सोनारीचे भैरवनाथ मंदीर, खर्डा/शिवपट्टण किल्ला, बीडचा नगरदुर्ग, कंकाळेश्वर मंदीर,कपिलधारा तीर्थक्षेत्र
सोनारीचा कालभैरवनाथ – सकाळी जाग आली. डोळे चोळत बाहेर ओसरीवर येवून पहिले तर यत्र–तत्र–सर्वत्र.. जळी–स्थळी–काष्ठी–पाषाणी माकडेच माकड. घर म्हणू नका, खिडक्या म्हणू नका, मंदिर म्हणून नका.. जिकडे बघावी तिकडे माकडेच माकडे. नुसता उच्छाद मांडला होता मर्कटांनी. सोनारीचा कालभैरव हा पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कालभैरव मंदिराभोवती कोट चढविला असून आत एक पाण्याचे चौरस कुंड असून खाली उतरण्यासाठी चौबाजूंनी पायऱ्या आहेत. भैरवनाथाचा रथ देखिल बघण्यासारखा आहे.. अगदी रंगबिरंगी पंचरंगी रथ.. सध्या रथ जिथे ठेवतात तिथे उजवीकडे एक दीपमाळ आहे, या दीपमाळेवर व्याघ्र प्रतिमा कोरल्याचे दिसते. दीपमाळ पहात असताना, कार्यकर्ते पूजा साहित्य आणि प्रसाद विकत घेण्यास थांबले, त्यात पेढे घेत असताना अचानक एका माकडाने सिंघमच्या गुडघ्याचा आधार घेत पेढ्यांच्या पातेल्यावर झेप घेतली आणि चार–दोन पेढे ओरबाडून ते उनाड माकड पसार झाले. त्यामुळे सोनारीची माकडे किती बेरकी आहेत याची ‘याची डोळा’ प्रचीती मिळाली. मूळ मंदीर दगडी बांधणीचे असून मंदिराच्या कळसावर बऱ्यापैकी कोरीव काम केल्याचे दिसते. भैरवनाथाचे दर्शन घेवून परत मुख्य दरवाजाजवळ येवून थांबलो.. इथे मंदिराकडे पाठ करून डांबरी रस्त्याने पुढे जाताच एका हनुमान मंदिरासमोर गढी सदृश अवशेष नजरेस पडतात. दोन बुरुज, दहा–पंधरा फुटी तटबंदी इथे कुण्या एका सरदाराची गढी असल्याची साक्ष देतात. असे बरेच बुरुज किरकोळ उंचीच्या टेकडावर वसलेल्या जुन्या सोनारी गावात आहेत असे स्थानिक सांगतात.
सोनारीगावातून निघालो आणि काल रात्री हॉटेल मध्ये जेवताना चार्जिंग ला लावलेला रिचार्जेबल ब्याटरीचा सेट हॉटेलात विसरल्याचे लक्षात आले. मग पुन्हा आठ–दहा किमी मागे जाऊन हॉटेलात पोहोचलो. इथे विचारलं तर.. स्फोट होईल या भीतीने हॉटेलमालकांनी सेल एका कर्मचाऱ्याच्या घरी ठेवण्यास सांगितले. मग हॉटेल कर्मचारी शिंदे भाऊंना घेवून सेल दुचाकीवर घ्यायला निघालो. जाता जाता त्यांनी इथल्या भागाचा इतिहास सांगितलं तो असा:
फार फार वर्षापूर्वी हिकडं कंडासूर, सुवर्णासूर, भौमासुर आणि प्रचंडासूर नावाच्या ४ राक्षसांनी अगदी उच्छाद मांडला होता. तेंव्हा शंकर भगवानांनी कालभैरवाच्या रुपात येवून इकडे चारही राक्षसांचा संहार केला. सगळ्यात आधी कंडासूराचा वध केला मग सुवर्णासूर, भौमासुर आणि प्रचंडासूर या राक्षसांचा नि:पात केला. म्हणून इथल्या गावांना कंडारी, सोनारी, भूम आणि परांडा अशी नावे पडली. परांडाचे मूळ नाव प्रचंडा होते पुढे ते परांडा झाले. कंडारीच्या भैरवनाथाचा मान सोनारीपेक्षा मोठा आहे असेही त्याने सांगितले. राक्षसवधाच्या घटनेनंतर कालभैरवाने सोनारी इथे काहीकाळ अधिवास केला. तेंव्हा भक्तगणांनी देवाला.. देवा तुम्ही इथे आलात याचा काही पुरावा द्या असे सांगितले आणि कालभैरवाने मग बालरुपात भक्तांना दर्शन दिले आणि इथे एका दगडावर नृत्य करून दाखवलं अशीही एक आख्यायिका शिंदे भाऊंनी सांगितली. सोनारी आणि परिसर यांचा इतिहास बाईक वर जाता-येता ऐकून पुन्हा हॉटेलात येवून पोहोचलो.
