‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग २

सप्तशृंग-गड, मार्किंड्या किल्ला, रवळ्या-जावळ्या, किल्ले धोडप, कांचन-मंचन किल्ला

सप्तशृंगगड – बाबाजी का दिव्य आदेश

वाटाड्या मार्ग क्र. ४: अहिवंतगड – नांदुरी रोड – सप्तशृंगी फाटा – सप्तश्रुंगगड (१४ कि.मी.)


सकाळी सहाचा गजर लावून आठला सगळे रेडी झाले.. गडावर जायचं असल्याने.. कडक गारेगार पाण्यातच अभ्यंगस्नान उरकून घेतले.. आणि मंदिराकडे निघालो.. दुकानाच्या अडथळे पार करीत.. गडावर जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या.. तसा पोटात गोळा आला.. मांगी-तुंगी च्या पायऱ्या आठवल्या.. ३००० पायऱ्यांनी केलेला गुडघ्यांचा बाजार आठवला आणि त्या पायऱ्यांच्या आठवणीनी गुडघ्यात एक कळ आली.. मग आईचा धावा करीतच पायऱ्या चढू लागलो.. हा एवढा गुडघा नीट राहू दे ग आई.. पाहिजे तर ढोपर देतो.. पण गुडघा तेवढा नीट राहू दे..
सात डोंगरांच्या पोटात एक गुहा आहे आणि तिथे सप्तशृंगी मातेचा अधिवास आहे असं स्वपन एका गुराख्याला पडलं आणि त्याला हे दिव्य मंदिर सापडलं.. सात डोंगरी सात हातांनी भक्तांचे युगे युगे रक्षण करणारी दिव्य सप्तश्रुंग माता.. सध्या इथे मातेच्या दर्शनासाठी थेट रोप-वे ची उभारणी केली जात असल्याचे दिसले.. आम्ही दोन पायाच्या गाडीवर पायऱ्यांनी निघालो.. मातेच्या दर्शनाला.. सकाळची वेळ असल्याने आणि सोमवार असल्याने गर्दी अशी फार नव्हती.. त्यामुळे दर्शन लगेच घडले..
कुठल्याशा पुस्तकात वाचलेली सप्तशृंगी मातेची कहाणी ती अशी.. दक्ष नावाच्या राजाने एक महायज्ञ केला होता आणि याचे निमंत्रण शंकर भगवान सोडून बाकीच्या देवांना देण्यात आले.. दक्ष राजांची मुलगी सती / शक्ति जी शंकराची बायको होती तिला हे आवडले नाही म्हणून तिने या यज्ञात उडी घेतली.. हे कळल्यानंतर शंकराने यज्ञाच्या जागी येवून तांडव केला आणि सतीचे कलेवर घेवून भगवान निघाले.. आणि तिन्ही लोकी भटकू लागले.. परिस्थितीचे गांभीर्य पाहून विष्णू देवाने सुदर्शन चक्र सोडून सतीच्या देहाचे तुकडे केले ते जिथे जिथे जाऊन पडले ती म्हणजे देवीची ५१ शक्तिपीठे.. यातील साडेतीन शक्ति पीठे महाराष्ट्रात आहेत.. पण सप्तश्रुंग गड हेच ह्या सतीचे/शक्तिचे मूळ स्थान मानले जाते.. कारण शंकराने खुद्द देवीच्या देहात प्रवेश करून इथे वास्तव्य केल्याचे सांगितले जाते.. इथे देवीचे रूपात महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती यांचा त्रिवेणी भाव एकवटला आहे.. शुंभ-निशुंभ आणि महिषासुर या राक्षसांचा निप्पात केल्यानंतर देवीने इथेच काही ताप तपस्या केल्याचे सांगितले जाते.. म्हणून या जागेचा महिमा थोर आहे.. तर सातमाळा एक्स्प्रेस च्या या स्टेशनचा इतिहास आणि वर्तमान थोर असा आहे.. देवीचे दर्शन घेवून पुढच्या प्रवासासाठी देवीला साकडे घातले.. इथल्या रांगांची भेदकता पाहून सुखरूप आणि वन-पिस प्रवास घडू डे अशी प्रार्थना केली आणि पुन्हा भक्त निवासी निघालो..
उतरताना सप्तश्रुंग गडावरून मार्किंड्या आणि रवळ्या-जावल्या कडे जाणारी हि सातमाळा रांग दिसू लागली.. सप्तशृंगीचा निवास हा या रांगेला जोडून आडव्या असणाऱ्या डोंगरावर आहे.. म्हणजे हे सातमाळा एक्स्प्रेस चे मध्यवर्ती जंक्शन.. इथल्या भेटीशिवाय सातमाळा भटकंती अपूर्ण आहे.. पायऱ्या उतरताना उगवतीच्या किरणांनी उजळलेला मार्किंड्या गड दिसू लागला.. खाली पोहोचलो आणि गाडीत बसणार तेवढ्यात एक बाबाजी गाड़ी जवळ आले.. म्हटल बाबाजी आशीर्वाद द्य.. अजुन पुष्कल गड हिंडायाचे आहेत.. बाबाजींनी डोळे मिटले आणि म्हटले.. “वत्सा दिव्य आदेश..  
मार्किंड्या किल्ला – लागली समाधी मार्कंडेयाची


वाटाड्या मार्ग क्र. ५: सप्तश्रुंगगड – सप्तशृंगी फाटा – नांदुरी – पायरपाडा – चंडिकापूर – वणी – (वणी-कळवण रोड) – बाबापूर – मुलाने गाव– मुलन बारी/घाट – खिंड – मार्किंड्या डावीकडे (३५ कि.मी.)
सप्तशृंगी देवीचे दर्शन आणि प्रसन्न अन शुचिर्भूत झालेल्या बाबाजींचे दिव्य आशीर्वाद घेवुन पुढचा ट्रेक सुरु झाला. आजचे लक्ष्य होते  मर्किंडया (मार्किन्डेय ऋषी) आणि रवळ्या-जावळ्या.. एकाच पठारावर अगदी समोरासमोर उभे ठाकलेले दोन जिगरी दोस्त.. सप्तश्रुंगगड- धोडांबे रस्ता- वणी – नांदुरी – मुलाने गाव- मुलाने बरी असा प्रवास करून मुलाने/बाबापूर बारी (खिंड) गाठली.. इथवर पोचण्यास बारा वाजले.. या बारीतएक बाबा मुक्कामाला असतात असे कळले.. इथे गाडी उभी करून मार्किंड्या दर्शन करावे असे ठरले.. आणि पुढे रवळ्या- जावळ्या ची सफर..
.. खिंडीतून पश्चिमेची खड़ी चढण आपल्याला मार्किडयाच्या पठारावर नेणारया नाकडा वर घेवून जाते.. कातळकोरीव नाकाड चढून वर येताच, काही पायरया लागतात.. मग एक बुरुज तटबंदी चे काही अवशेष.. हा कात टप्पा पार करताच आपण एका पठारावर येवून पोहोचतो .. इथे
थोड़े पुढे जाताच एक मंदिर आणि समोर दोन वाटा फुटतात यातली उजविकडची वाट थेट मार्किंड्यावर जाते तर डाविकडची वाट रामतीर्थ कडे जाते. म्हटलं इथे रामतीर्थ प्राशन करून इथल्या बाबाजींना भेटावे तर इथे विविध देवीदेवतांच्या मुर्तिंनी भाऊ गर्दी केलि होत तिथे उन्हाच्या कहरी.. बुड टेकवतो ना टेकवतो.. तोच.. एक अगम्य बाबा पुढ्यात आला.. काय कुणीकडून आलात.. कसं येणं केलं.. दिपकदादा म्हणाले मुंबई.. मुंबई.. मग जमलंच.. मि कल्याण ला होतो.. “आता माझ्या आयुष्याचे कल्याण झाले आहे.. या गडावर येवून..” “सब लिखा है.. सब कुछ लिखा है..”.. या थाटात.. त्याचे पुनर्जन्म यावर व्याख्यान चालू झाले.. महाभारतातला, “नैनं छिन्दन्ति शस्त्राणि.. नैनं दहति पावकः” .. असा हुकमी मंत्रवजा डायलॉग टाकीत त्यांनी सभेवर ताबा मिळवला.. आणि पुनर्जन्माचे दाखले देण्यास सुरुवात केली.. पार राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या पासून.. नुकतेच निवर्तलेले मोठे साहेब.. यांनी कुठे पुनर्जन्म घेतलाय याचा मागोवा ते घेत होते.. दुपारच्या उन्हात आता हा पुनर्जन्माचा जाच अती वाटू लागला.. मग.. जरा निर्वाणीच्या भाषेत या पुनर्जन्माने झपाटलेल्या गुरुपासून पिच्छा सोडविला आणि मार्कीडेय शिखराकडे निघालो.. रामतीर्थ कडून पठारावर मागे दिसणाऱ्या डोंगराला उजवीकडून वळसा मारीत मार्किंड्याच्या खिंडीकडे निघालो.. वाटेत एके ठिकाणी गोरक्षटाके आहे.. आणि पुढे उंबराचे आणि एक मोठे झाड दिसताच.. डावीकडे चढण सुरु होते.. ह्या इथवरच्या प्रवासात वाट चुकण्याचा तिळमात्र संभाव नाही अशी हि वाट मळलेली आहे.. रंजल्या-गांजलेल्या भक्तांच्या वाढत्या लोंढ्याने पायवाटेचा महामार्ग झाला आहे.. इथून दोन डोंगरांना विभागणारी एक पोर्टेबल खिंड आहे.. खिंडीच्या मधोमध अलीकडे एक कातळ थोडा पुढ्यात आला आहे…. पायवाटेने वर निघालो.. सूर्य पलीकडच्या बाजूला गेल्याने.. उन्हाच्या माऱ्यापासून मंडळाची तूर्त सुटका झाली होती.. त्यामुळे थकवा फार नव्हता.. पण गुडघेदुखीने डोके वर काढले.. मग घोडा-घोडा करीत खिंडीच्या पुढ्यातील कातळटप्प्यापाशी येवून पोहोचलो..
