सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती.. भाग १

Shivgad (Dajipur), Sarjekot, Padmagad, Sindhudurga, Rajkot (Malvan) Bhagvantgad (Chindar)“राकट सह्याद्री जर हिंदवी स्वराज्याची निधडी छाती असेल.. तर आमचो कोकण हे स्वराज्याचे हळवे मन आहे”.. कोकण  हे फक्त नाव घेतलं तरी.. सिर्फ नामही काफी है.. कोकणच्या सौंदर्याची कथा काय वर्णावी.. वळणावळणात ठासून भरलेला आरस्पानी निसर्गाचा आविष्कार.. लाटांची गाज.. नारळी-पोफळीचा साज.. कौलारू घरे.. आणि माणसांचा मागमोस नसलेले रिते आणि पारदर्शक किनारे.. सिंधुदुर्ग ते आंबोळगड दरम्यान तब्बल १२-१३ किल्ले आहेत.. तेव्हा.. सिंधुदुर्ग ते आंबोळगड भ्रमंतीचा बेत आखला.. श्रीकांत उर्फ गंपू.. अन्ना उर्फ रिशी.. युवराज उर्फ सुयोग आणि नेव्हिगेटर विशाल.. इत्यादी मेंबर तयार झाले चार दिवस.. सिंधुदुर्गाची चार दिवसीय सफर.. करण्यास..

प्रवासाचा वेळ कमी व्हावा आणि दुर्गभ्रमंतीसाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा या हेतूने.. रात्री निघण्याचे ठरले.. रिशीअन्नाची ह्युंदाई असेंट तयारच होती.. वाईला नेव्हिगेटर विशालला उचलून.. कोल्हापूर कडे रवाना झालो..  ST  स्थानकावर पहाटेच्या टायमाचा एक झोप घालविणारा ब्रेक घेतला.. चहा-पोहे यांची फर्माइश केली.. एका नगास प्रत्येकी दोन कप चहा हा असा थेट आतड्यात उतरल्यानंतर.. आतील माणूस अजून जिवंत असल्याची खात्री पटली.. आणि या स्थानकास दिलेल्या जुन्या भेटी आठवल्या.. पन्हाळा-विशाळगड.. तारकर्ली.. आंबोली.. आणि दक्षिण कोकणातील सर्व भटकंतीचा राजमार्ग.. हा कोल्हापूर स्थानकावरून जात असल्याने.. इथला ब्रेक अनिवार्य आहे.. राधानगरीच्या दिशेने निघालो.. रंकाळा तलावाच्या डावीकडे राधानगरीचा रस्ता आहे.. पण चुकून सरळ गेलो आणि एक मोटोक्रॉस चा track नशिबी आला.. धिम्याने गाडी रेटीत.. रंकाळ्याला उजवी प्रदक्षिणा मारीत.. राधानगरीकडे मार्गस्थ झालो..

