“ढाक ते भिवगड” – एक वाट अनगड – 2017

“ढाक ते भिवगड एक वाट अनगड

वाटाड्या मार्ग: कामशेत – जांभवली  कोंडेश्वर  ढाक पायथा – उजवीकडे – ढाक च्या डोंगराला उलटी प्रदक्षिणा  ढाक गाव – गारुबाई/खेतोबा मंदिर  गाळदेवी घाट  खिंड –  भिवगड – वदप (कर्जत) .. एकदिवसीय भटकंती


शहरी मरगळ काखोटीला मारून रोज मर्रा कि जिंदगी जगताना.. शहरी सुखाला चटावलेल्या या मनाला सतत वाटत होतं.. एक ब्रेक पाहिजे यार.. ऑफ-बीट ट्रेक किंवा एखादा किल्ला.. उप्या कोल्हापूरात बिझी.. तर चंद्रकांत अन्ना तिकडे हैद्राबादला लुंगी डान्स करायला गेलेला.. एक महिना नो ट्रेक.. झिरो मूव्हमेंट.. मनावर मळभ दाटू लागले.. आणि अशाच एका विकेंड संध्याकाळी सरदार चा दूरध्वनी आला.. अरे क्रॉस-कंट्री ट्रेक आहे येतोस का..! असं ऐतवारच्या ट्रे चं दान देवाने विनासायास पदरात टाकावं.. अगदी तसं झालं.. म्हटलं अरे क्रॉस कंट्री काय अगदी जुनाट टेकडी पण चालेल.. पण सरदारचा चिंतातूर संवाद.. ‘अजून एक भिडू पाहिजे.. जरा जंगल ट्रेक आहे.. बघ कुणी असेल तर’.. तडक किशोर भाऊंना दूरध्वनी केला.. तर तिकडून उत्तर.. ‘अरे उद्या एक प्लान आहे.. अवघड आहे’.. म्हटलं आता पाचवा भिडू कोण आता.. दहा मिनिटात किशोरचा दूरध्वनी.. अरे सगळे प्लान रद्द.. नुसतं ऑफिस ते घर करून वैताग आलाय.. चल जाऊ ट्रेकला.. सरदारला कळवले.. प्लान इज ऑ.. सरदार चा ट्रेक म्हणजे.. आपण डोकं घरी ठेवून जायचं.. लोक म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला तीर्थप्रसादाला जातात तसे.. ठरलं.. ६ वाजताची लोकल.. शिवाजीनगर स्टेशन.. चलो भिवगड..


एरवी आठ शिवाय न उघडणारा डोळा चक्क पहाटे ४.३० खाड्कन उघडला.. लगोलग एक तडतडीत मेसेज पाठवून.. ट्रेक नक्की आहे नं याची खातरजमा करून टाकली.. ठरल्याप्रमाणे ६-१=५ मेंबर्स जमा झाले.. आणि कामशेत गाठलं.. मग तिथे उतरून.. एक कि.मी. चा वार्मअप करीत वढाप स्थानक गाठले तर स्थानकाची जागा आणखी पुढे नेण्यात आल्याचे कळले.. तशी आणखी काही पावले टाकीत नवीन महामार्गानजीक असलेल्या चौकात आलो.. इथे उत्तम भाऊ ठाकर वढाप ठरवायला पुढे गेले.. आणि ४०० रुपयात एक max जीप ठरवून आले.. वेळेचं गणित पाळायला कधी पैशाचं गणित बाजूला ठेवावं लागतं.. तसे आढेवेढे नं घेता.. निघालो.. डीजे संस्कृती पासून दूर.. एका अनोख्या दुनियेत.. सह्याद्रीच्या रंगमंचावर.. एक नवी भटकंती करायला.. ढाक ते भिवगड.. max निघाली.. कानावर ओळखीचे गाणे वाजू लागले.. “दही हिचे सांडले गं.. जाता मथुरेला गं बाई मथुरेला..” बुगडी माझी सांडली गं च्या ठेक्यात गवळण ऐकीत पवास सुरु होता.. उंच उंच इमारती मागे पडून आता.. उंच उंच डोंगर दिसू लागले.. पावलागणिक जाणवणारा धूर जाऊन आता मोकळी हवा फेफड्यात फडफडू लागली.. तसे मन डोंगर वाटांवर रुंजी घालू लागले.. सरदार ने नाष्ट्याची सोय जांभवली गावात पोहोचण्याआधीच – आजींकडे करून ठेवली त्यामुळे.. वेळ नं दवडता.. चटचट खावून झटपट निघालो..  आजींनी सल्ला दिला.. त्या भैरीच्या डोंगराला उलटं फिरून जावा.. गाव लागल आणि फुती मंदिर लागल आणि मग दांडी वरून उतरून जावा.. किती वेळ लागेल..!! वाढलेल्या ढेरपोट्या ट्रेकर्सना पाहून आज्जी म्हणाल्या दांडी उतरायला दोन तास लागतील..! आणि आधी गारुबाई मंदिर पतूर.. ३-४ तास..


