ब्रम्हगिरी किल्ला / त्रिंबकगड (Trimbak / Bramhagiri Fort) – दुर्ग भंडार (durg bhandar fort)

वाटाड्या मार्ग :  त्र्यंबकेश्वर – जव्हार रोड –  खिंड – तिठ्याच्या अलिकडे डावीकडे – मग मुख्य रस्ता सोडून पुन्हा डावीकडे कच्च्या रस्त्याने मेटघरकडे – मेटघर – मेटघर किल्ल्याला खेटून असलेल्या वाडीच्या अलिकडे डावीकडे पायवाटेने वर चढायचं.. ब्रम्हगिरीचा डोंगर उजवीकडे ठेवत.. पायऱ्यांच्या वाटेकडे.. बांधीव पायऱ्यांनी त्र्यंबक दरवाजाने ब्रम्हगिरी चा गडमाथा गाठायचा..

त्रिंबक / मुख्य दरवाजा : त्र्यंबकेश्वर पासून गंगाद्वार कडे जाणारा रस्ता चालून आपण डावीकडे पायऱ्यांच्या मार्गाने पुढे जायचं.. इथे १०० पावलांवर उजवीकडे एक पुरातन दगडी बाधकाम असलेली धर्मशाळा.. इथून पुढे पायऱ्यांनी चढून वर गेल्यास एक लहानसा कातळकोरीव दरवाजा आणि आत.. एक प्रशस्त दरवाजा आहे.. इथवर येण्यास भूयारी कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग आहे.. दरवाजावर चंद्र आणि सूर्य यांच्या कोरलेल्या आकृत्या इथल्या निजामशाही अस्तित्वाच्या काही खुणा दर्शिवितो..

हत्ती मेटाची / दरवाजाची वाट : हा त्रिंबक किल्ल्यावर जाण्याचा दुसरा मार्ग आहे.. हा खडतर आहे.. या मार्गावर एक शिडी देखिल आहे. ब्रम्हगिरी वरील गौतमी मंदिराच्या मागे हा दरवाजा आहे.. किल्ल्यावर येण्यासाठी गंगाद्वार मार्गे ज्या कातळकोरीव पायऱ्यांनी आपण येतो .. हा मार्ग डोंगराच्या पलीकडच्या अंगाला डावीकडे आहे..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्गजवळचे गाव : त्र्यंबकेश्वर- २ किमी
किल्ल्याची निर्मिती : १२ व्या शतकात राज्य : महाराष्ट्र जिल्हा – नाशिक

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूस दिसणारा डोंगर म्हणजे ब्रम्हगिरी.. या डोंगरावर त्र्यंबकचा किल्ला आहे आणि त्याला एक जोड किल्ला आहे तो म्हणजे मेटघरचा किल्ला.. ब्रम्हगिरी चा डोंगर म्हणजे साक्षात शिवाचे रूप आहे असे भाविक मानतात.. या डोंगरावरील पाच शिखरे म्हणजे शिवशंभूची पाच रूपे आहेत: वामदेव, अघोर, ईशान, तत्पुरुष आणि व्योमजटा.. यातील सगळ्यात उंच शिखर म्हणजे ब्रम्हाद्री..  ब्रम्हगिरी किल्ल्यावर पाय ठेवणे पूर्वी निषिद्ध मानले जायचे पण काही शेठ लोकांनी इथे पायऱ्या बांधल्या आणि ब्रम्हगिरी वर भाविकांची पावले पडू लागली..

ब्रम्हगिरीच्या डोंगरावर .. गंगाद्वार, गोरक्षनाथ गुंफा, आणि १०८ शिवलिंग असलेली गुंफा आहे.. शंकराने जटा आपटल्या ते ठिकाण, गोदावरी उगमस्थान, वैतरणा नदीचे उगमस्थान..    ब्रम्हगिरी डोंगरावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.. एक पायऱ्यांचा मार्ग जो त्र्यंबक दरवाजातून गडमाथ्याकडे जाणारा.. दुसरा मागील बाजूस हत्ती (मेट) दरवाजातून जाणारा.. यातील दुसरा मार्ग कठीण आहे.. त्र्यंबक दरवाजातून वर जाणारी वाट मात्र थेट खालपासून वरपर्यंत पायऱ्याच पायऱ्या बांधल्याने सोपी झाली आहे..