इथे डावीकडे दोन गुहा लक्ष वेधून घेतात.. पाण्याच्या टाक्या सारख्या वाटणाऱ्या या दोन गुहा आतून मात्र जोडल्या आहेत.. भुयारी मार्गाने.. कदाचित मार्किंडेय ऋषींची हि ध्यानधारणेची जागा असावी.. किंवा शिवकाळातील मावळ्यासाठी दबा धरून बसण्याची जागा.. पण हि आरपार गुहा मात्र लक्षवेधी आहे.. अगम्य गुहेचे रम्य दर्शन घेवून खिंडीकडे निघालो.. आता इथे पुढे.. एका ऐसपैस घळईतून खड्या चढणीची चाल होती.. हा टप्पा.. मुल्हेरजवळच्या हरगडासारखा आहे.. साधारण २०० एकशे फुटाची.. दगड-धोंड्यांची तीव्र चढण पार करताच.. आपण मार्किंड्या गडावरील दोन डोंगरांना जोडणाऱ्या खिंडीत येवून पोहोचतो.. आत इथे समोर तटबंदी दिसते आणि मागे सप्तशृंगीमातेचा डोंगर अगदी नजरेच्या टापूत आलेला असतो.. आपली वाट डावीकडची.. सरधोपट पायवाटेने.. निघायचं.. डोंगराला उजवीकडे अगदी डोक्यावर ठेवत नागमोड्या पायवाटेने अर्ध तास चालताच आपण मार्किंड्याच्या माथ्यावर येवून पोहोचतो.. इथे एक दगडी चिरा आहे आणि मागे एक अगम्य झाड.. आता उजवीकडे एका टेकडावर म्हणजेच सर्वोच्च मार्किंडेय ऋषींची समाधी आहे.. डावीकडे बाबाजींचा आश्रम आणि मध्यभागी झाडाच्या मागे पाण्याची तिन टाकी दिसतात.. सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी दुबाजूस रेलिंग लावले आहे.. थकलेल्या देहाला.. रेलिंगचा आधार देवून मार्किंडेय ऋषींच्या समाधीपाशी येवून पोचलो..
इथे निवांत एका पायरीवर रेंगाळलो आणि थंडगार वारं भोवती फेर धरू लागलं.. समोर सप्तश्रुंग मातेचा गड आणि भोवतालचा सात डोंगरांचा समूह फार सुरेख दिसतो.. दिव्य दर्शन.. शिखरावरच्या मंदिरवजा समाधीचे दर्शन घ्यावे म्हणून आत शिरलो.. इथे साष्टांग दंडवत घातले आणि गारव्याने भरलेल्या या मंदिरात दोन क्षण निवांत बसलो.. अंतर्मुख व्हावे अशीच हि जागा आहे.. साल्हेरच्या परशुरामाच्या मंदिरासारखी.. हे ऋषीमुनी एवढ्या उंच तपस्या का अरीत असत.. याचं मूळ कारण म्हणजे निरव शांतता..हेच असावे.. साल्हेरच्या सर्वोच्च माथ्यावर.. मदनगडाच्या अगम्य गुहेत.. आणि रतनगडाच्या आरस्पानी गुहेत हिच निरव शांतता ओतप्रोत भरलेली आहे.. म्हणून तर आयटीत घुसमटलेले तरुण मनाची शांतता या अशा निर्जन जागी शोधत राहतात.. आता ती खरंच मिळते कि नाही हे पाहण्यासाठी एकदा वाट वाकडी करावी म्हणजे साक्षात्कार होईलच.. बाबजी का आदेश आहे शेवटी..तो वाया कसा जाणार.. !!  
मार्किंडेय स्वामींच्या समाधीशेजारी चार क्षण थांबून.. मंदिराच्या सावलीत अल्पोपहार उरकला आणि पुन्हा पलीकडच्या वाटेने उतरलो.. तिन हिरवेगार टाके आणि समोर इमारतीचे अवशेष असलेली झोपडी पाहण्यास निघालो.. इथे या इमारतीच्या अलीकडे एक.. विहिरीसारखे पण अगदी लहान असे टाके आहे.. इमारतीला वळसा घालून गेलो.. तर इथे या झोपडीत राहणाऱ्या बाबांची जिम तिकडे होती.. एक दंड.. असा भिंतीला टेकून टेचात उभा होता.. दंडाला साष्टांग दंडवत घालून.. परत निघालो.. तर तांबडे बाबांचे जुळे भाऊ असे एक बाब समोर आले.. वत्सा कैसा आहेस.. बाबाजीना नमस्कार केला.. आणि बाबाजी कि स्टोरी ऐकू लागलो.. तर सदर बाबा चेन्नई वरून इकडे स्थलांतरित झाल्याचे कळले.. तो देवीने मला दृष्टांत दिला.. तू इकडेच रहा म्हणून सांगितले मला.. तेंव्हापासून.. दहा वर्ष इकडेच आहे.. आधी ते सप्तश्रुंग माताचे डोंगरवर आमी राहत होते.. मग मार्किंडेय बाबा ने सांगितले तू इकडे ये म्हणून.. म्हणून इकडे आले.. आठ महिने आमी गडावर राहते.. आणि चार महिने उन्हाळ्यात खाली.. रामतीर्थ पाशी.. आमचं आश्रम असते तिकडे..
तांबडे बाबांच्या या कुंभ\मेळ्यात बिछडलेल्या बाबांचे नाव होते नारायण बाबा.. आणखी एका अगम्य बाबांचा दिव्य आदेश सोबत घेवून मार्किंड्यागड उतरू लागलो.. ऊन मागे पडलं तसं झपाझप जावं म्हणावं.. तर गुडघा आता साथ देईनासा झाला.. मग सिनिअर सिटीझन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत अनंतभाऊ, मी निवांत उतरू लागलो.. सोबत ग्यारह मुल्कोकि लडकीयोंके बापूस जिसे ढुंड रहे है.. असे मुंबई चे सुपर कॉप .. उपवर विवाहोत्सुक नितीनभाऊ..
दिपकदादा आणि उप्या खाली जाऊन अर्ध तास झाल्याने.. तांबडे बाबांच्या दिव्य आदेशाची पावती आता दीपकदादा कुणावर फाडणार याचीच चिंता होती.. नितीनभाऊ सगळ्यात लहान असल्याने.. त्याच्यावर हि पावती फाडण्याचे नियतीने ठरवले होते.. कदाचित.. म्हणून खिंडीत पाउल पडते नं पडते.. तोच दिपकभाऊ गरजले.. काय राव काय टाईमपास आहे हा. नित्या तुला अक्कल आहे का.. किती वेळ.. रवळ्या करायचाय आज आपल्याला.. पावतीफाड समारंभाची नांदी नितीनभाऊंवर सुरु झाली.. आणि या लेटलतीफ नाट्याची पावती फाडायची आता माझी बारी होती.. माधवभाऊ तुम्ही तरी.. लवकर यायचं इकडे.. किती वेळ नुसता बसून होतो इकडे.. आता काय पुढे जायचं का इथेच सातमाळा सर्किट थांबवायचं तुम्हीच सांगा.. सातमाळा एक्स्प्रेसचे हे शेवटचे स्टेशन ठरणार बहुतेक अशी चिन्हं दिसायला लागली.. तसा निर्वाणी चा डायलॉग मारला.. दादा अहो गुडघा दुखत होता.. त्यात तो नारायणबाबा नितीनभाऊना.. त्यांची होणारी बायको कोणत्या दिशेला मिळणार हे सांगत होता.. मग कसं निघणार.. या वाक्याने तापलेलं वातावरण निवळलं आणि पुन्हा गड उतरू लागलो.. तर मार्किंड्या च्या खिंडीत अशी छोटी चकमक झाली.. पण चालायचंच.. बडे बडे खिंडीमध्ये छोटी छोटी बाते होती रहती है..!
