‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग १

हातगड, अंचला, अहिवंत किल्ला, कण्हेरा किल्ला

                              (६ ते १२ डिसेंबर २०१३)  

सह्याद्रीच्या दिव्य डोंगररांगा भटक्यांना कायम आव्हान देत असतात.. सातारा जिल्ह्यातील शंभू महादेव, नगर जिल्ह्यातील कळसुबाई-पट्टा रांगा, बागलाण मधील सेलबारी-डोलबारी रांग, नाशिकच्या देवभूमीतील त्र्यंबक रांग, नाशिक-चांदवड-ते-औरंगाबाद पर्यंत पसरलेल्या सातमाळा-अजंठा, इगतपुरी, घनदाट जंगलातील सातपुडा रांग, रणरणत्या उन्हात तळपणाऱ्या धुळ्यानजीक असलेल्या गाळणा टेकड्या या काही प्रसिद्ध डोंगररांगा याच मातीत उन्हं सोसत उभ्या ठाकल्या आहेत.. तर अशाच एका अजरामर भटकंती चा आंखो देखा हाल आज मि तुम्हाला सांगणार आहे.. सातमाळा रांगेची एक्स्प्रेस भ्रमंती.. सह्याद्रीची एक दिव्य प्रचिती..!!

सह्य पर्वताची माळ.. उभी साता डोंगराची
होड लागली नभाशी.. तिथं डोंगरमाथ्यांची
 उंच माथ्यावरी उभा.. एक अचल संन्यासी
बुध्याच्या शेजारी.. असे अहिवंत आभासी
काटा कन्हेरी बेलाग.. उभ्या कातळाला घोर
सात डोंगरी वसली.. सप्तश्रुंग माता थोर
शिवे रक्षिला मार्किंड्या.. राहे उंच माथ्यावरी
रवळ्या-जावळ्याची जोडी.. उभी डोंगर-पठारी
शेंबी धोड्प्याची नाचे.. सातमाळेच्या डोईला
वीट सोन्याची झेलुनी.. मेरू कांचन जाहला
राजदेहेरी सामोरी.. दिव्य इंद्राई नगरी
चंद्र्सेनाच्या डोईला.. चंद्रवडाची सावली
सह्य पर्वताची माळ.. अशी साता डोंगराची
दुर्ग-माथ्याची ही वाट.. होती दिव्य क्षणांची
सातमाळा डोंगररांग करायची तेही एका दमात असं मी आणि उपेंद्र नं कधी तरी असंच.. एका भटकंती मध्ये ठरवलं होतं.. पण नेहमी मुहूर्त चुकायचा.. मागे सप्टेंबर मध्ये सातमाळा रांगेचा बेत आखला पण एका नादान पावसाने त्याचा पार खप्पा करून टाकला.. सगळं तयार होतं.. मंडळ.. कच्चा आराखडा.. यशवंती.. पण पावसानं साऱ्याचा पार येळकोट करून टाकला आणि भंडारा उधळावा तसा तो भटकंतीचा बेत उधळला गेला.. पण सातमाळा भटकंती तेही सलग करायची असे ठरवून टाकले आणि डिसेंबर च्या दुसऱ्या आठवड्याचा मुहूर्त धरला..
पुणे–नाशिकला जाण्यासाठी असलेला सध्याचा ‘इंडियाज मोस्ट डेडलीएस्ट’ रोड सोडून ठाण्याची वाट पकडली आणि कल्याण-कसारा मार्गे नाशिक गाठण्याचे ठरले.. ठाण्याला मुंबईचा दोस्त उपेंद्र अनंतभाऊंकडे येणार असल्याने यशवंती (कार) आणि मी तिकडे निघालो.. ३ हात नाका.. आणि कुठलासा मॉल ओलांडताच अनंतभाऊ भेटले आणि मग त्यांच्याकडे निघालो.. यंदाच्या ट्रेकचा पिक-अप पॉइंट म्हणजे अनंतभाऊ यांचे घर ठरले होते.. रात्री साडे-अकराला उप्या मुंबई पोलिसातील दोन कार्यकर्त्यांसोबत मुलुंड नाक्याला आला.. दीपक दादा आणि नितीन भाऊ.. तब्बल ६+ फुट उंचीचा धिप्पाड मुंबई पोलिस पहिल्यांदाच असा LIVE पहायला मिळाला..  मग ओळखपरेड उरकताच नाशिककडे कूच केली.. रात्री ११.३० ला.. यंदाच्या मोहिमेला मुंबई पोलिसातील दोघांनी वर्णी लावल्याने.. सरकारमान्य वाटमारी केंद्रावर (टोलनाका) होणारा टोळधाडीचा जाच पुरता टळला होता.. त्यामुळे टोळनाक्यांवर टोळ भरताना होणारी चिडचिड एकदम चिडीचूप झाली होती.. नाशिक रस्ता मात्र जास्तीचे मख्खन मारून तयार केल्यासारखा वाटला.. असाच मख्खन रस्ता आमच्या पुण्याहून पण हि राजकारणी का करत नाही याबद्दल जोरदार निषेध नोंदवला आणि कसारा घाटाच्या सुरुवातीला एक ब्रेक घेतला.. इथे हर चीज बीस रुपया असा हिशोब होता.. मुंबईत ६० रुपड्यांना मिळणारा चायनामेड कार चार्जरचा भाव इकडे तब्बल १२० रुपया पर्यंत वधारला होता.. शेवटी घासाघीस करत चार्जर आणि एक डिस्को गाण्यांची सी.डी. १४० रुपयात पदरात पडून नाशिक गाठले.. सध्या नाशिक शहराच्या मधोमध जाणाऱ्या ५-६ किमी लांबीच्या रामसेतू उड्डाणपुलावरून न जाता.. खालूनच द्वारका गाठलं आणि इथून वणीकडे निघालो.. सातमाळा भटकंतीचा श्रीगणेशा हातगड किल्ल्यापासून करण्याचे आधीच ठरले होते.. “हातगड – अचला – अहिवंत – कान्हेरा – सप्तश्रुंग – मार्किंड्या – रवळ्या – जावळ्या –धोडप – कांचन-मंचन – राजदेहेर – कोळधेर – इंद्राई – चांदवड” असा मारुतीच्या शेपटासारखा लांबलचक मेगा प्लान आधीच ठरवून टाकला होता.. त्यामुळे पायाचे तुकडे पडले तरी चालतील पण एका सलग भटकंतीतच सातमाळा रांग पूर्ण करण्याचा निर्धार पक्का होता..
यंदाच्या मोहिमेला तिघांकडे android मित्रमंडळाचे मोबाईल्स असल्याने रस्ता विचारण्याचा प्रश्नच नव्हता.. रात्री अपरात्रीच्या या प्रवासात हा (मोबाईल वरचा) गुगल नकाशा आमच्यासाठी एखाद्या वाटाड्याचे काम करीत होता.. गाडीमध्ये १०० किलो वजनी गटातील पैलवान नितीनभाऊ बसल्याने.. यशवंती (गाडी) तशी नाराजीनेच चालत होती.. अधून-मधून वाटेत आडवा येणाऱ्या गतिरोधकाला घासून यशवंती जास्त वजन झाल्याचा संदेश देत होती.. म्हणून नितीनभाऊंना पुढच्या सीटवर बसण्यास सांगितले आणि यशवंतीचे नखरे कमी झाले.. वाटेत इंडियन-ऑइल नामक कंपनीचलित इंधन पुनर्भरणी केंद्रावर यशवंतीची टाकी फुल्ल केली आणि विनाथांबा सातमाळा मोहीम एकदम झोकात सुरु झाली..   

