दिवस ३ रा – बीड जिल्ह्यातील भटकंती

धारूर चा किल्ला, आडस ची गढी, धर्मापुरी किल्ला आणी केदारेश्वर मंदीर
भल्या पहाटे सहाला आवाराआवर सुरु झाली, तंबूचा भेंडोळा करून कपिलधाराच्या जलधारांमध्ये शुचिर्भूत होण्यास निघालो. कपिलधारातील कातळकड्याच्या आडव्या रेषेवर सूर्यदेवाची एन्ट्री अजून व्हायची होती. अन्नाने रुद्र अभिषेकाचं बुकिंग केल्याने कार्यकर्त्यांना बिगीबिगी अभ्यंगस्नान उरकण्याची तंबी देण्यात आली. इथे पाण्यात उतरलो आणि समोरून येणाऱ्या थोड्या वयस्क काकांनी डावीकडे डोहात पाणी खोल आहे त्यामुळे जपून जावं अशी महत्वाची तंबीवजा सूचना दिली.. दहापंधरा फुटाचे अंतर पोहून गेल्यास कपिलधारेतील दोन धबधब्यापैकी डावीकडच्या मोठ्या धबधब्याखाली पोहोचता येते.. इथे पोहोचलो आणि पाण्याच्या आवेगाने डोक्यातील विचारांचे वारूळ पार साफ धुवून टाकली आणि रुद्रभिषेकासाठी सज्ज झालो. सकाळच्या मंगलमय वातावरणात रुद्राच्या मंत्रोच्चाराने स्वामीजींची पूजा करून मन्वथस्वामींना या मराठवाडा दुर्गभ्रमंती मोहिमेच्या सुखरूप प्रवासाबद्दल साकडे घातले आणि बीड जिल्ह्यातील उर्वरित किल्ले पाहण्यास लातूर राज्य महामार्गावरून निघालो.. आजचे लक्ष्य होते.. केज जवळचा किल्ले धारूर आणि अंबेजोगाई पासून २५ एक कि.मी. अंतरावर असलेला धर्मापुरीचा किल्ला.  

अवाढव्य तटबंदीचे कवच धारण करणारा ‘किल्ले धारूर’

वाटाड्या मार्ग बीड शहर सोलापूर रस्त्यावरील चौक डावीकडे – केज – धारूर गाव


केज कडे निघालो.. धकाधकीचा रस्ता काही काळ सुतासारखा सरळ झाला आणि मोफत मराठवाडा रस्ते विकास महामंडळ संचलित खड्ड्यातून मसाज ची अनुभूती देणारे सेंटर काही काळ बंद झाले. तरीही अधून मधून येणारा एखादा गचका खड्डेमय जीवनाची पावती फाडून जायचा. यंदाचा पाऊस बरा असल्याने निसर्ग मामाने मात्र धरणीमातेला हिरवाईची ओवाळणी भाऊबीजेला धाडून दिल्याचे दिसले. अधून मधून महाराष्ट्र रोड atlas ची उजळणी सुरु होती आणि तिकडे कॉम्पिटीशनला अन्नाचा याकुब आयफोनचा नकाशा. लातूर रोड ने केज गाठलं तोवर १० वाजले असावेत. अन्नाला असाच उपाशी फिर फिर फिरवला तर अन्नाचा दुपारी १२ नंतर भूकेला खुंखार वाघ होणार हे सगळ्यांना ठाऊक होतं. त्यामुळे केजला जसा अन्ना म्हटला काही खायला घेवून येतो तशी रावळसाहेबांनी गाडी सायडिंग ला घेतली. अन्ना पुढे गेला.. मागून कबिलेका सरदार रितेशला सोनकेळी आणायला पाठवले. मि आणि दिनेश मात्र गाडीत बसून राहिलो. दहापंधरा मिनिटाने अन्ना परत आला ते तावातावाने, “काय भुक्कड गाव आहे राव काही खायला नाही इकडे.. सगळीकडे नुसते वडे आणि भजी”.. तेवढ्यात रितेशभाऊ एक डझन सोनकेळी घेवून परत आला.. दही आणायचं राहून गेलं.. आता दही आणले नाही हे पाहून अन्ना आणखी खवळला.. सरतेशेवटी अन्नाला प्रॉमिस केलं पुढे रस्त्यावर आणखी एखादं गाव लागलं तर दही घेऊया.. असं म्हणून पुढे निघालो. अन्नाच्या पोटातील भुकेला जीन मात्र दर अर्ध्या तासाने वर डोकं काढत होता. म्हटलं आज काय खरं नाही. पुढे धारूरच्या वाटेवर एका गावात गाडी थांबवून अन्नासाठी पंचामृताची सोय करण्यात आली आणि अन्ना हसला.