. ९:३०: सरदारने चला अशी ऑर्डर सोडताच मंडळी सज्ज झाली आणि कोंडेश्वर मंदिराकडे पावले पडू लागली आता कोंडेश्वर मंदिरापर्यंत गाडी रस्ता झाल्याने.. चुकण्याचा काही प्रश्नच नव्हता.. पावसामुळे रस्त्यावर काही टप्प्यात गुडघाभर चिखल झाला होता इतकेच.. साधारण अर्ध्या तासात कोंडेश्वर मंदिर गाठले.. इथे आलो तर माहौल अगदीच वेगळा.. कधीकाळी कौलारू मंदिरात नांदणारा हा भोळासांब-शंभूदेव आता चक्क नवीन मंदिरात राहायला गेला होता.. आजूबाजूचा परिसर.. सिमेंट ने सारवलेला.. एकदम कडक.. आता बदल जिथे देवाला चुकला नाही तिथे माणसाची काय कथा.. त्यामुळे उगाच जुनेच मंदिर चांगले असे हळहळत नं बसता.. देवाला नवीन घराबद्दल अभिनंदन आणि सुरक्षित प्रवासासाठी वंदन करून.. ढाक कडे निघालो.. कोंडेश्वर मंदिरालगत असलेला धबधब्याचा प्रवाह ओलांडून आडवी वाट उजवीकडे डोंगर माथ्याकडे वर चढू लागते.. तसे कुठेही खाली नं उतरता चढणीच्या वाटेने.. आपण एका दांडावरून वर सरकत राहतो.. डावीकडे दरी.. उजवीकडे धबधब्याची ओबड-धोबड उतरण.. आणि मागे वळून पहिले तर एक डोंगराची सोंड उतरेलेली दिसते.. हि सोंड चढून ढाक-तेराजमाची असा ट्रेक करता येतो..

उजवीकडे एक धबधबा लागला तसे.. बदाबदा कोसळणारे पाणी पिण्यास निघालो.. दोन घोट पाणी आणि चार-दोन फोटो काढून पुन्हा चढणीची पायवाट चालू लागलो.. पावसाळ्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी असल्याने.. दोन-चार पाण्याच्या बाटल्या भरून निघालो.. पुन्हा दांडा वरची चढण तीव्र होवू लागल्याने वेग आणखी मंदावला.. त्यात तोंडाने जोरदार श्वासोच्छवास चालू असल्याचे पाहून एक रान-किडा जिभेवरून घरंगळत दोन टप्पे आउट होत थेट नरड्यात जावून पोचला.. मग पाणी पिवून त्याला आत ढकलला तसं पुढे निघालो.. आता एके ठिकाणी वाट निमुळती होते आणि डावीकडे खोल दरी दिसू लागते.. या टप्या पर्यंत सतत कोकण बाजू आपल्याला डावीकडे दिसत राहते.. इथे सह्याद्रीचा एक जोरदार पावसाळी नजारा अनुभवून.. जंगलात प्रवेश केला.. आता वाट उतरणीची आणि चांगली मळलेली होती.. कोंडेश्वर ते ढाकचा पायथा हि वाट एखाद्या त्रिकोनासारखी.. आधी वर मग थेट खाली.. एका बाजूला बोडका डोंगर तर दुसऱ्या बाजूस बऱ्यापैकी दा जंगल..