शिवगड – दाजीपूरच्या जंगलातील दुर्गरत्न.. एक अपूर्ण भटकंती
पहाटेच्या टायमाला राधानगरी अभयारण्यात काही प्राणी वगैरे दिसतात का ते पाहण्यासाठी डोळे ताणून जागा राहिलो पण.. नशिबात वन्यप्राणी दर्शन काही लिहिलेलं नव्हतं.. राधानगरी सोडून दाजीपुरच्या गाडीवाटेकडे निघालो आणि या अभयारण्यात प्रवेश केला.. इथे शिवगड नावाचा किल्ला असल्याचे कुठेतरी वाचले होते.. त्यामुळे शिवगडाचा शोध सुरु झाला.. वाटेत ओलवण गावाच्या अलीकडे एक डोंगर हुबेहूब किल्ल्यासारखा दिसत होता.. म्हटलं हा असेल शिवगड पण.. तिथेही घोर निराशा.. ओलवण गावातून उजवीकडे एक रस्ता दाजीपुर अभयारण्यात जातो.. इथे गगनगिरी महाराजांच्या आश्रमाजवळून शिवगडाची वाट जाते.. ओलवण गावातून उजवीकडे वळालो आणि पुढे गगनगिरी महाराजांच्या आश्रमाचा एक बोर्ड दिसला तिथून कच्च्या रस्त्याने डावीकडे निघालो.. थोडं एक चढावानंतर आश्रम दिसला पण भक्ताविना सुना पडलेला आश्रम.. ना साधक.. ना गुरुदेव.. असा निर्मनुष्य आश्रम.. त्याच्या गेटवर एक भलं मोठं कुलूप.. शेजारी एक गाडीरस्ता उजवीकडे जाताना दिसला.. ही दाजीपूर च्या जंगलातली गाडीवाट.. फोरेस्टाच्या परवानगीने इथे गाडीसह आत जाता येते.. इथे डावीकडे एक कच्चा रस्ता आश्रमाला वळसा मारत निघाल्याचे दिसले.. मग तिकडे निघालो.. जेमतेम ५० फुट गेलो असू.. तेवढ्यात इतका वेळ झोप काढणारा गंपू ओरडला.. गवारेडा..  गवारेडा.. त्याची नजर समोरच्या धूळमाखल्या रस्त्यावर पडली आणि त्याला १५-२० गव्यांचे ठसे दिसले तसा इतका वेळ मुग गिळून बसलेला गंपू बोलता झाला.. गवा दिसल्याचा गवगवा होताच काही उत्साही मंडळी गाडीतून उतरली आणि गव्यांच्या मागावर गेली.. आणि १५-२० मिनिटात हात हलवत परत आली.. पण सोबत शिवगडाबद्दल ब्रेकिंग न्यूज घेवून आली.. पुढे खरा गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे.. तिथून गडाची वाट आहे.. असे समजले.. मग तिकडे कुणी वाटाड्या मिळतो का ते पाहण्यास निघालो..! ओबडखाबड रस्ते आणि दुबाजूस जंगल असा प्रवास सुरु झाला.. दहा मिनिटातच आश्रमाजवळ पोहोचलो.. तर इथेही कुणीच नव्हतं.. चार-दोन भगिनी जनावरांना चारा देण्याचे काम करीत होत्या.. पण कुणी बोलायलाच तयार नाही.. हे पाहील्यावर.. शिवगडाचा बेत तातडीने रद्द करण्यात आला.. ‘देअर इज ऑलवेज नेक्स्ट टाईम’ असे म्हणून अचानक ठरलेला हा भटकंतीचा बेत बासनात गुंडाळून पुन्हा ओलवणफाट्याव येवून पोहोचलो.. इथे आलो आणि अन्नाला कडाडून भूक लागली.. तेंव्हा २-२ वडापाव आणि तेवढेच कोकम सरबत असा दुहेरी मारा करून अन्नाचा जठराग्नी शमविण्यात आला.. साधारण ९ वाजले असावेत.. तशी कणकवली जाण्याची लगबग केली आणि अन्नाने स्टार्टर मारला.. पुढे दाजीपुर च्या जलाशयाचा एक सुंदर view आहे.. तिथे गंपूने डबाबाटली ब्रेकची सूचना केली आणि तुंबलेल्या पोट्ट्यांनी ती तातडीने मान्य केली.. भर उन्हाळ्यातला हा दाजीपूरच्या जलाशयाचा गुड मॉर्निंग नजारा अगदी सुखद होता.. इथे १५ मिनिटे ब्रेक घेवून पुन्हा अन्नाने कणकवली कडे कारगाडी हाकण्यास सुरुवात केली.. तशी एक डुलकी काढली..       

सर्जेकोट – दुर्लक्षित पण देखणा उपकिल्ला
अन्नाने कणकवली-कुडाळ-मार्गे मालवणला वन-पिस पोहोचवले आणि अन्ना म्हणाला इधर एक अच्छा मालवणी हॉटेल है | खाना खाके गड देखेंगे | मी एक सूचना केली आधी सर्जेकोट पाहून घेवू आणि मग महाजेवण करू आणि दुपारी मग पद्मदुर्ग.. सिंधुदुर्ग.. राजकोट बघू कसे.. या वाक्यावर रिशीअन्नाने एक जहरी लुक दिला आणि गाडीला स्टार्टर मारला.. कुडाळ मार्गे उजवीकडे मालवण-विजयदुर्ग या सागरी महामार्गावर.. मालवणपासून जेमतेम २-३ किमी पुढे गेल्यास एका पोर्टेबल खाडीनंतर एक गाव दिसते.. इथे डावीकडे सर्जेकोट किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे.. तसा बोर्डच लिहिला आहे.. मग डावीकडे वळून.. पत्ता विचारीत सर्जेकोटकडे निघालो.. आणि एका जेट्टीवर जाऊन पोहोचलो.. इथे एका मोठ्या जहाजाच्या सावलीत लाजवंती पार्क केली आणि किनाऱ्यावरून साधारण अर्धा कि.मी. चालत दहा मिनिटात सर्जेकोट गाठला.. इथे जवळच एक जहाजबांधणीचा लहान कारखाना आहे.. त्याच्या उजवीकडे सर्जेकोटची तटबंदी दिसू लागते.. नेव्हिगेटर विशाल गडाचा काना न कोपरा धुंडाळून काढत होता.. समुद्र किनाऱ्यालगतची तटबंदी.. डावीकडे दुहेरी तटबंदी.. प्रवेश दरवाजा भग्न बुरुज आणि आत बालेकिल्ला वजा छोटेखानी गढी.. तटबंदीच्या ढासळलेल्या चिऱ्याच्या पायऱ्यावरून तटबंदीवर चढून गडावर प्रवेश केला.. गडाचे तट आणि बुरुज अजून इतिहासाची साक्ष देत उभे होते.. आत पाहिलं तर.. नारळाची झाडे आणि आत दूरवर पूर्वेकडे दिसणारा बालेकिल्ला.. उत्तरेला मुख्य दरवाजा.. आणि आत भग्न इमारतीचे अवशेष.. इथे सतीचे वृंदावन दिसते.. 