मेटघर गावाच्या बाजूला ब्रम्हगिरी च्या डोंगरावर असलेल्या दुर्ग भंडार चे नाक दिसते.. पण इकडे वर जायची वाट मात्र ब्रम्हगिरी वरून जाते. त्र्यंबकेश्वर वरून गंगाद्वार कडे निघायचं.. ब्रम्हगिरी चा डोंगर दोन तिन टप्प्यांचा आहे.. चढण पार करताच थोडी सपाटी लागते.. इथे पुढे बऱ्याच मंडळींनी दुकाने थाटली आहे.. दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी जिथे उगम पावते ते ठिकाण उजवीकडे डोंगरकड्याच्या पायथ्याशी एक गुफेमध्ये आहे.. डावीकडे एक पायवाट दुतर्फा दुकानांच्यामधून जाते.. हा रस्ता आपल्याला थेट ब्रम्हगिरी च्या सोपनाकडे घेवून जातो.. २०-२५ मिनिटांची वाट तुडवून दगडी बांधीव पायऱ्यांचा मार्ग गाठायचा आणि ब्रम्हगिरी कडे निघायचं.. ब्रम्हगिरी च्या ५० एक पायऱ्या चढताच  उजवीकडे एक दगडी कोरीव खांब आणि कमानी असलेली वास्तू नजरेस पडते.. हि धर्मशाळा आहे.. वाटसरुंसाठी क्षणभर विश्रांतीची जागा.. या धर्मशाळेच्या मागे एक पाण्याचे टाके आहे..    काही क्षण धर्मशाळेची बांधणी न्याहाळून पुन्हा पायऱ्या चढण्यास सुरुवात करायची..  

पायऱ्यांनी वर सरकताना.. वाटेत एक हनुमानाचे भव्य शिल्प पाहायला मिळते याशिवाय ब्रम्हदेवाचे एक शिल्प कातळात कोरले आहे.. कातळाच्या पोटातून कोरलेला सोपान चढून आपण गडमाथ्यावर दाखल होतो.. इथून उजवीकडे पाण्याचे एक टाके आहे.. पायऱ्यांन पाठ करून समोर पाहिल्यास डावीकडे ब्रम्हगिरीचा सर्वोच्च माथा असलेले टेकाड आणि उजवीकडे आणखी एक टेकाड दिसते या दोन टेकाड जोडणारी धारेवर चढायचं.. आणि पलीकडे उतरायचं.. इथे डावीकडे गेल्यास.. गौतम ऋषींनी तपश्चर्या जिथे केली ते स्थान आहे.. एक लहानसा मठ आहे इथे.. इथून मागे फिरून डोंगरकड्याच्या काठाने चालत आपण शंकराच्या जटा स्थानाला येऊन पोहोचतो.. शंकराने जटा आपटून गंगा इथे अवतरल्याची आख्यायिका आहे.. या मंदिराच्या मागून एक वाट दुर्ग-भंडार किल्ल्याकडे जाते..

दुर्ग – भंडार किल्ला / मेटघरचा किल्ला

जटास्थानाच्या मागे एक टेकाड आहे याला उजवीकडे ठेवत एक निमुळती वाट.. आपल्याला दुर्ग-भंडार कडे जाणाऱ्या भुयारी कातळ जिन्याकडे घेवून येते.. हा १५० पायऱ्यांचा जिना उतरून जाताच एक चौकट दिसते.. ती रांगून पार करताच एक निमुळती वाट समोरच्या डोंगराकडे जाते.. तिथे पोचताच आणखी एक झरोका आपल्याला भूयारी मार्गाने पल्याडच्या डोंगर माथ्याकडे म्हणजे दुर्ग भंडार कडे नेतो.. या किल्ल्यावर बुरुज, पाण्याची टाकी आणि सैनिकांच्या पहाराच्या जोती आहे..