चढ संपला आणि थोडी सपाटी लागली.. इथं सारा माहौल एखाद्या पंडोराच्या जगासारखा भासत होता.. एकदम अद्भुत.. डोक्यावर ढगांनी धरलेली झालर.. आसमंत व्यापून टाकणारे धुके.. हिरवीगार झालेली वसुंधरा.. मध्ये मळलेली तांबडी पायवाट.. एका अद्भुत जगाचा प्रवास करविण्यास सज्ज झालेली..

निसरड्या वाटांना आपलेसे करीत वन पीस ढाक खिंडीच्या पायथ्याशी पोचलो इथे मध्ये बऱ्यापैकी मोकळी जागा आहे.. इथे समोर चढावर गेलं कि ढाक.. उजवीकडे ढाक गाव.. आणि डावीकडे सांडशी गावाची वाट आहे.. मागे जांभवली-कोंडेश्वर ची वाट.. तर.. जंगलातल्या वाटेवरचा हा आगळावेगळा चौक आहे.. इथे चिलटे आणि ज्युनिअर चिलटे यांच्या फौजेने जोरदार हल्ला चढविला..

. ११:१५ क्षणभर ब्रेक घेवून उजव्या वाटेने ढाक गावाकडे निघालो.. आता घनदाट जंगल आणि पाच ट्रेकर्स.. सोबतीला एक ओलीचिंब पायवाट.. आणि गर्द झाडीत भरलेला गारवा.. झाडा-झुडूपांनी वेढलेल्या वाटेत तिनचार किरकोळ आटोपशीर ओढे ओलांडून एक हिरवेगार आटोपशीर लहानगे पठार दिसले.. इथे उजवीकडे दरीच्या पल्याड दोन-तिन धबधबे मोकाट दरीत झेपावताना दिसले.. आणि डावीकडे ढाकच्या डोंगराची तिरपी भिंत.. सरळ पुढे मग पुन्हा झाडीची वाट.. इथे थोडं पुढे गेल्यास लहानगे पठार आणि लीकडे झाडीतून डावीकडे एक वाट काटकोनात वर जाताना दिसते.. आपली वाट हि डावीकडची झाडाझुडूपातील.. मग दाट वनराईतून पायवाटेला सोबत करीत थोडा चढ मग उतार करीत अर्धा-पाउण तास चालून आपण एका विस्तीर्ण पठारावर येऊन पोचतो.. आता डावीकडे ढाकचा डोंगर आणि समोर चांगली मळलेली ठळक पायवाट.. ‘धोपट मार्ग सोडू नको’.. हे भटकंती चे प्रमाण शिरसावंद्य मानून मळलेल्या पायवाटेने पुढे निघालो..

