दिवस ८ वा – संभाजीनगर जिल्ह्यातील भटकंती – १

फर्दापूर सराई, अजिंठा सराई, अजिंठ्याचा भुईकोट, वाडीचा किल्ला, जंजाळे किल्ला..

नरनाळा किल्ले भ्रमंती नंतर थेट संभाजीनगर गाठण्याचे ठरले होते.. मराठवाडा भटकंतीमधील हा शेवटचा टप्पा.. जमेल तेवढे किल्ले पाहून हि भटकंती सार्थ करण्याचे एकमुखी मान्य करण्यात आले.. लाजवंती आता न लाजता धावत होती.. या किल्ल्यांच्या ओढीने.. फॉर्म्युला १ चालक मालक संघटनेचे अध्यक्ष दिनेश राव अविरत गाडी हाकत होते.. अकोट जवळ जोरदार जेवण उरकून संभाजीनगर कडे कूच केली..अकोटशेगावखामगावनांदुरामलकापूरशेलवाडजामनेर मार्गे महाराष्ट्र राज्य महामार्ग ८ गाठला आणि सोयगाव च्या अलीकडे एक पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकला.. पहाटे लवकर उठून जळगाव रस्त्याने सोयगाव पर्यंत येवून पोहोचलो.. सोयगाव हे संभाजीनगरच्या पूर्वेकडील दुर्ग भ्रमंतीसाठीचे मध्यवर्ती गाव आहे इथून अजिंठा सराई, फर्दापूर सराई, अजिंठ्याच्या वाघुर नदी काठचा भुईकोट आणि वेताळवाडी जंजाळा (वैशागड) असे किल्ले पाहता येतात..    

