Bharatgad (Kawa-Masure), Fort Nivati (Parule-Nivati), Ramgad, Siddhagad, Devgad, Yashvantgad (Sakhri Nate), Ambolgad
भरतगड – स्वराज्याचा नव्या दमाचा पहारेकरी
भगवंतगड आणि कावा-मसुरे दरम्यान असलेल्या कालवल खाडीतून ये-जा करण्यासाठी हि तरी (बोट) सेवा सुरु असते.. चक्क १२ रुपयात एकदम अफलातून असा स्वदेस स्टाईल प्रवास.. तरीत बसलो आणि नावाड्याने तरी पुढे हाकली.. ओहोटीची सुरुवात झाली होती.. नावाड्याने बांबू पाण्यात रुतवताच तरी पुढे सरकू लागली.. मध्ये काही-काही ठिकाणी पाण्याचा तळ अगदी स्वच्छ दिसतो.. अगदी गुडघाभर खोली असावी.. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार.. चिंदर ते कावा-मसुरे हे अन्तर ओहोटीला चालत पाण्यातून पार करता येते.. पण वाळू उपशामुळे खाडीत ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत.. त्यामुळे माहिती नसल्यास हे धाडस जीवावर बेतू शकते.. पण एखादा स्थानिक वाटाड्या मिळाल्यास खाडी क्रॉंसिंगचा थरार अनुभवायला काहीच हरकत नाही.. दहा-पंधरा मिनिटांच्या या जादुई प्रवास करून ‘कावा’ गावच्या किनारी पोहोचलो.. ओहोटी असल्याने.. तरी अलीकडेच थांबवण्यात आली.. मग गुडघाभर पाण्यातून चालत ‘कावा’ किनाऱ्याकडे निघालो.. कावा हे मसुरे गावाजवळील (भरतगडाच्या पायथ्याचे) एक २०-३० वस्तीचे गाव.. किनाऱ्यावरून पुन्हा नारळाच्या झावळ्यांच्या गर्द सावलीतून वाट काढीत डांबरी रस्त्यावर येवून पोहोचलो.. इथून डावीकडे साधारण दिड-दोन किमी अंतरावर मसूरे गाव आहे..आणि या गावाला खेटून असलेल्या डोंगरावर भरतगड बांधला आहे.. दुपारच्या उन्हात पावले टाकू लागलो.. वाटेत आणखी एक वाटाड्या माहिती देवू लागला.. पुढे एक टेलिफोन टॉवर आहे त्याच्या शेजारून जाणारी वाट भरतगडावर जाते.. मग कावा मसुरे गावातून चालत टेलिफोन टॉवर पाशी येवून पोहोचलो इथून डांबरी रस्ता सोडून उजवीकडे पायवाटेने पुढे निघालो आणि भरतगडाचा डोंगर दिसू लागला.. वेडीवाकडी पायवाट जशी जाते.. तसे वर जावू लागलो आणि एका तटबंदीशी येवून पोहोचलो.. पुढे गेलो तर एक खंदकाची रचना आणि पुढे एक चौकट नसलेला दरवाजा नजरेस पडला..
गडाच्या भग्न दरवाजातून आत शिरलो आणि पाहिलं तर गडावर चक्क डवरलेली बहरदार आमराई पाहायला मिळाली.. जिकडे पहावे तिकडे आंब्याचीच झाडे.. काही झाडांना गच्च हापूस लगडलेले पाहून.. तोंडाला पाणी सुटले.. पण मागे एकदा पुर्णगडाजवळच्या घाटात.. केवळ एका आंब्यापायी झालेला पाणउतारा लक्षात असल्याने.. आंबे तोडण्याचा मोह टाळला आणि गडाच्या बाह्य तटबंदीवरून एक फेरफटका मारला.. गडाची अवस्था अजूनही चांगली असल्याचे दिसून आले.. पुढे डावीकडे एका बुरुजाच्या आत तटाला खेटून बांबू लावून काहीतरी पुनर्बांधणी चालू असल्याचे दिसले.. इथे गडाच्या मुख्य दरवाजाची वाट दिसते..या वाटेत दुहेरी तटबंदीचे ढासळलेले चिरे.. चालताना अगदी नाकी नऊ आणीत होते.. जांभ्या चिऱ्याच्या बांधणीचे तट.. बुरुज आणि सैनिकांच्या दबा धरून जागा सारं काही नीट दिसत होतं.. बुरुजाच्या मध्यभागी असलेला एक ६-७ फुटी चौरस खांब लक्ष वेधून घेत होता.. थोडं पुढे एका झाडाखाली बुड टेकवलं तसे.. दुरून चार-दोन लोक येताना दिसले.. वाटलं .. आंब्याच्या झाडाकडे आशाळभूत नजरेने खवून बघितलं म्हणून हि माणसे जाब विचारायला आली कि काय..! पण ते तर गडाची पुनर्बांधणी करणारे कारागीर निघाले.. इथल्या राजकारण्यांनी गडाचे रूप पालटून टाकण्याचा विडा घेतल्याचे पाहून बरे वाटले.. थोडा वेळ आमराईतल्या घनदाट सावलीत बसून राहिलो.. तिकडे नेव्हिगेटर विशाल.. गडाचे इतर काही अवशेष दिसतात का ते पाहण्यासाठी पुढे निघाला.. तर इकडे गंपू.. बसल्या जागी डूलकी घेवू लागला.. अण्णा निर्विकार होता.. राहून राहून आंब्याच्या झाडाकडे पहात होता.. म्हटलं याची जेवणाची वेळ जवळ आली आता.. चला निघा..
