भांगशीमाता गड, खुल्ताबाद किल्ला, वेरूळ-घृष्णेश्वर मंदीर, भोसले गढी, लहुगड किल्ला’
भांगशीमातागड – मोहिमेचा शेवटचा दिवस आज निश्चित करण्यात आला.. भांगशीमातागडपाहून पुढे जाण्याचे ठरले.. भांगसाई गड असे हि या गडाचे नाव.. गडाची उंची हि समुद्रसपाटीपासून साधारण २७०० फुट आहे.. गडनिवासिनी भांगसाई देवीच्या अधिष्ठानाने या गडास भांगसाई गड असे म्हणतात.. औरंगाबादपासून १४ मि.मी. अंतरावर.. देवगिरी रस्त्याने जाताच घाटाच्या अलीकडे उजवीकडे एक फाटा आहे.. तिथून भांगशीमातागडाकडे जातं येते.. गडाच्या उजवीकडच्या टोकावर जाण्यासाठी आता सिमेंटच्या पायऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.. पुढे काही कातळकोरीव पायऱ्या दिसतात आणि खरा गड सुरु होतो.. कातळाला मध्यभागी फोडून तयार केलेला जिना पार करत आपण गडावर उजवीकडून प्रवेश करतो.. किल्ला म्हणून गडावर फारसे अवशेष नसले तरी.. गडमाथ्यावर पाण्याचे जोड टाके आहे.. यातील एका टाक्यात.. मध्यभागी आणखी एक लहान टाके खोदलेले दिसते.. तसेच चार टाक्यांचे एक लहानगं संकुल आपल्याला पाहायला मिळते.. साधारण फुटबॉलच्या मैदानासारखा या गडाचा आकार आयताकृती असा आहे.. गडावर कडेच्या बाजूने काही गुहा खोदलेल्या दिसतात त्यात पाण्याचे स्त्रोत आहेत.. कातळ तासून कोरलेले खांब हे या गुहेरी टाक्यांचे मुख्य आकर्षण.. याशिवाय या गडावरून औरंगाबाद टेकड्या.. पश्चिमेला देवगिरीचा मुलुख याचे एक सुंदर दर्शन घडते.. समोर दिसणाऱ्या डोंगररांगापासून हा गड जरा सुटावलेला दिसतो.. त्यामुळे तो ओळखण्यास सोपा.. औरंगाबाद वरून पुण्याकडे जाताना MIDC जवळ राज्य महामार्गावरून या गडाचे एक वेगळेच दर्शन घडते..
खुल्ताबाद किल्ला / औरंगजेबाची कबर: भांगशी मातागडाची एक छोटेखानी भेट घेवून खुल्ताबादकडे निघालो.. खुल्ताबाद हे औरंगजेबाने वसविलेले एक उपशहर.. गुरुवर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या या सनातनी व्यक्ती या गावाभोवती कोट चढविला आहे.. याचे भक्कम दरवाजे याची साक्ष देतात.. औरंगजेबाचे थडगे देखिल याच खुल्ताबाद शहरात आहे.. दख्खन दिग्विजयाचे दिवास्वप्न घेवून हिंदवी स्वराज्य काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा इथेच धुळीस मिळाली.. औरंगाबाद मधील हातरून येथील श्री संत नाथ माऊली म्हणजेच महादेवनाथ पारस्कर यांच्या चरित्र ग्रंथामध्ये अकराव्या अध्यायात याचा उल्लेख आहे.. तो असा, “परत आलो औरंगाबाद | वसति खरी हि आबाद | पाहिले खुल्ताबाद | किल्ला देई पूर्वजांची याद ||१२१||”
वेरूळपासून ३ किमी आणि औरंगाबाद पासून २७ किमी अंतरावर हे शहर वसले आहे.. इतिहासाचा मागोवा घेताना औरंगजेबाचे थडगे नं पाहता कसे चालेल.. स्वराज्याचे थडगे बांधायला निघालेल्या या क्रूरकर्म्याचे थडगे पाहण्यास निघालो.. १४ व्या शतकात बहामनी राजवटीची पाळेमुळे जुन्या काळच्या देवगिरी मुलुखात रुजताच.. इथे सुफी संतांनी त्यांची अध्यात्मिक नगरी वसवली.. ती म्हणजेच आजचे खुल्ताबाद.. औरंगजेबाचा अध्यात्मिक गुरु जैनुद्दीन शिराजी (सुफी संत मोइनुद्दिन किश्ती यांचे शिष्य) याचे या भागात वास्तव्य होते.. धर्मांध अशा मुघल सम्राटाला एक अध्यात्मिक