बालेकिल्ल्याकडे निघालो.. पुरुषभर उंचीच्या भक्कम पाया आणि त्यावर बांधलेली हि गढी.. म्हणजे दुर्गबांधणीचा उत्तम नमुना आहे.. भल्या मोठ्या चिऱ्याच्या बांधणीचे तिन पुरुष उंचीचे दणकट तट.. मुख्य द्वारासमोरील संरक्षक भिंतीला खेटून काही इमारतीचे चौथरे दिसतात.. मुख्य द्वाराच्या दुबाजूस लहानग्या खंदकाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.. बोडक्या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश केला.. मध्यभागी वाड्यांचे चौथरे.. रुंद तटबंदी.. चार बुरुजांचा हा चौबुर्जी बालेकिल्ला.. विलक्षण असाच आहे.. चौथऱ्याशेजारी.. एक चाफ्याचं झाड समोर तुळशी वृंदावन.. मागे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्या.. तिथे कोपऱ्याच्या अल्याड एक चोर दरवाजा (जो आता चिरे टाकून बुजविला आहे).. डावीकडच्या तटबंदीशेजारी उभा एक अजानबाहू अश्वत्थ वृक्ष.. एक विलक्षण, Magical आणि देखणा किल्ला होण्यासाठी जे ३६ गुण जुळावे लागतात.. ते सर्व गुण मला या सर्जेकोट किल्ल्यात सापडले.. चला सुरुवात तर चांगली झाली..! असे म्हणत.. सर्जेकोट सफर आवरती घेतली.. गंपू तर किल्ला पाहून भारावून गेलं होता किती फोटो काढू आणि किती नको त्याला असं होवून गेलं अगदी.. गडाच्या उत्तराभिमुख दरवाजाकडे निघालो.. इथे काही सतीची वृंदावनं नजरेस पडतात.. गडाचा हा दरवाजा मोडकळीस आला असून आणखी काही दिवसात इथे दरवाजा होता असं सांगावं लागणार हे नक्की.. पुन्हा कोळंब खाडी नजिक उभ्या केलेल्या लाजवंती गाडीकडे निघालो.. 

गाडीजवळ rapid fire कोपरासभा घेतली.. राजकोट पाहून जेवण करूयात असे सांगितले.. पण अन्नाने नकारार्थी मान डोलावली.. यंदा त्याचा निर्धार पक्का होता.. शेवटी अन्नाला नाराज करून कसं चालणार होतं.. अन्नाने जेवणाच्या हॉटेल ची अप टू डेट माहिती काढून ठेवली होती.. मालवण बाजारपेठेतील.. हॉटेल चैतन्य तिकडे निघालो.. ह्या हॉटेलच्या शोधात.. अनायसे मालवण दर्शन घडले.. पण हॉटेल काही सापडेना.. पण एका माणसाला या हॉटेलचे नाव सांगितले आणि तो म्हणाला ते बाजारपेठेत आहे.. त्यामुळे हे उपहारगृह खरंच अस्तित्वात आहे याची खात्री पटली.. तब्बल ४० मिनिटांच्या गुगल मालवण सर्च मोहिमेनंतर एकदाचं हॉटेल चैतन्य सापडलं.. तिथे अडचणीत एका दुकानासमोर लाजवंती उभी करून एकदाचं हॉटेलात शिरलो.. भुकेने कावलेला अन्ना.. सुरमयी थाळीवर तुटून पडला.. मी मेनुकार्ड चाळलं.. आणि तिथे आमरस या मेनू समोर.. रेट सिझनल.. असे लिहिल्याचे पाहून आश्चर्य वाटले.. आणि आमरसाची वाटी केवढ्याला अशी मालकांना विचारणा केली.. मालक बहुदा बिझी असावेत.. कारण माझ्या प्रश्नाने त्यांच्या चेहऱ्यावरची माशीदेखिल हलली नाही.. म्हणून पुन्हा विचारलं.. आमरस वाटी केवढ्याला.. ७० रु..!! एखादं झुरळ झटकावं तसा माझा प्रश्न मालकांनी निर्विकारपणे लिलया झटकला.. सत्तर रुपये..!!! पायाखालची जमीन सरकली.. १०० मिली लिटर रस ७० रुपयाला.. विचार आला खडसावून विचारावं त्याला.. पळीभर आमरसाचे खूप जास्तच लावलेत.. म्हणून.. स्थानिकांशी पंगा घ्यायचा नाही हे सह्याद्रीने शिकवले.. म्हणून मालकाला मुआफ करून टाकले.. आणि महागड्या आमरसावर फुली मारली.. तिकडे पल्याड बसलेली पारिवारिक मंडळी वाट्यावर वाट्या संपवत होती.. आणि आम्ही वाटीभर उसळीचा भुरका मारीत होतो.. वाटलं या मुस्कटदाबीचा निषेध नोंदवावा.. पण सैनिकांचे डायलॉग मनातल्या मनात.. अन्ना मात्र सुरमई थाळी आणि घडाभर सोलकढी पिऊन तृप्त झाल्यासारखा वाटला.. अन्ना सेटल झाल्याचे पाहून.. पुढचा बेत सांगितला.. डेस्टीनेशन पद्मगड..

