उदगीर चा किल्ला, कंधार किल्ला, नांदेड चा भुईकोट किल्ला’
उदगीरचा बलशाली दुर्ग – सकाळी सातला आवाराआवर सुरु झाली.. उन्हं डोक्यावर नाचाण्याआधी उदगीर करून मावळतीला नांदेड गाठायचा प्लान ठरला.. त्यामुळे कार्यकर्ते फटाफट तयार झाले.. अन्ना ने मात्र पाठ दुखत आहे आणि जास्त दुखल्यास मी ST पकडून पुण्याला जातो असा वागबाण सोडला.. आणि सकाळीच एका हाडाच्या डॉक्टर शोधायला निघून गेला तो पर्यंत नाश्त्यासाठी राजेश्वरी लॉज मधल्या उपहारगृहात हजेरी लावली.. तिकडे दिनुभाऊनी लॉजमालकांना उदगीर किल्ल्याची माहिती विचारण्यास सुरुवात केली.. तेंव्हा या किल्ल्याची इत्यंभूत माहिती असलेले एक उदगीरचे इतिहासप्रेमी गृहस्थ इथेच नाश्त्याला येणार असल्याचे कळले.. संधी मिळाल्यास गडाची माहिती असलेल्या अशा वाटाड्याची भेट घ्यायचे ठरले..
नगास एक याप्रमाणे पुरी–भाजी, मसाला डोसाला खावून सगळे फुल्ल होताच अन्ना डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्याचे पुडके घेवून हॉटेलात हजर झाला.. अन्ना च्या चेहऱ्यावरचं तेज पाहून डॉक्टरांचा उपाय रामबाण उपाय ठरला असल्याची शक्यता दिनेशने वर्तवली.. काय नाय राव एक इंजेक्शन घेवून आलो..!! असा डायलॉग ऐकताच अन्नाने मघाशी पुण्यास परत जाण्याचा जो बॉम्ब टाकला तो फुसका असल्याची खात्री पटली.. लगेच अन्नासाठी जंक्शन ऑर्डर देण्यात आली.. १ पुरीभाजी, १ उत्थप्पा.. अन्नाची ढेकर म्हणजे मंडळासाठी एक प्रकारचा ग्रीन सिग्नल होता.. ‘मोहीम पुढे चालू’ असा.. तर अशी करारी ढेकर ऐकून उदगीर किल्ल्याची वाट पकडली..
मंगळवार चा दिवस असल्याने आज सगळं ‘मंगलमय’ होणार असे वाटून गेले.. चौबारा चौकातून सरळ पुढे येताच नगरद्वार नजरेस पडते यातून सरळ गेल्यास आपण उदगीर किल्ल्याच्या द्वाराशी पोहोचतो.. इथे गडाची मुख्य द्वाराच्या दुबाजूस असलेली भक्कम तटबंदी नजरेस पडते.. चौबाजूंनी एक मोठा खंदक आणि दुहेरी तटबंदीचा असा आगळावेगळा उदगीरचा किल्ला.. तटबंदीवर पाहताना किल्ल्याच्या बुरुजांवर असलेली नानविध शिल्पकला लक्ष वेधून घेते.. इरेला पेटलेले आणि प्राणपणाने लढणारे दोन माहूत.. मुख्य दरवाजातून आत आलो आणि पाहिलं तर गडाच्या आतल्या दरवाजाला मोठं कुलूप.. ‘हा काय त्रास आहे’ म्हणून पोलिस कुठे दिसतो का ते पाहण्यास निघालो.. तर पोलिसाचा पत्ताच नाही.. पण उदगीर बाबांच्या समाधीकडे जाणारी उजवीकडची वाट तेवढी खुली ठेवल्याचे पाहून तिकडे निघालो.. उदगीरचा किल्ला हा एखाद्या लहानग्या टेकडीवर बांधला आहे.. त्यामुळे गडाची तटबंदी हि बरीच उंच करण्यात आली आहे.. ३०–४० फुटांची दोन–पदरी तटबंदी एक खंदकाच्या बाजूस तर एक आतल्या बाजूस.. दोन तटबंदीना जोडणारा जमिनीचा पट्टा एखाद्या परीघासारखा गडाला घेराव घालतो.. उजवीकडे जाताना तटबंदीवर एक विशाल शरभशिल्प आहे.. जंजिरा किल्ल्याच्या शिल्पचित्राशी साधर्म्य असलेल्या या चित्रात.. चार हत्ती पायात जखडणारा मुर्दाड वाघ आपल्याला पाहायला मिळतो.. ते पाहून उदागीर बाबांच्या समाधी कडे निघालो.. इथे एके ठिकाणी तटबंदी काटकोनात वळते तिथे अलीकडे एक भुयारी रस्ता आहे.. तिकडे आत तिनमजली बांधकाम आणि खंदकाच्या बाजूने उघडणारा दरवाजा आहे.. या भुयाराची अंधारी सफर करण्यात चंद्रकांत आणि दिनेश आघाडीवर होते.. आम्ही फॉलोअर त्यामुळे.. दबकत त्या भुयारात प्रवेश केला.. वटवाघुळांची शाळा इथेही भरली होती.. त्यामुळे त्यांचा चिलचिलाट ऐकत भुयारी मार्गाची शोधमोहीम संपताच उदागिर बाबांच्या दर्शनास निघालो.. पुन्हा गुहेतून बाहेर येताच समोर एक रंगवलेली भगव्या रंगाची कमान दिसू लागते मागे एक मोठे चिंचेचे झाड.. या चिंचेच्या झाडाशेजारी खाली उतरण्यास पायऱ्या आहेत..
