भटकंती २०१६: अजस्त्र सुधागड – आणि नितांतसुंदर ठाणाळे लेणी

भटकंती २०१६: अजस्त्र सुधागड  आणि नितांतसुंदर ठाणाळे लेणी

वाटाड्या मार्ग: पुणे ते खोपोली.. पाली.. गणपती मंदिर  पाली ते भिरा रस्ता  पाच्छापूर  उजवीकडे  ठाकूरवाडी  सुधागड किल्ला  डोंगरवाडी  पाली  ठाणाळे गाव  ठाणाळे लेणी  ठाणाळे गाव – —– – खोपोली  मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग – पुणे..

चिंब भिजलेले.. थेट दरीत झेपावणारे एक झाड.. पळसाच्या पानावरून ठिबकणारे पावसाचे थेंब.. डोंगर चढून जाताच एका दरी-खोऱ्याचा पाहिलेला विराट नजारा.. दरीत डोकावणाऱ्या साल नसलेल्या झाडाच्या उनाड फांद्या.. टकमक टोकाशी झालेली डोळ्यांची चकमक.. कातळाला खोदून काढलेली ती कातळकोरीव पायवाट.. बुरुजाच्या कोथळा काढून काढलेला एक पोटजिना आणि चोर दरवाजा.. पठारावरून दिसणारा धुक्याने वेढलेला तेलबेल चा सुळका.. तर उजवीकडे घाटाचे रक्षण करणारा घनगड.. हिरव्या रोपट्यांची तोरणे बांधून सजलेला एक महादरवाजा.. तटबंदीच्या झरोक्यातून कोसळणारा इवलासा दुहेरी जलप्रवाह.. पायऱ्यांचा झालेला भुशी dam.. भिंतीवर सजलेली हिरव्या वेलींची नक्षी.. आणि ओलसर कातळ.. एक संपूर्ण शांतता.. आणि निर्झराची खळखळ.. पायवाटेवर रुंजी घालणारे पाखरू (ब्लू मोर्मन फुलपाखरू).. गवतातून बाहेर डोकावणारे गुलाबी ऑर्चीपुष्प आणि घाटावरून थेट दोन टप्पे खात कोसळणारा दिल-से धबधबा..

पाच लोकांनी confirm ठरवू.. तीनच लोकांनी पूर्ण केलेल्या.. ह्या दोन ट्रेकच्या.. म्हणजेच ५-३-२ भटकंतीचा हा सारांश.. पाच लोकांनी येतो म्हणून सागितलं आणि दोन लोकांनी पहाटे सहाला दूरध्वनी बंद करून कलटी दिली.. मग ट्रेक करायचा असा निर्धार करून सरदार आणि मी खोपोलीत दाखल झालो.. खोपोलीचा प्रदेशात पोहोचलेला हॉटेल रमाकांतचा वडा अजून तयार व्हायचा होता.. तेवढ्यात -३- मधला तिसरा भिडू राहुलबाबांचे आगमन झाले आणि विसावा हॉटेलात जोरदार नाश्ता करून पाली कडे निघालो..    

किल्ले सुधागड :- खोपोली-पाली मोटोक्रॉस शर्यत जिकून पालीत दाखल झालो.. लगेच पाच्छापूर चा माग काढीत पाली-भिरा रस्त्याने निघालो.. एक नदीपूल पार करून २-३ किमी पुढे डावीकडे पाच्छापूरचा फाटा आहे.. इथून ६-७ किमी जंगलातला रस्ता पार करताच पाच्छापूर आणि उजवीकडे ठाकूरवाडी.. पाच्छापूरमधल्या तलावाचे जंगी फोटोसेशन करून ११ ला ठाकूर वाडी गाठली..


इथून शाळेसमोरच्या घरापासून सुधागडची वाट आहे.. सुरुवातीला वस्तीतून जाताना.. गावातल्या पोरासोरांनी बाय-बाय करीत सुधागड marathon ट्रेक ला शुभेच्छा दिल्या.. सुरुवातीला एक-दीड कि.मी चा किरकोळ चढ पार करताच एक पठार आणि पुढे पुन्हा झाडीतली वाट सुरु होते.. हि पार करताच.. एक लोखंडी शिडी.. मग पुढे खडी चढण आणि आणखी एक मेगा शिडी.. आणि एक निमुळती डोंगराची सोंड.. इथे गार वारा आपल्या स्वागताला आलेला असतो.. तेंव्हा सोंडेवरच्या उनाड वाऱ्याशी हितगुज करून पुढे निघायचं..