फर्दापूर सरायजळगाव अजिंठा रोड वर सोयगाव फाटा पार करताच ३४ कि.मी. अंतरावर फर्दापूर गावचा उजवीकडे फाटा आहे.. समोर अजिंठ्याचा डोंगर आणि घाट आहे.. या गावात एक गढी म्हणजेच सराय आहे. सराय हा शब्द पर्शियन सेराय या शब्दापासून तयार झाला आहे.. सराय म्हणजे राजवाडा.. फर्दापूर सराय हा औरंगजेबाने सैनिकांसाठी बांधल्याचे इतिहासकार सांगतात.. फर्दापूर सराय हि साधारण चौरस आकाराची गढी आहे.. याला दोन दरवाजे आणि आठ बुरुज असून ते सुस्थितीत आहे.. प्रत्येक बुरुजातून सराय च्या छतावर जाण्यासाठी भुयारी जिने आहेत.. दोन बुरुजांच्या मध्ये आडव्या भिंतीत बऱ्याच कमानी तयार केल्याचे दिसते.. सध्या तरी या कमानीत मानवी वस्तीचे अतिक्रमण झाले आहे.. सराय च्या मध्यभागी एक मशिद असून ती फार जुनी असल्याचे स्थानिक सांगतात.. आम्ही इथे पोचलो आणि मशिदीजवळच्या पाण्याच्या टाकीजवळ लाजवंती उभी केली.. आता माणसांनी ताब्यात घेतलेल्या गढीच्या छतावर कुठून चढावे ह्याचा विचार करीत असता.. गढीतील एका घरातून एक तरुण बाहेर आला.. हि लोक इथे काय करायला आली आहे ह्या उत्सुकतेपोटी तो गढी दाखवण्यास तयार झाला.. अन्ना आणि त्याची एव्हाना गट्टी जमली होती.. मग गढीच्या उजव्या कोपऱ्यातील बुरुजातून एक रस्ता वर जाण्यासाठी आहे तिथून वर छतावर आलो.. गढीचे बाकीचे बुरुज प्रायव्हेट आहेत.. म्हणजे.. या बुरुजात लोकांनी घरसंसार थाटले आहेत..छतावर येताच पाकळ्यांची छातीपेक्षा उंच तटबंदी लक्ष वेधून घेते.. हेच या गढीचे मुख्य आकर्षण.. याशिवाय बुरुजातून वर येणार दगडी पायऱ्यांचा जिना हे दुसरे आकर्षण.. तर गढी चे दोन भक्कम दरवाजे हे तिसरे.. तर अशी हि मानवाने तहसनहस केलेल्या गढीची एक प्रदक्षिणा छतावरून पूर्ण करून अजिंठा सराय कडे मोर्चा वळविला..
अजिंठा सराय आणि अजिंठा किल्लाऔरंगाबाद पासून साधारण ९० कि.मी. वर अजिंठा हे गाव आहे  सोयगाव फाट्यावरून साधारण १५ कि.मी. वर अजिंठा घाट आणि घाट ओलांडताच महामार्गावर अजिंठा गाव आहे.. या गावात एक भुईकोट किल्ला आणि गढी (सराय) आहे अजिंठा गाव पुढे ठेवून साधारण एक कि.मी. अलीकडे उजवीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याने अजिंठा सराय कडे जाता येते.. या सरायच्या अलीकडे दफनभूमीत अजिंठा लेणी संदर्भातील प्रसिद्ध पारोरोबर्ट या प्रेमप्रकरणातील पारोची समाधी आहे.. या उजव्या रस्त्याने २३ किमी आत येताच.. गढी चा २०२५ फुट उंच दरवाजा दिसतो.. या दरवाजावर दुबाजूस दोन स्तंभ उभे केल्याचे दिसते.. बाहेरून उजवीकडे एक पाण्याचा चौरस कुंड आहे.. इथून शेताडाच्या भोवताली तट बांधल्याचे दिसतात.. या दरवाजातून आत येताच समोर आणखी एक दरवाजा आणि मध्यभागी नवीनच बांधलेली कचेरी आहे. सध्या तटबंदीतील खोल्यामध्ये शाळा देखिल भरते.. तटबंदी मध्ये कमानी असून कचेरी जवळच्या दरवाजातून या तटबंदीवर चढून जाता येते.. या तटबंदीवर चढून या सराय चा फेरफटका मारताच.. वाघुर नदी काठी असलेल्या अजिंठा भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीचा काही भाग नजरेस पडतो.. 
अजिंठा भुईकोट किल्ल्याचा बराच भाग हा मानवी वसतीने अक्र्मिलेला आहे .. अजिंठा सरायच्या आतल्या दरवाजातून गाडी रस्ता आहे.. इथून पुढे गेल्यास चौक आहे डावीकडे गेल्यास भरवस्ती मध्ये दोन दरवाजे दिसतात.. या चौकातून उजवीकडे गेल्यास किल्ल्यातील काही जुन्या इमारती नदीकाठच्या बाजून पहावयास मिळतात.. या किल्ल्याचा इतिहास अज्ञात असून औरंगजेबाच्या काळात याची निर्मिती झाली असावी असे वाटते.. लाजवंतीत बसून अजिंठ्याच्या भुईकोट किल्ल्यातून एक फेरफटका मारला.. आणि पुन्हा अजिंठा सराय च्या बाह्य बाजून हागणदारीतून वाट काढीत वाघुर नदीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी पहिली आणि पारो ची समाधी पाहण्यास निघालो.. तर तिथेही कब्रस्तानात हागणदारी.. शेवटी अन्नाने मनाचा हिय्या करून तोंडाला करकचून रुमाल बांधून पारो ची समाधी पाहण्याचा विडा उचलला.. आणि पट्ठ्याने उग्र वासास नं जुमानता.. या ऐतिहासिक वारशाचा पुरावा कॅमेराबंद करून आणला.. आल्यावर एच.डी. (हागणदारी) युक्त भटकंती करण्यास भाग पाडल्याबद्दल एक जोरदार शिवी हासडली.. काय राव काय एच.डी. किल्ले दाखवतो राव असे म्हणून एक लाडिक निषेध नोंदवला.. 
तर अशा एच.डी. किल्ल्याची सफर उरकून सोयगाव नजीकचे डोंगरी किल्ले पाहण्यास निघालो वेताळवाडी आणि किल्ले जंजाळा..

