दिवस ४ था – लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील भटकंती

औसा किल्ला आणि नळदुर्ग किल्ला

भुकेला अन्ना जेवण करून तृप्त झाल्याचे पाहून धर्मापुरीचा निरोप घेतला आणि अंबेजोगाई बायपास करून लातूर कडे निघालो.. उद्याचे पहिले लक्ष्य औसा किल्ला मग महाकाय नळदुर्ग पाहून उदगीरचा किल्ला करण्याचे एकमुखाने मान्य करण्यात आलेघाटनांदूर मार्गे निघालो आणि डावीकडे अन्ना स्पेशल जी.पी.एस. वाटाड्या सांगेल तसे गावातून डावीकडे निघालो.. कुरकुर न करता.. महाराष्ट्र atlas मात्र गुगल वाटाड्या वापरल्याने जरासा नाराज होता इतकंच.. त्यात घाटनांदूर सोडलं आणि दुर्देवाचे दशावतार इन 3-डी असा रोड शो सुरु झाला.. मग काय महाराष्ट्र Atlas ला गुगल वाटाड्या ला बोलण्याची संधी मिळाली आणि खराब रस्त्याची दाखवल्याबद्दल अन्ना जी.पी.एस. ची फिरकी घेत लातूर हायवे ला येवून पोहोचलो.. थोडं अंतर पुढे गेलो आणि अन्ना स्पेशल जी.पी.एस. रस्त्याला मेगाहायवे का म्हणू नये यावर जोरदार चर्चा सुरु झाली.. इकडे खड्डे कुणाचे यावर जुगलबंदी सुरु होती तिकडे दिनेश खड्डे चुकविण्यात मश्गुल झाला होता.. लाजवंती गाडीला खरचटू नं देता गाडी शिताफीने हाकण्याचे कसब अगदी समेवर जाऊन पोहोचले होते.


अंधाराला छेद देत लाजवंती कधी सुसाट तरी कधी पुसाट वेगाने लातूर कडे निर्व्याहत धावत होती. साधारण दहाच्या सुमारास लातूर गाठले आणि एक जंक्शन हॉटेलात डिनरची सोय लावली.. अन्ना पठारावरच आउट झाल्याने उर्वरित मित्रमंडळ पोट भरून जेवले आणि लातूरऔसा रोडने निघालो.. रस्त्यावर खड्ड्यांचा माहौल थोडा सौम्य झाला तसा ताणलेल्या डोळ्याला डोळा लागला. जाग आली ते.. औसा आलं उठा आता.. या अन्नाच्या ठसकेबाज आरोळीने. साधारण दोन ते अडीच वाजले असावेत. औसा किल्ल्याच्या मागे एका पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या तुकाराम मंदिरात आजचा मुक्काम पडणार असल्याची वर्दी देण्यात आली.. उघड्यावर झोपण्यापेक्षा टेंट लावून डासांच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचे तंत्र या भटकंतीच्या पहिल्याच मुक्कामी यशस्वी ठरले होते. अन्ना गाडीत झोपतो असं सांगून तिकडे पळाला तसे टेंट मध्ये ताणून दिली..
पहाटेच दिनुभाऊनी सगळ्यांना उठा उठा वेळ झाली.. औसा पाहण्याची वेळ आलीया थाटात उठविले.. डोळे चोळीत मंदिराच्या पायरीवर बसलो तसे माणसांच्या जत्थेच्या जत्थे कुठेतरी निघाल्याचे दिसू लागले.. थोडा वेळ गेला तसे माणसांच्या हातातले नारळाच्या झाडाचे चित्र असलेले पुरातन तर लावलेले पत्र्याचे डबे.. तार लावलेल्या थम्स अप च्या बाटल्या.. ब्लेड ने कापलेल्या तिरपांगड्या बाटल्या.. पाहून हि लगबग एच.डी.लगबग असल्याचे ध्यानी आले. जाताना दु:खी कष्टी वाटणारे जीव येताना मात्र विजयी मुद्रेत परतत होते.. हे पाहून दिनेश जवळजवळ ओरडलाच आयला पुन्हा एच.डी. ..!!’ असो.. अशाच एका विजयी मुद्रा चर्येवर घेवून मार्गस्थ अशा एका युवकाला औसा किल्ल्यावर कसं जायचं याची माहिती विचारली.. पोट खाजवत त्याने.. किल्ला सकाळी ९.३० नंतर उघडतो आणि इथे जवळच लिंबाच्या झाडाखाली किल्लेदाराचे घर आहे अशी माहिती दिली..