बाबाजी का दिव्य आदेश पाठीशी होता.. म्हणून एक्स्प्रेस आता रवळ्या-जावळ्या कडे सुसाट धावू लागली.. खिंडीत टाईमपास झाल्याने आता नॉन-स्टोप भटकंती सुरु केली.. वीस मिनिटात मुलाने बारीकडील नाकाडावर.. आणि पुढे गुडघा दुखू लागल्याने.. अर्ध्या तासात खाली.. मुलाने बारीत पोचलो तेंव्हा चार वाजून गेले होते.. रवळ्या-जावल्याचं स्टेशन आता दूर-दूर वाटू लागलं.. सातमाळा एक्स्प्रेसचा एक (सिनियर सिटीझन्स साठी आरक्षित गुडघेदुखीवाला) डबा या मुलाने बारीत घसरणार अशी शक्यता निर्माण झाली.. मग ब्यागेतील नी-कॅपची आठवण झाली.. बघू काय फरक पडतो का ते.. चिमित्कार झाला चिमित्कार.. “तांबडे बाबा चेन्नई एकस्प्रेस्वाले”.. यांच्या कृपेने दिव्य चिमित्कार झाला.. आणि मार्किंड्या वर दुडूदुडू पडणारी पावले या नी-कॅप मुळे भराभरा पडू लागली.. रवळ्या-जावळ्याची भेट घडेल याची शाश्वती दहा मिनिटात वाटू लागली..    
मुलाने बारीत बाबाजींकडे लाडक्या यशवंती गाडीला सोडून.. मार्किंड्याकडे पाठ करून समोरच्या डोंगराकडे निघालो.. खिंडीतून डोक्यावर दिसणाऱ्या डोंगराच्या.. डाव्या अंगाने तिरपी वर जाणारी मळलेली वाट आहे.. साधारण २०-२५ मिनिटांची मध्यम चढण पार करताच आपण एका पोर्टेबल पठारावर येतो… इथून पुन्हा तिरपी वाट आपल्याला.. एका समोरच्या आडव्या कातळपट्ट्यासमोर घेवून येते.. इथवरच्या प्रवासात कण्हेर-मार्किंड्या-रवळ्या-जावल्या आणि धोडप या डोंगराच्या मधोमध लांबच्या लांब पसरलेले खोरे सतत डावीकडे दिसत असते.. समोरच्या कातळाला आता गवसणी नं घालता.. काटकोनात डावीकडे वळणाऱ्या पायवाटेने निघायचं.. आता हा समोरचा डोंगर आपल्या उजव्या बाजूला येतो.. मग पुन्हा तिरपी चढण घेत.. या कातळाच्या मध्यावर पोचायचं मग वाट पुढे सरळ जाताच आणखी एक कातळ पुढ्यात येतो.. इथे उजवीकडे जाऊन मग डावीकडची वळताच.. कातळ टप्पा लागतो हा चढला कि आपण रवळ्या-जावळ्याचे पठार गाठले म्हणून समजा.. मार्किंड्या झालेला टाईमपासची इथे भरपाई करायची म्हणून सातमाळा एक्स्प्रेसचे रवळ्याकडे जाताना लागणारे स्टेशन बायपास करण्याचे उप्या आणि दादा यांनी ठरवून टाकले होते.. पठारावर पोहोचताच.. किरकोळ चढणीचे टेकाड पार करताच रवळ्याचा डोंगर समोर मधोमध दिसू लागला.. इथे.. या डोंगराच्या उजव्या बाजूची वाट धरायची.. हि वाट पठाराच्या उजव्या काठाने जाते.. उजवीकडे.. या वाटेवर चालताना उजवीकडे वणी-धोडांबे पर्यंतचा परिसर दिसत राहतो आणि डावीकडे खुरट्या झुडुपांचे जंगल.. हि वाट या जंगलाला खेटूनच समांतर पुढे जाते.. अर्ध्या तासाच्या चालीनंतर आपण पठारावर रवळ्या आणि जावल्या यांच्या मधल्या टप्प्यात येवून पोहोचतो.. इथे दोन घरांची तिवारी वसती आहे.. अनंतभाऊनी मंडळासाठी लाकूडफाटा गोळा करून आणला होता.. तिवारी वसतीच्या अलीकडे रवळ्याला खेटूनच पठारावर ब्यागा टेकवल्या.. या पेक्षा उत्तम जागा शोधण्यापेक्षा इथेच तंबू टाकण्याचे नक्की केले.. इथे आजूबाजूला फेरफटका मारला आणि एका खडकाच्या मध्येच चूल शोधून काढली.. इकडे कार्यकर्ते तंबू उभारण्यात मग्न झाले होते तर तिकडे सूर्य रवळ्याच्या मागे अंतर्धान पावला होता.. जावल्या मात्र दोन हात दूर होता.. जणू खट्टू झाला होता तंबू पलिकडे टाकल्याने.. म्हटलं येनार.. येनार उद्या नक्की येनार.. न येवून कुठं जाणार.. पठारावर दिसणाऱ्या रवळ्या-जावळ्या जोडीचे वर्णन भाऊंच्या भाषेत सांगायचं तर.. “एक घाव दोन तुकडे.. एक गड (रवळ्या) इकडे आणि एक तिकडे (जावळ्या)”
सातमाळा एक्स्प्रेस आज तिवारी वस्तीवर मुक्कामी राहणार होती.. इकडे कार्यकर्त्यांनी पठारावरील जमुना टाक्याजवळ तंबू उभारला होता आणि चहासाठी काय दुधाची सोय होईल का ते पाहण्यासाठी मी आणि अनंतभाऊ तिवारी वसतीकडे निघालो.. या तिवारी वस्तीत म्हशींचा जोरदार राबता आहे.. त्यामुळे चहासाठी धारोष्ण दुध आयतेच मिळणार होते.. यंदा रवळ्या-जावळ्या च्या या दर्दी पठारावर.. मास्टर शेफ म्हणून अनंतभाऊनी सूत्रे हाती घेतली.. चुलीसाठी दगडांची शोधाशोध सुरु झाली तसा तंबूच्या मागे एका जमिनीतून बाहेर डोकावणाऱ्या खडकाच्या इथे एक नैसर्गिक रित्या चूल तयार झाल्याचे दिसले.. खडकाचा आडोसा आणि दोन-तीन दगडांची रचना.. इथे पातेले ठेवून या नैसर्गिक चुलीचे टेस्टिंग करण्यात आले.. २-३ टेक नंतर भांडे व्यवस्थित बसले आणि हि चूल आता मंडळाची झाली.. अनंतभाऊ मास्टर शेफ.. दिपकभाऊ मदतनीस.. नितीनभाऊ पाणक्या.. मी रिकामटेकडा.. उप्या झाला जेवण टेस्टर.. सुरुवात चहाने झाली.. तिवारी वस्तीतील म्हशीचं धारोष्ण दुध आणि मंडळाचा चहा हा अस्सा त्या रेडीमेड चुलीवर ढणढणु लागला कि त्याचा दरवळ पार तंबू फाडून आत आला.. फक्कड चहाने.. दिवसभराचा शिणवटा असा अंतर्धान पावला.. की आता उजेड असता तर तासाभरात रवळ्या सर केला असता.. यंदाच्या जेवणाला ‘मिक्स व्हेज म्यागी’ ची सुप्रीम रेसिपी आज अनंतभाऊना सुचली आणि बस्स दो मिनिट में रेसिपी तयार झाली.. साडेआठ ला जेवण करून मंडळी आडवी झाली.. पठारावरची निरव शांतता मनाला अंतर्मुख करून गेली.. शांततेच्या बाबतीत या पठाराचा नंबर म्हसाईच्या पठारानंतर लावायला हरकत नाही.. डोळ्यांवरची झापड गाढ झोप कधी झाली हे कळलंच नाही.. सकाळी रवळ्या-जावल्या करून रात्री पर्यंत धोडप च्या सोनार माचीवर पोहोचायचं याबद्दल सगळ्याचं एकमत झालं..
खडतर रवळ्या- बेलाग जावळ्या – “हि दोस्ती तुटायची न्हाय”

वाटाड्या मार्ग क्र. ६: वणी – (वणी-कळवण रोड) – बाबापूर – मुलाने गाव– मुलन बारी/घाट – खिंड – (१२-१४ कि.मी.) – उजवीकडे – तिवारी वस्ती – रवळ्या-जावळ्या
आधल्या दिवशीचा उशीर भरून काढण्यासाठी नितीनभाऊंनी सकाळी सहाला वेक-अप कॉल दिला.. अर्ध्या तासात सगळे तयार झाले.. रवळ्या वर प्रथम आरोहण मग जाव्ल्याची भेट असा दोनपदरी कार्यक्रम होता.. तिवारीवसती समोर पश्चिमेकडे तोंड करून उभे राहिल्यास रवळ्या चा पूर्वेकडची आडवी भिंत दिसते.. खाली खुरट्या झाडीचे जंगल.. आपली वाट या भिंतीच्या खाली दिसणाऱ्या जंगलझाडीत (साधारण मध्या तून चालू होते.. सुरुवातीची झाडांची रांग ओलांडली कि थोडं इकडे तिकडे फेरफटका मारताच एक वाट डावीकडे वर जाताना दिसते.. हि रवळ्या पूर्वेकडील टेकाडाला डावीकडे वळसा मारीत तिरपी वर जाते.. पुढे घसाऱ्याची वाट सुरु होताच.. एक रवळ्याच्या पूर्वेस असलेला पुढ्यातील टेकाड आणि रवळ्या गड यांना सांधणारी नाळ दिसते.. नाळेच्या सुरुवातीला उजवीकडे.. एक ट्राव्हर्स मारताच.. एक आरपार खोदलेली चौरस मुखाची आणि आत दहा-पंधरा फुट लांब गुहा दिसते.. अशीच एक गुहा पलीकडच्या बाजूस देखिल आहे.. त्यामुळे इथे आरपार गुहा होती या आख्यायिकेवर विश्वास ठेवून पुढे निघायचं..
