धुक्यात हरवलेलं दुर्गरत्न – रतनगड

वाटाड्या मार्ग क्र. १ – पुणे – नारायणगाव – आळेफाटा – बोटा – ब्राम्हणवाडा – कोतूळ – राजूर – भंडारदरा – रतनवाडी ..  १९० कि. मी.
वाटाड्या मार्ग क्र. २ – पुणे – नारायणगाव – आळेफाटा – ओतूर – ब्राम्हणवाडा – कोतूळ – राजूर – भंडारदरा – रतनवाडी .. १८० कि. मी.


गेल्या २-३ महिन्यांपासून आम्ही खूप गडांचा ‘नाद केला पण तो वाया गेला’.. कोर्टाची तारीख पडावी तशी.. गडावर जायची तारीख पुढं पुढं जायला लागली.. याच कारणानं जेंव्हा मन्याचा फोन आला कि रतनगडावर येणार का म्हणून.. तेंव्हा tyala लागलीच अधाशासारखं यस म्हणून टाकलं.. रतनगड हा सुमारे सव्वाचार हजार फुट उंचीचा गड आहे.. ‘आणि आज इथे या ठिकाणी’ एवढ्या उंचावर गड कसा काय बांधला आणि गडावर काय काय बांधकाम आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी करून ठेवलंय हे बघण्यासाठी उत्साही मंडळी निघाली.. मनोजराव, वकील मुळे आणि ६ नव्या दमाचे कार्यकर्ते (मि. हिरडे, शंतनू, अभय आणि मंडळी) घेवून आम्ही भंडारदराकडे निघालो.. मध्ये नारायणगावच्या अलिकडे मिसळ-आणि फक्कड चहाने पोटापाण्याची सोय झाली.. नारायणगाव सोडलं आणि ब्राम्हणवाड्याकडे निघालो.. मध्ये घाट वाटांमध्ये दिसणारा रबराच्या झाडांवरचा पांढऱ्या फुलांचा मोहोर.. आणि चार-दोन शेताडात दिसणाऱ्या बटाट्याच्या फुलांच्या ताटव्यांनी तर कासचीच खास आठवण करून दिली.. बटाट्याचं फुल इतकं सुंदर असू शकतं हे प्रत्यक्ष अनुभूतीतून समजलं.. चार-पाच तासांचा प्रवास करीत रतनवाडी गाठली.. ‘आणि आज इथे या ठिकाणी..’ रतनवाडीचे हेमाडपंथी मंदिर पाहून मन पुन्हा भूतकाळात जाऊन पोहोचले..

हि रतनगडाची तिसरी भटकंती.. पावसाळ्यातली पहिलीवहिली.. पाहिलं तर रतनगड गर्द धुक्यात हरवून गेला होता.. आणि अमृतेश्वर मंदीर परिसर तर एकदम २१ व्या शतकातील वाटला.. एकदम चकाचक.. आधी दर्शन गडाचं आणि मग अमृतेश्वराचं.. म्हणून लगोलग ब्यागा घेवून निघालो.. वाटाड्या म्हणून दत्ता गाईड ‘दत्त म्हणून हजर झाला’ आणि अंधार पडायच्या आत २ तासात गडावर पोहोचायचं असल्याने दत्ताला सोबत घेतले.. रतनगडाची वाट हि ओढ्याच्या उजव्या बाजूने एका नुकत्याच बांधलेल्या पुलाला खेटून जाते.. भात-खाचरांमधून वाट काढीत बांधा-बांधावरून चालत.. उजवीकडे दिसणाऱ्या दोन-तीन कौलारू घराकडे निघायचं आणि इथून खरा ट्रेक सुरु होतो.. इथवर पोहोचलो ‘आणि आज इथे या ठिकाणी’ रिमझिम पावसाला सुरुवात झाली.. ओढ्याचा खळखळाट आणि पावसाच्या झिम्माड सुया टोचून घेत चालत राहिलो.. डोंगराला वळसा घेणाऱ्या पायवाटेने.. कधी ओढा ओलांडत तर कधी पायवाटेच्या झालेल्या ओढ्यातून घोटाभर पाण्यातून चालत.. निघालो.. निसर्गाची एक अनोखी धुंदी अनुभवत.. इथे माहौलच काही और होता.. ना कसला गोंगाट.. ना कसला धिंगाणा.. माणसांची मुजोरी नाही की.. जिवाला पोखरणारी दुनियादारी नाही.. फक्त आरस्पानी निसर्ग.. श्रावणसरींनी न्हाऊन.. ओला चिंब झालेला आसमंत.. आणि एक वेडीवाकडी पायवाट..