सही-सलामत दांडगा भुईकोट – औसा किल्ला: सकाळी सातला किल्ला पाहून संध्याकाळी उदगीर पाहण्याचे स्वपन डगमगू लागले.. तसे तडक किल्लेदाराचे घर गाठले.. मि आणि कबिल्यातले कोकरू किल्लेदाराचे दर ठोठावू लागलो.. आतून आवज आला दर उघडं आहे.. मग दरवाजा ढकलला तसं तोंडात ब्रश.. कमरेला टॉवेल आणि डोक्यावर अर्धचंद्र असलेला मध्यमवयाचा किल्लेदार दाराबाहेर आला.. आलो पाच मिनिटात येतो म्हणून तोंड खंगाळून फिरून परत आला.. म्हटलं काका किल्ला बघायचाय.. ‘आता नाही ९.३० नंतर या.. सरकारी किल्ला आहे वेळेआधी उघडता नाही यायचा’.. दोन तासांचा खेळखंडोबा किल्लेदाराच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होता.. मग पुन्हा वेळ वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न करावा म्हणून आर्जवे सुरु केली.. म्हटलं साहेब पुण्यावरून आलोय खास इथले किल्ले बघायला पुढं लांब जायचंय.. नळदुर्ग करून ४ ला उदगीर गाठायचं आहे.. बघा काही जमलं तर.. यातील जमलं तरया शब्दावर जरा जोर दिला आणि किल्लेदार काका म्हटले नाश्ता करून येतो.. काका येतो म्हटले.. या वाक्यावर तडक पुन्हा तुकाराम मंदिर गाठले.. पण गडबडीत किल्लेदारांना कुठे यायचं हे सांगायचच विसरलो.. साधारण अर्ध्या तासाने किल्लेदाराचे घर गाठले.. किल्लेदारीन काकू म्हणाल्या, ते नाक्यावर गेलेत घरी नाहीत.. आत्ता..!! साडेनऊशिवाय काही किल्ला पाहायला मिळत नाही अशी चिन्हं दिसायला लागली.. मग शेवटचा उपाय म्हणून नाक्यावर गेलो.. पण तिथेही निराशा.. मग चहा घेण्यासाठी एका हॉटेलात निघालो आणि किल्लेदार दत्त म्हणून हजर.. काय राव तुम्हाला शोधतोय कुठं आहात तुम्ही.. तातडीने कोकरू आणि दिनुभाऊ यांना मोबाईल वरून सांगावा धाडला.. असाल तसे तडक या किल्लेदार आले आहेत.. साधारण ८ च्या सुमारास औसा किल्ल्याची भटकंती सुरु झाली.. पोलिस चौकीसमोरील रस्त्याने पुढे जाताच उजवीकडे एका पुलाच्या मागे औसा किल्ल्याचा खंदक आणि दरवाजा दिसू लागतो.. गडाचा मुख्य दरवाजा अजूनही सुस्थितीत असून त्याच्या दुबाजूस भरभक्कम बुरुज आहेतकिल्याच्या चहुबाजूस खंदक असून सध्यातरी हिरव्या पाण्याने तो वेढला आहे.. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस खंदकात एक विहीर आहे.. मुख्य दरवाजालगतची भिंत त्रिस्तरीय रचनेने लक्षवेधी ठरते.. भिंतीच्या बाहेर डोकावणारे सज्जे आणि त्यातून बंदुका रोखण्यासाठी केलेल्या जंग्या जणू खबरदार पुढे याल तरअसं म्हणत असतात.. किल्लेदार काकांनी दरवाजा उघडला आणि गड भटकंती ला सुरुवात झाली..  काका म्हणाले या अर्ध्या तासात गड बघून.. मग मीच म्हटलं तुम्ही जर गड दाखवायला आलात तर बरं होईल.. या वाक्यातल्या बरंया शब्दावर पुन्हा जोर दिला होता.. तसे दस्तुरखुद्द किल्लेदार गड दाखवण्यास तयार झाले.. दरवाजातून आत शिरलो आणि लगेचच आणखी एक दरवाजा दिसू लागला.. गडाचा हा दुसरा दरवाजा मात्र विविध शिल्प कलेने नटलेला आहे.. दरवाजाच्या कमानीवर थेट लगतच्या बुरुजापर्यंत पसरलेली एक आडवी शिल्पपट्टिका आहे.. यावर एका रांगेत चालणाऱ्या हत्तींचे शिल्प दिसते.. तसेच मुख्य दरवाजाच्या कमानीवरून बाहेर डोकावणारा सज्जा दरवाजाची शोभा वाढवितात.. दरवाजाची कमान मात्र मि. पुरातत्व खात्याने पुनर्बांधणी करून भक्कम केली आहे.. दुसऱ्या दरवाजातून आत शिरलो आणि एक दरवाजा शेवटच्या घटका मोजत आडवा पडल्याचे दिसले.. इथे डावीकडे काही देवड्या आहेत आणि समोर २०३० फुटांवर उजवीकडे गडाचा तिसरा दरवाजा..  इथून आत आलो आणि एका भव्य दालनात प्रवेश केला, गडाचा हा भाग एखाद्या मेगा हॉल सारखा दिसतो.. उजवीकडे तिन देवड्या तर डावीकडे चार देवड्या आहेत.. प्रत्येक देवडीत ठेवलेली तोफ.. प्रत्येक तोफ वेगळ्या धाटणीची आहे.. काही तोफेला मगरीचे तोंड तर काही तोफेच्या मुखाशी फुलांची कातळनक्षी.. यातील एका तोफेच्या नळकांड्यात चक्क एक तोफगोळा अडून बसल्याचे दिसते.. लहानग्या.. खांद्यावर सहज पेलता येईल अशा.. तरीहि वैशिष्ट्यपूर्ण अशा.. पोर्टेबल तोफा पाहून उजव्या कोपऱ्यातल्या चौथ्या दरवाजातून आत आलो.. तर उजवीकडे एक तिमजली बुरुज आहे.. हा या गडाचा सगळ्यात उंच बुरुज.. टेहळणी बुरुज.. बुरुजाला खेटून गडाचा पाचवा दरवाजा उभा आहे..  