गुहेच्या डावीकडे नाळेतून अंग चोरून वर शिरायचं.. साधारण वीस-एक फुट चढताच एक खडक पुढ्यात येतो.. आता.. डावीकडे जाऊन या खडकावर चढायचं.. त्यासाठी एक चिमणी क्लाइम्ब करायचा आणि  उजवीकडे कातळात तयार झालेल्या खोबणीतून समोर दिसणाऱ्या मोठ्या झाडाला उजवीकडून वळसा मारून वर यायचं.. आता आपण रवळ्या गडाच्या पुढ्यातील पूर्वेकडच्या टेकडावर येवून पोहोचतो.. डावीकडे वाट वळते आणि एक २०-२५ फुटांचा कातळटप्पा सुरु होतो आणि वाट संपते.. तेंव्हा जिगरबाज लोकं हा प्याच चढून दोर केंव्हा लावतील याची वाट बघत बसलो.. अनंतभाऊंनी एक सुरुवातीचा प्रयत्न केला पण उजवीकडे फ्री फॉल असल्याने.. या कातळटप्प्याची चढाई त्यांना सोडून द्यावी लागली.. दीपकदादांनी मग या प्याच चा सखोल मुवायना केला.. आणि अशक्य आहे असा निकाल दिला.. मग मी, नितीन भाऊ आणि उप्या उगाच एक शेवटचा प्रयत्न म्हणून चाल केली.. कातळाच्या खोबणीतून पाय रोवत या प्याचच्या अर्ध्यापर्यंत सहज जातं येते.. पण मध्यावर पोहोचलो कि पुढे उजवीकडे एक तिरपी रेघ आहे आणि डावीकडे पण.. डावीकडच्या रेघेत मात्र.. खोबणी नाहीत.. त्यामुळे मी वर जायचा बेत तिथेच रद्द केला.. उप्या भाऊ मात्र हा प्याच करायचाच या निर्धाराने.. उजव्या रेघेच्या खाली खोबणी पाय रोवून उभा राहिला.. आता एक मूव्ह केली कि.. प्याच सर.. उप्याने एक जोर लावला आणि प्याच सर केला.. सोबत एक ५० फुटी रोप होताच.. मग तिकडे एका जमिनीत रुतलेल्या दगडाला दोर बांधून उप्या पाठोपाठ अनंतभाऊ आणि नित्या वर गेले.. मी आणि दीपकभाऊंनी इथेच गड पाहिल्याचे डिक्लेअर केले.. इथून वर पाहताना जावळ्याची पूर्वेकडची तटबंदी दिसते.. आणि जावळ्याच्या माथ्यावरील टेकाडाकडे जाणारी वाट.. सातमाळा एक्स्प्रेसचं इंजिन उप्या आणि दोन डब्यांनी रवळ्याच्या प्याच सर केला तसा जल्लोष झाला.. अर्धा तास हा प्याच परीक्षा घेत होता.. त्यात तीन मावळे पास तर दोन काठावर पास झाले म्हणून काठावर राहिले.. बाकीचे गडाची जोरदार भटकंती करून पाउण तासात परत आले.. गडावर पाण्याची टाकी आणि टेकडावरच्या टाक्यात उपडा हनुमान आहे.. बाकी गडावर तसे किरकोळ अवशेष आहेत..
रवळ्याची भटकंती पूर्ण करून जावल्याकडे मोर्चा वळविला.. चिमणी प्याच जिवाच्या भितीने चिवचिव करीत उतरला आणि खाली गुहेच्या बाजूने रवळ्याला एक उजवीकडून वळसा मारीत छोटी प्रदक्षिणा मारली.. तिकडे आणखी एका गुहेशिवाय काही नसल्याने पुन्हा घसरड्या वाटेने पुन्हा पठारावर येवून पोचलो.. रवळ्या वरून पाहताना.. पूर्वेकडे जावल्याचा डोंगर, त्यामागून डोकावणारा धोड्प्या आणि पठाराचा एक आस्मानी नजरा आहे.. तसेच डावीकडे तवा नावाचा आणखी एक निसरडा डोंगर आहे.. म्हटलं तवा वर जाऊ पुन्हा कवा.. आता पहिल्यांदा जावल्या गड.. तिवारी वस्तीपाशी पोहोचलो.. तोवर नऊ वाजले होते.. इथे बाबांना वाट विचारली आणि मंडळासाठी पावशेर खवा सांगितला.. काका म्हणाले.. ते समोर नाक आहे ना उजवीकढलं तिथं वर जायचं आणि मग डोंगराला चिटकून डावीकडं फिरा.. मग डाव्या टोकाला.. ते तिकडं वाट फिरती.. अशी.. (अशी म्हणताना त्यांनी हाताने उजव्या बाजूची दिशा दाखवली..) तिकडे नाकावर वाट आहे..
तिवारी वसती मधून पूर्वेकडे म्हणजेच जावल्या कडे पाहताना जावल्या डोंगराचा आकार पसरट V सारखा दिसतो.. पायथ्याचं जंगल आणि डोंगराचा आडवा कातळपट्टा यांना जोडणारी रेष दुबाजूस स्पष्ट दिसते.. या V च्या दोन आडव्या पट्ट्यांना जोडणाऱ्या नाकाच्या खाली जाऊन पोचायचं.. म्हणून नाकाच्या रेषेत सरळ निघालो.. इथे थोडं उजवीकडे झाडीत शिरताच एक वाट थोडी उजवीकडे जात मग डावीकडे निघाली.. आणि मग झिग-झ्याग तिरपी चढण पार करीत करीत नाकाखाली येवून पोहोचलो.. आता V च्या डावीकडच्या टोकाकडे निघायचं.. जंगल आणी कातळ यांना सांधणाऱ्या रेषेवरून डोंगराला खेटूनच वाट आहे.. ती कुठेही फार खाली उतरत नाही किंवा वर जात नाही.. सरळ चालत राहायचं मग.. पुढे काही कातळकोरीव पण अर्धवट खोदलेल्या लेण्या दिसतात.. आणि कातळभिंती खेटून थोडंस वळसा घालताच पुढे डोंगराच नाक स्पष्ट दिसू लागतं.. या नाकावरच.. जावल्याच्या पायऱ्या आहेत..
पहिल्या नाकापासून इथे येण्यास साधारण अर्धा तास लागतो..  शेवटी वाट थोडी वर जाते.. आणि आपण या नाकाडाच्या पुढ्यातील एका खडकावर येवून पोहोचतो.. आता थेट नाकाडावरून कातळकोरीव खोबणीतून आरोहण आहे.. तीव्र चढाईची वाट असल्याने एक गूळ-पाणी ब्रेक घेतला.. आणि वर निघालो.. इथे २०-२५ फुट वर जायचं मग उजवीकडे तिरपं चढत जाताच पायऱ्या सुरु होतात.. या पायऱ्या मात्र मदन गडची आठवण करून देतात.. त्यामुळे जिवाला जपत आणि पायरीला धरत वर जायचं.. १०० एक फुट चढताच पायऱ्या डावीकडे वळून एक ट्राव्हर्स येतो.. इथे मुरमाड घसाऱ्याने धिम्याने १५-वीस फुट जाताच पुन्हा उजवीकडे.. पायऱ्या दिसतात आणि जावल्या गडाचा दरवाजा.. इथल्या पायऱ्या मात्र काही ठिकाणी तुटल्याने पुन्हा पायवाटेला हाताने धरत बेबी स्टेप्स ने दरवाजा गाठायचा.. जावल्या चा दरवाजा पाहणे हि मात्र एक पर्वणी आहे.. कातळाला आरपार बोगदा पाडून गडावर प्रवेश आहे.. बोगद्यामध्ये पुन्हा मोठ्या पायऱ्या.. दवाजात पोचलो आणि पहिल्या पायरीला हात लागताच गड सर झाल्याची पावती मिळाली.. इथे उजवीकडे एक फारसी भाषेतील शिलालेख आहे.. तो येताना पहायचे म्हणून पुढे निघालो.. भुयारासारख्या दरवाजातून आत आलं कि पायऱ्या सुरु मग भुयार.. आणि ते संपताच डोक्यावर आयताकृती चौकट दिंसते हिच गडाची वाट.. भिंतीतील चिऱ्याच्या कपारीत पावलं चढून हि चौकट चढून आलं कि आपण वर येतो.. मग मोठ्या खडकातून उजवीकडे वाट तिरपी वर जाते.. पुन्हा ७०-८० फुट वर गेल्यास आपण गडमाथ्यावर येवून पोहोचतो..  इथून पाहताना इंग्रजी व्ही या आकारचा डोंगरमाथा नजरेत भरायचा आणि डावीकडची वाट धरायची.. या वाटेने जाताना काही इमारतीचे अवशेष दिसतात आणि खुरट्या झुडूपानी भारलेले पठार.. साधारण दहा-पंधरा मिनिटात डावीकडे वाट वळते आणि समोर पाण्याची तीन हिरवीगार टाकी दिसतात.. हिच गड सर केल्याची महत्वाची खुण.. इथून धोडप.. अलीकडचा बंड्या.. त्यामागे डोंगऱ्या.. त्याच्या उजव्या अंगाला इखारा.. अशी दुर्गांची रांग दिसते आणि इथवर येण्यासाठी केलेले कष्ट.. सार्थकी लागतात.. या तीन टाक्यांच्या मागे खाली डोंगराच्या एक भली मोठी पायरी झालेली दिसते.. तिथे खाली आणखी काही पाण्याची टाकी दिसतात..
