सुमार-महीपत-रसाळगड: एक भन्नाट भटकंती – २०१६

सुमारमहीपत-रसाळगड: एक भन्नाट भटकंती
रसाळगड, सुमारगड, महीपतगड, पालगड, मंडणगड Rasalgad, Sumargad, Mahipatgad, Paalgad, Mandangad

सह्याद्रीच्या डोंगरवाटा.. इथल्या दऱ्याखोऱ्यातून..पानापांतून..रानोवानातून यत्र-तत्र-सर्वत्र वाहणारा.. खट्याळ मस्तवाल वारा.. अंगावर येणारे कातळकडे.. भटक्या मंडळींचं पार घामटं काढणारी चढण.. अंगाचं सालटं सोलवटणारी एखादी काटेरी झुडूपातील चाल.. मना धडकी भरवणाऱ्या दऱ्या खोऱ्यांचा एक भव्य नजारा.. कुठे डोंगर माथ्यावर बांधलेलं एक छानसं दगडी राउळ.. काळाच्या पटावर धडधडून शांत झालेल्या एका तोफेशी झालेली काही क्षणांची कश्मकश.. कधी अंतर्मुख करून टाकणारी इथली निरव शांतता.. पार वैराग्याची अनुभूती देणारी.. सब मिथ्या है..  हि प्रचीती देणारी.. माणसाच्या तोंडावरचा दुनियादारी चा मुखवटा फाडून त्याला पुन्हा माणसात आणणारी.. स्वत:शी स्वत:ची खरी ओळख करून देणारी हि किरर्र कोरी करकरीत शांतता.. 

तर कधी कुठल्याशा अवघड चढणीवर उर फुटेस्तोवर केलेला त्या श्वासांचा गजर.. रान तुडवून जंगलातून बाहेर पडताच समोर दूर दिसू लागणारा एखाद्या डोंगरावरचा दुर्गमाथा.. आणि कड्या कपारी भर उन्हात दूरवरच्या माथ्यावर बोललेला धावा.. या गडावरून त्या गडावर.. माणसांच्या सैरभैर जगातून सोडवून आणलेला डोंगरात मुक्त झालेला हा जीव .. जीवाची धडपड करीत केलेली रानातील चाल आणि पाचोळा सळसळून सुंगाट बुंग वेगानं आडवं गेलेलं जनावर.. कधी पायाखालून तर कधी नजरेसमोरून.. एका डोंगराच्या कपारीत सापडलेलं गारेगार करून टाकणारं पाण्याचं टाकं.. उघड्या माळावर कुणा अज्ञात वीर सेनानीची ओबडधोबड समाधी.. एखाद्या सन्यस्त योग्यासारखी.. डोंगरात फुटलेल्या चकवा देणाऱ्या पावट्या.. किरर्र घनदाट निबिड अरण्य आणि या जंगलात बांधलेले स्वराज्याचे पहारेकरी.. दुष्मनाला आव्हान देणारे गडकोट .. इतिहासाच्या घडामोडी काही अपरिचित घटनांचे साक्षीदार.. असे काही आडवाटेवरचे दुर्ग.. हाडाच्या भटक्यांचे खरे मैतर.. तिन तिगडा तो काम तगडा रे.. असे सांगणारे वैभवशाली वनदुर्ग सुमार-महीपतरसाळगड.. एकदम भन्नाट.. राकट कणखर असे दुर्गशिल्प..


सुमार-महीपत-रसाळ गड
सह्याद्रीतील काही भटकंती या ट्रेडमार्क भटकंती प्रकारात मोडतात.. ढाक ते भीमाशंकर, लोणावळा ते ढा, हरिश्चंद्र ते रतनगड, अलंगमदनकुलंग, बामणोली ते रसाळगड, पन्हाळा ते विशाळगड, राजगड ते तोरणा, तोरणा ते रायगड, राजगड ते शिवथरघळ, भोरगिरी ते भीमाशंकर आणि रसाळ-सुमारमहिपतगड.. सुदैवाने आणि कर्मधर्मसंयोगाने यातील शेवटची वगळता काही ट्रेडमार्क भटकंती ९० च्या दशकात करता आल्या तर काही ५-६ वर्षापूर्वी.. रसाळ-सुमार-महीपत मात्र आवाक्याबाहेर वाटत होता.. पण निसर्गाचा अद्वितीय आविष्कार पहायचा असेल तर योग यावा लागतो.. अशीच एक संधी २६ जानेवारी २०१६ च्या लाब्लाचक सुट्ट्यांमध्ये चालून आली.. मुंबईचे दर्दी ट्रेकर उपेंद्र, नितीन भाऊ बच्चन, कट्यार प्रसाद आणि जग्वार दीपक दादा अशी टीम जमली.. एका अजरामर भटकंती साठी.. रसाळ-सुमार-महीपतएका भन्नाट भटकंतीसाठी.. या तिन किल्ल्यांच्या सत्वपरीक्षेतील अवघड पेपर आधी सोडवावा म्हणून नेहमीपेक्षा अगदी उलटा क्रम ठरविला.. सुमार-महीपत-रसाळ.. या त्रिदुर्ग भटकंती २-३ प्रकारे करता येते..

वाटाड्या मार्ग क्र. १: खेड – दहिवली गाव – महिपतगड  वाडी बेलदरा  राया धनगराचा झाप – गुर खिंड – सुमार गड – गुर खिंड  म्हार खिंड  धनगर वसती आणि डोगर माथ्यावरून रसाळ वाडी  आणि किल्ले रसाळगड
वाटाड्या मार्ग क्र. २: खेड  वाडी जैतापूर  महिपतगड  वाडी बेलदरा  राया धनगराचा झाप – गुर खिंड – सुमार गड – गुर खिंड  म्हार खिंड  धनगर वसती आणि डोगर माथ्यावरून रसाळ वाडी  आणि किल्ले रसाळगड
वाटाड्या मार्ग क्र. ३: खेड  वाडी बीड  रसाळ वाडी  किल्ले रसाळगड  रसाळवाडी  समोर च्या डोंगर सोंडेवरून.. धनगरवाडा – म्हार खिंड  खाली उतरून गुर खिंड  सुमारगड  गुर खिंड – राया धनगराचा झाप  डोंगर सोंडेवरून लाईटचा खांब  उजवीकडे महिपतगड पायथा  वाडी बेलदरा  महिपतगड  वाडी जैतापूर..
वाटाड्या मार्ग क्र. ४: खेड  वाडी जैतापूर  गवळ वसती  नागमोडी घाट आणि उजव्या अंगाचा डोंगरमाथा  वर पोचताच  उजवीकडे राया धनगराचा झाप – गुर खिंड – सुमार गड – गुर खिंड  पुन्हा झाप – लाईट खांब – समोर वाडी बेलदरा – महिपतगड  वाडी बेलदरा  वाडी जैतापूर  गाडीने रसाळगड – आणि किल्ले रसाळगड