दरवाजाच्या डावीकडे एका चौथऱ्यावर सहा तोफा एका रेषेत मांडून ठेवल्या आहेत.. इथे एक मगर तोफ, एक पंचधातूची तोफ (आणि तोफेच्या तोंडात असलेला एक तोफगोळा), एक मयूर तोफ.. एक फुलाची नक्षी असलेली तोफ अशा आगळ्यावेगळ्या तोफा पाहून.. या किल्ल्यावर तोफा तरी किती आहेत असा प्रश्न पडला.. मराठवाड्यातील प्रत्येक किल्ल्यात अशा बहुरंगी तोफांचा राबता आहे.. किती पाहाल आणि किती नको असे व्हावे.. पाचव्या दरवाजातून आत आलो आणि किल्लेदार म्हणाले दिवानआम इथे पूर्वी गडाचे राजे आमसभा घेत.. जनतेची गाऱ्हाणी इथेच ऐकली जायची.. दिवानआम हा एखाद्या आयताकृती बांधणीच्या प्रशस्त हॉल सारखा.. इथे कुठेही नजर टाका देवड्याच देवड्या दिसतात.. उजवीकडे काही देवाड्यात डोकावून पाहिलं तर इथे तोफांचा बारदाना दिसतो.. मोजताना दमछाक होईल इतके तोफगोळे आहेत.. दिवानआम मधून पुढे निघालो.. कोपऱ्यावरच्या कमानीतून पुढे जाण्यासाठी पायवाट आहे.. थोडं पुढे जाताच.. डावीकडे एक जलतरण तालावासारखा सारखा एक तलाव दिसतो.. तिथे गेलो तर पायथ्याशी काही झरोके दिसू लागले.. किल्लेदारांना याबद्दल विचारलं तर ते म्हणाले हा एक जलमहाल आहे.. जलमहाल.. !! आमच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव बघून ते म्हणाले चला दाखवतो.. या तलावाच्या उजवीकडे कोपऱ्यात एक जिना आपल्याला या गुप्त जलमहालात घेवून जातो.. जिन्यापाशी पोहोचलो आणि किल्लेदार काकांनी काठी आपटून मि. सरपटलाल आहेत याची चाचपणी केली.. मग दबकत पावले टाकीत.. आयफोन विजेरीच्या प्रकाशात या जलमहालाची अदभूत सफर सुरु झाली.. पंधरावीस पायऱ्यांचा जिना डावीकडे खाली उतरतो आणि आपण जलमहालात येवून पोहोचतो.. इथे वटवाघळांची वसति आहे.. आत पोहोचताच वटवाघळांचा चिल्चीलाट सुरु झाला.. डोळ्यांसमोर वटवाघळे भिरभिरू लागली.. थोड्यावेळाने त्यांना आमची सवय झाली तशी इथली शांतता आणि थंड हवा जाणवू लागली.. गतकाली इथे बरीच खलबते झाली असणार असा हा ऐतिहासिक महाल आहे.. जिन्यातून आत येताच समोर एका बोळातून जाणारा रस्ता आणि आणखी एक खाली उतरणारा जिना दिसतो.. डावीकडे महालातील खोल्या आणि त्यांच्या भक्कम कमानी पुरातन वास्तुशास्त्राची ग्वाही देतात.. जलमहालाची अदभूत सफर करून पुन्हा गड्भ्रमंतीस निघालो.. आत बरेच गवत वाढल्याने किल्ल्याचे तट अर्धेअधिक दिसत होते.. 
गडावर चिंचेची आणि इतर जातीच्या झाडांची बरीच गर्दी आहे.. जलमहाल पाहून उजवीकडच्या पायवाटेने पुढे निघालो.. एका चिंचेच्या झाडाशेजारी उजवीकडे एक अष्टकोनी विहीर आहे.. साधारण १००१२५ फुटीची हि विहीर बघण्यासारखी आहे.. गडावर एकूण ३ मोठ्या विहीर असून यातील कटोरी विहीर हे नाव चटकन लक्षात रहाते.. विहिरीच्या डावीकडील तटबंदीला समांतर पायवाटेने निघालोइथे साधारण डोक्याइतकं गवत वाढलं होतं.. काकांनी पुन्हा काठी आपटून पुढे सरकण्यास सुरुवात केली.. दहा मिनिटांच्या गर्द हिरव्या गचपणातून वाट काढत एका बुरुजावर आलो आणि इथे एक अवाढव्य मगर तोफ पाहून हि गवतातील अघोरी पायवाट.. स्वर्गीय वाटायला लागली.. शत्रूचा घास गिळण्यासाठी आ वासून उभा असा जबडा.. बटबटीत डोळे.. तुर्रेबाज मिशी आणि भेदक नजर अशी हि अफलातून तोफ होती.. औसा भ्रमंतीचे चीज व्हावे अशी हि तोफ होती.. इथून पाय निघेना.. तेंव्हा किल्लेदार म्हणाले गडावर अशा आणखी ४ तोफा