पायवाटेने जाताना एक मात्र लक्षात आलं की आपण ओढ्यापलीकडच्या डोंगररांगेला समांतर जातोय.. हिरवा शालू पांघरलेले साधारण ७-८ डोंगर.. जणू निसर्गाच्या रंगमंचावरील काही दर्दी कलावंत.. १२ महिने विविध ऋतूरंगाचं कोंदण अंगाखांद्यावर मिरवणारे.. हे जिवाभावाचे मैतरच जणू.. असो.. रतनवाडीच्या ओढ्याच्या पलीकडून आपण बांधावरून जात एका चार-दोन घरांच्या वसतीजवळ येतो मग पुन्हा ओढ्याला डावीकडे ठेवत जाणारी पायवाट एखाद कि.मी. चालून आपण एका लहानग्या टेकाडापाशी येतो.. हे टेकाड चढताच.. मग पुन्हा २-३ किमी चे पठार.. आणि मग समोर दोन डोंगर एका रांगेत आडवे उभे असल्याचे दिसते.. यातला मागचा धिप्पाड थोरला डोंगर म्हणजे रतनगड.. आणि समोर दिसतो एक लहानगा धाकटा डोंगर.. आपली वाट याच डोंगरमाथ्यावरून उजवीकडे जाते.. साधारण ३-४ डोंगरांना वळसा मारत मस्तवाल ओढ्याचा खळखळाट ऐकत आणि सरीवर सरी झेलीत निघालो.. पायवाट हळूहळू तीव्र चढावाची होवू लागली तसे पहिला टप्प्याची चढाई सुरु झाल्याचे लक्षात आले.. बऱ्यापैकी दाट झाडीतून रुंद अशा पायवाटेने वर निघालो.. साधारण १५-२० मिनिटात रतनगडाच्या पुढ्यातील डोंगराच्या सोंडेवर आपण येवून पोहोचतो..

इथे एक लिंबू-टिंबू पठार आहे.. हिरवाई ची चादर पांघरलेली डोंगरसोंड.. इथे येईपर्यंत.. चांगलीच फ्या फ्या झालेली असते.. छाताडातून मोठ्या धापा ऊर फुटून बाहेर पडत असतात.. त्यामुळे.. फोटोग्राफीच्या नावाखाली एक ब्रेक पदरात पडून  घ्यायचा आणि थोडसं पाणी पिवून मग उजवीकडे सोंडेवरून पायवाट निघेल तिथे निघायचं.. इथे पोहोचलो आणि मघाशी झाडांच्या पानातून कोसळणारा रिमझिम पाऊस आता धो-धो वाटायला लागला.. त्यामुळे इथून काढता पाय घेतला.. आणि उजवीकडे डोंगराच्या नाकाडावर जाणाऱ्या पायवाटेने चालू लागलो.. इथे वर जाताना दुबाजूस कारवीचे जंगल.. आणि मग पुढे घनदाट जंगल.. तीव्र चढ चढताना जोरात धाप लागत होती.. पण दहा मिनिटे ट्रेक.. मग एक ब्रेक.. आणि पुन्हा ट्रेक असं ध्येय ठेवत चालत राहिलो.. पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे आजूबाजूला काही दिसतंय का ते पाहण्याची सोय नव्हती.. फक्त पायवाट आणि आम्ही आणि त्यावर पडणारी दुर्गप्रेमींची पावले.. हे असं भ्रमणचक्र चालू होतं.. दत्ता मात्र सुपरफास्ट सुसाट निघाला होता आता या विशीतल्या पोराचा पाठलाग करताना मित्रमंडळाचा पुरता धूर निघाला होता हे काही सांगायला हवं का..! साधारण ४५ मिनिटात रतनगडाच्या शेवटच्या चढावापाशी येवून पोहोचलो.. इथे काही दगडी चौथरे दिसतात.. आता इथे दोन वाटा फुटतात.. एक वाट रतनगड ते हरिश्चंद्रगड या मेगा ट्रेक ची आणि उजवीकडची ठळक पायवाट रतनगडावर नेणारी..