शिवपट्टण किल्ला – खर्डा – सुलतानगड :
वाटाड्या मार्ग क्र. ६ – परांडा – जामखेड रोड – सोनारी – जामखेड रोड – अनाळा – आंबी – पार्डी–उस्मानाबाद राज्य महामार्ग – डावीकडे – खर्डा (५२.४ कि.मी. – रस्ता खराब असल्याने लागणारा वेळ २ ते अडीच तास)
गावात चौकशी केली खर्ड्याला कसं जायचं तर जामखेड रस्त्याने जा रस्ता चांगला आहे असे कळले. जामखेड रोडने खर्ड्याकडे जाण्यासाठी निघालो आणि मराठवाड्यातील उखडलेले रस्ते यांचे अनुभूती आली, लाजवंती खड्डे–खुड्डे चुकवत पुढे निघाली साधारण तासाभराच्या अंतर खराब रस्त्याने अडीच तासांवर जाऊन पोहोचले. आधीच रस्ता खराब त्यात सोयाबीनची मळणी करण्यासाठी गावकरी रस्त्यावरच सोयाबीनचे ढिगारे टाकीत होते.. लाजवंती गाडीने इथे नुकतेच ‘मोफत सोयाबीन मळणी केंद्र’ सुरु केले होते. रस्त्यावरच्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला कधी हूल देत तरी कधी कचाकचा तुडवित लाजवंती निघाली. दुपारी १२ च्या दरम्यान खर्डा गाठले. खर्डा टोलनाका म्हणजे ‘सरकारमान्य अधिकृत वाटमारी केंद्राच्या’ डावीकडे पाहताना खर्डा किल्ला दिसू लागतो. किल्ल्याचे असे दुरून दर्शन घडताच मघाशी खराब रस्त्याने मनावर आलेली मरगळ अचानक नाहीशी झाली आणि मराठवाड्यातील आणखी एक किल्ला दृष्टीक्षेपात आला. वाटमारी केंद्राच्या पुढे अर्धा कि.मी. नंतर डावीकडे एक कच्चा रस्ता खर्डा किल्ल्याकडे जातो.
खर्डा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाशी येवून पोहोचलो आणि पाहिलं तर किल्ल्याच्या प्रवेश दरवाजातील गेटला मोठ्ठं कुलूप आणि गेटच्या आत पायाशी मोठे–मोठे दगड. मग तिथेच ताटकळत बसलो, अन्ना मात्र आत जाण्याची काही पर्यायी व्यवस्था सोय होते का ते पाहण्यासाठी निघून गेला. आत जाण्यास आता थोडा अवकाश असल्याने गुळपोळी आणि चटणी खावून घेतली आणि तेवढ्यात आमचा लाडका अन्ना परत येताना दिसला.. त्याच्या हावभावावरून त्याने काहीतरी जुजबी बित्तंबातमी काढल्याचे ध्यानी आले. विचारलं अन्ना काय झालं रे.. किल्ल्याचे बांधकाम नव्याने सुरु आहे आणि कंत्राटदार कैलासभाऊ गेटची चावी घेऊन गावभर फिरत आहे. अन्नाने त्याचा फोन नंबर आणला आणि मग मि. कंत्राटदार यांना काचेचा चंद्र अन्नाच्या सौजन्याने आर्जवे सुरु झाली.. दादा कधी येणार, लवकर या, कुठे पोहोचलात..! तिकडून दादा १० मिनिटात येतो–१५ मिनिटात येतो. असे करता करता अर्ध तास झाला कंत्राटदाराचा पत्ताच नाही. मग गड पाहण्याचा काही पर्यायी मार्ग आहे का याची चाचपणी सुरु झाली. प्रवेश दरवाजाच्या उजव्या दरवाजातून वर तटबंदीवर जाण्यासाठी चिमणी क्लाइम्बिंग चा वापर करून वर जाता येईल पण तिथेही वर बाभळीच्या झाडांची मोळी टाकल्याने गडाचे खुष्कीचे सारे मार्ग बंद झाल्याचे दिसून आले. गडाच्या तटबंदी लगत डबा टाकण्यासाठी निघालेल्या एका तुंबलेल्या पोट्ट्याला विचारले.. पण किल्ल्यावर जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याचे कळले. मग पुन्हा गेट जवळ सभा भरली, आणि तोवर आणखी काही मंडळी किल्ला पाहण्यासाठी इथवर येवून पोहोचली. आता पुन्हा मि. कंत्राटदार यांना फोनाफोनी झाली पण पुन्हा निराशा. मुख्य गेटच्या खालची पट्टी आणि जमीन यात जेमतेम अर्ध्या फुटाचे अंतर होते.. आणि इथूनही कुणी जाऊ नये म्हणून आडव्या पट्टीच्या रेषेत मोठाले दगड टाकून वाट अडविण्यात आली होती. आता