दिवस १ला – सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील भटकंती

अकलूज किल्ला आणि शिवसृष्टी, टेंभूर्णी ची गढी, माढा किल्ला, परंडा किल्ला

अकलूज किल्लाअकलूज किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षण. तटबंदी बांधताना वापरलेल्या विशाल विरगळ, किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी आणि किल्ल्याच्या मधोमध असलेल्या टेहळणी बुरुजावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहताना मन भूतकाळात जाऊन पोहचतं. नदीकाठची तटबंदी, घाट, किल्ल्याचे उत्तुंग बुरुज, घाटावरील पिळदार मिशीवाल्या मारुतीरायाचे मंदिर आणि किल्ल्याच्या मधोमध उभा ठाकलेला टेहळणी बुरुज हि अकलूज किल्ल्याची काही वैशिष्ट्ये.

अक्लाई देवी हे अकलूज चे ग्रामदैवत या देवीच्या नावावरून या शहराला अकलूज नाव पडले.. हा किल्ला यादवकालीन आहे असे इतिहासकार सांगतात.. १३ व्या शतकात यादवकालीन राजा सिंघन याने याची निर्मिती केली.. पुढे मुघल आणि मग इंग्रज यांनी या किल्ल्यावर राज्य केले.. औरंगजेबाचा दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखान याच्या कडे हा किल्ला होता.. दौंड जवळील बहाद्दूरगड देखील त्याच्या अखत्यारीत होता.. पुढे रणमस्तखान इथला किल्लेदार झाला.. इथे दस्तूरखुद्द संभाजी महाराज ४ महिने राहिल्याचे काही इतिहास कार सांगतात.. तसेच इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यानंतर दुसरा माधवराव पेशवा याने इथे आश्रय घेतल्याचेहि सांगतात.. अकलूजच्या परिसरात औरंगजेबाने डेरा टाकला होता आणि मुकर्रबखानाने संभाजी महाराजांना जेंव्हा संगमेश्वर येथे विश्वासघाताने पकडले.. तेंव्हा याच परिसरात डेरा टाकून बसलेल्या कपटी औरंग्याच्या सेनेने जल्लोष केला होता याबद्दल महाराष्ट्र ग्याझेटीअर मध्ये नोंद आहे..
सध्या इथे एक भव्य शिवसृष्टी चितारली आहे.. इथली शिवरायांच्या जीवनकाळातील काही महत्वाच्या घटना शिल्पबद्ध केल्या आहेत.. आणि ती पाहताना मन आपोआप शिवकाळात जावून पोचते आणि आपण देखील या नकळत शिवमय होवून जातो.. याशिवाय टेहळणी बुरुजावर असलेला महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा विलक्षण आहे.. इथे उजवीकडे एक किल्ले प्रदर्शन आहे.. इथे बऱ्याच मुख्य किल्ल्यांच्या प्रतीकृती आपल्याला हिंदवी स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांची एक सफर घडवून आणतात.. सहकुटुंब पाहावे असे हे शिवशिल्पालय आहे..  
  
टेंभुर्णीची गढीटेंभूर्णीची गढीच्या अस्तित्वाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे, ऐतिहासिक अवशेषांबद्दलची अनास्था या गढीच्या मुळावर उठल्याचे दिसून आले. सदाशिव माणकेश्वर नावाचा कुणी सरदार होता त्याने हि गढी बांधल्याचे सांगतात. गढी मध्ये माणकेश्वरांचा लाकडाचे कोरीव नक्षीकाम असणारा सातमजली वाडा होता आणि तो मालमत्ता वादातून जाळून टाकल्याचे इतिहासकार सांगतात. किल्ल्यात राम आणि विठ्ठलाचे मंदिर असून सध्या ते मोडकळीस आले आहे. रामभक्त हनुमान मंदिर मात्र तंदुरुस्त असल्याचे जाणवते.. किल्ल्यावर बामनतळे आणि मांगतळे.. गतकाळच्या दुर्दैवी जातीयतेची मूर्त उदाहरणे आहेत. अकलूजटेंभूर्णी रस्त्यावर उजवीकडे गढीचा मुख्य दरवाजा आणि आत डोकावल्यास डावीकडे बामनतळे नजरेस पडते. तसेच पुणेसोलापूर महामार्गाकडे जाताना उजवीकडे काही बुरुज आणि तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात.