मन होते हे खरे.. पण ते त्याने केलेल्या पापाच्या भीतीपोटी असावे असे वाटते.. दारा शुकोव चे भूत त्याच्या मानगुटीवर बसत असे.. सख्ख्या भावाला क्रूरतेने मारणाऱ्या औरंगजेबाने या खुल्ताबादेत चिरनिद्रा घेतली आहे.. औरंगजेब कदाचित सर्वात लोकप्रिय सम्राट नसेल पण तो ‘आखरी मुघल’ होता.. पण हा औरंगजेब इतर विलासी मुघल राजांपेक्षा वेगळा होता.. तो धर्मांध होता हेही तितकेच खरे.. स्वखार्चासाठी तो सरकारी खजिन्यातून छदामही घेत नसे.. तो टोप्या विणून आणि कुरणाच्या हस्तलिखित प्रती विकून स्वखर्च करीत असे.. हि गोष्ट मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांना शिकण्यासारखी आहे.. म्हणतात नं शत्रूचे चांगले गुण घ्यावे तसा औरंगजेबाचा हा गुण सरकारी लालबत्ती वाल्यांनी घ्यायला हवा..
इतिहासाची हि मराठवाडा सफर आता खुल्ताबादेकडे निघाली.. नगारखाना दरवाजातून आपण गाड्प्रवेश करतो.. चिरेबांधणीतून साकारलेला एक भक्कम दरवाजा इथे पाहायला मिळतो.. औरंगजेबाच्या मुलाने म्हणजेच मौझमशाह याने याची बांधणी इ.स. १६९८–१७१० या काळात केल्याचे मिस्टर पुरातत्व खाते सांगतात.. काही आनंदाच्या घटने प्रसंगी या दरवाजाच्या कमानीवर नौबत वाजविली जायची.. या दरवाजातून आत येताच आणखी एक जुनाट दरवाजा आहे.. चुन्याच्या निवळीने रंगवलेला पंधरा दरवाजा आणि वर काही हिरवे झेंडे.. मराठवाडा भटकंतीचा शेवटचा दिवस भगव्या वस्त्र धरणा करून हि अध्यात्मिक किल्ले भ्रमंती पूर्ण करायचे ठरवले होते.. हिरव्या झेंड्यावर उतारा म्हणून भगवा हवाच.. शरीरावरच्या भगव्या कुर्त्याचा झेंडा करून पांढऱ्या कमानीतून प्रवेश केला.. सरळ पुढे जाताच दुकानांची गर्दी सुरु होते आणि औरंगजेबाची कबर जवळ आल्याची कुणकुण लागते.. इथे लाजवन्ती गाडीला उभे करून उजवीकडे निघालो.. एक नक्षीदार कमान असलेला दरवाजा.. त्यावर हिरव्या पिवळ्या रंगाची छटा असे या दरवाजाचे वर्णन करता येईल.. यात भर म्हणून हा अंगभर भगवा.. आता हिरव्या सम्राटाला पाहायला हा भगवा पांथस्थ कुठून आला म्हणून लोक उत्सुकतेने बघू लागले.. म्हटलं आपल्याला आत प्रवेश मिळतो कि नाही.. पण तसे काही झाले नाही.. विनासायास प्रवेश मिळाला आणि आत आलो.. आत उजवीकडे एक मोठे झाड आहे.. त्याखाली.. एक तलाव व कारंजे.. चौबाजूंनी पाय धुण्यासाठी आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे.. इथे डावीकडे अलीकडे औरंगजेबाची कबर आहे.. तिकडे निघालो.. इतिहासाची पाने डोळ्यांसमोरून धडाधड समोर नाचू लागली.. आणि या क्रूरकर्म्याबद्दलचा संताप धमण्यामधून उसळू लागला.. निघालो.. संगमरवरी भिंतींनी या कबरीभोवती एक संरक्षक भिंत उभी केली आहे.. त्याच्या मुलाने हि बांधल्याची सांगतात.. मूळ कबर मात्र अगदी साधी सोपी सरळ आहे.. इथे एक चचा इथली माहिती देत होते.. त्यांचे नाव आमीरभाई.. ये कबर औरंगजेब साहब कि है.. इनकी वसियत के हिसाब से.. छत नही लगानेका मेरेको.. इसे ऐसा बनाया है.. सय्यद जैन्नुद्दिन बावीस खाजा.. जो मेन में खाजा मोइन्नुद्दिन किश्ती है.. उन्हीकी खानदान से है.. वो इराण के रहनेवाले है.. उन्होने जो टोपी और कुराण बेचके जो पैसे कमाए थे.. उससे हि ये कबर बनी है..