तिकडे विशालने हाक दिली.. अरे इकडे मध्ये बालेकिल्ला आहे.. मग तिकडे निघालो.. मध्यभागी एक आडवी २०-२२ फुटी भिंत दुरून दिसत होती.. हिच ती बालेकिल्ल्याची दणकट भिंत.. दुरून पाहताना एक भिंत.. उजवीकडच्या कोपऱ्यातला बुरुज आणि शेजारी एक चौकट दिसते.. हिच बालेकिल्ल्याची वाट.. कमानीविना.. तयार केलेल्या आयताकृती दरवाजातून आत शिरलो.. शेजारी एक देवडी होती.. मागे पुन्हा दरवाजाकडे पाहिलं तर तिमजली बांधकामाचे अवशेष.. आतील बाजूस कमानी पाहायला मिळतात.. पुढे ६-७ पायऱ्या चढून डावीकडे निघालो.. वाटेत.. सुकलेला पालापाचोळा.. आणि त्यात पावले रुतून होणारा पायांचा आवाज.. बाकी इथे शांतता होती.. डावीकडे.. एक घुमटी आणि बाजूला चार मनोरे असलेले एक मंदिर आहे.. हे महापुरुषाचे मंदिर.. या समोर तटबंदीलगत एक तुळशी वृंदावन आहे.. आणि तटबंदी मध्ये एक त्रिशूळ कोरल्याचे दिसते.. या वरून हे शंकराचे मंदिर असावे असे वाटते.. मंदिर डावीकडे ठेवत पुढे निघालो.. मग इथे डावीकडे.. एक सुकलेला बारव (चौरस पायऱ्यांची विहीर) आहे.. इथून डाव्या कोपऱ्यात एक तिमजली बुरुज आणि एक चोर दरवाजा दिसतो.. शेजारी.. एक कुलुपबंद.. तटबंदी मधील खोली आहे.. इथे बहुदा तुरुंग असावा.. असा अंदाज बांधत.. गडाचा एक फेरफटका मारून पुन्हा मुख्य द्वाराशी येवून पोहोचलो.. गडाचा घेरा तसा बऱ्यापैकी असून.. केवळ.. दुर्लक्षित असल्याने गडाची अवस्था आजतरी टिकून आहे..
अजून.. निवतीचा किल्ला पहायचा असल्याने.. बिगीबिगी दगडी पायऱ्या उतरून भरतगडाच्या पायथ्याच्या मसुरे गावी पोहोचलो.. इथे एक रिक्षा उभी असल्याचे पाहून मग.. पुन्हा जेट्टीपर्यंत तंगडतोड करण्यापेक्षा फेरारी कि सवारी करण्याचे सर्वमान्य झाले आणि माणशी ८ रु. प्रमाणे रिक्षावाले काका’ मसुरे गावातील जेट्टी पर्यंत सवारी पोहोचवायला तयार झाले.. काकांनी handle ओढला तशी.. रॉकेल+पेट्रोल रिक्षा जेट्टीकडे धावू लागली.. जेट्टीवर पोहोचलो पण बोटी चा पत्ताच नव्हता मग आडोशाला सावलीत बसलो आणी तरीची वाट पाहू लागलो.. भरतीची वेळ झाल्याने.. खाडीमध्ये पाण्याच्या पातळीत बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसले.. अर्धा तासांचा खेळखंडोबा करून तरी घेवून मिस्टर इंडिया नावाडीचे जेट्टीवर आगमन झाले.. तसे बिगीबिगी पाच भटके विमुक्त पांडव तरीत जाऊन बसले.. पुन्हा खाडीचा प्रवास सुरु झाला.. पाण्यात बांबू रुतवून.. तरी पुढे-पुढे सरकू लागली.. इथे एका नारळी-पोफळीच्या बेटाजवळ (जुवा) चार-दोन कोळीबांधव छातीभर पाण्यात उतरून मासेमारी करत असल्याचे दिसले.. दहा-पंधरा मिनिटात पुन्हा चिंदर गावच्या जेट्टीवर येवून पोहोचलो.. चिंदर गावात पोचतो नं पोचतो तोच.. गंपू चे अरे निवतीच्या किल्ल्यावर सनसेट मस्त असतो चला निघूया लवकर असं म्हणाला.. अण्णा कडे पाहिलं.. अन्ना म्हणाला.. खायचं बघा काहीतरी म्हणून ताडी-माडी विक्री केंद्राजवळ उभ्या केलेल्या कारच्या टपावर शिदोऱ्या उघडल्या आणि काय असेल नसेल ते वरपुन.. भगवंतगड-भरतगड या वैशिष्ट्यपूर्ण अशा जोडगोळीला निरोप दिला आणि पुन्हा मालवण कडे आल्या रस्त्याने चिंदर गावातून निघालो.. पुन्हा कालावल खाडीपूल.. मालवण गाठले.. युवराजांची रजा संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला आणि राहिलेले चार मावळे.. निवतीकडे निघाले..
