नायगावचा सुतोंडा किल्ला, उमरखेड किल्ला, अंतुरचा किल्ला









जंजाळा ते नायगाव हा प्रवास अगदी निर्मनुष्य असा होता.. अंधारल्या वाटांच्या सोबतीने घाटनांद्रा मार्गे.. बनोटी गावी पोहोचलो आणी इथे शंकराच्या मंदिरात तंबू उभारला.. घर दूर सोडून आता आठ दिवस झाले होते.. त्यामुळे मंदिरातला मुक्काम आता अंगवळणी पडला होता.. इथे एक भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली पथाऱ्या पसरल्या.. रात्रीचे साधारण अडीच वाजले असावेत.. पाठ टेकताच झोप लागली.. सकाळी एका शिवभक्ताला अशी भटकी मंडळी सकाळी सातवाजेस्तोवर लोळत आडवे पडलेले पहावलं नसावं बहुदा.. त्याने देवाकडे आमचा निषेध नोंदवण्यासाठी जोरदार घंटानाद केला.. टन्न्..!! आणि तो टणकन आवाज कानी पडताच अन्ना खेकसला कोण आहे रे.. तिकडे.. घणाघाती घंटा वाजविणारा चटकन तिथून पसार झाला.. तशी.. एक रम्य घणाघाती सकाळ झाल्याची जाणीव झाली.. मंदिराच्या परिसरात फेरफटका मारला आणि आपण एका निसर्गरम्य ठिकाणी नकळत येवून पोचल्याची पावती फाडणारा असा बेधडक निसर्गाविष्कार इथे पाहायला मिळाला.. नदीकाठचे मंदिर.. गगनाशी स्पर्धा करणारा मंदिराचा कळस.. आणि समोर अश्वत्थ वृक्ष.. वाटसरूना विनातिकीट सावली देणारा.. असा अश्वत्थ.. मंदिरात परमसिद्ध सिद्धेश्वर.. एक गुड मॉर्निंग झाल्यासारखं वाटलं.. बिगीबिगी आवरून.. नायगावकडे निघालो..
आजचे पहिले लक्ष्य सुतोंडा / नायगावचा किल्ला होतं.. तिकडे निघालो.. लाजवंती.. लाजत लाजत बनोटी गावातून निघाली.. बनोटीच्या मध्यातून हि एक अनामिक नदी वाहते.. ती गावाला दोन भागात विभागते.. या नदीपुलावरून पुढे डावीकडे नायगावचा रस्ता आहे.. याशिवाय आणखी एक रस्ता आहे पण हि नदी ओलांडण्याची सोय तिकडे नसल्याने.. राजमार्गाने नायगाव गाठण्याचे ठरले.. वाटेत एका हातगाडीवर तळलेल्या वड्यांचा घमघमाट अन्नाच्या नाकातून आत जाताच.. अन्नाच्या पोटातला भुकेला जीन जागा झाला.. म्हटलं काय मिळेल.. पाव वडा..!! आता जे मिळेल ते अन्न ग्वाड मानून उदरभरण उरकले आणि चहा ढोसून तडक नदी ओलांडून यशवंती एका पारापाशी येवून थांबली.. इथे नायगावचा रस्ता विचारण्यासाठी खिडकीतून मुंडके बाहेर काढले.. आणि एका विशीतल्या पोराला विचारले.. दादा सुतोंडा किल्ला कुठाय.. आ.. सुतोंडा.. आ.. नायगावचा किल्ला.. किल्ला व्ह्य.. ते विशीतले पोर मिशीत लाजत लाजत पत्ता सांगणार इतक्यात आणखी काही वाटाडे.. जमा झाले आणि इथे त्यांच्यातल्या त्यांच्यात एक वाक्युध्द रंगले.. अरे हिकडून जाऊ दे त्यांना.. मस्त रस्ता आहे.. अरे.. येड्या.. लही खड्डे आहे हिकडून.. तिकडून जाऊदे त्या ओढ्याकडून.. अरे तिकडून हि गाडी जात असती व्ह्य.. काय सांगतो लेका.. मि सांगतो तुम्हाला हिकडून जा.. तर हे असं चालू होतं सगळं.. आनंदी आनंद गडे.. इकडे तिकडे चोहीकडे.. या सगळ्या शाब्दिक चकमकीने झालं काय तर.. इकडे आधीच खड्ड्याने वैतागलेला आमचा खड्डे चुकविण्यात पारंगत आणि हिंगोली घाटाचा राजा दिनेशने डच खाल्ला (माघार घेतली).. रस्ता खराब आहेत म्हणतात राव.. अन्ना.. अरे चल.. दगड लावून गाडी काढू आपण.. चल.. या वाक्यावर जीवात जीव आला.. आणि लाजवंती पूल ओलांडून डावीकडच्या रत्याने निघाली.. पण शेवटी एक मोरी आडवी आली.. तब्बल अर्ध्या फुटांचा खड्डा असलेली हि मोरी पाहून.. लाजवंती.. रुसून बसली.. तसे नायगावला चालत जाण्याचे ठरले.. मग दोन पायांचा टांगा करून निघालो.. तडक नायगाव कडे.. पूल संपताच डावीकडे एक कच्ची सडक जाते गावाला वळसा मारीत.. तिकडे निघालो.. साधारण २–३ किमी ची परेड करून पुन्हा इंग्रजी अक्षर टी असा रस्ता .. इथे डावीकडे जायचं कि नायगाव दिसू लागतं..