माढा किल्ला हा १७०७ साली रंभाजी निंबाळकर या सरदाराने बांधला असे इतिहासकार सांगतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर रंभाजी निंबाळकर आणि चंद्रसेन जाधव (मोघलांना सालो कि पळो करून सोडणारे संताजी जाधव यांचा पुत्र) यांनी मुघलांची चाकरी पत्करली. १७०७ साली झालेल्या पुरंदरच्या लढाईत रंभाजी ने  मुघलांकडून लढताना बाळाजी विश्वनाथ आणि हैबतराव निंबाळकर याचा पराभव केला आणि निजामउलमुल्कने त्याला राव अशी पदवी दिली. पुढे करमाळा इथे रावरंभा निंबाळकर यांनी आपला तळ हलवला आणि त्यांच्या कुलदेवतेचे म्हणजे श्री कमलाभवानी मातेचे भव्य मंदिर बांधले. सतराव्या शतकात याच राव रंभा निंबाळकरांकडे पुणे सुभ्याची जहागिरी होती असं म्हणतात. बीड जिल्ह्यातील खर्डा येथील १७९५ च्या मराठे आणि निजाम यांच्यातील महासंग्रामात या रावरंभा निंबाळकर यांनी छातीचा कोट करून निजामाला वाचवले असे इतिहासकार सांगतात. चार बुरुजांचा भुईकोट म्हणजेच चौबुर्जी, राजे रावरंभा निंबाळकर यांची राजगादी इथे होती असे गावकरी सांगतात. याशिवाय शेसव्वाशे फुट खोल ५६ फुट रुंद अशी एक दगडी बांधीव विहीर आहे इथे पाच फण्यांचा नाग मुक्कामास असतो अशी एक आख्यायिका प्रचलित आहे. तटबंदी च्या आतील देवड्या वाड्यांचे चौथरे आणि मुख्य द्वाराच्या आतून शेजारी उजवीकडे एक भुयार.. डावीकडच्या तटावर एक महादेवाचे मंदिर आहे. किल्ला पाहून बाहेर आलो आणि गावकऱ्यांनी इथले विठ्ठल मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर आणि खंडोबाचे देऊळ पाहून जा असे सांगितले. अफजलखानाने जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याची मोहीम चालू केली तेंव्हा तो इकडे आला ते देवळांची आणि गावांची नासधूस करीत. यातून पंढरपूरचा विठोबा देखिल सुटला नाही, त्यावेळी विठ्ठलाची मूर्ती इकडे आणल्याचे आणि नंतर ती इथेच राहिली त्यामुळे खरा विठ्ठल इकडचाच असा दावाही काही लोक करतात. या माढ्याच्या विठ्ठल मंदिरासमोर एक समाधी आहे यातून एक भुयारी दरवाजा माढ्याच्या किल्ल्यावरील भूयाराला जोडला गेला आहे असाही समज आहे. प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर आणि त्याशेजारची जुनाट विहीर पाहून इथल्या खंडोबाच्या मंदिराकडे निघालो. इथे एक खंडोबाचे देऊळ आहे, मल्हारीमार्तंडाची दोन मुखवटे असलेली पिंड असून शेजारी आणखी एक अशीच एक सुंदर पिंड आहे. त्याशेजारी उजवीकडे जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे.