टीप १: मार्ग क्र. ३ ला जोडून बामणोली-शिंदी मेट-चकदेववाडी बीड मार्गे बामणोली ते महीपतगड असा जम्बो ट्रेक करता येऊ शकेल
टीप २: मार्ग क्र. १ उलट्या क्रमाने केल्यास पुढे हातलोट घाट चढून मधु-मकरंदच्या शिखरांना गवसणी घालता येऊ शकेल

आम्ही मार्ग क्र. ४ निवडला शेवटी कुठल्या ध्येयाचा आनंद हा ते गाठण्याच्या प्रवासात आहे.. प्रजासत्ताक दिनी अनायसे भटकंती योग जुळून आला आणि सुरवात झाली एका अजरामर भटकंती ची.. मुंबई टीमचे संख्याबळ जोरावर असल्याने पुण्याहून मी एकलाच लाल डब्याने निघालो.. स्वारगेट वरून माणगाव ची यष्टी पकडून रात्री दोन च्या सुमारास तिथे एका आरस्पानी स्थानकावर दाखल झालो.. मुंबई टीम चे चालक मालक जग्वार दादा असल्याने.. थकलेली यशवंती (इंडिका कार गाडी) धापा टाकत.. ३ च्या सुमारास माणगावला पोचली.. कार मधून उतरताच दादांनी मिशीवरून कंगवा फिरविला आणि चला चला लाही लेट झालं.. चला चला.. अशी घाई घाई सुरु केली..

मग माणगाव-आंबेत-मंडणगड फाटा.. पालगड फाटा मार्गे पहाटे पाचला खेड स्थानक गाठले,, झुंजूमुंजू होण्याच्या आत.. वाडी जैतापूर गाठायचे असल्याने टाईमपास-३ न करता.. भरणे नाक्यावरील पेट्रोल पंपाच्या डाव्या अंगाने जाणाऱ्या टापोटाप डांबरी सडकेने निघालो.. २०-२२ किमी चा टप्पा पहाटेच्या टायमाला पार करून वाडी जैतापूर आणि पुढे २-३ किमी वर गवलवाडा म्हणजेच धनगरवाडा गाठला इथे या प्रवासतील एक ट्रेडमार्क विहीर आहे.. आणि मागे धनगरांची वसती.. इथून ना सुमारगड दिसतो नं महिपतगड.. डावीकडे एक डोंगर रांग उजवीकडे एक आणि समोर त्या डोंगररांगा एकत्र येताना दिसतात.. या खोऱ्यातून आता गाडीरस्ता काढला आहे.. थेट महीपतगडाच्या अल्याडच्या डोंगरावर जाणारा..

गवळवाड्यातून एक माहितगार ठरविला आणि लगोलग निघालो.. आणि ह्याचं झालं असं कि समदी म्हणत होती नाष्टा करून जाऊ.. पण दादा म्हणले .. “आता लवकर चला उशीर कशाला करता..!!” म्हणून तसेच निघालो.. कच्च्या गाडी रस्त्याने.. साधारण अर्ध्या पाउण तासात एका तासलेल्या डोंगरकड्याशी येऊन थांबलो.. इथे दादा गाडी घेवून हजर होतेच.. आता ज्युनिअर यशवंती ला इथेच सोडून सुमार गडाकडे निघालो.. ब्यागा बोचकी बाचकी घेवून मंडळी बिगीने गडाव निघाली.. इथे सुरवातीलाच तीव्र चढ साधारण शे-दोनशे फुट उंचीचा आणि मग एक भला मोठा डोंगराच्या उजव्या अंगाने वळसे घेत जाणारा सरळसोट ट्राव्हर्स मारून मग उजव्या अंगाने डोंगरावर तिरकस चढणाऱ्या वाटेने निघालो.. इथे मात्र उन्हाने पार हल्ला बोल सुरु केला.. त्यामुळे वेग मंदावला होता.. पण जग्वार दादा काही लीड पोझिशन सोडायला तयार नव्हते.. साधारण तासाभरात डोंगरमाथा गाठला आणि आपण बरीच उंची गाठल्याचे लक्षात आले.. आता समोर.. डावीकडे.. महिपतगड.. पायथ्याची वाडी बेलदार अगदी डौलदार दिसू लागली.. सुमारचा काही माग लागेना.. इथे धापा टाकीत बूड टेकवणार इतक्यात दादा वदले.. “आता लवकर चला उशीर का करता..!!”.. मग दादांशी नष्टर घेवून १० मिनिटांचा ब्रेक घेवून टाकला.. म्हटलं हृदयाचे ठोक्यांची हि तेजतर्रार धडधड शांत होईस्तोवर नाही हलणार कोणी..

या डोंगर माथ्यावर आल्यावर.. समोर एक डोंगर रांग दिसते.. पायथ्याशी एक टुमदार वाडी २०-२५ घरांची.. समोर आखीव रेखिव शेताड.. मध्ये दरी खोरं.. दोन भल्या थोरल्या डोंगररांगांना समांतराचे अस्तित्व देणारं.. यातील  अलीकडची एक डोंगररांग.. एखाद्या स्पीड ब्रेकर सारखी.. रांगेकडे पाहिल्यास उजवीकडे कोकणचा दरीचा नजारा..

गवलवाडा ते इथवर यायला साधारण दीड-दोन तावेळ लागतो.. क्षणभर विश्रांती घेवून आता सुमारगडाकडे निघालो.. गाईड — तयारच होते.. आणि सोबत चला चला.. लवकर चला असा पिच्छा पुरवणारे आमचे दादा. तर दादांच्या विनंतीला मान देवून निघालो .. आता दुपारच्या उन्हाचा मारा थोडा तीव्र होऊ पाहत होता.. पण आजवरच्या भटकंतीचा अनुभव पाहून मध्यम वेगाने चाल सुरु ठेवली.. पहिली चढण चढताच उजव्या अंगाच्या डोंगर उतारावर एक सत्तरीतले म्हातारबाबा उन्हं खात बसले होते.. “कुठून आला पोरांनो.. आणि कुठंशी जाणार?”.. अशी विचारपूस सुरु झाली.. सुमारला चाललोय.. “वाट वाईच अवघड हाय पन.. नीट जावा”.. मी हाय इथं गुरं सोडल्यात तवा थांबतो इथं.. बाबा तुमचं नाव.. “राया.. राया धनगर..” इथं वर एकलाच राह्यतो.. सत्तरीतला हा माणूस आता एखाद्या योगसंपन्न सन्याशासारखा भासू लागला.. रानाची पाखरे अशी रानातच रमायची.. यांना मायानगरी कशी रुचावी.. दूरवर पसरलेला हा सह्याद्रीचा पसारा आणि किर्र अंधारल्या रानात एक खोपटं बांधून एकटाच राहणारा हा राया.. म्हणजे जशी प्रभूची थोर माया.. राया.. म्हणजे ह्या दूरवरच्या रानाचा एक अनामिक राजा.. इथल्या निसर्गरम्य आटपाट नगरीत एखाद्या महालासारखं एक टुमदार खोपटं बांधून राहणारा एक धाडसी सैलानी.. इथली झाडे.. फुलं वेली पाने.. इथे नांदणारी हिंस्त्र श्वापदे.. सरपटणारे जीव.. आणि आकाशात मुक्त विहरणारी पक्षी.. हि त्याची प्रजा.. आणि राया त्यांचा अनभिक्षित राजा.. एक सन्यस्त जीव..