आहेत मोठ्या.. !! चला चला.. तिकडे चला.. असे म्हणून गडावरील इतर काही तोफा पाहण्यासाठी निघालो.. अष्टकोनी विहिरीला वळसा मारून डावीकडच्या तटबंदीवर चढलो आणि पुन्हा तटबंदीवर वाढलेल्या छातीभर गवतातून किल्ले औसा परिक्रमा सुरु झाली.. पुढे एका बुरुजाशी उएवून पोहोचलो आणि इथे एक इंग्रजी बनावटीची तोफ तसेच एक बांगडी तोफ असल्याचे दिसले.. यातील बांगडी तोफ हि अर्ध्या अधिक लोखंडी बांगड्या काढून नेल्याने.. अर्धमेली झाली होती.. इंग्रज तोफ मात्र अजून सुस्थितीत असल्याचे पाहून बरे वाटले.. त्यावर इंग्रज सत्तेचे राजचिन्ह (या चिन्हामध्ये राजाचा मुगुट आणि काही प्राणी चित्रे आहेत) आणि एक इंग्रजी भाषेतील मजकूर  आहे.. पण अर्धीअधिक अक्षरे उडून गेल्याने फारसा वाचता येत नाही.. इथे परकोटामध्ये एक विहीर खोदल्याचे किल्लेदारांनी सांगितले.. इंग्रजी बनावटीची तांब्याची तोफ पाहून पुन्हा तटबंदीवरून चालत पुढे निघालो.. आणि एका बुरुजाला वळसा मारून एका इमारतीच्या छतावर येवून पोहोचलो इथे एक अजस्त्र बांगडी तोफ गवतात दडून बसल्याचे पहिले आणि दिनेशभाऊनी तोफेच्या आजूबाजूचे गवत काठीने साफ करण्यास सुरुवात केली.. दहा मिनिटांच्या अथक परिश्रमाने हे गवत दूर झाले आणि तोफेचे पूर्ण दर्शन घडले.. इथून थोडं पुढे चालत गेल्यास आपण दिवानआम च्या चौबाजूस असणाऱ्या इमारतीपैकी एका इमारतीच्या छतावर येवून पोहोचतो.. इथून दिवानएकआम चा वरून सुंदर नजरा दिसतो.. 
दिवानएआम ला छतावरून प्रदक्षिणा मारून पलीकडच्या बाजूस गेलो.. इथे डावीकडे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना आहे.. आणि वर गडावरची सगळ्यात मोठी तोफ आहे.. तोफेवर काही फारसी भाषेतील मजकूर आहे.. यात परवरदिगाराचे आभार मानण्यात आले आहे.. तोफेचे तोंड समोरून पाहताना एका फुलासारखे वाटते.. तोफेच्या बेसला मागच्या बाजूस जाऊन पहिले तर इथे हसणाऱ्या चंद्राचे / किंवा एखाद्या राक्षसाचे मुखकमल कोरल्याचे दिसते.. आपण या चेहऱ्याकडे पाहताना मात्र या शिल्पाचे अक्राळविक्राळ हावभाव अंगावर आल्याशिवाय राहत नाही.. अशी हि अनन्यसाधारण पंचधातू चंद्रमुखी तोफ पाहून औसा किल्ले भ्रमंती पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले.. आणि किल्लेदारांनी गडप्रदक्षिणा संपली असे म्हणून पुन्हा जिन्यावरून उतरत दिवानआम मध्ये प्रवेश केला.. इतिहासाच्या मागावर आलेली हि आदिवासी मंडळी पाहून मग किल्लेदारांनी या दिवानआम मधील एक बंदिस्त देवडी उघडून आत काही अवशेष पाहण्यास बोलावले.. इथे अडगळीच्या खोलीत आणखी काही तोफगोळे होते.. त्यात भर म्हणून एका परडीत १०१५ तोफांचे गोळे भरून ठेवले होते.. अशी हि तोफांची परडीपाहून पुन्हा मुख्य दरवाजाशी आलो आणि तोफांची खाण असलेल्या हा औसा किल्ला पुरेपूर दाखविल्याबद्दल मि. किल्लेदार यांचे आभर मानले.. मराठवाड्यातील भटकंतीत आणखी एक वाटाड्या आज आम्हाला किल्लेदार यांच्या रूपाने भेटला होता.. किल्याच्या मुख्य द्वारातून उजवीकडे निघालो इथे खंदकाची भिंत आणि आत की वसति दिसते.. वसति आहे हे ठीक आहे पण .. इथे एका झाडापासून आणि किल्ल्यातील एका बुरुजातून डोकावणाऱ्या जंगीत (लांबलचक) दोरी बांधून.. त्यावर चक्क लुंगी वाळत टाकण्यापर्यंत कशी काय लोकांची मजल जाते.. हे एक किल्ल्याबद्दलच्या अनास्थेचे जळजळीत उदाहरण आहे.. 