हातगड – दूर देशीच्या डोंगररांगांचा देखणा रंगमंच

वाटाड्या मार्ग क्र. १: नाशिक – (नाशिक-सापुतारा रोड) – वणी – (नाशिक-सापुतारा रोड) – बोरगाव – हातगडवाडी – हातगड (७५ कि.मी.)
नाशिकच्या द्वारकेतून पुढे जाताच डावीकडे वणीचा फाटा आहे.. तिथून साधारण अर्धा कि.मी. पुढे आणि तिथून उजवीकडे जाताच वणीचा एकपदरी रस्ता सुरु झाला.. आणि मोठ्या गाड्यांचा आतंक सुरु झाला.. ट्रकवाल्यांचा आतंक.. भसकन अंगावर येणे.. डोळ्यावर उच्चतम प्रखर प्रकाशझोत टाकणे.. रस्ता आपल्या परमपूज्यांनी बांधल्याचा गोड समज करून बाजू न देणे.. आदी अतिरेकी कारवाया सुरु झाल्या तेंव्हा यशवंतीचा वेग कमी केला आणि गपगुमान हातगड च्या दिशेने धिम्याने मार्गक्रमण केले.. नाशिक-दिंडोरी-वणी-सापुतारा मार्गाने.. ७०-८० किमी चा प्रवास करून पहाटे सहाला हातगडच्या पायथ्याशी येवून पोहोचलो.. एखादा चहा मिळतो का ते पाहायला एका टपरीवाल्याला उठवलं तर.. ‘दुध यायचंय अजून’ असा तक्रारीचा सूर ऐकताच.. गड कुठे आहे असा प्रश्न केला.. ‘हे काय समोर.. गाडी जाते गडावर’.. इथून दिसणाऱ्या दोन मध्यम उंचीच्या डोंगरातील उजवीकडचा डोंगर म्हणजे हातगड.
आनंदा स्पे. व्हेज हॉटेलच्या पुढून जाणाऱ्या उजवीकडच्या कच्च्या रस्त्याने निघालो, कठडे नसलेल्या कच्च्या रस्त्याने पुढे जाताच एक जोरदार यु टर्न मारताच हातगडचा कातळकडा डोक्यावर ठेवत डावीकडे वळायचं.. मग रस्ता संपतो.. तिथे थेट पायऱ्या सुरु झाल्या तशी यशवंती तिथेच उभी करून निघालो.. रस्ता संपताच सरळ पुढे तिरप्या चढणीने ट्रेक सुरु झाला.. दहा-पंधरा मिनिटात एक ट्राव्हर्स मारीत तुटलेला दरवाजा दिसू लागतो.. इथे एक शिलालेख भग्नावस्थेत असून जमीनदोस्त झाला आहे.. इथून पायऱ्या सुरु होतात.. आणि गडाचा पहिला कातळकोरीव दरवाजा दिसू लागतो.. इथे उजवीकडे कपारीत बाबाजींची ध्यानगुंफा आहे आणि पाण्याचं एक टाके.. इथून पुढे जाताना कपारीतील ताशीव पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो आणि मग काटकोनात वळताच गडाचा तिसरा दरवाजा पार डोंगराला आरपार भोक पडून खोदल्याचे दिसते.. इथून वर जाताच आपण गडाच्या पहिल्या स्तरावरील असलेल्या किल्ल्यावर येवून पोहोचतो.. इथून उजवीकडची वाट धरायची.. इथे एका टेकडावर असलेल्या भग्न वाड्याची इमारत लक्ष वेधून घेते तिकडे निघायचं वाटेत पाण्याची मोठी दोन तळी दिसतात.. यांना गंगा जमुना टाके असं म्हणतात.. यातील सगळ्यात मोठ्या तळ्याच्या अलीकडे उजवीकडे वर जाणारी वाट आहे.. ती आपल्याला बालेकिल्ल्यावर घेवून जाते.. भग्न इमारतीच्या समोरून पुढे जाणारी पूर्वेची वाट हातगडाच्या निमुळत्या माचीकडे जाते.. इथे शेवटपर्यंत जाण्यास दहा-पंधरा मिनिटे लागतात.. वाट संपेपर्यंत चालत राहायचं.. शेवटापर्यंत जाताना इमारतीचे जोते दिसतात आणि तटबंदीचे किरकोळ अवशेष.. शेवटाला मात्र एक मस्त नजारा आहे.. सातमाळा रांगेचा.. पहिला दिव्य नजारा.. तवल्या डोंगर त्यामागे डोकावणारा अचला.. त्यामागे धूसर सप्तश्रुंग आणि मार्किंड्या.. कधीकाळी इथे चार भक्कम दरवाजे अस्तित्वात होते असे इतिहासकार सांगतात.. सध्या तरी यातले दोन दरवाजे पाहण्यास मिळतात.. किल्ल्यावर एखाद्या मनोऱ्यासारखे दिसणारे भग्न धान्यकोठार देखिल आहे..

डावीकडे (उत्तरेकडे) मात्र बागलाण रांगेचा दूरवरचा पसारा डोळ्यांना उमगत नाही तरी त्यातील साल्हेर-सालोटा हि किल्लेद्वयी शोधण्यात मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना यश आले.. हि डोंगर रांग पार गुजरातेतील डांग प्रांतापर्यंत पसरलेली आहे.. ह्या भागात देखिल काही अपरिचित किल्ले दडून बसलेले असल्याची शक्यता आहे.. हातगड किल्ल्यावर इतर पाहण्यासारखे अवशेष म्हणजे गंगा-जमुना टाके.. एकांडा टेहळणी बुरुज / मनोरा.. महादेव मंदिर.. आणि पश्चिम बाजूची विस्तीर्ण तटबंदी.. हातगडाचा पसारा तसा बऱ्यापैकी आहे.. गडफेरी मारण्यास तासभर पुरे.. हातगड हा एखाद्या रंगमंचासारखा आहे.. बागलाण, सुरगणा प्रांत आणि सातमाळा डोंगररांग तसेच काही उपरांगाचे मेगा दर्शन घडते ते फक्त हातगडावरूनच.. म्हणून सातमाळा भटकंती मध्ये वाकडी वाट करून आल्यास, सह्याद्रीच्या दिव्यतेची भव्य प्रचीती आल्याखेरीज राहणार नाही..
उगवतीच्या किरणांनी उजळून टाकलेली सात डोंगराची माळ पाहून हातगडचा निरोप घेतला..पुन्हा मधल्या दरवाजापाशी आलो तर बाबाजी सकाळचं कोवळं उन्ह खात बसले होते.. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.. पण बाबाजी ध्यानस्थ होते त्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून प्रश्नचिन्ह म्यान करून टाकले..  
हातगड किल्ल्याचा इतिहास हा सुरत लुटीच्या दुसऱ्या मोहिमेशी जोडला गेला आहे.. सुरतेवरून परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हातगड भेट दिल्याचे gazetteers सांगतात.. हातगड मार्गेच त्यांनी बागलाण मोहीम उघडली आणि साल्हेरची लढाई तसेच वणी-दिंडोरी महासंग्राम आणि कांचनेबारीची घनघोर लढाई हा इतिहास सातमाळा डोंगरराजीतच घडला असे gazetteer मध्ये नमूद केले आहे.. पेशव्यांच्या काळात रंगराव औन्ढेकर यांच्या कडे किल्ल्याचा ताबा होता.. त्यावेळेस सुपकर्ण भिल्ल याने या गडाला वेढा दिला होता.. त्यावेळेस किल्लेदाराने हा हल्ला परतवून लावला.. आणि चिडलेल्या सुपकर्ण भिल्लाने पायथ्याचे गाव पेटवून आणि पळ काढला असाही एक इतिहास आहे..
अंचला किल्ला / अचलगड – घसरत्या वाटा आणि दुर्गमतेची भव्य प्रचीती

वाटाड्या मार्ग क्र. २: हातगड – (सापुतारा-नाशिक रोड) – अहिवंतवाडी फाटा – पिंपरी अचला – पिंपरीपाडा – (३० कि.मी.) – अचला किल्ला