राया धनगराचा अनुभवाचा आणि आपुलकीचा ‘नीट जा रे पोरांनो’ असा कानमंत्र घेवून पुढे निघालो.. एक दोन उंटाच्या पाठीसारखे चढाव पार करीत साधारण अर्ध्या तासात राया धनगराचा झापगाठला.. इथे राया धनगराच्या झापामध्ये ब्यागा ठेवून केवळ पाण्याच्या बाटल्या आणि शिदोरी घेवून पुढे निघालो.. जग्वार दिपकदादा तयारच होते.. “चला चला.. लवकर चला

आता झाडी जंगलातली वाट होती.. राया धनगराच्या झापापासून पुढे जायचं.. डोंगराला डावीकडून वळसा मारीत.. तब्बल तिन डोंगरांना वळसा मारताना इथले घनदाट जंगल आणि त्यातून जाणारी पाला पाचोल्याची वाट सोबतीला असते.. अधून मधून जाणवणारी सळसळ कधी डोक्यावर सांदी-पानातून होणारी तर कधी पायवाटेच्या डाव्या उजव्या अंगाच्या दाट झाडीत जाणवणारी.. आणि रान तुडवताना होणारा चर्र फर्र असा आवाज सारेच विलक्षण.. श्वासांची  लय वाढू लागली तसे ब्रेक ब्रेक असे आपसूकच ओरडू लागलो पण दादा काही ऐकेचना.. त्यांच्या अंगात जग्वार संचारला जणू.. फ्या फ्या करीत गप गुमान दादांच्या मागे मुकाट पावले टाकू लागलो..

साधारण तासभर’ चालीनंतर वाट तिरपी वर जाऊ लागली.. गचपणीच्या वाटेने पुढे जाताच आपण एका मातकटलेल्या खिंडीत येऊन पोहोचतो.. हि ‘गुर खिंड’.. इथून समोर उतरणारी वाट.. रसाळकडे म्हार खिंडीकडे जाणारी तर डावीकडे वर जाणारी कारवीच्या झाडीतली वाट सुमारगडाची.. इथे खिंडीत जोरदार ब्रेक देण्याचे दादांनी मान्य केले होते म्हणून हक्काचा ब्रेक घेवून कारवीचे रान तुडवून वर जाऊ लागलो.. डोंगरकड्याला उजवीकडे ठेवत तिरपे सरळ जाताच एक भलेमोठे झाड वाटेला आडवे आले.. गुरेढोरे पुढे जाऊ नयेत म्हणून हा ओंडका पायवाटेला आडवा  टाकून वाट बंद करण्यात आली असल्याचे दिसले.. अरेच्चा !! पण आपण तर माणूस .. म्हणून हा ओंडका लांघून पल्याड जायचे आणि चाल सुरु ठेवायची .. दहा पंधरा मिनिटात सुमार गड समोर उन्हात तळपताना दिसू लागतो आणि पावलांचा वेग आपसूक वाढू लागतो.. गड समोर पुढ्यात आला कि तिथवर पोहोचण्यासाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागतात. दिवसातलं पहिलं ध्येय असं भर उन्हात आणि तळपत्या रानात पुढ्यात येऊन ठेपलं.. पावले आपसूकच गडमाथ्याकडे निघाली.. दहा-एक मिनिटात सुमारगडाच्या नाकाखाली पोहोचलो.. इथे येताना डावीकडे सह्याद्रीचा एक आणखी एक अजरामर नजारा आणि सह्याद्रीची भेदकता दर्शविणारा एक नजारा काही केल्या डोळ्यासमोरून हलत नसतो.. कातळ  तुटून कोसळत्या दऱ्या.. खाली दोन डोंगर रांगांच्या मधोमध घनदाट वृक्षराजीने वेढलेले खोरे सारेच अद्भुत.. पंडोराचे जग.. भव्य दिव्य राकट कणखर..

सुमारगड आणि त्याच्या अलीकडचा डोंगर एका निमुळत्या धारेने जोडला आहे..  सुमारगडाच्या तिनही बाजूनी खोलवर दिसणारी दरी काळजात कापरे भरते.. तेंव्हा जपून धिम्याने चालत पुढे निघालो.. सुमारगडाला डावीकडून प्रदक्षिणा मारताना पायाखाली जेमतेम दोन तिन फुटाची कातळात कोरलेली वाट साथ देत असते उजवीकडे थेट डोक्यावर उभा कातळ.. त्याचा आधार घेत डावीकडे दिसणारी दरीकडे न पाहता पुढे निघायचं.. दृष्टीभय चेपून चाल सुरु ठेवायची.. आता आपण गडाच्या पलीकडच्या कोपर्यापाशी येऊन पोहोचतो.. इथे बऱ्यापैकी झाडी आहे आणि थोडं पुढे थेट दरी चे सैराट दर्शन.. नजर हटी.. अन दुर्घटना घटी.. सुमारगडाची वाट संपून आता प्रस्तरारोहन सुरु होते.. तेंव्हा क्षणाची उसंत घ्यायची आणि थेट कातालाशी दोन हात करायचे.. आता सुमारच्या नाकावरून प्रस्तरारोहण करीत कातळखोबणीतून वर सरकायचं आणि तुटक्या फुटक्या पायऱ्यांनी वर येताच.. साधारण साठ-सत्तर फुट उंच आणि ७० अंश तीव्र अशा कड्यावर वर जाण्यासाठी एक तुटकी फुटकी शिडी आहे.. इथे एक चूक थेट जीवावर बेतू शकते तेंव्हा दमाने वर निघायचं.. शिडी ज्या कड्यावर लावली आहे तिथे बऱ्यापैकी घसारा आहे.. कधी कधी तर थेट एखादा दगड आधाराला धरायचा आणि तो थेट हातात येऊन पडतो.. याला शास्त्रीय भाषेत लूज-रॉक असं म्हणतात.. लूज-रॉक शी दोन हात करून शिडीच्या वरच्या टोकावर पोचताच.. एक तिरपा खडक आहे आणि उजवीकडे थेट दरी.. इथे एक झाड आहे.. सुरक्षेसाठी इथे दोर लावता येऊ शकेल.. लटपट करणारी शिडी आणि विनाखोबणीचा खडक पाहून पावलं अडखळली.. तिरप्या खडकावर ग्रीप नसल्याने उभं राहण्याचे धारिष्ट्य होईना.. तसा पुन्हा शिडी उतरून खाली आलो.. उप्या.. नितीन भाऊ आणि गाईड सरसर वर गेले मी तिथेच एका दगडावर जीव मुठीत घेवून बसलो.. वर जाऊन भाऊंनी एका थोरल्या झाडाला दोर बांधला आणि मग पुन्हा एकदा प्रयत्न म्हणून जीव खाऊन चाल केली.. सोबतच्या दोराच्या आधाराने तिरप्या खडकावर पाय ठेवला.. आणि डावीकडच्या -१० फुटी कातळटप्पा चढून खोबणीतून वर सरकत एकदाचं ते झाड गाठलं.. इथे गडाची तटबंदी दिसू लागली खाली जेमतेम -५ फुटांचा जमिनीचा पट्टा.. आता छातीइतक्या तटबंदीवर जोर लावून चढायचं आणि गडमाथ्यावर प्रवेश करायचा..

