दिवस ७ वा – मेळघाट अभयारण्य आणि नरनाळा

मेळघाटातील दुर्गत्रिकुट किल्ले नरनाळा’ – ‘तेलियागड’ (राजगड) – ‘जाफरागड’,

मूळ नरनाळा किल्ला आठव्या शतकात हस्तिनापुर येथील पांडवकुळातील राजा नरेंद्रपुरी याने बांधला, त्यानंतर दहाव्या शतकात राजा नरनाळा स्वामी या राजाचे इथे शासन होते. नरनाळा स्वामी हा राजा वैराटआणि राजा इलयांच्या काळातील समकालीन राजा होता. इ स १४३५ मध्ये बहामनी राजा अहमदशाह याने नरनाळा जिंकला आणि गाविलगड आणि नरनाळा या दोन किल्ल्यांची डागडुजी केली. पुढे बहामनी १४९० मध्ये फतेउल्लाह इमाद उल मुल्क याकडे या किल्ल्याची जहागिरी आली आणि तद्नंतर बहामनी राज्याची शकले होताच इथे इमाद उल्क मुल्कचा इमादशाह झाला. मुघलशाही, कुतुबशाही, निजामशाही. आदिलशाही, बेरदशाही तशी हि इमादशाही. मुर्तझा निजामशाहीचे आक्रमण होण्यापूर्वी इमादशाहीने नरनाळा आणि गाविलगडावर सुमारे शतकभर राज्य केले.. पुढे मुघलशाहीने इथे सत्ता प्रस्थापित केली, नंतर पेशवाईच्या सुरुवातीच्या काळात मराठ्यांनी इथे भगवा फडकाविला आणि नागपूरच्या परसोजी राजे भोसले यांना इथली सुभेदारी मिळाली.. असा ह्या गडाचा संक्षिप्त इतिहास.. किल्ल्यावरील नौगज तोफेवर असलेला १००० वर्षापूर्वीचा फारसी शिलालेख तसेच महाकाली दरवाजावरील अज्ञात भाषेतील विशाल शिलालेख ह्या इथल्या इतिहासाची काही ठळक पाऊलखुणा..
नरनाळा किल्ला हा समुद्रसपाटीपासून ३१६० फुट उंचीवर असून जवळपास ३६० एकरात हा किल्ला पसरला आहे. किल्ल्याचा दोन टोकांमधील अंतर हे ३.५ कि.मि. इतके लांब आहे. नरनाळा किल्ल्यावर लहानमोठे असे मिळून एकूण ३०० हून अधिक बुरुज आहेत आणि किल्ल्याला ६ बुलंद दरवाजे आहेत तसेच २०२२ लहान दरवाजे आहेत. सध्या किल्ल्यावर थेट गाडी जाते पण रस्ता खराब असल्याने ती अलीकडे उभी करून चालत जावे लागते..
फॉरीस्टाच्या ऑफिसात रीतसर परवानगी मागून.. ऑफीशियल गाईड ठरवून निघालो.. पवार साहेब म्हणाले कि गाडी घेवून जा वर बुरुजापर्यंत म्हणजे जास्तित जास्त गड बघता येईल.. आमचे पवार साहेब.. मेळघाटातल्या सागासारखे टणक, वाणीने मेळघाटातील मधासारखे मधाळ आणि आपल्या धडाकेबाज कर्तुत्वाचा दरवळ चंदनासारखा दूरवर पसरवणारे आमचे मेळघाटातील पवार साहेब.. पवार साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून लाजवंती ने मेळघाट मध्ये निघालो.. अरण्यात जेमतेम १०० मिटर पुढे गेलो असू आणि मोरांच्या जोडीने दर्शन दिले.. कॅमेरा बाहेर काढे पर्यंत डावीकडच्या डोंगरातून पसार झाले.. जंगलझाडीतून पुढे जाताच मोटोक्रॉस रस्ता सुरु झाला आणि लाजवंतीचं ऑफ रोड ट्रेनिंगही.. अन्ना माशाळकर रस्त्यावर उतरून दिनुभाऊना ऑफरोडींग चे ट्रेनिंग देऊ लागला.. अरे डावीकडे दाब..!! अरे येवू दे सरळ..!! अरे फुल्ल मार फुल्ल..!! हे असं चाललं होतं.. इथे अन्ना अचानक डायरेक्टर आणि दिनुभाऊ नायकाच्या भूमिकेत शिरला होता.. 