निवतीचा किल्ला – मदमस्त वाऱ्याचा दोस्त
अन्ना चालक आणि गंपू वाहक.. अशी वरात निघाली.. निवतीचा सूर्यास्त पहायला.. अबोल गंपू तासाला फार फार तर एक वाक्य बोलतो आणि तो अन्नाला रस्ता दाखवणार..!! म्हणजे.. एकंदरीत आनंदच होता.. जरा आराम करावा म्हणून गाडीत पडी मारली.. मालवण पासून ४५-५० किमी अंतरावर असेलेलं निवती.. तास-दिड तास गेलं तरी येईना.. शेवटी न राहवून गंपूला विचारलं अरे काय रे भाऊ.. रस्ता चुकला की काय ते तरी विचार..! मग पट्ठ्याने गाडी बाजूला घेतली आणि.. एका स्थानिकाला विचारलं.. निवतीचा रस्ता कुठाय..? तर हा तारकर्लीचा रस्ता निघाला.. तसा.. नेव्हिगेटर गंपूला तडकाफडकी पदच्युत (बडतर्फ) करून त्याजागी विशालची नियुक्ती करण्यात आली.. तेंव्हा..कुठे.. गंपू म्हणाला अरे.. वो मोड गलत था अन्ना..!! झालं पुन्हा हरिदासाची कथा मूळपदावर आली.. पुन्हा मालवण रस्त्याकडे परत आलो.. आता इथेच पाच वाजले.. निवतीचा सूर्यास्त बोंबलणार असं वाटायला लागलं.. पण गंपू निर्विकार होता.. मग निवतीचा रस्ता विचारत.. गाडी पुन्हा रुळावर आली.. पुढे एक ‘cast away’ चौक लागला.. म्हटलं झाला का घोटाळा आता..! बरं इथे कुणाला विचारावं तर.. रस्त्यावर चिटपाखरूदेखिल नव्हतं.. शेवटी गंपू म्हणाला लेफ्ट आणि लेफ्टला निघालो.. इथे पुढे परुळे गाव लागलं आणि या गावातून उजवीकडे एक बारका रस्ता निवतीकडे जातो असे कळले.. १०-१५ किमी च्या अस्सल कोकणी वळणा-वळणाच्या गाडी रस्त्याने निवतीपर्यंत येवून पोहोचलो.. इथे एक-दोन हॉटेल्स आणि आजूबाजूला बऱ्यापैकी वसति आहे.. शिवाय.. गावकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पर्यटक निवास बांधले आहेत.. इथे राहून सहजसुलभ सहकुटुंब निवतीचा किल्ला पाहता येईल.. निवती किल्ला परिसर आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे ‘निवती रॉक्स’.. निवती किल्ल्याच्या दक्षिणेकडे हे समुद्रामध्ये एखाद्या बेटासारखे.. उभे असलेले.. तांबूस-पिवळ्या रंगाचे १५०-२०० फुटी खडक पहाणे हि एक भटक्यांसाठी आगळीवेगळी पर्वणी आहे.. सिंधुदुर्ग पासून २५ किमी वर असलेला हा निवतीचा परिसर.. म्हणजे निसर्गदत्त शांततेची एक खाण आहे.. भोगवे-देवबाग चा निर्मनुष्य किनारा.. म्हणजे एखादा प्रायव्हेट बीच.. स्वच्छ.. सुंदर.. नितळ.. आणि अगदी निवांत असा.. सिंधुदुर्गात राहून माणसांच्या गर्दीचा तिटकारा आल्यास किल्ले निवती आणि परीसराला एखादी धावती भेट द्यायला हरकत नाही..
निवती गावात पोहोचलो आणि ताबडतोब कच्च्या रस्त्याने निवती किल्ल्याकडे निघालो.. दहा-एक मिनिटे गाडीने टेकडावर जाताच.. रस्ता संपला.. तशी लाजवंती बाजूला उभी करून.. ताडताड किल्ल्याकडे निघालो.. मावळतीला अजून अंमळ अवकाश होता.. त्यामुळे दिशाभूल केल्याबद्दल गंपूची बिनपाण्याची न करण्याचे सर्वानुमते निश्चित झाले.. झपाझप पावले टाकीत निवती किल्ल्याच्या पायऱ्या चढू लागलो.. २० एक पायऱ्या चढताच.. एक भग्न पण भला दांडगा बुरुज लक्ष वेधून घेतो.. इथे.. गडाचा मुख्य दरवाजा होता असे जाणकार सांगतात.. आपण.. जे काही शिवकालीन इतिहासाचे सोबती (अवशेष) शिल्लक राहिले ते पहात थोडं पुढे सरकायचं.. इथे.. एक आडवी भिंत.. बुरुज आणि खंदकाची रचना पाहायला मिळते.. इथे डावीकडे चौकटीतून आत शिरायचं कि आपण एका प्रशस्त राजवाड्यात येवून पोहोचतो.. गडावर हाच काय तो ऐतिहासिक ठेवा.. याशिवाय.. गडावर आणखी काही पाहण्यासारखे बुरुज उत्तरेकडे आहेत.. पण हि वस्तू हे गडाचे मुख्य आकर्षण.. इथे पोहोचलो आणि सूर्यदेव अस्ताला निघाले होते.. तांबड्या रथाचे.. घोडे चौखूर उधळत.. डावीकडे निवती रॉक्स.. समोर.. वेंगुर्ला रॉक्स..लाईट हाउस.. उजवीकडे भोगवे चा निर्मनुष्य किनारा.. आणि निवती-ते-भोगवे टापूमधील करवंदीच्या जाळीचे जंगल.. इथे.. रानडुकरे.. बिबटे यांचा सर्रास वावर असल्याचे गावकरी सांगतात..
निवतीच्या भग्न राजवाड्यातून मावळतीचे सुंदर निसर्गचित्र पाहून उजवीकडील बुरुजाकडे निघालो.. करवंदाच्या जाळ्यातून जाणारी पायवाट चालत.. गडाच्या उत्तरेकडील बुरुजाकडे आलो .. इथं पोहोचलो आणि थंडगार वारा शिळ घालू लागला.. समोर भोगवे चा नितांत सुंदर असा समुद्रकिनारा.. पाहून.. एक नवा स्वर्ग पाहिल्याचे समाधान ऊरात दाटून आले.. इथे बुरुजावर काही निवांत क्षण घालवून पुन्हा करवंदाच्या जाळीतून वाट शोधीत.. मुख्य दरवाजाकडे निघालो.. इथे वाटेत डावीकडे आणखी काही इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात.. पुन्हा मुख्य दरवाजाशी आलो तेंव्हा आधार गुडूप झालं होतं.. मोबाईल विजेरीच्या प्रकाशात पुन्हा निवती किल्ल्याच्या पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली आणि निवती बस स्थानकावर येवून पोहोचलो.. इथे बुड टेकते न टेकते तोच गंपू.. म्हणाला आज निवती किनाऱ्यावर टेंट लावूयात.. तेंव्हा तंबू साठी जागेची रेकी करण्यासाठी.. चार भटक भुंग्याची टीम निघाली निवती किनाऱ्यावर.. समीर पर्यटक निवासाशेजारून निवती चा किनारा गाठला.. इथे बऱ्यापैकी दाट झाडी आहे.. निवतीचा किनारा.. तसा बराच निर्मनुष्य आहे.. त्यात खडकाळ किनारा.. धडकी भरवणारे लाटांचे आवाज.. आणि त्यात भरीत भर म्हणजे भरतीची वेळ असल्याने.. इथे तंबू टाकल्यास सकाळी कदाचित एक-दोन लाटा आपल्या मंडळाला कवेत घेवून टाकतील.. असा निष्कर्ष निघाला.. आणि निवतीच्या किनारी तंबू टाकण्याचा प्रस्ताव १ विरुद्ध ३ अशा बहुमताने फेटाळण्यात आला.. गंपू नाराज झाला.. त्याला म्हटलं त्यापेक्षा आपण निवती ST स्थानकावर तंबू लावू.. आजूबाजूला चार घरं आहेत लफडा होणार नाही.. मग तिथेच सावंतांच्या हॉटेलात जेवणाची सोय लावली.. जेवणाची ऑर्डर दिल्याचा आनंद अन्नाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.. सकाळपासून अन्नाला फक्त.. नाश्त्यावर फिर फिर फिरवला होता.. त्यामुळे.. एक सुरमई थाळी तो बनता हि था..!! अन्नाला म्हटलं तू फक्त ऑर्डर दे..बघू कोण नाही म्हणतंय ते.. आपलं काय .. झेंड्यावर पंढरपूर करायला मिळतंय म्हटल्यावर.. मासळी थाळीचा चान्स सोडतोय कोण..!!