पुरातत्व खात्याने किल्ला ताब्यात घेतल्याने किल्ल्याची सद्यावस्था आणखी चिरतरुण राहील अशी आशा आहे.. तर किल्ल्याची हेळसांड करणाऱ्या अशा बेमुर्वत वसतीतून वाट काढीत आणखी एका दरवाजाशी येवून पोहोचलो.. हा किल्याचा बाह्य दरवाजा खंदकाच्या पल्याडचा.. इथे आजूबाजूस दोन मंदिरे आहेत.. मंदिरातील देव मात्र की ओळखीचे वाटत नाही.. किल्ल्याच्या या दरवाजातील तटावर मात्र एक चंद्रसूर्य आणि खंजीर यांचे कोरीव शिल्प आहे.. खाली एक उध्वस्त मजकूर आहे.. किल्ल्याच्या या दरवाजासमोर हजरत सय्यद सादात रहे.. नावाचे. कब्रस्तान आहे.. औसा किल्ल्याची मोहीम पूर्ण होताच दिवसाचे मुख्य आकर्षण नळदुर्ग किल्ला पाहण्यास निघालो.. तिकडे चंद्राकडे पुण्यातील दोस्तांचे अपडेट्स येत होते.. अरे नवरानवरी फॉल चालू आहे नळदुर्ग वर पाहून या नक्की वगैरे वगैरे.. त्यामुळे नळदुर्ग तर पाहायचाच याबद्दल दुमत नव्हतं.. 

औसा गावाबाहेरील एका तिठ्यावर येवून पोहचलो डावीकडे उमरगा तर उजवीकडे उदगीर.. इथे काही जुजबी हॉटेल दिसताच इथे नाश्ता करण्याचे फर्मान सुटले.. भटकंतीच्या या टप्यावर चंद्रकांत अन्नाच्या पोटातील भुकेला जीन सगळ्यांच्या परिचयाचा झाला होता.. त्यामुळे शक्यतो या जीनला डीवचायचं नाही असे सार्वमत झाले होते.. त्यामुळे एका ओळीत तीन डिस्को हॉटेल दिसताच लाजवंती डावीकडे घेण्यात आली.. इथे जवळपास सगळ्याच हॉटेलात ग्यासवर एक मोठं पातेलं आणि त्यात तांबडा रस्सा असं चित्र होते त्यामुळे जवळच्या हॉटेलात शिरलो.. चार लोकांसाठी दोन रस्सा पुलाव, तिन पुरीभाजी, गाठीशेव अशी जंगी ऑर्डर देवून चार दिवसातील हि पहिली मेगा न्याहारी उरकली.. जोडीला एक टंपासभर ताक,, बास आखी काय हवं भटक्या जिवाला.. जवळपास सर्व कार्यकर्ते बेंबीला पार तडस लागेपर्यंत नाश्त्याला भिडले होते.. तृप्ततेच्या काही भारदस्त लकेरी कानी पडताच नळदुर्ग किल्ल्याकडे निघालो..      

नळ राजाचा किल्ला नळदुर्ग

वाटाड्या मार्ग औसा लातूरउस्मानाबाद रोड उमरगा हैद्राबादमुंबई महामार्ग नळदुर्ग (८४ कि.मी.)
औसा वरून उदगीर आणि मग हैद्राबादमुंबई महामार्ग क्र. ९ वरून निघालो.. साधारण केवळ ८० कि.मी. चा रस्ता खराब पार करण्यास तब्बल अडीच तास लागले.. हे रस्त्यावर पसरलेल्या खड्ड्यांच्या मालिकेने.. एका मागोमाग एक असे विविधरंगी, नानाविध आकाराचे खड्डे पार करताना दिनुभाऊचा जीव मेटाकुटीला आला होता.. नळदुर्गची तटबंदी दिसू लागली आणि खड्ड्यांचा जोर अजूनच वाढला.. इकडून नळदुर्गच्या अलीकडे नदी पुलावरून किल्ल्याचा एक सुरेख नजारा दिसतो.. इथून पाहताना किल्ल्याचा अफाट पसारा त्याच्या दूरवर पसरलेल्या तटबंदीकडे पाहताना ध्यानी येतो आणि हा भुईकोट किल्ल्यांचा एक बादशाह असा अजस्त्र किल्ला आहे हे मनोमन पटते.. इथून डावीकडे काटकोनात वळणाऱ्या तटबंदीकडे पाहिल्यास नऊ बुरुजांचा मिळून तयार केलेला असा एक बुरुज दिसतो.. नळदुर्ग किल्ल्याला तब्बल ११४ बुरुज असून.. किल्ला हा एकूण वीस-पंचवीस एकरात पसरला आहे.. या किल्ल्यावर बराच काळ आदिलशाही सत्तेचा अंमल होता असे इतिहासकार सांगतात.. तसेच नळदमयंती प्रेम कहाणीतील नळ राजाने हा किल्ला बांधल्याचे काही लोक सांगतात.. नळ राजाचा किल्ला नळदुर्ग.. मध्ययुगीन दुर्गबांधणीचे एक शाश्वत उदाहरण म्हणजे नळदुर्ग किल्ला..