ऑफरोडींग थरार पोलो मधून अनुभवत एके ठिकाणी आता जीप शिवाय पर्याय नाही..!!” असा खंगरी रस्ता सुरु झाला.. तशी गाडी उभी करून गाडीरस्ता सोडून पायवाटेने गडावर निघालो.. २० एक मिनिटांच्या खड्या चढण पार केल्यावर गडाचा पहिला दरवाजा आणि उजव्या बाजूची उत्तुंग तटबंदी दृष्टीक्षेपात आली.. तसा पावलांचा वेग वाढला आणि वाघ दरवाजात येवून पोहोचलो.. गड सर केल्याची पहिली पावती इथे मिळाली एवढा हा दरवाजा सुंदर होता.. दरवाजाच्या बाह्य कमानीच्या दुबाजूस व्याघ्र प्रतिमा कोरल्या असून, मुघल स्थापत्यशैलीची नक्षीदार छाप या दरवाजावर पडली आहे.. आत दोन्ही बाजूस ३३ देवड्या,.. त्यात कोनाडे आणि उजवीकडे २ एक  फुटी चिंचोळ्या भुयारी पायऱ्यांचा रस्ता एका मंदिरात घेवून जातो.. पण भुयारी मार्गात दगड ढासळल्याने इथे जाण्याचा अन्नाचा प्रयत्न फसला आणि मग दरवाजाच्या आतील बाजूस उजव्या अंगाने वर जाणाऱ्या पायऱ्यांनी दरवाजाच्या माथ्यावरील तटबंदीवर आलो.. इथून चंदनखोऱ्याचे भव्य दिव्य असे पहिले दर्शन घडते.. ह्याच साठी केला होता काल कृष्णविवरांचा प्रवास..!! पण ह्या नजाऱ्याने डोळ्यांचे पारणे फिटले.. छातीइतक्या गवतातून पुढची पायवाट जात होती तिकडे निघालो.. मेळघाट चा किल्ला पाहण्यासाठी गाईड सक्तीचा असल्याने अनायसे स्थानिक भाषेतून गडाचा इतिहास बोलका होणार होता.. गाईड श्री. हिरासिंग जव्हारकरविशीतले तरुण तडफदार पोरगं त्याच्या अनुभवातून नरनाळा किल्ल्याचे दर्शन घडवू लागलं.. 

माह्ये नाव हिरासिंग हे.. हिरासिंग जव्हारकर.. माह्ये गाव हे शहानुर.. भटखेड्यातून ५ किलोमीटर.. शक्कर तलावाची बाबतीत मी तुम्हाले सांगतो.. की शक्कर तलावाचे ते पानी आह्ये ते पानीमध्ये लई शक्ति हे.. ते शक्ती मा राजाचा.. नळ राजा ते अन त्याचे राणी हे.. अंबा राणी.. ते राणीचं नाव हे अंबा.. ते राणीचा ते जेवरातगेवरात ते हाये.. ते तलावामध्ये टाकून देलं.. ते अंग्रेज हे ना.. ते राणीवं (राज्यावर) हमला केला होता पण राणीनं ते जेवरातगेवरात शक्कर तालाबमध्ये फेकला.. आणि ते पाणीचे शक्ति हटत नाई.. म्हणजे तिथे जो कुत्तर देव आह्ये.. ते लोकं येतेत त्याचे दर्शन करते.. दर्शन गिर्षण आणि पाणीचा (महिमा) इतका आह्ये कि ते आंघोळ केलात कि ते ठीक होतं.. कुत्रं चावला की.. तर ते पानीची शक्ति तेवढं हाये.. ते शक्कर तालाव..