केज ते धारूर असा २०२५ किमी चा प्रवास करून धारूर गावी पोहोचलो. तर इकडे आठवड्याचा बाजार भरला होता. आता या बाजारातून गाडीला वन पिस सलामत बाहेर काढण्याचे दिव्य दिनेश पार पाडत होता. माणसांनी गच्च भरलेल्या बाजारातून रांगत लाजवंती धारूर किल्ल्याला पोहोचली. किल्ल्याच्या दरवाजापर्यंत थेट गाडी जाते असे कळले म्हणून थेट दरवाजात पोहोचलो. दरवाजा उघडला आणि HD सुगंध पार नाकाचे केस जाळून श्वासात रुतला. किल्ल्याचा मुख्य दरवाजा मात्र दणकट होता पण आत जायच्या मार्गात घोटाभर चिखल त्यामुळे मुख्य दरवाजाच्या डावीकडे एक उत्तुंग बुरुज दिसत होता तिकडे निघालो. बुरूजाच्या समोरील डाव्या बाजूच्या तटबंदीवर चढून आलो आणि धारूर गडभ्रमंती ला सुरुवात झाली. किल्ल्याचे उत्तुंग तट, बाह्य बाजूने केलेला खंदक आणि उजवीकडचा अंदाजे ४०४५ फुटी मनोऱ्यासारखा दिसणारा बुरुज. धारूर किल्ल्यावर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस नीट पाहिल्यास असे मोठे दोन बुरुज दिसतात. तटबंदीवरून चालत पुढे निघालो, मग डावीकडे बाहेर डोकावून पाहताना एक व्याघ्रशिल्प आणि गजशिल्प असलेला षटकोनी बुरुज नजरेस पडतो.. थोडं पुढे गेल्यास उजवीकडे खाली एक हिरवा तलाव दिसू लागतो आणि तट मात्र एखाद्या धरणभिंतीसारखे उंच वाटू लागतात. धारूर किल्ल्याच्या तिन बाजूंनी दरी आहे.. . नगरचा मांजरसुम्भा, माणदेशातील (सातारा) वारुगड या किल्ल्यांनाही असंच तिनही बाजूंनी दऱ्या आहेत त्याची आठवण झाली. धारुरचा किल्ला असाच दरीने वेढला आहे. डावीकडे दरीत उतरणाऱ्या घळीवर हा तलाव बांधला आहे. तिन बाजूंनी असलेले २५३० फुटी उंच तट, हिरवा तलाव आणि मागे ४०४५ फुट उंच एखाद्या मनोऱ्यासारखा चारमजली टेहळणी बुरुज असं सुंदर चित्र पाहून तलावाला तटबंदीवरून वळसा घालत निघालो. तटबंदीवरून वाकून तलावाकडे पाहताना गरगरत होतं अशी अवस्था पाहून किल्ल्याचे तट किती अभेद्य आहे याची खात्री पटली. काटकोनात वळून बुरुजाच्या कमानीतून बाहेर आलो आणि तुटक्या पायऱ्या उतरून भग्न तटबंदीच्या काठावर येवून पोहोचलो. इथून डावीकडे पाहताना एखाद्या धरणभिंतीसारखा दिसणारा तट.. समोर दरी आणि  उजवीकडे एक वळण घेवून पुढे जाणारी धारूरची विस्तीर्ण तटबंदी नजरेस पडली. मघाशी पाहिलेला हिरवा तलाव नसून एखादं पोर्टेबल धरण आहे कि काय अशी शंका या नजरेत न मावणाऱ्या उत्तुंग तटाकडे पाहताना येते. किल्ल्याच्या भव्यतेची खात्री पटवून देणारी अशी हि मोक्याची जागा आहे. भग्न तटावरून थोडं पुढे जाऊन ठरवलं आधे सिधे जावो आधे उजवीकडे जाओ.. बाकी मेरे पीछे आवो”.. मि आणि दिनेश उजवीकडे निघालो.. इथे दोन समांतर तटबंदीच्या अगदी मध्यावर एका पिराची कबर एका कडूनिंबाच्या झाडाखाली दिसते आणि मागे एका राजवाड्याची कमान. पिराच्या कबरीपासून उजवीकडच्या तटबंदीवर चढण्यासाठी पायवाट आहे. इथे आलो आणि एका बुरुजावर किल्ल्याची उजवीकडची तटबंदी आणि त्याशेजारी बाहेरून असलेला खंदकातील हिरवा तलाव दिसू लागला. असे किल्ले जर परदेशात असते तर त्याची कशी बडदास्त ठेवली असती.. इथे मात्र किल्ल्याची अवस्था सवतीच्या पोरासारखी झाली आहे. बाहेर पुरातत्व खात्याने ‘संरक्षित स्मारक’ असा रंगीत बोर्ड लावला आहे.. पण या किल्ल्याचे संरक्षण कोण करणार हा खरा प्रश्न आहे. नुसते बोर्ड लावून संरक्षण होत असावं.. असा गोड गैरसमज मि. पुरातत्व यांचा  झाला आहे हे नमूद करावे लागेल. पिराच्या कबरीशेजारील उजवीकडच्या बुरुजावरून पाहताना दरीकडे उतरणाऱ्या घळीवर एक बांध घालून पाणी अडवल्याचे दिसते. तसेच खंदकाच्या पलिकडच्या काठ बांधून काढल्याचे ठळक दिसते. इथे एका बुरुजातून डोकावून तलावाकडे पाहताना तटबंदीच्या साधारण अर्ध्या उंचीवर बांधलेला एक अष्टकोनी सज्जा बुरुज लक्ष वेधून घेतो.. पण इथे उतरण्याचा मार्ग मात्र गवताने गच्च वेधून टाकला आहे त्यामुळे या बुरुजाचे संपूर्ण छायाचित्रण करण्याचा विडा सिंघमने उचलला आणि क्षणार्धात हा लक्षणीय बुरुज कॅमेराबंद करून टाकला. इथून डावीकडे पाहताना दरीच्या डाव्या काठावरील तटबंदी मात्र पहात राहावी अशी देखणी आहे. मागे एक दूरवर दिसणारा इवलासा धबधबा या काळ्याहिरव्या निसर्गदृश्यात पांढरे रंग भरत होता.. इथून तटबंदीवून फेरफटका मारल्यास पुन्हा वळून आपण पिराच्या कबरीसमोरील तटबंदीवर येवून पोहोचतो.. तटबंदीच्या आत मात्र राजवाड्यांचे चौथरे दिसतात.
धारूरचा किल्ला हा तिन्ही बाजूस असलेल्या दरीत थेट सरळ घुसलेल्या निमुळत्या टेकडावर बांधला आहे.. मुख्य दरवाजापासून सरळ रेषेत पिराच्या कबरीकडे आल्यास पुढे तिन्ही बाजूची दरी आणखी खोल होत जाते आणि तटबंदीची बांधणी आणखी उंच भासते. पिराची कबर जणू या किल्ल्याच्या केंद्रस्थानी आहे.. इथून मागे बघताना किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या आजूबाजूला असणारे विवध उंचीचे तट आणि उंच बुरुज नजरेस पडतात. अन्ना आणि कबीलेका सरदार कबरीलगतच्या बुरुजावर पोहोचताच मुख्य दरवाजाकडे निघालो.. इथे मळलेल्या पायवाटेने पुढे जाताना डावीकडे एक मशिद दिसते यावर फारसी भाषेत एक शिलालेख लिहिला आहे.. दोन्ही बाजूस असलेल्या भग्नावशेष पहात पुढे गेल्यास आपण मुख्य दरवाजा शेजारील देवड्यापाशी पोहोचतो..  इथे लांबलचक आयताकृती वाटेने पुढे येताच डावीकडचा मुख्य दरवाजा दिसतो. दरवाजाच्या आजूबाजूस उत्तुंग तटबंदीने गडावरचा प्रवेश अतिकठीण करण्याचे धोरण राबवल्याचे इथला परिसर पाहताना जाणवते.  