बोरी नदीच्या काठी वसलेला एक महाकाय भूदुर्ग.. शहर आणि किल्ला ह्याच नळराजाच्या नावाने ओळखले जाते.. तरी हा किल्ला चालुक्य राजवटीमध्ये १३व्या शतकात बांधला गेला असे इतिहासकार सांगतात.. त्यानंतर बहामनी राजवटीची वक्रदृष्टी इथे पडताच.. बहामनी राजे इथले कर्तेधर्ते झाले.. पुढे आदिलशाही राजवट या किल्ल्यावर १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंत होती.. १६व्या शतकाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाने दाख्खन मोहीम उघडली आणि प्रथम विजापूर आणि मग जवळपास संपूर्ण मराठवाडा मोघली अंमलाखाली आणला.. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर निजामशाही राजवटीचे स्तित्थ्यंतर या भूदुर्गाने पहिले.. असा ह्या किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास gazetteer मध्ये वाचायला मिळतो.. इतिहासाच्या मागावर न जाता आम्ही किल्ल्याचा भूगोल पाहण्यास निघालो.. पूल संपताच उजवीकडे एक सिमेंट रस्ता नळदुर्ग किल्ल्याकडे जातो.. गावाची वेस पार किल्ल्याच्या तटबंदीला भिडली आहे.. पुरातत्व खात्याने हा किल्ला ताब्यात घेतल्याने मात्र किल्ल्याचे किल्लेपण अजून टिकून आहे हे नमूद करावे लागेल.. असो हुरमुख दरवाजा या किल्ल्याचा प्रमुख दरवाजा असून किल्ला तिन भागात विभागला आहे.. गावाजवळचा एका सर्व बाजूंनी तटबंदी असलेला चौरस भूभाग, पुढे नदीच्या अलीकडे उजवीकडे मुखाशी लहान आणि पुढे मोठा होत जाणारा एखाद्या उलट्या बटव्यासारखा भूभाग आणि आणि रणमंडल.. म्हणजेच बालेकिल्ला.. किल्ल्याच्या मधोमध वाहणाऱ्या बोरी नदीवर इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या कारकिर्दीत एक धरण बांधण्यात आले.. इब्राहिम आदिलशाह हा बहुदा कल्पक असावा म्हणून त्याने या धरण भिंतीत चक्क एक पानीमहल बांधला आहे.. पावसाळ्याच्या अखेरीस हे धरण पूर्ण भरते आणि इथे दोन धबधबे कोसळतात त्यांना कुणी नरमादी धबधबा.. तर कुणी नवरानवरी फॉल्स तर जुनी जाणती मंडळी नळदमयंती धबधबा म्हणतात.. मला तर नळदमयंती हे नाव अगदी समर्पक वाटलं.. किल्ल्यावरील काही प्रमुख आकर्षणे म्हणजे उपरी/उपली बुरुज हे किल्ल्यावरचे सर्वोच्च ठिकाण या शिवाय या किल्ल्याला आणखी काही महत्त्वपूर्ण बुरुज आहेत.. संगम बुरुज, नगर बुरुज, संग्राम बुरुज आणि नौबुरुज आता हि नावे कशी आणि का पडली हे इतिहासालाच ठाऊक.. किल्ल्याच्या सुरुवातीच्या भागात अंबरखाना, मशिद, बारादरी, राणीमहाल, रंगमहाल, हत्ती तलाव आणि मुघली तट असे इतिहासाचे काही अवेशेष शिल्लक आहेत.. बाकी अवशेष येथील जनतेच्या अनास्थेला बळी पडलेले आहेत आणि ते इतिहासजमा झालेले आहेत.. किल्ल्याच्या काही बुरुजांवर लहान मोठ्या तोफा सापडतात पण सगळ्यात मोठी अशी मगर तोफ हि उपरी बुरुजावर आहे..
हुलयुर दरवाजातून आत प्रवेश केला आणि सुरुवातीलाच असलेल्या एका वजनदार साखळदंड पाहून किल्ला जबरदस्त असल्याची चाहूल लागली.. साधारण २० एक फुटी उंचीचे तट आणि दोन बलदंड अशा मोठ्या घेर असलेल्या बुरुजांच्या मधोमध असलेल्या दरवाजातून प्रवेश करताच प्रथम डावीकडे आणि मग उजवीकडे पायऱ्या चढताच आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजाशी येवून पोहोचतो.. इथवर येताना याच पायऱ्यावरून काही दुचाकीस्वार गडातून आतबाहेर करताना दिसले.. इकडे मंडळ धुरापासून सुटका होण्यासाठी किल्ले बघत हिंडत असताना हा असा धुराडा तेही भर किल्ल्यात थोडा असह्य वाटला.. इतकंच.. मुख्य दरवाजासमोर मि. किल्लेदार तिकीट फाडत बसले होते.. येणाऱ्याजाणाऱ्या वाहनांना आडकाठी न करता.. म्हणजे कुंपणच शेत खात होतं असं म्हणा ना..!! असो किल्लेदाराला ६ रु माणशी या दराने चार लोकांसाठी २४ रु द्यावेत म्हणून ३० रु दिले तर पुन्हा उरलेले सहा रुपये राहू द्या असं ते हसत हसत म्हणाले.. आता हि सहा रुपयांची बक्षिशी बळेबळे भटकंती मित्रमंडळावर लादून ते पुन्हा नव्या मंडळींकडे वळाले.. दरवाजातून आत प्रवेश केला आणि समोर काही तोफा पाहून तिकडे मोर्चा वळविला.. यातील एक तोफ तर तब्बल चार हात लांब होती.. साधारण १५ फुट लांब