जरी हे दगड मागे सरकवले तरी या फटीतून यातून आमची वाढलेली पोटं कशी जाणार याची मला चिंता वाटू लागली. आता इतका फॉलोअप घेवूनदेखिल कंत्राटदार हूल देतो म्हटल्यावर आता अन्नाची सटकली आणि गेटच्या मध्यावरील काही दगड अन्नाने पायाने मागे सारले. मग मंडळाचे धडाडीचे युवा कार्यकर्ते रितेशभाऊ यांनी अंग चोरून सरपटत गेटच्या आत प्रवेश मिळविला. पण स्लीम–ट्रीम रितेश जसा जीव खावून आत गेला तसे इतरांना जाणे शक्य नव्हते. म्हणून मग ते महाकाय लोखंडी गेट चार पाच जणांनी थोडे उजवीकडून वर उचलून धरले आणि रितेश भाऊंनी काही मोठाले दगड त्या गेटच्या खाली सारले.. झाल्या प्रकाराने आता गेटच्या खालील पट्टी थोडी रुंद होवून पोट सुटलेल्या मंडळींना गडावर मुक्त प्रवेश मिळाला.. दगड सरकून ते महाकाय गेट थेट छाताडावर पडू नये यासाठी मग दुबाजूंनी त्याला भरभक्कम दगडांचा आधार देण्यात आला.
किल्ले भटकंतीच्या दुर्दम्य इच्छेने श्रमाचे दान देवून सात–आठ मंडळीनी खुष्कीच्या मार्गाने गडावर प्रवेश केला. आमच्या बरोबर आत आलेल्या एका स्थानिकाची प्रतिक्रियेने जणू प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त केली.. ‘आयला.. गड्या.. किल्लेदारालाबी वाटंल की.. लेका काय गडप्रेमी लोक आल्ती हिथं.. मावळ्यासारखं कुठनंबी घुस्त्यात जणू..!!’
असो गडप्रवेशाचे दिव्य कर्म उरकून आत प्रवेश केला आणि उजवीकडे गडाचा मुख्य दरवाजा पाहून किल्ल्याच्या भर–भक्कम अस्तित्वाची पावती मिळाली. गडाचे कोट जेवढे रुंद, उंच तेवढाच किल्ला भक्कम आणी अजिंक्य. निजामशाही बांधणीचा दरवाजा, मुख्य दरवाजाच्या कमानीवर फारसी शिलालेख अशी काही इथली वैशिष्ट्ये आहेत. साधारण तिस–चाळीस फुट उंचीचा तो मुख्य दरवाजा पाहून आत प्रवेश केला. आणि आत पाहिलं तर मोकळे मैदान किल्ल्यावरील सर्व अवशेष नामशेष झाल्याचे पाहून मन नाराज झाले.. पलीकडच्या तटबंदीकडे मात्र एक चिरनिद्रा घेतलेल्या पिराची कबर आणि मागे एक झाड त्यावर सावली धरून उभे असल्याचे चित्र दिसले बाकी गडावर कमरेइतके गवत वाढले होते. मुख्य दरवाजातून आत येताच उजवीकडे तटबंदीवर जाण्यासाठी असलेला जिना दिसतो.. यावर चढून तटबंदीचा एक फेरफटका मारता येईल. आम्ही मात्र समोर त्या पिराच्या कबरीकडे निघालो. इथे पोहोचलो आणि पुढे कबर आणि तटबंदी यांच्या मध्ये काही दगडी बांधकाम दिसले पुढे आलो तर हि एक दगडाने बांधलेली विहीर असल्याचे ध्यानी आले. विहिरीच्या कठड्यावरून एक फेरफटका मारताना विहिरीच्या भिंतीतून डोकावणाऱ्या झाडांवर काही सुगरणींनी बांधलेल्या घरट्यांची वसाहत असल्याचे पाहून प्रसन्न वाटले.. आत डोकावून डावीकडे पाहताना, या विहिरीत उतरण्यासाठी बांधीव जिना आणि विहिरीच्या आतल्या बाजूला एक ५x५ ची खोली बांधल्याचे दिसून आले. पायऱ्यावरून जोर–जोरात पाय आपटत आत जाण्यासाठी निघालो. साधारण ७०–८० पायऱ्या उतरताच विहिरीच्या आत दडवलेली ती खोली आतल्या बाजूस उघडणारी कमान दिसून आली.. इथून आत डोकावून पाहताना मात्र नजर गरागरा फिरू लागली. साधारण ५०–६० पुरुषभर उंच खोल हि विहीर हा पुराण स्थापत्य अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहे.. महाराष्ट्रातील ऐतिहासिक विहिरींच्या क्रमवारीत या विहिरीचा समावेश करून पुन्हा गेटकडे निघालो.. इतरत्र पाहण्यासारखे फार काही नसल्याने तटबंदीवर चढून अन्नाने अंगातील रग जिरवली.