शिडी पार करताच.. उंच झाडी आणि एक चढण.. मग डावीकडे सुधागडचा बुरुज दिसू लागतो त्याला आडवे जात आपण तिरपा डोंगर चढू लागतो आणि बांधीव पायऱ्या सुरु होतात.. भव्य बुरुज आणि सुधागड च्या आडव्या अजस्त्र कातळभिंतीमधल्या घळीतून काढलेली हि दगडी पायऱ्यांची वाट म्हणजे stamina ची सत्वपरीक्षा.. पायऱ्या पार करताच सुधागडचा भग्न दरवाजा दिसतो आणि काही पायऱ्या पार करताच उजवीकडे आपण बुरुजाच्या माथ्यावर पोचतो.. इथे एक पायऱ्यांची चोरवाट बुरुजातून खालच्या सज्जावर जाते.. इथे एका पायरीवर कातळ पुष्प कोरल्याचे दिसते..  भुयारी वाटेने खाली जाताच टेहळणी ची जागा दिसते.. पायऱ्यांच्या डावीकडे गेल्यास एक पाण्याचे टाके आहे.. कातळभिंतीच्या वर.. आणि पायवाट डावीकडे वळते आणि आपण थोड्या चढाईनंतर सुधागडच्या शेवटच्या टप्प्यातील टेकडावर येतो.. इथे वाट नागमोडी वळणे घेत.. पाण्याची वाट उजवीकडे ठेवत वर सरकते आणि अर्ध्या तासांच्या ह्या चढाईनंतर आपण सुधागडच्या माथ्यावरदाखल होतो.. इथे एक मेगा पठार आहे.. उजवीकडे तेलबैला आणखी उजविकडे घनगड आणि घाटमाथा दिसतो..

पठारावर डावीकडे वाड्यांचे एका रेषेत पसरलेले अवशेष दिसतात.. आणि मध्ये गवतातून बाहेर डोकावणारा लांब वर पसरलेला कातळ दिसू लागतो.. पुढे उजवीकडे गर्द झाडी दिसू लागते.. इथे पंतांचा वाडा आहे.. उजवीकडे टकमक टोक आणि सुधागड यामधली दरी दिसते.. आपण कातळावरून चालत निघायचं.. साधारण एक किमी ची हि रपेट मारताना एक पठारावर नजर ठेवण्यासाठी उभारलेला बुरुज आणि डावीकडे वाडा पाहून पुढे चालत राहायचं.. २० एक मिनिटात पंतांच्या वाड्यापाशी आपण पोचतो.. या गर्द झाडीने वेढलेल्या वनात हा पंत प्रतिनिधींचा वाड्याच्या अलीकडे एक वाट खाली टकमक टोक आणि सुधागडचे पठार या मधल्या घळीत उतरते इथे -४ पाण्याची टाके आहेत..

वाड्याला डावीकडून वळसा मारून गेल्यास एक दगडांनी बांधलेली वाट आहे ती उतरून जाताच उजवीकडे एक गर्द वनराईए वेढलेले शिवमंदिर आणि थोडं पुढे आणखी एक दगडांनी बांधलेली वाट आहे.. या वाटेच्या खाली डावीकडे एक वाट जाते.. हि वाट आपल्याला डावीकडच्या तटबंदीवर घेवून जाते.. इथे एक पाण्याचे टाके आहे.. तटबंदीला डावीकडे आडवे जाताच एक तटबंदीमध्ये काढलेली वाट आपल्याला खाली चोर दरवाजा कडे घेवून जाते.. तटबंदीवरून दिसणारे बुरुज आणि सुधागाद्ची दुर्गबांधणी पाहून पुन्हा दगडी जिन्यपाशी यायचं.. हा चढून जाताच समोर डावीकडे भोराई देवी मंदिर दिसू लागते आणि उजवीकडे एक तलाव आणि मागे अंबरखाना दिसू लागतो..