निवतीच्या स्थानकावर तंबू लावला.. तेवढ्यात ST महामंडळ एक मुक्कामी लाल डबा घेवून स्थानकावर हजर झालं.. डायवर आणि कंडक्टर.. ST उभी करून एका बाजावर आडवे झाले.. त्यातले कंडक्टर दिलखुलासपणे निवतीचा इतिहास सांगू लागले.. दोन वाक्यानंतर प्रत्येकी एक अस्सल मालवणी शिवी आणि मग पुन्हा दोन वाक्य.. अशी इतिहासाची अनोखी सफर सुरु झाली.. या गडावर दस्तुरखुद्द महाराज स्वतः येवून गेल्याचे कंडक्टर काकांनी सांगितले.. खांदेरी पासून ते थेट तेरेखोल पर्यंत असलेली ही जलदुर्ग/ समुद्र किनारी असलेल्या दुर्गांची मलिका म्हणजे शिवरायांच्या दूरदृष्टीचे एक ज्वलंत उदाहरण आहे.. निवती किल्ल्याच्या तशी इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण वेंगुर्ला ते मालवण या सागरी मार्गाचा हा एक खंदा पहारेकरी आहे..
रात्री ST स्थानकावरच तंबू टाकला आणि मस्तवाल वाऱ्याशी चार गुजगोष्टी करीत पाठ टेकवली.. सकाळी भल्या पहाटे जाग आली ती ६.३० वाजता.. मुक्कामाची ST निघायच्या बेतात होती.. तिकडे गंपूने आंघोळीची आणि नाश्त्याची जोरदार सोय लावली.. नुडल्स आणि चहा घेवून.. पुढच्या प्रवासी निघालो.. किल्ले रामगड-सिद्धगड आणि मु.पो. देवगड.. रामगड के वासियो हम आ रहे है..! एक तिकडे कर्नाटकात शोलेतल्या ठाकूरचा रामगड आणि इकडे स्वराज्यातील एक दक्ष पहारेकरी रामगड..!!
किल्ले रामगड – स्वराज्यातील एक दक्ष पहारेकरी
आल्यामार्गी मालवण गाठले आणि बाह्यवळण मार्गाने म्हणजेच सागरी महामार्गाने पुढे निघालो.. वाटेत आचरा या गावाच्या इथे तिठा आहे.. या ठिकाणाला आचरा तिठा म्हणतात.. इथून जवळच रामगड आहे साधारण १८-२० किमी अंतरावर.. आचरा तिठ्यावरून उजवीकडे आचरा-कणकवली रस्त्याने निघालो.. इथे तिठ्यावर माणसांची भाऊगर्दी होती.. इथे रामगडचा रस्ता विचारला.. तर पुढं श्रावण उतार लागेल आणि त्यापुढे ४-५ किमी वर रामगड.. पुढे निघालो आणि खरंच पुढे श्रावण नावाचं गाव आणि त्याच्या अलीकडे एक चेकपोस्ट आडवं आलं.. आणि पुढे श्रावण उतार.. या उताराच्या खळग्यातून पुढे आलो आणि दूर एक गाव दिसायला लागलं.. हेच रामगड.. इथे पोहोचलो तर साधारण ९.३० वाजले असावेत .. इकडे लोकांची सकाळच्या कामाची लगबग सुरु होती.. शाळेच्या पुढे एका बंद वर्कशॉप शेजारी लाजवंती उभी केली आणि रामगड चा रस्ता विचारला.. शाळेच्या पुढे उजवीकडे गडाची शेताडातून जाणारी वाट आहे.. शिवाय.. मारुती मंदिराच्या समोर एक वाट गडावर जाते..
