“ना सेलिब्रिटी.. ना डीजे..!! ना कसला धिंगाणा.. ना काही आरास..!! ना मोदकाचा थाट.. ना भक्तांची लाट..!!” पाहून सुखावलेला बाप्पा.. “कधी सोनसळी किरणांचा अभिषेक.. तर कधी मुसळधार.. कधी फेर धरणारा वारा.. तर कधी कोसळणाऱ्या धारा.. कधी विजांचा ऐकू येणारा ढोल.. तर कधी पानांवर वाजणारा ताशा..” ऐकून कधीकधी कंटाळत असणार.. त्यामुळेच भटक्या घुमक्क्डांची थकलेली पावले गडावर पडताच मात्र गणराजाला सगे सोयरे भेटावे तसा आनंद होत असावा..
कुठल्याही ट्रेक ची भटकंती गणरायाचे आणि शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही हेही तितकेच खरे.. वाट चुकली किंवा चकवा लागला तर गणपती बाप्पा.. वाट सापडली कि पुन्हा गणपती बाप्पा..!! रॉक प्याच आला कि गणपती बाप्पा.. रॉक प्याच पार पडला’ पुन्हा गणपती बाप्पा..!! कॅमेरा हरवला गणपती बाप्पा..!! कॅमेरा सापडला..कि पुन्हा गणपती बाप्पा..!! ट्रेक ला निघालो गणपती बाप्पा.. ट्रेक वरून सुखरूप पोहोचलो तरी गणपती बाप्पा..!! तर असा हा बाप्पा.. हाडाच्या भटक्यांना सदैव सोबत करीत असतो.. एखादा भटक्या (जीवाच्या भीतीने का होईना.!) नतमस्तक झाला आणि बाप्पा चा धावा करू लागला.. तेंव्हा हातचे राखून न ठेवता बाप्पा संकटाला नक्की धावून जात असणार..!! म्हणूनच घरात गणपती आले आणि गडकोटावर राहणाऱ्या लाडक्या बाप्पाची आठवण आली..
सह्याद्री च्या दरीखोऱ्यात भटकताना.. असेच काही लक्षणीय गणपती मी मुल्हेर.. वसंतगड.. चित्रदुर्ग.. जयगड.. रतनगड.. भूषणगड.. भामेर.. सोनगीर.. लळिंग.. कोलाबा.. कोरीगड आदी किल्ल्यांवर पहिले.. आज गणरायाचे आगमन झाले त्या निमित्ताने ह्या आठवणीतल्या.. आडवाटांवर राहणाऱ्या आपल्या खास अशा गणपती बाप्पाशी तुमची गाठ घालून देत आहे..
|| गणपती बाप्पा मोरया ||
किती सोपं, सुंदर लिहीलं आहेस माधव.. सगळी गणेश रुपं सुरेख… तुझं हे गडांचं वेड अभंग राहो आणि त्यातुन तुला अखंड आनंद मिळो हीच बाप्पा कडे मागणी
LikeLike