भोराई देवी मंदिराच्या पायवाटेवर डावीकडे एक हनुमान मूर्ती आहे.. मंदिराच्या समोर.. अज्ञात वीरांच्या समाध्या दिसतात आणि एक दीपमाळ.. गजशिल्प कोरलेली हि दीपमाळ वैशिष्ट्यपूर्ण आहे.. समोर आणखी एक मारुती मंदिर आहे.. आणि डावीकडे दगडांनी बांधलेली पायवाट खाली उतरू लागते.. हि आपल्याला महादरवाजापाशी घेवून जाते.. या दगडी वाटेवर घनदाट जंगल.. आडव्या तिडव्या वाढलेल्या वेली आपली साथ-सोबत करीत असतात.. पायऱ्यांवरच्या दगडांवर शेवाळाने आक्रमण केलेले पाहून खच खळग्यातून एक टप्पा नं खाता उतरू लागलो.. पुढे एक झाड थेट वाटेला आडवे झाल्याने.. डावीकडची निसरडी पायवाट घेवून पुन्हा दगडी वाटेवर दाखल झालो.. आता महादरवाजा अगदी दृष्टीक्षेपात आला होता.. हिरव्या ओलेत्या रानात हा बांधलेला कातळकोरीव दरवाजा आणि समोर गोमुखी तटबंदी एका भव्यतेची प्रचीती देते.. दरवाजातून वर येताच एक चार भिंतींची चौकी उभारल्याचे दिसते..

इथला माहौल मात्र काही औरच होता.. पायऱ्यांवरून खळखळत वाहणारा निर्झर.. कातळभिंतीवर वेलींनी काढलेली पानापानांची नक्षी.. दरवाजावर बांधलेलं हिरव्या पानांचे तोरण.. दरवाजाच्या कमानीवर दुबाजूस कोरलेल्या शरभ प्रतिमा.. मधोमध कातळपुष्प.. राजचिन्ह आणि वर आडवी शिल्पपट्टिका.. महिरपीला कोरलेले तिहेरी पदर.. तटबंदीच्या फटीतून कोसळणारे दोन जल प्रवाह.. एखाद्या इटुकल्या-पिटुकल्या दुहेरी धबधब्यासारखे.. दुर्गगंगेच्या धारेमध्ये स्नान-शुचिर्भूत होवून महादरवाजाचे महान दर्शन डोळ्यात साठवले.. शिवछत्रपतींचा जयघोष करून पुन्हा पंतांच्या वाड्याकडे निघालो.. —- गावाकडून महादरवाजाला येण्याची वाट आहे..

परतीच्या वाटेवर.. वाड्याजवळचे शिवमंदिर पाहून.. पंतांच्या औरस-चौरस वाड्यात प्रवेश केला.. इथे काही धनगरांची वसती आहे.. तिथे जेवणाची सोय लावली.. पंतांच्या वाड्यात भाकरी-पिठलं ओरपून.. तृप्त होवून पुन्हा ठाकूरवाडी कडे निघालो.. पुन्हा पायऱ्यांची वाट आणि मग सोन्डेवरची उतरण.. तिन तिगडा आणि त्यात गड तगडा.. अशी द्रुतगती भटकंती करून दिड तासात पायथा गाठला.. तेंव्हा संध्याकाळी घरट्यात परतणाऱ्या पाखरांची चिवचिव सुरु होती..

उन्हेरे गरम पाण्याचे कुंड :- दिवसभराचा शिणवटा घालवण्यासाठी.. उन्हेरे गावात गरम पाण्याच्या कुंडात डुंबण्यासाठी निघालो.. पाली गावातून बाहेर पडताच महामार्गावरून डावीकडे निघायचे.. इथे एक नदी पार करताच उजवीकडे गाडीरस्ता आहे.. इथून अंदाजे ३-४ किमी सरळ जाताच एक ओढ्यावरचा पूल आहे .. तिथून उजवीकडे १००-२०० मिटर अंतरावर हे पाण्याचे कुंड आहे.. गंधकाच्या पाण्याचे हे तप्त कुंड म्हणजे त्वचारोगावर जालीम उपाय..

