राजधेर – कोलधेर – इंद्राई – चांदवड
वाटाड्या मार्ग क्र. ९: खेळदरी गाव – मंगरूळ गाव – टोलनाका – नाशिक-आग्रा महामार्ग – चांदवड – आग्रा महामार्ग (८-१० कि.मी.) – इच्छापुर्ती गणपती मंदिर – वडबारे गाव – राजधेरवाडी.. (२५-२७ कि.मी.)
वाटाड्या मार्ग क्र. १०: चांदवड – आग्रा महामार्ग (८-१० कि.मी.) – इच्छापुर्ती गणपती मंदिर – वडबारे गाव – राजधेरवाडी.. (१०-१२ कि.मी.) – इंद्राई किल्ला
वाटाड्या मार्ग क्र. ११: चांदवड – आग्रा महामार्ग (८-१० कि.मी.) – डावीकडे – इच्छापुर्ती गणपती मंदिर – राजधेरवाडी.. (१०-१२ कि.मी.) – राजधेर किल्ला पायथा – कोळधेर किल्ला
राजधेर किल्ला – कातळकोरीव पायऱ्या, गूढरम्य गुहा आणि राजवाडा
सातमाळा एक्स्प्रेस चांदवड ला पोहचली तेंव्हा रात्रीचे आठ वाजले होते.. त्यामुळे लॉज शोधायची गडबड सुरु झाली.. मुख्य चौकातून मनमाड रस्त्याकडे जाताना डावीकडे एका कॉम्प्लेक्स मध्ये एक ऐतिहासिक लॉज सापडला.. यात पाच भटक्या मंडळीसाठी एक कॉमन रूम घेतली.. आणि स्वच्छ – अस्वच्छ अशा वादात न पडता निवांत ताणून दिली.. सकाळी उप्याने वेक कॉल दिला आणि सहाला मंडळी उठून आवराआवरी करू लागली.. बरोबर सातच्या ठोक्याला सातमाळा एक्स्प्रेस ला राजधेरवाडी कडे जाण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आणि सातमाळा चं खरखुरं इंजिन म्हणजे यशवंती राजधेरवाडीकडे मुकाट निघाली.. चांदवड पासून आग्रा महामार्गाने जाताना.. दरीमध्ये रेणुकामातेचे मंदिर आहे.. त्याच्या उजव्या बाजूला.. चांदवड चा धिप्पाड किल्ला आहे.. या मंदिराच्या विरुध्द बाजूस थोडे पुढे एक रस्ता इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे जातो.. या रस्त्यानेच पुढे डावीकडे राजधेरवाडीचा फाटा आहे.. राजधेरवाडी हे राजधेर-कोळधेर-इंद्राई या दुर्गत्रिकुटाच्या केंद्रस्थानी असलेले गाव.. या गावाला या तिन दुर्गांचा सहवास लाभला आहे असं एक दिव्य गाव.. इच्छापुर्ती गणेशाला या त्रिकुटाची भ्रमंती पूर्ण होण्यासाठी साकडे घालून वडबारे गाव आणि पुढे डावीकडे निघालो.. इथून पाहताना डावीकडे भला मोठा पसारा मांडून बसलेला इंद्राईचा उंचपुरा डोंगर दिसतो.. इंद्राई किल्ल्याच्या डोंगरसोंडा तीन ठिकाणी उतरताना दिसतात.. एक वडबारे गावाकडे.. एक राजधेरवाडीच्या अलीकडे खिंडीत डावीकडून उतरणारी.. तर एक धरणाच्या पुढे लांब उतरणारी.. आजच्या दिवसातले.. पहिले स्टेशन किल्ले राजधेर.. त्यामुळे राजधेरवाडी गाठले.. इथे शाळेसमोरच्या पटांगणात यशवंती उभी केली आणि पटापट ब्यागा उचलल्या.. ब्यागेत खाऊ आणि पाणी भरून तडक गडावर निघालो..