१७९५ चा निजाम–मराठे यांच्यातील महा–रणसंग्राम (Gazetteers of India) – खर्डा हे आणखी एका ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे खर्ड्याची लढाई. सतराव्या शतकाच्या अखेरीस माधवराव पेशवे (२) आणि हैद्राबादचा निजाम यांच्यात ऐतिहासिक लढाई झाली यात देशाच्या विविध भागातील मराठे एकत्र येवून त्यांनी निजामाचा सपशेल पराभव केला. इथे इंग्रजांनी तटस्थ राहून निजामाची मदत करण्याचे नाकारले. या अतिटतीच्या लढाईत मुधोळचे सरदार मालोजी घोरपडे, इंदूरचे दौलतराव सिंधिया, माधवराव पेशवे–२, नागपूरचे रघुजीराजे भोसले आणि खर्डा येथील जहागीरदार ‘सरदार सुलतानराजे निंबाळकर’ यांनी महापराक्रम गाजविला आणि निजामाला धूळ चारली. पानिपतच्या महासंग्रामानंतर खर्ड्याची लढाईचे नाव घेता येईल, या मैदानी लढाईत सुमारे ३ लाख मराठे विरुद्ध निजामाचे साधारण ४–५ लाख सैन्य असा मुकाबला होता आणि तो मराठ्यांनी मनगटाच्या जोरावर जिंकला. निजामाकडून जबर खंडणी तसेच बेरर प्रांतातील महसुलाचा वाटा देण्याचे मान्य होताच निजाम आणि मराठे यांच्यात तह झाला. हिंदवी स्वराज्यातील हि शेवटची लढाई इतिहासात महत्त्वपूर्ण अशीच आहे. दुर्दैवाने या लढाईच्या सविस्तर युद्धतंत्र, युद्धनीतीवर प्रकाश टाकणारी ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध नाहीत किंवा असतील तर माझ्या माहितीत नाही. पुढे १८१८ मध्ये इंग्रजांनी संपूर्ण भेदाभेद नीतीने अखंड हिंदुस्थान घशात घातला आणि भारतात इंग्रजपर्व सुरु झाले..
साधारण दिड–दोनच्या सुमारास, खर्डा किल्ला पाहून बीडचा नगरदुर्ग पाहण्यास निघालो. अन्नाने जी.पी.एस. वर बीड कडे जाण्याचा गुगल नकाशा सुरु केला आणि लाजवंती बीड शहराकडे धावू लागली. आता मात्र रस्ता नावाचा प्रकार संपून खाचाखळग्यातून प्रवास सुरु झाला. कुणालाही विचारलं रस्ता कसा आहे, तर चांगला आहे असेच उत्तर यायचे. याला जर चांगला रस्ता म्हणायचं तर चांगलं कशाला म्हणायचं असा प्रश्न भाबड्या लाजवंतीला पडला. फुफाटा, १००–२०० मीटर नंतर रस्त्यावर टाकलेल्या सोयाबीनच्या पेंड्या आणि सर्वदूर पसरलेले खड्डे यातून शिताफीने लाजवंती हाकताना दिनेश भाऊंचा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. एकाच तिकिटात ३–३ सर्कस करीत गिरवली गावातून बीड–सोलापूर राज्य महामार्ग गाठला तोवर सायंकाळचे ४ वाजले असावेत.. ३०–४० कि.मि. चा हा प्रवास एखाद्या खड्डेपर्वा सारखा वाटला.. सुरुवातीचा डोंगराळ भूप्रदेश नंतर हिरवाईची चादर पांघरलेली शेत–जमीन, दूरवर पसरलेलं हिरवागार निसर्ग.. लांबच्या लांब दिसणारे पठार हि या प्रवासाची काही क्षणचित्रे. मध्ये एका गावाच्या जवळ ‘कांडी करकोचा’ नामक पक्ष्याचे दुरून दर्शन झाले, बाकी कोतवाल, वेडा राघू, रान–पारवा, माळ–चिमण्या यांचे दर्शन अव्याहत नित्यनेमाने चालू होते.