राहुलबाबा गरम पाण्यात डुंबण्यासाठी उतावीळ झाल्याचे पाहून जास्त वेळ नं दवडता.. रॉयल स्नानासाठी ५-२ मित्रमंडळ सज्ज झाले.. इथे एक कुंड चौबाजुनी झाकून टाकला आहे आणि लेडीज आणि जंटलमन यांच्या स्नानासाठी वेगवेगळी व्यवस्था आहे.. इथे पुढेच एक उघड्यावर एक कुंड आहे.. तिथे पाणी एकदम गरम आहे.. राहुल बाबा सुपर हॉट म्हटले आणि तिकडे निघालो.. दिवसभराचा शिणवटा.. या पाण्याच्या चटक्याने चुटकीसरशी दूर झाला.. आणि या रॉयल स्नानाची बहारदार अंधारमय क्षणचित्रे क्यामेराबंद करून भक्त निवास कडे निघालो.. तिन दिवस सलग सुट्ट्या आल्याने भक्तनिवास तुडुंब भरल्याचे समजले मग.. चौकशी करता होतकरू हॉटेल टूरिस्ट पोइंट मध्ये जागा शिल्लक असल्याचे समजले.. १०% डिस्काउंट साठी जोरदार लढा देवून.. अपयश मान्य करून बुकिंग करून टाकले.. भुकेल्या राहुलबाबांची सोय एका हॉटेलात करून ५-३-२ मंडळ.. टुकार टूरिस्ट पोइंटमधल्या सुमार खोलीत घोरू लागले..

पाली गणपती दर्शन :- सकाळी राहुलबाबांच्या उन्हेरे वन्स अगेनया मोहिमेला नकार घंटा दाखवीत.. पाली गणपती मंदिरासमोर जमा झालो.. राहुलबाबा अष्टविनायक पाली-गणपती दर्शन उरकून येईपर्यंत.. नाश्त्याची सोय लावली.. वडा-सांबर पोहे आहे हौदभर चहा पिवून.. पुन्हा पाली-भिरा रस्त्याने ठाणाळे गावाकडे निघालो.. इथे २१ गणेश मंदिर आहे.. त्याला खेटून जाणारा रस्ता ठाणाळे गावाकडे जातो.. इथून पुढे जाताच.. एक निसर्गरम्य खडकाळ पाणवठा आहे तिथे थोडे फोटोसेशन करून — आणि — गाव पार करताच ठाणाळे गाव दिसू लागले.. इथे एका मंदिरापाशी नैनो गाडी उभी करून.. एखादा वाटाड्या मिळतो का ते विचारलं तर बाबा —- तयार झाले.. माणशी १०० रु. अशी बिदागी ठरवून.. वेळ न दवडता.. तडक ठाणाळे पदभ्रमंती सुरु केली..

ठाणाळे लेणी भटकंती :- मंदिराच्या शेजारचा सिमेंट रस्ता १०० फुट चढून पुन्हा आडवे उजवीकडे आणि मग डावीकडे.. एका बोळकांडातून वर येताच एक झाड दिसते.. इथून पायवाट सुरु होते.. वाट नागमोडी पण चढणीची असल्याने पावलांचा वेग मंदावला.. किती लांब आहे.. लही लांब हाय इथून.. हे चढाव संपला कि तिरपी वाट गेली रानातून मग दोन होल्यातून (ओढ्यातून) गेलं कि वर चढायचं आन मग माघारी आडवं जायचं.. तिकडं आणखीन एक होला लागल.. ते पार केला कि तिथं गुहा हायेत.. अडीच तास लातील तुमाला..बाबांनी पार ट्रेकची iternary सांगून टाकली..   

गावापासून झाडीतली वाट चढून आपण डावीकडे एका लहान पठारावर येतो.. इथे उजवीकडे एक वाट पुन्हा रानात घुसते.. तिकडे निघालो.. आणखी एक ४००-५०० पावलांची चढण चढून एका लहानग्या पठारावर पोचलो.. मग डावीकडे पायवाटेने.. जाताच एक लहानशी चढण आणि पुन्हा पठार.. हम्म.. चढण संपली आता.. हे असं रानातून जायचं.. आता सरलच वाट हाये.. सरळ जायचा.. बरे आलात इथवर.. मग बाबा १० पैकी किती मार्क देता.. अजून कायबी नाही..!! असं म्हणून बाबांनी पार या भटकंतीच्या परीक्षेत नापास करून टाकलं.. स्लो बट स्टेडी हे प्रमाण मानून पावले टाकीत राहिलो.. आता चढण संपली होती आणि सरल सरल वाट होती.. पण हि सरल वाट मात्र सटासटा घसरल अशी होती.. हि वाट मात्र जंगलाने वेढलेली होती..