अजिंठा रांगेतील दुर्गवैभव.. वेताळवाडी किल्ला

अजिंठ्याची एच.डी. भटकंती करून सोयगाव गाठले.. इथे चौकातच एका हॉटेल वर उदरभरण म्हणून मिसळ, भजी याची सरबत्ती केली आणि चौकातून डावीकडे निघालो वेताळवाडी किल्ल्याकडे.. चौक सोडताच हिरवाई ला सुरुवात झाली आणि पंधरा मिनिटातच एका ओढ्यापाशी येवून पोचलो.. इथे समोर एक डोंगर आणि त्याच्या अलीकडच्या टोकाला दोन कमानी दिसतात.. हा डोंगर म्हणजे वेताळवाडी चा किल्ला.. ओढ्यापाशी दोन मिनिटे ब्रेक घेवून किल्ल्यावर जाण्याची स्ट्राटेर्जी ठरविण्यात आली.. इकडून खालून जायचं का तिकडून उजवीकडे वळसा घालून.. तेवढ्यात समोरून दोन वाटाडे येताना दिसले.. त्यांना म्हटलं किल्ल्यावर जायचंय.. कसं जावू.. ह्या गाडी रस्त्याने जावा.. घाटातून वर चढलास कि डायरेक्ट गडावर.. आता गडावर गाडी जाते म्हटल्यावर गाडीरस्त्याने निघालो.. लाजवंती नागमोडी रस्त्याने निघाली.. थोडं पुढे गेलो आणि कच्चा रस्ता सुरु झाला.. हा हळदा घाट रस्ता जो आपल्याला अजिंठा रांगेतील एका विस्तीर्ण पठारावर घेवून जातो.. हळदा घाटात (साधारण २००० फुट उंचीच्या) वेताळवाडी किल्ल्याचा एक मस्त नजरा पाहायला मिळतो.. घाट संपला आणि सौम्य चढणीचा सरळसोट रस्ता सुरु झाला.. इथे डावीकडे पाहिलं आणि वेताळवाडी किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी दिसू लागली.. आजचा दिवस नवनवीन किल्ल्यांचे वाण घेवून भेटीसाठी आला होता..