पायवाटेने निघालो.. समोर दिसणाऱ्या एका टेकाडाच्या दिशेने.. दहा-एक मिनिटात.. बऱ्यापैकी झाडी लागली आणि पायवाट वळेल तशी पुढे निघालो.. आणि एक काटेरी झाडीत दडलेला बुरुज दिसू लागला.. जांभ्या चिऱ्यात बांधलेला भक्कम बुरुज पाहून गड जवळ आल्याची खात्री पटली.. थोडं पुढे आलो आणि गोमुखी रचनेचा दरवाजा नजरेस पडला.. हाच गडाचा मुख्य दरवाजा.. २०-२२ फुटी दोन बुरुज आणि मध्यभागी आत दडवलेला दरवाजा.. पायवाटेने येताना गडाचा दरवाजा बुरूजाजवळ आल्याशिवाय चटकन दिसत नाही.. तटबंदी आणि बुरुजाला गर्द काटेरी झाडीने घेराव घातला आहे.. आत प्रवेश केला आणि मुख्य द्वाराच्या आत दुबाजूस देवड्या नजरेस पडल्या.. आत आलो आणि उजवीकडच्या तटावर जाण्यासाठी जिना केल्याचे दिसले.. पुढे तटबंदी उजवीकडे ठेवत निघालो.. आणि गडाच्या मध्यभागी राजवाड्याचे अवशेष दिसून आले.. इथे.. राजवाड्याच्या भिंतीवर जाण्यासाठी जिना आहे.. आत डोकावून पाहिलं तर इथे तुळशी वृंदावन .. आणि गणपती मंदिर दिसून आले.. इमारतीचे आतले बांधकाम भुईसपाट झाले असून आणखी काही वर्षात इथे बाहेरच्या भिंती तरी शिल्लक राहतील कि नाही याची शंका वाटते.. राजवाडा डावीकडे ठेवत पुढे निघालो.. उजवीकडे.. तिरपे जाताच.. एक तुळशी वृंदावन आणि जमिनीत तोंड खुपसून बसलेल्या ६ तोफा लक्ष वेधून घेतात.. वेगवेगळ्या आकाराच्या ह्या तोफा म्हणजे.. गडावरील सुसज्ज शिबंदीचा धडधाकट पुरावा.. या समोरच गडाचा मागील बाजूचा दरवाजा आहे.. इथे मात्र बरीच पडझड झाल्याचे दिसते तरी दरवाजाची कमान अजूनही मजबूत आहे.. दरवाजाच्या मागील बाजूस कोपऱ्यात.. वर तटावर जाण्यासाठी एक कातळी पायऱ्यांचा जिना आहे.. इथे तटावर चढून पाहिलं तर पुढे गर्द रानाशिवाय काही नाही मग पुन्हा खाली उतरून डावीकडे निघालो.. इथे.. एक बारीक चौकट दिसते.. आणि आजूबाजूला इमारतीचे चौथरे दिसतात.. इथे धान्य कोठार असावे.. इथून पुन्हा राजवाड्याला उजवीकडून वळसा मारून पुढे निघालो.. राजवाडा पार करताच उजवीकडच्या तटबंदीमध्ये.. आणखी एक दरवाजा दिसून येतो.. इथे आतील देवड्यात वटवाघूळाचा चित्कार ऐकू आला.. यंदा नेव्हिगेटर.. आघाडीवर होते.. जीव मुठीत घेवून आत शिरलो.. तर समोर.. दरवाजासमोर आडवी कमरेइतुकी भिंत आणि डावीकडे उतरती तटबंदी दिसते.. इथे बरीच झाडी होती आणि पाचोळ्यामध्ये पाय पूर्ण रुतत होता.. थोडं पुढे जाऊन पाहिलं तर इथे चक्क उतरत्या तटबंदीला जोडून काही पायऱ्या खाली जाताना दिसल्या पण .. पाचोळ्याच्या आडोशाला दडून बसलेले वळवळणारे मि. सरपट कुमार शाळा करतील.. म्हणून गुडघाभर पाचोळ्यातून भ्रमंतीचा नाद सोडून दिला.. आणि पुन्हा मुख्य द्वाराकडे निघालो.. पुन्हा आल्यामार्गे परत जाताना.. गडाला वळसा मारत डावीकडे जाणारी वाट घेतली.. इथे इवल्या-इवल्या खिंडीतून उतरत उजवीकडच्या पायवाटेने.. पुन्हा मुख्य रस्त्यावरील मारुती मंदिरासमोर येवून पोहोचलो.. इथवर आलो आणि अन्ना कुठाय.. अन्ना कुठाय अशी ओरड सुरु झाली.. म्हटलं गेला असेल सिद्धगडाची वाट विचारायला.. पण कसलं काय.. हा पठ्ठ्या वाट विचारायला गेला आणि जेवणाच्या ताट कुठे मिळते याचा शोध लावून आला.. इथे शाळा-रामगड इथे.. कुणाच्या तरी लग्न पंचविशी निमित्त गावजेवणाचा कार्यक्रम सुरु होता.. इथे अन्ना आणि गंपू काही वेळ घुटमळले आणि तिथल्या काही जणांनी त्यांना गावजेवणाचे आवताण देवून टाकले.. जेवणाचे आवताण मिळताच अन्नाच्या चेहऱ्याची कळी खुलली.. आणि अन्ना हसला.. !!
शेवटी जे झाले ते बरेच झाले.. पदरी पडले पवित्र झाले.. अन्नदाता सुखी देवो भवः दुपारी बाराच्या ठोक्याला पंगतीत बसून.. गावजेवण सुरु झाले.. मसाला भात.. बटाटा रस्सा भाजी.. आणि सोजी (लापशी).. त्यावर दोन पळ्या तूप.. बास. ब्बास.. बास.. आणखी काय पाहिजे मुसाफिर जीवाला.. यजमानही अगदी आग्रहाने वाढू लागले.. अन्ना पार पोटाला तड लागेपर्यंत भिडत होता.. म्हटलं लढ बाप्पू.. आता.. उद्यापर्यंत जेवण नाही.. “तृप्तेची ढेकर.. चेहऱ्यावरची समाधानाची लकेर होईपर्यंत गच्च जेवलो”.. आणि यजमानांचे मित्रमंडळातर्फे हार्दिक आभार मानून सिद्धगडाची वाट पकडली..