इथे झाडाच्या सावलीत एक जोरदार ब्रेक घेवून श्वासांची एक्स्प्रेस तटबंदीवर लावली.. आणि गडावर काय काय अवशेष उरले आहेत हे पाहण्यासाठी निघालो.. समोरच एक देवडी आणि भग्न देवता दिसताच नतमस्तक होवून डाव्या अंगाने निघालो.. आता इथे उजवीकडे पाण्याचं एक मोठं टाकं आहे आणि डाव्या बाजूच्या कातळात गुहेमध्ये शंभूमहादेवाचे मंदिर.. हिरव्याशार पाण्याचा तवंग बाजूला सारून बघितलं तर पाणी अगदी स्वच्छ होतं.. आणि थंडगार.. मग पोटभर पाणी पिऊन शंभू महादेवाचं दर्शन घेवून भर उन्हात एक गडावर प्रदक्षिणा मारली आणि पुन्हा ऊरात धडकी भरवणाऱ्या वाटेकडे निघालो.. परतीच्या प्रवासाला.. आता खरी कसोटी होती.. दरीची खोली आणि त्यातून निर्माण होणारे दृष्टीभय पायात कापरे भरत होते.. मग स्लो बट स्टेडी हे ब्रीद मानून.. घसारा उतरू लागलो.. वाट तशीच होती.. नजर हटी आणि दुर्घटना घटी.. दोरखंडाला ठराविक अंतरावर गाठी मारल्याने आधार भक्कम होता.. जीव खाऊन दोर पकडून हि वाट उतरलो आणि सुटकेचा निश्वास टाकला.. वन पीस.. एकही टप्पा न पडता सुखरूप खाली उतरल्याने गडदेवतेचे आभार मानले आणि पुन्हा परतीच्या वाटेकडे निघालो.. ३ डोंगरांना उजव्या अंगाने वळसा मारीत पुन्हा राया धनगराच्या झापावर येऊन पोचलो.. तेंव्हा राया धनगर दुपारच्या विसाव्याला त्याच्या खोपटात परत आला होता.. मग पायपीटीने तापलेल्या देहरुपी इंजिनावर एक हंडा ताकाचा मारा केला.. तेंव्हा जीवात जीव आला.. तिथे एका झाडाखाली बूड टेकवले आणि जग्वार दादांना तंबी दिली गाडी अर्धा-पाउण तास काही हलणार नाही.. एक हंडा ताकाने एकदम अंगात शक्ति फुंकल्याने.. ताजे तवाने होऊन.. वाडी बेलदार कडे निघालो.. पन्ह आल्यावाटेने.. लाईटच्या खांबापाशी येऊन पोचलो.. इथे अलीकडे एका वाट खाली उतरते.. थोडं दरीत उतरायचं आणि पुन्हा छाताडावर येणारा चढ पार करताच कौलारू घरांची टुमदार वाडी दिसू लागते.. हिच ती बेलदार वाडी.. वाडीच्या डावीकडे वर थोरला आडवा डोंगर म्हणजे महिपालगड..

मुक्काम पोष्ट बेलदार वाडी:


बेलदार वाडीच्या अलीकडे पोचलो तोवर सूर्यदेव चंबू गबाळे आवरून दुसऱ्या गावी निघाले होते.. वाडीत पोचलो आणि दुसऱ्या घराशी येऊन पोचलो.. इकडे पवार आजी स्वागतासाठी बाहेर आल्या.. कुठनं आला पोरांनो.. या जरा विसावा घ्या.. मग चार-दोन गप्पा मारल्यावर.. जेवणाची सोय होईल का हे विचारले.. तुमी काही तेल बिल आणलंय का.. हो आणलंय नं.. तांदूळ.. तेल मीठ चहा.. सगळा शिधा आहे.. मग देते बनवून.. तुम्ही बसा.. पाणी भरून आलेच मी.. म्हणजे.. हिथं पाणी ते वरच्या विहिरीतून आणवं लागतं.. मग उप्या म्हणाला.. आजी तुम्ही थांबा आम्ही भरतो पाणी आज.. मग चार दोन हंडे आणि एक पोहरा घेवून.. निघालो पाणी भरायला..
गावातून मधोमध आडवी जाणारी वाट ५-६ घर संपताच एका टेकाडाला वळसा घालून नागमोडी वर जाऊ लागते.. इथे खुरटी झाडी आणि मग एक ओढ आहे.. इथेच एक विहीर आहे.. हाच इथल्या पाण्याचा मुख्य स्त्रोत.. पोह्र्याने पाणी शेंदून.. पुन्हा पवार आजींच्या घराशी येऊन पोचलो.. आम्ही पाणी भरल्याचे आजींना भारी कौतुक.. म्हणून त्यांना भेटलेल्या प्रत्येकाला त्यांनी आवर्जून सांगितले.. पोरांनी पाणी भरलं सगळं.. मला किती मदत केली.. मस्त बटाटा भाजी आणि तांदळाची भाकरी असा जय्यत मेनू होता.. आजीच्या त्या चंद्रमौळी झोपडीच्या पवीत ब्यागा टेकवल्या होत्या.. जेवण तयार होताच आजीने आरोळी दिली तसेच भुकेने कावलेले जीव जेवणावर तुटून पडले.. मग गप्पा फोडणीला.. तेंचा आजींचा परिवार आता मुंबईत स्थाईक झाला ते.. “आजी गाव तसं मोठं दिसतंय”,, ,, किती लोक राहतात इकडं वसतीला.. कशाच काय.. आता सगळे गेले पोटापाण्याच्या वाटेला.. आता फक्त हिथं मढीच राहिली नं काय.. या वाक्याने खोलीत शांतता पसरली.. आडवाटेवर वसलेल्या या वाडीसत्याची हिच खरी कर्मकहाणी.. रोज संघर्ष करण्यापेक्षा जरा इतरांसारखं जगता यावं म्हणून इथली नवीन पिढी शहरात किंवा पायथ्याच्या गावी स्थलांतरित झालेली.. आणि मागे उरलेली हि जुनी पिढी.. शहरी वातावरणाशी सूत नं जमवता आलेली.. इथली भाबडी लोकं.. इथल्या मातीत जन्मलेली आणि इथेच मिसळून जाणारी..