पद्मगड – सिंधुदुर्गाच्या चरणी वाहिलेले सुंदर कातळपुष्प
लोकल GPS अर्थात स्थानिकाला पत्ता विचारला तर.. तो म्हणाला मालवण ST स्थानकाच्या रस्त्याने जा.. पुढे विचारायचं स्मशानभूमी आणि तिथे डावीकडे दांडगेश्वर मंदिर.. त्या समोर पद्मगड.. किल्ले पद्मगड सिंधुदुर्गचा पहारेकरी.. जणू शिवलंका सिंधुदुर्गच्या चरणी वाहिलेलं एक कातळपुष्पच.. स्मशानभूमीच्या पुढ्यात गाडी सावलीत उभी केली आणि डावीकडे दांडगेश्वर मंदिराच्या समोरील पुळणीवर येवून दाखल झालो.. या दांडगेश्वर मंदिराच्या डावीकडे तारकर्लीचा किनारा आहे.. इथे बगळ्यांचे थवेच्या थवे सुक्या मासळीवर ताव मारताना दिसले.. इथे काही कोळणी भर उन्हात इमाने-इतबारे मासळी गोळा करण्याचे काम करीत होत्या.. मग त्यातील एका मिसेस स्पायडरम्यान (कोळणीला) विचारले.. पद्मगडावर जायला तरी (बोट/नाव) मिळेल का?.. तुमाला त्या मंदिरापाशी तरी भेटल.. म्हटल्यावर तरीला भेटण्यासाठी पुळणीवर वाट पाहू लागलो.. समोर.. पद्मगड त्यामागे शिवलंका सिंधुदुर्ग आणि मध्ये घोंघावणाऱ्या अन वाऱ्यासवे डोलणाऱ्या बेभान लाटा असा निवांत क्षण दुपारी तिनच्या उन्हात अनुभवत बसलो.. अर्धा तास उलटून गेला.. आणि तेवढ्यात एक तरी उसळत्या लाटांवर स्वार होऊन पुळणीवर येताना दिसली.. तरीकडे पाहिलं तर.. आत मि. इडिया सारखी HAT घातलेला नावाडी.. आणि सोबत सिंदबाद नावाडी आणि काही हौशी पर्यटक.. नावाड्याला बऱ्याच हाका मारल्या तशी त्याने तरी किनाऱ्यावर घेतली.. म्हटलं पद्मगडावर येणार का? मि. इंडिया म्हणाला.. एवढ्या लोकांना तारकर्ली किनाऱ्यावर सोडून येतो.. मग जाऊ..! मग पुन्हा वेटिंग वेटिंग सिम्पली सिटींग.. साधारण २०-२५ मिनिटात पठ्ठ्या पर्यटकांना वाटेला लावून पुन्हा दांडगेश्वर मंदिरासमोरील पुळणीवर दत्त म्हणून हजर झाला.. 

सोसाट्याच वारं सुटलं आणि पुळणीसमोरील खडकाळ रांगेतून लाटा उसळू लागल्या आणि हृदयात कालवाकालव सुरु झाली.. तरी बरं पोहता येत होतं.. पण शहरातील जलतरण तलावातलं  पोहणं आणि इथे उसळत्या लाटात पोहणं यात जमिन-अस्मानाचे अंतर.. मग काय.. धाकधूक करणारं काळीज आणि पद्मगड पाहण्यासाठी आतुरलेलं मन असं शेजारी शेजारी घेवून बसलो तरीत.. मि. इंडिया आणि मि. सिंदबाद यांनी तरी जीव खावून ओढून धरली आणि एकेक मेंबर जीव मुठीत घेवून तरीत घुसले.. किनाऱ्यावर थडकणाऱ्या उसळत्या लाटा.. जणूकाही उरात धडकी भरत होत्या.. सगळे जीवाच्या भितीने चिडीचूप बसल्याचे पाहून.. तरी वल्हवायला सुरुवात केली.. जेमतेम दहा-वीस मिटर पुढे गेलो असू.. तेंव्हा लक्षात आलं या लाटा कुठेही कशाही येत आहेत.. यांना जणू दिशाच नाही..   तशात एखादी उभी आडवी-तिडवी तिरपी लाट यायची आणि पाच-सहा काळीजं पाणी पाणी करून जायची.. कुंडलिका रिव्हर राफ्टींगचा थरार या प्रवासासमोर अगदी किरकोळ होता.. कधी पुढे-मागे.. कधी वर-खाली.. तर कधी तिरपी अशी तरी चालली होती.. पद्मगडाच्या दिशेने.. आता बुडते का मग बुडते.. अशीच धाकधूक.. पण मि. इंडिया आणि मि. सिंदबाद यांचा जोश.. आणि महापुरुषाचे महाआशिर्वाद यांच्या बळावर भटकंती मित्रमंडळ सुखरूप पद्मगडाच्या किनारी पोहोचले.. गुडघाभर पाण्यात हेलकावणारी तरी मि. इंडिया आणि सिंदबाद यांनी जीव खावून ओढून धरली आणि मंडळी फटाफट खाली उतरली.. मि. इंडियाला म्हटलं १५ मिनिटात गड बघून येतो.. आलोच.. यावर तो म्हणाला.. आम्ही पलीकडे जाऊन थांबतो.. तुमचं गड पाहून झालं कि आवाज द्या.. कसं..!! आता नाही म्हणून सांगतो कुणाला.. हा मि. इंडिया पल्याड जाऊन अदृश्य झाला तर.. उपाशी अन्नाला घेवून इथे मुक्काम करायचा म्हणजे दिव्यच.. पण मि. इंडियाच्या शब्दावर विश्वास ठेवून.. पद्मगड पाहण्यास निघालो.. 