इथवर येताना वळसे घेणाऱ्या खंदकाच्या तटबंदीवर बांधलेल्या दिड–पुरुष उंचीच्या पाकळ्या–पाकळ्यांची आकाराची किल्ल्याची भेदकता अधोरेखित करतात.. इथे खंदकाची तटबंदी आणि किल्ल्याची तटबंदी यांचे मधील अंतर बाधलेले दिसते.. मध्यभागी एक आयताकृती लांबलचक पट्टा.. आणि या पट्ट्याच्या उजव्या भागात असलेल्या दिड–दोनशे फुट खोल कपारीत असलेले उदगीर महाराजांची समाधी.. कपारीच्या बरोबर मागे एक उत्तुंग बुरुज असे विलक्षण दृष्य या चिंचेच्या झाडापाशी दिसते.. ५०–६० पायऱ्या उतरताच डावीकडे अन्नछत्राची आधुनिक शेड आहे तिथून डावीकडे गेल्यास गडाचा एक दरवाजा इथेही पाहायला मिळतो पण उदगीर म्याटर मुळे ह्या दरवाजाला देखिल कुलूपबंद व्हावे लागले त्यामुळे गडावर प्रवेशाची इथूनही काडीमात्र संधी नव्हती.. अन्नछत्राच्या उजवीकडे आणखी ५०–६० पायऱ्या उतरताच आपण एका चौरस तळ्यासमोर पोहोचतो.. इथे कपारीवर उदगीर बाबांचे तैलचित्र काढले आहे.. डावीकडे एका बंदिस्त कातळात कोरलेल्या अंधाऱ्या खोलीत उदगीर बाबांची समाधी आहे.. उदागीर नावाचे हे स्वामी पूर्वी इथे वास्तव्यास होते त्यांच्या इथल्या वास्तव्यानेच इथल्या गावास आणि किल्ल्यास उदगीर हे नाव पडले.. उदागीर बाबांचे आशीर्वाद घेवून गडावर जाण्यासाठी एखादा खुष्कीचा मार्ग दिसतो का ते पाहण्यासाठी उजवीकडून मंदिराला वरून वळसा मारत निघालो.. इथे दुहेरी तटबंदीच्या मधून जाणाऱ्या पायवाट आहे.. पण इथे छातीभर गावात वाढल्याने एखादा हरहुन्नरी साप पायाची पप्पी घेती कि काय असे आपलं उगाच वाटत होते इतकंच.. खंदकाची तटबंदी उजवीकडे ठेवत भरभर पुढे आलो.. इथे एका बुरुजाजवळ डावीकडे तटाची उंची कमी असल्याने इथून वॉल–क्लाइम्बिंग करून वर जाणे शक्य वाटू लागल्याने.. कोकरू रितेश सरसर तट चढून गेला.. वर पुन्हा एक १५–२० फुटी तट डावीकडे असल्याने किल्ला खुष्कीच्या मार्गाने चढण्याचा नाद सोडून दिला आणि पहिला तेवढा किल्ला पुरे असे म्हणून पुन्हा माघारी परतलो.. कपारीला वळसा मारणाऱ्या तटबंदीच्या अलीकडे डाव्या बाजूला एक पाण्याचे टाके आणि एका इमारतीचे अवशेष दिसतात..
उदगीर किल्ल्यावर मराठवाड्यातील इतर किल्ल्यांप्रमाणे काही अजस्त्र तोफा सापडतात.. त्यातील चंद्रमुखी तोफ हि औसा किल्ल्यातील तोफेसारखी आहे.. याशिवाय एक पुष्करणी, राणीमहाल, राजवाडा.. झेंडा बुरुज असे काही इतर महत्त्वाचे अवशेष आहेत.. उदगीर किल्ल्याची हि अविस्मरणीय भटकंती करून कंधार नगरी कडे निघालो..