सकाळचे दहा वाजले होते.. इथे लाईटच्या टॉवर समोर दिसणाऱ्या डोंगर सोंडेवरून आपली वाट जाते.. रस्त्याच्या पलीकडे शाळेच्या मागे.. दिणाऱ्या टेकाडाकडे निघालो.. राजधेर किल्ला डावीकडे ठेवत तीव्र चढणीवर पाऊल टाकले.. तसा सातमाळा एक्स्प्रेस चा वेग मंदावला.. घड्याळाची टिकटिक.. इंजिनाची घरघर.. आणि काळजाची धडधड.. सुरु झाली.. एकंच वेळी.. त्यामुळे एक ब्रेक आणि ब्रेक के बाद पुन्हा ट्रेक करीत.. दगड-धोंड्याच्या वाटेने टेकाडाच्या माथ्यावर येवून पोचलो.. इथे बऱ्यापैकी पठार आहे.. झाडं नावाचा प्रकार मात्र या पठाराला अनभिज्ञ आहे.. म्हणून कि काय या पठारावर उजवीकडे दिसणारे एकमेव झाड जणू एका स्थितप्रज्ञासारखे भासत होते.. त्यामागे एक हिरवी घुमटी.. आणि समोर आणखी एक टेकाड.. राजधेरच्या वाटेवरचे दुसरे टेकाड.. ठळक पायवाट निघाली तिकडे निघालो.. यंदाच्या स्टेशनला सिनिअर सिटीझन्सचे डबे इंजीनासारखे पुढे चालले होते.. दीपकदादांचे गणित.. पाववड्यांनी बिघडले होते.. नितीनभाऊचा जोश जोरदार होता.. उप्या नेहमीसारखाच सातत्यपूर्ण.. दुसरे टेकाड चढू लागलो.. इथे पायवाटेचा घाट झाला आहे.. आधी डावीकडे मग टेकाडाला उजवीकडून वळसा घालून पुन्हा वाट मागे फिरून वर चढते आणि आपण डोंगराच्या दुसऱ्या स्तरावरील पठारावर येवून पोहोचतो..
इथे मात्र नाही म्हणायला इवले-इवले जंगल आहे.. खुरट्या झुडुपांचे.. इथे डावीकडे वर राजधेरची आडवी कातळभिंत दिसते.. आणि खाली खोल दरी.. आणि उजवीकडे टेकाड.. राजधेरच्या कातळभिंतीला या पठाराशी जोडणारे टेकाड.. आता समोर थोडंसं डावीकडे एका रेषेत चालायचं कि आपण पुन्हा या तिसऱ्या टेकडाच्या पायथ्याशी पोहोचतो..
इथे पुन्हा उजवीकडच्या वाटेने तिरपे वर जाताच.. राजधेरच्या पायथ्याच्या माचीवरचा बुरुज दिसतो.. इथे काही कातळकोरीव पायऱ्या आहेत.. त्यांना हाताने जोर देत वर निघायची कि आपण राजधेरच्या पायथ्याशी असलेल्या या माचीवर पोचतो.. एकंदरीत तिन तेकाडांचा टप्पा एखाद्या जिन्याच्या पायरीसारखा.. तीन टेकड्यांचा जिना.. स्टेप बाय स्टेप चढून.. आपण माचीवर पोचतो.. इथे मघाशी आडवी दिसणारी राजधेरची कातळभिंत आता एका रेषेत उभी दिसू लागते.. आपल्याला या कातळभिंतीच्या मध्यात पोचायचे असते.. इथे राजधेर च्या तुटलेल्या पायऱ्या आहेत.. आणि नुकतेच बसवलेली लोखंडी शिडी.. शिडीजवळ पोचतो ना पोचतो तोच इथे म्हशींनी ट्राफिक जाम करून ठेवला होता.. त्यामुळे.. म्हशींपासून बचाव करण्यासाठी.. ट्रेकिंग स्टिक चा आधार घ्यावा लागला.. पंधरा मिनिटांच्या खेळखंडोबा करून म्हशींनी वाट दिली आणि शिडी च्या पायथ्याशी पोचलो.. आता एक सरळसोट कातळ (शिडीने) चढला कि थेट राजधेरच्या महादरवाजात..