अधून मधून हिरासिंग ची मुलाखत सुरूच होती.. गडावर आणखी पाहण्यासारखं काय काय आहे?

ते महाकाली दरवाजा ()हे.. वाघ दरवाजा ()हे.. अं अं अं.. बारुदखाना ()हे.. अं अं अं.. हमाम ()हे म्हणजे राणीचं होतं ते.. चंद्रकांत : साबण आहे ते.. अं अं अं.. साबणाचं नही.. राणीचं साबण म्हणजे चंदनचं  साबण होते त्याचं.. आन तिकडे (उजव्या बाजुला) जाफरबाद आह्ये.. जाफरबाद किल्ला.. आणि इकडे (डावीकडे) पॉइंट तेलियागड.. म्हनजे राजगड किल्ला.. आन आकोट दरवाजा.. अन तीन तोफ आह्येत.. एक नौगजी तोफ.. दोन एक बांगडी तोफ.. पण खाली लहान.. आणखी एक गुल्लर घाट पॉइंट.. आणि तिकडे एक चेतलीबाबाचा टेकडी ()हे.. आणि समोर तिथे मंदिर आहे म्हनजे  गुफासारखा ()हे.. शिवमंदिर.. धारगड तेचं नाव..

थोडसं जाफराबाद आणि तेलियागड किल्ल्याविषयी सांगा?
ते जाफरबाद किल्ला तिकडे ते म्हनजे.. तिकडे जनवरचा लई खतरा ()हे.. म्हणून तिकडे नो एन्ट्री केला ये.. जनावर तिकडे वाघ ()हे.. वाघाचे पन.. जास्त तून नाही.. पण अस्वल आये.. बिबट ()हे.. पण अस्वलची लही भिंती (भिती) आहे.. अंगावरंच येतं ते.. ते जरा तिकडे दाट जंगल ()ह्ये.. म्हणून तिकडे नो एन्ट्री केला ये.. तुमाले दाखवायची काय हरकत नव्हती.. चौकीदार ची परमिशन घेवून आपन गेलो असतो जाफराबाद पॉइंटले..!! ‘जाफराबाद किल्ल्यावर काय काय आहे?’ तेच्यावर.. अं.. म्हणजे.. मंदिर आह्ये.. ते आपला बजरंगबलीचं मंदिर ()ह्ये..आन तालाब आह्ये ती चार आहे.. शक्कर तलावसारखे  चार आहेत ती.. आणि बुरुज ()ह्ये.. ते सहा हाये.. तोफ नाही तथी.. पण लई खतरा आह्ये तिकडं..

आता तेलियागड या उपकिल्ल्याबद्दल आम्हाला सांगा?
त्या ती एक.. आणि कुठलं एक पीरबाबा हाय.. आं तेलियागड वर.. नाही जाफराबाद मध्ये.. आणि एक होतं ते आपला दुर्गामा(ता) चे ते थोडी मूर्ती होते.. ते दुर्गामाता चे मूर्ती तोडले आता ते.. अर्धेच होते ते.. हां.. दगडातली मूर्ती.. आज फक्त त्याचा मंदिर होते तिकडे.. बस एवढं पाह्येल हे मी जाफराबाद.. पूर्ण हिंडेल नाही मी.. 