तिकडे एक भेट देवून पुन्हा मुख्य दरवाजाकडे निघायचं.. इथे फोटोग्राफीची हाउस भागवून घेतली आणि धोडपचा एक वेगळेच दर्शन घडल्याने.. सातमाळा एक्स्प्रेस काहीशी सुखावली होती.. यंदाच्या स्टेशनवर मात्र एक्स्प्रेस चे पाचही डबे बिनबोभाट दाखल झाले होते.. वाट जरी जिव्हारी होती तरी भटकंती एक्स्प्रेसने जीवाची बाजी लावून ती पार केलीच शेवटी.. यंदा सिनिअर सिटीझन्स चा जोर काही औरच होता.. नी कॅप ने चांगलाच आधार दिला होता..
एका शिखरावरून दुसऱ्या शिखराकडे हि सातमाळा एक्स्प्रेस आज सुसाट निघाली होती.. आज एका दमात दोन स्टेशन गाठून या एक्स्प्रेस ने कमाल केली होती.. आम्ही पहिल्या तिन टाक्यांच्या अल्याडच्या खडकावर रेंगाळलो.. इथे जोरदार गूळ-पाणी ब्रेक घेतला.. दुपारच्या तावलेल्या उन्हाचे हि आता काही वाटेनासे झाले होते.. असा अंतर्मुख करणारा माहौल होता.. जे काही चार सुखाचे क्षण या गडाच्या माथ्यावर दिसले ते वेचून जावल्याचा निरोप घेतला..
परतीच्या वाटेवर जमेल तेवढे अवशेष पाहून पुन्हा बोगद्याची वर उघडणारी चौकट गाठली.. दरवाजा शेजारी शिलालेख पहिला.. फारसी भाषा फारशी येत नसल्याने केवळ फोटो काढून घेतला.. एखाद्या जाणकार मुस्लिम बांधवाला गाठून याचा अर्थ जाणून घेण्याचे नक्की केले.. इथून उतरताना मात्र, आता धडधड वाढू लागली.. दरीचे एक्स्पोजर आता 3-डी स्वरुपात थेट अंगावर येवू लागले.. तसे पाय लटपटू लागले.. पण एक्स्प्रेसचे इंजिन म्हणजे उप्या एकही डबा या पायवाटरुपी रुळांवरून घसरणार नाही याची काळजी घेत होता.. त्याच्या मार्गदर्शनाखाली उतरण्यास सुरुवात केली.. उत्साही कार्यकर्ता नितीन यास हळुवार उतरण्याची ताकीद देण्यात आली.. पुन्हा ट्राव्हर्स आणि मग उजवीकडे.. काळ दाखवणाऱ्या करारी पायऱ्या.. पायऱ्यांना घट्ट धरून उतरू लागलो.. नाय हो करीत पुन्हा नाकाडाचे टोक गाठले.. आणि सरळ रेषेत खोबणीतून खाली उतरलो.. रवळ्या-जावल्याची स्वप्नवत वाटावी अशी भटकंती बाबाजींच्या कृपेने आज पूर्ण झाली होती.. जय बाबाजी..!! ज्येष्ठ नागरिक संघाचा विजय असो.. असा हि एक नारा देवून आनंद व्यक्त केला.. आता.. इथे दिपकभाऊनी एक डिसिजन मेकिंग प्रश्न उभं केला.. आल्या वाटे जाण्यापेक्षा सरळ खाली जाऊ म्हणजे लवकर जातं येईल.. मग इंजिन आणि दादा यांच्यात जोरदार डिस्कशन होवून.. दादा म्हणतील त्या रुळावरून एक्स्प्रेस जाणार असे ठरले.. इथे नाकाडाकडे पाठ करून उभे राहिल्यास थोडं उजवीकडे एक वाट खाली उतरते.. हि आपल्याला पाठाराकडे नेते.. त्या वाटेने निघालो.. झिग-झ्याग वळणाची पायवाट उतरताच.. जस जसे पठार जवळ येवू लागते तसं तशी पिवळ्या गवतात हि वाट हरवते.. आणि वीस-एक मिनिटात आपण पठारावर येवून पोहोचतो..  पठारावर आलो आणि मनात विचारांचा काहूर उठला तशी या भटकंतीवर एक कविता करून टाकली.. ताबडतोब ती अशी:
एक मुसाफिर आहे मी.. ह्या सह्याद्रीच्या वाटांचा
बेलाग अशा कड्यांचा.. कापरं भरवणाऱ्या दऱ्यांचा
दिव्य प्रकाश पहात राहतो.. भव्य अशा माथ्यावरून
कधी धापा टाकत राहतो.. निसरड्या त्या वाटांवरून
रक्तबंबाळ होतो कधी.. ठेच लागून.. काटे रुतून
 चालणं मात्र सोडत नाही.. सह्याद्रीच्या वाटे वरून
कधी स्वप्नांची फांदी.. पायवाटांवर बघत बघत
कधी पाखरासारखा उडत.. तर कधी रडत खडत
एक मुसाफिर आहे मी.. ह्या धूळमाखल्या वाटांचा
सोडून आलोय किनारा तिथे.. चाकोरीतल्या लाटांचा
पठार ते तिवारी वसती दरम्यान नितीनभाऊंची मुलाखत घेण्यात आली. .आणि भटकंती चा अनुभव कॅमेराने टिपण्यात आला.. चालता चालता आजचा सवाल “दिपक दादा नितीनभाऊंना घालून पडून बोलले का?” असा दर्दी कार्यक्रम सुरु झाला आणि बोलता बोलता तिवारी वसती कशी आली हे कळलंच नाही.. इथे खोपटीच्या सावलीत बूड टेकवलं आणि जरा वस्तीतील माणसांशी गुजगोष्टी सुरु केल्या..
इथे रवळ्या-जावल्या च्या मधील पठारावर सध्या दोन चुलत भाऊ वसती करून आहेत.. ठाकरे बंधू आणि त्यांच्या दोन झोपड्या.. मातोश्री आणि कृष्णकुंज.. असं दूरदूर नजर फेकाल तिथे इथे यांचच राज्य होतं.. प्रशस्त भव्य लांबवर पसरलेलं.. या पठारापासून त्या पठारापर्यंत.. या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत.. हिच यांची खरी श्रीमंती.. काल जरा तुटकपणे.. घुम्याने वागणारे ठाकरे बाबा आज मात्र चांगलेच बोलते झाले होते.. खोपटाच्या सावलीत बसतो नं बसतो तोच प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.. “ते रवळ्याला गेले होते नं सकाळी काय पायलं तिकडं.. तिथं एक उपडा हनुमान हाये टाक्या त्यो बगीतला का न्हाई..?” पहिला काका टाक्यातला हनुमान पायला आमी.. “आनी ते जावल्याच्या पलीकडच्या अंगाला पाण्याची लही टाकी हायेत.. आन चांगली धा-पंधरा मानसं रातील अशी गुहा बी हायेते पाहिलं कि न्हाई..” पुन्हा आम्ही.. पायलं..पायलं काका.. अशी अगदी सगळी सारासार विचारपूस चालली होती.. या सत्तरीतल्या ठाकरे बाबांची.. मोठ्या साहेबांची.. काका उन्हाळ्यात पाण्याचा त्रास होत असंल.. “कसला तरास.. गंगा जमुना (टाकं) हायेत पठारावर.. इथलं पानी कधी आटत न्हाई.. देवाचीच किरपा हाय या पठारावर.. पोरं सगळी खाली गावात राहत्यात.. योक घोडा ठिवलाय.. खवा-दुध न्याया-आनाया.. पाच-पन्नास म्हसाडी हायेत.. आणि इस-पंचइस गाई.. निभून जातंय आमचं.. त्यो हाये नं त्यो बघतोय वरून.. (टाक्यातला उपडा हनुमान) मग कशाची चिंता..!!”