सिनिअर सिटीझन्स क्लब चे संस्थापक अध्यक्ष अनंतभाऊनी शिडीचा श्रीगणेशा केला.. ६०-७० फुटांची हि हिल्ले-डूल्ले शिडी चढणे म्हणजे काय दिव्य आहे.. हे वर जाताना कळते.. त्यात.. तीस-एक फुटांवर मोडलेल्या दोन पायऱ्यांनी तर अजूनच धडकी भरते.. अर्धी अधिक शिडी चढून गेलं कि एक ओव्हर ह्यांग.. प्याच.. इथे शिडी थेट ८० अंश कोनात वळते आणि बाहेर अधांतरी होते.. आपल्याच वजनाने ती गदागदा हलते आणि आता बद्कन पडणार अशी भीती वाटू लागते.. पण हे असलं काही होत नाही.. आणि आपण ह्या प्याच चे दिव्य पार करून.. कातळटप्पा पार करीत भग्न दरवाजापाशी येवून पोचतो.. इथे आलो आणि चौथऱ्यावर चार क्षण रेंगाळलो.. इथे दरवाजाच्या डावीकडे एक शिलालेख लिहिला आहे.. फारसी भाषेतील शिलालेख.. आता उजवीकडे.. खडा कातळ फोडून तयार केलेल्या तिरपा जिना आपल्याला थेट गड माथ्यावर घेवून जातो.. या जिन्याच्या उजवीकडे तुटलेला कातळ पाहून पायाची थरथर होते इतकंच बाकी ‘ऑल इज वेल’.. एकदम आलबेल.. साधारण ६० अंश कोनातून कोरून काढलेला कातळी जिना चढून जाताच आपण गडाच्या दुसऱ्या भग्न दरवाजापाशी येवून पोचतो.. इथवर पोहोचताना डावीकडे जिन्याच्या मध्यावर काही कातळकोरीव गुहा दिसतात.. आणि पुढची वाट कठडे धरून वर जाणारी.. भग्न द्वारातून गड माथ्यावर प्रवेश केला.. आणि किरकोळ झुडुपातून वाट काढीत पायवाटेने निघालो.. झुडूप संपताच डोंगराच्या वर अस्ताव्यस्त अंथरलेला आडवा एक कातळ लक्ष वेधून घेतो.. डावीकडे दूरवर एक टेकाड दिसते तो गडाचा सर्वोच्च माथा.. कातळाच्या मध्यावर वर पहिल्यास एक आडवी गुहा.. फुटपट्टी सारखी मापात कोरल्याचे दिसते.. तिकडे निघालो.. गुहेच्या मुखाशी पाऊल ठेवले आणि मागे नजर टाकली.. समोर एक पिराची कबर आणि वाड्याचे चौथरे दिसतात.. मागे दूर इंद्राई चा अजस्त्र किल्ला मात्र अजून दिल्ली दूर आहे असं सांगत उभं असतो.. त्याला येतो असं सांगून.. या परिसराची पाहणी सुरु केली.. कातळाच्या पोटात खोदलेली ६ खोल्यांची अलिशान गुहा.. सध्या या गुहेत एक बाबा राहतो असे कळले.. पण बाबा दौऱ्यावर असल्याने.. बाबाजींचा दिव्य आदेश काही मिळाला नाही.. असो.. बाबाजींची अलिशान गुहा पाहून.. उजवीकडे.. राजवाड्याकडे निघालो.. राजधेरच्या पूर्वेकडे माचीवर एक अलिशान राजवाडा आहे.. गुहेतून पाहताना तो लक्ष वेधून घेतो.. म्हणून तिकडे निघालो.. दहा पंधरा मिनिटात राजवाडा गाठला.. राजवाड्यातील आउट हाऊस फक्त तग धरून होते.. बाकी सारा वाडा जमीनदोस्त झाला आहे.. मात्र हि इमारत अगदी.. माचीच्या काठावर उभी आहे.. समोर कुभाऱ्या-कुंभई ची लहानगी डोंगररांग फार सुरेख दिसते.. या इमारतीच्या कमानी वर कातळकोरीव नक्षी आहे.. ती पाहून पुन्हा मुख्य द्वाराशी निघालो.. राजधेर ची धावती