एखाद्या चौकीसारखा बांधलेला हा छोटेखानी किल्ला.. महाकाय सिंधुदुर्गासमोर टिचभर वाटणारा पण तसाच बलाढ्य देखिल.. एखाद्या ढालीसारखा.. सिंधुदुर्गाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर.. एक पहारेकरी.. तटबंदीच्या ढासळलेल्या दगडांवर चढून तटावर आलो.. आणि पद्मगडाचा आटोपशीर पसारा दिसू लागला मध्यभागी महापुरुषाचे मंदिर.. शेजारी पाण्याचे टाके.. डावीकडे तटबंदीमधून डोकावत.. सिंधुदुर्गाकडे टक लावून पाहणारा.. एक दरवाजा.. आत पाहताना आणखी एक गोष्ट लक्षात आली.. इथे सगळीकडे झुरमुळ्या आणि पताकाच पताका लावल्या होत्या.. हेही नसे थोडके म्हणून की काय.. मुख्य दरवाजा पूर्णपणे झाकणारा एक भव्य फ्लेक्स लावण्यात आला होता.. मघाशी मिसेस spiderman यांच्या कडे पद्मगडाची चौकशी केली तेंव्हा त्या म्हणाल्या होत्या.. दादा.. काल आला असता तर गडावर जेवण मिळालं असता.. महापुरुषाचा उत्सव होता गडावर.. ३ दिवस रोज अन्नदान सुरु होतं.. अन्नापासून हि अन्नदानाची बातमी जाणीवपूर्वक लपविण्यात आली होती.. काय सांगावं त्याला हि न्यूज द्यायची आणि त्याचा जठराग्नी पुन्हा भडकायचा.. असो.. फ्लेक्स मुळे गडाच्या मूळ दरवाजा झाकल्याने मंडळी नाराज झाली.. कलरफुल दरवाजातून सिंधुदुर्गाचे एक छायाचित्र घेवून महापुरुषाचे आशीर्वाद घेतले आणि पुन्हा किनारी येवून पोहोचलो.. मि. इंडिया पल्याड मंदिराजवळ जाऊन बसला होता.. मग त्याला हाका मारून.. अल्याड बोलावले.. अंगात संचारल्यासारखे ते निघाले बेधडक.. लाटांना नं जुमानता.. दोन वल्हे.. कैक लाटा.. सोसाट्याचा वारा आणि त्यांना न जुमानणारे मि. इंडिया आणि सिंदबाद नावाडी.. यंदा ते पुळणीच्या सरळ रेषेत निघाले होते.. पाण्यातून बाहेर डोकावणाऱ्या खडकातून अलीकडे येणाऱ्या लाटांच्या प्रवाहाचा अचूक उपयोग करीत.. ते दहा मिनिटात अल्याड पोहोचले.. येताना आलेला लाटांचा अनुभव ताजा असल्याने.. युवराज सुयोग सातारेवले ‘१ लाखाचा’ कॅमेरा आणि तेवढाच लाखमोलाचा जीव पणास लावून तरीत बसले.. दहा मिनिटांचा थरार सुरु झाला.. यंदा वाऱ्याचा दंगा अगदी शिगेला पोहोचला होता.. या दहा मिनिटांच्या प्रवासात कमीत कमी २५ वेळा हि तरी आता पलटी खाणार असे वाटून गेले.. पण मि. इंडिया आणि मि. सिंदबाद यांनी युवराज आणि मंडळीना किनारी सुखरूप पोहोचवलं आणि मि. इंडियाला बिदागी आणि अनेक धन्यवाद देवून सिंधुदुर्ग कडे निघालो..

