मिर्झा राजे जयसिंग छत्री, बाळापुर किल्ला, अकोल्याचा ‘असदगड’ किल्ला..
अकोला जिल्ह्यातील पूर्व–पश्चिम वाहणारी पूर्णा नदी हि मुख्य जीवनदायिनी, पुढे या नदीला विद्रुपा, काटेपुर्णा, मोर्णा या नद्या येवून मिळतात. अकोला जिल्ह्यात सातपुडा रांगेतील डोंगराळ भाग, अजंठा रांगेतील तसेच गाविलगड डोंगराळ प्रदेशातील काही भाग येतो. अकोला जिल्ह्याच्या सीमेवर मेळघाट अभयारण्य सुरु होते, तसेच काटेपुर्णा अभयारण्य देखिल साग, ऐन, खैर, अंजन अशा वृक्षराजींनी नटलेले आहे. मराठवाड्याच्या मानाने तसा विदर्भ नैसर्गिक दृष्ट्या उजवा असा आहे. अकोला जिल्ह्यात अकोला, बाळापुर आणि नरनाळा असे तीन किल्ले आहेत यातील अकोला किल्ला उर्फ असदगड हा नगरदुर्ग आहे..
बाळापुरचा किल्ला
मन आणि म्हैस नदीच्या संगमावर उभा ठाकलेला बाळापुरचा किल्ला नक्षीदार दरवाजा मुळे प्रसिद्ध आहे. या बाळापुर किल्ल्यापासून धरणाच्या अलिकडे एक नक्षीदार शिल्पकलेने उभारलेली २२ खांबांची छत्री आहे, ती मिर्झा राजे जयसिंग याने बांधल्याचे इतिहासकार सांगतात. मन आणि म्हैस (नद्या) आणि या दोघांच्या कात्रीत सापडलेला बाळापुरचा किल्ला पाहून अकोल्यातील नगरदुर्ग पाहण्यास निघालो.
अकोल्याचा ‘असदगड’ किल्ला :
औरंगजेबाने त्याचा दिवाण असदखां याला अकोला हे गाव इनाम म्हणून दिले त्याने १६९७ मध्ये इथे असदखानाने अकोला गावाच्या चौबाजूंनी कोट चढविला तो म्हणजे अकोल्याचा असदगड किल्ला. किल्ल्याला एकूण चार दरवाजे असून दहीहंडा वेस, बाळापुर वेस, अगरवेस, गजवेस या नावाने प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे काही उंच आणि भक्कम बुरुज बांधले त्यांना असद बुरुज, पंच बुरुज अगरवेस बुरुज असे म्हणतात. यातील पंचकोनी महाकाय असद बुरुज हा उंचीने आणि आकाराने थोरला आहे. सध्या उरलासुरला किल्ला आणि इतिहासाचे अवशेष याच भागात पाहता येतात. उर्वरित किल्ला पहायचा असल्यास दुर्गंधी आणि गल्लीबोळातून वाट काढून पाहावा लागतो. किल्ल्याजवळून वाहणाऱ्या लहानग्या नदीचा मात्र सध्या शहरात नाला झाला आहे.
अकोल्याहून साधारण ४८ कि.मी. वर अकोट शहर आणि तिथून शहराच्या मध्यातून डावीकडे जाणारा नरनाळा अभयारण्याचा रस्ता आहे. अकोट सोडलं तशी हि मेळघाटची डोंगररांग दिसू लागली आणि एका रोमांचक भटकंतीला सुरुवात झाली. अकोट–पोपटखेड–शहानुर मार्गे (२३ कि.मी.) भटखेडा गावी पोहोचलो आणि इथे चौकात डावीकडचा रस्ता नरनाळा अभयारण्याकडे जातो.. तिकडे निघालो.. शहरी धकाधकीपासून असा दूरच्या वाटांचा प्रवास सुरु झाला. समोर हिरव्याशार डोंगरांचे पदर, त्यांना लगडलेले ढगांचे पुंजके आणि पाठीची हाडं खिळखिळी करून टाकणारा रस्ता.. अर्ध्या पाउण तासात नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो तोवर साडेचार वाजले होते. संध्याकाळच्या आत किल्ला पहावं म्हटलं तर किल्ला पाहण्याची वेळ दुपारी ३ ला संपते असे इथल्या सुरक्षारक्षकाने सांगितले.. मग ‘इथेच टाका तंबू’ असे म्हणून नरनाळा वन्य जीव अभयारण्यातील वनखात्याने सुरु केलेल्या पर्यटक निवासात मुक्काम केला. इथे तीन माणसांसाठी टेंट – ७०० रु आणि बंकर बेड ६० रु प्रतिमाणशी दिल्यास मुक्कामाची जंक्शन सोय होते. सहकुटुंब अगदी निवांत रहावे अशी हि सुंदर जागा आहे पण त्यासाठी शहरी नखरे चार दिवस बाजूला टाकण्याची मनापासून तयारी हवी. शहरी अंगवळणाची कात टाकून इथे आल्यास एका मुक्त आणि दुर्गम निसर्गाविष्काराची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही.
सुंदर
LikeLike