इथे मात्र चढाई आणखी तीव्र होत जाते.. ‘आणि आज इथे या ठिकाणी’ पायवाटांच्या आता पायऱ्या झालेल्या असतात.. पावसामुळे आता त्यांचे ओढे झालेले दिसतात..तर अशा या तिहेरी पर्वणीचा आनंद घेत रतनगडाकडे निघालो.. मघाशी बऱ्यापैकी असणारा वेग आता कमालीचा मंदावला होता.. दत्ताला जरा हळू चालण्याची विनंती केली आणि मग बेबी स्टेप्सने तीव्र चढावाच्या डोंगरावर चाल करीत रतनगडाच्या शेवटच्या कातळटप्प्याशी येवून पोहोचलो.. ‘आणि आज इथे या ठिकाणी’ रतनगडाचे ते राजस, राकट, रौद्र रूप पाहून मनात एकंच विचार आला.. रतनगडाचा ‘नाद केला पण आज वाया नाही गेला’.. सुमारे ३००-४०० फुटी कातळकडा सह्याद्रीच्या रौद्रतेची प्रचीती देत उभा होता.. इथे वर जाण्यासाठी आता नवीन चकचकीत लोखंडी शिड्या लावल्या आहेत.. जुन्या शिड्या गंजल्याने ह्या नवीन शिड्या लावण्याचे काम ज्या कुणी केले असेल त्याचे ‘आज इथे या ठिकाणी’ जाहीर आभार मानून शिड्या चढण्यास आरंभ केला.. पहिली १००-१५० फुट उंचीची शिडी चढून मग पुन्हा १००-१२५ फुट कातळाच्या खोबणीत रोवलेली शिडी.. या दुसऱ्या शिडीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आणि शिडी जोरात हलू लागली म्हटलं देवा नारायणा.. नाद केलाय पण आता वाया जाऊ देऊ नकोस.. दुसरी शिडी रीतसर पार करताच.. रतनगडाचा दरवाजा दिसू लागला.. ‘आणि आज इथे या ठिकाणी’ मन अभिमानाने भरून गेलं.. रतनगडावर श्रावणसरींचा मुक्त अभिषेक सुरु होता.. या शेवटच्या टप्प्यात आधी कातळखोबणीतून थेट दरवाजाच्या चौकटीपर्यंत जाणारी ३०-४० फुटी घळ होती.. पण इथेही एक शिडी उभारली आहे त्यामुळे घसरगुंडी होण्याचा प्रश्न नव्हता.. थेट दरवाजाकडे निघालो.. आणि दरवाजाच्या चौकटीला हात लावताच ‘आज इथे या ठिकाणी’ एक पावसाळी दुर्गभ्रमंती सफल झाल्याची प्रचीती आली.. 

