||..इश्क-ए-दिल्ली..|| – २०१४

||..इश्क-ए-दिल्ली..||


दिल्ली.. शहरांचे शहर.. एक महानगर.. या दिल्लीला महानगर म्हणायचं कारण इथे अनेक छोट्या नगरांची मिळून हि महानगरी तयार झाली आहे.. ख्रिस्तपूर्व काळात सुमारे ५००० वर्षांपूर्वी पांडवानी वसवलेले इंद्रप्रस्थ नगर, जहापनाह प्राचीर, सिरी, तुघलकाबाद, आदिलाबाद, फिरोजाबाद, दिनापनाह, शहाजनाबाद आणि इंग्रजांनी वसवलेले नवी दिल्ली.. इथल्या या उपनगरांना मात्र एक राजेशाही इतिहास आहे.. दिल्लीत किल्ले किती आहेत असे विचारलं तर लाल किल्ला नजरेसमोर येतो.. पण त्याचा जोड किल्ला असलेला सलीमगड मात्र अनोळखी आहे.. अशा या महानगरातील इतर किल्ले वाचनात फारसे येत नाहीत.. किला राय पिथोरा हा पृथ्वी राज चौहान यांनी बांधलेला किल्ला, फिरोजशाह कोटला हे फक्त स्टेडीयम नसून तिथे एक भक्कम नगरदुर्ग ठाण मांडून बसला आहे.. या शिवाय हुमायु चा पराभव करणाऱ्या शेर शाह सूरी याने बांधलेला शेरगड हा आज पुराना किला नावाने ओळखला जातो, सिरी चा किल्ला, विक्षिप्त राजा महंमद बिन तुघलक याने बांधलेला तुघलकाबाद, आदिलाबाद.. असे एक सो एक सुंदर किल्ले दिल्ली मध्ये आहेत.. या शिवाय लालकोट या जुन्या किल्ल्यातील कुतुब मिनार म्हणजे दिल्लीतील एक प्रमुख आकर्षण

हुमायू नंतरच्या काळात मुघल राज्यकर्त्यांनी आग्रा हे सत्ताकेंद्र म्हणून निवडले.. पुढे शहाजहान ने शहाजनाबाद हे शहर वसविले.. आजचा लाल किल्ला याचा शहरात येतो.. तर अशी हि बहुरंगी दिल्ली.. राजेशाही दिल्ली.. याच जुन्या दिल्लीतील किल्ले पाहताना.. आपण दिल्लीच्या प्रेमात पडतो आणि आपसूकच नकळत मनात भावना येतात.. इश्क ए दिल्ली..!!!


१. लालकोट किल्ला  कुत्ब/ कुतुब मिनार
इ.स. १२ व्या शतकात दिल्ली मध्ये तोमर वंशीय राजपूतांची सत्ता होती असे इतिहासकार सांगतात.. याच तोमरवंशातील एक राजा.. राजा अनंगपाल याने.. लालकोट या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात केली.. सध्या महरौली भागातील कुतुबमिनार हा याच किल्ल्यात आहे.. या लालकोट किल्ल्यास चौमुखा द्वार, गजनी द्वार, रणजीत द्वार, सोहन द्वार असे दरवाजे आहेत.. याशिवाय सध्याचे मुख्य आकर्षण कुतुब मिनार याच किल्ल्यात बांधले आहे.. ७३ मिटर उंच असा हा मिनार कुतुबुद्दीन ऐबक याने शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज चौहान याचा पराभव करून त्या विजयाचे प्रतिक म्हणून बांधला.. यातील पूर्वेकडील दरवाजावर असलेल्या शिलालेखात हा मिनार २७ हिंदू मंदिरे उध्वस्त करून त्याचे चिरे वापरून हा मिनार तयार केल्याचा  चिथावणीखोर उल्लेख आहे.. सुरुवातीस तीन मजली असलेला हा मिनार.. इल्तीत्मुश या राजाच्या कारकिर्दीत पाच मजली झाला.. तर फिरोजशाह तुघलक याने शेवटचे दोन मजले बांधल्याचे इतिहासकार सांगतात.. याचा इतिहास जरी वादग्रस्त असला तरी हा कुतुब मिनार आजघडीला भारतातील ऐतहासिक वास्तूतील एक मुख्य आकर्षण आहे..या कुतुब मिनार शेजारी एक लोहस्तंभ आहे.. सम्राट अशोक च्या राजवटीत असे स्तंभ बांधण्यात येत असत.. या ७० फुटी स्तंभावर ब्राम्ही भाषेतील शिलालेख कोरला आहे. असाच एक स्तंभ फिरोजशाह कोटला या किल्ल्यात पहायला मिळतो..