नंदीतटातील म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील किल्लेभ्रमंती – गोदावरी नदीकाठी वसलेले शहर नंदितट म्हणजेच आजचे नांदेड.. ४ थ्या आणि ५ व्या शतकात इथे नंद कुळातील राजांची अधिसत्ता होती, म्हणूनच गोदावरी नदीकाठी वसलेल्या नगरीला नंदीतट म्हणत.. याचा उल्लेख वाशिम येथे सापडलेल्या एका ताम्रपटात आला आहे.. १७ व्या शतकात औरंगजेबाच्या अधिपत्याखाली असलेल्या तेलंगण सुभ्याची नांदेड हि राजधानी होती.. औरंगजेबाच्या मृत्यू नंतर शिखांचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंदसिंह यांनी इथे स्थलांतर केले आणि ते इथलेच होवून राहिले.. सुवर्णमंदिरानंतर थेट नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचा नंबर लागतो.. याशिवाय नांदेड मध्ये काही प्रसिद्ध किल्ले ठाण मांडून बसले आहेत.. माहूरचा रामगड, कंधार नगरीचा मानदंड असा बलशाली भूदुर्ग म्हणजे कंधारचा किल्ला आणि नांदेडचा नगरदुर्ग अशी काही नांदेड जिल्ह्यातील ऐतहासिक किल्ल्यांची नावे.. माहूरचा रामगड तसा दूर असल्याने यंदाच्या मोहिमेत माहूरच्या किल्ल्याला भेट द्यायचा बेत भ्रमणमार्गातून वगळण्यात आला होता..
कंधारनगरीचा इतिहास (पुरातत्व विभागाने दिलेला इतिहास हा असा) – राष्ट्रकुट तिसरा राजा कृष्ण याने इ.स. ९४०–९६७ दरम्यान कंधार नगरीचा विकास केलाम्हणून त्यास कंधारपूरवराधीश्वर अशी उपाधी मिळाली.. १९५० च्या सुमारास डॉ. सरकार आणि भट्टाचार्य यांना बहाद्दुरपुरा येथे सापडलेल्या शिलालेखानुसार दहाव्या शतकातील कंधारपूरचे वर्णन दिले आहे.. या लेखात राष्ट्रकुट परिवाराची वंशावळ तसेच राजाच्या दानशूर वृत्तीचे वर्णन करणाऱ्या काही ओळी तसेच नंदीतट (नांदेड) येथील आश्रमशाळांना दिलेल्या अनुदानाचा उल्लेख या शिलालेखात करण्यात आला आहे.. प्रस्तुत लेखानुसार कंधारपुर येथे दोन मोठ्या बाजारपेठा होत्या यापैकी एक गुर्जर व्यापाऱ्यांची होती.. राजाने जनावरांसाठी चाऱ्याची सोय तसेच जनतेसाठी एक मंडप उभारला होता.. इथे पाणपोया लोकांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी शेकोट्या अशी बडदास्त राजाने ठेवल्याचे या शिलालेखात नमूद केले आहे.. या लेखात विविध मंदिरांची मांदियाळी आहे शहराच्या उत्तरेस बंकेश्वर, तसेच नगरातील वीरनारायण, छल्लेश्वर, कृष्णेश्वर, कालप्रीय, तुम्बेश्वर, तुडीगेश्वर, कामदेव मंदिर अशा मंदिरांचा या शिलालेखात उल्लेख केला आहे.. कालप्रीय मंदिराच्या मंडपात बहारदार गायन–नृत्य कार्यक्रमांची सोय रयतेसाठी करण्यात आली होती.. १९६० साली पुण्यातील डेक्कन कॉलेज आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त उत्खनन मोहिमेअंतर्गत मानसपुरी येथे केलेल्या उत्खननात आठव्या शतकातील काही बौद्धकालीन मूर्ती तसेच जैन मूर्ती सापडल्या आहेत.. त्या कंधारच्या किल्ल्यात ठेवलेल्या आहेत.. राष्ट्रकुट राजांनी जैन धर्मियांना आश्रय दिला होता असं इतिहासकार सांगतात..