अशी ‘लंबू बच्चन’ तोफ इथे पहायला मिळाली याचे मागे एक गजशिल्प असलेली शिळा आहे.. दरवाजातून सरळसोट अशा मोठ्या पायवाटेने पुढे निघालो आणि आजूबाजूला नजर टाकताना दूरवर पसरलेली तटबंदी किल्ल्याच्या भव्यतेची पोचपावती देतात.. समोर दिसणाऱ्या मशिदीकडे निघालो.. वाटेत शाळकरी मुलांचा जत्था गड पाहून परतीच्या प्रवासास निघाला होता.. यातील काही मुले वाटेवरील विविध खाऊ विकणाऱ्या गाड्यांवर क्षणभर रेंगाळली आणि बालपणाच्या काही सहली डोळ्यासमोर आठवणी होवून नाचल्या.. त्या निरागस चेहऱ्यामध्ये स्वत:चे बालपण पाहून दोन पायांची गाडी पुढे धावू लागली.. मशिदिपुढे एक गोळागाडी आडवी आली आणि भुकेले कार्यकर्ते इथे कालाखट्टा खाण्यासाठी उतावीळ झाले.. मग उदार होवून तब्बल ४ लोकात ८ गोळ्यांची ऑर्डर देवून टाकली.. उन्हात रापलेल्या मनावर बर्फाचा मारा करून त्यात उत्साह भरण्यात यश मिळाले हे पाहून पुढे चाल केली.. किल्ल्याचा हा टप्पा मात्र एखाद्या लांबलचक रेल्वेच्या डब्या सारखा दिसतो.. लांबच्या लांब पसरलेला.. दोन तटात समान अंतर ठेवून पुढे जाणारा.. पंधरा मिनिटांच्या चालीने आपण उपरी बुरुजाच्या अलीकडे येवून पोहोचतो.. इथे डावीकडे एक दरवाजा आहे.. नदीकडे उतरणारा.. इथे दरवाजातून बाहेर जाताच उजवीकडे उतरण्यासाठी कातळी जिना आहे.. इथल्या पायऱ्या उतरताच आपण.. बोरी नदीवर बांधलेल्या धरणाच्या/बंधाऱ्याच्या २०२५ फुटी रुंद भिंतीवर येवून पोहोचतो.. भिंतीवर मात्र माणसांची जत्रा भरली होती.. मानवनिर्मित ही ऐतिहासिक इमारत पाहण्यास माणसांची झुंबड उडाली होती.. या धरणभिंतीत एक आदिलशाही राजवटीत बांधलेला जलमहाल दडलेला आहे.. साधारण चार मजली जलमहालाच्या आत उतरण्यासाठी ठिकठिकाणी जिने करण्यात आले आहे.. एखाद्या भूलभुलैया सारखा जलमहाल पहाणे हि एक पर्वणी आहे.. 
जलमहालात उजवीकडे एक विश्रामगृह त्याचा धरणभिंतीबाहेर डोकावणारा सज्जा.. दोन धबधब्यांच्या मधोमध आहे.. पलीकडच्या धबधब्याशेजारी तर चक्क तळमजल्यापर्यंत जातं येते.. बऱ्याच ठिकाणी मात्र पाणीगळती झाल्याने तिथे मिस्टर पुरातत्व खात्याने लोखंडी दरवाजे बसवून वाटा बंद केल्या आहेत.. जलमहाल धुंडाळून काढण्याचे कामात चंद्रकांतने आघाडी घेतली होती.. जलमहाल का चप्पा चप्पा शोधून.. अरे इथे कारंजे आहे.. अरे इथे कातळाची खिडकी.. अरे इथे सज्जाच्या वर जायला वाट आहे.. अरे इथे सिक्रेट महाल आहे.. अरे इकडे तळमजल्याकडे उतरायला वाट आहे.. अशी जुजबी माहिती चंद्रकांत देत होता..     
तासभराची अंधारल्या वाटांची जलमहाल सफर करून.. नळदमयंती धबधबा पाहण्यास निघालो.. धरणभिंत पार करताच आपण गडाच्या बालेकिल्ल्यावर जाऊन पोहोचतो.. इथे दोन दरवाजे नजरेस पडतात.. एक बालेकिल्ल्यात जाणारा तर दुसरा बाह्य बाजूचा.. इथून दोनही जलप्रपात आणि मागे नळदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीचे विराट दर्शन घडते.. पावसाळी वातावरणाने आकाशात लगडलेले ढग ठिकठिकाणी तटावर सावली धरत होते.. इथे थोडा विसावा घेतला.. आणि उदगीर किल्ल्याकडे निघालो.. साधारण ३.०० वाजले असावेत.. जाताजाता शेदीडशे पायऱ्या चढून उपरी बुरुजावर पोहोचलो.. इथे मगर तोफ आणि एक तोफ आहे.. तोफ चारी बाजूंनी फिरवण्यासाठी एक वर्तुळाकृती चर बांधून काढला आहे.. असे दोन चार नजरेस पडतात.. इथून उपरी बुरुजात दडलेल्या खोलीमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत.. या खोलीत एका बाजूस बालेकिल्ल्याच्या दिशेने एक खिडकी काढलेली आहे.. टेहळणीकरिता.. ऊपरी बुरुजावरून चाहुबजूस नजर फेकताना.. नळदुर्ग किल्ल्याचा अवाढव्य पसारा ध्यानी येतो.. इथून धरणभिंतीकडे पाहताना रणमंडल अर्थात बालेकिल्ल्याला वळसा मारत वाहणारी बोरी नदी हि बालेकिल्ल्याच्या गळ्यातील तांबड्या माळेसारखी भासते.. तर बालेकिल्ला हा एखाद्या मानवनिर्मित देखण्या द्विपासारखा दिसतो.. उपरी बुरुजावर पार आरपार किल्ला पाहून नळदुर्ग मोहीम थांबविण्यात आली.. आणि उदगीर कडे निघालो.. तेंव्हा दुपारचे ३.३० वाजले असावेत.. अंधार पडायच्या आत उदगीरचा किल्ला पाहून अकोल्याकडे निघायचे ठरले..

नळदुर्ग ते उमरगा हा असा रात्रीचा प्रवास करण्याचे ठरलेच होते.. पुन्हा आल्या मार्गाने उमरगा गाठले.. तिथून NARANGWADI-NILANGA-DEVANI ASHI वाट काढीत उदगीर मध्ये येवून पोहोचलो..

उदगीरचा म्याटर.. खुष्कीच्या मार्गाने किल्ले दूरदर्शन

वाटाड्या मार्ग : नळदुर्ग – हैद्राबाद महामार्ग – उमरगा – नारंगवाडी – निलंगा – देवणी – बामणी – उदगीर


उदगीर शिवाजी चौकातून रस्ता विचारीत.. एका पोर्टेबल गल्लीतून उदगीर किल्ल्यासमोरील मोकळ्या मैदानात येवून एका स्थानिकाला प्रश्न विचारला.. उदगीर किल्ल्यावर मुक्कामाची काही सोय होवू शकेल काय..? उदगीर वर राहायचं सोडा राव किल्ल्यात घुसता यायचं नाही.. का बरं काय झालं.. अहो इथे लय मोठ्ठा म्याटर झाला ना मागच्या महिन्यात.. काय..!! मागच्या महिन्यात हिकडं उदगीर बाबांच्या मंदिरासमोर हिरवा झेंडा लावला आणि किल्ल्यात खुण पडला आन काय.. किल्ल्यात जायचं अवघड आहे.. सकाळी पोलिस येतात त्यांची परवानगी काढून जावं लागल.. हे म्याटर झाल्यामुळे लय अवघड काम होवून बसलं न काय..!!


औसा किल्ल्याचा किल्लेदार हा आधी उदगीर किल्ल्यावर बदली खेळाडू होता.. त्यांच्या सांगण्याप्रमाणे इकडे काही ना काही घटना घडत असतात.. त्यामुळे वर्षातले आठ महिने तरी किल्ला बंदच असतो.. तुम्ही चाललाय खरं पण लय अवघड काम आहे.. पण तेंव्हा त्यांचे म्हणणे दुर्लक्षित करून उदगीर किल्ला पाहायचा असा निश्चय झाला होता.. आजही या किल्ल्यावर हक्क मिळवण्याचा संघर्ष अजूनही सुरु असल्याचे पाहून वाईट वाटले.. किल्ला कुणाचा..!! हा प्रश्न अजूनही इथल्या मंडळींना २१ व्या शतकात पडावा हे दुर्दैव नाहीतर आणखी काय.. शेवटी भावना.. या एका शब्दावर भारताचा राज्यकारभार सुरु आहे हे नाकारून कसे चालेल..!! असो.. काही केले तरी किल्ला पाहायचा असल्याने.. मुक्कामाची सोय लावण्यासाठी कोपरा सभा भरवण्यात आली.. तेंव्हा उदगीर मध्ये एखादा चांगला लॉज बघून मुक्कामाची सोय लावण्याचा ठराव ४ विरुद्ध ० मतांनी पास करण्यात आला आणि लॉज शोधण्यासाठी अन्नाने GPS लावला आणि पहिले नाव आले उदगीरच्या शिवाजी चौकतील राजेश्वरी लॉज.. इथे शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे आणि चौकातच असलेला हा राजेश्वरी लॉज.. लॉज चा मुवायना करण्याची जबाबदारी अन्ना आमाझ्यावर पडली तसे लॉजचा रिपोर्ट काढण्यासाठी निघालो.. ठिकठाक अशी स्वच्छ खोली जोरदार फिरणारा ऐतिहासिक पंखा आणि हे सगळं ६०० रुपयात म्हटल्यावर या लॉज मध्ये एक सार्वजनिक खोली बुक केली आणि ब्यागा टाकल्या.. जेवणासाठी रस्त्याच्या पल्याड एक थाळी टाईप भोजनालय होते.. तिकडे जेवणाची सोय लावली.. मस्तपैकी महाराष्ट्रीयन थाळीवर ताव मारून राजेश्वरी लॉज मध्ये ताणून दिली.. एक सुखाची झोप.. दिवसभराच्या घडामोडी डोळ्यासमोरून एखाद्या चलतचित्रासारख्या सटासट नेत्रपटलावर बदलत होत्या.. नळदमयंती फॉल्स हे आजच्या दिवसाचे प्रमुख आकर्षण.. औसाची तोफ हि अधून मधून दर्शन देवून जायची.. अशा मस्त आठवणींच्या कुशीवर गाढ झोपी गेलो..क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s