भेट मनाला सुखावून गेली.. आता.. पुन्हा ती हलणारी शिडी दिसू लागली.. ओव्हरह्यांग शिडी.. आमची वाट पहात होती.. दरवाजात एक मोठा श्वास घेतला आणि शिडी उतरू लागलो.. कसाबसा खाली पोहोचलो आणि जीवघेण्या शिडीपासून सुटकेचा निश्वास सोडला.. आता पुन्हा पायरीसारख्या उतरत्या डोंगरांकडे निघालो.. थोडं उतरून आलो आणि राजधेर च्या कातळभिंतीकडे पाहिलं.. इथे काही ठिकाणी डोंगराला पडलेल्या खाचा ह्या डोळ्यांसारख्या दिसतात.. यातल्या दोन खाचा तर हुबेहूब दैवी डोळ्यांसारख्या.. “युरेका.. युरेका.. डोंगरदेव.. सापडला..”.. डोंगरदेव.. अहिवंतचा डोंगरदेव आज शेवटच्या दिवशी.. राजधेर वर सापडला.. येणाऱ्या जाणाऱ्यावर पाखर धरणारा डोंगरदेव.. मातीची गाऱ्हाणी.. वारियाच्या कानात सांगणारा डोंगरदेव.. ग्रीष्माच्या रणरणत्या राज्यात.. चार-दोन ढग जिद्दीने अडवणारा डोंगरदेव.. आज राजधेर च्या कातळभिंतीत एखाद्या स्तिथप्रज्ञासारखा शांत डोळे मिटून बसला होता.. ध्यानस्थ..!!
राजधेर चा निरोप घेवून.. दुपारच्या रणरणत्या.. डोंगर उतरू लागलो.. पुन्हा माची – पठार – पुन्हा उतरण—मग आणखी एक पठार.. मग शेवटचा उतार असा लांबचा पल्ला मारून राजधेरवाडीत वन-पिस पोहोचलो.. हुर्रे.. सातमाळा एक्स्प्रेस ने आणखी एक जंक्शन पार केले होते.. ‘राजधेर.. (डोंगरदेव प्रसन्न) जंक्शन’.. उतरलो आणि शाळेच्या व्हरांड्यात गुडघे चाचपून ‘सब पुर्जे ठीक ठाक’ आहेत याची खात्री करून घेतली..
राजधेरची राजेशाही भटकंती करून चांदवड कडे मोर्चा वळविला.. दिवसाला कमीत कमी दोन दुर्गांचे स्टेशन गाठलेच पाहिजे असा आदेश बाबाजीनी सातमाळा एक्स्प्रेसला दिल्याने.. काही इलाज नव्हता
वाटाड्या मार्ग क्र. १२: नाशिक शहर– नाशिक-आग्रा महामार्ग – रेणुका माता मंदिर – चांदवड गाव – चांदवड किल्ला
शाळेच्या आवारात शिदोऱ्या उघडल्या आणि भुकेला आत्मा शांत केला.. आणि पुन्हा आग्रा महामार्ग गाठला.. आता कूच चांदवड वर.. इच्छापुर्ती गणेश मंदिराच्या विरुद्ध बाजूस माचीवर जाण्यासाठी आता कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे.. गुडघ्यांचा बाजार झाल्याने यशवंतीनेच चांदवड ची माची गाठण्याचे सार्वमत झाले.. चांदवड किल्ल्याकडे कच्च्या रस्त्याने निघालो बिनकाठच्या आंनी मुरुमाड वाटेने.. सातमाळा एक्स्प्रेस चे डबे जरी पेकाळले असले तरी.. यशवंती (द वंडर कार) मोठ्या जोमाने माचीकडे धावू लागली.. अर्ध्या तासांचा बेक्कार घाट चढून माची गाठली.. आता लांबलचक पसरलेले पठार आणि डावीकडे धिप्पाड चांदवड दिसू लागला.. पुढे जाताच.. पार्किंग साठी बनविलेला चौथरा दिसताच यशवंती तिथेच उभी करून.. भटकंती सुरु केली.. साधारण दुपारचे साडेतीन वाजले असावेत.. गाडी रस्ता सोडून समोर दिसणाऱ्या झुडूपाकडे