इथे.. गावाच्या अलीकडे.. शेतकरी राजा.. मळणी करीत असल्याचे दिसले.. नायगाव.. नायगाव विचारीत.. साधारण दिड तास चालून नायगावात पोचलो.. इथे हि कुठनं माणसं आलीत ते पाहायला माणसांनी गर्दी केली.. तसे किल्ल्यावर कुणी येणार का असे विचारले.. तर कुणी तयार होईना.. आज इतवार.. बाजाराचा दिस हाये.. त्यामुळे.. कुणीही तयार होईना.. आता जसे जमेल तसं किल्ला शोधू असे म्हणून निघणार तेवढ्यात.. एक तरुण तडफदार वाटाड्या.. बोलता झाला.. आज इतवार आहे नं त्यामुळे.. कुणी येणार नाही.. मागे मुंबईचे लोक आले होते तेंव्हा मीच घेवून गेलो होतो किल्ल्यावर.. त्यांनी १०० दिले होते.. पण आज बाजार आहे नं.. काय करणार.. या संभाषणातील महत्वाचा १०० चा धागा पकडून.. अन्नाने त्या दोस्ताला शेवटी हो नाय करत तयार केले.. पण त्याने एक अट घातली.. ‘बा’ ला विचारतो.. मग आमची दलील पेश करण्यासाठी आमचे मंडळ त्याच्या ‘बा’ कडे निघालो.. आता आमच्या भटकंतीची पूर्ण दारोमदार अन्ना आणि त्याच्या ‘बा’ कडे होती.. बाबा दिसताच अन्नाने.. आम्ही पुण्याकडून मराठवाडा भटकंती करून इकडे कसे पोहचलो आणि आता हा मुलगा बरोबर आल्याने आमचं वेळ कसा वाचणार आणि आम्हाला नवनवीन किल्ले फटाफट कसे पाहता येणार याची दर्दभरी दास्तान ऐकवली.. काकांचा अजून नकार होता.. शेवटी अन्नाच्या आर्जवांची त्यांना द्या आली.. आणि.. ए पोऱ्या.. तासाभरात नेवून आन याना गडाव नेवून.. असे फर्मान काकांनी सोडले.. काकांचा पोरगा आमचा आजचा दिवसभरातील पहिला वाटाड्या झाला होता.. तडक निघालो.. गावातून परसाकडच्या वाटेने पुढे गेल्यास.. गावाला डावीकडून वळसा मारीत येणारा कच्चा रस्ता दिसतो.. या पायवाट वजा रत्याने पुढे गेल्यास एक ओढा आहे.. तो ओलांडला कि मघाशी अर्धवट दिसणारा डोंगर सुस्पष्ट दिसू लागतो.. अजंठा डोंगरांगेपासून सुटावलेल्या या अलिप्त डोंगरावर सुतोंडा किल्ला बांधला आहे.. लांबून पाहताना जेमतेम पर्वती टेकडी एवढा दिसणारा किल्ला वाटतो तेवढा लहान नाही.. ओढा संपला आणि सौम्य चढ्या पायवाटेने समोर दिसणाऱ्या डोंगराच्या उजव्या अंगाला निघालो.. वाटाड्याला परत येण्याची गडबड असल्याने.. त्याने राजमार्ग पायवाट सोडून.. खुष्कीच्या मार्गाने गड चढण्याचे ठरवले.. त्यामुळे पायवाटेच्या फंदात नं पडता वर दिसणाऱ्या एका दरवाजाच्या सरळ रेषेत खड्या चढणीच्या वाटेने.. ट्रेक सुरु झाला.. आता ओघाने दमछाक हि आलीच.. त्यामुळे लहान लहान ब्रेक घेत अर्ध्या तासात गडाचा चोर दरवाजा गाठला.. गडाचा ह्या दरवाजाची एक कमान तेवढी शिल्लक आहे..