बाबा कुठली जनावर आहेत इथं.. मस जनावर हाय.. वाघ हाये.. कोल्हं.. तरास.. लांबडं.. ते न्हाई.. ते तिकडं शेताडा खाली.. त्याला खायला सापडतंय तिकडं.. म्हणून ते तिकडं.. हि सगळी झाडं नवीन हायेत.. फोरेस्ट च्या माणसांनी लावलेली.. सगली नवीन हायेत.. इथून डावीकडे सवाष्णीच्या घाटाने वर तेल-बेल्याला जाता येतंय.. वर वाघजाई देवी बी हाये.. तुम्ही किती वेळा गेलाय.. गेलो लई येळा आता कुणी मोजलय.. पण वाट जरा अवघड हाये.. वाढलेल्या डेरक्याकडे बघून बाबांनी डायलॉग मारलाच शेवटी.. गाव सोडून आता तासभर झाला होता.. २०-२५ आपण सपाटीवरून रानव्यातून चालत राहतो आणि एका ओढ्यापाशी पोचतो.. पहिला होला (ओढा) आला पोरांनो.. म्हणत बाबांनी ओढ्यातले पाणी पिवून तरतरीत ब्रेक घेतला.. इथे स्थानिक तरुणांचा एक ग्रुप मस्ती करीत डुंबत होता.. इथे टाईमपास नं करता पुढे निघालो.. आणि वाट पुन्हा जंगलझाडीतून निघाली..  इथे डावीकडे दरी आणि आडवा डोंगर दिसतो याच्या माथ्यावरच्या बाजूला कोरलेली लेणी दिसतात.. आणखी अर्ध्या तासाची सपाटीवरची रपेट मारून दुसऱ्या ओढ्यापाशी पोचलो.. इथे एक पाणी ब्रेक घेवून.. ओढ ओलांडून पलीकडे जायचं.. आता थोडं डावीकडे जान वाट उजवीकडे वर चढत जाते.. एका सह्याद्रीच्या जुनाट जंगलातून.. उंचच्या उंच झाडे आणि खाच खळग्यातली वाट चढून येताच.. थोडी मोकळी जागा दिसते.. ओढ्यातून झेपावणाऱ्या पाण्याची खळखळ अधून मधून ऐकू येते.. मोकळ्या जागेतून पायवाट डावीकडे वळते आणि आता आपण उलट्या दिशेने चालू लागतो.. दोराला वळसा मारीत.. आपण एका मोठ्या ओढ्यासमोर येऊन पोचतो.. उजवीकडे.. घाटावरून कोसळणारा एक महाकाय जलप्रपात दिसू लागतो.. पण तो पूर्ण दिसत नाही.. पण त्याचा खाली कोसळताना होणारा आवाज आसमंत भारून टाकतो..

कमरेइतक्या पाण्यातून ओढा ओलांडून आपण पलीकडे पोचतो आणि डावीकडच्या वाटेने डोंगराला लहानगा वळसा मारून लेण्याच्या उजव्या अंगाला येऊन पोहोचतो.. रानातून चालताना हिरव्या झालेल्या नजारा या तांबड्या खडकात कोरलेल्या लेण्या पाहून भारावून जातात.. आणि सह्याद्रीच्या कुशीतली हि तांबडीशार लेणी पाहून मन आनंदाने भरून जाते.. याच केला होता हा अट्टाहास.. साधारण १३ लेण्यांचा हा समूह आहे.. सावकाशीनं या रे पोरांनो बाबांनी प्रेमाचा सल्ला दिला आणि इकडं या खोलीत बघण्यासारखं हाये असं सांगीतलं.. पहिल्या तिन खोल्यामध्ये कोरीव काम नाही.. चौथ्या खोलीत अर्धवर्तुळाकृती पाच स्तूप उभारले आहेत.. यातील दोन स्तुपांना खाली नक्षीदार झालर कोरली आहे.. मागे एक महिरप आहे.. पण त्यातली मूर्ती मात्र गायब केल्याचे दिसते.. इथली शांतता मात्र अद्भूत अशीच आहे.. मनाला हवीहवीशी.. आणखी तिन लेण्या पार करताच आपण मधल्या विशाल लेण्यात येऊन पोचतो.. इथे साधारण ३०x५ फूट चौरस खोली आहे.. तिन बाजूंनी इथे कडा आणि खोल्या आहेत.. समोर पाहताना काही महिरपी दिसतात.. त्यात बरेच कोरीव काम आहे.. कोरलेला वाघ.. शेषनाग.. आणि काही पुराणकालीन मूर्ती इथे कोरल्या आहेत.. इथे गजांत लक्ष्मी शिल्प कोरल्याचे हि दिसते.. पण सगळ्याच महिरपीचे कोनाडे बोडके आहेत.. यातील मूर्ती कपाळकरंटयांनी पळवून नेल्याचे दिसते..