धारूरचा भुईकोट किल्ला आदिलशाही सरदार किस्वरखान लारी याने १५६७ साली (हिजरी सन ९७५) बांधल्याचे gazetteers सांगतात. पुढे अहमदनगरच्या मुर्तझा निजामशाहने किस्वरखानाचा काटा काढून धारूर वर निजामशाही चा झेंडा फडकवला. पुढे १६३० साली मुघलशाहीने या किल्ल्याचा ताबा घेतला असा या किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास आहे. धारूरचा किल्ला धारूर शहरापासून २०० मि. वर असून तो साधारण सरासरी २४०० उंचीच्या डोंगररांगेतील एका डोंगरावर बांधला आहे. असे असले तरी किल्ल्यावरचा प्रवेश हा पठारावरूनच आहे, मागच्या बाजूस या किल्ल्याला तिनही बाजूनी नैसर्गिक दरीचा खंदक आहे. साधारण १५-२० फुटी उंचीची तटबंदी किल्ला मजबूत करण्यात आला आहे. गडाचा मुख्य दरवाजापर्यंतचा मार्ग मात्र वळणावळणाचा असून हत्तीच्या धडकेने दरवाजा सहज तोडता येऊ नये यासाठी दोन तटामधले अंतर जाणीवपूर्वक कमी ठेवण्यात आले आहे.
असा हा देखणा किल्ला पाहून बाहेर पडलो आणि प्रवेश द्वारासमोर एका पाण्याच्या टाक्यात सुगरणी घरटी विणत असल्याचे चित्र दिसले. धर्मापुरी गाठायचे असल्याने धारुरच्या भटकंतीला पूर्णविराम देवून गावाला वळसा मारत जाणाऱ्या रस्त्याने धारूर बस स्थानकासमोरील चौकात येवून पोहोचलो.