इतक्यात एक ट्रेकर्स चा ग्रुप येताना दिसला.. ढाक गावाचा रस्ता हाच याची खातरजमा केली आणि पुढे निघालो.. ढाक गावाचा तर दूर दूर पत्ताच नव्हता.. पण पायवाट मळलेली असल्याने.. निशंक मनाने पुढे निघालो.. ढाकच्या डोंगराला वळसा मारला.. वळसा मारताना ढाकच्या डोंगरावरची तटबंदी दिसू लागली.. आणि समोर पहिले तर ढाकच्या डोंगरावरून उतरणारी सोंड.. चांगली ६-७ फुट भरभक्कम दांडगी तटबंदी पाहून ढाक किल्ल्याला तटबंदी आहे हे याची डोळा पहिले.. आता पुढे पठारावर दगडांचा सडा पडल्याचे दिसले.. ढाकचा डोंगर उतरणीला लागलेला.. वाट सरळ पण हलकेच तिरपी जाणारी.. पण मळलेली.. तास-दीड तास ढाकच्या डोंगराला/किल्ल्याला वळसा मारीत पुढे चालत राहिलो पण गाव काही दिसेना.. आता संयम सुटू लागला.. क्षणभर अल्पोपहार ब्रेक उरकून घेतला.. ५१० मिनिटांचा विसावा.. इथे मातीतून डोकावणाऱ्या खडकावर बूड टेकवले.. लगोलग एक पठार सभा घेण्यात आली.. चिक्की आणि केळी खावून चर्चासत्राला सुरुवात झाली.. “हे ढाक गाव नेमकं आहे तरी कुठे.. सरदार..?” असा प्रश्न विचारला.. तसे सरदार ने भ्रमणध्वनी वरी दृश्यपटलावर टिचक्या मारून डोंगरयात्रा नकाशा.. गुगल नकाशातील संदर्भ चाचपून पहिले.. ढाक गाव अग्नेय दिशेस असल्याचे सांगितले.. इतरांना दाहीच्या दाही दिशा अग्नेय वाटत होत्या.. पण सरदारला आव्हान देण्याइतपत कुणाची कुवत नसल्याने.. सरदार म्हणेल ती अग्नेय दिशा असे एकमताने मान्य केले.. आणि तसे निघालो.. पुढे एके ठिकाणी दोन भल्या थोरल्या दरडी थेट ढाकच्या किल्ल्यावरून घरंगळत पायवाटेवर येऊन आडव्या पडल्याचे दिसले.. आणखी पुढे १०-१५ मिनिटे गेल्यावर ढाकची दुसरी सोंड मागे पडली आणि एक पुसशी वाट डावीकडे जाताना दिसली.. उत्तम अन्ना डावीकडे चला म्हटले तसे तिकडे थोडा वेळ चालून पहिले.. पण नक्की हि वाट नाही हे समजले आणि पुन्हा जुन्या वाटेवर येऊन पोचलो आणि जोपर्यंत हि मळलेली आत संपत नाही तोपर्यंत पुढे जात राहण्याचा निर्धार केला..  अर्ध्या तासाने.. पठारावर खुरटी झाडे आणि जवळपास आयताकृती चर खणल्याचे दिसू लागले.. अधे मध्ये दगड रचून लहानगे बांध रचल्याचे लक्षात आले आणि गाव जवळपास असल्याच्या खुणा दिसू लागल्या.. सरदार ला प्रश्न केला .. कहा है वो गाव.. कहा है..!!.. आलंय जवळ म्हणून सरदार सरसर पुढे निघाला..

कोंडेश्वर सोडून आता  तास झाले होते पण तो ट्रेकर्सचा ग्रुप सोडला तर एक गावकरी माणूस दिसेंना.. आणि गावाचा तर पत्ता लागेना.. पुढे आणि मागे.. फक्त आणि फक्त पायवाट.. आणि लांबच्या लांब दूरवर पसरलेले  निर्मनुष्य पठार.. डावीकडे मागे पडलेला ढाकचा डोंगर.. डोंगराच्या दोन सोंडा.. त्याच्या पायथ्याला थोडी झाडी.. आणि डोंगराला वेढणारे लांबच्या लांब पठार..

चाल सुरु ठेवली.. आतापर्यंत एकेरी वाटणारी पायवाट अचानक दुहेरी भासू लागली तसे जवळपास गाव असण्याची शक्यता बळावली.. वाटेत दिसणारे.. जुनाट रंग उडालेले बिस्कीट पुड्याचे rappers.. हिच वाट असल्याची संकेत देत होते.. बाकी हा निर्मनुष्य वाटेवरचा प्रवास आत्ता.. जरासा धाडसी वाटू लागला होता.. पठारावर पाऊस आणि धुक्याने दांडी मारल्याने हि ५-६ किमी लांब पठारावरची रपेट सुसह्य झाली इतकेच.. नाहीतर धुंडते रह जाओगे.. अशी ही वाट आहे..

दु. १:३० वा: खुरट्या झाडीची दाटी वाढू लागली आणि पंधरावीस मिनिटांची वाट संपताच एक कौलारू घर, पडवी आणि बंदिस्त गोठा दिसला आणि जीव भांड्यात पडला.. सापडलं ढाक गाव सापडलं.. हेच ते गाव.. ढाक गाव..!! पण कसलं काय.. हा तर एक धनगर वाडा.. तिथे  आवाज देवून पाहिलं तर आत कुणीच नाही.. फक्त एक निर्मनुष्य घर आणि पुन्हा समोर पायवाट घराला खेटून पुढे जाणारी.. पुन्हा पठार आणि किरकोळ झाडी.. हा धनगरवाडा.. दिसल्याने जरा जीवात जीव आला आणि ढाक गाव जवळ असल्याची खूण पटली..थोडं पुढे गेलो तर.. पायवाट अरुंद होऊ लागली.. आणि धाकधूक वाढू लागली.. इथे उजवीकडे एक बैलगाडी वाट दिसली पण.. वाटेला आडवी काठी आणि ३-४ दगडे रचून ठेवल्याने.. सरळ जाण्याचे ठरले.. थोडं १०-१५ मिनिटे पुढे जाताच.. झाडी संपून दलदल दिसू लागली आणि दूर उजवीकडे.. एक मंदिर.. हेच ढाक/खेतोबा/गारुबाई मंदिर.. चालता चालता हि दलदल नसून.. पूर्वाश्रमीची भातशेती असल्याचे जाणवले.. सरदारला पुन्हा डिवचले.. सरदार. “कहा है वो गाव.. कहा है..!”