वेताळवाडी किल्ल्याचे इथून एक सुरेख दर्शन घडते.. डोंगर उताराला बांधलेली लांब तटबंदी आणि कैक बुरुज, समोर दोन बुलंद आत दडविलेला दरवाजा आणि उजवीकडे तिरपी वर चढत जाणारी भरभक्कम तटबंदी.. दोन तटबंदीना सांधणाऱ्या एका उंच विशाल बुरुजाकडे निघायचं.. दहा मिनिटात आपण या बुरुजाखाली येवून पोचतो.. इथे दोन बुरुजांच्या मध्यातून जाणारी फरसबंदी वाट आहे.. आपण ती पार करताच डावीकडच्या बुरुजाला खेटून बांधलेला छुपा दरवाजा पाहायला मिळतो.. कमानीच्या दुबाजूस शरभशिल्प आहेत.. डाव्या बाजूस असलेल्या शरभाच्या पायाशी एक गोलाकार राजचिन्ह पाहण्यास मिळते.. दरवाजातून पुन्हा मागे वळून पाहताना बलदंड आणि उत्तुंग बुरुजाचा बाहेर येणार एक सज्जालक्ष वेधून घेतो.. दर्जातून आत प्रवेश केला आणि शेणाच्या वासाने नाक भरून आले.. इथे डावीकडे एक भुयारी जिना आपल्याला दरवाजाच्या माथ्यावर घेवून जातो.. आपण पायऱ्यांनी पुढे जायचं.. आत प्रवेश करताच डावीकडे किल्ल्याची भक्कम तटबंदी.. उजवीकडे मध्ये बालेकिल्ल्याचे २ बुरुज आणि तटबंदी दिसते.. आणि अगदी उजवीकडे आता वर तिरपी चढत गेलेली तटबंदी आणि शेवटाला एक बुरुज त्यावर असलेले झाड नजरेस पडते.. हा बुरुज जरासा सुटावलेला असल्याने लक्षात येतो.. तिकडे निघालो.. जाताना पायवाटेच्या डावीकडे एक पाण्याचे टाके आहे.. तिथे पाहिलं तर त्याचे पाणी लालेलाल झाल्याचे दिसले.. खुफिया टाके पाहून पुन्हा उजव्या तटबंदी जवळून जाणाऱ्या पायवाटेने सुटावलेल्या बुरुजाशी येवून पोचलो.. या बुरुजावर जाण्यासाठी आठदहा पायऱ्या आहेत.. इथून अजिंठा रांगेचे एक विलक्षण दृष्य आहे.. डावीकडच्या डोंगर रांगेत रुद्रेश्वर लेणी आहेत.. आपण या एकांड्या बुरुजाला पाठ करून बालेकील्याकडे निघायचं.. पंधरा मिनिटात बालेकिल्ल्याच्या बुरुजाला वळसा घालून आपण वर येवून पोचतो.. इथे खुज्या झाडी झुडुपातून वाट काढत एका इमारतीपाशी पोहोचायचं.. हे धान्यकोठार.. मागे एक मोठा तलाव आहे.. तलावाचे काठ दगडभिंतीने बांधून काढल्याचे दिसते.. या कोठाराच्या अलीकडे एक जमिनीत पुरलेला कातळ रांजण आहे.. या कोठाराला उजवीकडे ठेवत पुढे निघालो कि आपण दोन कमान असलेल्या माचीकडे जातो.. तिथे निघालो.. किल्ल्यावरील हवापालट करण्याचे हे ठिकाण एखाद्या देखण्या मंचासारखे.. याला बारादरी असे म्हणतात.. दोन कमानीच्या बारादरीत येवून पोचलो.. मी आणि कोरकू.. दुपारचे तीनसाडेतीन झाले असावेत.. मस्तपैकी वारा सुटला आणि हि भटकंती सार्थ करून गेला.. कमानीच्या सावलीत क्षणभर रेंगाळलो.. जवळ असलेला.. भटकंती मेवा खावून.. तृप्त झालो.. या कमानीच्या अलीकडे डावीकडून खाली उतरल्यास किल्ल्याचा चोर दरवाजा पहावयास मिळतो.. वेताळ वाडीची जोरदार भटकंती करून पुन्हा मुख्य द्वाराशी येवून पोचलो.. 


वेताळवाडी किल्ल्याचा इतिहास देखिल बऱ्यापैकी अज्ञात आहे.. या प्रभागात.. पूर्वी.. मेडनीराव आणि कामदेव या दोन राजपुतांचे राज्य होते ३०० शिबंदी आणि २००० पायदळ यासह त्यांचे राज्य होते पण हे दोघे या किल्ल्याचे राज्यकर्ते होते याचा कुठेही उल्लेख नाही.. असो इतिहासाच्या मागावर नं जाता किल्ल्याचा भूगोल पुरेपूर पाहून पुन्हा घाटस्त्यावर आलो.. इथे एक मेंढ्यांचा कळप चरताना पाहून मेंढपाळ कुठे आहे ते पाहू लागलो.. मेंढपाळ दिसताच.. त्याला जंजाळा किल्ल्याकडे कसे जायचे याचा पट्टा विचारला.. तर हितनं फुढ् हळदा गाव लागेल तिथनं उजवीकडे जावं मग उंडणगाव.. इथून पुन्हा उजवीकडे जायचं कि आला जंजाळा.. मेंढपाळांना जय मल्हार करून जंजाळे किल्ल्याची वाट पकडली..