एक परफेक्ट आयताकृती खोली इथे कोरण्यात आली आहे.. छतावर मध्यभागी कडा तासून नं काढता काही भाग तसाच ठेवून.. त्यावर एक छानसं नक्षीदार फूल कोरले आहे एखाद्या झुंबरासाखं.. अगदी मधोमध.. इथून समोरचा डोंगर दिसतो आणि मध्ये दरी.. या डोंगरावरूनच अलीकडे आडवी आपली वाट आहे.. इथवर येण्याची..

समोर ५-६ पायऱ्यांचे तिन जिने कातळात कोरल्याचे दिसतात.. डावीकडे उजवीकडे कोपऱ्यात आणि एक अगदी मधोमध.. अशाच एका पायरीवर विसावा घेतला.. शांत परिसराने संमोहित होवून.. अंतर्मुख झालो.. बाबा एका कोपऱ्यात विसावा घेत होते.. त्यांना विचारलं.. बाबा.. आता किती मार्क..!! आलो नं दोन तासात इथवर.. आता सगलेच्या सगले.. बरे आलात तुम्ही..!! तशी अवघड वाट हाये.. मागे एक माणूस तिकडं खाली जंगलात वाट हरवलं.. सोबतीला तिघं होते.. पण पाण्यावाचून गेला तो.. त्या माणसांनी गावात खबर दिली मग.. गावातल्या माणसांनी त्याला शोधून काढला.. पण गेला होता तोवर.. पण गावातल्या माणसानं त्याचा अंगावरचा दागिना काढला.. मग त्याला धरला त्याने आणि पार आयुष्यातून उठवला.. सोडतोय व्ह्य त्यो.. घरात ठेवलान त्यानं दागिना.. मग कसं होणार..!! असो सह्याद्रीत घडलेल्या अनेक अपघातांपैकी हा एक अपघात.. माहिती नसताना उन्हाळ्यात केलेले धाडस पाण्याअभावी जीवावर बेतू शकते.. तेंव्हा.. एखादा वाटाड्या घेवून भटकंती केल्यास.. भटकंती सफल होवू शकेल आणि जीवावर हि बेतणार नाही..  

इथे मग सरदार स्पेशल अल्पोपहार ब्रेक घेण्यात आला.. आणि पुढच्या आणखी २-३ लेण्या पाहून.. परतीचा प्रवास सुरु केला.. इतक्या वेळ आमच्या क्षमतेबद्दल साशंक असणारे बाबा.. आम्ही हि लेण्यापर्यंतची वाट चढून आल्यावर निशंक झाले.. आता जातोय आपण तासाभरात खाली.. सगलेच्या सगले..!!

सह्याद्रीतील आणखी एक भटकंती आणि एक नवीन वाटाड्या.. काही नवीन किस्से.. भटकंतीचा नवा भिडू राहुल आणि अनुभवी सरदार.. याच्या बरोबर दोन दिवस पुरेपूर भटकून डोंगरातून फिटनेस सर्टिफिकेट मिळवलं आणि पुन्हा सज्ज झालो आणखी एका नव्या भटकंतीला.. आता योग येईल आणि डोंगर बोलावणं धाडेल तेंव्हा..

|| जय हिंद.. जय महाराष्ट्र.. जय भवानी..जय शिवराय.. जय सह्याद्री ||

माधव कुलकर्णी.. २०१६
  

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s