आजी सगळ्याचं जेवण होईपर्यंत थांबल्या होत्या.. कुणाला कमी पडाय नको म्हणून.. दादांनी आग्रह केला मावशे घे वाढून पान आता.. झालय आमचं..! ना आमची कुठली ओळखना पाळख.. पण केव्हढा हा जिव्हाळा.. आणि केवढी डोंगराएवढी आपुलकी.. अशी हि रानातली मुक्त पाखरे रानातच रमायची.. त्यांना हा नवा बाटलेला शहरी वारा कसा सोसावा..!! जेवण उरकून पुन्हा पवीत येऊन पोचलो.. डोंगरा आडून वर आलेला चंद्र आता.. पडवीच्या झावळ्यातून डोकावत होता.. सारवलेल्या अंगणात पाठ टेकली आणि पाच दहा मिनिटात दिव्य समाधी लागावी तशी गाढ झोप लागली.. एक शांत झोप..

किल्ले महिपतगड: सकाळी जग्वार दादांच्या आवाजाने जाग आली.. चला दादा.. महीपतगडावर.. सकाळी लवकर गडप्रदक्षिणा करून आज रसाळगड  पहायचे ठरल्याने.. सगळ्यांनी आवरते घेतले.. ब्यागा आजीकडे सोडून लगोलग महीपतगडाच्या वाटेवर निघालो.. ते तिकडं.. वाटेवर आड (विहीर) हाय.. तिथनं डावीकडं वाट गेली गडावर.. सापडल वाट तुमाला.. नीट जा..


बेलदार वाडीतून जाणाऱ्या वाटेने डावीकडे जायचं.. मग अंदाजे शंभर पावलावर वाट उजवीकडे वळते.. खुरट्या झाडीतून दहा-पंधरा मिनिटे चालून आपण त्या विहिरीपाशी येतो.. इथे डावीकडे डोंगराच्या नाकाडावर/सोंडेवर नेणारी वाट आहे.. या नाकावर चढून आपण डोंगराच्या खाली येतो.. इथे डावीकडे.. एका जोड-डोंगरावर लांब नाकासमोर महीपतगडाचा बुरुज दिसू लागतो.. पायवाट उजवीकडे वळणे घेत महीपतगडाच्या दिशेने जावू लागते.. इथे उजवीकडे एक वाट वर जाताना दिसते आणि एक डावीकडच्या बुरुजाकडे जाणारी.. आपल्याला उजवीकडे वर जाताच.. एक आडवी भिंत दिसते.. हा क बंधारा आहे.. भिंतीच्या डावीकडून वर येताच.. पायवाटेने पुढे सरकायचं.. पुढे उजवीकडे एक मोठी विहीर दिसते.. विहिरीच्या अलीकडे थोडी मोकळी जागा  आणि मागे दाट झाडी-जंगल आहे.. विहिरीला खेटून गवतातून जाणाऱ्या बारक्या वाटेने पुढे आडवी झाडी दिसते.. हि पार करताच एक प्रशस्त मळलेली पायवाट दिसते.. हि आपल्याला पारेश्वर मंदिराकडे घेवून जाते.. या वाटेने झाडीतून जाताच.. दहा-पंधरा मिनिटात मंदिर दिसू लागले.. मंदिरासमोर एक विहीर आणि बरीच मोकळी जागा.. बाकी अथ:पासून इतिपर्यंत जंगलच-जंगल.. इथे अस्वल.. कोल्हे.. बिबटे आणि जंगली प्राण्यांचा मुक्त वावर आहे.. त्यामुळे इथल्या गडावरच्या जंगलात मुक्काम करीत असाल तर सावधान..

महीपतगडाचा पसारा तसा बराच मोठा आहे.. पण गडावर सध्या दाट जंगल असल्याने .. बरेच अवशेष अक्षरशः शोधावे लागतात.. इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार गडाला ६ दरवाजे आहेत.. ईशान्य दिशेला लालदेवडी दरवाजा, आग्नेय दिशेस यशवंत दरवाजा, पूर्वेला पुसाटी,  पश्चिमेला शिवगंगा, दक्षिण दिशेस खेड आणि उत्तरे कोतवाल दरवाजा अशी नावे आहेत.. गडावर मध्यभागी पारेश्वराचे मंदिर आहे..  खेड दरवाजा जवळ गणपती आणि मारुती मंदिर आहे.. महिपतगड सुमारे सव्वाशे-दिडशे एकरात पसरल्याचे इतिहासकार सांगतात..पण गडाचा पसारा खरंच खूप मोठा आहे.. संपूर्ण गड धुंडाळायचा आणि काना-कोपरा पहायचा म्हणजे कमीत कमी  दिवस हवेत.. गचपण असल्याने बऱ्याच ठिकाणी पायवाटा नाहीत.. वाट करीत जावे लागते आणि स्थानिक सोबत असल्याखेरीज हे धाडस करून नये.. असं घनगर्द जंगल इथे आहे..

महिपतगड हा सह्याद्री रांगेला समांतर जाणाऱ्या अशा डोंगररांगेवर बांधला आहे.. याच रांगेत .. सुमारगड आणि पुढे डावीकडे रसाळगड हे किल्ले येतात.. किल्ल्यावरून उतरून हातलोट गावी जाता येते.. इथून हातलोट घाटातून मधु मकरंदगडाकडे जाता येईल.. किंवा रसाळगड उतरून चकदेव-महीमंडण-पर्बतगड कडेही जाता येते.. गडावर ३६० ते ७०० इतिहासकालीन अवशेष असल्याचे इतिहासकार आणि ग्याझेटीअर्स सांगतात.. यात लहान मोठे बुरुज.. वाडे.. समाधी.. मंदिरे आणि तटबंदी यांचा समावेश आहे.. रामदास स्वामींच्या सज्जनगड वास्तव्याआधी या गडाची निवड केल्याचे काही इतिहासकारांचे मत आहे.. असो..


आम्ही मंदिरासमोर डावीकडे दिसणाऱ्या चौथरयाकडे निघालो.. इथून एका अज्ञात समाधीलगतची वाट झाडीत गेल्याचे दिसले.. तिकडे निघालो.. पुढे गचपण वाढू लागली तसे.. ऊन दिसेनासे झाले आणि पायवाटेवर डावीकडे एक उघड्यावरचे हनुमान मंदिर आहे.. इथून उजवीकडे जाताच.. दाट वाटेने आपण बाहेर येताच एक ओढा दिसतो.. हा पार करताच परत दाट जंगल.. इथे थोडी चढण आहे.. पण डावीकडे जाणारी.. दाट जंगलातली.. दिड पुरुष भर उंचीच्या कारवीमधली.. हि कारवी पार करताच वाट आपल्याला एका सोंडेवर घेवून जाते.. इथे जंगल मागे पडून आपण एका डोंगराच्या सोंडेवर (पूर्व दिशेस) येऊन पोचतो.. समोर दरी.. पुढे सह्याद्रीच्या दोन-तिन समांतर आणि अजस्त्र डोंगररांगा.. तुटलेले कडे.. खाली दरीत घनदाट जंगल दिसते.. इथून पाहताना उजवीकडे चौथ्या डोंगररांगेत मधु-मकरंदगड डोकं वर काढून बसल्याचे दिसतात.. डावीकडे महीपतगडाचा पसारा दिसतो.. त्याच्या शेवटाला एक सोंड खाली उतरते.. ती पुढे खिंडीत आणि डावीकडे — गावात जाते.. अलीकडे गर्द जंगल आहे..

