गडकोटांवरची शक्तिपीठे – २०१३

गडकोटांवरची शक्तिपीठे

अश्विन शुक्ल पक्षात सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवाचा जल्लोष हा भक्तांनी देवीच्या शक्तिला दिलेली एक मानवंदना आहे. नऊ दिवस देवीच्या विविध शक्तिरुपाची पूजा करून देवीला साकडं घातलं जातं आणि देवीची यथासांग पूजा केली जाते. दैत्य निर्मूलनाचा देवीचा महिमा मार्कण्डेय पुराणात यथासांग वर्णन केला आहे. महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत कोल्हासुराचा वध करणारी कोल्हापूर ची अंबाबाई, तुळजापूरची भवानीआई, परशुरामाची आई म्हणजेच माहुरची रेणुकामाता आणि सप्तश्रुंगगडावरची सप्तशृंगीमाता हे अर्धे शक्तिपीठ. या साडेतीन शक्तिपिठाचे वर्णन देवी भागवत पुराणात केले आहे ते असे; “कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता । मातुःपुरं (माहूर) द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् । तुलजापुरं तृतीयं स्यात् सप्तशृंगं तथैवच ।।“.. 

देवीच्या महिम्याबद्दल संत एकनाथ म्हणतात; अनादी निर्गुण प्रगटली भवानी | मोह महिषा सुरमर्दाना लागोनी | त्रिविध तापाची करावया झाडणी | भक्ता लागोनी पावसी निर्वाणी | आईचा जोगवा जोगवा मागेन ||”… 

स्वराज्य निर्मितीच्या मोहिमेला तोरणजाई देवीच्या आशीर्वाद लाभला होता, तुळजापूरची भवानी माता तर हे अखंड हिंदवी स्वराज्याचे कुलदैवत.. अफझलखानाचा वध करण्याआधी शिवरायांनी प्रतापगडवरच्या श्री जगदंबेचा आशीर्वाद घेतला होता. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी  सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर शत्रूचा वार झेलणाऱ्या प्रत्येक धारकरी, सेनापती, मावळे यांच्या मागे गडकोटावरच्या कुठल्या न कुठल्या देवीचा आशिर्वाद सदैव पाठीशी होता. यातील काही गडकोटांवरील शक्तीपीठांची ओळख आज नवरात्री निमित्त करून देत आहे.

प्रचंडगड निवासिनी तोरणजाई देवी: या किल्ल्यावरील हि चार हातांची देवी वाघावर स्वार झालेल्या असून हाती खंजीर, चक्र आणि अंकुश घेवून उजव्या हाताने आशिर्वाद देणारी अशी देवीची आवेशपूर्ण मुद्रा आहे. ह्या देवीच्या नावावरून महाराजांनी प्रचंडगड हे नाव बदलून या किल्ल्याला तोरणा हे नाव दिले. प्रचंडगड किल्ला सर करून स्वराज्याचे तोरण बांधले गेले म्हणून देखिल तोरणा हे नाव पडल्याचे काही लोक सांगतात.


शिवनेरी किल्ल्यावरची शिवाई देवी – शिवनेरी किल्ल्याचे हे नाव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही श्री भवानी सिवाई / शिवाई देवीच्या नावावरून देण्यात आले आहे. हत्ती दरवाजातून आत गेल्यास आणखी एक दरवाजा दिसतो या दरवाजातून आत आल्यावर समोरची वाट सोडून उजवीकडची वाट शिवाई देवीच्या मंदिराकडे घेवून जाते.

वर्धनगडची वर्धानीमाता  वर्धनगडावरील टेकडावर गडाची अधिष्टात्री वर्धानीमातेचे मंदिर असून, अफझलखान वधानंतर ह्या वर्धनगडाची निर्मिती करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज इथे महिनाभर राहिल्याचे तसेच ह्या देवीच्या दर्शनाला येवून गेल्याचे इथले पुजारी सांगतात.   