सिद्धगड – भैरोबाची घुमटी आणि परमसिद्ध असा सिद्धगड
‘रामगड के लोगो’ यांचा निरोप घेवून पुन्हा मागे श्रावणउताराकडे निघालो.. इथे पुढे डावीकडे.. कसाल गावाकडचा रस्ता विचारीत कसाल गाठलं इथून ३-४ किमी अंतरावर ओवळीये नावाचे गाव आहे.. इथे आधी उजवीकडे श्री. गांगेश्वर मंदिर दिसते.. आणि ओवळीये या गावाच्या पुढे डावीकडे.. सिद्धगडाची वाट आहे.. इथे पोहोचलो आणि डावीकडच्या धूळमाखल्या कच्च्या रस्त्याने निघालो.. लाजवंती कच्च्या रस्त्याने धावू लागली.. इथे थोडं पुढे जाताच एक रस्ता सरळ जातो आणि एक डावीकडे सिमेंटची factory आहे त्याला वळसा घालून वर.. इथे सिद्धगड असावा असा.. अंदाज नेव्हिगेटर विशालने बांधला आणि इथे गाडी उभी करून.. डोंगराच्या दिशेने निघालो.. आधी बऱ्यापैकी वाटणारी वाट अरुंद होत गडप झाली आणि काटेरी झुडुपातून नेव्हिगेटर वाट काढू लागला.. चांगलं १५-२० मिनिटे काटेरी जाळीतून वर गेलो पण पुढे वाट काही दिसेना.. त्यामुळे.. तिथे.. काटेरी झाडीत रक्तबंबाळ.. मंडळाची सभा भरली आणि नेव्हिगेटर विशालने मंडळाला धक्क्याला लावल्याचे निष्पन्न झाले.. कुणाचे ढोपर रक्ताळले तर कुणाचे गुडघे.. जो तो पथ चुकलेला.. अशावेळी.. पुन्हा परत फिरण्याचा निर्णय घेण्यात आला.. नेव्हिगेटरला अजूनही वाटत होते कि गड फक्त दोन बोटे उरला आहे.. पण.. काटेरी झाडीत भरकटण्याची शक्यता असल्याने पुन्हा factory पाशी जाण्याचे ठरले.. इथे आलो आणि पुन्हा परत निघालो.. मघाशी वर येताना एक रस्ता सरळ जात होता.. हा सिद्धगडाचा रस्ता असण्याची शक्यता होती.. म्हणून त्या तिठ्यावर थांबलो.. कुणी वाटाड्या येतंय का याची वाट पहात.. दहा-वीस मिनिटे तसेच थांबलोआणि एक टेम्पो आमच्या दिशेने येताना पहिले.. टेम्पो चालकास आमची दर्दभरी कहाणी ऐकवली आणि तो म्हणाला तिकडं तुम्ही गेला तिकडे लई रानडुकरे आहेत.. बर झालं तुम्ही परत आलात ते.. सिद्धगडाची वाट इकडे आहे ही सरळ.. पण हि गाडी नाही जायची वर.. वाटेत लई मोठे दगुड आहेत.. बर.. अन्नाकडे कटाक्ष टाकला.. दडपून जेवल्याने अन्ना कुठल्याही सहसासाठी सज्ज होता.. जिधर तक लाजवंती जायेगी उधर तक जायेंगे.. है क्या नही क्या.. !! अन्ना तयार झाला.. आणि कच्च्या रस्त्याने निघालो.. अन्नाचे कसब पणाला लागले होते.. पुढे एके ठिकाणी.. लईच मोठे दगड आडवे आले आणि मग लाजवंती तिथेच उभी करून.. पुढे पायी निघालो.. दहा-पंधरा मिनिटे तंगडतोड करताच.. एक खिंड दिसू लागली.. आणि एकंच गलका झाला.. सिद्धगड सापडला.. हुर्रे.. खिंडीतून वर आलो आणि एक विस्तीर्ण पठार दिसू लागलं..
उजवीकडे काही वसती दिसू लागली.. तिकडे निघालो तर.. एक तुर्रेबाज रुबाबदार मिशीवाले वयस्क काका आमच्याकडे येताना दिसले.. त्यांना विचारलं सिद्धगड कुठाय.. मग डावीकडे.. दिसणाऱ्या झाडीत सिद्धगडाची वाट आहे असे त्यांनी सांगितले.. उजव्या अंगाने जावा म्हणजे वाट गावल.. असं सांगण्यास ते विसरले नाही.. गडावर भैरुबाचं ठानं आहे.. जरा इथे पावित्र्य राखा.. असा मोलाचा सल्ला देवून गाववाले निघून गेले.. त्यांचे आभार मानून सिद्धगडाकडे निघालो.. इथे वाटेत एक टॉवर दिसतो.. त्याच्या उजवीकडून निघालो.. पायवाटेने गच्च झाडीत घुसलो आणि समोर दगडाची रास दिसतात हिच सिद्धगडाची तटबंदी आणि मुख्य दरवाजा असे जाहीर करण्यात आले.. दगडांच्या राशीवर चढून गडावर प्रवेश केला.. थोडं पुढे जाताच.. इमारतीचे भग्नावशेष आणि भरभक्कम चिऱ्याच्या बांधणीचे चौथरे दिसतात.. आपण पायवाट वळेल तसं निघायचं.. एक-एक तट ओलांडत गडाचे अंतरंग उलगडू लागले.. थोडं पुढे गेल्यावर.. एक साधारण दोन पुरुष (२०-२५ फुट) खोल असं आयताकृती बांधीव पाण्याचं टाके आहे.. आत वाढलेल्या झाडांनी टाक्याच्या भिंतीना भेगा पडल्या आहेत.. त्यामुळे तलाव कोरडाठन्न आहे.. आणखी पुढे निघालो .. पाचोळ्याची इथे जंगी सभाच भरली होती.. चालताना होणारा पाचोळ्याचा आवाज सोडला तर बाकी इथे भयाण शांतता होती.. थोडं पुढे जाताच.. चार खांब आणि मध्ये एक घुमटी नजरेस पडली.. हि भैरोबाची घुमटी..! बस्स.. गंपू खुश झाला.. त्याला इथे फ्रेम च फ्रेम दिसू लागल्या.. बुटाडे काढून भैरोबाच्या पायी नतमस्तक झालो आणि इथल्या चौथऱ्यावर चार क्षण विसावा घेतला.. आणि देवाला म्हटलं अशीच किरपा राहू दे रे बाबा आमच्यावर.. पठारावरून दिसणाऱ्या दाट झाडीत निमुळत्या होत जाणाऱ्या डोंगरावर सिद्धगडाचे बांधकाम केले आहे.. दाट झाडीमुळे पटकन गड ओळखू येत नाही.. पण हा एक किल्ला आहे हे नक्की.. भैरोबाचे मंदिर मात्र फार जुने असण्याची शक्यता आहे.. अशीच एक घुमटी महाबळेश्वर ते ढवळ्या घाटात दिसते..