औरंगजेबाचे थडगे पाहून त्याच्या गुरूकडे निघालो.. स्वतःचे साधे थडगे बांधणाऱ्या या आलमगीराने आपल्या गुरुची कबर मात्र एका जंक्शन संगमरवरी घुमटीने सजवली आहे.. इथे या गुरूच्या समाधी मागे.. महम्मद पैगंबर हे जेंव्हा अल्लाह ला भेटायला गेले त्यावेळी त्यांना एक पोशाख भेट दिला होता तो पोशाख एका खुफिया खोलीत बंद आहे.. हा पोशाख इतिहासाचा आणि पवित्रतेचा एक मौल्यवान ठेवा आहे.. सबंध जगात हा महम्मद पैगंबरांचा पोशाख एकमेव असा आहे.. ‘पीर और मुरीद’ म्हणजेच गुरु शिष्य परंपरेतून तो मोइनुद्दिन किश्ती आणि शेवटी तो पोशाख इथे आला.. दरवर्षी ८ लाख मुस्लीम भाविक इथे दर्शनासाठी येतात.. इस्लाम मध्ये मूर्ती पूजा निषिद्ध असली तरी अनुयायांनी या पवित्र पोषाखाच्या पूजेने त्यांच्या गुरुचे श्रद्धास्थान हा पोशाख जीवापाड जपला आहे.. हा पोशाख इथवर कसं आला याचा एक १४०० वर्ष जुना इतिहास इथे शब्दांकित केला आहे.. मदिना–ते–दिल्ली–ते–खुल्ताबाद असा हा प्रवास इस्लामच्या अनुयायांनी इथे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला आहे.. पण हे सगळं फारसी भाषेत असल्याने.. काही कळायला वाव नाही.. राष्ट्रभाषेत याचा अनुवाद केल्यास.. इतरांनाही याचा बोध होईल.. असो.. या पोशाखावर रचलेला एक शेर आमीरचचांनी आम्हाला ऐकवला तो असा,
यहां पे लिखा है.. ऐ अल्लाह तेरे नाम से शुरूवात करता हू.. “बिस्मिल्लाह रहमान ए रहीम”,..“यहां खास मुस्तफा का मुबारक है पैराखान.. महबूबेटी ब्रिया का मुबारक है पैराखान.. खाबिले दरुद अदब के है मुखाम.. नबियोंके पेशवाका मुबारक है पैगाम..” ह्याचा संक्षिप्त अर्थ म्हणजे साक्षात महम्मद पैगंबराचा दैवी वारसा असलेला हा पोशाख एकमेवाद्व्तीय असा आहे..!!
तिथून पुढे निघालो या इमारतीसमोर आणखी काही कबरी आहेत त्यातली एक औरंगजेबच्या मुलाची आझाम्खन आणि सुनेची आहे.. शेजारी गुरुबंधूची कबर आहे.. औरंगजेब कबर संकुलाचा एक फेरफटका मारताना इथली शांतता मात्र सुखावणारी होती.. हिरव्या इतिहासाची केलेली हि भगव्या वस्त्रानिशी केलेली सफर संस्मरणीय राहील..