परांडा किल्लाअकलूज, टेंभूर्णी आणि माढा किल्ल्यांना धावती भेट देवून मराठवाडा भटकंतीतील पहिला किल्ला परांडा इथे पोहोचलो. यष्टी स्थानकापासून गल्ली बोळातून वाट काढीत किल्ल्यासमोरील खंदकाजवळ येवून पोहोचलो, इथून गडाचा मुख्य दरवाजा दिसतो, एका दांडग्या बुरुजाच्या मधोमध कोरलेला हा दरवाजा आणि तितक्याच दांडग्या बुरुजाच्या पाकळ्या असा हा अभिनव दरवाजा आहे. खंदकाच्या अल्याड दोन लहानगे बुरुज एखाद्या भालदारचोपदारासारखे आपले अगत्यशील स्वागत करतात. पूर्वी खंदकातून आत येण्यास लाकडी काढताघालता पूल होता, पण नंतर जनताजनार्द्नाच्या सोयीसाठी राजरोस एक नवा पूल बांधला आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून, तिकीट फाडण्याखेरीज मि. पुरातत्त्व महाराज काहीच करीत नसल्याचे दिसून येते. मोडकळीस आलेल्या लाकडी चौकटीतून आत प्रवेश केला, तर काही वटवाघळांनी इथे वटवाघळे कि दुनिया वसविल्याचे दिसले. एका अर्धगोलाकार बुरुजामध्ये मध्यभागी गडाचा दरवाजा आहे, आत आलं कि लगेच समोर एक रांगत जाता येण्याइतुका चोर दरवाजा आहे आणि उजवीकडे काही देवड्या आणि इथे काटकोनात डावीकडे वळताच आतील कमान नजरेस पडते. आत शिरताच पुन्हा समोर धिप्पाड पाकळी बुरुज, दुबाजूस दणकट तट आणि उजवीकडे एक सज्जाधारी बुरुज नजरेस पडतो, सज्जाच्या दिमतीला दोन्ही बाजूस व्याघ्रशिल्प आणि वर आकर्षक गजशिल्पपट्टिका कोरल्याचे दिसून येते. या बुरुजाला खेटून पुढे उजवीकडे थोडा आत दडवलेला असा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. समोरील बुरुजांच्या कोनाड्यातून काही लहानग्या तोफा बाहेर डोकावताना दिसले आणि मराठवाड्यातील किल्ल्यात काय पाहणार ! या खोचक प्रश्नाचे पहिले उत्तर मिळाले.. तोफा पाहणार !


गडभ्रमंतीच्या दहाव्या मिनिटाला इतक्या तोफांच्या दर्शनाने अगदी भारावून न जाता.. आत आणखी काय दडलेलं आहे हे पाहण्यास निघालो. दुसऱ्या दरवाजातून आत प्रवेश केला आणि समोर पाहिलं तर आणखी पुन्हा दोन सज्जाधारी बुरुज, पण इथल्या बुरुजांची उंची हि बाहेरील बुरुजांपेक्षा पेक्षा काकणभर सरस आहेत. भुईकोटाची हि अभेद्य रचना खरोखर थक्क करणारी आहे. समोरच्या उंचपुऱ्या बुरुजाच्या अलीकडे डावीकडे सहासात कमानी असलेली एक इमारत लक्ष वेधून घेते.. हि घोडेपागा असावी. समोर दिसणाऱ्या दोन उंचपुऱ्या बुरुजांच्या मधून काटकोनात उजवीकडे जाताच गडाचा तिसरा दरवाजा नजरेस पडतो. या दरवाजा समोर एक पाण्याची आयताकृती विहीर आहे. या दरवाजातून आत प्रवेश करताच आपण किल्ल्याच्या मध्यवर्ती भागातील जो कोट आहे (ज्याला आपण बालेकिल्ला म्हणून हवं तर) त्यावर प्रवेश करतो. इथे पुन्हा उजवीकडे जाताच समोर दारुकोठार आहे आणि डावीकडे मशिद. मशिदीकडे पाठ करून पाहताच मुख्य दरवाजाला आतून खेटून असलेल्या लगतच्या उंचपुऱ्या बुरुजावर जाण्यासाठी चक्क शेदीडशे पायऱ्यांचा जिना तयार करण्यात आल्याचे दिसते. येताना इकडे जावे असे म्हणून अंधार पडण्याआधी उजवीकडे फेरफटका मारण्यासाठी निघालो. परांडा किल्ल्यावर पुष्कळ तोफा आहेत असे कुणाकडून तरी ऐकले होते, त्याची झलक दुसऱ्या दरवाजात पाहायला मिळाली होती, पण इथे काही अजस्त्र तोफा देखिल आहेत असे कळले
परांडा किल्ला हा सुमारे इ.स. १००० च्या दरम्यान बहामनी शिलेदारांनी बांधल्याचे इतिहास कार सांगतात. सध्या विजापूरच्या किल्ल्यावर असणारी प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ हि आधी याच किल्ल्यावर होती आणि पुढे आदिलशाहच्या काळात ती विजापूर येथे स्थलांतरित करण्यात आल्याचे सांगितले जाते.. तर तब्बल २६ बलाढ्य बुरुज असणारा हा किल्ला आवर्जून पाहण्यासारखा आहे.. महाकाळ बुरुज, बुलंद बुरुज, चंचल बुरुज शाह महाकाळ बुरुज आणि नासा ईद बुरुज अशी काही बुरुजांची नावे.. याशिवाय किल्ल्यात एक मशीद असून, तळघर असलेली विहीर, तोफखाना, नरसिंह मंदिर आणि रामतीर्थ अशी काही आणखी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.. हजार वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर मिरवणारा हा एक बलाढ्य भूदुर्ग आहे..  
 