ठाकरे ब्रदर्स आणि हे पठार यांचा निरोप घेवून.. रवळ्या-जावल्या स्टेशन सोडले.. आता गाठ धोडपशी होती.. तसं कण्हेरा वरून त्याला दुरून पहिला होता पण आता.. जवळून दर्शन.. सातमाळा एक्स्प्रेस आज धोडप वर थेट मुक्कामी जाणार होती..
धोडप – सातमाळेतील बलाढ्य गिरिदुर्ग
वाटाड्या मार्ग क्र. ७: वणी – बाबापूर – दुधखेड – पारेगाव – (धोडांबे रोड) – इंदिरानगर – हत्ती/हट्टी गाव धोडप किल्ला (३० कि.मी.)

धोडपची हिरकणी – सोन्याबाई
धोडपची ‘गुड मॉर्निंग सह्याद्री’ सफर करून पुन्हा सोनार माची गाठली.. आणि ब्यागा घेण्यासाठी आजीच्या वयाच्या सोन्याबाईंची पर्णकुटी गाठली.. इथे उन्हाचा कार वाढू लागला.. म्हणून सावलीत बसलो.. त्यांनी मग हंडाभर पाणी पुढ्यात ठेवलं.. आणि मग ते गटागटा पिवून तृप्त झालो.. इथे उप्याने मावशीची विचारपूस केली.. मावशे.. जरा.. आजून थंडगार पाणी दे ग मला.. देते बाबा देते.. तूझ्यासोबत इथे कोण कोण असतं.. म्हणजे नातू पणतु.. हायेत पन ते खाली गावात राहत्यात.. मि इथे एकलीच राहते.. आता इस-पंचवीस वरसं झाली असतील.. माझा म्हातारा गेला.. आठ पोरं ओटीत टाकून..  चार मुलं आणि चार मुली.. पुढ सगळ्यांची लग्न झाली.. आणि आपल्या आपल्या वाटेला लागली.. तशी मि इकडं आले.. माझ्या म्हाताऱ्याचं घर हाय हे.. इथंच मन रमतंय.. धाकला पोरगा म्हनतो.. आई चाल तू माझ्या घरला.. पण आता सवय झाली.. असं एकलं रायची.. तुला भ्याव वाटत न्हाई..!! कसलं भ्याव..!! वाघरू येतं कंदी मंदी.. मग त्याला दवडायला मीच जाते काठी घेवून.. आता सरकारनं हा दिवा लावलाय माझ्या घरावर.. तवापासनं.. जरा बरं चाललंय.. गडावर चतुश्रुंगी माता हाये ना तिलाच माझी काळजी..
कसलं भ्याव..!! म्हणताना सोन्याबाईच्या चेहऱ्यावर ची सुरकुती तसू भर सरकली नाही.. आज चतुश्रुंगीचं रुपच, जणू या धोडप च्या सावलीत आम्ही पाहिलं.. एक धीट.. करारी.. कष्टकरी.. विरहिणी.. रान-रागिणी.. अशी सोन्याबाई.. हि तर धोडपसे सवाई.. मावशे शिधा घेणार का.. काल गडावर आणला होता.. असं म्हटल्यावर.. नको बाप्पा.. राहून द्या तुमाला.. लागल पुढच्या वाटंला.. मावशीच्या हातावर पन्नास रुपये ठेवले आणि म्हटलं राहू दे मावशे.. पुना आलो की भेटू हितंच.. येतो आता.. नीट जा रे पोरानो.. ती तिकडं पठारावर मारोती हाये तिथून खाली वाट गेली बघा.. मारोती पासून उजव्या अंगाला वळा.. मग दिसल वाट..
सातमाळा एक्स्प्रेस आज या मावशी कडे पाहून थोडी भाऊक झाली होती.. असं एकटं जिणं कुणाच्या वाट्याला येवून नये.. अगदी वैऱ्याच्याही.. धीटपणाची दिव्य प्रचिती घेवून हट्टी गावची वाट घेतली.. सोन्यामावशीचा चेहरा सुरकतलेला मात्र डोळ्यासमोरून हलत नव्हता..
हट्टी गावात पोहोचलो तेंव्हा दुपारचे दिड वाजले होते.. गाईडच्या घरापासून गाडी घेतली आणि कांचन-मंचनची वाट पकडली..

कांचना-मंचना – उपडा केलेला सोन्याचा डोंगर


वाटाड्या मार्ग क्र. ८: हत्ती/हट्टी गाव – धोडाम्बे (हेमाडपंती मंदिर) – कानमंडले – खेळदरी गाव – वडारवाडी – कांचना किल्ला.. (२५ कि.मी.)
हट्टी गाव – धोडांबे कान मंडले – कांचने बारी – कांचने गाव असा एक रस्ता आहे.. किंवा.. मागील बाजूस भावडे गावावरून एक वाट आहे.. तेवढ्यात आठवलं.. उत्तम अप्पांनी मागे कांचना केला होता.. म्हटलं त्याची वाट विचारावी.. मग लगेच अप्पांना फोन लावला.. अप्पा म्हनले.. कांचनबारीच्या अलीकडे हायवे वर गावांची नवे दाखवणारा आडवा फलक आहे.. त्याच्या अलीकडे उजवीकडे एक कच्चा रस्ता जातो.. या रस्त्याने पुढे गेलं की एक वसती लागेल.. तिथं गाडी लावायची आणि कांचना वर जायचं इथून दिड-तासात लागेल तुम्हाला गडावर जायला.. वाट थोडी निसरडी आहे पण जवळची आहे.. नाहीतर कांचने गावातून फिरून येणारी वाट आहे.. आता अप्पांनी एवढं टाईम सेव्ह करणारी वाट सांगितली म्हटल्यावर.. लगेच गाडी उजवीकडे घेतली.. आणि एक वसती गाठली इथे.. वस्तीसमोरच्या शेतात लोकांची कामाची गडबड सुरु होती.. सोयाबीनची कापणी आणि मळणी.. मग त्यातल्या त्यात कमी बिझी अशा मिसरूड नं फुटलेल्या पोराला विचारलं.. दादा गडावर कसं जायचं.. तो म्हणाला असं तिथं तुमी आले ना त्या रस्त्यावर एक (वि)हिर लागल.. तिथनं उजवी वाट घ्यायची आणि असं खालनंच फुढे जायचं.. तिथं त्या शेवटच्या नाकावर चांगली मळलेली वाट आहे.. वाट चुकायची नाही एकदा गावली की..!!
विहिरीपासून निघालो आणि कांचना-मंचना चा डोंगरउतार डावीकडे ठेवत.. डोंगराला वळसे मारीत निघालो.. मध्ये एके ठिकाणी चार-दोन घरांची वसती आहे.. तिथे पुन्हा वाट बरोबर असल्याची खात्री केली आणि पुन्हा डोंगराच्या पायथ्याने अगदी खेटून जाणाऱ्या पायवाटेने निघालो.. साधारण अर्धा तासात एक सुकलेल्या धबधब्याची जोडी दिसते.. इथे मधोमध वर चढायचं आणि यातील उजव्या धबधब्याखालून आडवं जात मग धबधबा आणि शेजारचा डोंगर यांना सांधणाऱ्या रेषेतून वर चढून यायचं कि मग डावीकडे कांचनाचा मोठा डोंगर मध्ये.. ढासळनारा डोंगर आणि उजवीकडे मंचनाचा आडवा डोंगर असे दृष्य टप्प्याच्या दिसते.. इथे मधल्या डोंगराच्या खाली पाहिल्यास दरीत उतरणाऱ्या उतारावर काटेरी जाळीचा जंगलाचा A आकाराचा लांबलचक पट्टा दिसतो.. आपली वाट इथे डाव्या बाजूची A ला डावीकडून खेटून जाणारी.. जाताना वाटेत दगडांचा सडा पडलेला दिसतो.. म्हणून बेतानेच पुढे जायचं.. साधारण अर्धा-पाउण पायपीट करून आपण मधल्या डोंगराच्या खाली पोहोचतो.. इथे एक वाट उजवीकडे जाते.. तिथे वर चढून जाताच आपण.. मंचनाच्या उजव्या बाजूच्या डोंगरसोंडेवर येवून पोचतो.. इथे जरा विसावा घ्यायचा आणि समोर उजव्या डोंगराच्या पायथ्याच्या गुहा दिसतात.. आता नागमोड्या आणि घसरड्या वाटेने या गुहाकडे निघायचं.. इथून वर पोहोचायला.. साधारण १५ मिनिटे लागतात.. इथे पोचलो आणि एक शेंबडे धनगराचे पोर.. मेंढ्या चारत निवांत बसले होते.. म्हटलं येतो का वर दादा.. तर मग लगेच तयार झालं.. सातमाळा एक्स्प्रेस ला एक डबा जोडण्यात आला आणि मग शेंबडा वाटाड्या आणि दमलेली पोट्टी घेवून सातमाळा एक्स्प्रेस गुहेकडे निघाली.. पंधरा मिनिटात गुहा गाठली.. इथे कातळाच्या पोटात तब्बल ८-९ टाकी कोरली आहेत.. आत पोचलो तर इथे.. विशिष्ट प्रकारच्या लाखो किड्यांनी या गुहेच्या छतावर एक स्तर तयार केला होता.. टाक्यातील पाणी मात्र बऱ्यापैकी हिरवं झालं होतं..