बीड जिल्ह्यातील किल्ले आणि प्रेक्षणीय स्थळे – बीडचा नगरदुर्ग, किल्ले धारूर आणि धर्मापुरीचा भुईकोट. याशिवाय इथे इतर प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळे आहेत. बीड शहरातील नदीकाठचे बांधीव तलावातील कंकाळेश्वराचे हेमाडपंती मंदिर, मन्वथस्वामींची संजीवन समाधी असलेले कपिलधारातीर्थ क्षेत्र म्हणजे जणू मराठवाड्यातील शिवथरघळ, तसेच परळीचा वैजनाथ आणि अंबेजोगाई देवीचा महिमा दूरवर पोहोचला आहे. याशिवाय वेळ असल्यास खर्डाजवळचा सौताडा धबधबा पाहता येऊ शकतो, पण इथे धबधबा पाहण्यास सप्टेंबर अखेरीचा काल सर्वोत्तम आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा या तालुक्यामध्ये असलेल्या डोंगरकिन्ही गावात एक गढी आहे.. हि गढी राझाकार सेनेपासून संरक्षण करण्यासाठी बांधल्याचे स्थानिक सांगतात.. बीड शहरापासून ६ किमी वर खजाना बावडी म्हणून एक विहीर आहे, लिंब गावातील बारा मोटेच्या विहिरीसारखी हि अजस्त्र विहीर देखिल बीड जिल्ह्यातील भटकंतीचे एक आकर्षण आहे. आमचे उद्दिष्ट किल्ले पाहण्याचे असल्याने प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची इच्छेला मुरड घातली आणि मिशन ‘मराठवाड्यातील किल्ले’ सुरु ठेवले, किल्ल्यांच्या वाटेवर असणारी प्रेक्षणीय आणि धार्मिक ठिकाणे पाहण्याचे मात्र कार्यकर्त्यांनी एकमुखाने मान्य केले.
बीडचा निजामशाही नगरदुर्ग
वाटाड्या मार्ग क्र. ७ – खर्डा – पखरुड – Thats ‘इट’ गाव – गिरवली गाव – सोलापूर–बीड महामार्ग – बीड
धकाधकीचा प्रवास करीत हाशहुष करीत लाजवंती बीड च्या चौकात पोहोचली. इथे चौकात एका स्थानिकाला विचारलं कि बीड चा किल्ला कुठाय.. तर तो म्हणाला.. हिकडं किल्ला नाही किल्ला तिकडं औष्याला.. अरे म्हटलं भाऊ ते लांबचं राहू दे इथलं काय ते बोल. कुठल्यातरी पुस्तकात नदीकाठी बीड चा नगरदुर्ग असल्याचे वाचले होते. मग पुलाकडे निघालो. पुलावरून नजर फेकली तरी किल्ला असण्याची काही खुण सापडेना.. मग अलीकडे गाडी उभी करून पुलावर फुटपाथवरून नेम धरून सायकल चालवणाऱ्या काही माणसांना किल्ला कुठे आहे ते विचारलं. ह्या इकडे काय किल्ला बिल्ला नाही. म्हटलं झाली का शाळा..!! Gazetteer मित्रमंडळ अशी टोपी नाही टाकणार हे नक्की माहित होतं. मग रस्ता ओलांडून पलीकडे गेलो तिथे एक चाचा खाली मान घालून मुकाट चालले होते. म्हटलं चाचा इथं किल्ला कुठाय. चाचा म्हणाले. इधर किला नाही, मग विचारलं ‘ऐसे बडे बडे पत्थर के गेट.. या दरवाजा किधर है..!’. हां. गेट.. वो उधर है देखो गेट.. यहां से नाही दिखता.. पूल खतम होनेके बाद गलीकुचेसे जाओ फिर एक गेट आयेगा. किल्ला सापडला या आनंदात किल्ल्याकडे जाण्याचा चांगला रस्ता कोणता हे विचारण्याचे काम राहून गेले.. चिचाने सांगितलेल्या रस्त्याने निघालो.. तर पुन्हा डबरे पडलेला रस्ता.. मोठे मोठे पोचे पडलेला.. जेमतेम २०–२५ फुट गेलो असो.. दिवसभर खड्डे चुकवून वैतागलेला दिनेश खेकसला.. तुला दुसरा रस्ता नाही सापडला का..! अरे म्हटलं भाऊ.. चिचाने सांगितलाय रस्ता.. चूक असूच शकत नाही. तू चल पुढे. पुढे गेलो आणि उजवीकडे नदीकाठचा किल्ल्याचा तट दिसू लागला. थोड्या वेळाने एक वसती सुरु झाली, अरुंद रस्ता आणि वेडीवाकडी अंगावर येणारी वाहने, अधून मधून गाडीला आडवी येणारी पोरे–ढोरे बस्स इतकीच काय ती लहानशी अडथळ्यांची शर्यत पार करीत. एकदाचा बीड किल्ल्याचा प्रवेश दरवाजा म्हणजेच राजुरी दरवाजा दिसला.