पावसाचा जोर कायम होता.. दरवाजाच्या फटीतून उडणारे जलतुषार अंगावर झेलीत कमानीतून आत प्रवेश केला आणि बाकीची मंडळी येण्याची वाट पाहू लागलो.. शिडीवर कार्यकर्ते एका रांगेत शिस्तीत वर येत होते.. मग इथे छत्री घेवून फोटोग्राफीचे पुण्यकर्म केले आणि कार्यकर्त्यांना एक्सक्लुझीव लाईव्ह कव्हरेज देण्यात आला.. दरवाजात कार्यकर्ते पोहोचताच ‘जय भवानी.. जय शिवाजी’.. असा जयघोष झाला आणि रत्नाई देवीच्या मंदिराशेजारील गुहेकडे निघालो.. मग पुन्हा दोन शिड्या.. कातळ पायऱ्या तुटल्याने या शिड्यांचा एक भक्कम आधार मिळाला.. कार्यकर्ते सुरक्षित गडावर पोहोचतील याची पुरेपूर काळजी गावकऱ्यांनी घेतल्याचे पहिले.. ‘आणि आज इथे या ठिकाणी’ अजूनही निरपेक्ष भावनेने काम करणारी मंडळी या व्यवहारी जगात शिल्लक असल्याचे दिसून आले.. पुन्हा एकदा शिडी अभारणाऱ्या मित्रांचे जाहीर आभार मानून.. पुढे निघालो.. साधारण इंग्रजी अक्षर S याच्या उलट्या आकाराचा खडा निसरडा कातळजिना चढून गडाच्या दुसऱ्या दरवाजासमोर येवून पोहोचलो..

गडाचा हा दुसरा दरवाजा विलक्षण सुंदर आहे.. यावर बाह्य बाजूने डावीकडे मारुती आणि उजवीकडे गणेश-रिद्धी-सिद्धी यांचे शिल्प आहे.. त्यावर भगव्या रंगाचा थर दिल्याने.. दरवाजा एकदम कलरफुल झाल्याचे दिसले.. इथे जास्त वेळ न दवडता.. नखशिखांत भिजल्या अंगाने मुक्कामाच्या गुहेकडे निघालो.. गुहेत पोहोचलो आणि ‘आज इथे या ठिकाणी’ रतनगड सर झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते.. समोर दाट धुके दाटलेले.. यंदा रतनगड गर्द धुक्यात अगदी हरवून गेला होता. त्यामुळे रतनगडला खेटून उभा असलेला सुळका म्हणजेच रतनगडाचा खुट्टा काही दिसत नव्हता.. आणि दाट धुक्याने आजोबा डोंगर हि दिसत नव्हता.. दिसत होतं फक्त रतनगडाचे पावसाळी रौद्र रूप.. आजोबा नाराज झाले म्हणून काय झालं.. रत्नाई देवीचा आशीर्वाद मात्र पाठीशी होता.. संधीप्रकाशात घसरगुंडी नको म्हणून गडभ्रमंतीचा बेत.. उद्यावर ढकलला आणि कोरडे कपडे अंगावर घातले.. इथे रतनवाडीतील मि. नातू मुक्कामाला असतात.. त्यांनी मुख्य गुहेच्या शेजारच्या ४ बाय ४ च्या गुहेत एक दुकान थाटले आहे.. इथे चहा.. नाश्ता.. गरम जेवण.. चुलीवरच्या भाकऱ्या असं सगळं मिळतं.. म्हटल्यावर मग काय.. चहाची ऑर्डर देवून.. इथल्या गारव्याने भरलेल्या गुहेतील निवांतपणाचा पुरपूर आस्वाद घेतला.. समोरच्या दरीतून येणारं गार-गार वारा मात्र स्वस्थ बसून देईना.. तसा गुहेत फेरफटका मारला.. ‘आणि आज इथे या ठिकाणी ’स्टार यार कलाकार अशा रंगतदार कार्यक्रमाला सुरुवात झाली.. काही गझला.. कॉमेडी डायलॉगबाजी.. आणि शेरो-शायरीने माहौल रंगला.. ट्रेकर मंडळींच्या सुप्त कलागुणांना वाट सापडली होती.. कार्यक्रम संपता संपता.. जेवण तयार असल्याची वर्दी मिळाली आणि तांदळाच्या भाकऱ्या आणि झुणक्यावर आडवा हात मारून आडवा झालो.. गुहेत उंदरांचा बिनधोक वावर होता पण धोडप आणि साल्हेर च्या उंदरांसमोर हा अगदी किरकोळ प्रकारात मोडणारा उपद्रव होता.. लोकांना त्रास कसा द्यायचा याचं पेटंट फक्त धोडपच्या उंदारांचच आहे..   