कंधारनगरीतील देखणा भूदुर्ग – कंधारचा किल्ला
वाटाड्या मार्ग – उदगीर – धामनगाव – राज्य महामार्ग क्र. २२२ – विग्रस बुद्रुक – गाडल – भादरपूर – कंधार जलाशय – कंधार
उदगीर वरून कंधार कडे निघालो.. वाटेवर धामनगाव रस्त्यावर डावीकडे एक मिनी कास पठार टाईप फुलांचा ताटवे दिसले तसा इथे छायाचित्रणाचा खच पाडण्यात आला.. थोडं पुढे आलो आणि विग्रस बु. गावात तर भर रस्त्यावर २ मोर बागडताना दिसले.. आणि इथले मोर गर्दीला न घाबरता रस्त्यावरून निवांत चालले होते.. म्हटलं हा काय प्रकार आहे म्हणून एका स्थानिकाला विचारलं तर ‘इथे कोंबड्या पाळतात तसे मोर सुद्धा पाळतात’.. जागच्या जागी उडालोच.. भारताचा राष्ट्रीय पक्षी पाळतात म्हणजे कहर होता.. पुढे एका बंधाऱ्यावर छोटा खंड्या आणि मोठा खंड्या सावज टिपण्यासाठी सज्ज असल्याचे एक चित्र पाहायला मिळाले.. तर अशी उदगीर ते कंधार दरम्यान घडलेली हि अचानक मित्र मंडळाची अचानक पक्षी निरीक्षण सफारी.. साधारण दोन तासांच्या प्रवासानंतर कंधारचा जलाशय दिसू लागला.. उजनी धरणाच्या जलाशयासारखा विशाल असा नजारा इथे पाहायला मिळतो.. इथे या जलाशयाला दोन भागात विभागणारा असा एक लांबलचक पूल बांधला आहे.. या पुलावरूनच कंधार किल्ल्याची वाट आहे.. पूल ओलांडला आणि दहा मिनिटात पुढे रस्त्यावरील झुडुपांच्या आडून डोकावणारी कंधार किल्ल्याची तटबंदी दिसू लागली.. बास.. बास.. बास.. क्षणार्धात अंगात एक चैतन्य संचारलं.. भटक्या मंडळींचे हे असे होते.. प्रवासाचा थकवा किल्ल्याची तटबंदी दिसताच कुठल्या कुठे निघून जातो.. तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जा.. जस जसे किल्ल्याचे तट जवळ येवू लागतात तसे पायात आपोआप बाल येते आणि थकली पावले भरभर पुढे सरकू लागतात.. थोडं पुढे आलो आणि कंधार किल्ल्याची मागची बाजू दिसू लागली.. खंदक.. कंधार किल्ल्याची भरभक्कम तटबंदी.. डावीकडे खंदकाच्या पाण्यात एका बेटावर असलेली पिराची कबर.. औरंगजेब देखिल या किल्ल्यावर फिदा झाला होता असे म्हणतात.. खंदकाला उजवीकडून वळसा घालत गाडी रस्त्याने निघालो.. इथे उजव्या कोपऱ्यात खंदकाच्या अलीकडे बांधकाम सुरु असल्याचे दिसले.. चौकशी करता पुरातत्व खात्याने या किल्ल्याची डागडुजी आणि पुनर्बांधणीचे काम जोराने सुरु केल्याचे समजले.. असेच कार्य महाराजांच्या सह्याद्री रांगेतील किल्ल्यांवर केल्यास महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास अजून बोलता होईल.. असो कंधारला अर्धी प्रदक्षिणा मारून कंधार किल्ल्याच्या मुख्य द्वारासमोरील मशिदीजवळ येवून पोहोचलो..
लाजवंतीला सावलीत उभी करून कंधार किल्ल्याच्या खंदकावरील पूल चालत कंधारच्या पहिल्या दरवाजासमोर येवून थांबलो.. गडाच्या बऱ्याच बुरुजांची दुरुस्ती करून त्यांना मूळ स्वरूप देण्याचे काम पाहून बरे वाटले.. पहिल्या दरवाजाला बसवलेले आधुनिक दरवाजे लांघून किल्ल्यात प्रवेश केला.. इथून उजवीकडे दुतर्फा उत्तुंग तटबंदी च्या मधोमध असलेल्या सर्पिलाकार रस्त्याने जाताच किल्ल्याचा दुसरा दरवाजा दिसतो.. इथे डावीकडे तटबंदीच्या भिंतीमध्ये एक शिलालेख आहे बुऱ्हाण “निजामशाह ने बाराव्या इमामासाठी सगळे नवस फेडले” असा या शिलालेखाचा मतितार्थ आहे.. दरवाजाच्या दुबाजूस तटबंदीमधून डोकावणाऱ्या जंग्या आणि सैनिकांच्या दबा धरून बसण्याच्या जागा पाहून किल्ल्याच्या सुरक्षेची कल्पना येते.. दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस सिंहाचे शिल्प तटबंदी तून बाहेर डोकावताना दिसते.. तसेच दरवाजाची मखर तिहेरी बांधणीने उठावदार दिसते.. मखरीच्या वरच्या चौकटीवर एक शिल्पपट्टिका आहे.. दरवाजातून आत आलो आणि पुन्हा दरवाजाकडे पाहताना डावीकडे उंचावलेला बुरुज दिसतो उजवीकडचा बुरुज त्यामानाने कमी उंचीचा आहे.. दरवाजातून आत शिरताच समोर एक कचेरी आहे.. इथे निजामाची कचेरी होती असं म्हणतात.. या इमारतीच्या बाहेर एक उखळी तोफ आहे.. हि तोफ बांगडी तोफ या प्रकारातील तोफ आहे.. मछली दरवाजातून ‘L’ आकारात वळताच गडाचा तिसरा दरवाजा दिसू लागतो.. या दरवाजाच्या उजवीकडे आणखी एक फारसी भाषेतील शिलालेख आहे.. त्यात “जे देवावर विश्वास ठेवतात.. त्यांना मि एकच सांगतो की तुम्ही विजयाच्या अगदी जवळ आहात”.. असा सैनिकांचा उत्साह वाढविणारा शिलालेख आहे.. या परिसराला अंबरखाना असे म्हणतात आणि दुसरा दरवाजा म्हणजे मछली दरवाजा.. इथे एक धन बुरुज आहे.. त्यावरील शिलालेख हा बुरुज इब्राहिम आदिलशाह ने बांधल्याचे सांगतो.. गडाच्या तिसऱ्या दरवाजातून आत येताच.. समोर गडावरील राजवाड्याची भिंत दिसू लागते.. कंधार किल्ल्यावर बऱ्याच इमारती असून दारुगोळा कोठार.. राणीचा महाल.. राजा वाघ स्वार कबर.. हि काही प्रमुख इमारतींची नावे आहेत..
तिसऱ्या दरवाजातून आत येताच उजवीकडे मोहम्मदी मशिद आहे.. इथूनच किल्ल्याच्या झेंडा बुरुजावर जाता येथे.. डावीकडे एका चौथऱ्यावर उत्खननात सापडलेल्या जैन आणि बुद्ध मूर्ती ठ्वण्यात आल्या आहेत.. त्या पाहताना या मूर्तींची भव्यता, प्रसन्नता नजरेत भरते आणि गडभ्रमंतीला आणखी उत्साह येतो.. इकडे आम्ही किल्ल्याचे प्रमुख आकर्षण असलेली व्याघ्रमुखी तोफ व्याघ्रमुखी तोफ पाहण्यात निघालो तिकडे चंद्रकांत परकोट ३/४ प्रदक्षिणा मारून पुन्हा झेंडा बुरुजावर येवून पोहोचला.. मोहम्मदी मशिदीच्या उजव्या बाजूस असलेल्या जिन्यावरून झेंडा बुरुजावर प्रवेश केला आणि या बुरुजावर जाण्याचा प्रवेशमार्ग पाहताना हा किल्ल्याचा सगळ्यात मोठा बुरुज असल्याचे जाणवले.. व्याघ्रमुखी तोफ पाहताना हि एक विशाल तोफ असल्याचे दिसते.. मुखाच्या बाजूला वाघाची प्रतिमा तोफेकडे वरून पाहताना दिसते.. वाघाच्या मानेवर दुहेरी माळ कोरल्याचे दिसते.. तर भारताच्या भूमीवरून नामशेष होणारा वाघोबा असा तोफेच्या मुखातून जिवंत असल्याचे पाहून कंधार सफर सार्थ होते.. इथे तोफेच्या मुखाकडे आणि मागच्या बाजूस एक हात सोडून लोखंडी कड्या लावल्या आहेत.. कड्या अडकवण्याची जागा फुलांच्या नक्षीने सजवून टाकली आहे.. हि तोफ बांगडी तोफ या प्रकारातील तोफ आहे.. तोफेची लांबी साधारण १० फुट तर घेर अंदाजे २ फुटांचा आहे.. मराठवाड्यातील किल्ल्यावरील अजस्त्र तोफांच्या यादीत या तोफेचा क्रमांक वरचा राहील यात दुमत नाही.. इथे झेंडा बुरुजावर चढून पाहिल्यास जाताच गडाचा TOP VIEW आहे.. एका नजरेत समग्र गड दर्शन अशी सोय फक्त याच बुरुजावर आहे.. इथून अंबरखान्यातून सुरु हिणारी परकोट रचना.. मोहम्मदी