जंजाळ्यातील देखणा दुर्ग किल्ले जंजाळा

वेताळवाडी किल्ल्यावरून तासाभरात उंडणगाव गाठले आणि लाजवंती चा पेट्रोल साठा संपत असल्याचे दिसले मग.. एक पेट्रोल पंप बघून लाजवंतीला पेट्रोलचे भरपेट जेवण दिले आणि अंबाई गावाकडे निघालो.. उंडणगाव ते अंबाई साधारण ६७ कि.मी. अंतर आणि पुढे जंजाळा ३४ कि.मी.  अशी सफर करून जंजाळे गावात पोचलो टॉवर उन्हं कलंडली होती.. आता किल्ला पाहायला मिळतो कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.. गावात पोचताच एका दुकानासमोर लाजवंतीला उभि करून खाली उतरलो तोच पोट्ट्यांनी गराडा घातला.. किल्ल्यावर येणार काय प्रश्न विचारताच सगळ्यांनी धूम ठोकली.. मग तिथे उपस्थित काही वाटाड्यान्ना विचारलं किल्ल्यावर येणार काय.. ह्या प्रश्नावर उरल्या सुरल्या माणसांनीतिथून काढता पाय घेतला.. तेवढ्यात एक तरुण त्या दुकानाशेजारून पुढे येताना दिसला.. त्याला म्हटलं किल्ल्यावर जायचं.. बहुत देर हो गयी अभी.. अभी मुश्कील है.. अजून सूर्य मावळायला एक प्रहराचा अवधी होता.. म्हटलं.. चलो आप.. नही अभी मै खेत से आया.. नाही आ सकता.. जल्दी आते तो कोई नं कोई आ जाता.. तर हे असं हो नाही चाललेलं..  तेवढ्यात एक चाचा समोरून आले.. त्यांनी मुवायना केला चाचा म्हणाले.. जा बेटा इनके साथ बहुत दूर से आये है.. विचारलं तर हा तरुण चचाचा पोट्टा निघाला.. चलो आता हू म्हणत.. जवळपास धावतच किल्ल्याकडे निघालो.. दुकानाच्या डावीकडून एक वाट जाते.. विहिरीवर या विहिरीशेजारून किल्ल्याचा रस्ता आहे..  

तो मुलगा जवळपास धावत होता.. त्याचा वेग सांभाळताना मात्र फेफडे भरून आले होते.. कधी बाजरीच्या शेताडातून तर कधी ज्वारीच्या डोक्यापेक्षा उंच चिपाडातून वाट निघाली होती.. मध्ये उजवीकडे काही कातळात कोरलेल्या लेण्या दिसल्या.. ह्या घटोत्कच लेण्या असल्याचे कळले.. पुन्हा कधीतरी.. हे ठरलेलं वाक्य मनात कोरून त्या पोट्ट्याला फॉलो करून लागलो अर्ध्या तासाच्या शर्यतीनंतर डावीकडे.. दरी दिसू लागली आणि समोर तटबंदी.. तशी धूम ठोकली.. तटबंदीच्या पुढ्यातील खंदकाच्या अल्याड येवून पोचलो.. आज आणखी एक किल्ला पाहण्याची इच्छा पूर्ण झाली होती.. किल्ले जंजाळा हा असा पुढ्यात उभं आहे यावर विश्वास बसत नव्हता.. हा पोट्टा आला नसता तर जन्जाला सापडणे आज शक्य झाले नसते.. मग गाईड ने आम्हाला एक गवतात लपलेली तोफ दाखवली आणि मस्जिद पे जायेंगे म्हणत पुढे निघाला.. जन्जाळा किल्ल्याची तटबंदी भक्कम अशी आहे.. खंदकामुळे त्याची अभेद्यता अंमळ वाढली आहे.. तटबंदीच्या मधल्या बुरूजालगत एक पायवाट ढिगाऱ्यातून गडावर जाते.. एव्हाना अंधारलं होतं.. पण संधिप्रकाश असताना गड पाहण्याची नामी संधी सोडून कसं चालणार होतो..