हातगड किल्ल्याची सहजसुंदर भेट घेवून अचला कडे निघालो.. हातगड वरून पुन्हा वणीकडे निघालो वाटेत डावीकडे एक अहिवंतवाडीचा फाटा फुटतो.. हाच रस्ता पुढे वणी-सप्तश्रुंग रस्त्याला जाऊन मिळतो.. आपली वाट पिंप्री अचला गावातून पुढे जाणारी.. ‘पिंप्री अचला’ हे अचला किल्ल्याच्या जवळचे गाव.. सध्या अचला लगतच्या बारीतून म्हणजेच खिंडीतून नवीन रस्त्याचे काम सुरु झाले आहे.. बिलवाडी कडे जाणारा रस्ता.. पण सध्यातरी फक्त १० टक्के काम झाल्याने.. पायी जाण्याशिवाय पर्याय नाही.. साधारण दोन-एक वर्षात थेट बारी पर्यंत गाडी रस्ता होणार असल्याचे कळले.. पिंपरी अचला गावात शिरताच पुरुषभर उंचीच्या विरगळ लक्ष वेधून घेतात.. आणि चौकशी करताच त्या इथवर  कशा आल्या याबद्दल कोणालाच  फारशी माहिती नसल्याचे कळले.. पुढे निघालो. पिंपरी अचला गावातून पुढे जाताच डावीकडे एक आश्रम शाळा लागते, त्या समोरूनच जाणारी कच्ची सडक आपल्याला अचला आणि उजवीकडच्या डोंगराला जोडणाऱ्या बारीत घेऊन जाते.
शाळेपासून पुढे निघालो आणि एक ओढा ओलांडताच थोडं पुढे उजवीकडे शेताडातून जाणाऱ्या मोटोक्रोस रोडने निघालो. हा रस्ता मात्र अतिशय खराब दर्जाचा होता. त्यामुळे खड्ड्यातून रस्ता शोधताना यशवंतीच्या नाकी नऊ आले. साधारण अर्ध्या कि.मी. च्या ऑफ रोडिंग चा थरार अनुभवत अन्चला आणि उजवीकडचा डोंगर यांच्या मध्ये अगदी पायथ्याशी असणाऱ्या दोन घरांच्या वसतीवर येऊन पोचलो. यशवंतीला झाडाच्या सावलीत दावणीला बांधलेल्या बैलोबाच्या शेजारी उभी करून इथल्या काकांना अचला कडे जाण्याचा रस्ता विचारला.” खिंडीकडे बोट दाखवत ते म्हणाले’ “अंचलावर जायचंय ना.. हितनं समोर फुड जावा.. बारी (खिंड) लागल तिथं सतीमाईचे मंदिर हाये तिथनं डावीकडनं वाट गेलीय गडाकडे. नाकाडावरून चढलं कि उजव्या अंगाला वळायचं मगं पुन्हा डावी कढनं धारेवर चढलं कि पायऱ्या गावत्यात”.. तडक  निघालो सूर्य डोम्बल्यावर मुर्दाडासारखा रान पेटवत चालला होता, त्यामुळे भटक्यांच्या सुसाट सातमाळा एक्सप्रेसची पार डकाव-डकाव शटल झाली होती. दोन घरांच्या वस्ती वरून खुरट्या झुडुपांच्या मिनी जंगलातून वर जाताच बारीकडे (खिंडीकडे) जाताच कच्चा रस्ता डावीकडे जाताना दिसला. रस्त्यावरून चालत जाताना वळणावर डावीकडे एक पायवाट फुटलेली दिसते. हि वाट डावीकडे तिरपी वर चढत आपल्याला खिंडीत नेऊन सोडते. इथे एका पत्र्याच्या शेडमध्ये सतीमातेचे मंदिर आहे. मंदिराच्या सावलीत क्षणभर विसावा घेवून मग पुढे डावीकडे नाकाडावर जाणारी खड्या चढाईची वाट धरली..
डोक्यावर उन्हाने थैमान घातले होते.. भर थंडीतले हे, अघोरी उन्हं उभ्याने पिवूनच मग भटकंती सुरु केली.. साधारण उजव्या अंगाने तिरप्या वर चढत जाणाऱ्या वाटेने ३००-४०० फुट चढताच एक पठार लागले आणि इथे डावीकडे विनाछपराच्या मंदिरात भक्तांना आशिर्वाद देणाऱ्या मारोतीचे दर्शन घडले.. इथे समोरच असणाऱ्या खुरट्या झुडुपाच्या सावलीत उन्हाने लाही लाही झालेले मन आणि शरीर थंड केले.. त्यावर गूळ आणि पाण्याचा शिडकावा करून पठारावरून उजवीकडे निघालो वळसे मारीत जाणाऱ्या पायवाटेने.. पण अचला कडे जाणारी वाट काही सापडेना.. मग आणखी पुढे जाताच बऱ्यापैकी झाडी सुरु झाली..
इथे एक तरुण तडफदार मेंढपाळ.. शेळ्या हाकीत असल्याचे दिसले.. दुरूनच त्याला आवाज दिला तसं तो डोंगर वाटांवर धडपडणारी वाट चुकलेली मंडळी पाहण्यासाठी जवळ आला.. म्हटलं दादा अचला चा रस्ता कोणता? अन्चलाची वाट.. हि काय मागं नाकावरची वाट.. असे म्हणून त्याने झाडाच्या मागे अंगावर आलेल्या नाकाडाकडे अंगुलीनिर्देश केला.. हि वाट.. !! आता हि खाडी चढण या रणरणत्या उन्हात कशी चढावी याचा विचार सुरु केला.. तेंव्हा उगाच वाटांचा खोळंबा नाकी म्हणून त्या पोराला बरोबर घेतले.. पोरगं गड दाखवायला तयार झालं.. तसे तडक निघालो खडी चढण चढताना मात्र सातमाळा एक्स्प्रेसची आता मात्र बैलगाडी झाली होती.. बैलगाडी तरी बरी म्हणायची.. मि आणि अनंतभाऊ ‘स्लो बट स्टेडी’ हे तत्व मानून पुढे निघालो.. उपेंद्र ने वाटाड्या बरोबर आघाडी घेतली होती.. दीपक भाऊ मात्र, ‘का आलो उगाच’..!! अशा जड मनाने पावलं टाकीत होते.. तरी एखादी गार वाऱ्याची झुळूक येवून जायची आणि एक भरारी देवून जायची.. अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दगडधोंडे कोसळल्याचा टप्पा आला आणि इथे उजव्या कातळावर चढून जाणारी वाट अंचलाकडे निघाली.. इथवर येणारा रस्ता मात्र तीव्र चढाईचा असा होता.. कातळावर चढून उजवा ट्राव्हर्स मारीत निघालो आणि उजवीकडे तिरप्या वर चढणाऱ्या पायऱ्या सुरु झाल्या.. पण डावीकडे चांगलाच घसारा होता.. पाय सरकला कि थेट ५००-६०० फुटांची घसरगुंडी आणि एक अटळ गच्छंती.. त्यामुळे अनवाणी चढाई सुरु केली.. पायऱ्या संपल्या आणि एक आणखी ट्राव्हर्स सुरु झाला.. इथे मात्र पायाला कापरं भरलं.. कारण वाटच तशी होती.. पायाखालचा मुरूम सतत सरकत होता.. नितीनभाऊ मात्र उत्साहात वाटचाल करीत होते.. त्यांना सबुरीचा सल्ला दिला आणि धिम्याने हा टप्पा सर केला.. पुढे खुरट्या गवताची वाट सुरु झाली आणि उजवीकडे उतरला थोडी झाडी दिसू लागली.. वाटाड्या म्हणाला आला अंचला किल्ला.. म्हटलं कुठाय? हे काय इथे पुढं टाकी आहेत.. तसा उतारावरच्या झाडाच्या सावलीत एक हक्काचा ब्रेक घेतला.. उत्साही मंडळी डावीकडे आणखी काय अवशेष मिळतात ते पाहण्यासाठी निघून गेले.. इथून बिलवाडी गाव आणि एकमेकांची साथ देत उभ्या अशा डोंगररांगा दिसू लागल्या.. उप्या आणि मी मात्र सावलीतून टाक्याकडे निघालो.. इथे सात टाक्यांचा समूह आहे.. यातील काही टाक्यामध्ये कमान कोरल्याचे दिसते.. पाणवठ्यावर सापांचा वावर परीचयाचा असल्याने थबकत पावले टाकीत टाके पाहून घेतले.. आणि परतीची वाट धरली..
मध्यंतरी अचला-अहिवंत वर काही अपघात घडल्याचे ऐकून होते.. ते या घसरड्या वाटांनी सिद्ध केले त्यामुळे पावले भक्कम झाल्याशिवाय पुढे जायचे नाही हा निर्धारच करून टाकला.. त्यामुळे उतरताना थोडा उशीर झाला पण ‘जीव सलामत तो गड पचास’ हे प्रमाण मानून धीम्यानेच चाल कायम ठेवली.. यंदा सिनिअर सिटीझन्स क्लब मध्ये अनंतभाऊ सामिल झाले होते त्यामुळे निवांत उतरणं सुरु होतं.. संध्याकाळ होण्याआधी अहिवंतचा माथा गाठायचा असल्याने तडक निघालो.. येतानाचा मार्ग मात्र अंचलाच्या पहिल्या नाकावरचा म्हणजे खिंडीतून दिसणाऱ्या नाकाडावरचा होता.. सरळसोट.. तीव्र उताराचा.. तासाभरात पुन्हा एक घर वाडी समोर येवून पोहोचलो.. इथवर पोहोचलो तेंव्हा दुपारचे ४ वाजले होते.. त्यामुळे वसती वरच्या वाटाड्या काकांचा निरोप घेवून अहिवंतवाडी रस्त्याने पुढे निघालो.. मध्ये एके ठिकाणी चौकशी केली तर एका काकांनी दरेगाव कडून जावा सोपी चाल आहे.. असं सांगितलं आणि दरेगाव कडे निघालो.. पाउण तासात दरेगाव गाठलं..
दिवस मावळायला अजून तब्बल दोन घटिका शिल्लक होत्या.. त्यामुळे अहिवंतवर लगेच जाऊन तिथल्या गुहेत मुक्काम करण्याचा प्रस्ताव आला.. पण दिवसाला दोनच किल्ले करायचा मनसुबा आज सफल झाल्याने.. परत तिसरा किल्ला चढायचं आता जीवावर आलं होतं त्यामुळे दरेगाव च्या मारोती मंदिरासमोर तंबू उभारण्याचे नक्की केले आणि दिवसभराचा शिणवटा इथल्या धरणाच्या पाण्यात बुडवण्यासाठी सप्तशृंग रस्त्यावर निघालो.. यशवंती थेट धरण भिंतीवर उभी करून.. अभ्यंगस्नानाचा मिनी प्रोजेक्ट लौंच केला.. धरणभिंतीवर एक नेढं खुणावू लागलं.. हे ‘मोहिंद्री चे नेढे’.. इथे या डोंगरावर पाण्याचे टाके आणि हे नेढं असा आणखी एक ट्रेक होऊ शकतो पण प्लान मध्ये याचा समावेश नसल्याने ‘पुन्हा केव्हातरी’ या तत्वाने.. अचानक मित्रमंडळ आयोजीत ‘मोहिंद्री भ्रमंती’ चा कार्यक्रम बासनात गुंडाळला..  
धरणाच्या कडक थंडगार पाण्यात अभ्यंगस्नान उरकताच नांदुरीच्या अलीकडे एका हॉटेलात अल्पोपहार उरकून पुन्हा दरेगाव गाठलं.. इथं पहिले तर मंदिरात हि भाऊगर्दी.. आज इथे कसलीशी सभा आयोजित केली होती.. तिथल्या काही तरुण कार्यकर्त्यांना विचारलं, “भाऊ म्याटर काय आहे”.. !! आज इथे डोंगरदेवाची पूजा याबद्दल मिटिंग आहे.. डोंगरदेव..!! पत्रकार अनंतभाऊ यांनी घेतलेला या डोंगरदेव आणि पावरी नृत्य यांचा आढावा हा असा आहे..
डोंगरदेव आणि पावरी नृत्य
डिसेंबर (मार्गशीर्ष) महिन्याच्या पौर्णिमेस इथे आदिवासी लोकांचा म्हणजे ठाकर लोकांचा डोंगरदेवाचा उत्सव असतो.. पौर्णिमेच्या उत्सवाआधी ७ दिवस गावातले कर्ते पुरुषमंडळी ओसरीवर झोपतात आणि स्वत:चे जेवण स्वत:च तयार करतात.. कोठारी (मामा) देतील तेवढ्याच ओंजळभर मक्याच्या फुल्या.. म्हणजेच लाह्या खावून डोंगरदेवाची आराधना करतात.. प्रत्येक गावाचा प्रत्येकी एक डोंगरदेव.. पायथ्याच्या जवळचा डोंगर म्हणजे त्यांचा डोंगरदेव..
हा एक आठवडा म्हणजे प्रत्येक गावात एक जल्लोषाचा आठवडा.. इथे गावातील मंदिरासमोर गावकरी पावरी नृत्य सदर करीत डोंगरदेवाला आर्जवं घालतात.. पावरी म्हणजे पुंगीसारखे वाद्य, पण शेवटाला (पुंगीसारखे) निमुळते नं ठेवता त्याचं तोंड सनईसारखं उघडं ठेवलं जातं.. असं हे एक आदिवासी लोकांचं पारंपारिक वाद्य.. हेच वाद्य वाजवणारे खानदेश-बागलाणात पुंगालीया म्हणून ओळखले जातात.. तर अशा या पावरी वाद्याच्या तालावर आदिवासी बंधू-भगिनी ठेका धरतात.. आणि डोंगरदेवाची उपासना करतात.. पौर्णिमेच्या पावरी नृत्याची मजा काही औरच असते.. या दिवशी पुराणकाळातील वेशभूषेनुसार इथली लोक वेशभूषा करतात.. कुणी पुतना मावशी.. कुणी कृष्णदेव.. कुणी रावण.. तर कुणी शंम्भूदेव.. अशी देवाधीदेवांची मांदियाळी या पावरी नृत्याने ठेका धरते आणि परिसर मंगलमय होवून जातो.. पत्रकार अनंतभाऊ यांनी दिलेल्या बातमीनुसार या नृत्याचे वारली, कोकणी नृत्यकलेशी साधर्म्य आहे..
या डोंगरदेवाच्या उत्सवाची सांगता मार्गशीर्ष पौर्णिमेला बोकडाची मान कापून होते.. हाच डोंगर देवाचा नैवेद्य.. इथल्या भागात शेळ्या-मेंढ्या पालन हा पारंपारिक व्यवसाय आणि या भागातले दुर्भिक्ष्य पाहता.. उन्हाळ्यात शेळ्यांना मिळणारा चारा हा फक्त डोंगरावर उपलब्ध असतो त्यामुळे.. डोंगर म्हणजे आदिवासी लोकांचा तारणहार.. म्हणून कदाचित डोंगराला देव मानण्याची प्रथा पडली असावी.. असे वाटते..