हि सोंड थोडी निमुळती होत खाली उतरते.. इथे बऱ्यापैकी जागा आहे.. इथून डावीकडे पाहताना.. महीपतगडाच्या डोंगर उताराला बांधलेले ३-४ बुरुज दाट झाडीतून बाहेर डोकावताना दिसतात.. सह्याद्री चे विश्वरूप दर्शन दाखवणाऱ्या काही अद्भुत जागांपैकी हि एक दिव्य जागा आहे.. हे नक्की.. असो सह्याद्री चा दिव्य नजारा पाहून पुन्हा पारेश्वर मादिरापाशी आलो.. आणि एक पाणी ब्रेक घेवून पुन्हा बेलदारवाडीपाशी आलो.. इथे पवार आजींचा निरोप घेवून पायथ्याच्या धनगरवाडी कडे निघालो.. इकडे बांधाला आडवे जात मग डोंगराच्या कडेने समोरच्या सोंडेवर पोचलो आणि उजव्या उतरत्या पायवाटेने खाली आणि मग पुन्हा डोंगराला डावीकडून अर्ध प्रदक्षिणा मारून आणखी एका सोंडेवर पोचलो.. इथे मुरमाड वाटेवरून धिम्याने उतराई करीत.. घाटरस्ता गाठला..

किल्ले रसाळगड :- दुपारी ३ च्या सुमारास रसाळगडाकडे कूच केली.. रसाळगडावर आता थेट पायथ्यापर्यंत गाडी जात असल्याने गाडीने रसाळगड करायचे ठरले.. गाडी फुफाटा उडवीत निघाली.. आणि १९९२ साली केलेल्या बामणोली रसाळगड भटकंती ची क्षणचित्रे डोळ्यासमोर नाचून गेली.. बामणोली-शिंदी मेट-चकदेवगड-शिडीची वाट-धनगरवाडा-आंबिवली-रसाळवाडी-रसाळगड असा ३ दिवसांचा मेगा ट्रेक एकदम नजरेसमोर तरळून गेला.. खेड-भरणेनाका-तळे गाव पुढे पहिला फाटा रसाळगडकडे जाणारा तर दुसरा उजवीकडचा फाटा-वाडी जैतापूर महीपत-सुमारगडाकडे जाणारा..

वाडी जैतापूर कडून सोडल्यावर तळे गावाच्या अलीकडे डावीकडे एक गाडीरस्ता आहे.. फाट्यावर किल्ले रसाळगड असा फलक लावला आहे.. तिकडे निघालो.. ड्रायव्हिंग चे सुकाणू जग्वार दादांकडे होते आणि गाडी रसाळगड च्या घाट रस्त्यावर कुरकुर करू लागली.. आणि एका वळणावर बेसिक सुविधांवर चालू असलेली दादांची लाजवंती गाडी.. लाजून बंद पडली…. म्हटलं झाली का शाळा आता.. काय दादा..!! तेंव्हा लगेच दादांनी गाडी सुरु करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु केले.. गाडीने एयर पकडलाय.. थांबा जरा.. २-३ वेळा धक्का स्टार्ट करून लाजवंती सुरु झाली आणि जीव भांड्यात पडला.. पुन्हा गाडी फुफाटा उडवीत निघाली.. २-२.३० च्या दरम्यान.. रसाळगडच्या अगदी पायथ्यापर्यंत गाडी येऊन पोचली आणि रसाळडाकडे पावले पडू लागली.. एक चढण पार करून डोंगर सोंडेवर पोचलो आणि पलीकडच्या अंगाला खाली धारेवर रसाळवाडी दिसू लागली.. रसाळगड साधारण दक्षिण-उत्तर असा पसरला आहे.
उजवीकडे रसाळगडाच्या पायऱ्या सुरु होताच.. जय भवानी जय शिवाजी असा एकच जयघोष आणि नुकत्याच बांधलेल्या पायऱ्यांवरून पुढे जात रसाळगडाचे दोन दरवाजे पार करून गडमाथा गाठला.. स्वागताला काही तोफा पाहताच मन आनंदाने भरून गेले.. शेजारीच जंगली बोरांचा सडा पडल्याचे पाहून रानाची बोरे खिशात भरून झोलाईदेवी मंदिराकडे निघालो.. पाच दहा मिनिटात मंदिरासमोर पोचलो आणि गडप्रदक्षिणा मारण्यासाठी निघालो.. गडाच्या दक्षिण बाजूकडील टोकाला.. झोलाई मंदीराला खेटून गडाचा बालेकिल्ला आहे.. त्यासमोरील वाट आपल्याला माचीकडे घेवून जाते.. साधारण अर्ध्या किमीवर पसरलेली हि माची पाहणे म्हणजे एक पर्वणी आहे.. जाताना पाण्याची टाकी.. एक वाडा.. आणि अज्ञात वीरांच्या समाध्या दिसतात.. त्या इतिहासाच्या पटावर धराशायी पडलेल्या वीरांच्या समाधीसमोर नतमस्तक होवून पुढे निघालो आणि वीस एक मिनिटात दक्षिण तटावर येऊन पोचलो.. इथून एक सोंड खाली उतरते.. डावीकडे एक डोंगर त्या सोंडेला खेटून उभा असतो.. जरासा अलिप्त.. उजवीकडे दाट जंगल आणि सह्याद्रीच्या डोंगरांचे पदर.. डावीकडे सह्याद्रीचा घाटमाथा.. चकदेव गड दिसू लागतो.. थोडं मागे सुमारगड दोन डोंगरांच्या मागून डोकावून लागतो.. खाली.. सह्याद्रीची मुख्य रांग आणि रस्ल्गड यांच्या मध्ये — गाव दिसू लागते.. इथून गडाच्या पायथ्याशी वसलेल्या रसाळवाडीकडे येण्याचा जुनी पायवाट आहे..