सिंधुदुर्ग – स्वराज्याची दक्षिण पंढरी.. कुरटे बेटावरचा शिवलंका सिंधुदुर्ग
दिवस मावळतीला आला होता.. मावळतीची किरणे आकाशाला सोनसळी रंगात रंगवून.. काळोखाच्या मिठीत जाण्याच्या आत सिंधुदुर्ग पाहण्यास निघालो.. मालवण बाजारपेठेतून जेट्टीवर येवून पोहोचलो.. गाडी पे-आणि-पार्क मध्ये पार्क करून तिकीट खिडकीवर दाखल झालो.. ५ सिंधुदुर्ग रिटर्न तिकीट द्या.. तिकीट काढून मुकाट जेट्टीवर फेरीबोटीची वाट पाहू लागलो.. दहा मिनिटात बोट किनारी लागली आणि सिंधुदुर्गकडे निघाली.. सिंधुदुर्गाची हि माझी दुसरी भेट.. या भेटीत काय नविन पाहायला मिळतंय याची उत्सुकता होतीच.. सिंधुदुर्गाबद्दल सभासद बखरकार म्हणतात.. “चौऱ्यांशी बंदरात हा जंजिरा.. अठरा टोपिकरांचे उरावर.. शिवलंका अजिंक्य जागी निर्माण केला..!!” यातले अठरा टोपीकर म्हणजे इंग्रज.. डच.. पोर्तुगीज.. फ्रेंच आणि काही उपटसुंभे असावेत.. आणि त्यांच्या नाकावर टिच्चून हा राकट कणखर आणि विशाल जलदुर्ग दस्तुरखुद्द श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला.. सिंधुदुर्गास स्वराज्याची दक्षिण पंढरी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.. असा हा महत्वपूर्ण किल्ला आहे.. सिंधुदुर्गाची तटबंदी जांभ्या चिऱ्याने बांधली आहे.. किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे म्हणजे.. शिवराजेश्वर मंदिर.. हे राजाराम महाराजांनी बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर.. इथे कौलारू मंदिराच्या गाभाऱ्यात कोळी वेशातील शिवरायांचा मूर्ती आहे.. इथे शिवरायांची पहाटे आणि संध्याकाळी यथासांग नित्यनेमाने पूजाअर्चा केली जाती.. सिंधुदुर्गाचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे ३-४ कि.मी. लांबीची नागमोडी तटबंदी.. अभेद्य अशी.. या शिवाय दर्या बुरुज.. झेंड्याचा बुरुज (गडावरील सगळ्यात उंच जागा).. भगवती देवीचे मंदिर.. महापुरुष मंदिर.. जरीमरी देवी मंदिर.. आणि साखरबाव.. दुध बाव आणि दहिबाव अशा विहिरी आहेत.. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात एक हनुमान मंदिर आणि आत आल्यानंतर उजवीकडच्या पायऱ्यानी वर तटबंदीवर गेल्यास.. महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे उमटलेले स्थान आहे.. महाराजांच्या आभाळाएवढ्या कर्तुत्वाला आणि व्यक्तित्वाला वंदन करून सिंधुदुर्गचा निरोप घेतला..  

जेट्टीवरून चालत पार्किंग लॉट जवळ येवून पोहोचलो आणि पाहिलं तर गंपू गायब.. ! कुठं उलथला हा गंपू.. कोण जाणे.. थोड्या वेळानंतर हा पार्किंग लॉट समोरील एका हॉटेल वजा घरातून बाहेर आला.. ते हि एकदम शुचिर्भूत होवून.. मग काय रे गम्प्या? “अरे इथे दहा रुपयात आंघोळ करता येते.. आणि डबा फ्री”.. हा गंपू काय शोधून काढेल याचा नियम नाही.. गंपूला म्हटलं मुक्कामाच काय? तर उत्तर आलं ‘चिवला बीच’.. बर त्याचं काय.. चिवला बीच वर मुक्काम करू.. रात्रीच्या मेजवानीसाठी मि सायबा हे हॉटेल सुचविले.. इथला माहौल काही औरच आहे.. समोर माडाच्या बनाला वळसा मारून आत येणारा समुद्र.. चंद्रप्रकाशात काजव्यासारखे चमचमणारे पाणी.. त्यात लाईट लाईट असेल तर अहाहा.. काय वर्णावे हे दृश्य.. अगदी काळजाला भिडतं.. सायबा हॉटेलवरची डिनरपार्टी उरकून चिवला बीच गाठला.. इथे पर्यटकांसाठी समुद्रकिनारी शेड्स उभारले आहे.. आयतीच शेड मिळाल्याचे पाहून.. युवराजांचे विमान ऊन..वारा.. थंडी.. यांची तमा न बाळगता.. शेडमधील बाकड्यावर उतरले.. आणि युवराजांची ब्रम्हानंदी टाळी लागली.. तर इकडे गंपू म्हणाला किनाऱ्यावर तंबू टाकू.. म्हटलं राजा भरतीचा टाईम आहे तेंव्हा एखादी लाट येईल आणि तुला तंबूसह आत घेवून जाईल.. मग.. थोडं कच्च्या रस्त्यावर तंबू ठोकण्यात आला.. आता शेड मधील बाकावरून युवराजांच्या घोरण्याचा आवाज लाटांचा आवाज चिरत कानी येवू लागला.. लाटांची गाज ऐकत झोपी गेलो..  