निघालो.. इथे.. एक चौरस तलाव आणि त्याला घेरणाऱ्या काही कबरी आहेत.. इथे अलीकडे एक पुरातन गणेश मंदिर आहे.. तलावाचे कठडे दगडी चिरे टाकून बांधल्याने तलाव अजून सुस्थितीत होता.. पुढे जाताच उजवीकडे एक घळ आहे.. आणि त्याच्या आजूबाजूला दाट झाडी.. झाडी उजवीकडे ठेवत पायवाटेने निघायचं मग वाट उजवीकडे वळते.. इथे आणखी एक कातळाच्या पोटात कोरलेले पाण्याचे टाके आहे.. इथे कातळ भिंतीवर गणेश मूर्ती आणि काही आकृत्या कोरल्या आहेत.. तीन दरवाजाच्या चौकटी मात्र लोखंडी गेट लावून बंद केल्या आहेत.. त्यामुळे चौकटीतून आत डोकावत काही बघता आलं नाही तरी.. झुळझुळत्या झऱ्याची खळखळ ऐकून मंत्रमुग्ध व्हायचं आणि पुढे निघायचं.. चांदवड चा बालेकिल्ला मागे असतो.. एखाद्या पाठीराख्यासारखा.. इथे देवराई संपली कि आणि एक विहीर दिसते.. थोडं पुढे उजवीकडे चंद्रसेन मारुती मंदिर आहे.. मारुतीची मूर्ती फारच सुरेख आहे.. अंजनीसूताचे आशीर्वाद घेवून समोर चंद्रसेन महाराजांनी बांधलेले चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर आहे.. तिकडे निघायचं.. इथे एक हेमाडपंती मंदिर आहे.. मंदिराचा दर्शनी भागावर देवांची मांदियाळी कोरल्याचे दिसते.. मंदिराला एक प्रदक्षिणा मारून कोरीव शिल्पकलेचे भग्नावशेष हेरून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला.. इथे एक पोर्तुगीज घंटा डोक्यावर लटकत असते.. त्यातलं dragon चं कोरीव रूप कॅमेरात बंद करून गाभाऱ्यात प्रवेश केला.. चंद्रेश्वर महादेवाला दंडवत घातले आणि मंडपात चार क्षण विसावलो.. सातमाळा एक्स्प्रेस ची चाल आता काहीशी मंदावली होती.. म्हणा किंवा ती आता शेवटच्या स्टेशन वर येवून पोचल्याने.. सातमाळा एक्स्प्रेस काहीशी खट्टू झाली होती.. आता पुन्हा बजबजपुरी.. माणसांचे जंगल.. आणि दुनियादारी.. पहावी लागणार या करणे ती नाराज होती.. मग तिची समजूत काढून.. पुन्हा गणेश मंदिरापाशी येवून पोचलो.. इथे चांदवड बालेकिल्ला करायचा कि नाही यावर जोरदार चर्चा झाली.. मुंबईवरून दीपकदादा आणि नितीनभाऊंना सायबाचा आदेश आल्याने.. आणि बालेकिल्ल्यावर फारसे अवशेष नसल्याने.. माचीवरचा किल्ला पुरेपूर पाहून सातमाळा भटकंती संपल्याची घोषणा करण्यात आली.. पार्किंग स्लॉट कम हेलीप्याड वर सातमाळा भटकंती बद्दल कार्यकर्त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले.. सातमाळेचा सूर्य आता इंद्राई मागे कलंडला होता.. राशा, बळद्या.. साडेतीन रोडगा एखाद्या ढाली सारखे इंद्राईच्या रक्षणाला तत्पर असे दिसले.. आणि दूरवर नजर फेकावी तिथे तांबड्या किरणांनी आसमंताचा ताबा घेतला होता.. सोबतीला मावळतीकडे वाहणारे गार वारे मनावर हळुवार फुंकर मारत होते.. इथला माहौल काही औरच होता..