भूषणगड ची हरणाईदेवी  “हर हरिणाक्षी देवी संस्थिता दुर्गभूषने | एतासां दर्शनाद्देव सर्व पापे प्रमुच्यते | अशक्तो दर्शने नित्यं स्मरेत प्रातः समाहितः | तथांप्यु पासकः सर्वे परा धैर्विमुच्यते ||” अर्थात भूषणगड निवासिनी हरणाईदेवीच्या दर्शनाने सर्व पापे धुतली जातात, आणि देवीच्या नित्य दर्शनाने, प्रातः स्मरणाने तसेच उपासनेने सर्व संकटांचे निर्मुलन होते. भूषणगडाच्या सर्वोच्च माथ्यावर या देवीचे मंदिर असून देवीला पितळेचा मुखवटा आहे, समोर एक जुना दीपस्तंभ आहे आणि दिपस्तंभासमोरील वृंदावनावर कोरीव काम केले आहे


औंध निवासिनी श्री यमाई देवी  रवळनाथाच्या मदतीने अवंदासुराचा वध करणारी आणि इथेच वास्तव्यास राहणारी ही देवी, रवळनाथाने संकटात ये माई हाक दिल्याने ‘यमाई’ अशा नावाने प्रसिद्ध आहे. औंध संस्थानचे पंत प्रतिनिधी यांनी इथे देवीच्या मंदिराभोवती किल्ले सदृश कोट बांधला आहे, आणि मंदिरावर कळस चढविला आहे, मंदिराच्या शिखरावर दशावताराची कोरीव शिल्प आणि पुराणातील काही महत्त्वपूर्ण घटना यांची विलक्षण अशी शिल्पकला पाहायला मिळते.

 


प्रतापगडावरील भवानीमाता  महाराजांची कुलस्वामिनी जगदंबा तुळजाभवानी मातेवर अपार श्रद्धा होती त्यामुळे त्यांनी प्रतापगडावर भवानी मातेचे मंदिर बांधले. भवानी मातेने प्रगट होवून छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिल्याची एक कथा प्रसिद्ध आहे, या तलवारीला भवानी तलवार असे म्हणतात. या भवानी मातेच्या नावाने मंदिराशेजारचा बुरुज हा भवानी बुरुज म्हणून ओळखला जातो


करमाळ्याची कमलाभवानी देवी  मोघली सरदार राव रंभाजी निंबाळकर यांनी कुलस्वामिनी कमला भवानीचे एक मंदिर बांधलेले असून ते करमाळा शहराजवळील एका टेकडावर आहे, याला देवीचा माळा असे म्हणतात. मंदिराभोवती उंच कोट चढविला असून मंदिर समोर एक सभामंडप आहे. नवरात्रात इथे भक्तांची रीघ लागलेली असते. हाती त्रिशूळ आणि तलवार हाती घेतलेल्या अष्टभुज कमला मातेची मूर्ती प्रसन्न असून, देवीच्या मंदिरासमोर आकाशात झेपावणाऱ्या एखाद्या मनोऱ्यासारख्या तीन मोठ्या दीपमाळा बांधल्या आहेत.

 


सिंधुदुर्ग किल्ल्यावरील भगवतीदेवी  देवीच्या उजव्या बाजूला पायाशी एक सिंह बसलेला असून, हाती त्रिशूळ, चक्र, तलवार आणि शंख घेऊन उभी असलेली हि चतुर्भुजा देवी अत्यंत प्रगल्भ अशी आहे. निशाण बुरुजाच्या डावीकडे चालत गेल्यास लाल पिवळ्या रंगाने रंगवलेल्या मंदिरात देवीची मूर्ती बसवलेली आहे.  इंदुरी किल्ल्यावरील कडजाई देवी  सरदार दाभाडेंच्या इंदुरी किल्ल्यावरील कडजाई मातेचे मंदिर आहे हिरवाशालू नेसलेल्या ह्या देवीची मुद्रा अतिशय शांत आणि प्रसन्नचित्त आहे. तळेगाव जवळचा इंद्रायणी काठच्या ह्या भुईकोट किल्ल्यावर नदीकाठच्या तटबंदी लगत हे मंदिर उभारले आहे.  