परत निघालो.. साधारण चार वाजले असावेत.. पुन्हा खिंडीत’ दाखल झालो.. इथे सोबतच्या पाण्याच्या बाटल्या उघडल्या आणि मग गप्पा सुरु झाल्या.. रानातून सैरावैरा धावणाऱ्या वाऱ्याशी.. इथे सगळ्यांची मुलाखत घेण्यात आली.. आणि सोजी वर ताव मारणाऱ्या गंपूला जबरदस्त आर्थिक दंड करण्यात यावे असा निर्णय झाला.. याशिवाय जंगल झाडीत नेवून अन्नाला रक्तबंबाळ केल्याने नेव्हिगेटर विशाल यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आणि विशालवर सेशन कोर्टात कोर्ट केस करण्यात यावि असा एकमुखी निर्णय झाला.. क्षणभराचा विरंगुळा पदरात पडून पुन्हा लाजवंती कडे निघालो तर.. मघाशी रस्ता दाखवणारे मिस्टर & मिसेस जंगम काका आणि काकू गवताचा भारा घेवून पुन्हा घरी चालल्याचे दिसले.. मग पुन्हा एकदा त्यांचा thank you सोहळा उरकून अन्नाने शिताफीने लाजवंती वळविली आणि मग ओवळीये गावाकडे निघालो.. वाटेत आचरा तिठ्यावर.. अन्नाने ड्रायव्हिंग ची कामगिरी चोख बजावल्याने त्याचा एक डझन केळी देवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.. अन्नाला जखमी केल्याबद्दल विशालची पुन्हा एकदा खरडपट्टी काढण्यात आली.. देवगडच्या अलीकडे स्थानकाजवळ जेवणाची सोय लावून रात्री अंधारात देवगड गाठला.. चुन्याने रंगवलेल्या बुरुजाआड दडलेल्या देवगडच्या मुख्य द्वाराशी लाजवंती उभी केली आणि इथेच टाका तंबू असा गंपू चा आदेश निघाला.. खरी मजा गडावर मुक्काम करण्यात आहे.. हे गंपूचे म्हणणे मान्य केले आणि गडाच्या मुख्य दरवाजाच्या आतील डावीकडच्या तटबंदीलगतच्या एका सिमेंटच्या चौथऱ्यावर मस्तपैकी तंबू उभारला..
देवगड किल्ला – द्वीपकल्पाचे देखणे कातळशिल्प
रत्नागिरी-सिंधुदुर्ग गिरीभ्रमण मोहिमेचा हा तिसरा पडाव.. लाटांची गाज ऐकत समाधानाची ऊब उशाशी घेवून निजलो.. सकाळी जग आली तो तंबूत कुणीच नव्हतं.. गंपू कुठल्यातरी तटावर आभाळाचे फोटू काढीत होता.. तर एक्स-नेव्हिगेटर विशाल गडाचे अवशेष शोधत होता.. डोस्क्यावर अजून उन्हं यायची होती तेंव्हा बिगी-बिगी आवराआवरी सुरु केली.. तोवर सकाळची आन्हिके उरकून सगळे तंबूजवळ जमा झाले.. आजचा बेत म्हणजे.. साखरी-नाटे चा यशवंतगड आणि आंबोळगड या दोन दुर्गांची भेट घेवून स्वगृही निघायचं असा बेत ठरला.. आणि गडाचा फेरफटका मारण्यास निघालो.. गडाचा घेरा तसा प्रचंड आहे.. पण काळाच्या ओघात इथल्या आतील इमारतींची पडझड झाली आहे.. आत भुईसपाट आणि बाहेर झगमगाट अशी या किल्ल्याची आजची अवस्था आहे.. देवगड किल्ल्याकडे येताना जेट्टी च्या पुढे एखाद्या द्वीपकल्पासारखे टेकाड दिसते यावर हा किल्ला बांधला आहे.. वाटेत वाडी-वसतिंमधले काही बुरुज या गडाचे तट आणि घेरा किती विस्तृत आहेत याची ग्वाही देतात.. आणि सध्या जो किल्ला आहे तो बालेकिल्ला असावा.. या किल्ल्याभोवती खंदक खणून ठेवला आहे.. किल्ल्याच्या तटबंदीवरून एक फेरफटका मारताना गडाचा पसारा लक्षात येतो.. मध्यभागी.. गणेशाचे मंदिर.. १०-१२ फुट रुंद आणि लांबलचक तटबंदी हि गडाची काही आकर्षण केंद्रे.. देवगड हे फार पूर्वी एक व्यापारी बंदर असल्याने.. या बंदरावर देखरेख ठेवावी यासाठी देवगड गावाला लागून असलेल्या एका द्वीपकल्पावर (peninsula) या गडाची बांधणी करण्यात आली आहे.. गडावर इंग्रजांनी दीपगृह बांधले असून.. सध्या तिकीट काढून त्यावर जाता येते.. याशिवाय.. या दिपगृहातून देवगडाचा बर्ड्स आय नजारा पहाणे हि एक सुखद पर्वणी आहे.. देवगडच्या तटबंदीवरून एक लांबलचक फेरफटका मारून.. दिपगृहातून गडाचे लोभस रुपडं पाहून साखरी-नाटे गावी निघालो.. ST स्थानकाजवळ एका हॉटेलात जोरदार नाश्ता कम जेवण असा २ इन १ कार्यक्रम उरकला आणि पुन्हा महाराष्ट्र राज्य सागरी महामार्ग क्र. ४ (MSH4) ने निघालो..