आठ वाजले आणि डोंगरदेव उत्सव नियोजन सभा ऐरणीवर आली.. त्यांना उगाच आपला व्यत्यय नको म्हणून आम्ही एक फेरफटका मारण्यास निघालो.. तासाभराची रपेट मारून पुन्हा परत आलो तर मिटिंग संपण्याच्या बेतात होती.. बोकडाची मान कापण्याचा मान कुणाला तरी मिळाला होता.. इथे मंदिराच्या डाव्या अंगावरील पहिल्या घरात रात्रीच्या जेवणाची सोय लावली होती.. जेवण करून पुन्हा मंदिरापाशी आलो आणि पावरी चा सुमधुर आवाज कानी पडू लागलं.. आज खास पाहुण्यासाठी.. म्हणजे आमच्यासाठी इथे पावरी नृत्याची रंगीत तालीम होणार होती.. गावातले तरुण पावरीवर ठेका धरू लागले आणि आपसूक मन त्या तालावर डोलू लागले.. शहरी रॉक च्या थोतरीत मारेल अशी हि धून होती.. चंद्राच्या पिठूर चांदण्यासारखी मनावर फुंकर मारणारी.. आज अहिवंतवर नाही गेलो हे बरे झाले एका अर्थी.. पावरी नृत्याची अशी पर्वणी चित्रगुप्ताने नशिबाच्या डायरीत लिहून ठेवली असेल कदाचित.. सातमाळा एक्स्प्रेस दरेगावच्या डोंगरदेव स्टेशन वर आज मुक्कामी होती.. ती या चित्रगुप्तामुळेच..
सातमाळा भटकंती चा पहिला दिवस आज सार्थकी लागला होता.. देखणा हातगड, घसरत्या वाटांचा अन्चला आणि हे अहिवंत च्या पायथ्याचे मनोहारी पावरी नृत्य..
 
अहिवंतगड, टिंगरी आणि बुध्या – सातमाळेतील महादुर्ग आणि त्याचे सगेसोबती

वाटाड्या मार्ग क्र. ३: पिंपरीपाडा – पिंपरी अचला – अहिवंतवाडी – नांदुरी रोड – अहिवंतगड (८-१० कि.मी.) किंवा पिपरी अचला – वणी रस्ता – वणी गाव – नांदुरी रस्ता – खिंडीतून डावीकडे – दरेगाव – अहिवंत गड पायथा

सातमाळा रांगेतील सगळ्यात मोठा किल्ला कुठला असे जर कुणी विचारले तर अहिवंतगड हे त्याचे खरे उत्तर असेल.. अहिवंत गडाच्या क्षेत्रफळाच्या मानाने त्यावरचे अवशेष मात्र फार तुरळक म्हणायला हवे.. या अहिवंतगडाला एक जोडकिल्ला देखिल आहे बुध्या / स्थानिक लोक याला बुंध्या.. बुंधला म्हणतात.. अहिवंत वर जाणारे ट्रेकर मात्र बुध्याची वाट विसरतात म्हणूनच उप्याने बुध्या आणि अहिवंत करायचे नक्की केले होते.. सकाळी आठ-साडे आठ ला सुरुवात केली.. यंदा वाटाड्या म्हणून दरेगावातील दोन चुणचुणीत पोरं सोबतीला होती.. दरेगावातील चौथी-पाचवीत शिकणारी हि मुलं आज वाटेला सोबत होते.. अगदी शाळेचा युनिफॉर्म घालून टापटीप.. दरेगावातून खेटून उभ्या असलेल्या आडव्या डोंगराकडे पाहताना डावीकडे दोन तीन सुळके लक्ष वेधून घेतात.. उजवीकडे आडवा सिनेमास्कोप पसरलेला अहिवंत.. C आकारात वळण घेणारा.. अहिवंतचा भला मोठा पसारा ध्यानी येतो .. आपली वाट हि तीन सुळक्यांच्या पायथ्यापासून थोडं खाली उजवीकडे ट्राव्हर्स घेत आडवी खिंडीकडे जाणारी..