२. किला राय-पिथोरा  पृथ्वीराज चौहान या हिंदू राजाची राजधानी, किला राय पिथोरा.. म्हणजेच साधारण १२ व्या शतकात वसवलेले एक मोठे नगर.. पृथ्वीराज चौहान यांनी तोमर वंशीय राजाचा पराभव करून वसवलेलं नगरदुर्ग. तोमरवंशीय राज्यकर्ता अनंगपाल याने लालकोट नावाचा नगरदुर्ग बांधला.. या किल्ल्याचे अवशेष आजही महरौली आणि कुतुब मिनार च्या परिसरात दिसून येतात.. पृथ्वीराज चौहान राजाने मग या लालकोट चा विस्तार केला आणि त्यासमोर आणखी एक कोट बांधला तो म्हणजे किला राय पिथौरा.. सध्या मात्र या किल्ल्याच्या नावाने इथे चौकशी करता असा किल्ला इथे अस्तित्वात आहे याची स्थानिकांना तसूभर देखिल माहिती नाही.. कुतुब मिनार पाहून या किल्ल्याची चौकशी केली.. तर बऱ्याच लोकांनी ऑ.. असा आ वासला तर बऱ्याच जणांनी नही ऐसा कोई किला नही इधर..असं ठणकावून सांगितले.. असेच दहा-पंधरा जणांना विचारले तेंव्हा कुठे एका पानवाल्या भैय्याने सांगितले.. ये आगे नंगा बाबा है न उसके पास है ये किला.. असे सांगितले.. आता हे नंगा बाबा म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हे पाहण्यास निघालो.. विचारत विचारत.. एका मठासमोर येऊन पोचलो तर भगवान महावीर जैन यांचा इथे एक भव्य पुतळा आहे.. ते म्हणजे त्या भैय्याच्या भाषेत नंगा बाबा.. इथे चौकशी केली राय पिथोरा किल्ल्याबद्दल पण कुणाला काही माहिती नव्हते.. शेवटी या पुतळ्याच्या मागे पार्क मध्ये एक ऐतिहासिक इमारत आहे.. तिकडे काही सापडतंय ते पाहावं म्हणून तिकडे निघालो.. तिथे एका तरुणाला विचारले.. कि भाई ये किला राय पिथोरा किधर है.. तर तो बोबड्या शब्दात म्हणाला.. घोडा पार्क.. घोडा पार्क.. आता हा घोडा पार्क काय प्रकार आहे ते समजेना.. मग त्याला विनंती केली घोडा पार्क किधर है..?.. हा चलो दिखाता हू.. असे म्हटल्यावर हे घोडा पार्क काय प्रकरण आहे ते पाहण्यास त्याला घेवून रिक्षाने निघालो.. दहा-पंधरा मिनिटात एक पार्क समोर येवून पोचलो.. येताना रस्त्यावर उजव्या बाजूस तटबंदीचे अवशेष दिसतात.. पार्क समोर रिक्षा थांबताच तो.. बोबडा बोलणारा तरुण तडफदार वाटाड्या उद्गरला.. वोह देखो.. घोडा बाबा..!!.. घोडा बाबा.. अरे ते पृथ्वीराज चौहान आहेत.. घोड्यावर बसलेले.. असं त्याला सांगावसं वाटलं.. पण अचानक भेटलेल्या या वाटाड्यामुळेच आज किला राय पिथोरा पाहायला मिळाला.. त्याचे आभार मानून किल्ल्यातून एक फेर फटका मारला.. सध्या या किल्ल्याच्या अर्ध्या अधिक भागात एक मोठी बाग तयार करण्यात आली असून.. पुरातत्व खात्याने किल्ल्याचा बराचसा भाग उत्खनन करून त्याचे जतन केले आहे.. या किल्ल्यात पुरातत्व खात्याच्या ऑफिस जवळ पृथ्वीराज चौहान यांचा एक अश्वारूढ पुतळा बांधला आहे..

किल्ल्याला तीन दरवाजे असून अरबिंदो मार्गाजवळील अधचीनी द्वार, बदरपूर कडे जाणाऱ्या रस्त्याजवळील बदायू आणि बरका द्वार पाहण्यास मिळतात.. याशिवाय आझम खान याची कबर आणि बालबन हिची कबर आहे..

सन ११९२ मध्ये महंमद घौरी याने राजा पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला आणि दिल्लीचे राज्य कुतुबुद्दीन ऐबक याच्या हाती सोपवले.. पुढे याच ऐबकने १२०६ मध्ये महंमद घौरी याची हत्या होताच.. स्वत:ला राजा घोषित केले आणि तो दिल्लीचा कारभार पाहू लागला.. इ.स. १२९० पर्यंत मग इथे गुलामांची सत्ता राहिली.. याच कालखंडात रजिया सुलतान ही दिल्लीची पहिली सम्राज्ञी झाली.. सुमारे तिन वर्षे तिने दिल्लीवर राज्य केले..