असो गडावर अजस्त्र तोफांची भाऊगर्दी आहे हि बातमी कळताच अन्ना माशाळकर यांच्या मेंदूत तोफ हा शब्द फिट्ट बसला आणि अन्ना तोफा शोधू लागला. मशिदीच्या समोर डावीकडे दारुकोठार आहे, तिथे अन्नाला एक तोफ दिसली, यावर दुबाजूस पकडण्यास कड्या म्हणून बेडकाच्या प्रतिमांचा वापर करण्यात आला आहे. या तोफेच्या मागे कोनाड्यातून डोकावल्यास शेकडो तोफगोळ्यांची रास पाहायला मिळते, या वरून गडावर किती तोफा असतील याची कल्पना येते. दारूकोठाराची झाडाझडती घेवून पुढे निघालो तर डावीकडे एक अष्टकोनी बांधीव विहीर दिसू लागली. विहिरीचा घेर तसा बराच मोठा असून समोरून विहिरीच्या परिघात चक्क काही तळमजले बांधून काढल्याचे दिसले. इथे उतरण्यास डावीकडून पायऱ्या आहेत. मावळतीचा  रागरंग पाहून उजवीकडच्या एका कमानीकडे मोर्चा वळविला इथे पांढऱ्या रंगात रंगविलेले एक लहानगे कळस नसलेले मंदिर आहे, आत मात्र काहीच नाही त्यामुळे याला मंदीर का म्हणावे की आणखी काही असा प्रश्न पडतो. पण मंदिरावरील कळसाचा मनोरा त्यावरील फुलांची नक्षी पाहता इथे पूर्वाश्रमीचे मंदीर असावे असे वाटते. असो अष्टकोनी विहीरदर्शन उरकून पुन्हा मशिदीजवळ येवून पोहोचलो. आता निशान बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या चढू लागलो, दारूकोठारातील तांब्याची तोफ पाहून तरतरीत झालेला अन्ना तरातरा पायऱ्या चढून गेला आणि वर पोहोचताच ओरडला अरे खाली पाहिलेल्या तोफेपेक्षा पाच पट तोफ इकडे आहे, तसं तोफेच्या दिशेने सगळे धावू लागले. पायऱ्या संपताच थोडं उजवीकडे जात पुन्हा डावीकडे तिरपा जिना दिसतो हा आपल्याला निशान बुरुजावर घेवून जातो. इथे या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ आहे. वर पोहोचलो आणि तोफेकडे पाहून आश्चर्यचा धक्का बसला या तोफेसमोर खाली दारुकोठारासमोर पाहिलेली तोफ म्हणजे अगदीच लहान वाटू लागली. तोफेच्या मुखाशी फारसी भाषेत काही मजकूर कोरला आहे. याशिवाय तोफेच्या मध्यावर दोन सिंह बसविले आहे. तोफेच्या मागच्या भाग हा एखाद्या गदेसारखा भासतो.. तोफेवर मागील बाजूस फुलाफुलांची नक्षी इथे आहे. सदर तोफ हि पंचधातूची असून चार मोठ्या बांगड्या जोडून तयार केल्याचे दिसते. प्रत्येक जोडणीच्या ठिकाणी नक्षीदार रिंग कोरल्याचे आढळते.. पण तोफेला एके ठिकाणी खड्डा पडल्याचे दिसून आले.. छत्रपती शिवाजी महाराजांचा गुडघा लागून हा खड्डा पडल्याची एक आख्यायिका आहे.. तसेच इथे गुडघा दुखावल्याने महाराजांना गुडघा रोग झाला असेही काही महाभाग सांगतात.. तर अशा महाकाय तोफेला शिरावर घेवून उभा असलेला बुरुज हा तितकाच भक्कम असावा. गडाच्या इतर बुरुजांवर देखिल अशाच पण थोड्या लहान तोफा आहेत यातील एक मगर तोफ आहे.. तोफेचा दर्शन सोहळा डोळे विस्फारून पाहता पाहता सूर्यास्ताची चाहूल लागली आणि मावळतीचे रंग आसमंत व्यापू लागले.. तिकडे अन्ना शेजारील सज्जामध्ये डोकावून आणखी काय दिसते ते पाहून लागला. त्याला समोरील काही बुरुजांवर अशाच मोठ्या तोफा असल्याचे दिसले. अन्नानेआधी पहिले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्याने इतरांना त्या दाखवल्या. इतक्यात अन्नाची आणि तटबंदीतून बाहेर डोकावणाऱ्या एका पिंपळाच्या झाडावर बसलेल्या घुबडाची नजरानजर झाली. तशी घुबड पाहण्यास झुंबड उडाली. पुन्हा पायऱ्या उतरून आतल्या तिसऱ्या द्वाराशी येवून पोहोचलो अन्नाला वाकुल्या दाखवणारे घुबड अजून तिथे टकामका पहात होते. मग अंधारल्या वातवरणात घुबडाची काही छायाचित्रे घेण्याचा केविलवाणा कार्यक्रम उरकून पुन्हा मुख्य दरवाजाच्या बाहेर आलो. एव्हाना अंधारलं होतं त्यामुळे पोटपूजा करण्यास निघालो. इथे जवळच सोनारी येथे कालभैरवनाथाचे जागृत देवस्थान मग तिथे निघालो.