डावीकडून तटबंदी मात्र भुईसपाट झाली आहे.. त्यामुळे या कमानीला वळसा घालून देखिल गडावर प्रवेश करता येतो.. पण दरवाजातून प्रवेशाची मजा काही औरच म्हणून एकांड्या कमानीतून गडावर प्रवेश केला.. इथून डावीकडे तिरपे गेल्यास आपण बालेकिल्ल्यावर जातो.. इथे एक लिंबूपाणी ब्रेक डिक्लेअर करण्यात आला.. दरवाजातून पुढे आल्यावर समोर दिसणाऱ्या एका टेकाडाकडे निघालो.. समोर हिरव्या रंगाने उजळलेली एक कबर दिसते.. हिच आपली वाट.. ह्या कबरीपाशी येताच.. समोर पाण्याची टाकी दिसतात.. हा टाक्यांचा समूह चावंडच्या टाक्यांची आठवण देवून जातो.. गाईड ला विचारले.. किती टाकी आहेत इथे.. ५२ टाकी आहेत या गडावर.. समोर आणखी एक टेकाड दिसत होते.. उजवीकडून टेकाडाला वळसा मारीत निघालो.. इथे सीतामाई ची गुंफा आहे.. तिकडे निघालो.. इथे एका ताक्यापाशी रेंगाळलो आणि वर आकाशाकडे नजर टाकली.. तर.. मधमाश्यांचा थवा आमच्याकडे घोंघावत येताना दिसला.. मधमाशा.. मधमाशा.. पळा असा एकंच हलकल्लोळ उठला.. आणि सगळे फुटले त्या वाटेने पुढे धावू लागले.. मधमाशांचा घोळका.. उजवीकडून पसार झाला आणि एका संकटातून अवचित सुटका झाली.. टेकाड मध्यावर ठेवून राजू गाईड गोल गोल फिरू लागला आणि त्याला वाट सापडेना.. पावसामुळे जरा निसरडं झालं होतं.. त्यामुळे जरा बेताने वाटचाल सुरु होती.. आता हा गाईड बालेकिल्ला सोडून खाली पूर्वेकडे दिसणाऱ्या पाण्याच्या टाक्याकडे निघाला होता.. हि वाट मात्र जनावरांची वाट होती.. त्यात ती निसरडी असल्याने हिच ती वाट का.. अशी शंका येण्यास सुरुवात झाली.. पण गाईड निघाला तिकडे निघालो.. या वाटेवर चांगलाच घसारा होता.. पाय घसरला तर थेट तीन एकशे फुट घारण होवून थेट टाक्यात अशी अवस्था.. इथे चालताना चंद्रकांत चा पाय घसरला आणि काळजाचा ठोका चुकला.. थोडं पुढे गेल्यावर राजू गाईडचा पाय घसरला आणि मग ह्या राजू गाईड ला आवरा असं म्हणायची वेळ आली.. म्हटलं बाबा राहू डे ती टाकी बालेकिल्ल्यावर चल मुकाट.. अशी तंबी देवून.. बालेकिल्ल्यावर निघालो.. इथे खुरट्या झाडांची गर्दी आहे.. त्यातून अधून मधून जुनाट वाड्याचे चौथरे बाहेर डोकावत होते.. बळेकिल्ल्याचा फेरफटका मारून पुन्हा कबरीपाशी आलो.. इथे एक कमान लक्ष वेधून घेते.. इथे टाक्याचा नजारा हा एखाद्या शृंखले सारखा दिसतो.. अशी हि आखीव–कोरीव टाकी.. सुतोंडा किल्ल्याला दक्षिणेच्या बाजूस.. एक भुयारी दरवाजा आहे.. किल्ल्याची दक्षिणेकडील बाजू तासून एक खिंड तयार झाली आहे’.. या खिंडीतूनच हा भुयारी मार्ग आहे.. पण असो ‘पुन्हा कवातरी’ असं म्हणून नायगाव कडे निघालो.. अर्ध्या तासात ओढा आणि तासाभरात बनोटी गाठलं.. सकाळी ओस असणारा मुख्य रस्ता रविवारच्या बाजाराने फुलून गेला होता.. मग इकडे गोटी सोडा आणि पाव वडा असा उदरभरणासाठी मेनू ठरवून जरा विसावा घेतला.. राजे रावळ लाजवंती सह बाजारात दाखल झाले.. अल्पोपहार उरकून.. अंतुरकडे प्रयाण केले.. दुपारचे दोन वाजले असावेत.. इथे पोलिसांच्या एका टोळक्याने पोलिस फंडासाठी आयोजित कार्यक्रमाची पावती फाडण्यास भाग पडले आणि चिडचिड झाली.. पण असो.. गाडी अंतुर कडे निघाली.. अंतुर किल्ल्याकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत.. दोन्ही मार्ग कन्नड या तालुक्याच्या गावातून जातात..