सूर्य मावळतीला निघाला तसे गडाचे हे दक्षिण रंग अनुभवून परतीच्या वाटेवर निघालो.. पुन्हा झोलाई मंदिर.. आणि अलीकडे बालेकिल्ला पाहण्यास निघालो.. बालेकिल्ल्याची बरीच डागडुजी केल्याचे पाहून बरे वाटले.. आत खोल्या काही तोफा आणि चुण्याचा घाणा आहे.. बालेकिल्ल्याचे बुरुज मात्र सुस्तिथीत आहेत.. बालेकिल्ला आणि झोलाईदेवी मंदिर यामध्ये असलेला तलाव पुन्हा बांधून काढला आहे.. झोलाईदेवीचे दर्शन घेवून रसाळ-सुमार-महीपत भटकंती देवीच्या चरणी अर्पण केली आणि मनोभावे नमस्कार करून डावीकडच्या तटबंदीवरून फेरफटका मारत पुन्हा खाली  पहिल्या दरवाजाजवळ पोहोचलो.. सोंडेवरून डावीकडे उतरून गाडीरस्ता गाठला आणि सह्याद्रीच्या डोंगरधारेवर सोनसळी किरणाचा अभूषेक करणाऱ्या सूर्याचे ते रुपडे काही क्षण पाहून.. दापोलीला निघालो.. रसाळ-सुमार भटकंती.. हि खर्या अर्थाने पूर्ण झाली होती.. एक स्वप्न पूर्ण झाले होते.. आता दापोली आणि वेळ मिळाल्यास पालगडमंडणगड करण्याचे ठरले होते..


किल्ले पालगड
दापोली/खेडमंडणगड रस्त्यावर दापोलीपासून २० किमी अंतरावर पालगड गाव आहे.. पालगड हे सानेगुरुजींचे जन्मगाव.. तिथे मंडणगड – दापोली – खेड तिठा आहे खेड च्या रस्त्याला जायचं थोडं पुढे घाट उतरून गेल्यावर.. दुसऱ्या फाट्यावर डावीकडे वळायच.. हा रस्ता घेरा पालगड कडे जातो.. इथून पुढे ४-५ किमी वर आणखी एक तिठा लागतो.. या ति रस्त्यांच्या मधला रस्ता घेरा पालगड कडे जातो.. घेरा पालगड हे पालगड पायथ्याचे गाव.. ३०-४० घरांचे एक टुमदार गाव.. गावातून गडाकडे पाहताना.. उजवीकडच्या सोंडेवर जाण्यासाठी कच्चा गाडीरस्ता तयार झाला आहे.. या रस्त्याने एक धाधन पार करताच अलीकडे एक पायवाट आपल्याला गडाच्या डावीकडच्या सोंडेवर घेवून चोरदरवाजाकडे जाते.. आणि गाडीरस्ता संपतो तिथून डावीकडे पालगडाचा मुख्य दरवाजा आहे.. जग्वार दादा वाटाड्या यांनी चोर दरवाजाची वाट निवडली.. थोडी चढण पार करताच एका दांडावर पोचलो उजवीकडे येताच.. समोर पालगड दिसू लागला.. पण इकडे सगळ्या गुरांच्या वाटा असल्याने त्यातल्या त्यात मळलेल्या पायवाटेने पुढे निघालो.. हि वाट पालगडाला डावीकडून प्रदक्षिणा घालत दाट झाडीत शिरते.. अगदी अलीकडे एक बऱ्यापैकी मोठे झाड आहे.. त्याशेजारी काही पाण्याचे खोदीव टाके दिसतात.. गचपण वाटेने पुढे जात आम्ही गडाच्या डावीकडच्या बुरुजाच्या खाली येऊन पोचलो.. पण इथे ठळक पायवाट नसल्याने.. पुन्हा माघारी फिरलो.. पुन्हा मोठे झाड दिसताच त्याच्या सावलीत दोन क्षण विश्रांती घेतली.. आणि २० एक पावले पुढे आलो.. इथे एक वाट घसाऱ्यावरून वर झाडीकडे जाताना दिसते.. दादांना म्हटलं चला इथून.. बघा वाट सापडते का.. वर चढून जाताच काहीशी पुसट पायवाट दिसते.. आणि कातळ टप्पा.. या टप्प्यावर बऱ्याच खोबणी असल्याने.. चढाई सोपी आहे.. कातळटप्पा चढून गेलं कि आपण एका ढासळलेल्या बुरुजाच्या समोर येऊन पोचतो.. आता सोंडेवरून बुरुजाकडे जायचं आणि मग उजवीकडे जाताच एक चोर दरवाजा दिसू लागतो.. तिकडे निघालो.. इथे जरा जपून चढायचं.. कारण.. खाली पाय घसरला कि कपाळमोक्ष.. चोर दरवाजा गाठला आणि वर आलो कि काही पायऱ्या पार करताच आपण थेट गडमाथा गाठतो.. खुश्कीच्या मार्गाने का होईना पण गडावर सुखरूप आणल्या बद्दल जग्वार दादांचे आभार मानले.. गडप्रदक्षिणा मारावी म्हणून तटबंदीच्या कडेकडेने निघालो मध्ये काही जोती.. तोफा आणि वाड्याचे अवशेष दिसतात.. गडाची तटबंदी बऱ्यापैकी सुस्थितीत आल्याचे पाहून बरे वाटते.. डावीकडून तटबंदीला समांतर जात आपण गडाच्या तिसऱ्या माचीवर पोचतो.. इथे समोर चा जोड डोंगर आणि त्याची सोंड दिसते.. मागे कोकणचा दूरवर पसरलेला मुलुख.. मध्ये एका सिमेंटच्या चौथरा आणि पत्र्याचे शेड बांधले आहे.. त्यात शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसवलेला आहे.. महाराजांना वंदन केले आणि शेडमध्ये काही काळ विश्रांती घेतली.. ऊन जास्तच काऊ लागल्याने.. दहा एक मिनटात मुख्य दरवाजाकडे डाव्या पायवाटेने निघालो.. ढासळलेल्या दरवाजातून खाली उतरताच कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात आणि मग उतरणीची पायवाट.. पालगडाचा निरोप घेतला आणि घेरा पालगड गावाकडे निघालो.. दहा-एक मिनिटात गाडीरस्ता सुरु झाला आणि कच्च्या रस्ताने चालत गाव गाठलं.. हि वाट चोरदरवाजाच्या वाटेपेक्षा फार सहज-सोपी अशी आहे.. घेरा-पालगड गावात एक पाणी ब्रेक घेतला.. आणि एका घरात चहाची सोय लावली.. आणि भाऊंनी (आ. रामदास कदमांनी) गावाचा कसा विकास केला याची कहाणी ऐकली.. गडाबद्दल फारशी माहिती मिळाली नाही पण छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या गडावर येऊन गेल्याचे मात्र एका आजींनी सांगितले.. यजमानांचा निरोप घेवून पुन्हा पालगडतिठा आणि मग सध्याचे पालगड गाव गाठले.. आणि मंडणगडाकडे निघालो..