बीडचा किल्ला हैद्राबादच्या निजामाने बांधला असे म्हणतात तर बहामनी काळात हा किल्ला बांधल्याचे gazetteers सांगतात, बीर/भिर/बीड हा निजामशाही अंमलातील एक सुभा होता असं इतिहासकार सांगतात. तटबंदीसमोरील पुलाजवळ गाडी उभी करून जरा किल्ल्यावर फेरफटका मारला. किल्ल्यावर माणसांनी पूर्ण अतिक्रमण केल्याचे दिसले आणि मुंबईचा माहीमचा किल्ला आठवला. बीड चा किल्ला हा माहीमच्या किल्ल्याचा जुडवा भाई असल्याचे जाणवले. किल्ल्यावरचे अतिक्रमण मी समजू शकतो, पण इतकी भयानक अस्वच्छता.. त्याचं काय..!! किल्ल्याच्या मुख्य दरवाजा समोरची ‘बेनसुरा’ नदीकाठी हगणदारी (एच.डी.).. कचराकुंडी.. हे कमी झाले कि काय म्हणून किल्ल्याला खेटून वाहणाऱ्या बेनसुरा नदीत सांडपाणी सोडून १००% गलिच्छ किल्ला करण्याची एकही संधी बीड किल्ले वासियांनी न सोडल्याचे दिसून आले. बेनसुरा नदीचा पार सूर चेपून टाकला होता. गाडी नदीकाठी सोडून पुलाकडील राजुरी गेट (दरवाजा) जवळ गेलो.. इथे दोन फारसी भाषेतील शिलालेख दिसतात. एक दरवाजाच्या लगतच्या तटबंदीवर, तर दुसरा दरवाजाशेजारील लाईट च्या खांबाच्या मागील भिंतीवर. दरवाजासमोर आडवी भिंत आणि डावीकडे एक बुरुज.. बुरुजावर एका पिराची अज्ञात कबर. आत फेरफटका मारला आणि गडावर आणखी काही पाहण्यासारखे नं सापडल्याने मिळेल ते ऐतिहासिक अवशेष कॅमेराबंद करून पुन्हा बशीर गेट गाठले.. इथे एक चिचा उभे होते.. आम्ही एच.डी. फोटोंना एवढे फुटेज का देतोय हे त्यांना कळेना. मग न राहवून त्यांनी माहिती देण्यास सुरुवात केली.. किल्ल्याला एकूण पाच दरवाजे आहेत, बशीर गेट, कोतवाली दरवाजा, धोंडिपुरा गेट, राजुरी दरवाजा, गंज गेट हि त्यांची काही नावे. किल्ल्यावर तालाब है क्या..!! ह्या प्रश्नाला ‘नही’ असे उत्तर आले.
किल्ल्याच्या कोतवाली दरवाजाला खेटून इकडे–तिकडे सात बुरुज बिंदुसरा नदीच्या काठावरून दिसतात.. पण आतून पाहणे म्हणजे एक कसरत आहे. जुन्या बाजाराजवळ काझी दरवाजा आहे तर हिरालाल चौकातून गंज गेट पाहता येते. उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तपकिरी दाढीवाले चिचाचे आभार मानून पुलाकडे निघालो.