मालोजी राजे गढी आणि घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ – खुल्ताबाद मधून पुन्हा नगारखाना दरवाजा गाठला आणि भोसले गढी कडे निघालो.. वेरूळ लेण्यांच्या पुढे महामार्गावर मालोजी राजे यांची गढी आहे.. सध्या दैदिप्यमान इतिहासाची साक्षीदार गढी जरी भुइसपाट झाली असली तरी इथे राज्य सरकारने उशिरा का होईना शहाजी महाराजांचे स्मारक बांधले आहे.. ते पाहण्यास निघालो.. आधी दर्शन घृष्णेश्वराचे मग गढीचे असे ठरवून घृष्णेश्वर मंदिर गाठले.. इथे पहिले तर किरकोळ विक्रेत्यांची इथे भाऊगर्दी होती.. गर्दीतून वाट काढीत मंदिरापाशी पोचलो.. तोच भिकाऱ्यांचा घोळका अंगावर आला.. त्यांना चकवून मंदिरात प्रवेश केला तर.. इथे पोलिसांचा ससेमिरा.. कॅमेरा आहे काय.. मोबाईल आहे काय.. परमिशन न्हाय असा हेटाईयुक्त उग्र संवाद ऐकून.. तळपायाची आग मस्तकाला गेली.. पण सांगतो कुणाला.. सैनिकांचे डायलॉग मनातल्या मनात.. घृष्णेश्वर हे पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे मंदिर.. मालीजीराजे आणि विठोजीराजे यांनी याचा जिर्णोद्धार केला आणि ते पुन्हा मुघलांनी उध्वस्त केले.. पुढे अहिल्यादेवी होळकरांनी यांचा पुन्हा जिर्णोद्धार केला.. आजचे जे मंदिर दिसते हे त्यांनी बांधले आहे..
यासंबंधी एक कथा आहेती अशी.. फार वर्षापूर्वी देवगिरी नजिक एक सुकर्मा नावाचा ब्राम्हण आणि त्याची पत्नी सुदेहा राहायची.. ते निस्सीम शिवभक्त होते.. पण ते निपुत्रिक असल्याने चिंतीत होते.. शेवटी सुदेहाने वंशवेल वाढविण्यासाठी सुकर्माला तिची बहिण घुष्मा हिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले.. घुष्मा हि शिवभक्त होती.. ती प्रत्येक दिवशी एक शिवलिंग तयार करून त्याची पूजा करीत असे वं सायंकाळी ते विसर्जित करीत असे.. त्यांनी पुढे एका बाळाला जन्म दिला.. ते मोठे झाले आणि तरुण वयात त्याने प्रवेश केला.. इकडे.. सुदेहाच्या मनात हळूहळू त्यांचा मत्सर निर्माण झाला.. आणि शेवटी तिने झोपेत त्याची हत्या करून त्याचे पार्थिव जवळच्या तळ्यात फेकून दिले.. याच तळ्यात घुष्मा शिवलिंगाचे रोज विसर्जन करीत असे.. सकाळी जेंव्हा हे सगळे घुष्म आणि तिच्या सुनेला समजले ते आक्रोश करीत तळ्याकाठी आले.. घुश्माने मनोभावे शिवशंकरास साकडे घातले आणि सती घुष्मा हिचा मुलगा त्या तळ्याच्या डोहातून जिवंत बाहेर आला.. पाठोपाठ शंकर भगवान प्रकट झाले.. सुदेहाचे कृत्य त्यांना सहन न झाल्याने त्यांनी तिचे शीर त्रिशुळाने उडविले.. घुष्माने बहिणीचा अपराध पोटात घालण्याचे विनवून तिला पुन्हा सजीव करण्यास भाग पाडले.. शिवभक्तीने प्रसन्न होवून शंकराने घुष्मा हिस विचारले.. बोल कन्ये काय पाहिजे.. तेंव्हा लोककल्याणासाठी तुम्ही इथेच कायमचा निवास करा अशी मनोभावे प्रार्थना तिने केली.. ती जागा म्हणजे हे घृष्मेश्वर.. त्याचे पुढे घृष्णेश्वर असे नाव पडले.. असो.. सध्यस्थितील हे मंदिर म्हणजे कोरीव कामाचा एक अजोड नमुना आहे.. मंदिराच्या मंडपात.. दशावतारातील शिल्प कोरली आहे.. खांबावरील गणेश शिल्प तर अप्रतिम असे आहे.. पण फोटोग्राफी निषिद्ध असल्याने केवळ दोन डोळ्यांच्या कॅमेरात हे सगळं साठवून.. घृष्णेश्वराचा निरोप घ्यायचा.. भटकंती सफल झाल्याबद्दल.. देवाचे आभार मानून पुढे निघालो.. घृष्णेश्वराच्या मंदिराच्या अलीकडे एक कोरीव कातळचिऱ्याच्या समाधीकडे लक्ष गेले.. हि मालोजी राजे यांची समाधी आहे.. दर्शन घ्यावे म्हणून पहिले तर इथे मोठे कुलूप.. थोड्याशा नाराजीने पुढे निघालो..