तेलियागड मधे पायऱ्या ()ह्ये.. बावन पायरी आहे तथी (तिथे).. आन.. बावन पायरीत मधी.. ते बावन पायरी खाली जाते.. ते पायरीतून खाली जाते अन उतरते आता.. ते आपला चेतलीबाबाचा दर्गाचा दिसतो आपल्याला.. ते पायऱ्यातून.. आणि समोर आपन जातो ते शिवबाबाचा गुफा आपल्याले दिसतो (धारगड).. आणि तेलियागडले दरवाजा ()ह्ये.. मोठा दरवाजा.. कमळचं फुल आह्ये..  दोन्ही बाजूला.. कमळ फुल.. पण दोन अलग अलग प्रकारचं ()ह्ये.. जसं शाधू दर्ग्यात कसे कमळचे फुल आह्ये.. ती तसंच म्हणजे त्या प्रकारे आह्येत.. आन.. घोड्याचे तथी (तिथे) चित्र दिलाय.. आं.. डावीकडं.. ‘सजवलेला घोडा आहे कि साधा आहे..?’.. ते तथी गोठ्यात च बांधेल हाय.. साधा ()ह्ये.. आपण वाघचं पाहिलं नाही.. ते चित्र दिलाय त्याच्यावर.. बस एवढं पाह्यलं.. ते मुसलमानांनी नाव दिलं तेलियागड.. आमी लोग त्याले राजगड म्हनतो..
आमची नरनाळा भटकंतीची सुरुवात झाली ती साधारण अशी.. वाघ दरवाजातून पुढे जाताच तीव्र चढाई सुरु झाली आणि ३०४० पावलांवर गडाची दुसरी तटबंदी दिसू लागली.. इथला बुरुज मात्र अतिविशाल गटात  मोडणारा असा धिप्पाड बुरुज आहे.. हिरासिंग ला विचारलं बाबा काय आये इकडे.. महाकाली दरवाजा.. बुरुजाला वळसा मारून उजवीकडच्या पायऱ्या चढून गेलो आणि आत एक देखण्या शिल्पकलेचे पैलू अंगाखांद्यावर मिरवणारा दांडगा दरवाजा नजरेस पडला.. आजवर पाहिलेल्या गडकोट दरवाजामध्ये महाकाली दरवाजा अग्रस्थानी असेल यात शंका नाही.. म्हणजे बघा.. दरवाजाची आखीवरेखीव कमान.. ठिकठिकाणी असलेल्या शिल्पपट्टिका.. राजबिंडे नक्षीदार खांब.. दुबाजूस कोरीव रथाच्या मखरीसारखे सज्जे.. आणि कमानीवरचे दोन शिलालेख.. यातील भाषा मात्र फारसी नाही हे नक्की.. ती कोणती भाषा आहे हे फारसे ज्ञात नाही.. पण कॅलीग्राफीचा सुंदर नमुना म्हणजे हा शिलालेख.. फक्त इथे अक्षरे कातळावर कोरली आहेत हाच काय तो फरक.. कातळकोरीव कॅलीग्राफी.. महाकाली दरवाजातून आत आलो आणि डावीकडे निघालो.. गडाचे अंतरंग पाहायला.. गडावर पाहण्याचे अवशेष म्हणजे अंबरमहाल / राणीचा महल.. गडावरील एकूण २२ तलावातील सगळ्यात मोठा तलाव म्हणजेच शक्कर तलाव’.. हत्तीमहाल, अश्वशाळा.. मागील बाजूस असलेल्या विस्तीर्ण तटावरून दिसणारा चंदन खोऱ्याचा मेगा नजारा आणि शक्कर तलावाशेजारी असलेली बाबाजी उर्फ कुत्तर देवकि कबर.. याशिवाय बारूद (दारूगोळा) कारखानाकोठार आणि गडाचे मुख्य आकर्षण अशा ३ बलाढ्य तोफा.. नरनाळा किल्ल्याला तेलियागड आणि जाफरागड हे उपकिल्ले आहेत.. तर हि जादुई सफर करण्यास निघालो.. डावीकडच्या चढणीच्या वाटेने.. वाटेत एके ठिकाणी तेलियागडाची