इथे क्षणभर रेंगाळून मग कातळाला खेटून एक ट्राव्हर्स मारीत कांचना आणि मंचना च्या खिंडीच्या पायथ्याला आलो आता एक तीव्र घसरडी चढण पार केली कि खिंडीत.. कांचना-मंचन जंक्शन जवळ आले होते.. त्यामुळे घसरत्या वाटेला आणि दुखऱ्या गुडघ्याला न जुमानता वर निघालो.. आणि दहा मिनिटात खिंड गाठली.. इथला नजारा मात्र बेभान असा होता.. निसर्गाची मनसोक्त उधळण कांचना-मंचना वर विश्वकर्माने केल्याचे दिसले आणि त्याचा हा निसर्गाविष्कार पहात एका पायरीवर बसून राहिलो.. इथे लंच कम अल्पोपहार ब्रेक डिक्लेअर करण्यात आला.. आता इथे दोन-डोंगराच्या मधल्या खिंडीत आपण उभे असतो इकडे.. डावीकडे बेलाग कांचना आणि उजवीकडे ढासळत्या कातळाचा डोंगर म्हणजे मंचना.. डावीकडे वर जाण्यासाठी मात्र जीवावर उदार होऊनच जावे लागेल.. दरीमध्ये पडलेला दगडांचा सडा बरेच काही सांगून जातो.. इथल्या ठिसूळ खडकाचा एक्स-रे आता उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर मात्र डावीकडे वर जाण्याचे धाडस होईना.. इथे वर जाण्यासाठी मात्र.. डोक्याच्या वर उंच असा दिड-पुरुषभर उंचीचा कातळ टप्पा चढून जावं लागते.. नितीनभाऊ.. उप्या.. आणि दादा इकडे वर चढून गेले.. आणि पुढचा टप्पा जीवावर बेतणारा असल्याचे त्यांनी सांगितले.. इथे कातळात कोरलेला एक हनुमान आहे.. इथे समोरच्या डोंगर मात्र सह्याद्री चे राकट कणखर आणि बेलाग रूप सिद्ध करतो असा.. अंगावर येणारा कातळ टप्पा  इथे आहे.. वर जाण्याची वाट मात्र.. जिकिरीची.. कातळ खोबणीतून जाणारी.. खिंडीतून डोंगराला खेटून साधारण आठ-दहा फुट डावीकडे जायचं आणि मग वर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात.. इथून सरळ रेषेत थोडं उजवीकडे जायचं मग पुन्हा डावीकडे तिरपं.. कि आपण गड-माथ्यावर येवून पोहचतो.. इथे काही पाण्याची टाकी आणि किरकोळ अवशेष आहेत.. आणि डावीकडे.. एक शेंडी.. म्हणजे सुळका.. हा सुळका सर करायचा म्हणजे प्रस्तरारोहण येणे आवश्यक आहे.. इथे एक रोप त्या शेंडीला लटकत होता.. म्हणजे इथे काही अपघात झाल्याची शक्यता उप्या ने वर्तवली.. त्यामुळे इथला बेत रद्द करून पायथ्याकडे निघालो.. उतरताना आ वासून उभी अशी खोल काळदरी उरात धडधड आणि पायात कापरं देत होती.. त्यामुळे.. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सह्य सुपंथ’ हे ब्रीद मानून वाटेला जवळ करून उतरू लागलो.. अर्ध्या तासात पुन्हा खिंड गाठली.. 
  
सह्याद्रीची हि दिव्य भटकंती आज शेवटच्या टप्प्यावर आली होती.. राजदेहेर-कोळधेर-इंद्राई-चांदवड आता केवळ ह्याच सोबतींना भेट द्यायची राहिली होती.. पाचव्या दिवशी हि सातमाळा एक्स्प्रेस विनातक्रार धावत होती.. क्षितिजाच्या ओढीने.. आणि सह्याद्री बद्दलच्या अवीट गोडीने..  सह्याद्रीचा कधी कंटाळा येत नाही पावलं थकली तरी मन मात्र धावत असते.. या शिखरावरून त्या शिखराकडे.. एखाद्या गिधाडासारखे.. उंच उंच भरारी घेत.. ते सतत भिरभिरत असते.. या पावटीवरून त्या पावटीवर..
इथे मागे.. दरीचा एक सुंदर नजारा आहे.. मग इथे सावल्यांचा खेळ पाहून.. अंधाराची वेळ जवळ आल्याने घाईघाईत गड भ्रमंती करून परतीची वाट धरली.. अंधारल्या वाटेवरून पावले पडू लागली.. पायाखालची वाट मध्ये मध्ये सरकत होती.. सर्र-सर्र.. सर्र-सर्र.. तसे दोन माणसांमधील अंतर कमी केले आणि मंद गतीने काटेरी जंगल डावीकडे ठेवत पुन्हा पहिले टेकाड गाठले.. रात्री सात च्या सुमारास पायथ्याला सुखरूप पोहोचली आणि धोडप-कांचना सफर खऱ्या अर्थाने पूर्ण झाली..  
टेकाडावरून निघालो आणी दगडधोंड्याच्या वाटेने खाली जात.. सुकलेल्या जुळ्या धबधब्याखालून जाणाऱ्या वाटेने पायथ्याशी आलो.. अंधार चांगलाच पडला होता त्यामुळे चायनीज विजेरी घेवून लडखडत निघालो.. पुढे – वसतीवर पोचलो आणि चहा मिळेल या भाबड्या आशेने मालकांकडे विचारणा केली.. गायीचं दुध मिळेल का दादा चहाला.. न्हाई जनावर नाही राह्यलं आता.. आमचा म्हातारा गेला त्याच्या आजारपणात सगलं होतं नव्हतं ते गेलं.. आता ह्यो जिमिनीचा तुकडा हाये आणि त्यातच आमचा गुजारा..
यांच्या या व्यथेसमोर आमच्या त्रासाची काय कथा.. म्हणून त्यांचा निरोप घेवून पुढे निघालो.. यशवंती उभी केली त्या – वस्तीवर.. अर्ध्या तासात वस्तीवर येवून पोचलो.. तसे आम्ही गड पाहून आल्याने.. आमच्याकडून या भटकंती चा ‘आखो देखा हाल’ ऐकण्यासाठी चार-पाच मंडळी जमली.. मग सुरु झाला प्रश्नांचा आणि उत्तरांचा जोरदार सिलसिला..
गेलते का गडावर.. कसा वाटला गड.. वाट सापडली का तुमाले.. हो सापडली.. लई घसारा हाये.. वाटेवर.. आमचे तर बूट घसरायला लागले.. सटासटा.. हे ऐकल्यावर भवती जमलेल्या मंडळीतील एक वयस्क आजोबा म्हणाले.. सगळा गड पाहायला जरी म्हटलं तरी दिवसा ती बाजू चांगलीये.. रात्री काय खरं नाही.. बगू कसलं बूट घातल्यात ते.. मग नितीनभाऊंनी बूट दाखवल्यावर.. ह्या याला काय बूट म्हण्याच का.. हे बघा.. बूट असे पाहिजे.. बारीक नक्षी वाले.. आणि तुम्ही अंधारात उतरला जणू.. हो.. मग ब्याटरी होती का.. हो होती.. तीन-चार होत्या.. हि बघा ब्याटरी.. मेड इन चायना.. ह्या.. हि “’आगीची गांड”’ काय कामाची.. ब्याटरी कशी पाहिजे.. हि बगा.. वाह.. काय ब्याटरी हे.. हिकडं वडाळी भोई ला मिळती हि ब्याटरी..

आजोबा पार बेसिक मध्ये घुसले.. आणि थेट मुद्द्याला हात घातला.. आपन गडावर जातो.. तिथं जनावर असतंय.. त्यामुळे एकदम पवारबाज ब्याटरी पाह्यजे.. हि अशी.. इस किलोमीटर लांब जातेय हि.. बगा.. ट्रेकिंग करतानाचे हे बाळकडू आज इथल्या बुजुर्गाने दिले.. विषय बदलावा म्हणून एक प्रश्न टाकला.. ‘गडाचा काही इतिहास माहितेय का बाबा?’ कुठल्या गडाचा.. ह्या कांचनाचा.. जास्त काय माहिती नाय.. पण आज्या-परज्या कडून जे आईकलं ते सांगतो.. मलाही थोडसंकच माहितीये.. माहितीचा हिशोब असा झाला तो.. आआआआआ.. गोरक्षनाथ स्त्री राज्यात गेलता.. बरं का..! मि ऐकून हे.. मि काय प्रत्यक्ष पाह्येल नही.. हे जुने माणसं सांगायचे म्हणून मि सांगतो.. तवा ते आता गेल्यानंतर.. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात गेला.. पहिला.. आणि मंग गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा चेला असल्यामुळं.. चालला गुरूचा शोध करायला.. असा शोध करता करता मग.. ते.. तिकडं.. हे झाला.. त्या मच्छिंद्रनाथाला मुलगा झाला.. त्याचं नाव काय ठिवलं तेच काय माझ्या लक्षात नाही.. काननाथ का.. काय ते..(??) कानिफनाथ.. हं.. कानिफनाथ..!