एका धिप्पाड बुरुजाच्या उजवीकडे तुटलेल्या तटबंदीमधून गडावर प्रवेश केला.. गडावर बरीच झाडी असल्याचे दिसले.. त्यामुळे इथे रानडुक्कर आणि रानटी प्राणी यांचा वावर आहे.. त्यामुळे सगळे सोबत निघालो.. अंतर पडून नं देता.. वाटेत.. एक गूढ खुफिया महाल असल्याचे गाईडने सांगितले.. इथे चित्रविचित्र आवाज येतात.. मग अन्नाने.. आत जावून काय काय खुफिया आहे याची पाहणी केली.. आणि आणखी एक अजस्त्र तलाव पाहण्यास मिळाला.. संधिकालची गर्द निळाई या तळ्यावर तरंगत होती.. तळ्याचा बांध डावीकडे ठेवत निघालो.. दहा मिनिटात.. एक पिराची कबर दिसली इथे काही फारसी भाषेतील शिलालेख आहेत.. पिराला कोकारुने नमस्कार करताच.. किल्ल्याचा सर्वोच्च माथ्यावरील मशिदीकडे निघालो.. इथून पुढे पायवाटेने गेल्यास एक टेकाड आहे.. याच्या माथ्यावर हि मशिद आहे..

जंजाळा किल्ल्याला तिन दरवाजे असून पूर्वेकडे वेताळवाडी दरवाजा.. दक्षिणेस जन्जाला दरवाजा तर पश्चिमेस जेरमाडी दरवाजा आहे.. या शिवाय या किल्ल्यास मजबूत तटबंदी आणि बरेच बुरुज आहेत.. किल्ल्यावर बऱ्यापैकी पठार आहे.. किल्ल्याच्या तीन बाजूस डोंगर उतार असल्याने नैसर्गिक संरक्षण आहे तर दक्षिणेकडील बाजूस पठारावरून आक्रमण रोखण्यासाठी खंदक रचना केली आहे.. मावळतीच्या रंगात बुडालेला जन्जाला पाहून आजचा दिवस सार्थकी लावला.. निजामशाही अधिपत्याखाली हा किल्ला असल्याचे इतिहासकार सांगतात.. या किल्ल्याची उंची साधारण ३००० फुट असून.. जंजाळे गावातून सोपी वाट आहे..