दरेगाव सोडलं आणि सिमेंट रस्त्याने पुढे निघालो.. रस्ता सोडून डावीकडे तीन सुळक्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या टेकडावर जाणारी वाट धरली.. हि वाट मात्र सौम्य श्रेणीच्या घसाऱ्याची होती त्यामुळे पावले झपाझप पडू लागली.. पोरं मात्र आम्हाला लाजवू लागली एवढी झपाझप चालत होती.. पण उभ्या उभ्या ब्रेक घेत चाल करीत गेलो.. आणि तीन सुळक्यांच्या डावीकडे असणाऱ्या टेकडावर आलो.. इथून आता वर न जाता उजवीकडे नजरेच्या रेषेत चालत राहिलो.. तीन सुळके डावीकडे डोक्यावर ठेवून.. खिंड दिसू लागली तशी पायवाट वर जावू लागली.. हा टप्पा खानदेशातील भामेर जवळच्या रव्या-जाव्याच्या खिंडीसारखा आहे.. खिंड चढून वर आलो आणि एक हक्काचा ब्रेक घेतला आता उजवीकडे अहिवंत आणि डावीकडे बुध्या.. लेफ्ट कि राईट असा यक्षप्रश्न.. उप्या लेफ्ट म्हणाला..
अहिवंताचा दोस्त बुधला / बुध्या – बुध्याची वाट तशी खड्या चढाईची आणि घसाऱ्याची.. बेलाग अशी.. त्यामुळे हि वाट चढताना अतिउत्साहाला मुरड घालूनच वाट चढावी.. खिंडीतून डावीकडे पाहताना पार डोक्यावर बुध्याचा एकांडा बुरुज दिसतो.. थोडं डावीकडे जाताच पायऱ्या सुरु होतात आणि हृदयात धडधड.. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक कातळटप्पा आहे.. तो पार केला कि १५-२० नेटक्या पायऱ्या पण अलंग-मदन स्टायील पायऱ्या.. आणि मग उजवीकडे नागमोडी वर जाणारी घसाऱ्याची वाट.. “पाऊल घसरलं कि खेळ खल्लास अशी बेलाग वाट”, इथे आव्हान देत उभी ठाकली होती.. वाट तशी नेटकीच होती पण वाटेवर वाढल्याने पिवळ्या गवताने तिची भेदकता द्विगुणीत झाली होती इतकंच.. पावलांनी गवत घासून वाट करीत बुध्याच्या माथ्याकडे निघालो.. पंधरा-वीस मिनिटात एक बुरुज दिसू लागला आणि उत्साह दुणावला.. आणि तो दांडगा बुरुज गाठला.. या बुरुजावरून अहिवंत गड आणि आजूबाजूचा परिसर पाहणे हि एक पर्वणी आहे.. सातमाळा एक्स्प्रेसच्या या प्रवासातले बुध्या नावाचे स्टेशन हे बेलाग आणि देखणे आहे.. इतकं देखणं.. कि ‘प्रेमात पडावे अशीच कलाकुसर..’ सह्याद्रीने या बुध्यावर केली आहे..

बुरुजाच्या पुढे गेल्यास.. तटबंदीचे अवशेष दिसतात आणि एक टाके.. या टाक्याला वळसा घालून एक वाट तिरपी माथ्यावर जाते.. माथ्यावर इमारतीच्या जोत्याचे अवशेष आहेत.. आता मनाचे विमान करून इथवर चढलो खरा पण हि पिवळ्या गवताची सरसर सरकणारी वाट उतरायची कशी याचा विचार करून लागलो.. ते म्हणजे असं झालं की, “एक घाव दोन तुकडे.. थोडे इकडे थोडे तिकडे आणि बुध्याचा घसारा पाहून भाऊंना भरले फेफडे..!!”
अनवाणी पायाने बुध्याची उतरण सुरु केली.. खाली दिसणारे ३००-४०० फुटांचे एक्स्पोजर सारखं भीती देत होते.. पण सगळे एकमेकांची साथ देत उतरत होते.. एक टीम वर्क.. सेफ्टी फर्स्ट.. या उक्तीने धिम्यानेच बेबी स्टेपने उतरत पायऱ्या गाठल्या आणि सुटकेचा निश्वास सोडला.. पिवळ्या घसाऱ्यातून सहीसलामत सुटका.. पायऱ्यांवर दोन घटका विसावलो आणि पुन्हा खिंडीत येवून पोहोचलो.. खिंडीतून आता अहिवंत्यावर जायचे होते.. इथून उजवीकडे पाहताना डोक्यावर दिसणाऱ्या डोंगरांत काही पायऱ्या खोदल्याचे दिसून येते.. थोडं उजवीकडे जात वरची कातळकोरीव वाट धरायची आणि पायऱ्या गाठायच्या.. एकदा ह्या पायऱ्या चढल्या कि आपण अहिवंतगडाच्या माथ्यावर येतो.. इथून किरकोळ चढणीची वाट घेवून मग डोंगरमाथा डावीकडे ठेवत काठाकाठाने चालत राहायचं.. समोर दूर दिसणाऱ्या टेकडाकडे.. ह्या टेकाडाला ‘सोनटेकडी’ असे म्हणतात.. या सोनटेकडीच्या डावीकडेच अहिवंतवर राहण्याच्या गुहा आहेत.. पण या गुहेत मध्यंतरी भरारी संस्थेचा एक गिर्यारोहक पाय घसरून मृत्युमुखी पडला आहे असे उप्याकडून ऐकण्यात आले.. त्यामुळे गड पहायचा पण जरा जपूनच.. साधारण वीस-एक मिनिटांच्या चालीनंतर आपण अहिवंतच्या एका मध्यावर येवून पोहोचतो.. इथेच अल्पोपहाराचा बेत ठरला.. १ संत्रे.. ३-४ गाजर.. गूळ आणि भरपेट पाणी.. असा ऐवज पोटात जाताच पुन्हा तरतरी आली आणि टेकडी कुठाय.. कुठाय टेकडी.. करीतच सोनटेकडीकडे निघालो.. या सोनटेकडीवर सोनं सापडतं अशी खबरबात गावकऱ्यांनी दिली होती.. म्हटलं बघू काय प्रकार आहे ते.. म्हणून तिकडे निघालो.. आमचं खरं सोनं हे भटकंती नंतरची मन:शांती असल्याने.. या टेकडावरच्या सोन्याची आस तसूभर नव्हती.. सोनटेकडीच्या अलीकडे.. एक पाण्याचे टाके.. भग्न वाड्याचे अवशेष आणि सप्तश्रुंग माता मंदिर आणि एका झाडाखाली हनुमानाचे मंदिर आहे.. बिनछपराचे मंदिर.. टेकडीवर मात्र.. या सोन्याच्या लालसेपायी .. जोरदार उत्खनन केल्याचे दिसले.. टेकडीला डावीकडून वळसा मारीत पुढे गेलो.. इकडे ती अपघातप्रवण गुहा आहे.. टेकाडाच्या मध्यावर एक दोन मोठी झाडं दिसतात इथे डावीकडे एक कातळ दिसतो.. आणि खाली खोल दरी.. सह्याद्रीची भेदकता अधोरेखित करणारी अशी काळदरी.. इथेच सोप्या श्रेणीचा कातळ उतरून गुहेत पोहोचतं येते.. पण हे धाडस अंधारात करून नये.. आणि केले तर सुरक्षितता पाहूनच चाल करावी.. कारण.. कातळ उतरताच ३००-४०० फुटांची जीवघेणी घसरगुंडी आणि काळदरी आ वासून उभी असते.. गुहेत पोहोचलो आणि इथून अहिवंतचा एक वेगळाच नजारा पाहायला मिळतो साधारण ६० अंशांच्या कोनात जोडले गेले असे दोन कातळकडे आणि मध्ये खाली उतरणारी दरी.. दरीकडे पाहताना मात्र जरासं गरगरतं इतकंच..
इथे दुर्घटना घडून कायमचा सह्याद्रीवासी झालेल्या भरारी संस्थेतील त्या ट्रेकिंग बांधवाला श्रद्धांजली वाहून पुढे चाल केली.. पुन्हा टेकाडाला वळसा मारून टेकाडाच्या मागच्या अंगाला येवून पोहोचलो इथून काल पाहिलेला अंचला किल्ला आणि मध्ये एक डोंगर दिसतो.. इथे एक अष्टकोनी आकाराचे बाळांतीणीचे बांधीव टाके आहे आणि शेजारी बाळांतीण देव.. घोड्यावर बसलेल्या या देव आणि देवीच्या या मूर्तीचे मल्हारी मार्तंडाशी साधर्म्य आहे.. मूर्ती अर्धी भंगली असली तरी अजून देखणी आहे.. आणि इथले पाणी अवीट गोडवा आणि गारवा असलेले असे दिव्य  पाणी.. टाक्याचे थंड पाणी पिऊन सोनटेकडीला प्रदक्षिणा मारली आणि गडाच्या उत्तरेस निघालो इथे उजवीकडे काही गुहा आणि दारुकोठार आहे.. इथे एके ठिकाणी सोबतीस आलेल्या चिल्ल्या पिल्ल्यांचे जोरदार फोटोसेशन केले आणि पुढे निघालो.. इथे फोटो काढताना एक बारक्या म्हणाला अरे.. इकडे हेर.. फोटू काढताहेत आपला.. इकडे हेर (पहा).. बारक्याचं हेरून झालं आणि पुढची चाल केली.. इथे पुढे डोंगराला एक मोठी स्टेप आहे.. या वरच्या डोंगराला तटबंदी दुहेरी तटाचा जिना आहे.. हाच गडाचा मुख्य दरवाजा असावा.. इथून खाली पाहताना एक पाण्याचे मोठे टाके दिसते.. या टाक्यापासून पुढे जाताच डावीकडची वाट धरावी.. हि वाट पुढे यु-टर्न मारून खाली उतरते.. इथे एक छानशी गुहा आहे.. हि मुक्कामाला चांगली अशी गुहा आहे.. म्हणजे त्या डेडली गुहेपेक्षा सुरक्षित अशी गुहा.. ह्या गुहेकडून उतरताना.. आपण डोंगर उजवीकडे ठेवत उतरतो आणि.. उतरताना बुरुजांचे अवशेष दिसतात.. इथे एक आधुनिक बारीचे/खिंडीचे काम सुरु आहे.. कालांतराने इकडेही रस्ता होणार हे नक्की.. डोंगराला उजवीकडे डोक्यावर ठेवत निघालो. आणि बारीच्या अल्याड येवून पोहोचलो.. इथून मात्र वाटाड्याने सगळ्यांना घसरत्या वाटांनी नेवून घसरगुंडीची हाउस पुरी केली.. दीपक भाऊ एके ठिकाणी जोरदार घसरले आणि त्यांच्या हाताने कट्टी केली.. पण भाऊंनी स्वतःला सावरले आणि सातमाळा एक्स्प्रेस अहिवंत प्रदक्षिणा मारून पुन्हा दरेगावात दाखल झाली.. दुपारचे २.३० वाजले असावेत.. तातडीने.. कण्हेरगडाकडे निघालो.. रामजी पांगेरा यांच्या रणझुंजार लढ्याने पावन झालेला असा कण्हेरगड.. नेढ्याचं कोंदण ल्यायलेला कण्हेरगड आमची वाट पहात होता..
कण्हेरगड – नेढ्याचं कोंदण आणि रामाजींची रणदुल्लाखानाशी झुंज