राजकोट – सिंधुदुर्गचा सच्चा पहारेकरी
जाग आली ती डासांच्या हल्ल्याने.. लाटांची गर्जना आता मवाळ होवून आता सुसह्य वाटू लागली.. काल गर्जणाऱ्या लाटा आज कुजबुज करू लागल्या होत्या.. तोंडं खंगाळून थेट सर्जेकोट गाठले.. मालवणात कालनिर्णय फेम जयंत साळगावकर यांनी बांधलेले एक गणेश मंदिर आहे.. त्याजवळ राजकोट हा भुईसपाट झालेला किल्ला आहे.. मालवण जेट्टीकडे पाठ करून डावीकडून किनायावरून चालत देखिल राजकोटला जाता येते.. इथे आलो तर दोन भली मोठी मच्छिमारी जहाजं उभी होती.. आजूबाजूला चौकशी केली तेंव्हा समोर उंचावरील चौथरा म्हणजे राजकोट.. असे समजले.. तिकडे निघालो तसा वाळत ठेवलेल्या माशांचा कुबट वास असह्य वाटू लागला.. मग रुमालाने नाक झाकून वासाची तिव्रता कमी केली आणि गडाचा एक फेरफटका मारला.. आता हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अवशेष या गडावर शिल्लक आहेत..  मध्यभागी एक मंदिर (!).. एक ट्रेडमार्क झाड.. ह्या मंदिराच्या डावीकडे काठावर गेल्यास जुन्या इमारतीच्या बांधकामाचे चौथरे दिसतात.. शिवाय कठडे नसलेली तटबंदी दिसते.. थोडं पुढे गेल्यास.. खडकाळ किनारा.. तिथून उसळणाऱ्या बेभान लाटा आणि मागे सिंधुदुर्ग असे एक विलक्षण जादुई चित्र दिसते.. ह्या मंदिराच्या मागे एका घराच्या शेजारी उभा एक जीर्ण बुरुज दिसतो.. हिच काय ती गड असल्याची शेवटची खुण.. बाकी सब मिथ्या है..!

भगवंतगड – ओबडधोबड भगवंत आणि नितांतसुंदर किल्ला
राजकोट वरून निघालो आणि भगवंतगड-भरतगड भ्रमंतीचा बेत फायनल करून टाकला.. युवराजांना घरी परतायचे असल्याने तातडीने निघालो.. मग पुन्हा चैतन्य हॉटेलवर जय्यत नाश्ता करून.. आधी पोटोबा करून घेतला आणि भगवंताच्या दर्शनास निघालो.. मालवण मधील वडाच्या पारावरून माग काढीत सागरी महामार्ग गाठला.. कालावल खाडीच्या दुबाजूस भगवंतगड आणि भरतगड हि किल्ल्यांची जोडगोळी आहे.. महाराष्ट्रात बरेच जोडकिल्ले आहेत चंदन-वंदन.. श्रीवर्धन-मनरंजन.. सातमाळा रांगेतील रवळ्या-जावळ्या.. भामेर च्या जवळचे रव्या-जाव्या, मनमाड जवळील अंकाई-टंकाई तसे हि सिंधुदुर्गातील जोडगोळी भगवंतगड-भरतगड.. कालावल खाडीच्या दोन बाजूस ठाण मांडून बसलेले दोन नितांतसुंदर किल्ले..