मशिदीसमोरील पाण्याचे टाके.. मशिदीच्या अलीकडे चुन्याची घाणा दिसतो आणि मध्यभागी महादेवाची पिंड.. असे अजब दृष्य पाहायला मिळते.. गडावरील एक सो एक असे मोठ्या पाकळ्यांची झालर असलेले भलेदांडगे अष्टकोनी बुरुज.. खंदक.. बुरुजाच्या आतील बाजूस अष्टकोनी चौथरे.. बुरुजाची रचना मात्र इतर किल्ल्यांच्या पेक्षा वेगळी भासते.. तटबंदीवरून फेरफटका मारल्यास किल्ल्याचा काना न कोपरा धुंडाळता येईल.. किल्ल्याच्या मधल्या भागात असलेल्या आयताकृती राजवाडा अधून मधून डोकावणारे बुरुज आणि मोहम्मदी मशिदी चे दोन उंच मिनार असे एक भव्य दृश्य पाहून राजवाड्याकडे निघालो.. तिसऱ्या दरवाजातून आत येताच समोर राजवाड्याकडे जाण्याची वाट आहे.. एका कमानीतून आत येताच राजवाड्याचा भक्कम दरवाजा आणि उजव्या बाजूस व्याघ्रम (वाघाची प्रतिमा.. सिंघम तसा व्याघ्रम) कोरला आहे.. या दरवाजाच्या उजवीकडे पुष्करणी आहे.. आणि डावीकडे एक पाण्याचे टाके.. आत येताच उजवीकडे मोगालोत्तर काळातील एक सुफी संत ‘राजा बाघस्वार’ याची कबर आहे.. या पीर वाघावर स्वार होत असे अशी आख्यायिका आहे.. राजवाड्यात प्रवेश केला आणि भिंतीवर कोरलेले बरेच कोनाडे दिसले.. समोर दिसणाऱ्या दरवाजाच्या डावीकडे दारुकोठार आहे.. दारुकोठारात तोफगोळ्यांची रास मांडून ठेवली आहे.. आणि कोठारातील गारवा अतिशय सुखावह असा आहे.. या गारव्याने भरलेल्या दारूकोठाराची सफर करून कंधारचा निरोप घेतला.. आणि नांदेड कडे निघालो.. आजच्या दिवसाचे तिसरे लक्ष्य किल्ले गोदावरी नदीकाठचा नांदेडचा नगरदुर्ग आमची वाट पहात होता..
गोदाकाठचा लहानगा नगरदुर्ग – नांदेडचा किल्ला
वाटाड्या मार्ग : कंधार किल्ला – कंधार – लोहा – होत्तलवाडी – सोनखेड – विष्णुपुरी – नांदेड : ४४ कि.मी.
कंधार नगरीची जादुई सफर करून नांदेडकडे जाताना लोहा गाव लागते.. इथे चौकातून उजवीकडच्या रस्त्याने जायचे आणि तिथून नांदेड कडे प्रस्थान.. इकडे आलो आणि अन्नाच्या पोटातील भुकेला जीन जागा झाला.. अन्नाला आजही भिर भिर फिरवला होता.. सकाळी उदगीरचा नाश्ता सोडला तर दिवसभराच्या जेवणाला फुली मारली होती त्यामुळे जीनचं लटकेच रागावणे साहजिकच होतं.. अन्नाच्या जीनला नैवेद्य म्हणून एके ठिकाणी भेळ घेतली पण जीन म्हणाला, मी सटरफटर खात नाही.. नको मला.. म्हटलं जाऊ दे जीनचं बघू नंतर आता भेळीवर ताव मारावा.. नांदेड कडे जाणारा रस्ता मात्र एकदम टवटवीत होता.. लोहा गावाकडून नांदेड शहराकडे जाताना असलेल्या नदी पुलावर पोहोचलो आणि इथे डावीकडे असणाऱ्या सिमेंट रोडने जाताच आपण एका महादेवाच्या मंदिरापाशी पोहोचतो.. इथे एक वडाचे मोठे झाड आहे.. गाडी तिथेच उभी करून धावत किल्ल्याकडे निघालो.. सूर्य जणू क्षितिजापाशी येवून आमचा निरोप घेण्यासाठी काही क्षण थांबला होता.. मंदिरापासून पुढे जाताच डावीकडे गल्लीबोळातून जाताच आपण एका मोठ्या बुरूजापाशी येवून पोचतो.. इथे उजवीकडे तटबंदीला समांतर नांदेडच्या भुईकोट किल्ल्यावर जाणारी वाट आहे.. वीस–तीस पावले पुढे जाताच एक जोड–बुरुज आणि शेजारी किल्ल्यावर जाणारा सिमेंट रस्ता दिसतो.. सध्या किल्ल्यावर पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे.. आत आलो आणी किल्ल्याचं किल्लेपण अगदी