वाटाड्या मार्ग क्र. ३: वणी – नांदुरी गाव – आठंबे गाव – सादाडविहीर गाव (१०- कि.मी.) – किल्ले कण्हेरा


सुरतेच्या दुसऱ्या मोहिमेवरून परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली आणि या भागातील अनेक किल्ले स्वराज्यात सामिल केले.. हे सहन न झालेल्या औरंगजेबाने दिलेरखानाला तीस हजारी फौज देऊन महाराजांवर चाल करण्यासाठी निघाला.. त्या वेळी कण्हेरगडावर गस्तीसाठी रामाजी पांगेरा हे सुमारे ६०० मावळे घेवून डोळ्यात तेल घालून मोघल सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. रामाजी पांगेरा, इतिहासाच्या पुस्तकातले एक हरवलेले पान.. याच रामाजी पांगेरा ने.. अफझलखान वधा नंतरच्या लढाईत जावळीच्या जंगलात आदिलशाही सैन्यावर हल्ला करून त्यांचे शिरकाण केले होते .. असा हा शूरवीर रामाजी पांगेरा..  

दिलेरखानाने कण्हेरगड परत घ्यायच्या उद्देशाने गडाला विळखा घातला.. या वेढ्यावर अचानक छापा टाकण्याची आणि मुघल सैन्याला बेसावध गाठून सळो कि पळो करून सोडण्याचा गनिमी कावा व्यूहरचना किल्लेदार रामाजी पांगेरा यांनी आखला. मोगल सैन्य संख्येने हजारांच्या घरात होते. माघार घेणे तुळजाभवानीच्या लेकरांना माहित नाही शत्रू संख्येने  कितीही मोठा असला तरी त्याच्या पायात खोडा बांधण्याची कला महाराजांनी सोबतीच्या मावळ्यांना पुरेपूर शिकवली होती.. 

त्यामुळे काळोखात पहाटे  रामाजी पांगेरा आणि सोबतीच्या ६०० मावळ्यांनी मोगलांच्या भल्यामोठ्या सैन्यावर अचानक यल्गार केला. अचानक पडलेल्या वाघांच्या छाप्याने मोगल सैन्य बावरले. सहाशे मावळ्यांनी त्यांच्या पेक्षा दुप्पट मुघल कार्यकर्ते कापून काढले. पराक्रमाची शिकस्त केली. संख्येने कमी असूनही मराठे मागे हटले नाही. साडे-तीन प्रहर कण्हेरगडाच्या पायथ्याला हा रणसंग्राम सुरू होता..कण्हेरगडचा महासंग्राम.. रामाजी आणि त्याच्या मराठ्यांनी शौर्याची कमाल केली. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि तीस हजारी मुघल सैन्याशी झुंज घेत ‘हिंदवी स्वराज्य’ यज्ञात प्राणांची आहुती दिली..

सभासदाची बखर यात या लढाईविषयी लिहिलेले वाक्य हा रणसंग्राम आणि त्याची भेदकता अधोरेखित करते, ते असे की “टिपरी जैसी सिमगीयाची दणाणते तैसे मराठे कडाडले..  शिमग्या ला हलगी वर टिपरी वारंवार कडाडते अगदी तसे मुठभर पण रणझुंजार मावळे मुघलांच्या सेना सागरावर कडाडले.. तसेच एकदा मराठी फौजांचे मोहोळ उठले म्हटल्यावर मुघल सैन्याला शिमगा करण्याखेरीज काही काम उरत नसे.. हेही तितकेच खरे..!!