दिवसाचा शेवट गोड झाला होता.. सोनारी गावच्या हॉटेल मध्ये असले अस्सल गावरान जेवण मिळाले कि काय सांगू.. मटकी भाजी, शेव भाजी आणि चपात्या.. पार बेंबीला तडस लागेपर्यंत जेवलो. सकाळपासून अकलूज रस्त्यावरच्या वडापुरी गावच्या शिळ्या पाक्या पुऱ्या आणि मिसळवर भटकंती मित्र मंडळाला फिरफिर फिरावे लागले.. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच खवळले होते. रात्र गडद झाल्याचे पाहून मुक्कामाच्या सोयीसाठी निघालो. सोनारी गावात पाव्हण्यांकडे सोय लावली, इथे बेलसरे आणि बेलसरे सन्स यांच्या लायब्ररी मध्ये मुक्कामाची सोय करण्याचे फायनल झाले. झोपण्याआधी उद्या पहायचे किल्लेया चर्चासत्रात.. बीड जिल्ह्यातील किल्ले पाहण्याचे आणि सोबत कपिलधारा तीर्थक्षेत्र पाहण्याचे नक्की झाले. नळदुर्गची सफर तिसऱ्या दिवशी करण्याचे नक्की केले.

क्रमशः

2 Comments Add yours

  1. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    Like

  2. Rao Rambha Nimbalkarache Mul Nav Rambaji Baji hote Not a Haibatrao,,,,

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s