मालोजीराजे भोसले गढी: घृष्णेश्वर मंदिराच्या थोडं पुढे गेल्यास लगेच डाव्या हाताला एक स्मारक आहे.. हे शहाजी महाराजांचे स्मारक सरकारने नुकतेच बांधले आहे.. याच्या मागे पडकी वास्तू म्हणजे मालोजीराजे यांची गढी.. सध्या इथे काही नसले तरी.. स्वराज्य ज्यांनी कष्ट घेतले अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचे घर आवर्जून पाहायलाच हवं.. थोरल्या महाराजांचे आशीर्वाद घेवून पुन्हा वेरूळ घाटाने परत आलो.. इथे खुल्ताबाद च्या अलीकडे एक तिठा आहे..या रस्त्याने डावीकडे अजिंठा कडे जायचं रस्ता आहे.. या रस्त्यावर फुलंब्री गावाच्या जवळ.. लहूगड नावाचा एक किल्ला आहे तिकडे निघालो.. मराठवाडा भटकंतीतील हा शेवटचा किल्ला असे जाहीर करण्यात आले.. भुकेने अन्नाचे हाल होवून नये म्हणून तिठ्यावर एक जोरदार लंचब्रेक डिक्लेअर करण्यात आला.. ‘आधी पोटोबा मग भद्रोबा’..
भद्रा मारोती – डावीकडे निघालो आणि थोडं पुढे गेल्यावर लगेच उजवीकडे ‘भद्रा मारोती प्रसन्न’ अशी पाटी वाचली.. आता औरंगजेबाचे थडगे पाहायला वेळ आहे पण मला पाहायला नाही असे म्हणून मारोती नाराज होणार.. असे वाटल्याने.. तडक मुकाट्याने लाजवंती तिकडे निघाली.. या भद्रा मारोतीची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे ती थोडक्यात सांगतो..
फार वर्षापूर्वी.. इथे भद्रावती नावाची नगरी होते.. भद्रसेन ह्या नगरीचा राजा होता.. तो रामभक्त होता.. तो नित्यनेमाने इथल्या भद्रकुंडाच्या जवळ रामाची आराधना करीत असे, भजन कीर्तन करीत असे.. एक दिवस हनुमान इथून चालले असता त्यांनी राम भजनाचे स्वर ऐकून ते इकडे आले तर इकडे भजनात गुंग झालेल्या भद्रसेनाचे स्वार ऐकून त्यांची भार्मानदी टाळी लागली.. शयनमुद्रेत लीन होवून ते भजन ऐकू लागले.. भजन संपताच हनुमानजी जागे झाले.. म्हणाले बोल राजा तुला काय वर पाहिजे.. भद्रसेन म्हणाला.. तुम्ही इथेच तुमचे स्थान राहू द्या.. हनुमानजी तथास्तु म्हणाले.. आणि अंतर्धान पावले.. त्यावेळेस त्यांची मुद्रा असलेली हि शिळा तयार झाली असे म्हणतात.. शयनमुद्रेतील हि मारोतीची मूर्ती पाहण्यासारखी आहे.. त्यामुळे महाबली बलभीम भक्तांनी इथे आवर्जून भेट द्यायलाच हवी.. इथला मारुती नवसाला पावतो अशी पंचक्रोशी मध्ये ख्याती आहे.. भद्र्कुंडाचा मात्र गलिच्छ तलाव झाला आहे.. तेंव्हा भक्तांनी यात वेफर्स.. प्लास्टिक टाकू नये अशी नम्र विनंती.. नाहीतर निद्रिस्त मारोती जागा झाला तर तुमची काही खैर नाही.. मग आहेच ‘एकंच फाईट अन वातावरण टाईट’.. असो मारोतीचे शुभाशिर्वाद घेवून लहुगड कडे निघालो..
सीतामाईच्या वास्तव्याने पावन झालेला.. लहुगड: ह्या किल्ल्याबद्दल बरेच वाचले होते.. ह्या ठिकाणी रामायणातील काही संदर्भ दिले जातात.. सीतेची गुंफा..हे ठिकाण आपल्याला थेट राम राज्यात आल्याचा दाखला देतात.. दंडकारण्य मधील बराचसा भाग हा अजिंठा रांगेत आहे.. छत्तीसगड पासून सुरु होणारे हे अरण्य त्याची व्याप्ती पार आंध्र प्रदेश पर्यंत आहे.. महाराष्ट्रातील काही भाग दंडकारण्यात येतो.. सातपुडा डोंगररांग तसेच अजिंठा रांगेचा याचे संदर्भ बऱ्याच अख्यायीकांमध्ये येतात..