नरनाळा किल्ल्यापासून जरा अलिप्त झालेली माची दिसते.. तेलियागडची माची पाहताना मात्र लोहगडाचा विंचूकाटा आठवल्यावाचून राहत नाही.. तेलीयागडाचे दुरून दर्शन घेवून पुढे निघालो राणीचा महाल दिसला इथे समोरच मोठा तलाव आहे त्याला शक्कर तलाव म्हणतात.. तसेच उजवीकडे तेलतुपाची विहीर आहे.. या विहिरीत प्रतिध्वनीचा मनमोहक आवाज ऐकू येतो.. महालाच्या डावीकडे हत्ती बांधण्याची जागा आहे.. तलावाला प्रदक्षिणा मारून आपण गुल्लर घाट पॉइंट पाशी येतो आणि इथे दूरवर पसरलेली गर्द वनराई, डोंगरांचे पदर आणि मध्यभागी एका टेकडावर चेतलीबाबा ची समाधी.. आणि मागे धारगड असा मेगा नजारा आहे.. या गुल्लर घाट पॉइंट च्या अलीकडे फॉरेस्टचे चेक पोस्ट आहे.. याला वळसा घालून निघालं कि आपण नौगज तोफेकडे जातो.. एखाद किलोमीटरची रपेट मारून एका कड्यापाशी हि नौगज तोफ आहे.. नऊ गज लांबीची हि तोफ म्हणजे नौगजी तोफ.. एकदम धिप्पाड.. कधीकाळी शत्रूवर तिन्ही त्रिकाळ लक्ष ठेवणारी.. नौगज तोफ.. या तोफेच्या शेजारून एक वाट जाफारागडकडे जाते.. जिथे अस्वलांचा मुक्त संचार आहे..
तोफेच्या मुखाकडे पहात उभे राहिल्यास.. डावीकडची वाट नरनाळा किल्ल्याच्या काठाकाठाने वळसे  मारीत पुन्हा शक्कर तलावाकडे जाते.. इथे जाताना बारूद कारखाना.. हमाम आणि जुन्या काळातील पावसाचे पाणी तलावात सोडण्यासाठी केलेल्या मोऱ्या पाहायला मिळतात.. बारूद कारखाना अजून सुस्थितीत असून गचपण वाढल्याने.. आत जाणे जरा अवघड आहे.. हमाम देखिल तीनमजली भिंतीने झाकून टाकला आहे.. दारूकोठारासमोर एक फोरेस्टचा वॉच पॉइंट आहे इथून नरनाळा किल्ल्याची सोंड दिसते मध्ये दरीतली दाट झाडी.. या डोंगरसोंडेवरच पलीकडच्या बाजून वाघ दरवाजा आहे.. अलीकडे नीट पाहिल्यास.. आणखी काही दरवाजे आणि बुरुज पाहायला मिळतात.. इथे पुढे तलावाकाठी एक कमान उन्हं खात उभी असल्याचे दिसते.. या कमानीतून शक्कर तलाव पाहताना त्यात पडलेल्या ढगांच्या प्रतिबिंबाने तर कमळ केली होती.. त्या एकांड्या कमानीच्या सावलीत चार क्षण रेंगाळून.. नरनाळा भटकंती पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले.. आणि पुन्हा खाली निघालो.. चंदनखोऱ्यातील महादुर्गाची (म्हणजे नरनाळा किल्ल्याची) गोंडस आणि विशाल निसर्गाची उदात्त क्षणचित्रे मनात कायमची साठवून.. पुन्हा दुर्गरांगड्या मराठवाड्याकडे.. अजंठा रांगेतील काही दुर्गांची ओळख करून घ्यायला..!!

वाटाड्या मार्ग : अकोट – शेगाव – खामगाव – नांदुरा – मलकापूर – शेलवाड – जामनेर – महाराष्ट्र राज्य महामार्ग ८ – सोयगाव 

क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s