सोबतच्या ग्याझेटीअर्सची चाचपणी केली आणि कण्हेरगडाचा अनोळखी इतिहास असा सामोरी आला.. पण हा कण्हेर गड वणी जवळचा की चाळीसगाव जवळचा याबद्दल काही ठोस माहिती मिळत नाही.. लगेच पुढची गाडीवाट नक्की केली.. दरेगाव-नांदुरी-आठम्बे-सादाड विहीर-कण्हेरगड असा एक मार्ग आहे.. दुसरी वाट पलीकडच्या बाजूने मुलाने बारीतून जाते,, कण्हेरगड वाडीतून.. पण डोंगराला वळसा घालुन जाण्यापेक्षा सोपी वाट निवडली.. फक्त सादाड असे नाव ऐकताच पोटातले खादाड कावळे जागे झाले.. कालच्याच तर्रीबाज हॉटेलात येवून खाव-खाव करू लागले.. तशी उसळ पाव.. आणि पाव-वडा.. भजी अशी जोरकस ऑर्डर दिली.. सातमाळा एक्स्प्रेसचे डबे या मेजवानीने तृप्त झाल्याचे पाहून कण्हेरगडकडे कूच केली.. सादाड विहीर गावातून वाटाड्या म्हणून येतंय का विचारलं तर दोन बारकी पोरं तयार झाली मग त्यांना सोबत घेतलं आणि तडक गडाकडे निघालो.. साधारण दुपारचे साडेतीन झाले असावेत.. सादाड विहीर गावातून १-२ किमी चा टप्पा पार करताच डावीकडे काटेरी झाडांचे एक जंगल दिसते हिच कण्हेरगडाची वाट.. यशवंतीला एका मोरीच्या कठड्यापाशी उभी करून लगोलग २-३ ब्यागा उचलल्या आणि कॅमेरे सरसावून कण्हेरगडकडे निघालो.. पण उत्साहाच्या भरात वाटाड्या म्हणून घेतलेल्या पोरांनी आम्हाला काटेरी जाळीत घुसवले.. आणि पार रक्तबम्बाळ करून टाकले.. म्हटले अरे हि झाडं कुठली तर ते म्हनले याला ‘गंगुताई’ म्हणतात.. बारीक-सारीक पोरे त्या काटेरी कमानीतून अलगद निसटून जायची आणि आमच्या सारखे.. ढोलबच्चन बरोबर काट्यांच्या तावडीत सापडायचे.. अशी.. दहा-पंधरा मिनिटांची रक्तरंजीत वाट चालताना गंगुताईने पार सगळ्यांचा ढोल वाजवला होता.. थोडं पुढे गेलो आणि राजमार्ग सापडला.. आता खाडी चढण सुरु झाली हा टप्पा चढताना तिकोनाची चढण आठवली.. अगदी सेम टू सेम चढण ह्या कन्हेराची आहे.. म्हणजे.. आपण उजव्या बाजूच्या कण्हेरा आणि डावीकडच्या डोंगराला जोडणाऱ्या खिंडीत पोहोचायचं आणि मग.. उजवीकडे.. तीव्र चढणीने.. कन्हेराचा माथा गाठायचा.. तिकोनाचा राजमार्ग साधारण हा असाच आहे..
खिंडित आलो आणि समोर उंचपुरा धुडप/धोडप किल्ला दिसू लागला.. मावळतीकडे झेपावणाऱ्या सूर्याच्या तिरप्या किरणांनी धोडप कसा उजळला होता.. थोडंसं गोरा-मोरा होवून आमच्याकडे पहात होता,, कवा येणार दादा.. म्हटलं येनार.. उद्या तुझ्याकडेच आहे पाहुणा म्हणून मुक्कामाला.. आज रामजींचा कण्हेर पाहून येतो.. तो पर्यंत तू आमच्याकडे हेर.. आम्ही तुला हेरतो (पाहतो).. खिंडीत पोहोचलो आणि सातमाळा एक्स्प्रेस ची पुन्हा एकदा मुंबई पुणे शटल झाली.. आता तीव्र चढणीच्या वाटेवर ती अनेक स्टेशन घेत पुढे जाऊ लागली.. मुरमाड वाट, अंगावर येणारा तीव्र चढ आणि पायाखालची सरकणारी वाट असा तिहेरी संकटांचा सामना करीत पुढे निघालो.. आधीची मुरमाड वाटणारी पायवाट अचानक खडकाळ झाली आणि गड जवळ आल्याची कुणकुण लागली तसा एका विशाल अश्वत्थ वृक्षाच्या सावलीत गूळ-पाणी ब्रेक घेतला.. इकडे सिनिअर सिटीझन्सला सवलत म्हणून १५ मिनिटे ‘कुणालाही न जुमानता’ एक जोरकस ब्रेक घेतला.. दिपकदादा पुढे निघून गेले आणि त्यांचा ह्या अचानक लांबलेल्या ब्रेकने त्यांचा पुतळा झाला. त्यामुळे झाल्या प्रकारची पावती नितीनभाऊवर फाडून पुढे चाल केली.. सूर्य मावळायला चांगला दिड तास अवकाश होता आणि गड असा-तसा जवळच आला होता..  इथे गावकऱ्यांनी घसाऱ्यावर उतारा म्हणून फावड्याने पायऱ्या तयार केल्या होत्या.. त्या नसत्या तर हि चढण चढताना आणि उतरताना सातमाळा एक्स्प्रेस दोन पावलांच्या रुळावरून घसरण्याची दाट शक्यता होती.. त्यामुळे.. कण्हेरगड कुदळ-फावडा संघटनेच्या अनामिक प्रतिनिधींना या कामगिरीबद्दल धन्यवाद देवून पुढे निघालो.. पंधरा मिनिटात.. कण्हेराचा बुरुज दिसू लागला आणि पावलांचा वेग वाढला.. पण इथे वाटाड्या मित्रमंडळी समोरची कातळाची वाट सोडून डावीकडे.. चकाचक मुरमाड वाटेने डावीकडे निघाले.. थोडं पुढे जाताच एक रॉक प्याच आणि तो चढताच कातळकोरीव पायऱ्या सुरु झाल्या,, म्हटलं गड सर होणार आता.. पायऱ्या आहेत म्हजे आता झालंच काम.. गडावर पोहोचल्यातच जमा .. पण कसलं काय.. याच पायऱ्यांवर पुढे ट्राफिक-जाम झाला आणि काय प्रकार आहे हे ध्यानी येण्याच्या आधीच वाटाड्या म्हणून आलेले १२-१४ वर्षांची पोरं सरसर पुढे निघून गेली.. इथे पिवळ्या निसरड्या गवताची वाट होती.. आता हि पोरं तरातरा निघून गेल्याचे पाहून दीपकभाऊ आणि नितीन भाऊ पुढे निघाले.. पण जसजसं पुढे जाऊ लागले.. तसतसं पायाखालची हि वाट सटकू लागली.. पहिला टप्पा हाच १२-१५ फुटांचा रॉक प्याच होता.. समोर कातळकडा दिसत होता.. उजवीकडे वाट होती.. आणि एक खुरटे झाड.. पण बाकी आनंदच होता एकंदरीत.. बर आता परत जावं म्हटलं तर पाय घसरण्याची पुन्हा शक्यता.. उजवीकडे हा अशी घसरण किती आहे ते पहावं तर पुढे गेलेल्यांचा आधीच चेकमेट झालेला.. मग आता पुढेच जाणे इष्ट म्हणून कळपाच्या मागेमागे निघालो.. झाडाच्या बुंध्याशी बऱ्यापैकी ग्रीप होती.. पण खाली ४० एक फुटांचा फ्री फॉल.. परतीचे दोर केंव्हाच कापून टाकले होते.. ह्या झाडापाशी आलो आणि कार्यकर्त्यांची हा स्क्री चढताना होणारी ससेहोलपट.. हालेहाल.. पाहून पायात गोळा आला.. तो तसाच थोपवला.. उप्याला म्हटलं दादा शेवटून येतो.. तू हो पुढे.. एकेक करून कार्यकर्ते धक्क्याला लागले.. आता नितीनभाऊ आणि मी.. या झाडापासून वर २५-३० फुटांचा ६० अंशांचा स्क्री प्याच होता.. मध्यभागी एक खडकाचा तुकडा तेवढा आशेचा किरण म्हणून त्या सोनसळी गवतातून बाहेर डोकावत होता.. वर काही खुरटी झुडुप.. वाकुल्या दाखवीत उभी होती.. आणि तरुण तडफदार वाटाडे आमची वाट लावून केंव्हाच वर पायवाटेवर चढून.. हा सिनिअर सिटीझन्स चा स्क्री क्ल्याम्बिंग चा गमतीदार खेळ पहात होते.. नितीनभाऊ त्या आधार खडकावर पोहोचले आणि मनाचा हिया करून.. पिवळ्या गवतावर अनवाणी चढू लागलो.. आधाराला.. एक दगड नाही.. बर पायवाटेला धरावं तर घसरगुंडी नक्की.. एका जागी उभं रहाव तर पाय सटकतोय.. मग.. एका जागी जास्त न थांबता.. सरसर निघालो.. त्या खडकाला गवसणी घालायला.. एकदाचा तो खडक हाती लागला.. तर तिथे नितीनभाऊनी ट्राफिक जाम केलेला.. म्हटलं चला.. चला पटकन वर चला.. त्या खडकाला जीव खावून पकडले आणि होता नव्हता तो जोर लावून वर आलो.. आणि पायवाटेवर दोन हात आणि दोन पाय यांचा पुरेपूर वापर करीत.. मुख्य पायवाटेला स्पर्श केला.. हि होती घसरत्या वाटांची कहाणी फाटेश रिशी पकुर कि जुबानी.. साठ घसरत्या पावलांची कहाणी हि अशी.. निरुत्तर करून सफल संपूर्ण झाली.. ज्युनिअर वाटाड्या मित्रांनी मुख्य पायवाट लांब सोडून हा असा खडतर मार्ग निवडला.. इथे बत्ती गूल व्हायची वेळ आली होती..