तर हा लहुगड पहायचा म्हणजे औरंगाबाद वरून अजिंठा रस्ता धरायचा आणि फुलंब्री गाव गाठायचं.. या गावाच्या पुढे पाल गावचा फाटा आहे इथून उजवीकडे निघायचं आणि जातेगाव – नांद्रा असा ७-८ कि.मी. चा रस्ता कापून आपण नांद्रा गावात दाखल होतो.. हे लहुगडाच्या जवळचे गाव.. गावातून समोर दिसणारी डोंगररांग लक्ष वेधून घेते.. इथे उजवीकडे नजर टाकताच एक खिंड दिसते.. या खिंडीला खेटून असलेला उजवीकडचा डोंगर म्हणजे लहुगड.. सध्या थेट पायथ्यापर्यंत गाडी रस्ता आहे.. तर लाजवंती लाजत लाजत लहुगादापाशी येवून पोचली.. fफोर्मुयला-१ चालक मालक संघटनेचे अध्यक्ष दिनुभाऊनी थेट पायथ्यापर्यंत गाडी आणून पायपीट कमी केली होती.. आता समोर एक मोठा खड्डा आणि मग सिमेंट रस्ता.. पण खड्डा आणि त्यासमोरील स्टेप पाहून लाजवंती गाडीला दुखापत होऊ नये म्हणून उरलेले अंतर चालत जाऊ असे म्हणून दिनुभाऊ गाडीतून उतरले.. आणि मग पायी चढण पार करून लहू गडाच्या पायथ्याशी पोचलो.. इथे एक ट्रेडमार्क वडाचे झाड आहे शे-दीडशे वर्षापासून तग धरून बसलेले.. हे झाड म्हणजे गडाची मुख्य ओळख.. तिथून डोंगर डोक्यावर उजवीकडे धरत चालत गेल्यास कातळकोरीव पायरया सुरु होतात आणि सुमारे ५०-६० पायऱ्या चालून जाताच आपण एक गुहेतील शिवमंदिरासमोर येवून पोचतो.. हे रामेश्वर मंदिर.. मंदिरासमोर एक लक्षवेधी नियमावली सांगणारा फलक लावला आहे.. हि नियमावली एका अवली बाबाने लिहिली आहे..
रामेश्वर संस्थान पवित्र तिर्थ आहे या ठिकाणी आल्यावर ध्यान भजन पुजन अथवा वाचन करावे.. रिकाम्या गप्पा निदा बददी करून नये.. हा नियम न पाळल्यास ५०० रु दंड भरावा लागेल.. आदेशावरून
ह्या मंदिरासमोर कातळकोरीव एक औरस चौरस तुळशी वृन्दावनासारखे एक गणेश मंदिर आहे.. बाबाजींचा आदेश शिरसावंद्य मानून गडभ्रमंती सुरु केली.. श्री रामेश्वर दर्शन घेवून यासुंदर कातळकोरीव मंदिराची पाहणी केली.. इथे गणेश मंदिरासमोरून पाहताना मंदिराचे कोरीव खांब लक्षणीय वाटतात.. डावीकडे कातळात दडवलेले एक पाण्याचे टाके आहे.. तिर्थ म्हणून ते पाणी पिण्यास गेलो तर.. ते वटवाघळाचे तिर्थ निघाले.. एक विलक्षण शिसारी आणणारी अस्मानी चव या पाण्याला होती.. ह्या टाक्याचे पाणी पिण्यायोग्य नाही.. हे नंतर २ तास जाणवत राहिले.. डोंगरच्या उतारावर तासून तयार केलेले हे मंदिर हे गडाचे मुख्य आकर्षण.. या मंदिराला खेटून डावीकडे.. गडमाथ्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.. ह्या कातळकोरीव पायऱ्या मात्र फार जुन्या असल्याचे जाणवते.. इथून सुमारे ४०-५० पायऱ्या चढून जाताच आपण गडाच्या एकमेव डोंगर तासून तयार केलेल्या दरवाजाशी येवून पोचतो.. गडाचा हा दरवाजा मात्र एकदम दणकट.. कातळाच्या बोगद्यातून जाणारा.. दरवाजातून आत येताच डोक्यावर एक झरोका दिसतो.. शत्रूच्या डोक्यावर धोंडा मारण्याची