rest day.. किल्ले देवगिरी, पाणचक्की
मराठवाडा भटकंती मधील आजचा दहावा दिवस.. आज रेस्ट डे घोषित करण्या आला होता.. त्यामुळे थेट दुपारी उठलो आणि जेवणास निघालो. एस. टी. स्थानकाजवळ साई लॉज वर यंदाचा मुक्काम पडला होता.. दुपारी ३ च्या दरम्यान देवगिरी किल्ला पाहण्यास निघालो.. औरंगाबाद–वेरूळ रस्त्यावर देवगिरी/ दौलताबाद किल्ला आहे.. हिंदवी स्वराज्यावर जुलमी यवन राज्यकर्त्यांची वक्रदृष्टी पडण्यापूर्वी वैभवसंपन्न असा देवगिरी किल्ला.. सदर किल्ला ११ व्या शतकात देवगिरी चे यादव शासक भिल्लम पंचम यांच्या काळात बांधला. १२ व्या शतकाच्या अखेरीस इ.स. १२९६ मध्ये अल्लाउद्दिन खिलजीने राजा कृष्णदेव (कृष्णदेवराय) याच्या मुलाचा म्हणजेच रामचंद्रदेवाचा पराभव करून देवगिरी चा ताबा घेतला.. पुढे १३ व्या शतकात इ.स. १३०६ साली मलिक काफुर ने रामचंद्रदेवाचा मुलगा शंकरदेव याचा पराभव केला आणि त्याचा बली घेतला.. तद्नंतर हरपालदेवराय हा या किल्ल्याचा शासक होता.. पुढे त्याने स्वतंत्रता घीषित केली आणि खिलाजींचे मांडलिकत्व झुगारले.. नंतर कुतुबुद्दीन मुबारक शाह खिलजीने या हरपालदेवाचा पराभव केला आणि त्याला कैद करून दिल्लीस नेले.. यानंतर दिल्ली मध्ये महमद बिन तुघलकाने या खिलजींना दिल्लीतून हद्दपार केले आणि १३२८ साली त्याने या देवगिरी ला तुघलकी साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केले..आणि याचे नाव ठेवले दौलताबाद.. ब्रिटिशांनी भारताला ‘सोने कि चिडिया’ तर तुघलकाने इथले वैभव पाहून यस दौलताबाद.. त्याने दिल्लीतून राजधानी इकडे हलवण्याचा विक्षिप्त निर्णय घेतला आणि प्रजेचे हाल हाल केले.. कधी काळी देवगिरी किल्ल्याच्या दरवाजात सोन्याचा हत्ती झुलत होता असं म्हणतात..
पुढे बहामनी राज्यकर्त्यांकडे दिल्ली ची सूत्रे आली आणि बहामनी राज्याची शकले पडताच इ.स. १४९९ दरम्यान हा किल्ला निजामशाही कडे आला.. पुढे दौलताबाद हि नगरी निजामशाही ची राजधानी झाली.. त्यानंतर दक्षिणेकडे मुघलांची पावले वळली आणि त्यांनी निजामशाही चा पाडाव करून दौलताबादेचा ताबा घेतला.. दक्षिण सुभ्याचा मुघली कारभार इथूनच चालत असे.. औरंगजेबानंतर या किल्ल्यावर काही काळ कुतुबशाह ने कारभार सांभाळला आणि सतराव्या शतकाच्या मध्याला इथे मराठ्यांनी भगवा फडकवला..
सुमारे २०० मीटर उंचीच्या शंखाकृती डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला.. मुख्य बालेकिल्ला हा चारही बाजूने सुमारे १००–१२५ मीटर तासला आहे.. आणि इथे खंदकाची रचना केली आहे.. किल्ल्याच्या मागच्या बाजूस तासलेल्या कातळभिंतीवर काही शिल्प अर्धवट कोरल्याचे दिसतात.. वेगवेगळी राजकीय स्थित्यंतरे पहिल्याने या किल्ल्याच्या बांधणीत.. यादवकालीन, मुघलकालीन, आणि पेशवेकालीन दुर्गबांधणीची छाप दिसते.. याशिवाय.. इथे बालेकिल्ल्याच्या भूलभुलैया जवळील चिनी महाल पाहता.. पाश्चात्य बांधकाम शैलीची भुरळ मुघल राज्यकर्त्यांना पडल्याचे दिसते..
बालेकिल्ल्यातून खंदकात उघडणारे तीन मोठे भुयार आजही इथे पाहायला मिळतात.. या शिवाय पायऱ्या असलेल्या मोठ्या विहिरी, अंधेरी म्हणजेच भूलभुलैया, ७० मीटर उंच आणि २१ मीटर परीघ असलेला उत्तुंग चांद मिनार, कचेरी, हत्ती हौद, आम खास, शाही हमाम, रंगमहाल, चिनी महाल, या शिवाय इथे देवीदेवतांच्या मूर्ती तसेच जैन तिर्थंकराच्या प्रतिमा असलेली लेणी देखिल आहेत. बालेकिल्ल्याच्या वाटेवर भूलभुलैया पार केल्यानंतर एक गणपती मंदिर देखिल आहे..
अंधेरी / भूलभुलैया हे देवगिरी किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे.. डोंगराला तासून तयार केलेला हा कातळकोरीव पायऱ्यांचा मार्ग.. या मार्गावर ठिकठिकाणी असलेल्या डबा धरून बसण्याच्या खोबणी.. गरम तेल ओतण्याचे झरोके.. तिरंदाज सैनिकांना मारा करता येतील असे सज्जे, आणि थेट खंदकात उतरणारे चकवे.. त्यामुळे हि अंधेरी म्हणजे पार करणे म्हणजे जीवावर उदार होवून मृत्यूला आलिंगन देण्यासारखे आहे.. म्हणूनच हा किल्ला अजिंक्य असा आहे.. हि अशी रचना भारतातील फार कमी किल्ल्यांवर पाहायला मिळते.. देवगिरीच्या आजवरच्या इतिहासात जेंव्हा जेंव्हा या किल्ल्याचा पाडाव झाला तो फंदफितुरीनेच.. अन्यथा हा अजिंक्य असा किल्ला आहे..
याशिवाय या किल्ल्यावर विविध तोफा पाहायला मिळतात; बालेकिल्ल्याच्या शिखरावरील दुर्गा तोफ, भूलभुलैया समोरील एकांड्या बुरुजावर असलेली मेंढातोफ.. तसेच मुख्य दरवाजा समोरच्या मंडपात असलेली मगरतोफ हे किल्ल्याचे दुसरे आकर्षण..
देवगिरी किल्ल्याचा पसारा फार मोठा आहे.. बालेकिल्ल्यावरून नजर फिरवताना.. मूळ किल्ल्याभोवती बांधलेली त्रिस्तरीय भक्कम तटबंदी हि विलक्षण भासते.. हा असा अफाट पसारा पाहून तुघलकाला या देवगिरीला दौलताबाद म्हणावं असं वाटलं यात काय ते नवल..! तर अशी दौलत लुटूनही देवगिरीचे वैभव आटले नाही हिच खरी या किल्ल्याची महती आहे.. देवगिरीची हि रॉयल भटकंती करून वेरूळ घाटातील एका लॉज वर मुक्काम केला आणि जवळच जेवणाची सोय लावली.. मराठवाडा भटकंतीमधला हा दहावा दिवस देवगिरीच्या भटकंतीने सार्थकी लागला होता..
क्रमशः