पाणी पिवून पुढे निघालो.. आमचा पाणी ब्रेक संपेपर्यंत दिपकभाऊ आणि बाकी मंडळी वर गेली होती.. मि नितीन फक्त मागे राहिलो होतो.. कन्हेरगड माचीचा कातळकडा उजवीकडे डोक्यावर ठेवत.. थोडं तिरपे वर जाताच.. पायऱ्या सुरु झाल्या आणि माची जवळ येवू लागली.. माचीवर आलो आणि आणखी एक कडा दिसू लागला.. निमुळता.. उजवीकडे २०-२५ फुटी कातळकडा.. समोर दिसणाऱ्या कातळकोरीव पायऱ्या.. डावीकडे खोल दरी.. दरी आणि कड्यामध्ये जेमतेम आठ-दहा फुटांचे अंतर.. इथे एक जोरदार कळ पोटरीतून उसळली आणि नितीन भाऊंना म्हटलं जरा वज्रासन घालून पुढे जाऊ.. वज्रासन घालून बसलो आणि उजवीकडे सहा फुटावर सळसळ आवाज झाला.. दोन क्षण शांतता आणि पुन्हा सळसळ सळसळ.. तसा तडक उठलो आणि पुढे गेलो.. उजवीकडे पाच फुटांवर या सळसळ सळसळ आवाजाची महानायिका घोणस मागे कड्यावर चढू पहात होती.. कदाचित ती दबा धरून होती.. कदाचित भक्ष्य शोधायला निघाली होती आणि माणसं आडवी आली.. पण मी थोडं पुढे गेल्याने ती बावचळली आणि आता ती, मी आणि मागे नितीनभाऊ सुरक्षित जागा शोधू लागलो.. घोणस हि आक्रमक असल्याने आम्ही जागीच खिळून राहिलो.. आणि ती कुठे जाते याचा अंदाज घेवू लागलो.. शेवटी तिनेच हा चेकमेट सोडवला आणि पाच-सहा फुट समांतर ती कड्याच्या आणि जमिनीच्या भेगेतून आडवी पुढे निघाली.. पिवळ्या गवतातून सळसळत.. मागे नितीनभाऊ पण जागीच खिळून होते.. तसा मीही..!! पांढराशुभ्र रंग.. कॅरम बोर्डाच्या सोंगट्यासारखे आखीव-रेखीव गोल ठिपके.. आणि पाच-सहा फुटांचं ते अतिविषारी जनावर पाहून.. कॅमेरा गळ्यात असूनही काही सुधारलं नाही.. मग ती घोणस आपल्या वाटेने निघाल्याचे पाहून या मिस कण्हेराचा एक ओझरता फोटो कॅमेराबंद केला आणि ती घोणस.. एक मोठ्या दगडाखाली दडून बसताच.. नितीनभाऊ आणि मी सोबतच निघालो.. आज दोनदा.. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. याचा तासाभरात दोनदा प्रत्यय आला..
इथून झपाझप पावले टाकीत पायऱ्या चढून वर आलो आणि कण्हेरगडचे नेढे दिसले.. घोणस इतक्या जवळून पाहिल्याच्या धक्क्यातून या नेढ्याने मला बाहेर काढले.. इतका सुंदर नजारा या ठिकाणी आहे.. डावीकडे दिसणारया डोंगररांगा.. जिकडे पाहावे तिकडे ऑक्टोपसच्या आठ पायासारख्या इतस्तः पसरलेल्या डोंगरसोंडा.. अध्ये मध्ये उंचावणारे डोंगर.. आणि अशाच एका डोंगराच्या आड मुक्कामाला निघालेले सूर्यदेव.. डावीकडे तर.. धोडपचा वन पिस नजारा.. समोर रवळ्या जावल्या ची जोडी.. मध्ये बंड्या १ आणि २.. धोडप आणि कण्हेरगडाच्या मध्ये असलेले खोरे.. त्यात अधून मधून डोकावणारे हिरव्या शेताडाचे औरस-चौरस तुकडे.. चित्रासारख्या दिसणाऱ्या रेखीव वाडी वस्त्या.. मध्येच’ सापासारखे नागमोडी वळणे घेत जाणारे घाट रस्ते.. हिरव्या-पिवळ्या  रंगाचा शालू नेसलेली वसुंधरा.. आजूबाजूची चार टाळकी सोडली तर माणूस नावाचा प्राणी नाही.. असं एक मेगा निसर्गचित्र या नेढ्यातून पाहायला मिळतं.. त्यात घोणस पाहून आल्यास हे चित्र आणखी आशादायक वाटायला लागतं.. असो.. “बघू नका रागानं.. आज घोणस पहिली वाघानं.. त्यात कण्हेर चढलाय घसरत्या वाटेनं..”
नेढ्यातलं मावळतीचे गारे-गार वारं पीत बसलो.. दिवसभराचा शिणवटा घालवत बसलो.. तसे दीपकभाऊंचे फर्मान आले.. अंधार पडायच्या आधी चला वर.. नेढ्याशेजारी.. दुहेरी तटाचा कातळी जिना दिसतो.. हा जिना चढताच.. दोन खांबांचा दरवाजा दिसू लागतो.. पिवळ्या गवतातून दबकत पावले टाकीत पुढे निघालो आणि सोपे प्रस्तरारोहण करीत थेट दरवाजा गाठला.. इथे पुढे.. पाण्याची टाकी दिसतात.. इथे जरा बुड टेकवलं तर पुन्हा सळसळ.. पुन्हा उठलो.. उत्साही मंडळी म्हणजेच नितीनभाऊ आणि अनंतभाऊ गडकोटाचा चप्पा-चप्पा पाहण्यास निघून गेले.. आम्ही मात्र निघालो नेढ्याची धुंद अनुभवायला.. त्या निसर्गनिर्मित कलाकृतीकडे निघालो..
भले बुरे जे घडून गेले.. विसरून जावू.. सारे क्षणभर.. चला विसावू या वळणावर.. या वळणावर.. असं आपसूकच वाटावं.. इतकं हे नेढं देखणं आहे.. इथे पोहोचलो आणि मावळतीचा दिव्य प्रकाशाने नेढं उजळून निघालं होतं.. दिव्यतेची येथ प्रचिती.. हिच माझ्या सह्याद्रीची महती.. या इथे आज या ठिकाणी अनुभवायला मिळाली..
कण्हेराची दिव्य भटकंती करून सूर्य मावळ्याच्या आधी पायथ्याकडे निघालो.. यशवंती बिचारी.. ओढ्याकाठी एकटी होती.. त्यामुळे तिकडे निघालो.. मघाशी वर येतानाच या मुरमाड वाटेने इशारा दिला होता.. त्यामुळे.. बेताने उतरण सुरु होती.. पुन्हा खिंडीत पोहोचलो तर सूर्यदेव दिवसभर उन्हाच्या पाट्या टाकून डोंगराआड निघून गेले होते.. अंधाराची सय त्या गंगुताईच्या काटेरी रानात सर्वत्र पसरू लागली लागली.. तशा दोन एक ब्याटरया काढून ती वाट उतरू लागलो.. यंदा वाटाड्या पोरांनी चांगली वाट धरली होती.. ती शेवटापर्यंत आम्ही सोडली नाही आणि अर्ध्या तासाच्या उतरणीनंतर पुन्हा गाडीरास्त्यावर येवून पोहोचलो.. आता मुक्काम सप्तशृंग गडावर.. पोरांना पुन्हा गावात सोडलं आणि सातमाळा एक्स्प्रेस च्या वाटेवरचे हे कण्हेरगडच्या पायथ्याचं स्टेशन (सादाड विहीर गाव) सोडलं..
रात्री दहाच्या सुमारास सप्तशृंगगड गाठला.. इथे हॉटेल पाह्यजे का हॉटेल अशी विचारणारी बरीच माणसं आडवी आली.. पण आमचं स्टेशन भक्त निवास होतं त्यामुळे वाटेवरची खर्चात पडणारी आलिशान  स्टेशनं बायपास करून सातमाळा एक्स्प्रेस थेट भक्त निवासी येवून थांबली.. महाप्रसादाची सोय नितीनभाऊनी आधीच पाहून ठेवली होती त्यामुळे.. लगोलग थोबाड धुवून भुका लागल्याने.. जेवणास निघालो.. शिरा.. वरण-भात, २ पोळ्या आणि रस्सा भाजी.. असा जंगी प्रसाद भक्तांसाठी तयार होता.. भटक-भूणग्या लेकरांनी तृप्तेच्या ढेकरांच्या फैरी वर फिर झाडताच.. हक्काची आणि सुखाची झोप घेण्यासाठी भक्त निवास गाठला.. 

क्रमशः .. 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s