आडस ची गढी:

धारूर गावातून निघालो आणि अंबेजोगाईची वाट पकडली, धारूरआडस रोडने अंबेजोगाई गाठता येतं किंवा चांगला रस्ता हवा असल्यास पुन्हा केज गाठून अंबेजोगाईला जाता येतं. आडस इथे सरदार आडसकर यांची गढी असल्याचे कळले म्हणून पुन्हा खाचखळग्यातून वाट काढत आडस गाठलं. दोनतिन पुरुष उंचीचा दगडी पाया आणि त्यावर बांधलेली २५ फुटी मातीची भिंत अशी हि आडस ची गढी शेवटच्या घटका मोजताना दिसली. गढीचे बुरुज वरून ढासळले असून ते कधीही जमीनदोस्त होतील अशी अवस्था आहे. आडस गावातील एका काटकोनी वळणावर डावीकडे हि गढी आहे. गढीसमोरील उजवीकडच्या पायऱ्यांनी गढीच्या मुख्यदरवाजासमोरील चौथऱ्यावर प्रवेश केला. इथे दरवाजासमोर बाहेर एक हनुमान मंदिर बांधले आहे. दरवाजातील उंबऱ्यात आडसकरांचे काही वंशज गप्पागोष्टी करताना दिसले आणि या गढीच्या इतिहासाबद्दल विचारणा केली. शिवकालीन सरदार आडसकर यांनी हि गढी बांधली आणि त्यांनी खर्ड्याच्या लढाईत काही पराक्रम गाजवला अशी माहिती मिळाली. गढीच्या आतल्या भागात काही आडसकर वंशज मंडळींची घरे पाहायला मिळाली याशिवाय आत एक विहीर देखिल असल्याचे कळले. धारूरधर्मापुरी रस्त्यावरून जाताना इतिहासाच्या पानावर पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ऐतिहासिक गढीला एक धावती भेट देवून अंबेजोगाई चा रस्ता धरला.. इथून जाताना हिरवं रान आणि विस्तीर्ण पठार दिसते. पठारावरून दुडूदुडू धावणारा वारा अधून मधून सुखावत होता.