हरवून गेल्यासारखं जाणवलं.. आजूबाजूला पडलेला मानवी वसतीचा विळखा आणि आत प्रकल्प त्यामुळे किल्ला हा केवळ नावापुरता उरला आहे.. जो काही किल्ला आहे तो नदीकडच्या बाजूने.. इथे काही इमारतींचे अवशेष आणि पाण्याच्या टाकीला वळसा मारून नदीला समांतर उजवीकडे चालत गेल्यास एका चिंचेच्या झाडाखाली एक तोफ खाली गवतात दडलेली दिसते.. या झाडाच्या मागे एक मोठा बुरुज आहे.. ह्याच किल्ल्याच्या किल्लेपण दाखवणाऱ्या इतिहासाच्या काही पाउलखुणा.. नांदेड किल्ल्याचा फेरफटका मारून पाण्याच्या टाकीवर पोचलो आणि इथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गडाच्या इतिहासाचे अंतरंग उलगडायला सुरुवात केली.. “काका किल्ला किती जुना आहे”.. ते काय माहिती नाही पण निजामाच्या/इंग्रजांच्या काळापासून इथे पाण्याची व्यवस्था होती.. गडावर इथे नवीन जे करंजे बांधले तिथे पाण्याचे टाके होते.. ‘पुष्करणी’ हा तेच काय ते.. ते पडून आता.. सिमेंटचे करंजे बांधले आहे.. पाण्याच्या टाकीजवळ एक पिराची कबर आहे.. मागे एका इंजिनिअर ने इथे कबरीला छप्पर घालण्याचा प्रयत्न केला पण इंजिनिअरलाच अपघात झाला.. तेंव्हापासून इथे कुणी काही करत नाही आणि कबर आहे तशीच आहे..
तर अशी हि गडाची लहानशी कथा ऐकून अंधारल्या वाटेची नांदेड गडभ्रमंती पूर्ण करून सचखंड गुरुद्वारा कडे रवाना झालो.. गुरु गोविंदसिंह यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या नांदेड नगरातील गुरुद्वारा पाहण्यास दूर–दुरून शिख बांधव येतात तेंव्हा इथे एक भेट द्यायचे ठरले.. शहरातील ठिकठिकाणी लागलेले दिशादर्शक बोर्ड आपल्याला थेट सचखंड गुरुद्वारापाशी घेवून येतात.. इथे संगमरवरी इमारतीत बांधलेले हे मंदिर फार सुंदर आहे.. बाहेर एक खांब आहे आणि आत गुरुगोविंदसिंह यांची समाधी आहे.. इथे शांत भक्ती भावात रंगलेल्या भजनाची साथसंगतीने इथलं वातावरण भक्तिमय होवून जातं.. इथे काही काल विसावून दिवसातले पहिले पोटभर जेवण करण्यास एका फेमस पंजाबी हॉटेल कडे निघालो जेवणावर ताव मारून अकोल्याकडे निघालो.. मराठवाडा भटकंती दोन दिवसांसाठी थांबवून विदर्भाला भोज्जा करून पुन्हा औरंगाबाद मधील किल्ल्यांनी मोहिमेची सांगता करण्याचे सर्वानुमते ठरले.. अकोल्यातील बाळापुर–अकोला–नरनाळा हे दुर्गत्रिकुट पाहून औरंगाबाद कडे मोर्चा वळवायचे नक्की झाले..
मेळघाटातील अनवट दुर्गरत्न नरनाळा किल्ल्याची भ्रमंती आता खुणावू लागली होती.. परभणी आणि जालना जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट पुन्हा केव्हा तरी द्यावी असे ठरवून हिंगोली–वाशिम मार्गे अकोल्याकडे निघालो.. नांदेड सोडलं आणि जेमतेम १० किमी गेलो असू.. आणि एक खडबडीत प्रवासाला सुरुवात झाली.. रस्त्यावरच्या या कृष्णविवरांनी अगदी ऊत आणला होता.. भारत स्वतंत्र झाला आणि इकडे कुणी फिरकलेच नाही इतका हिडीस रस्ता.. सरकारी निष्क्रियतेचा धडधाकट पुरावा.. प्रत्येक खड्डा वेगळ्या मापाचा.. वाहनचालकांना नवे आव्हान देणारा.. कैक कारवाले आले आणि या खड्ड्यांना डायरेक्ट शरण आले.. कहर खड्डे.. त्यात रात्रीचा प्रवास.. ट्रक तर अगदी अनेक कोनातून वाकत होते.. आता पलटी घेतो मग.. इकडे दिनूभाऊ नी स्लो बट स्टेडी असा पवित्रा