यशवंतगड (साखरी नाटे)– उपेक्षित पण भलादांडगा किल्ला
शिरसे-मिठ्गावने-बकाले-वाघरण-जैतापूर-आगरवाडी-साखरीनाटे अशा रस्त्याने साखरी नाटे गाठले… रस्त्यात एके ठिकाणी विजयदुर्गचा एक मस्त Landscape view आहे.. तिथे काही क्षण रेंगाळून पुढे निघालो.. साखरी नाटे या गावी खाडीच्या काठावर यशवंतगडची बांधणी करण्यात आली आहे.. विजापूरच्या आदिलशहाने गडची निर्मिती केल्याचे इतिहासकार सांगतात.. पुढे.. कोकणभूमी पादाक्रांत करीत शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात सामिल करून घेतला.. साखरी नाटे गावातून आंबोळगडच्या रस्त्यावर डावीकडे हा किल्ला आहे.. थेट समुद्राला भिडलेली १५-२० फुट उंच उतरती तटबंदी.. गडाच्या चहुबाजूने असलेली खंदकाची व्यवस्था.. मुख्य दरवाजाच्या बाह्य बाजूस बुरुजाच्या उजवीकडे महापुरुषाचे मंदिर.. खंदकाच्या खडकावर कोरलेली हनुमानाची मूर्ती.. खंदकातील विहीर/टाके हि यशवंतगडाची काही ठळक वैशिष्ट्ये.. पण नाटे गावापासून एवढ्या जवळ असूनदेखिल गडावर वाढलेली दाट झाडी पाहता.. गावकऱ्यांची या ऐतिहासिक ठेव्याबद्दलची अनास्था दिसून येते.. डावीकडच्या कोपऱ्यात दोन बुरुजामध्ये गडाचा मुख्य दरवाजा लपलेला आहे.. गोमुखी रचनेच्या दरवाजातून आत प्रवेश केला.. दरवाजाशेजारील देवड्यात पुरुषभर उंचीचे वारूळ गडाच्या अनास्थेची ग्वाही देतात.. आत शिरताच एक गोलाकार रचनेचा चौथरा/पार लक्ष वेधून घेतो.. गडावर सर्वत्र माजलेले रान असून.. तटबंदीचे चिरे दुभाजून डोकावणारी गर्द झाडी सर्वत्र पाहायला मिळते.. त्यात काही शुष्क बावड्या.. वाड्यांचे चौथरे.. मोडकळीस आलेल्या भिंती.. असे अवशेष दिसतात.. उजविकडे दाट झाडीतून वाट काढीत उजवीकडे झेंडा लावलेल्या बुरुजावर प्रवेश केला.. इथे.. विशालने सोबत आणलेला भगवा झेंडा फडकावून मोहिमेची अनौपचारिक सांगता करण्यात आली..
आंबोळगड – महापुरुषाचे मोडके घर मु. पो. आंबोळगड
यशवंतगडाला धावती भेट देवून पुन्हा मुख्य दरवाजाजवळ येवून पोहोचलो.. अन्ना म्हणाला चलो अभी पुना वापिस चलते है..! त्याला म्हटलं अरे आंबोळगड इथून फक्त ७-८ किमी अंतरावर आहे.. एक धावती भेट देवून येवू कसं.. पण अन्ना नाही म्हणाला.. हे म्हणजे आंबोळगड भटकंतीचं असं झालं कि.. हाथ को आया और मुह न लगाया..! शेवटी डेड लॉक झाला.. अन्ना हटून बसला.. मग त्याला म्हटलं अन्ना एक-दो घंटे कि बात है..!! तरी अन्नाचं नो म्हणजे नो असं पालुपद सुरु झालं.. मग त्याला निर्वाणीच्या भाषेत म्हटलं ये देखो अन्ना.. अभी इतना दूर आये तो.. जाना तो पडेगा.. नही तो मै अकेला जाता हू और आप वापस चले जाओ.. मै आता हू ST महामंडळसे कैसे.. या वाक्याने अन्ना नरमला पण काहीशा नाराजीने का होईना आंबोळगड पाहण्यास तयार झाला.. रुसवे फुगवे आणि डायलॉगबाजी नंतर लाजवंती आंबोळगडकडे धावू लागली.. C शेप निर्मनुष्य समुद्रकिनारा पाहून पुढे वसती दिसू लागली आणि हेच आंबोळगड गाव आहे असे चौकशी करता समजले.. इथे किल्ला कुठाय असं एका तरुणाला विचारलं आणि हा गडी ‘चला गड दाखवतो म्हणून सोबत आला’.. इथे गावाच्या चावडीजवळ उजवीकडे तटबंदीचे ३-४ फुटी अवशेष दिसतात.. इथे ६-८ बुरुजांचा आंबोळगड आहे.. सध्या गडाच्या मध्यभागी अजस्त्र असे.. सुमारे एकरभर पसरलेले एक वडाचे झाड असून.. हे झाड गडाच्या बांधणीच्या आधी पासून इथे असावे असे दिसते.. महापुरुषाचे वास्तव्य या झाडावर आहे अशी गावकऱ्यांची धारणा आहे.. तटबंदीवरून एक आयताकृती वळसा मारून गडाचा फेरफटका मारायचा आणि वडाच्या झाडाखाली पोहोचायचं.. इथे.. चार पावलांवर एक आयताकृती चांगली १०-१५ पुरुष खोल अशी विहीर आहे.. त्या शेजारी जनावरांसाठी पाणी पिण्याचा एक लहानगा आयताकृती हौदा आहे.. उजवीकडे.. गडावरील वाड्याचे चौथरे दिसतात.. झाडाच्या मागे पाचोळ्यात दडून बसलेली एक तोफ आहे.. गडाच्या चौबाजूस खंदकाची रचना लक्षवेधी आहे.. तर असा नेटका पण काळाच्या उंबरठ्यावर.. शेवटच्या घटका मोजणारा आंबोळगड पाहून धन्य झालो.. अन्नाला मनापासून धन्यवाद दिले आणि मघाशी यशवंतगडावर झालेल्या डायलॉगबाजीबद्दल मनापसून सॉरी म्हणून टाकलं.. आणि एक लांबलचक मोहिमेची औपचारिक सांगता केली.. मित्रमंडळाचे दिलेल्या सहभागाबद्दल आभार मानून.. परतीचा प्रवास सुरु केला..
ते चार दिवस.. जणू चार युगांसारखे.. मनात स्वाभिमान जागवणारे.. शिवकालीन दुर्गांचा वारसा पाहून खरंच थक्क झालो.. “अनंत अशी शिवरायांची ध्येयासक्ती आणि तसाच उदात्त स्वराज्य निर्मितीचा ध्यास.. ह्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील कैक दुर्ग बांधणीवरून ध्यानी येतो..” हिंदवी स्वराज्यातील समुद्र किनारीच्या वसविलेल्या गडदुर्ग निर्मितीचा हा अध्याय उघड्या डोळ्यांनी वाचून.. भरून पावलो.. आणि हा आडवाटांवरचा मल्हारी महाराष्ट्र पाहून धान्य झालो..!!
जय भवानी.. जय शिवाजी.. जय हिंद.. जय महाराष्ट्र..
माधव कुलकर्णी (२०१२)