मालवण वरून सागरी महामार्ग.. पुढे कालवल खाडी पूल.. पुलानंतरचा घाट रस्ता संपताच मग उजवीकडे चिंदर गावाकडे निघायचं.. इथून ५-६ किमी.. चिंदर.. हे भगवंतगडाच्या पायथ्याचे गाव आहे.. इथे शाळेशेजारून उजवीकडे जाणारी वाट.. भगवंतगडाकडे जाते.. शाळेच्या उजव्या बाजूस असलेल्या पायऱ्यांवरून आपण वर येताच.. एक मोठा खडक दिसतो.. हा खडक चढून जाताच मग तुरळक झाडी आणि मग थोडा चढाव पार करताच आपण दहा-एक मिनिटात भगवंतगडाच्या भग्न दरवाजाशी येवून पोहोचतो.. इथे तटबंदी, बुरुज आणि कातळकोरीव पायऱ्या नजरेस पडतात.. आठ-दहा पायऱ्या चढून जाताच समोर एक महाकाय वटवृक्ष आहे.. आणि या डावीकडे झाडासमोर दगडभिंतीतील सिद्धेश्वर म्हणजेच भगवंताचे मंदिर.. मंदिराच्या दांडग्या पायऱ्या चढून पाहिलं तर आत एक जांभ्या खडकात ओबडधोबड अशी शंकराची पिंड नजरेस पडते.. मंदिराशेजारी दिड-दोन पुरुष उंचीचे भव्य तुळशीवृंदावन.. कॅमेरामन गंपू फ्रेम न मिळाल्याने नाराज झाला होता.. तर नेव्हिगेटर विशाल गड संशोधनासाठी पुढे निघून गेला.. तुळशी वृंदावनापासून पुढे गेल्यास.. उजवीकडे गर्द झाडीत लपलेले दोन बुरुज दिसतात.. इथे उजव्या बाजूला बुरुजाच्या अलीकडे एका झाडापासून खाली उतरायला एक पायवाट आहे.. तिथून थोडं खाली उतरताच एक दरवाजा आणि दोन दांडगे बुरुज दिसतात.. समोर उतरत्या पायऱ्या.. दोन बुरुज आणि मध्यभागी दरवाजाची चौकट.. इत्यादी अवशेष.. हाच गडाचा मुख्य दरवाजा असल्याचे निक्षून सांगतात.. इथे मात्र गंपूचा निवांत झालेला कॅमेरा धाडधाड फोटो काहु लागला.. कारण गंपूला इथे फ्रेमच फ्रेम असल्याचा साक्षात्कार झाला.. अन्न मात्र निर्विकार होता.. म्हटलं याच्या पोटातील भुकेला जीन पुन्हा जागा झाला की काय..!! उजवीकडे खाली उतरायला वाट आहे पण गर्द झाडी आणि पाचोळा यात ती गुडूप झाली आहे.. त्यामुळे पुन्हा वर आलो.. आणि अजानबाहू वटवृक्षाखाली विसावा घेतला.. इथे हौशी मंडळीनी पारंबी क्याम्बिंग.. झोका अशा नानाविध गोष्टींचा आनंद लुटला.. इथे झाडाच्या मागे एक बुजलेलं भुयार आहे.. दहा मिनिटांच्या विसाव्यानंतर भगवंतगडावरील ओबड-धोबड भगवंताला दंडवत घालून पुन्हा शाळेपाशी आलो.. आणि भरतगडाची चौकशी केली.. चिंदर गावातून तरीने भरतगडावर जाता येते असे कुठे तरी वाचले होते.. त्यामुळे आता हि तरी कुठे मिळेल याचा शोध घेत पुढे निघालो.. 

साधारण १ किमी पुढे गेलो आणि पाहिलं पण तरी मिळेल अशी जेट्टी काही दिसेना थोडं पुढे गेलो.. आणि पुढे आणखी एक बुरुज दिसला.. पुढे एक डावीकडे वळण आणि उजवीकडे खाडी.. म्हटलं हा काय प्रकार आहे.. गड तर मघाशी पाहून झाला.. आणि आपण एक किमी भर पुढे आलो.. मग हा कुठला नवीन बुरुज.. मग तिथे गाडी लावून.. पुढे गेलो तर आश्चर्याचा धक्काच बसला.. इथे सुमारे १००-१५० मीटर ची डोंगरावर बांधलेली भक्कम अशी उतरती तटबंदी आहे.. तटबंदी मध्ये बांधलेले साधारण तीन एक बुरुज नजरेस पडले.. आणि या गडाचा विस्तार प्रचंड असल्याचे जाणवले.. इथे खाडीकाठच्या बुरुजाशेजारी उभा असलेला  मंडळातील एक कार्यकर्ता ओरडला.. आणि प्रतिध्वनी ऐकल्याचा भास झाला.. मग.. हा इको पॉइंट आहे का हे पाहण्यासाठी मग आरोळ्या ठोकण्याची स्पर्धा सुरु झाली.. आणि या अनाहूत इको पॉइंटचा आनंद घेतला.. क्षणभराच्या विरंगुळा उरकून  मग पुन्हा.. तरी कुठाय.. तरी कुठाय..!! अशी एका नारळाच्या झाडावर चढलेल्या क्लायंबरकडे विचारणा केली.. उत्तर देण्यासाठी क्ल्याम्बर खाली उतरला.. आणि म्हणाला.. मागे जा.. पुढे एक ताडी-माडी (!) दुकान आहे तिथनं डावीकडे जेट्टी आहे.. तेवढ्यात काही शाळकरी पोरं चिंदर गावाकडे निघाल्याचे दिसले.. त्यातील एका पोराला म्हटलं दादा जेट्टी दाखव बाबा ती एकदाची.. मग पोराला बरोबर घेवून जेट्टीकडे निघालो…

चिंदर गावातून पुढे जाताच थोडा उतार आहे.. आणि मग एक वळण.. हे वळण संपताच उजवीकडे नारळाची गर्द बाग दिसते.. समोर एक-दोन टपरी वजा दुकाने आणि एक सरकारमान्य ताडी-माडी विक्री केंद्र.. इथे गाडी उभी करून.. दुकानच्या समोरील नारळाच्या झाडातून चालत पाच मिनिटात जेट्टीवर येवून पोहोचलो.. बारक्याला धन्यवाद देवून जेट्टीवर तरीची वाट पहात बसलो..

क्रमशः ..!!


माधव कुलकर्णी २०१३

2 Comments Add yours

  1. rohit2482 says:

    खुपच छान

    Like

  2. खुप छान तुम्ही आपले लिखाण ईसाहित्य ला पाठवा.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s