३. सिरीचा नगरदुर्ग
पुढे १३व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने गुलामांचे राज्य संपवून आपले राज्य प्रस्थापित केले.. त्याने पार नर्मदा नदीपर्यंत साम्राज्य वाढविले आणि दिल्लीत सिरी या नगरदुर्गाची बांधणी केली.. सध्या हौज खास भागात या नगर दुर्गाचे काही अवशेष पाहायला मिळतात.. येथे असलेल्या बांधकामावर पाश्चिमात्य शैलीचा पगडा जाणवतो..

४. तुघलकाबाद किल्ला .. एक होता तुघलक
इसवी सन १३३० दरम्यान घियासुद्दिन तुघलक.. तुघलक साम्राज्याची स्थापना केली आणि दिल्लीजवळ एका नव्या शहराची रचना केली.. ती आता तुघालाकाबाद म्हणून ओळखली जाते.. परकीय मोंगोल आक्रमणापासून बचाव करण्यासाठी त्याने या शहराभोवती एक मजबूत किल्ला बांधला.. तो म्हणजे आजचा तुघालाकाबाद किल्ला.. बदरपूर मेट्रो स्टेशन पासून ४-५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.. बदरपूर पासून शेअर रिक्षा किंवा बसने इथवर पोहोचता येते.. अशाच एका उनाड रापलेल्या दुपारी तुघलकाबाद कडे निघालो.. बदरपूर वरून एक शेअर ऑटोने तुघलकाबाद गाठले.. आणि डावीकडे.. एक लाल रंगांची भव्य कबर आणि उजवीकडे किल्ल्याची उंच तटबंदी दिसताच तेथे उतरलो.. इथे उजवीकडे तुघलकाबाद किला असा पुरातत्व खात्याचा बोर्ड आहे.. थोडंसं झाडीझुडूपातून नीट लक्ष देवून पाहिल्यास .. गडाचा प्रवेश दरवाजा नजरेस पडतो.. झिग-झ्याग जिन्याने आपण दर्शनी प्रवेश द्वाराशी येऊन पोहोचतो.. हा बालेकिल्ल्याच्या जवळचा दरवाजा.. तुघालाकाबाद किल्ला हा साधारण चार भागात विभागला आहे.. एका लहानग्या टेकडावर बांधलेला बालेकिल्ला, बालेकिल्ल्याभोवतालचा भव्य कोट साधारण १५-२० कि.मी. क्षेत्रफळाचा भूभाग सामावून घेणारा,  बालेकिल्ल्यासमोरील घियासुद्दिन तुघलकाची कबर आणि तुघलकाबाद किल्ल्याचा जोडकिल्ला आदिलाबाद.. ह्यातील कबर आणि बालेकिल्ला हे एका दगडी रस्त्याने जोडले आहेत. दक्षिणे-पूर्वेस असणारा आदिलाबाद किल्ला देखिल तुघलकाबाद किल्ल्याच्या तटबंदीला एका भक्कम बंधाऱ्याने जोडला आहे.. या बंधाऱ्यात बरेच दरवाजे काढण्यात आले होते.. जे उघडून इथल्या शेतीसाठी पाण्याचे नियोजन केले जायचे.. मोंगोल सैन्याचे आक्रमण थोपविण्यासाठी या किल्ल्याचे तट १०-१५ मिटर उंच बांधले आहेत.. आणि बुरुज दुमजली.. तर अशी हि किल्ल्याची भक्कम रचना आहे..

 