सकाळी जाग तशी लवकरच आली.. अंधार पडायच्या आत राजगुरुनगर ला पोहोचणे क्रमप्राप्त होते.. म्हणून ब्यागा भरून गड बघण्यासाठी निघालो.. काल सायंकाळी पाहिलेला रंगबिरंगी दरवाजा आज आणखी उठावदार वाटत होता.. दरवाजाच्या कमानी जागच्या जागी असल्याचे पाहून बरे वाटले.. रतनगडाचा माथा वर असलेल्या दोन टेकाडामुळे दोन भागात विभागला आहे.. डोक्यावर टोपी घालावी तशी दोन टेकाडाची टोपी रतनगडच्या माथ्यावर आहे.. रतनगडाला एकूण पाच दरवाजे आहेत.. रतनवाडी कडून येताना यातील दोन दरवाजे दिसतात तर.. यातील कल्याण दरवाजा पाहण्यासाठी मात्र एखाद कि.मी. ची वाट चालावी लागते.. गडाचा आणखी एक दरवाजा.. माथ्यावरील टेकाडाला डावीकडून वळसा मारून गेल्यास दिसतो.. इथून जवळच चार-पाच पाण्याच्या टाक्यांची शृंखला आहे.. गडावर आणखी बघण्यासारखे अवशेष म्हणजे.. “तटबंदी.. कातळकोरीव पायऱ्या.. पाण्याचं टाकं.. तिनमजली गोल बुरुज / मनोरा.. सहा-सात माणसे सहज बसू शकतील असं नेढं (डोंगराला पडलेलं नैसर्गिक आरपार छिद्र)”.. याशिवाय गडाला खेटून उभा असा ‘रतनगडचा खुट्टा’.. धुक्यामुळे यातला खुट्टा दिसणे केवळ अशक्य होते आणि घसरड्या वाटांमुळे नेढ्यावर फुली मारली मग गडावरील इतर अवशेष पाहण्यास निघालो.. 

दुसऱ्या दरवाजात थोडं रेंगाळलो आणि इथे मत्स्यावतारातील विष्णू.. गणेश-रिद्धी-सिद्धी, आणि लांबलचक शेपूट खांद्यावरून सावरत आशीर्वाद देणाऱ्या अंजनेयाचे शिल्प आहेत.. दरवाजाच्या आतील भिंतीवर दुबाजूस आणखी दोन शिल्प कोरल्याचे दिसते.. यातले देवी देवता मात्र ओळखू येत नाहीत.. उजव्या बाजूच्या शिल्पात एक पान कोरल्याचे मात्र ठळक दिसून येते.. दरवाजाच्या भिंती पार करताच उजवीकडे एकांडा बुरुज उभा असल्याचे दिसते.. गोलाकार आकाराचा हा तिमजली बुरुज/मनोरा म्हणजे एखादा टेहळणी बुरुज असावा.. किंवा याला आणखी काही मजले असावेत असे वाटते.. इथून उजवीकडची वाट कल्याण दरवाजाकडे जाते.. पण यासाठी एक कि.मी. चा दोन डोंगरांना वळसे मारत जाणारा ट्राव्हर्स मारावा लागतो.. त्यात पावसाळी वाट आणि पायवाटांवर साठलेलं शेवाळ.. म्हणजे जीव मुठीत घेवून हा टप्पा पार करावा.. मनोऱ्यापासून निघालो आणि उजवीकडची वाट धरली.. गुडघाभर गवत आणि मळलेली हिरवी पायवाट तुडवत आपण दहा मिनिटात कातळाच्या पोटात बांधलेल्या पाण्याच्या टाक्या पाशी येतो.. इथे एका कोनाड्यात नंदी दिसतो.. म्हणजे या शेजारील चौरस टाक्याला शंभू टाके म्हणायला हरकत नाही.. पुढे निघायचं आणि घसाऱ्याच्या वाटेने दोन डोंगरच्या खालून चालत.. पुन्हा मोकळ्या जागेत यायचं इथे डावीकडे मागे यु-टर्न घेवून चढणीच्या वाटेने नेढ्यापर्यंत जाता येतं तर समोर डावीकडे तिरपे गेल्यास कल्याण दरवाजाची वाट आहे.. तर उजवीकडची वाट खुटट्याचे रौद्र रूप दाखवणारी..