मंडणगड किल्ला
पालगड पासून ३०-३५ किमी वर मंडणगड हे तालुक्याचे गाव आहे.. मंडणगडतिठा येताच डावीकडे जायचं.. आणि यस्टी स्थानकाला खेटून सरळ पुढे जाणाऱ्या गाडी रस्त्याने निघायचं.. पुढे मंडणगडच्या दाट वसती मधून गाडीरस्ता आपल्याला थेट गडपायथ्याला घेवून जातो.. इथे गेटच्या बाजूला गाडी उभी करायची आणि थेट गडभ्रमंती सुरु करायची..  इथे गेट मधून प्रवेश करताच तुरळक तटबंदी आपले स्वागत करते.. आत येताच.. डावीकडे एक मंदिर आहे.. इथे मुख्य पायवाटेवर डावीकडे एक कमान कोरलेला दगड आहे.. आणखी पुढे जाताच.. पीराच्या दोन कबरी आहेत.. इथे डावीकडे एक तलाव आहे..  आणि वर जाताच .. डावीकडे.. भगव्या रंगात रंगवलेली एक तोफ आहे.. आणि थोडं पुढे.. किल्ल्याची पश्चिमेकडील बाजू.. किल्ल्यावर हेच महत्वाचे अवशेष.. इथे पोचलो तोवर सूर्य मावळतीला निरोप घेण्यास सज्ज झाला.. त्याला अलविदा करून.. रसाळ-सुमार-महीपत-पालगड-मंडणगड भटकंतीचा समारोप केला.. एका नव्या सह्याद्रीच्या भटकंतीसाठी..

धन्यवाद

माधव कुलकर्णी.. २०१६

संदर्भ सूची:-
RASALGAD FORT
Rasalgad Fort (Khed T.; 17° 45′ N, 73° 30′ E;), at the south end of the spur which further north is crowned by the Sumargad and Mahipatgad forts, has an area of about five acres. Less elevated than either of the above forts, Rasalgad is approached by an easy ascent which begins on the west and is about three miles from the village of Madave (Khed T.; p. 897). Narrow in the north, the fort gradually broadens, dividing in the south into two spurs, one running to the south-east, the other to the south-west. The fort is entered from the north by a very massive gate guarded by a tower and high battlements. In a crevice in the wall opposite the gate is an image of Maruti. About eighty yards inside is a second gateway, also strongly guarded by a tower and battlements. Further south, where the ground broadens, there is a temple with some rich wood carving. This temple, dedicated to the goddesses Zolaya and Vaghya, is of some local sanctity forming every year the gathering place for bands of worshippers from fourteen neighbouring villages. Both the spurs of the hill beyond the temple are fortified. On the south-east spur is a roofless building once used as a storehouse. Beyond the storehouse are some pools with near their banks several memorial stones with very dim weather-worn tracery. The spur after about 300 yards ends in. a battlement’ known as the Pusati’s Tower. The south-west spur is much more strongly fortified. The defences known as the upper fort, bale killa, about 186 feet by 126, are surrounded by walls, with, at each corner, an embrasured battlement. Inside are the ruins of a powder magazine and of the commandant’s house. The temple of Zolaya and the image of Maruti show that the fort was built and for a time held by Hindus. The only trace of Musalmans is in the Upper Fort, a battlement known as the saint’s tower, pir buruj. At present (1960), there are six guns on the fort.
The fort has an easy access but no inhabitants reside in it. However, people often use a big open ground inside the fort as a picnic spot. Puja of the Goddess Zolaya is performed daily and a fair is held in her honour in Navratra, Ashvin Sud., 1 to 10.
SUMARGAD FORT
Sumargad Fort (Khed T.), on the same spur of hill as Mahipatgad a good deal lower and about four miles to the south of it is about three-quarters of an acre in area. [Gov. List of Civil Forts, 1862.] Surrounded by walls from fifteen to twenty-two feet high, [Mr. A. T. Crawford’s MS.] and with four corner battlements, the fort has a difficult access.
The fort, built of black stone, is still in a good condition. There are 16 guns in the fort. Inside the fort wall is a tank on an elevated land. There are no inhabitants in the fort. Two miles away from the fort on the western side there is a place, paga, where horses were kept. The way from the fort to the paga is built with stone steps. There are two temples on the fort, one of the god Bahiri and the other of god Shiv. From the top of the fort can be viewed the river Vaghnadi and the villages Mandve, Vadi, Jaitapur, Devghar and Ainavali and the fort Rasalgad.
MAHIPATGAD FORT
Mahipatgad Fort (Khed T.; 15° 50′ N, 74° 20′ E; p. 6477), about 19 miles from Khed, facing the Harlot pass and Makrandgad, the Mahabaleshvar ‘ Saddle back’ stands at the head of a high spur, and running parallel to the Sahyadris is crowned by the three forts of Mahipatgad, Sumargad, and Rasalgad. Reached by a very narrow difficult pass six miles long, [The most direct practicable route from the northward is by the main road as far as the Government bungalow at Poladpur, whence to the left a path leads over broken ground, and after sighting the fort, winds among and over steep hills. Pursuing this pathway southwards, it is necessary to pass, at a distance of one and a half miles, along the whole west side of the fort. Reaching the valley, the ascent is gained over projecting spurs on the west and leading over the south continuation of the range the path winds over spurs on the eastern side of it, and reaches two hamlets, whence a steep pathway leads to the top. It is about four miles from the beginning of the ascent on the west to the interior of the fort. Report on Mahipatgad, 1854.] in 1880, Mahipatgad was a table-land 120 acres in area, with no surrounding wall, but with well-built battlements and gateways in six places where the approach was easy. The defences were in bad repair, the wood work had gone, and in many places the stone work was in ruins. On all sides the table-land was surrounded by the village of Beldarvadi [Beldarvadi, bricklayers’ suburb, is a strip of rugged land said to have been assigned to certain bricklayers brought by Shivaji to build the fort.]. There were six gates, to the north, the Kotval gate formed by two battlements one on each side and joined with parts of the ramparts; to the north-east the Red gate, Lal Devdi; to the east the Pusati gate formerly entered by a ladder; to the south-east the Yeshvant gate and a thirty feet high battlement; to the south the Khed gate with traces of the path by which the garrison used to receive its supplies; and to the west the Shivganga gate called after a ling at the source of a rivulet. At the entrance of the south or Khed gate, was the foundation of a temple of Maruti and Ganapati, its walls half standing, half fallen. Here according to one account, there were 360, and according to another 700 stables [Foundations of this sort are found all over the fort.]. Further on was a stone house forty-five feet long by fifty-four broad, and a temple of Pareshvar, a very strong building about twenty feet long by thirty-eight broad. The six gates and the battlements have come down. There are cracks on the walls, due to heavy rainfall. It enjoys a yearly grant of Rs. 15. In the temple enclosure, are two ponds, with, on their banks, some engraved stones. The local story that the fort was begun and left half finished by Shivaji is supported by the heaps of mortar piled in several parts of the enclosure. The rough and uneven ground within the fort is over-grown with thorn bushes and other brushwood.
At present (1960), some Christians inhabit the fort area and there are to be seen a number of Christian tombs. From the fort one gets a good view of the red tiled steep roofed bungalows of Mahabaleshvar in the day time and twinkling lights on the slopes of Mahabaleshvar hills in the night. The village of Beldarvadi surrounding, the table-land is also clearly visible. Some of the villages on the border of Satara and Kolaba districts are easy to locate.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s