हि जागा.. मग पुढे काटकोनात उजवीकडे वळणाऱ्या पायऱ्या चढून जाताच आपण गडमाथ्यावर पोचतो.. समोर मध्यभागी झुडुपे दिसतात आपण त्यात न शिरता उजवीकडे वळायचे.. आणि गडावर ठिकठिकाणी खोदलेल्या गुहा आणि टाकी पाहून घ्यायचे.. गडावर तब्बल १७-१८ पाण्याची टाकी आहेत,, आणि ७-८ गुहा.. यातील गुहा नंबर ५ हि राहण्या योग्य आहे पण पाण्याची सोय नसल्याने रामेश्वर तीर्थासमोरील जागेत राहता येते.. पण बाबाजीचा आशीर्वाद मिळाला तरच बर का..!! पाच नंबरची गुहा पाहण्यासाठी थोडं खाली उतरून जावं लागतं.. पाच पायऱ्यांचे एक टाके आणि आणि शेजारी गुहा आहे.. इथून पुढे गेल्यावर उजवीकडे खाली जाण्यासाठी पायवाट आहे.. इथे गडावर मागच्या बाजूने येण्याची पायवाट आहे.. या वाटेवरच हि गुहा आहे.. हि गुहा मात्र प्रशस्त ऐसपैस अशी आहे.. ३ खोल्यांची जंक्शन गुहा.. गडमाथ्याला उजवीकडून प्रदक्षिणा मारून पुन्हा मुख्य दरवाजाशी आलो.. इथून थोडं पुढे आणखी एक वाट खाली उतरते.. इथल्या पायऱ्या मात्र नवीन आहेत.. या पायऱ्यांनी थेट खाली गेल्यास समोर एक हनुमान मंदिर आहे.. लहुगडाची मेगा भ्रमंती करून हनुमान मंदिरापाशी आलो.. श्री रामेश्वर आणि मारोतीचे दर्शन घेवून मराठवाडा भटकंतीची सांगता केली..
साधारण ११ दिवसांच्या ह्या भव्य भटकंतीची क्षणचित्रे डोळ्यासमोरून हलत नव्हती.. सुमारे ३०-३५ नवीन दुर्गाना भेट देण्याचा योग जुळून आला तो दिनुभाऊ रावळ, अन्ना माशाळकर आणि कोकरू रितेश मुळे.. उदगीरचा म्याटर.. अन्नाची कंबरदुखी.. रात्री ३ वाजता मंदिरातून हकालणारा तुसडा म्हातारा, वेताळवाडीचा भक्कम किल्ला.. जंजाळाचे प्रेमळ अगत्यशील चिचा, भोसले गढीची सफर, नळदुर्गची दांडगी सफर, नळ-दमयंती धबधबा, कपिलधारा, बीडचा नगरदुर्ग, केदारेश्वर, हिंगोलीचा तो डाम्बर नसलेला रस्ता.. मन-आणि म्हैस यांच्या कात्रीत सापडलेला बालापुरचा किल्ला.. मिर्झा राजे जयसिंग छत्री.. नरनाळाची दिव्य सफर, आणि राष्ट्रीय पक्षी मोराला पाळणारे महाभाग, नांदेडचा गुरुद्वारा आणि भुईकोट, परंडाचा भव्य भूदुर्ग.. औसा किल्ल्यातील एकाहून एक सरस आशा तोफा.. कंधार नगरीचे दुर्गवैभव आणि मराठवाड्यातील ह्या भटकंतीला साथ देणारया अनेक वाटा.. अशा एक न अनेक रॉयल आठवणीनी हि सफ़र कायम संसमरणीय ठरेल यात काही शंका नाही.. सह्याद्रीपासून थोड्या दुरवर हे वसलेले हे दुर्गवैभव पाहून कैक किल्ल्यांशी थोडे हितगुज करून पुन्हा पुण्यनगरीस परतलो.. तर असं मनसोक्त भटकायचं एकदा मनात आलं की निघायचं वाट फुटेल तिकडे.. काय सांगावं असा योग पुन्हा कधी जुळून यायचा.. त्यामुळे उगाच मनातील इच्छा मनात कोंडून ठेवण्याचे तसे काही कारण नाही.. कारण आयुष्यात एक गोष्ट मात्र नक्की आहे.. “याकूब कभी होल्ड नाही करता..”
समाप्त
|| जय शिवराय.. जय हिंद.. जय महाराष्ट्र ||
माधव कुलकर्णी – २०१३