बिंदुसरा नदीच्या पूर्वेकडील काठावर (पुलाच्या पलीकडे) श्री. कंकाळेश्वराचे प्राचीन हेमाडपंती मंदिर असल्याचे कळले तिकडे निघालो. पूल ओलांडताच उंचपुरी चिंचेची झाडे दिसतात, इथे काही कबरी आणि एक भग्न इमारत दिसते. सिमेंट रस्त्यावरून निघालो.. एच.डी. चा घमघमाट सुटल्याने सिंघमने गाडी पुढे घेतली, मी मात्र चिंचेच्या झाडाजवळच्या इमारतीकडे निघालो.. इथे काही मंडळींचा पत्त्याचा डाव रंगला होता. आठ–दहा फुटी उंच एका बांधकामावर चढून पहिले समोर एक तिमजली मनोरा लक्ष वेधून गेट होता. तिथे एका दोस्ताला विचारलं बाबारे इथं काय आहे.. चला तुम्हाला दाखवतो काय ते.. म्हणून ‘दोस्त माझं मस्त’ पुढे चालू लागला.. मनोऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून छतावर आलो तर इथे उजवीकडे.. एक हौद दिसू लागला.. तर दोस्त म्हणाला ह्या हौदातून एक इथे भुयार आहे जे खाली निघते. भुयारी मार्ग..!! म्हटलं दादा.. येतोस का रस्ता दाखवायला..!! तर तो लगेच तयार झाला. आठ–दहा फुटी हौदात उतरलो तर खाली आतल्या बाजूस ३x४ ची एक खिडकी होती तिथून वाकून डावीकडे निघालो तर चुन्याच्या भिंतीतली एक खोली.. आठ दहा फुटांची कोंडवाडा टाईप भासणारी खोली.. थोडं पुढे उजवीकडे एक आयताकृती झरोका.. इथून खाली उरण्यासाठी भिंतीत काही दगड रचले होते.. मग तोल सांभाळत त्या दगडांवर पाय ठेवून खाली उतरलो.. मग पुन्हा एक खोली आणि डावीकडे आणखी एक झरोका.. पण इथे गचपण आणि अंधार असल्याने इथून जाणे धोक्याचे होते म्हणून एका अनामिक मनोऱ्याची भुयारी सफर उरकली आणि वाटाड्या दोस्ताचे आभार मानून मंदिराकडे निघालो.
कंकाळेश्वर मंदिर
वीस–पंचवीस पावलात कंकाळेश्वर मंदिरासमोर येवून पोहोचलो आणि मंदिराची रचन पाहून थक्क झालो. या मंदिराचे बांधकाम यादवकालिन सून मंदिराचे सौंदर्य आणि कारीगरी बघण्यासारखी आहे. एक बांधीव तलाव, मध्यभागी एखाद्या जादुई बेटासारखे बांधलेले हेमाडपंती धाटणीचे मंदिर आणि उजवीकडे मंदिराकडे नेणारी पाण्यातून जाणारी एकमेव बांधीव वाट. ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ असे वाटावे इतके देखणे मंदिर. लगोलग निघालो, अन्ना आणि मंडळी आधीच इकडे येवून पोहोचले होते. मग गुडघाभर पाण्यात पचाक–पचाक करीत पुढे निघालो आणि जादुई बेटावरच्या मंदिरात प्रवेश केला. मंदिराचे बांधकाम थक्क करणारे आहे पण बहामनी क्रूरतेचा वरवंटा या मंदिरावर देखिल चालला असल्याचे दिसून आले. मंदिरच्या बाह्य भागातील जवळपास सर्व मुर्त्या कपाळकरंट्यान्नी तोडफोड करून उध्वस्त केल्याचे दिसून आले. असो मंदिराची एक प्रदक्षिणा मारून पुन्हा मुख्यद्वाराशी येवून पोहोचलो इथे आलेल्या एका मुलाची बोलकी प्रतिक्रिया इथे देत आहे.. “या मंदिराला जे खांब दिसत आहेत.. ते मोजल्यास दरवेळेस गिनती चुकते.. पहिल्यांदा २० भरली असेल तर पुन्यंदा मोजताना १९ होते.. त्यामुळे मंदिराचे एकूण खांब किती हे कुणीच नाही मोजू शकत.. एवढं भारी मंदिर राव.. पण त्या लोकांनी पार फोडून टाकलं”.. असं दबक्या आवाजात सांगून हा उत्साही कलाकार तिथून सटकला. कंकाळेश्वराची मनोभावे पूजा करून पुन्हा गुडघाभर पाण्यातून चालत काठावर आलो. समोर एक काळभैरवाचे मंदिर आहे.