कल्याण दरवाजाकडे निघालो.. पाच मिनिटात कल्याण दरवाजाच्या पायऱ्या दिसल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज कि जय असा जयघोष केला.. अखंड कातळात कोरलेला हा दरवाजा आणि पायऱ्या म्हणजे एक अतिशय सुंदर असे कातळशिल्पच.. हिरव्याकंच पायऱ्या धिम्याने उतरत दरवाजा गाठला.. पायऱ्याच्या बाजूने पाहताना ओबड धोबड वाटणारा हा दरवाजा.. पलीकडल्या बाजूस मात्र देखणा राजबिंडा असा आहे.. अखंड कातळात कोरल्याने हा दरवाजा अतिशय आखीव-रेखीव भासतो आणि चिरे नसल्याने तो चिरंतन झाला आहे एखाद्या अश्वथाम्यासारखा.. अमर..!! दरवाजाची कमान एखाद्या मुक्तहस्त रेखीव चित्रासारखी.. मोजून मापून कोरलेली.. इथे पोहोचताच आणखी एक दरवाजा उजवीकडे काटकोनात कातळ कोरून घडविला असल्याचे दिसते.. आणि समोर साम्रद कडे जाणारी खिंड.. हा दरवाजा आणि त्यासमोरील खिंडीतून आत येणारा प्रकाश.. एखाद्या दिव्यज्योतीसारखा प्रगल्भ आणि मनाला संमोहित करणारा.. 

तर ‘आज इथे या ठिकाणी’ गडाचे मुख्य आकर्षण म्हणजे आहे एकमेवाद्वितीय असा कल्याण दरवाजा पाहून पुन्हा आल्या वाटेने परत निघालो.. मघाशी किरकोळ वाटणारी घसाऱ्याची वाट आता धोकादायक वाटू लागली आणि इथे पावसाळ्यात येणं म्हणजे एक धाडस आहे याची खात्री पटली.. डावीकडे धुक्याने आसमंत व्यापलेला उजवीकडे रतनगडाचा माथ्यावरचा डोंगर.. गच्च गवतातून जाणारी इवलीशी पायवाट.. डावीकडे आ वासून उभी अशी काळदरी.. जरा चुकलात कि गेम ओव्हर अशी..! पण सह्याद्रीच्या वाटा आता भीती घालत नाहीत.. तर त्या सोबत करतात.. दुरून आलेल्या मुशाफिराची.. एखाद्या सख्या सवंगड्यासारखी.. अशाच एखाद्या वाटेवर थकून भागून विसावताना.. आपुलकीनं विचारपूस करतात आणि एखाद्या वाऱ्याचा झोत धाडून देतात.. बोनस म्हणून.. हितगुज करायला.. 

‘आणि आज इथे या ठिकाणी..’ आल्या वाटेने माघारी फिरलो.. आणि पुन्हा दुसऱ्या दरवाजाशी येवून पोहोचलो.. आता वेळ आली होती.. रतनगडाचा निरोप घेण्याची.. एका धुक्यात हरवलेल्या दुर्गरत्नाची..!!

माधव कुलकर्णी – २०१३

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s