तुघलकाबाद किल्ल्याला बाहेरील तटबंदीमध्ये तब्बल ११ दरवाजे आहेत.. यातील हाती दरवाजा, बंधोली दरवाजा, रावल दरवाजा, धोबी-धोबन दरवाजा, निमवाला दरवाजा हे काही प्रमुख दरवाजे आहेत.. बालेकिल्ल्याचा आकार एकूण किल्ल्यापेक्षा फार कमी आहे.. बालेकिल्ल्याच्या डावीकडे हत्ती कुंड, विहीर आणि राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात..  बालेकिल्ल्याला तब्बल १५ बुरुज असून हा साधारण चौरस आकाराचा बालेकिल्ला अजून सुस्थितीत आहे.. बालेकिल्ल्यावर मशिद, राजवाड्याचे अवशेष, गुप्त दरवाजा.. आणि मीना बाजार हे मुख्य अवशेष आहेत.. यातील मीना बाजाराची केलेली भुयारी रचना हे स्थापत्य अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे.. सध्या या किल्ल्याची अवस्था बऱ्यापैकी बघण्यासारखी आहे.. दिल्ली सरकारने इथल्या किल्ल्यांची अजून हानी होऊ नयेत म्हणून मिस्टर पुरातत्व यांची फुल्ल पगारी नेमणूक केली आहे.. हाती तलावाच्या डावीकडे जरा जंगल आहे.. यात नीलगाई येतात असे गडावरील वाटाड्यांनी सांगितले..या  तुघलकाबाद बाद किल्ल्यासमोरच घियासुद्दिन तुघलक याची कबर आहे.. विटकरी रंगाच्या घडीव दगडांनी बांधलेली हि कबर आहे.. या कबरी च्या एका चौकटीतून एक विस्तीर्ण पटांगण दिसते.. आणि मागे एक टेकडी .. हि टेकडी म्हणजे .. आदिलाबाद चा किल्ला..

५. आदिलाबाद चा किल्ला  हा तुघलकाबाद किल्ल्याचा जोडकिल्ला आहे.. हा किल्ला गयासुद्दिन तुघलकाने एखाद्या छावणी सारखा उपयोग व्हावा म्हणून बांधला असे म्हणतात.. तुघलकाबाद किल्ला आणि या किल्ल्याच्या तटबंदी आहे.. त्यातील काही भाग महरौली-बदरपूर रस्त्यामध्ये तोडण्यात आला आहे.. सध्या किल्ल्याचे काही अवशेष तग धरून आहे.. किल्ल्याच्या मुख्य द्वारातून आत आल्यानंतर.. लगेच डावीकडे.. दगडी बांधीव चढाव आहे.. तो चढून वर जाताच एक भक्कम बुरुज.. आणि आत वाड्याची जोती.. तांबड्या रंगाचा बुरुज आणि तटबंदी लक्षणीय भासते... फिरोजशाह कोटला – हे स्टेडीयम नसून या नावाचा किल्ला स्टेडीयमच्या जवळच आहे.. हा किल्ला सुलतान फिरोजशाह तुघलक याने बांधला आहे.. या राजाने फिरोजाबाद नगरी वसवली होती.. त्याचाच हा किल्ला एक भाग आहे.. किल्ल्याचे काही अवशेष म्हणजे दरवाजे आजही या किल्ल्याच्या उजव्या भागातील दाट वस्तीमध्ये तग धरून आहेत.. या किल्ल्याला खेटून क्रिकेटचे फेमस स्टेडीयम आहे.. ‘फिरोजशाह कोटला’.. किल्ल्यामधील मुख्य आकर्षण म्हणजे.. एखाद्या पिरामिडसारखा बांधलेला महाल.. आणि त्यावर असलेला अशोक स्तंभ.. यावर ब्राम्ही, प्राकृत, संस्कृत आणि पाली भाषेतील मजकूर कोरला आहे.. किल्ल्यामध्ये जामी मशीद आणि एक भव्य विहीर आहे (बाउली/बावडी).

७. लाल किल्ला आणि त्याचा जोडकिल्ला सलीमगड

यमुना नदीच्या तीरावर शहाजहान राजाने हा  किल्ला १६३९ साली बांधल्याचे इतिहासकार सांगतात.. हा किल्ला लाल खडकाच्या चिऱ्यांनी बांधल्याने.. त्याचे लाल किला नाव पडले.. या किल्ल्याच्या आत एक भव्य नगरी वसविल्याचे इथल्या भव्य वस्तू पाहताना समजते.. या किल्ल्यात नौबत खाना, चावडी बाजार आहे.. याशिवाय मुमताज महल, खास महल, रंगमहल, हिरा महल असे राजवाडे आहेत.. लाहोर दरवाजा, दिल्ली दरवाजा, पाणी दरवाजा असे काही भव्य दरवाजे आहेत.. याशिवाय दिवान-ए-आम आणि दिवान-ए-खास या वास्तू आहेत..

 

       

लाल किल्ल्याला एक जोडकिल्ला आहे.. सलीमगढ.. हा एका अरुंद पुलाने लाल किल्ल्याशी जोडला आहे.. सध्या इथे मिलिटरी चा तळ आहे.. या किल्ल्यात एक तुरुंग असून त्याचे आता स्वातंत्र्य सैनिकांच्या संग्रहालयात रुपांतर केले आहे.. लाल किल्ल्याला भेट देताना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा सांगणाऱ्या या किल्ल्यास अवश्य भेट द्यावी.. 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s