मशिदीजवळ फोटोसेशन करून पुन्हा खंदक गाठला.. एव्हाना मिट्ट काळोख दाटला होता.. त्यामुळे.. मोबाईल विजेरीच्या उजेडात.. शेताडाची वाट तुडवू लागलो.. तासाभराच्या चालीनंतर विहीर गाठली.. विहिरीचे पाणी पिवून दम घालवला.. आणि दुकानापाशी येवून पोचलो.. इथे जंजाळे गावातील पोट्ट्यांनी चौक डोक्यावर घेतला होता.. लाजवंती यावेळेस त्याचे मुख्य आकर्षण केंद्र होते.. लाजवंती ला ओरखडे पडू नये म्हणून.. गोळ्या वाटपाचा कार्यक्रम घोषित केला.. गोळ्या खाताच पोरे पसार झाली आणि चचानी चौकात एन्ट्री घेतली.. मग किल्लाची भ्रमंती घडविल्याबद्दल.. गाईड  आणि चचा यांचे जाहीर आभार प्रदर्शन करून निघणार तेवढ्यात.. चचा म्हणाले.. खाने का क्या करेंगे आप.. देखते है आगे हॉटेल मिलेगा तो.. इधर दूर दूर तक कोई हॉटेल नाही है.. आप हमारे घर पे खाना खाके जावो.. अगत्यशील चचाचे हे दानशूर रूप पाहून लगेचच इथे एक कोपरा सभा घेण्यात आली.. आणि जेवण करून पुढे चाल करण्याचे ठरले.. चचांच्या घराकडे निघालो.. इथे जवळच चार खोल्यांच्या चंद्रमोळी घरात चाचांचा परिवार राहत होता.. तर समोर त्यांचा मुलगा गाईड याचे घर.. माची सोय तिथे लावण्यात आली.. मग चचांनी आपुलकीने चौकशी केली.. इथे चंद्रकांत आणि चचा यांच्यात प्रश्नोत्तरांची मैफल रंगली.. इस किले का नाम जन्जाला कैसे पडा.. इधर सब जंजाल था.. जंजाल म्हणजे गचपण.. या किल्ल्याला तलतम चा किल्ला असेही म्हणतात असे चचांना सांगताच ऐसा कोई नाम नाही है.. इसको जंजालाच बोलते है.. हे उत्तर ऐकताच अन्न निरुत्तर झाला.. आगे बनोटी जानेके लिए रस्ता कैसा है.. एकदम टापोटाप रस्ता है.. जोरसे जायेंगे..


प्रश्नोत्तरांची मैफल संपली ती खाना तैयार है या आरोळी ने’.. दालचा खाना, चपाती बटाटा सब्जी असा मेनू आजच्या भोजनावळी साठी चाचींनी तैयार केला होता.. – गाईड ने पाने घेतली.. आणि जेवणास सुरवात झाली.. चचा जातीने काय हवं नको ते पाहून फर्मान सोडत होते.. जेवण उरकताच अन्नदाता सुखी देवो भव’.. असे म्हणून तृप्ततेची एक ढेकर दिली.. आणि चाचांचा निरोप घेतला.. चचांनी बनोटी पर्यंतचा रस्ता नीट समजावून सांगितला.. निरोप घेताना.. त्यांच्या मुलाला किल्ले दाखवण्याची बिदागी देवू केली पण चचा म्हणाले.. कैसा पैसा.. हम मेहमान से पैसा नाही लेते.. शेवटी गाईडच्या मुलीच्या हातात.. ४०० रु दिले.. आणि ये हमारी तरफ से इसको गिफ्ट समझो असं सांगितलं तेंव्हा कुठे चचा शांत झाले.. तर जंजाळे गावातील अशी अनोखी मेहमाननवाजीचा अनुभव घेवून बनोटीकडे निघालो.. चाचांचे पुन्हा एकदा जोरदार आभार मानून.. रात्रीचे ८ वाजले असावेत.. आडगावात जातीधर्माचे बंधन झुगारून.. एक माणुसकीचा खळखळता झरा या चचांच्या हृदयातून अखंड वाहत होता हेच खरे..


अंभई गावातून पुढे उजवीकडे टापोटाप रस्त्याने भराडी गावाकडे निघालो.. निर्मनुष्य रस्त्यावर अचानक गव्हाणी घुबडाचे दर्शन घडले.. इथे एक ब्रेक घेण्यात आला.. मेहमान नवजी जास्त झाल्याने डोळ्यावर झापड येवू लागली.. कोकरू आणि चंद्राने पडी मारली.. आणि दिनेश आणि मी गप्पा मारीत निघालो.. गुगल नकाशावर बनोटी हे डेस्टीनेशन निश्चित करून.. नकाशाच्या सूचीने मार्गक्रमण सुरु झाले.. वाटेत एक जीपवाल्या वाटाड्याला विचारून रस्ता बरोबर असल्याची खात्री केली.. आणि पुढे निघालो..  

क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s