि ‘नाही’ असं उत्तर दिलं.. चौलचा किल्ला काळाच्या ओघात नामशेष झाला आहे.. आता हाताच्या बोटावर मोजण्याइतके अवशेष आजमितीला शिल्लक आहेत.. किल्ला पाहण्यास मंदिरापासून सुरुवात करावी म्हणून.. मग विचारलं की शितळादेवी मंदिर कुठाय? मग कुणीतरी म्हणालं ‘इथनं सरळ जा’.. आणि पुढे जात १० मिनिटात शितळादेवी मंदिराजवळ येवून पोहचलो.. इथे मंदिरालगत एक पुरातन विहीर आहे.. मंदिरात प्रवेश केला आणि पाहिलं तर इथल्या भिंतीवर देणगीदारांच्या नावांच्या यादीने मंडपाच्या भिंतींवर धुमाकूळ घातला होता.. म्हणजे भिंतीच्या वरपासून खालपर्यंत.. डावीकडून उजवीकडे.. जिकडे पहावं तिकडे.. नावेच नावे.. देणगीदारांच्या मांदियाळीत नांदणारी ही देवी खरोखरच धाडसी आणि प्रगल्भ असली पाहिजे..   देवीच्या पायी नतमस्तक होवून.. गडभ्रमंती ला सुरुवात केली.. मंदिरापासून आग्राव गावाकडे जाताना पहिल्याच वळणावर उजवीकडे एका शेताडात तटबंदी आणि शेवटच्या घटका मोजणारा एक बुरुज नजरेस पडतो.. आणखी काही अवशेष पहायला मिळतील या आशेने आग्राव गावात जाऊन पोहोचलो.. इकडे किल्ल्याबद्दल कुणाला माहिती आहे का ते पाहण्यास.. चौकशी केली.. इथे किल्ला कुठाय.. तर रिक्षा stand जवळील काही नवयुवक बाह्या सरसावून पुढे आले.. तुम्ही Archelogy ची माणसं आहास काय.. सर्व्हे करायला आलात काय.. आयला या archelogy च्या माणसांनी लय उत आणलाय.. कुणाच्या शेतात खोदकाम करतात आणि काही सापडलं तर जमिन.. संरक्षित क्षेत्र म्हणून सांगतात.. तुमी archelogy वालेच आहात ना..? त्याला म्हटलं .. बाला.. आमी archelogy वाली माणसं न्हाय.. आमी पर्यटक.. वातावरण तापलेलं पाहून.. तिथून काढता पाय घेतला आणि जमेल तेवढे चौल किल्ल्याचे अवशेष पाहून रेवदंडा किल्ल्याकडे निघालो.. 

To be continued..!! क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s