अंबेजोगाईला पोहोचलो तेंव्हा चार वाजले होते म्हणून दुरूनच देवदर्शन घेवून अंधार पडायच्या आत घाटनांदूर मार्गे धर्मापुरी गाव गाठलं तोवर उन्हं कलंडली होती. धारूरआडसअंबेजोगाईधर्मापुरी हे साधारण ६५ कि.मी चे अंतर कापण्यासाठी खराब रस्त्यामुळे तब्बल अडीचतीन तास मोजावे लागले.

विस्तीर्ण तळ्याकाठचा धर्मापुरी किल्ला

वाटाड्या मार्ग धारूर आडस अंबेजोगाई घाट नांदूर धर्मापुरी गाव धर्मापुरी किल्ला


धर्मापुरीच्या अलीकडे असणाऱ्या पठारावरून धर्मापुरी किल्ला आणि शेजारचा तलाव यांचा एक दांडगा नजारा आहे तो पाहून धर्मापुरी गाठलं आणि किल्ल्याकडे धाव घेतली. धर्मापुरी गाव संपायच्या अलीकडे उजवीकडे एक सिमेंटचा चकाचक रस्ता धर्मापुरी किल्ल्याकडे जातो. अरुंद बोळातून लाजवंती लाजत लाजत किल्ल्याकडे निघाली. किल्ल्याच्या अलीकडे एका घराच्या ओसरीवर २ गणेश शिल्प आणि कैक विरगळ धूळ खात पडल्याचे पाहून आश्चर्य आणि दु:ख वाटले. इतिहाच्या पाउलखुणा पाहिल्याचे आश्चर्य आणि त्याबद्दलचे औदासिन्य पाहून दु:ख वाटले.. मुख्य रस्त्यापासून साधारण १०० मिटर उजवीकडे जाताच समोरच किल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. किल्ल्याचा बाह्य दरवाजा फक्त चौथऱ्यापुरता तग धरून आहे. मुख्य दरवाजाकडे जाणारी वाट मात्र चढणीची आहे, पायऱ्यांच्या उजवीकडे काही आधुनिक घरे बांधली आहेत. ५०६० पायऱ्या चढून  वर आलो आणि डावीकडे षटकोनी आकाराचा देखणा आणि भला दांडगा बुरुज पाहून किल्ला पाण्यासाठी केलेला आटापिटा सार्थकी लागला. पायऱ्या चढून वर येताच उजवीकडे गडाचा मुख्य दरवाजा दिसतो. मुख्य दरवाजा मात्र आधुनिक दगडी चिरे घालून बंद केला आहे. आतबाहेर करण्यासाठी सध्या एक छोटी चौकट तेवढी ठेवली आहे. कमानीच्या उजव्या बाजूस एक शिल्पपट्टिका मात्र किल्ल्याच्या दर्शनी भागाची शोभा वाढवणारी आहे. डावीकडे भिंतीमध्ये काही कोरीव चिरे लक्ष वेधून घेतात. मराठवाड्यातील बऱ्याच किल्ल्यामध्ये हे सर्रास आढळते. हेमाडपंती मंदिराच्या खुणा या अशा किल्ल्याच्या भिंतीवर पाहायला मिळतात. चौकटीतून वाकून आत आलो आणि समोर काटकोनात वळून गडाच्या आतल्या भागात प्रवेश केला. गडाच्या हा तिसरा दरवाजा मात्र भग्नावस्थेत आहे. दरवाजाची वरचा खांब अदृश्य झाला असून उंबरा आणि बाजूच्या भिंती तेवढ्या शिल्लक आहे. या दरवाजाच्या आत येताच डावीकडे तटबंदीतील एक खोली आणि उजवीकडे तटावर चढण्यासाठी व्ही आकाराचा दगडी चिऱ्याचा जिना आहे. समोर नजर फेकली तर चारही बाजूस मोकळे मैदान.. समोर शेवटाला तटबंदीला खेटून उभ्या असलेल्या तीन कमानी मात्र लक्षणीय वाटतात म्हणून तिकडे निघालो. कमानी पाशी पोहोचलो तर हि एक तटबंदीला खेटून बांधलेली एक इमारत असल्याचे कळले. हे दारू कोठार किंवा गुप्त चर्चा करण्याची जागा असावी. कारण इमारतीचा प्रवेश दरवाजा हा २x२ टूबायटू एवढा लहान आहे

