
मराठवाडा.. बहामनी (मुघलशाही, बेदरशाही, आदिलशाही, निजामशाही) सत्तेच्या वरवंट्याखाली रगडलेला मराठवाडा. यवनी पाशवी अत्याचाराचा मूक साक्षीदार म्हणजे मराठवाडा. सत्तांतराची साक्ष देणारा मराठवाडा.. तसेच नामांतराची चळवळ छातीवर झेलणारा मराठवाडा. या मराठवाड्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो, उस्मानाबाद–बीड–लातूर–परभणी–नांदेड–हिंगोली–जालना–औरंगाबाद. साधारणतः उजाड माळरान भूभाग म्हणजेच पठारी प्रदेश, निसर्गाने आखडून घेतलेला हात आणि राजकारण्यांनी दिलेलं आश्वासनांचे डोईजड गाठोडे. साठ वर्षांच्या स्वतंत्र भारतातील एक दुर्लक्षित भूप्रदेश म्हणजे मराठवाडा. मराठवाड्याने महाराष्ट्राला तब्बल तिन मुख्यमंत्री दिले.. विरोधी पक्षातील आघाडीचे नेतेदेखिल याच भागातले.. पण मराठवाडा मात्र आहे तसाच राहिला.. उपेक्षित. पण मित्रहो मराठवाडा हि संतांची भूमी देखिल आहे..! मराठवाड्याचा इतिहास तसा मोठा आहे.. पार यादवकालापासून, तसेच त्रेतायुगातील घटनांचे संदर्भ सांगणारी काही ऐतिहासिक स्थळे इकडे आहेत अजंठा–वेरूळ लेणी, देवगिरी साम्राज्याचा साक्षीदार, तुघलकाच्या विक्षिप्तपणाचा पुरावा, बौद्धकालिन शिल्पकला असणारी खारोसा लेणी, घटोत्कच लेणी, पितळखोरे लेणी.. रामायणातील दंडकारण्यातील काही भाग मराठवाड्यात येतो.. हिंदवी स्वराज्याची कुलदेवता ‘आई तुळजाभवानी’चे मंदिर हे मराठवाडा भागात येते हे नव्याने सांगायला नको.. तर मंडळी असा हा आपला सर्वांचा लाडका असा इतिहाससंपन्न मराठवाडा.
सह्याद्री हे नाव घेतलं की सामोरी येतात पावलांना कापरे देणाऱ्या कातळधारा, उंचपुरे सरळसोट तुटलेले बेलाग दुर्गम कडे, घनदाट जंगलांनी गर्द विळखा घातलेल्या दऱ्या आणि हिरवाईची चादर ओढून विविध जीवसृष्टी अंगाखांद्यावर खेळवणारी हिरवीकंच वनराई. वर्ल्ड हेरीटेज चा दर्जा मिळालेला असा पश्चिम घाटातील आपला सखा–सोयरा सह्याद्री.. एखाद्या लहान मुलाला जरी स्वराज्यातील किल्ल्यांची नावं विचारली, तर प्रतापगड, राजगड, तोरणा, सिंहगड हि नावे त्यांच्या मुखोद्गत असतात. पण मराठवाड्यातील काही किल्ल्यांची नावे कुणाला विचारलं तर एकाच्या चेहऱ्यावरची माशी हलणार नाही असे प्रश्नचिन्ह (?). त्यामुळेच मराठवाड्यातील किल्ले कसे असतील, त्यावर नेमकं काय पाहायला मिळेल ! अशी उत्सुकता कायम मनात दाटून असायची. मराठवाडा हा प्रभाग जसा राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित तसाच तो हाडाच्या भटक्यामंडळीना भुरळ पाडत नाही. म्हणूनच या मराठवाड्यातील किल्ल्याचं रहस्य नेमकं काय आहे ते पाहण्याचा वज्र निर्धार केला. सहा–आठ महिन्यांपूर्वी हाडाचा भटक्या उपेंद्रने मराठवाडा भटकंतीचा बेत आखला पण पुढे काही कारणाने तो बारगळला. मग अशाच एका उनाड संध्याकाळी चंद्रकांतचा तावातावाने फोन आला, दहा दिवसांची सुट्टी टाकतोय.. बघ काही मेगा प्लान भटकंतीचा. क्षणाचाही वेळ न दवडता तातडीने मराठवाडा दुर्गभ्रमंती चा बेत नक्की केला.. सोबत विदर्भातील काही किल्ल्यांना भेट द्यायचे ठरले.. मोहीम सुरु झाली सोलापुरातील काही ठराविक किल्ल्यांपासून (अकलूज, टेंभूर्णी, माढा किल्ले पाहून) मोहिमेचा श्रीगणेशा करण्याचे ठरले. यंदाच्या मोहिमेला F1 चालक–मालक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री दिनेशभाऊ रावळ यांनी लाजवंती डिझलगाडी घेवून येण्याचे मान्य केले आणि लांबलचक मोहिमेच्या खर्चाची दांडगी बचत केली. या मोहिमेचे सारथ्य भाऊंनी अथ पासून इति पर्यंत करण्याचे शेल्फ डिक्लेअर करून टाकले आणि वारज्यातील सोबा पूरम वसाहतीतील तिरप्या रॉकेट कमानीखाली नारळतोड कार्यक्रमाने मोहिमेला सुरुवात झाली.
रोहिलागड विसरले वाटतं आपण….किल्ले रोहिलागड ता.अंबड जि.जालना https://rohilagad.site123.me
LikeLike