सातमाळाचे सगे सोबती – तवल्या.. मोहिंदरी.. बंड्या १-२.. तवा.. डोंगरी, इखारा.. लेकुरवाळा, हंड्या.. बाफ्ल्या.. भिंती.., कुंभाऱ्या.. कुंभई.. राशा.. साडेतीन रोडगा.. बळद्या..
या सातमाळा रांगेतील गिरीदुर्गांचे सोबती असे काही डोंगर आहे.. त्याची ओळख या भटकंती मध्ये आज आम्हाला झाली ती अशी..
तवल्या डोंगर – अंचला आणि तवल्या हि एकाच पठारावर उठवलेली दोन गिरिशिखरे.. यातील तवल्या एखाद्या सुळक्या सारखा दिसतो.. वर जाण्यासाठी मात्र वाट अवघड आहे.. तीव्र घसरण आणि ठिसूळ कातळ यामुळे तवल्याची चढाई हि कठीण प्रकारात मोडते.. अंचला गावातील धनगराची पोरे मात्र लिलया तवल्या चढून जातात..
मोहिन्द्रीचे नेढे – सप्तशृंग गडाच्या पश्चिमेला आडव्या पसरलेल्या डोंगर रांगेत डावीकडे अहिवंत आणि उजवीकडे दोन डोंगर सोडून मोहिन्द्रीचा डोंगर दिसतो.. मध्यभागी एक नुकतेच बांधलेले धरण आहे.. या धरण भिंतीवरून देखिल मोहिन्द्रीच्या पायथ्याच्या गावात जातं येते.. हा डोंगर इतर डोंगरांपेक्षा वेगळा भासतो हा निसर्ग निर्मित आयताकृती नेढ्यामुळे.. दुरून जरी सोपा वाटत तरी नेढ्या कडे जाणारी वाट मात्र सत्वपरीक्षा बघणारी आहे..
तवा आणि बंड्या डोंगर – जावळ्याच्या माथ्यावरून रवळ्याकडे पाहिल्यास.. उजवीकडे म्हणजेच साधारण उत्तरेला एक डोंगर लक्ष वेधून घेतो.. अलिप्त वाटणाऱ्या या डोंगराला ‘तवा’ असे संबोधले जाते.. रवळ्या जावल्या च्या पठारावरून पुढे पूर्वेकडे चालत गेल्यास धोडपच्या अलीकडे दोन डोंगर दिसतात.. स्थानिक लोक या दोन्ही डोंगरांना बंड्या असे म्हणतात.. आपण त्यांना छोटा बंड्या आणि मोठा बंड्या म्हणायचं..
डोंगऱ्या / डोंगरी – धोडप किल्ल्याहून इखारा सुळक्याकडे म्हणजेच पूर्वे कडे जाताना.. पठारावर एक डोंगर दिसतो.. हा डोंगऱ्या.. कधी तरी या सातमाळे च्या रांगेत उभ्या ठाकलेल्या या दोस्तांची सफर करायलाच हवी..
इखारा सुळका – सातमाळा रांगेतील हा एक नावाजलेला सुळका नावाला जागणारा असा हा सुळका चढणे हे एक आव्हान आहे.. सुळक्याच्या पायथ्याला पश्चिमेच्या बाजूला बाबाजी का आश्रम आणि एक विहीर आहे.. धोडप ते कांचना ट्रेक दरम्यान इथे एक ब्रेक अनिवार्य असा आहे.. इखाऱ्या कडे जाण्याची वाट धोडपच्या सोनार माची वरून पूर्व बाजूस आहे.. माची संपताच डोंगरी आणि त्याला डावीकडे वळसा मारून इखाऱ्याकडे जाता येते..