अन्ना असं काही दिसतंय म्हटल्यावर घाईने निघाला म्हटलं भाऊ सावकाश जा.. एक तर निर्मनुष्य गड आणि त्यात असली बंदिस्त अंधारी खोली म्हणजे आत सरपटकुमार वाट बघत असणार.. हे नक्की.. तसा अन्ना सावधपणे त्या चौकटीत गुडघ्यावर रांगत आत शिरला. आतून आवाज आला काही नाही रे आत या.. आत आलो आणि अंधारल्या खोलीत समोरून प्रकाश किरणाचा एक झोत भग्नावशेषातून त्या खोलीत डोकावून.. “कोण नवीन मंडळी आली आहे हा अडगळीतला गड पाहायला”, असं म्हणत भसकन डोळ्यांवर आला. ह्या बंदिस्त खोलीतला गारवा मात्र सुखावणारा होता एखाद्या शितगृहासारखा. पुन्हा बाहेर आलो आणि तटबंदीवरून एक फेरफटका मारावा ह्या हेतूने या कोठाराच्या उजवीकडच्या पायऱ्याकडे निघालो. पायरीवर पाऊल टाकणार इतक्यात समोर तटबंदीच्या वरच्या भागातून बाहेर डोकावणाऱ्या झाडांवर काही सुगरणी घरटे विणण्यात मग्न असल्याचे दिसले. डावीकडे एक विणकर पक्षीण त्यांच्या नाकावर टिच्चून एका झुडुपाचे पान विणून घरटे बांधत होती.. या झुडुपातून विणकराच्या पिलांचा किलबिलाट ऐकू येवू लागला आणि सुगरणीची वसाहत पाहून गडाच्या तटबंदीवर प्रवेश केला. पायऱ्या चढून गडाच्या उजवीकडच्या कोपरा बुरुजावर दाखल होतो. इथे बुरुजाच्या केंद्रस्थानी एका पिराची कबर आहे त्याला पांढराहिरवा रंग देवून शांत निद्रिस्त पिरबाबांना एकदम रंगेबिरंगी करून टाकल्याचे दिसले. कबरीला वळसा मारून बुरुजाच्या कोपर्यावर आलो आणि इथल्या तलावाचा नजरा पाहून धर्मापुरी किल्ल्याची भटकंती पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. सूर्यदेव गुडबाय करायला क्षितिजाच्या कंगोऱ्यावर ताटकळत उभे होते. आज सूर्यदेव जणू हि भटकंती पुरी करण्यासाठी ओव्हरटाईमच करत होते.. बुरुजावर पोहोचलो तोच सूर्यदेवाने लाल बावटा दाखवून मावळतीची गाडी पकडली. संध्यासमयीचे असे विहंगम दृश्य पाहून तटबंदीवरून गडप्रदक्षिणा पूर्ण केली.. मातीच्या बुरुजावरून चालताना मात्र कधी कधी धाकधूक वाटत होती इतकंच. कोठाराला खेटून उभ्या असलेल्या तटबंदीवरून चालत बुरुजबुरुजावरून पुन्हा मुख्य दरवाजाच्या आतल्या ‘व्ही’ आकारातील जिन्यापाशी आलो. वाटेत एके ठिकाणी विहीरसदृश काहीतरी दिसले पण वाढलेले झाडीझुडुपांचे गचपण त्यामुळे नेमकं काय ते कळायला मार्ग नव्हता. इथे पोहोचलो धर्मापुरी गढीचा निरोप घेतला आणि तडक केदारेश्वर मंदिराकडे निघालो..