पंधरावीस मिनिटात बांधाबंधाने.. चिखलातून वाट शोधीत निघालो.. समोर डोंगरझाडीचा लांबच्या लांब पसरलेला आडवा तिरपा पट्टा.. उजवीकडे कोपऱ्यात झाडीच्या पायथ्याला दिसणारे रंगबिरंगी मंदिर.. अलीकडे.. लांबच्या लांब दिसणारे शेताडाचे औरस-चौरस तुकडे.. असे एकंदरीत दृश्य आहे.. मागे ढाकचा डोंगर जरा लांब आणि लहान दिसत असतो..

बोडक्या पठारावरून बांधाबांधाने तिरपे जात.. मंदिराच्या अलीकडे वाटेवर पोहोचलो.. इथे एका झाडापाशी एक वाट वर जंगलात जात असल्याचे दिसले.. हिच गाळदेवी घाटाची वाट.. वाट बऱ्यापैकी रुंद आणि दगडगोट्याची आहे.. एखाद्या चर खणून काढल्यासारखी प्रशस्त वाट.. इथून मंदिर उजवीकडे अगदी ३०-४० पावलांवर आहे.. मंदिराच्या पुढ्यात येऊन पोहोचलो.. हे मंदिर ढाकोबा मादिरासारखे दिसते.. हेच ते पठरावारचे खेतोबाचे मंदिर.. मंदिराच्या बाहे.. लाल रंगाचा चौथरा आणि त्यावर काही देव मांडल्याचे दिसतात.. हेच गारुबाईचे ठाणं असावे.. आत शेंदू फसलेली एक ओबड-धोबड मूर्ती आहे.. हि खेतोबाची मूर्ती.. इथे जेवणाचा ब्रेक घेवून.. घाट उतरायचे ठरले.. ‘अर्धा तास नो त्रास’ अशी .. सरदार ला तंबी देण्यात आली.. गाव नही पण मंदिर सापडलं.. फुल नं फुलाची पाकळी.. मग तिथेच जेवण ब्रेक घेण्यात आला.. इडली.. भाजणी थालीपीठ.. लोणचे.. दही.. असा फराळ चोपून घाट उतरण्यास सज्ज झालो..

दु ४:०० वा.  
ब्यागा उचलल्या आणि मंदिराकडे पाठ करून उजव्या हाताच्या दिशेने निघालो.. एक मोठे झाड आणि उजवीकडे जंगल वाट दगडगोट्यांनी भरलेली.. पावसामुळे ओलीचिंब झालेली एक चिखलमय वाट.. दहा वीस मिनिटांच्या या जंगलातील चालीने आपण आणखी एका पठारावर येऊन पोहोचतो.. हे जंगल म्हणजे दोन पठारामधली कुंपण भिंतच जणू.. उजवीकडे तिरपी वाट पुढे सरकते आणि उजव्या बाजूस.. खाली उतरणीची.. मळलेली वाट दिसते.. थेट झाडीत  खाली उतरणारी.. हिच आपली वाट.. आणि हाच तो घाट गाळदेवी घाट.. इथे डावीकडे एक गावकरी काम करीत असल्याचे दिसले.. त्यांना हा दिली आणि गाव कुठाय बाबा.. बाबा उत्तरले मंदिराच्या समोरच वाट हाये नं गावाकडची.. या -१० किमीच्या ठारावर पाहिलेला हाच एकमेव स्थानिक माणूस.. खाली कसं जायचं.. ते झाडाच्या जवळ वाट हाय नं मातीची तिने खाली उतरा.. खाली उजव्या अंगानं दांडीवर जावा आन मग खाली वाट हाय.. पठारवाले बाबांना रामराम करून पुढे निघालो.. झाडाच्या उजव्या हाताला उतरणाऱ्या मातकट वाटेवरून..