अंतुर किल्ला : साधारण १५ व्या शतकात या किल्ल्याची निर्मित झाली असे इतिहासकार सांगतात.. इथे बरीच वर्षे निजामशाही चा अंमल होता.. साधारण एक मैलाचा परीघ आणि आयताकृती रचना असलेला हा किल्ला आहे.. किल्ल्यावर एक मोठा तलाव असून या तलावाशेजारी असलेल्या टेकाडावर राणीचा वाडा आणि माथ्यावर एक मशिद/दर्गा आहे.. हि मशिद इस्माईल हुसेन याने सोळाव्या शतकात बांधल्याचे समजते.. या शिवाय किल्ल्याला तब्बल ८ दरवाजे असून.. बऱ्यापैकी अवशेष शिल्लक आहेत.. किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर एक शिलालेख आहे याशिवाय तलावाशेजारी असलेल्या इमारतीच्या भिंतीवर एक शिलालेख पाहायला मिळतो.. इथे निजामशाहीतील राज्यकर्त्यांचा उल्लेख आढळतो.. किल्ल्याच्या पश्चिमेला बुरुज आणि खंदक आहे.. या खंदकातून एक भुयारी दरवाजा आपल्याला गडावर घेवून जातो.. पण राजमार्ग हा या खंदकाच्या उजवीकडून दाट जंगलातून आहे.. किल्ल्याच्या तीन बाजूस नैसर्गिक तुटलेली कातळभिंत.. ह्या किल्ल्याची अभेद्यता वाढवितात..

किल्ल्यावर जाण्याचा राजमार्ग हा मात्र जंगलातून जातो.. गौताळा अभयारण्याला डावीकडे ठेवत जाणा–या गाडी रस्त्याने गेल्यास आपण थेट माथ्यावरून हा किल्ला गाठू शकतो.. या शिवाय कन्नड–कोलापूर–नागापूर मार्गे पलीकडच्या बाजूने किल्ल्यावर येतं येते.. इथून गड चढण्यास अडीच ते तीन तास लागतात.. गौताळा अभायारण्य गाठायचं आणि पुढे ७–८ किमी वर डावीकडे कच्च्या गाडी रस्त्याने थेट किल्ल्याच्या लगतच्या डोंगरमाथ्यावर जाता येते.. हा रस्ता मात्र गौताळाच्या घनदाट जंगलातून जातो.. ऑफरोडींगचा दमदार अनुभव या रस्त्याने घेता येईल.. या रस्त्याने आल्यास इथे एक फोरेस्टची निरीक्षण चौकी आहे.. इथून डावीकडची वाट थेट अंतुर किल्ल्यावर घेवून जाते.. रस्ता जिथे संपतो तिथे डावीकडचे टेकाड चढून समोर तिरपे गेल्यास आपण खंदकापाशी येवून पोचतो.. इथून अजिंठा रांगेचा एक सुंदर नजरा आहे.. खंदकाची रचना अफलातून अशी आहे.. इतिहासाच्या मागावर जाताना हे असे समोर येणारे खंदक, तटबंदी, बुलंद दरवाजे.. आपल्याला चकित करून जातात आणि अशात एखादा भुयारी मार्ग असेल तर काही सांगायलाच नको..