धर्मापुरीचे हेमाडपंती केदारेश्वर मंदिर
धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिराबद्दल बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं त्यामुळे अंधार धर्मापुरीला कवेत घेण्याआधी बिगीबिगी निघालो. पायऱ्या उतरून धर्मपुरी किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाला पाठ करून उजवीकडे जाणाऱ्या चकचकीत सिमेंट रस्त्याने निघालो. मुख्य रस्ता दिसताच उजवीकडे वळून केदारेश्वर मंदिर कुठे दिसतोय का ते पाहू लागलो. मग उजवीकडे असावे असे समजून तिकडे निघालो. थोडं पुढे गेल्यावर मंदिराचा काही पोस लागेना हे पाहून. पुन्हा एका वाटाड्याला विचारलं.. ते मंदिर चढ संपल्यानंतर उजवीकडे आहे.. हिकडे कुठं आलात तुमी.. असं आपल्या अकलेचे वाभाडे काढून पुन्हा चढावर आलो.. इकडे एक कच्चा रस्ता उजवीकडे जाताना दिसतो. एका बाजूला शेत.. पाणी वाहण्यासाठी केलेला पाट आणि उजवीकडे तुरळक वसती पार करताच उजवीकडे एका पिंपळाच्या झाडाखाली असलेले मंदिर दिसू लागते. झाडाकडे पाहिल्यास एखाद्या घरासारखे पण डावीकडे त्याची हेमाडपंती बांधणी लक्षात येते