राशा.. साडेतीन रोडगा.. बळद्या..
राशा.. साडेतीन रोडगा.. बळद्या.. हे इंद्राई ह्या बलदंड किल्ल्याचे सोबती आहेत.. चांदवड किल्ल्याच्या माचीवरून पाहिल्यास पश्चिमेला डावीकडे राशा.. उजवीकडे समोर साडेतीन माथ्याचा मिळून असा साडेतीन रोडगा डोंगर.. परशुरामाने इंद्राईच्या गुहेत रोडगा (जाड भाकरी) शिजवून खाल्ल्याची आणि उरलेला साडेतीन रोडगा फेकून दिल्याने हे डोंगर तयार झाल्याची एक दंतकथा इथे सांगितली जाते.. इंद्राईच्या मागे आणखी एक डोंगर बाहेर मान काढून आपल्याकडे पाहताना दिसतो.. याला स्थानिक बळद्या असं म्हणतात..
कुंभाऱ्या.. कुंभई
चांदवड मधून आग्रा महामार्गाने धुळे कडे जाताना ३-४ किमी अंतरावर रेणुका माता मंदिराच्या विरुद्ध दिशेला डावीकडे इच्छा पुर्ती गणेश मंदिर.. इथून पुढे गेल्यास वरून वडबारी / वडबारे गाव आहे.. इथून इंद्राई किल्ल्याकडे जाणारी एक वाट आहे.. आपण पुढे निघायचं.. पुढे एका तिठ्यावर डावीकडच्या रस्त्याने जाताना .. चिंच बारी / खिंड आहे.. इथे उजवीकडे कुंभाऱ्या आणि कुंभई हे दोन डोंगर राजधेर च्या रांगेत उभे ठाकलेले दिसतात.. यातील राजधेर किल्ल्याच्या अलीकडचा डोंगर कुंभाऱ्या.. याच्या मध्यावर पावसाळ्यात छान धबधबे पाहायला मिळतात.. थोडीशी वाट वाकडी करून वेळ असल्यास या दोन डोंगरांना भेट द्यायला हरकत नाही..
सातमाळा रांगेतील प्रत्येक डोंगरामध्ये एक आगळेपण आहे.. या रांगेतले सगळे.. तीन हजारी (फुट) मनसबदार जणू.. एकापेक्षा एक.. सरस.. आणि उंच.. प्रत्येकाची खासियत वेगळी.. महाभारताच्या पात्रासारखी.. अहिवंत कर्णासारखा दानशूर.. मनात येईल तिथे रहा.. चांगला.. पाच-पन्नास एकराचा गडमाथा आहे.. अचला.. द्रोणाचार्यासारखा तपस्वी.. हा गड सर करणे म्हणजे एक तपस्याच जणू.. कण्हेरा.. दैदिप्यमान इतिहास असूनही अश्वत्थाम्यासारखा शापित.. धोडप.. भीमासारखा बलदंड.. भल्या भल्याचे तोंडचे पाणी पळविणारा.. तर.. रवळ्या-जावल्या नकुल-सहदेवाची जोडी जणू.. मार्किंड्या.. तर सगळ्यांचा ‘बडे भैया’.. पांडवांमधील थोरला.. तर कांचना.. शत्रूवर अचूक तीर रोखून धरणाऱ्या धनंजया सारखा.. आणि हे सगळं असं भटकंती महाभारत तिथे तटस्थ पणे पाहणारा इंद्र (इंद्राई) आणि चंद्र (चांदवड).. कृष्ण मात्र सप्तशृंग मातेच्या आश्रयाला राहून काळाची चक्रे फिरवीत असणार.. हे नक्की..
समाप्त