पुन्हा रस्ता विचारीत मुख्य चौकात येवून पोहोचलो. आता डेस्टीनेशन कपिलधारा गाठायचे होते. अन्ना मात्र भुकेने खवळला होता, त्यामुळे मुकाट गाडी बाजूला घेवून चौकात सोलापूर रोडला डावीकडे असलेल्या पाणीपुरीच्या गाड्यावर भुकेल्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. प्रत्येकी २–२ प्लेट पाणी पुरी, एक भेळ, २ रगडा कचोरी खावून दिवसभराचा उपवास सोडला आणि अन्ना हसला..!!
निसर्गसुंदर.. तिर्थक्षेत्र कपिलधारा – बीड हून निघालो पुन्हा आल्या रस्त्याने परत निघालो बिंदुसरा धरण मग पुढे घाट रस्त्याने जाताच डावीकडे घाटाच्या सुरुवातीला एक कच्चा रस्ता डावीकडे जातो.. हा कपिलधारा तिर्थक्षेत्राकडे नेतो. याशिवाय सोलापूर–बीड रस्त्यावर बीड च्या अलीकडे घाटाच्या अलीकडे मोठ्या चौकातील एक रस्ता ‘मांजरसुंबा’ या गावी जातो, या गावातून देखिल कपिलधारा कडे जाण्यासाठी गाडीरस्ता आहे.
कपिलधारा इथे पोहोचलो तोवर रात्र झाली होती, प्रथम मन्वथस्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश केला. मन्वथ स्वामी यांनी स्थापिलेल्या शिवमंदिराला तिन बाजूंनी कातळ-कोट चढविला असून चौथ्या बाजूस मात्र नैसर्गिक कातळकड्याची उंचच्या उंच भिंत आहे. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात इथे या कातळावरून दोन जलप्रपात मन्वथस्वामींच्या चरणी झेपावतात. वरंध घाटातील शिवथरघळ जशी एक मन:शांती देणारी एक अदभूत जागा आहे तशीच हि डोंगरराजीत वसलेली मराठवाड्यातील शिवथरघळ. भाद्रपदात इथे स्वामींच्या दर्शनास अफाट जनसागर लोटतो, साधारण २–३ लाख भाविक इथे दर्शनास येतात. तसा स्वामींचा लौकिक आणि दरारा आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनी इतिहासाची कहाणी सांगितली ती साधारण अशी.. कर्नाटकातून स्वामी इकडे आली आणि इकडचेच झाले. साधारण ज्ञानेश्वर महाराजांच्या वयात मन्वथस्वामींनी संजीवन समाधी घेतली. मंदिराची बांधणी शे–दीडशे वर्षापूर्वीची आहे.. इथे आश्चर्य म्हणजे शंकराची पिंड गाभाऱ्याच्या बाहेर आहे, गाभाऱ्यात स्वामींची संजीवन समाधी.. पुजाऱ्यांनी सांगितलेल्या आख्यायिकेनुसार, बरेच पाटील–राव–रंक मंदिराचा जिर्णोद्धार करायला आले आणि त्यांच्या आयुष्याचा उद्धार झाला. पूर्वी कुणा पाटलाच्या सांगण्यावरून इथे शंकराची पिंड मंदिराच्या गाभाऱ्यात हलविण्यासाठी काही कार्यकर्ते आले होते.. पण मि. शंकर भगवानांनी त्यांना जोर का झटका धीरेसे दिला आणि विजेचा झटका लागावा तसे ते दूर फेकले गेले. त्यामुळे इथे कुणी फेरफार करायला जात नाही.. “ठेविले अनंते तैसेची राहावे” या उक्तीप्रमाणे सगळं सुरु आहे. रात्री कपिलधाराचा घाट चढून चौकात फेरफटका मारण्यास निघालो.. तेंव्हा.. इथे काही कोल्हे घाटरस्त्यात शतपावली करण्यास निघाल्याचे दिसले.. एक-दोन ससे.. आणि मोराची कुईकुई हि अशी आडवेळची भटकंती सार्थ करून गेली. रात्री मंदिराच्या प्रवेश दरवाजाच्या उजवीकडे एका मंदिरात तंबू लावण्यात आला आणि निवांत झोपी गेलो.
क्रमशः