गच्च भरल्या रानव्यातून.. वळणे घेत वाट खाली झेपावू लागते आणि आपण एका सोंडेवर येऊन पोचतो.. इथे जरा जपूनच पाउल टाकायचं कारण, ‘जरासी सावधानी.. जिंदगीभर आसानी’ हे वाक्य इथे अगदी खरे ठरते.. हि सोंड पाहताच जांभिवलीतील आजींनी सांगितलेले वाक्य आठवले.. “दांडीवरनं दिड तास उतरयाला लागतं..!”.. आता हि दांडी उतरता उतरता मंडळाची दांडी गुल झाली नाही म्हणजे मिळवलं.. अशी हि घाटवाट होती..

दांडीवरून नागमोड्या चालीने उतरताना कधी झाडीतून तर कधी उघड्या बोडक्या वाटेची उतरण लागते.. वर मागे वळून पाहताना.. डोंगरमाथा दूर सुटू लागतो.. आणि खाली वदप परिसर दिसू लागतो.. इथे डोंगराच्या खालून डीजेच्या तालावर झिंगणाऱ्या तरुणाईचा आरडओरडा कानी पडला.. तासाभराच्या मध्यम उतरणीचा घाट रस्ता तुडवून खाली येताच एक धनगरवाडा दिसू लागला आणि समोर इटूकले पठार.. धनगरवाड्यापाशी एक उभ्या उभ्या ब्रेक घेतला.. मागे वळून पाहिलं तर.. डोंगर माथा आता फारच उंच दिसू लागला.. इथे जास्त टाईमपास न करता.. खाली निघालो.. पुन्हा उतरण सुरु झाली आणि डीजे वाले बाबूंचा गोंगाट वाढू लागला.. समोर आता.. खिंड आणि त्याशेजारी भिवगड दिसू लागला.. वाट जसजशी मागे पडू लागली तसा भिवगड नजिक येवू लागला.. २०-२५ मिनिटात भिवगड खिंडीच्या अलीकडच्या खडकावर येऊन पोचलो.. इथून पाहताना.. भिवगड हा एखाद्या युध्दनौकेवरील धावपट्टी सारखा दिसत होता..

किल्ले भिवगड/भीमगड :- सह्याद्रीच्या डोंगररांगेला अगदी खेटून उभा ठाकलेला असा भिवगड किल्ला.. स्वराज्याचा ए पहारेकरी.. गडावर काही ठिकाणी कातळ कोरीव पायऱ्या आहेत तसेच ५-६ पाण्याची टाकी आहेत.. गडावर कातळ कोरीव शिल्प असल्याचे गावकरी सांगतात..  गडभ्रमंती करण्यास साधारण ३०-४० मिनिटे लागतात.. खिंडीतून डावीकडे भिवगड आणि उजवीकडे गाळदेवी घाट-ढाकची वाट आहे.. इथे गाडीने यायचे असल्यास कर्जत-वदप मार्गे गौरकामत गावी यावे.. इथे स्थलांतरित आदिवासींची वसती आहे.. तिथून वाट खिंडीकडे जाते.. खिंडीत थोडं रेंगाळलो आणि खाली दिसणाऱ्या वस्तीकडे निघालो..


आता वेळ आली होती सह्याद्रीचा निरोप घेण्याची.. आणि पुन्हा माणसांच्या जंगलात जाण्याची.. एका क्रॉसकंट्री ट्रेकची अजरामर आठवण सोबत घेवून.. कोंडेश्वर मंदीर.. ढाक किल्ला पायथा.. ८-१० कि.मी.चे किल्ल्याला वेढणारे पठार.. धनगरवाडा.. खेतोबा मंदिर.. गाळदेवी घाट आणि भिवगड खिंड.. एक लांबलचक हटके भटकंती.. सरदार ला धन्यवाद देवून भटकंती ची सांगता केली..
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||

माधव कुलकर्णी  सप्टेंबर २०१६

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s