मंग.. त्या स्त्रिया म्हणायच्या.. जाऊ नका म्हणे.. तिथं गोरक्षनाथ गेले.. तिथं.. ते तबला पेटी आपोआपच नाचायला लागले.. बोलो मच्छिंदर.. गोरख आया.. बोलो मच्छिंदर.. गोरख आया..!! म्हणून.. बाकीच्याला काय समजलं नाही पण मच्छिंद्रनाथाला बराबर समजलं.. आता गावाला कोट करील होता न तो.. स्त्री राज्याच्या.. कुठलं राज्य.. स्त्री राज्य.. म्हणजे मारोती ने बुभूकार केला म्हणजे सगळ्या स्त्रियाच स्त्रिया.. तेंव्हा असा व्हायचं पहिला.. असं सांगतात.. आता काही पोथी पुराणात बी हाये.. जेवढं आपल्याला वाडवडिलांनी शिकवेल.. तेवढं सांगता येतं.. मग आता तिकून आल्यानंतर.. त्या बायांनी शोक केला म्हणे तुमी जाऊ नका म्हणून.. मग त्या मच्छिंद्रनाथाचे ते पोरगा झाला ना.. गोरक्षनाथ म्हणे.. आपल्याला काय करायचं साधू व्हायला पोरं नं सोरं.. नाही नाही .. आपला लडका आहे.. म्हणे.. तुम्ही दोघं भाऊ हे.. बर चला म्हटले.. असं करता करता मग आले ह्या खाली.. याच्या पाशी.. मटन्यापशी आले.. मटन्यापशी आले.. तर तिथं.. ते इकड काय म्हणे.. बाबा परसाकडला हिकडं तिकडं बसले.. का.. झोळी काखात घे.. आणि चाल म्हणे.. बाबा का असे भेतां (भिता) म्हणे आपल्या साधू लोकांना काय भ्येव हे.. पाहते तर एक इट दिली त्या येड्या.. बायांनी.. वीट दिली सोन्याची.. मग मटन्याचे (?) म्हणे.. काय करायची आपल्याला हि सोन्याची वीट.. दिली फेकून.. पुढे देव तिकडे गेले.. त्या खर्ड्याच्या नदी मधी आणि तिकडं आंघोळी केल्या.. आंघोळी केल्या तर त्या.. तर पूर आला आणि त्यांच्या वाहूनच गेल्या त्या लुंग्या वाळत घातलेल्या.. महाराज म्हणे.. है..!! लुंगी गेली म्हणे आता ह्या नदीला तिसऱ्या वरसच पाणी राहील.. तिसर्या वर्षीच पाणी चालू राहते या नदीला..  कारण त्यांच्या नदीत वाहून गेल्या लुंग्या म्हणून.. मग ते इकडे आले कांचना कडे.. या बारीमधी.. आणि पाहिलं.. तिथे गोरक्षनाथने वीट फेकली.. किल्ला सारा सोन्याचा होवून गेला.. सोन्याचा झाल्यावर अर्र म्हणे.. पुढं मानव योनी ला फार तरास होईल म्हणे.. आ.. कापाकापी होईल म्हणे त्यांची.. खाण्यापिण्याची भ्रांत होएल.. मग.. पालथा टाक म्हणे.. पालथा.. तसा तो डोंगर त्यांनी उपडा केला.. असं काही ऐकून आहे.. बरं का..!! नाहीतर तुम्ही काय म्हणाल.. बाबा काहीबाही सांगतोय म्हणून.. ते पहा तिकडं वर जर गेलं.. तुम्ही पाहिलं ना.. नऊ टाक पहिले.. हां.. नऊ टाकं.. घोड्शाळा.. आणि दगडाचा खांब त्या शाळाला.. आणि अशी बी खाली वभडी (वाट).. बरं का जायाला.. आणि तिथे काय असल पहिले त्यांचे त्यांचे राजकारणी.. वर जायेल हे का तुमी वर गडावर.. आमी ना.. हो जायेल हे.. हो.. वरती थेट वरती शेंडीवर.. शेंडी.. हि वरती किल्ल्याची.. वर पाण्याची टाकी आहे.. गादी (आ)हे राजाची..! बुरुज (आ)हे.. तट (आ)हे.. पण वर जायाला लई अवघड वाट (आ)हे.. हे पहाहा छोकरा आमचं नातू हे.. तिकडून पुण्याहून काही मंडळी आली होती.. पाठंगुळी ब्यागा बिगा बांधून.. हा त्यांना घेवून गेलता गडावर.. ह्या पहिल्या डोंगरावर पण जाता येतं.. हा काय मंचना आहे का?.. हा कांचन हे.. आणि त्यो नऊ टाक्याच्या तिथं मंचन हे.. शेंडीवाला.. तो मंचन त्या बाजूचा.. पण मग याच्या वर काय आहे.. याच्यावरच ना ते राजांची गादी हे.. ह्या साईट ने रस्ता जायेल हे..रस्ता कसा निसरडा का सरळ.. इथून पुढे जर यायचा योगायोग आला तर मात्र ते ब्याटरी ह्या अशा पाहिजे.. नाही खोटं नही.. बाबा सल्ला बरोबर आहे.. नाही नाही एकदम रास्त सल्ला आहे. .आणि गाडी बी अशी वसती ला लावायची.. त्या बारीत लावू नका बरं.. !! का..? 
झायलो ची सवारी

ते दोन वर्षापूर्वी एका माणसाने हिथं आले होते.. कांचना किल्ला बघायला.. पुण्याचे का कुठलेतरीच होते.. त्यांची झायलो गाडी होती.. नवीन कोरी.. इथं या बारीत लावली त्यांनी.. अशे चार पाच वाजता.. आता तुम्ही कशे आले.. तशे.. या पिरीयड ला त्यांनी ती गाडी लावली.. चौघच जण होते.. ते गेले वरती.. रिमोट कंट्रोल गाडी होती.. त्यांनी रिमोट लॉक करून दिले पण गाडीचं स्पार्किंग चालू करून दिलं कुणी येवू नये म्हणून.. के उतरलो आपण म्हणजे नेमकी आपली गाडी कुठे लावली ते दिसल म्हणून.. त्या साईडचे tractor वाले कांदे विकून आले.. पाहिलं इथं.. गाडी लावेल.. म्हणून चोर आहे असं बुवा असं त्यांना वाटलं.. मग त्यांनी लगेच tractor आणला.. आणि गाडी तशीच मस्त ओढली.. ती लॉक करेल होती.. ह्यांड-ब्रेक लावेल होता.. ती तशीच फरफटत नेली.. टायर बियर सगळे फोडून टाकले.. त्यांनी.. पोलिसगाडीने पण चार पाच वेळेस गरके मारले पण कुणीच नाही.. तपास लागलं नाही.. ते दुसऱ्या दिवशी नऊ वाजता उतरले खाली.. !! आणि बारीत आले.. इथे मात्र उपस्थित लोकांमध्ये हशा पिकला.. त्यांची अवस्था पार डोळ्यांसमोर आली.. मग ती गाडी देवळा पोलिस स्टेशन ला गेली आणि मग ते लोक या कमानीखाली आले मग त्या गावात गेले तिथं एक सेपरेट पिकअप केली भाड्याची.. आणि मग पोलिस स्टेशनला गेले.. तिथं मग पुण्यावरून पैशे बोलावले.. आणि मग पुण्याला गेले.. तर अशी झाली त्यांची कांचनाची सफारी.. “झायलो कि सवारी”.. या वाक्यावर सगळे.. हसून हसून आडवे झाले.. त्या झायलो ची काय अवस्था झाली असेल याची चित्रे सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली..
कांचनाचा आणि झायलो चा भूगोल ऐकून.. यजमानांचा निरोप घेतला आणि वडाळी भोई कडे निघालो.. रात्रीचे आठ वाजले असावेत.. आज चांदवड ला लॉज मध्ये मुक्काम करून पहाटे.. राजधेरवाडीचा बेत नक्की केला.. कांचने बारीच्या अल्याड उजव्या अंगाची वसती—कानमांडले-तिथून डावीकडे-वडाळे भोई असा रस्त्यावरून दौडत दौडत.. यशवंती आग्रा महामार्गावर पोहोचली.. रात्री चांदवड ला मुक्कामासाठी लॉज गाठला.. पाय चांगलेच ठसठसत होते.. आजचा भटकंतीचा पाचवा दिवस पण.. अजूनही कंड काही जिरत नव्हता.. चांदवड जवळची दुर्ग-चौकडी पाहूनच या मोहिमेची सांगता करायचा निर्धार सातमाळा एक्स्प्रेस ने केला होता.. 

क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s