रत्नदुर्गवरील भगवती देवी  रत्नदुर्गावर भगवती देवीचे मंदिर असून, रत्नदुर्गला भगवतीचा किल्ला असेही म्हटले जाते. चांदीच्या कोरीव मखरीत देवीची नितांतसुंदर मूर्ती असे मूर्तीचे स्वरूप आहे. मंदिराशेजारी डावीकडे चौकोनी तळे होते आता ते उध्वस्त झाले आहे.  मंदिरासमोर एक उंच तुळशी वृंदावन आहे.

  


कोराईमाता कोरीगड  लोणावळे जवळील कोरीगडावर श्री कोराईमातेचे मंदिर असून शेजारी एक मोठा तलाव आहे, मंदिरासमोर दीपमाळ आणि देवीच्या मूर्तीसमोर त्रिशूळ आहे. ह्या देवीच्या नावावरून या गडाला कोरीगड नाव पडले आहे.

  


लळिंग किल्ल्यावरील ललितामातेचे ठाणे  लळिंग किल्ल्यावरील सर्वोच्च माथ्यावर श्री देवी ललितामातेचे मंदिर आहे. जुन्या दगडी चौरस मंदिरात देवीची संगमरवरी मूर्ती असून देवीच्या मागे कोनाड्यावर दुबाजूस कातळ पुष्प कोरलेली आहेत.


विजयदुर्ग ची भवानीमाता  विजयदुर्ग किल्ल्यावर राणीच्या राजवाड्या कडे जाताना उजवीकडे एक कौलारू मंदिर दिसते हे श्री भवानी मातेचे मंदिर आहे आणि आत चातुर्भूजधारी श्री भवानी मातेची कातळात घडवलेली कोरीव मूर्ती आहे.मंदिराचा मंडप BHUISAPAT झालेला असून आता फक्त मंदिराची देवडी तेवढी शिल्लक आहे.


कर्नाळ्याची कर्नाई माता  कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याला सिंहारूढ आणि चार हाती शंख, चक्र, त्रिशूळ आणि तलवार घेतलेल्या श्री कर्नाई देवीचे मंदिर आहे. मुगुट आणि डोईवर पदर घेतलेल्या ह्या देवीचे दर्शन घेवूनच दुर्ग्यात्री कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी निघतात.नारायणगडची हस्तमाता  पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी पुनर्बांधणी केलेला हा किल्ला, याच्या डावीकडील सर्वोच्च माथ्यावर हस्तमातेचे मंदिर आहे. एका अखंड शिळेवर देवीची मूर्ती असुरवध करणाऱ्या आवेशात कोरली आहे. ह्या देवीच्या पायी नतमस्तक होवूनच नारायणगड भटकंती पूर्ण होते.अंकाई लेण्यात वसलेली श्री मायजाबिनी देवी  अंकाई-टंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोरीव लेण्यातील पहिल्या गुहेत श्री देवी मायजाबिनी देवीची सुमारे आठ ते दहा फुट उंच मूर्ती असून, हि देवी रेणुकादेवी चा अवतार असल्याचे स्थानिक सांगतात. सिहावर बसलेल्या ह्या देवीची मुद्रा सप्तशृंगी देवीसारखी अतिशय प्रसन्न आणि बोलकी आहे.


मुल्हेर गावातील देवी लक्ष्मी  मुल्हेर येथे उद्धव महाराजांच्या मठात असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिरातील हि श्री लक्ष्मी मातेची मूर्ती काळ्या संगमरवरी पाषाणात घडवलेली असून ती हसतमुख आहे. इथे कृष्ण जन्माष्टमी ला रासक्रीडेचे कार्यक्रम होतात आणि ते पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची भाऊगर्दी होते.

माधव कुलकर्णी  २०१३

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s