घेतल्याने.. निवांत गप्पा सुरु झाल्या.. अरे तुला माहिती आहे का.. नांदेड ते अकोला रस्ता हा वाह्या चंद्र असा जातो.. अरे आपण इथे गोल्फ काढूया का.. हिंगोली येथे भव्य ३० किमी चा मेगा गोल्फ कोर्स.. आता मला कळलं.. कि या रस्त्यावर ‘सरकारमान्य अधिकृत वाटमारी केंद्र’ म्हणजेच टोलनाका का नाहीये ते.. मग कुणाला तरी इथे अभिनव कल्पना सुचली.. कि इथल्या ऑटोमोबाईल इंजिनिअरींग कॉलेजातल्या पोरांना तिथले मास्तर इकडेच घेवून येत असतील.. मुलांनो हा पहा शॉक अब्सोर्बर.. ते पहा त्या खड्ड्यात पडले त्याला स्टीअरिंग असं म्हणतात.. ते पहा ते रस्त्याच्या कडेला जे बाकड्यासारखे दिसतंय त्याला ट्रकचं सीट म्हणतात बरं.. आणि हे उसाच्या गुऱ्हाळाला जे जोडलय ना ते फियाट चं ४ हॉर्स पॉवर चे इंजिन जबरदस्त इजीन आहे बरं का..! या रस्त्यातले पाच–सहा घड्डे तर असे होते कि त्यासाठी आम्हाला हा खड्डा पार करण्यासाठी एक कोपरा सभा घेवून तो पार करण्याची निती ठरवावी लागली आणि मग तो खड्डा लाजवंतीला धक्का न लावू देता पार झाला.. आणि दिनुभाऊ चा हा खड्डा पार केल्याबद्दल भारताच्या चांद्रयान मोहिमेचे नेतृत्व देण्याचा ठराव मंडळाने एकमुखाने मान्य करण्यात आला.. इकडे आम्ही हे खड्डे दिव्य नवनव्या निती ठरवून पार करत होतो आणि तिकडे कोकरू मात्र ढाराढूर झोपलं होतं.. खड्ड्यांची तमा न बाळगता.. बिनघोर.. निवांत.. मराठवाडा हा का मागे राहिला याचा साक्षात्कार देणारा हा रस्ता.. म्हणजे रोड टू मून.. विदाउट तिकीट फुल्ल टाईमपास.. खड्ड्यातून हरवलेला रस्ता शोधत वाशिम गाठलं आणि एक चहाब्रेक घेवून पुढे वाशिमकडे निघालो.. असा हा इवलासा ३० किमी चा रस्ता पार करण्यास तब्बल तिन तास लागले यावरून डेडली रोड म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभूतीतून समजलं.. दिनुभाऊ तर पुरता वैतागून गेला होता.. रात्रीचे ३ वाजले हे पाहून.. कुठेतरी मंदिर दिसतं का ते पाहू लागलो.. इथे एका शेताडात एक दत्त मंदिर होतं.. तिथे मुक्काम करावं म्हटलं तर शेजारी असलेल्या घरातून काका बाहेर आले आणि म्हणाले हे प्रायव्हेट मंदिर आहे.. मग दिन्याला म्हटलं अरे पंपावर झोपू हाय काय नाही काय.. आणि एका पेट्रोल पंपावर चारच्या दरम्यान गाडी थांबविण्यात आली.. १० रुपयात ४ लोकांची सोय लावून ताणून दिली.. थोडा वेळ आराम करून ७ ला वाशिमकडे कूच केली.. अर्ध्या तासात वाशीम गाठलं.. मग पुढे पातूरच्या अलीकडे एक सागवानी झाडाचं जंगल सुरु झालं आणि इथे एक ओढा पाहून.. अभ्यंगस्नानाची आयती संधी चालून आल्याने ती दवडून कसे चालणार होतं.. लगोलग ओढ्यावर निघालो.. अर्ध्या पाऊण तासांनी सामुहिक अभ्यंगस्नान आणि ओढ्यातील ‘खेकडा चावा’ कार्यक्रम उरकताच पुन्हा भटकंतीकडे वळालो.. इथून पुढे जाताच एका वळणावर ढाबे पाहून नाश्ता करण्यासाठी एक ब्रेक घेण्यात आला.. इथे पराठा.. ऑमलेट आणि हौद भरून चहा पिऊन पातुर तिठा गाठला.. आता इथून डावीकडे बाळापुर आणि उजवीकडे अकोला शहराचा रस्ता.. डावीकडे बाळापुर किल्ल्याकडे निघालो..
वाटाड्या मार्ग : नांदेड शहर – बसमत – डिग्रस – हिंगोली – कन्हारगाव – वाशीम – मालेगाव जहांगीर – मेडशी – पातुर – बाळापुर – अकोला – असदगड : २४३ कि.मी.
क्रमशः