कोलापूर मार्गे नागपूर पोचलो तेंव्हा दुपारचे चार वाजले होते.. इथे चौकशी करता.. इथून अंतुर किल्ला चढण्यास कमीत कमी ३ तसं लागतील असे कळले.. पण इथून कन्नड–गौताळा अभयारण्य मार्गे गेल्यास थेट गडावर जातं येयील असे समजले.. आज कुठल्याही परिस्थितीत किल्ला पाहण्याचा चंग बांधल्याने.. गौताळा कडे निघालो.. बनोटी–सायगव्हाण–कन्नड–गौताळा अभयारण्य अशा रस्त्याने गौताळा अभयारण्य गाठले.. उन्हं तिरप्या रेषेत अंगावर आली होती.. इथून ७–८ किमी सिल्लोड रस्त्याने जाताच डावीकडे.. धनगरपाड्या जवळ अंतुर किल्ल्याची पाटी दिसली आणि जंगल रस्त्याने अर्ध्या तासात अंतुर समोरील डोंगरावर येवून पोहोचलो.. वाटेत येताना एक मोठा ओढा आणि सुतार पक्ष्याचे दर्शन झाले.. फोरेस्ट च्या चौकी वरून डावीकडे रस्ता वळला तसे लाजवंती चा ऑफ रोडींग थरार सुरु झाला.. पाच मिनिटात रस्ता संपला आणि अंतुर किल्ला समोर दिसू लागलं लगोलग पाण्याच्या दोन बाटल्या उचलून किल्ल्याकडे धूम ठोकली.. डावीकडच्या टेकडावर चढलो आणि समोर खंदक दिसू लागला.. हि खंदकाची संरचना फार सुरेख अशी आहे.. डोंगर तासून केलेली हि अशी रचना कण्हेरगड आणि धोडप या किल्ल्यावर पाहायला मिळते.. खंदकात चढण्या–उतरण्यासाठी मात्र थोडंसं धाडस करायला हवं.. कोकरू उर्फ कोरकू म्हणाला दादा मि उतरतो आणि बघतो काही रस्ता दिसतो का ते..! अंधारल्या वातावरणाने खंदकाच्या बाजूने गडावर जाण्यासाठी काही मार्ग दिसेना तेंव्हा.. आता इथूनच परत जावं लागतं कि काय अशी स्थिती निर्माण झाली.. पण उजवीकडे कातळकड्यातून एक वाट खाली उतरताना दिसली.. तशी हि वाट उतरायला अवघड अशीच होती.. पण कोरकू सरसर उतरून गेल्याने इतरही याच वाटेने खाली उतरू लागले.. पाक मिनिटात मागच्या मुख्य दरवाजाकडे जाणाऱ्या ट्राव्हर्स घेत जाणाऱ्या पायवाटेवर पोचलो.. इथून चालताना अंतुर किल्ल्याची कातळभिंत डावीकडे डोक्यावर येते..
पाच दहा मिनिटात आपण गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोचतो.. संध्याकाळचे सहा वाजल्याने सगळीकडे किर्रर्र झालं होतं.. आमच्या पावलांचा आवाज.. अधून मधून येणारा वटवाघळांचा चित्कार हि शांतता भेदून जात होता.. थोडं पुढे आलो आणि गडाचा दुसरा दरवाजा दिसला.. इथे पुढे अंतुरच्या कातळभिंतीवरून एक पातळ कातळधार कोसळताना दिसली.. आणि पायऱ्या सुरु झाल्या.. पुढे पायऱ्या डावीकडे वळाल्या आणि गडाचा मुख्य दरवाजा पुढ्यात आला.. इथे मात्र वटवाघळांनी पार धुमाकूळ घातला होता.. त्यात मुख्य दरवाजात एक काटेरी कुंपणच घातल्याचे दिसले.. हे कुंपण कोपऱ्याकडून बाजूला सारत गडप्रवेश केला.. इथे L आकाराचा जिना आहे.. गड तसा निर्मनुष्य होता.. फक्त चार मुसाफिरांची आणि वटवाघळे कि हि अनोखी दुनिया.. यात प्रवेश केला होता.. दवाजातून आत येताच.. समोर एक टेकाड आणि त्यावर बांधलेली तटबंदी दिसते.. याला उजवीकडून वळसा मारत गेल्यास आपण बालेकिल्ल्यावर पोचतो.. बालेकिल्ल्यावर मात्र एक भला मोठा तलाव आहे.. त्या तलावाच्या मागे एक ऐतिहासिक वस्तू लक्ष वेधून घेते.. इथवर येईपर्यंत पुरतं अंधारलं होतं.. म्हणून कोरकू ला गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यास सांगून इथे एक ब्रेक घेण्यात आला.. अंधारल्या वाटांची भटकंती आज अंतुर किल्ल्यावर येवून एक पळभर थांबली होती.. अर्ध्या तासांची गडप्रदक्षिणा मारून परतीचा प्रवास सुरु केला..

क्रमशः
Like this:
Like Loading...
Related