मंदिराच्या दरवाजापाशी आलो तिथे पायरीच्या अलीकडे एका सिहाची भग्न मूर्ती आहे. दरवाजातील चौकटीच्या दुबाजूस तेजस्वी कांतीचे दोन द्वारपाल पाहून थक्क झालो.. एवढी वनपिस पुरातन मूर्ती मी आजवरच्या महाराष्ट्राच्या भटकंती मध्ये पहिली नव्हती.. मंदिराला वळसा मारीत डावीकडे निघालो आणि एका मागून एक देव समोर प्रगट होवू लागले.. नृसिंहसरस्वती, लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण, वराहअवतारातील विष्णू, ब्रम्हा, बासरीधारी कृष्ण अशी देवांची महासभाच या केदारेश्वर मंदिराच्या अवतीभिवती भरल्याचे दिसले. बहामनी सत्तेच्या मूर्ती तोडो अभियानातून हे मंदिर बचावल्याचे पाहून आनंद झाला. देवांच्या दिमतीला स्वर्गीय अप्सरांचा खासा राबता होता. मध्येच हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढणारा नरसिंह तर एखाद्या जिवंत शिल्पासारखा.. या मुख्य मंदिराच्या एका भिंतीतून लांबून गोमुखासारखी रचना आहे. इकडे नीट पाहिलं तर हा भरजरी कलाकुसर केलेला एक वराहरथ आहे असे दिसले.. या शिल्पातील वराहाच्या पायात तोडे.. गळ्यात पोवळ्याची माळ, मानेवर करकचून लगाम ओढून बसलेला सारथी आणि मागे नक्षीदार मखर असलेली अंबारी.. महाराष्ट्रातील हेमाडपंती मंदिराच्या इतिहासाच्या पुस्तकात हे मंदिर म्हणजे एक सोनेरी पान आहे.. पण सध्या याची अवस्था बघता पुरातत्व खाते हे मंदिर जमीनदोस्त होण्याच्या वाटेवर डोळे लावून बसल्याचे दिसते.. त्यात हे क्षेत्र भूकंपप्रवण असल्याने धिरे का झटका जोरसे लागण्याची शक्यता पाहून लवकरच काही पावले नं उचलल्यास.. बहामनी वरवंट्यातून सहीसलामत सुटलेले हे मंदिर भ्रष्ट शासनाच्या वरवरवंट्याखाली भरडले गेले असे भविष्यात म्हणावे लागेल.. मंदिराच्या भिंतीतून डोकावणारी झुडुपे आणि इतस्त: विखुरलेल्या कोरीव शिळा पाहून मन सुन्न होते.. मग हे सगळं शिल्पवैभव पाहून सभामंडपाकडे निघालो.. सभामंडप मोडकळीस आला असून त्याला आधार देण्यासाठी मि. पुरातत्व ने स्वस्तात अशा कामचलाऊ मस्त भिंती उभारल्या आहेत. आत आलो आणि सभामंडपाची रचना दिसू लागली डावीकडे समयीच्या प्रकाशात उजळून निघालेला केदारेश्वराचे मंदिराचा गाभारा दिसू लागला. या गाभाऱ्या समोर असलेल्या मंडपाच्या छतावर देखणे कोरीव काम आहे. उजवीकडे एका किनाद्यात विराजमान अशी देखणी गणेशमूर्ती आहे. गाभाऱ्याच्या चौकटीला नमस्कार करीत आत प्रवेश केला आणि दुर्गभ्रमंतीचा हा तिसरा दिवस केदारेश्वराच्या चरणी अर्पण केला.
याकुब मित्रमंडळ आयोजित समग्र मराठवाडा दुर्गपर्यटन हे एका अर्थाने तीर्थाटन म्हणून उदयास येत होते.. म्हणजे पहिल्या दिवशी सोनारीचा कालभैरव, दुसऱ्या दिवशी बीड चा कंकाळेश्वर तसेच मनःशांतीचा ठाव असे तीर्थक्षेत्र कपिलधारा आणि आज धर्मापुरीचा केदारेश्वर.. अशी किल्ल्याबरोबर समांतर सुरु अशी तिर्थयात्रा पाहून जमल्यास रोज एक तरी मंदिर पाहावे असा संकल्प सोडला.


दिवसभराची हि गाडीयात्रा.. गडभ्रमंती.. आणि एक वेळचे जेवून चालेलेले पर्यटन असा रागरंग पाहून अन्ना खवळला.. काय राव जेवायचा तरी ब्रेक घ्या कि राव असे म्हणून अन्नाने सौम्य शब्दात निषेध नोंदवला.. म्हणून लगोलग याकुम मित्रमंडळाने धर्मपुरीच्या पठारावर लंच कम अल्पोपहार ब्रेक मंजूर करून टाकला..  पठारावर पोहोचलो आणि शिदोऱ्या उघडल्या साजूक तूप.. कोरियन ब्यागेत घुसळलेले अन्ना स्पेशल दही आणि गुळपोळी असा मेनू सज्ज होता. रस्त्याच्या कडेला रंगलेला हा रोडभोजनाचा साग्रसंगीत सोहळा सुरु झाला.. तशी पठारावर मोरांची कुईकुई ऐकू आली.. अन्ना स्पेशल दह्याचा वास मोरांच्या नाकी पडण्याच्या आत जेवण उरकले आणि औसा किल्ल्याकडे निघालो..


क्रमशः


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s