
वाटाड्या मार्ग : बेतूल तिठ्यावरून डावीकडे १०-११ किमी अंतरावर काबो द राम चा किल्ला समुद्रतटावर बांधला आहे.. हा किल्ला काणकोण (Canaconna) या तालुक्यात येतो.. बेतूल गाव पार करताच आपण एक घाट चढून पठारावर येवून पोहोचतो.. इथे पठारावरील निर्मनुष्य रस्त्याने पाच-सहा किमी नंतर एक वस्ती (Nuem Village)आणि पुढे जंगल सुरु होते.. या जंगलातून एक रस्ता उजवीकडे खाली उतरतो आणि हाच काबो-द-राम किल्ल्याचा रस्ता..बेतूल पासून साधारण अर्ध्या तासात आपण इथे पोहोचतो.. गाडी थेट किल्ल्यापर्यंत जाते.
कसे जाल आणि काय पाहाल ?
किल्ल्याचा प्रकार : समुद्रतटावरील किल्ला | जवळचे गाव : बेतुल (Betul-Nuem-Cabo De Ram) ११ किमी |
किल्ल्याची निर्मिती : १६ व्या शतकात | राज्य : गोवा जिल्हा : दक्षिण गोवा तालुका : काणकोण Canacona |
बेतूल तिठ्यावरून डावीकडे १०-११ किमी अंतरावर काबो द राम चा किल्ला समुद्रतटावर बांधला आहे.. हा किल्ला काणकोण (Canaconna) या तालुक्यात येतो.. बेतूल गाव पार करताच आपण एक घाट चढून सपाटीवर येवून पोहोचतो.. इथे निर्मनुष्य रस्त्याने पाच-सहा किमी नंतर एक वस्ती आणि पुढे जंगल सुरु होते.. या अंगलट एक रस्ता उजवीकडे खाली उतरतो आणि हाच काबो-द-राम किल्ल्याचा रस्ता..बेतूल पासून साधारण अर्ध्या तासात आपण इथे पोहोचतो.. गाडी थेट किल्ल्यापर्यंत जाते.. किल्ल्याच्या मुख्य द्वारासमोर च्या प्रांगणात गाडी उभी करायची आणि किल्ले भ्रमंती’ ला तडक सुरुवात करायची.. किल्ल्याचा मुख्य दरवाजा आपल्याला तेरेखोल किल्ल्याची आठवण करून देतो.. किल्ल्याच्या दर्शनी भागातील तटबंदीलगत खंदक बांधलेला आहे.. त्यावर बांधलेल्या पूलावरून आपण दरवाजात प्रवेश मिळवायचा.. किल्ल्याचा मुख्य दरवाजा भव्य असा असून दरवाजावर कमानीवर एकमजली बांधकाम आहे.. यात काही जंग्या शत्रूवर नेम धरून बसल्याचे दिसते..
दरवाजातून किल्ल्यात पहिले पाऊल टाकताच.. समोर जेमतेम एक माणूस सरपटत जाऊ शकेल असा एक वर्तुळाकृती झरोका दिसतो.. हा इथला चोर दरवाजा.. शत्रूचे आक्रमण झाल्यास गडाचा बाहेरचा आणि आतला दरवाजा बंद करून शत्रूला नामोहरम करण्याची एक नामी कल्पना.. काटकोनात वळून आपण किल्ल्यात प्रवेश मिळवितो.. इथे उजवीकडे बुरुजावर चढण्यासाठी प्रशस्त जिना बांधला आहे.. डावीकडे तटबंदीवर चढून जाण्यासाठी पायऱ्या.. इथे वर चढून तटबंदीवर चढायचं आणि कडेकडेने सज्जावरून चालत किल्ल्याचे डावीकडचे दक्षिण टोकाकडे निघायचं. थोडं दहा वीस पावले जाताच उजव्या बाजूला पांढऱ्या रंगात रंगवलेले आणि निळ्या पट्ट्यांनी सजविलेले एक मोठे चर्च/चापेल दिसते.. सेंट अंथोनी चर्च (St Anthony Church).. या चर्चच्या दरवाजावर दोन देवदूतांनी उचलून धरलेल्या कृसाचे शिल्प कोरले आहे..
किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे जाताना बुरूजामध्ये ठिकठिकाणी तोफा अस्तव्यस्त पडल्याचे दिसते.. उजवीकडे बर्यापैकी झाडी आहे.. दक्षिण टोकावरील बुरुजावर पोहोचताच.. या बुरुजावर जाण्यासाठी दगडी चिऱ्यांचा उतार आहे.. यावरून तोफा वर नेण्यासाठी केलेली सोय इतर पोर्तुगीज किल्ल्याप्रमाणे इथेही दिसून येते.. बुरुजावर पोहोचताच समुद्रकिनाऱ्याकडे पाहताना डावीकडे काबो-द-राम चा खडकाळ किनारा दिसतो.. आणि उजवीकडे काटकोनात वळलेली तटबंदी.. इथे एक मदमस्त खट्याळ वारा वाटसरूंना रुंजी घालत असतो.. तर किनाऱ्यावरून तटबंदीकडे झेपावणाऱ्या वाऱ्याशी दोन क्षण हितगुज करून उजवीकडे निघायचं.. उजवीकडे थोडे चालून जाताच किल्ल्याचा मागचा दरवाजा नजरेस पडतो.. इथे निमुळत्या वाटेने .. तटबंदी पार करताच एक उंच बुरुज आणि त्यात दडविलेला दरवाजा नजरेस पडतो.. इथून थेट किनाऱ्यापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.. त्या काही ठिकाणी मोडकळीस आल्या आहेत.. लाटांचा खडकांशी थडकून होणारा आवाज इथे मन प्रसन्न करून टाकतो.. इथे काही क्षण रेंगाळून पुन्हा तटबंदी च्या आत शिरायचं आणि डावीकडे आणखी काही बुरुज आणि अवशेष पाहण्यास निघायचं.. किल्ल्याच्या उत्तर भागात बऱ्यापैकी झाडी आहे.. साधारण दहा-पंधरा मिनिटात आपण आणखी एका बुरुजापाशी येवून पोहोचतो.. अर्धवर्तुळाकृती बुरुज आणि त्यामागे दिसणारा अथांग समुद्र असा विशाल नजारा या बुरुजावर आपल्याला पाहायला मिळतो.. बुरुजाच्या उजव्या अंगाला मात्र मोकळे मैदान आणि पुढे झाडी-झुडुपे दिसतात.. इथे बऱ्यापैकी दाट झाडी आहे..
काबो-द-राम किल्ल्याचा पसारा बऱ्यापैकी मोठा आहे.. किल्ल्याला साधारण १२-१३ बुरुज असून किल्ल्याची तटबंदी भक्कम आणि उंच आहे.. किल्ला एका लहानग्या लक्षद्विपावर बांधला असून.. तो तिनही बाजूंनी समुद्राने वेढला आहे.. किल्ल्याच्या दर्शनी भागातील विस्तीर्ण तटबंदी भव्य भिंत आणि समोर खंदक बांधून सुरक्षित केली आहे.. किल्ल्याच्या मध्य भागात पठार असून तटबंदीच्या कडेने दाट झाडी आहे.. हा किल्ला सौंदतीच्या राजाने बांधला आणि तो पोर्तुगीजांनी जिंकून घेतला आणि किल्ल्यावर तोफांचा पहारा ठेवला.. सध्या किल्ल्यामध्ये २०-२२ तोफा पाहायला मिळतात..
किल्ल्याचा इतिहास जरी अज्ञात असला तरी किल्ला प्रेक्षणीय आहे हे नक्की.. किल्ला पूर्ण पाहण्यास साधारण दोन तासांची सवड हवी.. तर अशा आडवळणावरील या दुर्गद्विपाला दिलेली एक भेट नक्कीच संस्मरणीय ठरेल यात शंका नाही..